सत्व

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
30 Dec 2016 - 3:17 pm

सूर्याकडून तांबूस सोनेरी किरणं उसनी घेऊन उल्हासित झालेली पहाट श्री.दिक्षीत यांच्या दारावर हळुवार थाप मारू लागली होती परंतु उशिराच्या जागरणामुळे असेल किंवा रात्रीच्या पार दुसऱ्या प्रहरी लागलेल्या झोप यांमुळे असेल श्री.दिक्षीत तिच्या गोड हाकेला प्रत्युत्तर देत नव्हते. आपल्या सोनेरी रूपावर भाळून स्वागताला येणाऱ्या दिक्षीत यांची तिला अगदी सवयच होऊन गेलेली होती. परंतु आज ते बाहेर येत नाहीसं पाहून तिला अचंबा वाटला. थोडावेळ वाट पाहून थकलेली पहाट मोत्यासारख्या शुभ्ररुपात त्यांच्या दरवाजात अवतरली.
अगदीच नाईलाज झाला तसे श्री. दिक्षीतानी दरवाजा उघडला....... एक अगदी हवीहवीशी, मंद झुळूक पाहुणीच्या रुपात अंगाला बिलगली. अन कानामध्ये एक अवीट गोडीचे भावगीत गुणगुणू लागली. त्यांनी भोवती पाहिले. एकदम रम्य वातावरण, कुठेही जळमट नसणारी... आल्हाददायक पहाट, पक्षांचे गुंजारव, वाऱ्याबरोबर होणारी पानांची एका सुरातील सळसळ..... अगदी मदहोश करणारे वातावरण ! अप्रतिम..... !
त्यांच्या मनामध्ये क्षणभर विचार आला. रोजचेच पक्षी ! वारा ! वातावरण ! मग आज आपणास ते हवेहवेसे का वाटताहेत ? वठत चाललेल्या मनास पालवी फुटून पुन्हा जगण्याची इर्षा निर्माण का व्हावी ? ही जगावेगळी अभिलाषा आपल्या मनामध्ये का उत्त्पन्न व्हावी ?
त्यांनी आपल्या अंगाभोवती शाल लपेटून घेतली अन पाण्याची झारी घेऊन ते अंगणामध्ये ठेवलेल्या कुंडीमध्ये पाणी शिम्पू लागले. त्यांनी पाहिले कुंड्या अस्ताव्यस्त होत्या. काही फुलांची रोपे कोमेजू लागली होती. पांढऱ्या निशिगान्धाकडे लक्ष जाताच त्यांच्या मनास धक्का बसला. त्याच्या मुळ्यामध्ये जोर होता तरी ते वरून खाली सुखत चालले होते. त्यांनी झारीतील पाणी त्याच्या मुळात शिंपले. त्याच्याजवळच बसून त्याचं मन भूतकाळात डोकाऊ लागलं -------
पांढरा निशिगंध आपणास खूप पसंद होता कारण तिलाही तो खूप आवडायचा. आपल्यापेक्षा तिलाच जास्त. आपण जेव्हा ओंजळीमधून फुले न्यायचो, तेंव्हा लहान मुलासारखी आनंदून जायची. बाळबोध चाळे काय करायची. अगदी अधीर होऊन आपल्याच ओंजळीत फुलांना भरभरून हुंगायची. अन हळुवार कोमल हातांनी त्यातील दोन फुले वेणीमध्ये मळायची. डोळ्यांमध्ये मृदुता, आर्जव, मार्दव घेऊन " कशी दिसतात ? " विचारायची. आपण 'अप्रतिम ' म्हणण्याच्या बदल्यामध्ये तिच्याकडून सुरेश भटांचे कोणतेही एक भावगीत म्हणवून घ्यायचो. तिच्या गोड आवाजाने कान तृप्त झाल्यावर मग आपण 'अप्रतिम ' म्हणायचं. आणि मग ती खुदकन हसायची, हसताना तिच्या गालावर पडणारी ती मोहक खळी, तिचा तो लडिवाळ अविर्भाव पाहून वाटायचं, वाटायचं कि आयुष्यभर हिच्या केसामध्ये फुले माळावीत. परंतु नियतीनं ते भाग्यही आपणांस दिलं नाही. कॉलेज संपण्यापूर्वीच दोघांच्या भिन्न - भिन्न रस्त्याविषयी जाणवलं. ' प्रेमात चूक या शब्दाला थारा नाही' म्हणूनच चूक कुणाची या गोष्टीवर कधी विचार करत बसलो नाही. ठेचाळत्या अवस्थेत आपण जीवनाच्या रखरखीत फुफाठ्यातून चालत राहिलो. आणि त्या उष्ण फुफाठ्यानच मग घाव भरण्याचं काम केल. मात्र तिची आठवण म्हनुनच आपण ही बंगली बनवली तेंव्हा हा पांढरा निशिगंध आपल्या हातांनी फुलवला, वाढविला, जोपासला. जेंव्हा रात्र तिच्या आठवणींनी कासावीस करी तेंव्हा तो निशिगंध तिच्या रुपात येउन आपणास थोपवयाचा अन हळूवार निद्रेच्या स्वाधीन करायचा. एक झटका बसावा तसे श्री. दिक्षीत भानावर आले.
