लिफ्ट आणि पोटाचा काय संबंध आहे हा प्रश्न बर्याच जणांना पडला असेल. अदनान सामीच्या "मुझको भी तो लिफ्ट करा दे..." यात जरी त्याने येनकेन प्रकारे नशीब उघडून आयुष्य जगण्याचा स्तर वाढवण्यासाठी देवाची करुणा भाकली असली तरी आयुष्यात सगळ्याच गोष्टी वाढणे ही तशी धोकादायक बाब आहे. पोट वाढणे ही त्यातलीच एक चिंताजनक बाब. पोटाचा घेर हा आयुष्यातल्या सुखासीनतेशी समानुपाती असतो असा माझा निष्कर्ष आहे. सुखासीनता वाढणे कदाचित चांगले असेल परंतु सुखासीनतेसोबत शरीराला आवश्यक असणारे श्रम कमी होणे हे मात्र घातक आहे. किंबहुना सुखासीनता याचे थेट नाते शारीरिक श्रमाशी आहे. बसल्या-बसल्या रिमोट कंट्रोलची बटणे दाबून आपल्याला हवे ते चॅनल लावणे ही सोय झाली पण कुठेतरी लपलेला रिमोट कंट्रोल शोधण्याचेही कष्ट न घेता दुसर्या कुणालातरी त्या कामाला लावणे ही आळसाची (आणि सुखासीनतेची देखील) परमावधी झाली. रात्रीचे जेवण घेतल्यानंतर लगेच हात पुसत-पुसत सोफ्यावर येऊन बसणे आणि नंतर तिथून उठून बेडरूममध्ये झोपायला जाणे या सवयीमध्ये पुण्या-मुंबई सारख्या शहरात फोफावणार्या महागड्या जिम्सचे आणि वजन घटविणार्या दवाखान्यांचे यश दडलेले आहे.
२-३ दिवसांपूर्वी आम्ही आमच्या पुण्यात एकट्या राहणार्या एका जवळच्या नातेवाइकाला जेवायला बोलावले. रात्री साधारण ८:३० च्या सुमारास ते घरी आले. माझा फ्लॅट तिसर्या मजल्यावर आहे. अपेक्षित असल्याने आणि लिफ्ट माझ्या फ्लॅटच्या दाराजवळ असल्याने लिफ्ट थांबल्याचा आणि दरवाजा उघडल्यानंतर होणार्या (संतापजनक) आवाजामुळे मी ते आले आहेत हे ओळखून दार उघडले. तेच होते. वय साधारण ४०-४१ वर्षे, उंची ५.७ वगैरे, कुठलाही गंभीर आजार नाही, मधुमेह किंवा रक्तदाब यांसारख्या आजकालच्या आवडत्या मित्रांशी मैत्री नाही, माझ्या माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत त्यांना कुठेलेच व्यसन असल्याचे ऐकीवात नाही. एकंदरीत निरोगी व्यक्तिमत्व असलेले किंवा भासणारे हे गृहस्थ आत आले. चेहरा थोडा चिंताक्रांत दिसत होता. नमस्कार करून ते खुर्चीत स्थानापन्न झाले. मी विचारले,
"काय दादा, खूप थकल्यासारखे दिसताय. बरं नाही का?"
"नाही रे, आता कार्यालयातून येता-येता जिमला जाऊन आलो त्यामुळे थोडं थकल्यासारखं वाटतंय."
"जिम? कशासाठी?" मला कारण स्पष्ट समोर दिसत होतं. ते 'कारण' खुर्चीच्या दोन्ही हातांच्या मधून ओसंडून खालच्या दिशेने धाव घेत होतं. होय, पोट! तेच ते जालीम पोट जे भरण्यासाठी माणूस जीवाचा आटापीटा करतो ; तेच ते गद्दार पोट आता दादांच्या मेंदूत चिंतेचे कारण बनले होते. काय गंमत आहे, पोट नाही भरले तरी माणसाला चिंता असते, कमी भरले तरी चिंता असते आणि तट्ट फुगले तरी चिंताच असते.
