आधी काहीतरी गोंधळामुळे अपूर्ण लेख प्रकाशित झाला. माझी काहीतरी चूक झाली. उरलेला भाग येथे देत आहे.
दादा विमनस्क होऊन समोर वाढलेल्या ताटाकडे पाहत होते. त्यांच्या डोळ्यात मन आणि मेंदू यांच्यातलं द्वंद्व स्पष्ट दिसत होतं. गरमागरम कांदा भजी, तिळाच्या गोड पोळ्या, तर्रीदार भाजी बघून त्यांच्या मनाची चलबिचल त्यांच्या चेहर्यावर दिसत होती. मला उगीच अपराध्यासारखं वाटत होतं. मी विचार केला की जेवण झाल्यावर हा विषय चर्चिला असता तर बरं झालं असतं. मी त्यांना थोडं मोकळं करावं म्हणून म्हटलो, "जाऊ द्या हो, तुम्ही रात्रीचं जेवण कमी केलं आहे ना? आणि शिवाय जिमही लावली आहेच; मग कशाला टेंशन घेता? एखाद्या दिवशी मनसोक्त खाल्ल्याने काही बिघडत नाही. मी तर रविवारी पोट फुटेस्तोवर खात असतो आणि लोळत असतो. चला जेवायला."
त्यांच्या चेहर्यावरचा ताण थोडा हलका झाल्यासारखा वाटला. यथावकाश जेवण झालं. थोड्या वेळाने दादा जायला निघाले. मी त्यांना खाली सोडून यावे म्हणून निघालो. दादा लिफ्टच्या दारासमोर येऊन उभे राहिले आणि त्यानी बटण दाबले. मी आणि माझी बायको कधीच लिफ्ट वापरत नाही.
"तुम्ही या लिफ्टने; मी येतो जिन्याने."
"का?" गोंधळून दादांनी विचारले. त्यांच्या चेहर्यावरची निरागसता बघून बघून किती निरागसपणे लोकं आपले पोट वाढू देत असतील याची जाणीव झाली.
"अहो, आम्ही कधीच लिफ्ट वापरत नाही."
"चला, मी पण जिन्याने येतो मग!" यावेळेस त्यांचं हसू मात्र छान होतं. गाडी काढून दादा निघून गेले.
मी विचार करत उभा राहिलो. खरच, ३-४ मजल्यापर्यंत जाण्या-येण्यासाठी धडधाकट माणसांना लिफ्टची गरज असते का? मी घरी किंवा कार्यालयात लिफ्ट अजिबात वापरत नाही. अगदी ४-५ मजले चढून जायचे असतील तरी मी लिफ्टचा वापर करत नाही. शिकागोमध्ये असतांना माझा फ्लॅट ४९व्या मजल्यावर होता. तिथे लिफ्टला पर्यायच नव्हता. तरीही सुरुवातीला ३-४ दिवस मी २-३ मजले जिन्याने चढून मग लिफ्टने जायचे असा प्रयोग करून पाहिला पण तो फार काळ टिकला नाही हे मी प्रांजळपणे कबूल करतो. माझं कार्यालय माझ्या घरापासून १.५ किमी होतं सकाळी उठून मी ताड्ताड चालत जात असे आणि परत येत असे. अमेरिकन लोकं चालण्याच्या बाबतीत अगदी आळशी असावीत असा माझा अंदाज आहे. त्यांना आश्चर्य वाटायचं. मागील ६ महिन्यात मी पुण्यात लिफ्ट वापरलेली नाही. अगदी वेगात जर जिने चढून गेलो तर ३ मजले चढायला लिफ्टने लागतो त्यापेक्षा कमी वेळ लागतो. शिवाय थोडे श्रम होतात हा फायदा आहेच. लिफ्टच्या कमी वापराने विजेची बचत होते आणि पर्यायाने पैशाची बचत होते. पर्यावरणाच्या रक्षणात तेवढाच खारीचा वाटा उचलला जातो तो वेगळाच.
माझ्या फ्लॅटच्या समोरच्या फ्लॅटमध्ये २ तरूण आणि थोडी स्थूल मुले राहतात. दिवसातून कितीतरी वेळेला ती मुले खाली जातात. लिफ्टशिवाय त्यांचं पान (की पाय?) अजिबात हलत नाही. १९-२० वर्षांच्या मुलांनी लिफ्ट वापरण्याची गरजच काय असा मला प्रश्न पडतो. मी आमच्या सोसायटीत माझ्या या सवयीचा परिणाम इतरांवर व्हावा असा प्रयत्न करत असतो. कितीतरी लोकांनी आता लिफ्ट वापरणे कमी केले आहे.