आज त्याची ही अवस्था पाहून त्यांच्या मनामध्ये एक उसण भरली. त्यांच्या अंतर्मनाला एक अपराधाची
बोच लागली. कित्येक दिवसामध्ये आपण त्याच्याकडे लक्षच दिले नाही म्हणून कदाचित त्याची ही केविलवाणी
अवस्था झालीय. आज माळ्याला चांगला फैलावर घेतला पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला अन क्षणात
नाहीसाही झाला. कारण तो तरी कोणकोणती कामे एकदम करणार होता ? घरातील दुधापासून भाजीपाला आणून
स्वयंपाक करण्यापर्यंतची सर्व काम तो बिचारा एकटाच तर करत होता. तशी चूक आपल्याच हातून झाली होती. आपण आपल्या भावनांचं रक्षण करण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवणेच चूक होते. ती चूक पुन्हा होता नये अशी मनाची समजूत घालून ते आत आले. अंघोळ, नाष्टा उरकून ते बाहेर पसेजमध्ये सोडलेल्या पाळणाखुर्चीमध्ये वर्तमानपत्र वाचत बसले. मात्र त्यांचे लक्ष त्यामध्ये लागत नव्हते. ते उठून पेंसेजमध्येच फेऱ्या मारू लागले.
आजची सकाळ एका निवृत्त प्राध्यापकास रम्य वाटली होती. कित्येक दिवसानंतर त्यांच्या मनाचा एक कप्पा हळुवार भावना बाहेर ओतू पाहत होता. त्यांना आठवलं, या अगोदर फक्त माया च्या सहवासातच फर्गुसन कॉलेजला शिक्षण घेत असताना आपली अशी अवस्था होत होती. मात्र आज खूप वर्षांनी पुन्हा ती हवीहवीशी संवेदना मनाचं तळ ढवळून काढत होती. उताराला लागलेल्या देहाला पुन्हा वर खेचू पाहत होती. त्यांच्या लक्षात आलं -
काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे सारसबागेमध्ये फेरफटका मारण्यास गेल्यावर, विश्रांतीसाठी लहान वृक्षाशेजारी बसल्यानंतर एक भावगीत त्यांच्या कानी आलं. आणि पहिल्या ओळीनेच त्यांच्या हातापायाला जडत्व आणलं. ते निश्चेष्ट झाल्यासारखं प्राण कंठात आणून ते भावगीत ऐकत होते. गीत संपल्यानंतरही ते बराचवेळ त्या अवस्थेमध्ये
होते. एकदम मंत्रमुग्ध ! नकळत त्यांच्या ओठातून 'अप्रतिम' शब्द निघून गेला. मात्र त्या स्त्रीच्या अन तिच्याबरोबर
असणाऱ्या लहान मुलाच्या संवादांनी त्यांचा तो आवाज हवेतच विरला. त्यांच्या संभाषणावरून तो मुलगा तिचा नातू
असावा. श्री. दिक्षीताना तिच्या गोड गळ्याबद्दल अभिनंदन करण्याचा मोह होत होता. गडबडीने दिक्षीत उठले मात्र फिरून सामोरे जाण्याअगोदरच ती स्त्री आपल्या नातवाचा हात धरून चालू लागली होती.
अगदी तेंव्हापासून श्री. दिक्षीतांचे मन सैरभैर होते अगदी तसाच आवाज, तोच गळा , सुरेश भटांचेच झुलवत ठेवणारे, फुलवत घेवून जाणारे काव्य ! कसे शक्य आहे ? रात्रीच्या पहिल्या प्रहरी त्यांच्या समोरून कॉलेजमधील तारुण्याचे ते दिवस जसेच्या तसे सरकू लागले होते.
पेंसेजमध्ये फिरत असतानाही त्यांना कालच्या या सर्व गोष्टी आठवत होत्या. त्या गोष्टींनी ते अगदी अस्वस्थ होत होते. त्यांच्या नकळतच त्यांच्या मनाने त्या स्त्रीला भेटून तिच्या आवाजाला दाद देण्याचा निर्णय घेतला तेंव्हाच त्यांचे मन शांत झाले.
*************