"अरे बाबा, हे पोट बघतोयस ना? किती प्रयत्न केले पण कमीच होत नाही रे. वैतागलो बघ पुरता. रात्रीचं जेवण कमी केलं, मिठाई बंद केली, पार्किंग मध्ये अगदी दूर गाडी पार्क करून पाहिली पण पोटाचा प्रश्न काही सुटत नाही. शेवटी जिम लावली. ८०० रुपये महिना! बायको सारखी ओरडत असते. ती म्हणते तुम्ही पुण्याला गेल्यापासून तुमच्या पोटाचा घेर दिवसागणिक वाढतो आहे."
"अरे बाप रे, म्हणजे जवळपास १०,००० रुपये वर्षाचे की! महाग आहे हे प्रकरण बरंच!"
"काय इलाज आहे बाबा आता, पोटासाठी करावं लागतं" असं म्हणून ते स्वतःच्या कोटीवर खोखो हसत सुटले. मी पण हसलो. आपल्याकडे बर्याच क्षुल्लक वाटणार्या गोष्टी हसण्यावारी नेण्याने त्यांचे गांभीर्य भविष्यात वाढत जाते असा माझा अनुभव आहे.
"पण मिठाई बंद केली म्हणजे काय?" दादा रोज नाश्त्यात अर्धा पाव पिस्ता बर्फी आणि अर्धा पाव काजुकतली खात असावेत की काय अशी मला शंका आली. शिवाय संध्याकाळच्या विचित्र भुकेच्या वेळी फक्त २-३ मलई पेढे खाऊनच समाधान मानत असतील की काय अशी देखील शंका आली. पुलंच्या "श्रीखंड-पुरी खाऊन कसे-बसे दिवस काढणे" या वाक्याची मला आठवण झाली.
"मिठाई अजिबात खात नाही; अगदी मुलगा एका परीक्षेत पास झाल्याचे पेढे पण नाही खाल्ले मी."
"वा, पण जिमच्या प्रशिक्षकाने डाएटींग सांगीतले आहे का? काही पथ्य वगैरे?"
"बिलकूल नाही. उलट ते तर म्हटले की सकाळी २-३ प्लेट पोहे खा, दुपारचं जेवण व्यवस्थित घ्या; ५-५.३० ला भरपेट खा आणि रात्रीचं जेवण मात्र थोडं कमी म्हणजे ४ पोळ्या खात असाल तर तीनच खा असे म्हटले आहे." हे सांगतांना त्यांचा चेहरा उजळला होता आणि डोळ्यांमध्ये एक चमक आली होती. बहुधा डाएटींगच्या महाकर्मकठीण अशा लफड्यातून आपण बचावलो याचा त्यांना आनंद झाला असावा.
"काय??? सकाळी २-३ प्लेट पोहे आणि संध्याकाळी पुन्हा भरपेट खाणं?? तुमचं दिवसभरात काही पायी चालणं किंवा जॉगिंग वगैरे होतं का?" मी डोळे विस्फारून विचारले.
"हो तर, पार्किंगमध्ये दूर गाडी लावल्यानंतर मी चालत कार्यालयात येतो आणि संध्याकाळी पुन्हा तेवढचं चालत जातो गाडी काढायला."
"किती होतं चालून?"
"तसा काही विचार नाही केला पण साधारण १० मिनीटे जातात दोन्ही वेळेला."
"म्हणजे १ किलोमीटर पेक्षाही कमी. पण अशा हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीत एवढं कमी चालून काही उपयोग नाही."
"म्हणून तर जिम लावली आहे ना!!" पुन्हा एकदा हास्य!
"आणि नाश्त्यात काय खाता?"
"सकाळी पोहे किंवा इडली आणि संध्याकाळी समोसे किंवा कचोरी किंवा वडापाव."