वजन कमी करतांना जर अशा छोट्या-छोट्या गोष्टींचा विचार केला तर इतर उपायांबरोबरच या गोष्टीदेखील चांगला परिणाम दाखवतात असा माझा अनुभव आहे.
कार्यालयातून घरी आल्यावर काही जण धाडकन सोफ्यावर बसतात आणि बराच वेळ बसूनच राहतात. शीण आलेला असतो दिवसभराचा. पण न बसता जर लगेच कपडे बदलून गार पाण्याने स्वच्छ हातपाय धुतले तर लगेच ताजेपणा जाणवतो. आल्यानंतर टीव्ही बघण्यात सगळी शक्ती घालविण्यापेक्षा घरात २ कामे केली तर शरीराला थोडी हालचाल होते. ७.३० ते ८ च्या दरम्यान रात्रीचे जेवण उरकून पायी फिरायला जाण्याने खूप फायदा होतो. रात्रीच्या जेवणानंतर कमीत कमी २.३० तास झोपू नये असे वैद्यकीय शास्त्र सांगते. रात्रीचे जेवण झाल्यावर किचनमध्ये थोडी मदत करणे, पायी फिरणे, वाचन करणे, मुलांसोबत खेळणे (खेळणे म्हणजे अगदी उड्या मारत संपूर्ण शरीराला वाकवत खेळणे, नुसतं "अले वा, किती छान हशतो, वा किती गोड आहे माझा शोनू, काय्-काय केलं शोनूने आज दिवशभर..." वगैरे सोफ्यावर बसून केलेली पोपटपंची नाही!) थोडा वेळ टीव्ही बघणे आदी गोष्टींमध्ये वेळ चांगल्या प्रकारे घालवता येतो.
कार्यालयात देखील २-२ तासाने ब्रेक घेऊन लांब फिरून येणे, जिन्याचा वापर करणे, लांबवर गाडी पार्क करणे, असात्विक अन्न (जंक फूड) टाळणे इत्यादी गोष्टी पाळल्या तर वाढत्या पोटाची चिंता कमी होण्यास मदत होते. शेवटी सगळं आपण पोटासाठीच तर करतो, खरं ना?
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 12:44 pm | सहज
गंमत आहे पहिला भाग अपूर्ण वाटला नाही.
अवांतर -अश्या लेखाच्या प्रवर्तकांनी न चुकता आपला पुरावा म्हणून सिक्स पॅकचा फोटो चढवणे अशी अट ठेवली तर हा शेवटचा लेख होईल का? ;-)
कधी कधी इतके अपराधी वाटते की जे काही काळ वेळ असेल ते न बघता व्यायामाला / पळायला जावेसे वाटते. आत्ता तसे होत आहे.
5 Feb 2009 - 12:52 pm | समीरसूर
आधीच्या भागाचे परीक्षण करून, काही फेरफार करून प्रकाशित करायचा मानस होता पण अस्मादिकांच्या चुकीमुळे तो प्रकाशित झाला. म्हणून तो अपूर्ण वाटत नसावा बहुधा. किंवा सदोष लेखनशैली असल्याने देखील असे झाले असेल. :-)
माझा सिक्स्-पॅकचा फोटो?? अहो, माझा असा फोटो इथे डकवला तर माझं पितळ उघडं पडेल ना? ;-) :-)
मी माझं वजन आणि पोट बर्यापैकी नियंत्रणात ठेवण्यात (त्या आधी आणण्यात) यशस्वी झालो आहे. खात्री करून घेण्यासाठी घरी जेवायला यावं लागेल. :-)
--समीर
5 Feb 2009 - 1:17 pm | अनिल हटेला
समीरजी !!
तुम्ही सांगीतलेले उपाय सोपे आणी साधेच आहेत !!
करायला हरकत नाही !! ट्राय करुन बघतो !!!
लेख आवडला हे वे सा न ल !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
5 Feb 2009 - 1:38 pm | नंदन
आवडला, समीर. मागे चतुरंगांनीही याबद्दल एक उत्तम अग्रलेख लिहिला होता. लेखात मांडलेला खाण्याचा आणि शारीरिक श्रमांचा ताळमेळ असायला हवा, हा मुद्दा अगदी बिनतोड आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Feb 2009 - 2:00 pm | शंकरराव
छान माहिती दिली आहे,
लेखात मांडलेला खाण्याचा आणि शारीरिक श्रमांचा ताळमेळ असायला हवा, हा मुद्दा अगदी बिनतोड आहे.
असेच म्हणतो