"नमस्कार ! मी प्रा. श्री. रामचंद्र दिक्षीत."
" नमस्कार ! मी श्रीमती संगीता जोग. पण आपली पूर्वीची ओळख आहे ?"
" अगदी कालची ! परंतु म्हणालात तर खूप वर्षापूर्वीची. "
" मी समजले नाही."
" मी आवाजाची ओळख सांगितली. काल तुम्ही फार छान भावगीत म्हणालात."
" आभारी आहे. निखिलने खूपच आग्रह केला अन धमकीही दिली."
" धमकी?"
" धमकीच म्हणायची कारण एकट्या त्याचाच लळा आहे हे तो लबाड जाणतोय. म्हणूनच 'गीत नाही म्हटलं तर तो माझ्याबरोबर पुढच्या रविवारी माझ्याकडे येणार नाही' म्हणाला. हो.. पण... मी खूपच हळू आवाजात ते म्हटलं होतं."
" हो ! ना ! परंतु मीही खूप दूर नव्हतोच. म्हणूनच एक 'अप्रतिम' काव्य ऐकण्याचा योग आला. आणि काही आठवणी पुन्हा पल्लवित झाल्या. खरे तर यासाठी प्रथमता निखीलचेच आभार मानले पाहिजेत. कुठे आहे तो ?"
" नाही आला. आठवड्यातून फक्त एकदाच तो माझ्याकडे असतो. "
" म्हणजे ? "
" तो माझ्या मुलीचा मुलगा. आणि रविवार फक्त आम्हां दोघांचा असतो. चला मला निघायला हवं."
" आणखी बोलता आलं असतं तर छान वाटलं असतं. ठीक आहे. निघूया. उद्या बोलू."
" शक्यता कमी आहे. कारण उद्यापासून मी इथे येणार नाही आहे."
" बाहेरगावी असता का ?'
" नाही. इथेच पद्मावतीला राहते मी. परंतु एक दुवा होता तोही आता निसटतोय."
" म्हणजे ? चला, स्वारगेटपर्यंत चालत चालत बोलू." असं म्हणून श्री. दिक्षीतही उठून चालू लागले.
" म्हणजे माझ्या जावयांची बदली मुंबईला झाली आहे." ....."हं..." असा सुस्कारा सोडून त्या पुन्हा म्हणाल्या. " आता पुन्हा ते वैराण वाळवंठ, पुन्हा तो अधाशी एकटेपणा खायला उठेल. असो, माझ्या गाण्याचं कौतुक करण्यासाठी आलात त्याबद्दल धन्यवाद !"
****************