"हम्म्म्...एवढ्या नाश्त्याची आणि ते ही दोन वेळा खरच गरज आहे का तुम्हाला? तुम्ही दिवसभर बसून काम करता. शारीरिक श्रम जवळपास शून्य आहेत. तुमची दिवसाची कॅलरीची गरज जास्तीतजास्त १००० ते १२०० कॅलरीज आहे. तुमच्या या दोन वेळच्या नाश्त्यात तुमच्या ९०० ते १००० कॅलरीज होत असतील. मग दोन वेळच्या जेवणातून, चहा-कॉफीतून, कधी-मधी तोंडात टाकलेल्या खार्या शेंगदाण्यातून, सणा-वाराला दाबून खाल्लेल्या भजींमधून, पुरणपोळीमधून मिळणार्या कॅलरीज कुठे जाणार? त्या अनधिकृत झोपडपट्टी फोफावल्याप्रमाणे पोटावर साम्राज्य वाढवतात. मग तुमचा कॅलरी इन्-टेक कमी व्हायला नको का त्या प्रमाणात? तेव्हाच तुमच्याकडे अतिरिक्त असलेल्या कॅलरीजचा वापर होऊन तेवढी चरबी कमी होणार ना? रस्त्यावर काम करणार्या आणि ज्यांचं पोट खरच हातावर आहे त्यांना वाढत्या पोटाची चिंता का नसते? त्यांची दिवसाची कॅलरीज ची गरज २४०० ते २७०० एवढी असते कारण ते कष्टाचे काम करतात. शिवाय त्यांना पुरणपोळी (ती ही साजूक तुपात बुडवलेली), केक, पेस्ट्री, पिझ्झा, मिठाई, श्रीखंड इत्यादी पदार्थ सहजासहजी मिळत नाहीत. कदाचित म्हणूनच त्यांच्यात बेढब सुटलेली पोटे दिसत नाहीत आणि त्यामागून गनिमी काव्याने हल्ला करणारे रक्तदाब, मधुमेह, स्नायुंचे आजार, आम्लपित्त देखील दिसत नाहीत."
"पण आमच्या प्रशिक्षकाने तर अजिबात खाण्यावर कंट्रोल ठेवायचा नाही असे सांगीतले आहे." दादांनी थोडं कुरकुरीच्या स्वरात सांगीतलं. माझा निषेध करावा असं त्यांच्या मनात खदखदत होतं. त्यांना शक्य झालं असतं तर त्यांनी लगेच तो नोंदवला ही असता.
"त्याबद्दल मला खरच काही माहित नाही. त्यात तथ्य असेलही. काही नशीबवान असे असतात की त्यांची प्रकृती खूप शिडशिडीत असते. त्यांनी रोज पेढे-बर्फी चे जेवण घेतले तरी ते बारीकच राहतात. पण ज्यांची वातप्रकृती असते त्यांचे वजन नुसत्या हवेने पण वाढते. त्यांनी खाण्यावर नियंत्रण ठेवलेच पाहिजे आणि शक्य असेल तिथे आणि तेव्हा शारीरिक श्रमाची कामे केली पहिजेत असा माझा अनुभव आहे."
आता मात्र दादा अस्वस्थ झाले होते. मी त्यांच्या खाण्याच्या चैनीला आव्हान केले होते. शिवाय कमी झालेले पोट तसेच ठेवणे हे सत्यमचा कोसळलेला डोलारा परत उभारण्याइतकेच कठीण काम आहे असे मला वाटते. त्यासाठी खाणं आणि शारीरिक श्रम योग्य प्रमाणात असले पाहिजेत असं माझं मत आहे.
प्रतिक्रिया
5 Feb 2009 - 12:12 pm | भिडू
सहमत
5 Feb 2009 - 12:14 pm | सहज
छान लिहले आहे.
5 Feb 2009 - 12:16 pm | अनिल हटेला
लिफ्ट आणी पोटा बरोबर बरीच माहिती दिलीत !!
आवडेच !!!
पूलेशु...
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
27 Feb 2009 - 9:52 am | प्रकाश घाटपांडे
"खाण्यावर" च्या ऐवजी मी "शब्दावर"असे वाचले तरी फरक पडला नाही.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
27 Feb 2009 - 11:19 am | वेताळ
बिलकूल नाही. उलट ते तर म्हटले की सकाळी २-३ प्लेट पोहे खा, दुपारचं जेवण व्यवस्थित घ्या; ५-५.३० ला भरपेट खा आणि रात्रीचं जेवण मात्र थोडं कमी म्हणजे ४ पोळ्या खात असाल तर तीनच खा असे म्हटले आहे." हे सांगतांना त्यांचा चेहरा उजळला होता आणि डोळ्यांमध्ये एक चमक आली होती. बहुधा डाएटींगच्या महाकर्मकठीण अशा लफड्यातून आपण बचावलो याचा त्यांना आनंद झाला असावा.
असे त्याना नक्की सांगितले होते का? वजन कमी करताना जितकी व्यायामाची गरज आहे त्यापेक्षा ज्यादा आहारावर नियंत्रण गरजेचे आहे.चहा,कॉफी दिवसातुन एक दोन वेळ ठिक आहे किंवा टाळता आले तर बरेच.बाहेरचे जंकफुड खाणे बंद केले पाहिजे.भरपेट जेवण्यापेक्षा मोड आलेले कडधान्ये खाणे ,हिरव्या पालेभाज्या,फळे खाणे उत्तम.वरील आहार जर ते घेत असतील तर पोट कमी होणे कठिण आहे.
आजकाल मी मिपावरच्या पाककृती खुप कमी बघतो. पाकृ दिसली की खाण्यावर नियंत्रण राहत नाही.तशी घरी बनवुन खाण्याची खुप इच्छा होते.
वेताळ
27 Feb 2009 - 11:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
भरपेट जेवण्यापेक्षा मोड आलेले कडधान्ये खाणे ,हिरव्या पालेभाज्या,फळे खाणे उत्तम.वरील आहार जर ते घेत असतील तर पोट कमी होणे कठिण आहे.
अगदीच संपूर्ण सहमत नाही. कडधान्यं, पालेभाज्या, फळं, फळभाज्या खाव्यात, पण भरपूर खावं आणि पोट 'भरायला' ताक प्यावं. मला आमच्या जिममधल्या अर्ध्या डॉक्टरने (डाएटीशन) नारळाचं पाणी पिण्याची अनुमती दिली आहे. पण या पाण्याचं पुढे खोबरं होतं, त्यातूनच तेल मिळतं आणि तेल अर्थातच वजन वाढवतं, आणि हे त्या डाएटीशनला मान्य नव्हतं.
आजकाल मी मिपावरच्या पाककृती खुप कमी बघतो. पाकृ दिसली की खाण्यावर नियंत्रण राहत नाही.तशी घरी बनवुन खाण्याची खुप इच्छा होते.
१००% सहमत!
अर्थातच हा किस्सा आवडला ... असे अनेक लोक आजूबाजूला पाहिल्यामुळेही असेल, पण मज्जा आली वाचताना.
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
27 Feb 2009 - 11:44 am | वेताळ
एक आठवड्याचा कोर्स आहे. त्यात म्हने फक्त मोड आलेले कडधान्ये लिंबु पिळुन खायला देतात. असे मी एकले आहे.तसा प्रयोग मी सध्या करित आहे. एकवेळ जेवणा एवजी मोड,गाजर,काकडी व कोबी (कच्चा) खाणे.चहा ,कॉफी टाळणे. मला भातात दुध व दुधाची साय खायची खुप सवय आहे. तेहि आता बंद केले आहे.आणि हो ताका एवजी मी मठ्ठा पितो.जरा वेगळी चव लागते.ताका एवजी मठ्ठा चालतो काय?
अदिती नवीन काही माहिती असेल तर मला दे.
वेताळ
27 Feb 2009 - 11:45 am | अर्चिस
आहार नियंत्रणावर लेक्चर...............:). लेख आवडला
अर्चिस