रात्री अंथरुणावर श्री. दिक्षीत विचारामध्येच गुरफटले होते. त्यांनी झोपेची आळवणी करूनही ती त्यांना प्राप्त होत नाहीसं पाहून त्यांनी व. पुं. चं पुस्तक हाती घेतलं. परंतु त्यामध्येही त्यांचं लक्ष लागत नव्हतं. एक अज्ञात शक्ती त्यांना आपल्याकडे खेचत असल्याचा भास होत होता. आणि या एका विचाराने ते खूपच हादरून गेले. नाही ! कधीच नाही ! आपण केलेल्या तपस्येचा अंत असा होणे बरोबर नाही. आपण जे जीवापाड जपले ते सत्व एका वादळाने येऊन घेऊन जाणे बरोबर नाही. आजपर्यंत तिच्या आठवणींवर आपण जगायचं ठरवलं आणि तारुण्याची वर्षे अविवाहित , प्रपंच त्यागून घालवली मग त्याला अर्थ तो काय ? आपण केलेला तो त्याग फक्त देखावाच राहणार.... ? कसं शक्य आहे... ? परंतु ती अज्ञात शक्ती त्यांना आपल्याकडे आकृष्ठ करण्यासाठी प्रलोभने दाखवू लागली. गतआयुष्याच्या जीवनामध्ये डोकावण्यास भाग पाडू लागली. त्यावेळी केवळ नोकरी नाही म्हणून सर्टीफिकेटला रद्दी म्हणणारा तिचा बाप......! आणि केवळ आजारी पित्याची इच्छा म्हणून तिने स्वीकारलेली वेगळी वाट ....... अनपेक्षितपणे सात वर्षांनी पतीसोबत भेटल्यानंतर त्याची ओळख करून देतानाची तिच्या चेहऱ्यावरील परिपूर्णता ....... यामध्ये कुठेतरी त्याला जाणवलेली त्याच्या प्रेमाची उपेक्षा ...... या सर्वांची आठवण ती अज्ञात शक्ती त्यांना करून देऊ लागली. आयुष्याच्या उतरणीवर दिलासा देणाऱ्या माणसाची गरज, संपूर्ण जीवनातील भकास क्षण , कधीही हवीहवीशी न वाटणारी संद्याकाळ अन कधीही उल्हासित न करणारी सकाळ ...... यांची जणू उजळणीच त्यांना होत होती. त्यांचं मन आता त्यांच्या हातून निसटून जाण्याचा प्रयत्न करू लागलं. मात्र त्यांच्या त्याग , सत्व , तपस्या यांना ते मुळीच मान्य नव्हतं. जवळ जवळ अगदी निसटत्या क्षणी त्यांनी त्या अज्ञात शक्तीवर विजय मिळवला. त्यांनी मनाची ठरवलं कि आता कधीच त्या मोहाच्या वाटेवर जायचे नाही.
मात्र चारच दिवस उलटले असतील. त्यांना आपल्या मनाची चाललेली तळमळ गप्प बसू देईना. त्यांनी या रात्री अक्षरशः दिवसासारख्या जागून काढल्या होत्या. त्यांनी मनाचा ठाम निर्णय केला. अन त्यांची पाऊले पुन्हा सारसबागेकडे वळली. बागेच्या कमानीतून खाली उतरतानाच त्यांची नजर सर्वत्र शोध घेऊ लागली. परंतु अपेक्षित असं
काही त्यांच्या नजरेला गवसत नव्हतं. त्यांनी खाली येऊन संपूर्ण फेरफटका मारला. एकदम शून्य ! बाजूच्या पेशवे पार्कमध्ये जाऊनही पाहिलं. छे ... नाहीच ! ते निराश मनानी घरी आले. पुन्हा रात्रभर तळमळ ! तगमग !
हे चक्र साधारण पाच दिवस चालले. अगदी व्यर्थच ! आणि आज मात्र ते मनात म्हणाले - ' आज नाही तर कधीच नाही ' ते कमानीतून खाली उतरू लागले, इतक्यात त्यांची नजर समोर गेली अन ते एकदम आनंदून गेले, थोडेसे गोंधळलेसुद्द्धा ! काही क्षण पाऊले घुटमळली ! मात्र त्यांचं लक्ष जाताच त्यांच हसल्या. अन हात करत त्यांच्याकडे चालत येऊ लागल्या. क्षणभर श्री. दिक्षीतांना आपण काही चूक तर करत नाही ना ? असं वाटून गेलं.
" नमस्कार दिक्षीत. ! मी तुम्हालाच शोधत होते, म्हटलं 'आज नाही तर कधीच नाही.”
दिक्षीतांनी नमस्कारासाठी हात जोडले.
"अगदी माझ्या मनातलं बोललात. मीही हेच ठरवून आलो होतो. गेले चार - पाच दिवस झाले तुम्हालाच शोधत होतो, परंतु आपण भेटला नाहीत, आज मनांत म्हटलं ' आज नाही तर कधीच नाही' "
दोघही अगदी मनमोकळेपणाने हसली. अन एका रिकाम्या बाकाड्याकडे चालू लागली.
"आपल्याही मनांमध्ये तेच विचार होते तर ? आता पुढे त्याचा आपणास कितपत उपयोग होईल. सांगणे कठीण आहे."
" मी समजलो नाही."
“श्रीधरनेही अशीच ओळख नसताना मैफल संपल्यावर एकदम व्यासपीठावर येऊन गळ्याला दाद दिली होती. पत्रकार होता तो. काही दिवसांनी पुन्हा एका मैफिलीमध्ये भेटला अन माझ्याजवळ माझ्या मैफिलीबद्दल लेख लिहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आमचे भेटणे वाढले. आणि एके दिवशी आम्ही घरचा विरोध पत्करून आंतरजातीय विवाह केला. लग्नाची काही वर्ष अगदी सुखात गेली. आमच्या प्रपंचलतेवर एक कोमल फुल उमललं. श्रीधर खूपच कौतुक करायचा तिचे. लाडाने तो तिला 'भातुकली' म्हणायचा. एक दिवस लेख घेऊन कोणत्या झोपडपट्टीतून घरी आला. त्यांच्या जीवनाविषयी तळमळीने बोलला. आठ दिवस तिथले पाणी पिल्यामुळे थोडासा सर्दी, खोकला होता. औषध घेऊनही खोकला वाढत गेला. आणि एक दिवस खोकता खोकता रक्ताची उल्टी झाली. सर्व फ्रीज ! जिथल्या तिथे ! माझा तर आधारच गेला. मात्र त्यातूनही उठायचं ठरवलं, कारण श्रीधरने माझ्या हातामध्ये तिची आवडती 'भातुकली' दिली होती.......
पुन्हा मैफिली करायचं कटाक्षानं टाळून नोकरी पत्करली. आमच्या 'भातुकलीला' खेळण्याच्या विश्वातून बाहेर आणून वास्तव जगात प्रवेश करण्यास सहाय्य केलं. मात्र याकामी दुसरीकडे माझं असं काहीतरी हरवत गेलं. लग्नाच्या ऑफर खूप आल्या काहींनी मुलीसह तर काहींनी एकटीला पसंद केलं. परंतु प्रत्येकाला नकार देत आले. प्रत्येकवेळी श्रीधरचा हसरा चेहरा दिसू लागायचा अन तोंडातून नकळत नकार बाहेर यायचा. काही - काही वेळा भावनेवरती शरीर विजय मिळवू पहायचं. त्यावेळी खूप कष्ट पडायचं. मात्र त्याला हरवावच लागे. आज आमच्या 'भातुकली'चा उमललेला, फुललेला संसार बघताना कृतःकृतः वाटतं. सर्व भरून पावते...........”
खूप दिवसांनी, खूप दिवसाचं, साठवून ठेवलेलं श्रीमती जोग श्री. रामचंद्रांना अगदी विश्वासानं सांगत होत्या. बराच उशीर बोलल्यामुळे त्यांना थोडा थकवा जाणवत होता. थोडावेळ विश्रांती घेऊन त्या पुन्हा बोलू लागल्या.
" मात्र परवा तुम्ही माझ्या गळ्याला ओळख नसताना दाद दिलीत अन मला पुन्हा श्रीधरची आठवण झाली. मन पुन्हा सैरभैर झालं, पुन्हा बंडाळी करू लागलं. म्हटलं हा एकटेपणा आपणांस यापुढे साहणार नाही. आपणांस हा उतार उतरताना मानसिक आधाराची गरज आहे. आठवड्यातून एकदिवस भेटणारा निखीलही आता भेटणार नाही, तेंव्हा तर प्रकर्षाने आपणांस एका हळुवार माणसाची गरज आहे. असा माणूस ज्याच्या मनात संवेदना राहत असतील. अश्या माणसाची आपणांस गरज आहे याची मनास जाणीव होऊ लागली. आणि त्याचवेळी माझ्या डोळ्यापुढे तुमचा चेहरा येत राहिला अन त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून मी इथे तुम्हांला शोधत राहिले. कदाचित तीन - चार दिवस तुम्ही इथे आलाच नाहीत. या चार दिवसात माझं उसळणारं, भरती आलेलं मनही श्रांत होऊन ओहोटीला लागलं. घरी बसून मी विचार केला कि, नको…, नाही… ! हे चूक आहे. आपण जे करतोय ते बरोबर नाही. पतीच्या पश्च्यात शील जपण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावलं. आयुष्याबरोबर लावलेला तो ‘पण’ आपण जिंकला. समाजाने अनेक प्रलोभने दाखवली. मात्र आपण त्याच्यापासून अलिप्त राहून समाजाला वाकुल्या दाखवल्या. त्याला कोठेही बोट ठेवण्याला जागा ठेवली नाही. मात्र आज केवळ एका क्षणासाठी , जो आपल्या आयुष्यात नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी आला आहे. त्या क्षणांसाठी आपण आजपर्यंत कमावलेला, मिळवलेला संयम , सर्वस्व यांची एकदम आहुती द्यावी ? हे माझ्या मनांस पटले नाही. तुमच्या भावूक डोळ्यांनी माझ्याशी बोलणी केली होती. शिवाय आपणही बोलता – बोलता आपल्या जुन्या आठवणींविषयी बोलला होतात. म्हणून मनांत म्हटलं आपणांस असं तळमळत सोडण्यापेक्षा सत्यस्थिती कथन करावी. मला माफ करा, पण आपणच 'समाजाच्या दृष्टीने आपल्या वयाचा, अन आपल्या दृष्टीने आपण केलेल्या त्यागाचा ' विचार करून आपल्या मर्यादा आपल्यापुरत्या ठरवणे योग्य होईल. आपणच आपले मर्यादाचे वर्तुळ मोडून टाकायचा प्रयत्न करणे बरोबर नाही. जे वर्तुळ जाणीवपूर्वक आपण
आपल्याभोवती निर्माण केलेलं आहे. मात्र असं व्हायला नकोय. कारण मग आपण केलेल्या बलिदानाची , तिळ तिळ तुटत घालवलेल्या एकेका क्षणांची क्षणात राख होऊन जातेय."
श्री. दिक्षीत या बोलण्यांनी खूपच प्रभावित झाले होते. अगदी मंत्रमुग्ध ! ते अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहत होते. एकदम सुरवातीला आपल्या मनांत उमठ्णारे तेच बोल ते त्यांच्या तोंडून ऐकत होते. परिस्थिती वेगळी असली तरी दोघांचा त्याग सर्वस्वी एकच होता. आणि हे ऐकत असतानाच त्यांच्या मनावर विजय मिळवलेल्या त्या अदृश्य शक्तीची धार बोथट होत होती. त्यांचं ते तपस्वी मन पुन्हा उजळून निघत होतं.
" खूपच छान विश्लेषण केलंत. खर तर माझीही स्थिती काही काळ दोलायमान झाली होती. मात्र तुमच्या एकेक शब्दानिशी माझं कमकुवत होत चाललेलं मन पुन्हा उभारी घेऊन आपल्या पूर्वीच्या मताशी ठाम उभं राहिलं आहे. आजपर्यंत कुणीही आपल्याकडे बोट करू नये असं वागत आलो. काही - काही वेळा त्याविषयी मन अगदी संदिग्ध होत होतं. मात्र आता ती काळजीही नाही."
"खूप वेळ झाला. आपण निघूया आता."
" हो - हो निघुयाच अगदी ! परंतु कधीही एकटेपणा वाटला तर माझ्या घरी निसंकोच स्वागत असेल तुमचं. अं ….माझा पत्ता ......?"
"आभारी आहे. परंतु आता त्याची गरज नाही."
"मला कळेल असं बोला."
"म्हणजे असं कि, यापुढे आपण कधीही भेटणार नाही आहोत. अगदी वृद्धापकाळातील मित्र म्हणूनही नाही. कारण आजचा संयम, दृढनिश्चय ठाम राहील कि दिवसेंदिवस कमकुवत पडत जाईल हे सांगणे कठीण आहे. कदाचित भविष्यात मग आपल्या स्वागताला स्वार्थही उभा राहील."
" माझ्या म्हणण्याचा उद्देश तो नव्हता पण आता निखीलही मुंबईला ..........."
" ते जरी खरं असलं तरी मी त्याची भेट घेण्यासाठी तिकडे जाऊ शकते. आणि मग हळुहळू तो इथं नसण्याचीही
सवय होऊन जाईल."
" माझा जे होतं ते चांगल्यासाठी' या गोष्टीवर प्रगाढ विश्वास आहे. चला, आपण आपल्या शेवटच्या भेटीचं सेलिब्रेशन कॉपी पिवून करू."
**************************

रात्री श्री. दिक्षीत अगदी मोहक वातावरणामध्ये घरी आले. वातावरण रम्य होतं कि त्याचं मनच रमणीय झालं होतं हे सांगता येत नव्हतं. परंतु फाटकातून आत येताच त्यांची गात्रं मोहरून गेली, सुगंधित झाली. ते मोहरल्या वातावरणात तसेच निशिगंधाच्या कुंडीजवळ आले. त्यांनी पहिले - निशिगंधाने पुन्हा जोर धरला होता. पुन्हा त्याच्यावर पांढरी फुले उमलून आली होती. चांदण्याचा प्रकाशात टपोऱ्या मोत्यासारखी दिसणारी ती पांढरी फुले त्यांना खूप मोहक वाटली. त्यांनी त्यातील दोन फुले आपल्या ओंजळीत घेतली अन घरामध्ये प्रवेश करत त्यांनी त्याचा सुवास ओंजळ नाकाजवळ नेत घेतला. पुनः पुन्हा ! अगदी भरभरून ! नकळत त्यांच्या ओठावाटे शब्द निघाले - "अप्रतिम !"

******************************* समाप्त ****************************************

लेखक : श्री. साजीद यासीन पठाण
मु : दह्यारी.
जिल्हा : सांगली ( महाराष्ट्र )

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

मराठी कथालेखक's picture

30 Dec 2016 - 3:50 pm | मराठी कथालेखक

छान कथा
पण म्हातारपणी प्रेम / आकर्षण असे खरंच काही वाटते का याबद्दल शंका आहे..

कपिलमुनी's picture

30 Dec 2016 - 4:47 pm | कपिलमुनी

मस्त लिहिल आहे !
बर्‍याच दिवसाने आले गाववाले !कुठे गायब ?

फारच सुंदर लिहिलंय.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

30 Dec 2016 - 6:20 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं लिहिलयं.

कपिलमुनीसाहेब आठवणीत ठेवल्याबद्दल धन्यवाद ! गेलेल्या, हरवलेल्या सोनेरी दिवसांवर एक लेख मालिका लिहतोय ...... "गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी" या सदरामध्ये ...... आंतरजालावर लवकरच घेऊन येतोय ....

पुन्हा एकदा आवडली.
पूर्वीही एकदा तुम्हीच टाकली होतीत ना?

ज्योति अळवणी's picture

31 Dec 2016 - 1:55 pm | ज्योति अळवणी

खूप सुंदर लिहील आहे. आवडली कथा. प्रेम कोणत्याही वयात होऊ शकत. आणि प्रेम नसलं तरी मैत्री तर नक्कीच होऊ शकते.

रातराणी's picture

31 Dec 2016 - 2:04 pm | रातराणी

सुरेख कथा!

अमितदादा's picture

31 Dec 2016 - 2:06 pm | अमितदादा

सुंदर. आवडली