स्पॉयलर अलर्ट लेवल: हाय !!!)
आशुतोश गोवारीकर हा एक प्रामाणिक सिनेमाकार आहे. तो जीव तोडून मेहनत करत सिनेमे काढतो. पण त्याचं दुर्दैव म्हणा किंवा प्रयत्नांची- अभ्यासाची कमतरता म्हणा, कुठेतरी कमी पडतो. त्याचा नवा 'मोहोन्जो-दारो'ही या लौकिकाला अपवाद नाही. लगान, जोधा अकबर यासारखं प्रत्येकवेळी मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढायाची हौस कितीही असली तरी चित्राच्या विषयात आणि ते चितारणार्या कुंचल्यात तेव्हढा दम हवा नाहीतर 'गवत खाणारी गाय' या चित्रासारखी त्याची गत होते आणि पाहाणार्याला गवतही दिसत नाही अन् गायही. मोहोन्जो-दारोचीही काहीशी अशीच अवस्था झाली आहे.
मी वर हाय लेवल स्पॉयलर अलर्ट दिला आहे, तो केवळ 'शास्त्र' म्हणून. खरं म्हणजे त्याची काही गरज नव्हती इतका हा चित्रपट 'फ्रेम टू फ्रेम' प्रेडिक्टेबल आहे. १९७० च्या दशकातील कुठल्याही मसाला सूडपटाची मोहोन्जो-दारो शहराच्या पार्श्वभूमीवरची कहाणी एवढंच या चित्रपटाच्या कहाणीबद्दल सांगितलं तरी ते पुरेसं आहे. लेखाच्या ओघात इतर तपशील येतीलच. असो.
काही जुन्या सिनेमांच्या सेंसॉर सर्टिफिकेटवर चित्रपटाची भाषा 'हिंदुस्थानी' (बहुधा तीच ती महात्मा गांधींची!) अशी लिहिलेली आढळते. ही 'हिंदुस्थानी' भाषा कोणती हे मला अजून समजलेलं नाही पण मोहोन्जो-दारो पाहिल्यावर मात्र त्यातील पात्रांची भाषा हीच ती हिंदुस्थानी भाषा असावी असं वाटतं. संस्कृतप्रचुर हिंदी वापरायची की हिंदीयुक्त ऊर्दू वापरायची की 'तुरंत'च्या ऐवजी 'तुरितो' , 'सोना'च्या ऐवजी 'सोन' वगैरे वेगळीच थिअरी वापरायची या गोंधळात संवादलेखिका पडली आहे. त्यातल्या त्यात समाधान म्हणजे हृतिक रोशनकडून स्पष्ट शब्दोच्चार करुन घेण्यात आले आहेत त्यामुळे त्याचे संवाद समजतात. ही रोशनच्या अभिनयातील सुधारणा अभिनंदनिय आहे. तसेच ४५०० वर्षांपूर्वींची प्राचीन नायिका चानी (पूजा हेगडे) एकविसाव्या शतकातील मॉडेल रॅम्प वर चालतात तशी सिनेमाभर वावरते आणि ओठाला ओठ न लागू देता बोलताना दिसते. एकविसाव्या शतकातील सिनेमाप्रमाणे हृतिक रोशन इथेही खांदे उडवत त्याच त्या स्टेप्स घेत नाचताना दिसतो. म्हणजे या गोष्टी किती प्राचीन आहेत हेही आपल्याला कळते.
जावेद अख्तर आणि ए.आर. रहमानची अनुल्लेखनीय व विस्मरणीय गाणी म्हणजे एक निराशाजनक सरप्राईज आहे. विशेषत: हरप्पाकालीन संगीताबद्दल फारशी काही माहिती उपलब्ध नसताना व सध्याच्या सिनेसंगीतात सूफी आणि पार्टीगीतांनी (पियानोवाली रडकी गाणी नव्हे तर 'चार बज गये लेकिन पार्टी अभी बाकी है' वाली बरं का!) वैताग आणलेला असताना गीत-संगीताबाबत अनेक प्रयोग करण्याची आणि नावीन्य आणण्याची एक उत्तम संधी वाया घालवण्यात आली आहे. 'मोहोन्जो...मोहोन्जो..दारो…' अशा सपक गाण्यांची तर नक्कीच अपेक्षा नव्हती.
चित्रपटाच्या एकूण टेकींग व ट्रीटमेंटवर ट्रॉय, ग्लॅडिएटर सारख्या रोमपटांचा तर काही ठिकाणी 'गेम ऑफ थ्रोन्स'चा प्रभाव स्पष्ट जाणवतो. कथानकावर तर मनमोहन देसाई व सलीम-जावेद इफेक्ट आहेच (हा आरोप नसून निरीक्षण आहे). चित्रपटाची विविध कारणांमुळे रखडलेली निर्मिती व त्यामुळे होणारे परिणामही सहज जाणवतात. उदा. स्पेशल इफेक्ट्स. विशेषत: क्लायमॅक्सच्या महत्वाच्या दृष्यांमधले इफेक्टस वेळ मारुन नेल्यासारखे, उरकल्यासारखे वाटतात. (कदाचित मी सिनेमा जिथे पाहिला त्या कार्बनचोर सिनेमागृहाचाही हा दोष असू शकतो. चूभूदेघे.) गाण्यांमधे नाचणारे उताडे, ग्लॅडिएटर-स्टाईल साहसदृष्यांमध्ये खचाखच भरलेले प्रेक्षागार, बाजाराची दृष्ये इत्यादी ठिकाणी सढळ हस्ते वापरलेली आणि दाखवलेली गर्दी ऐन क्लायमॅक्सला रोडावते व परिणाम उणावणारी ठरते. एकंदरीतच दिग्दर्शकाने मायक्रो पातळीवरचं डिटेलिंग प्रयत्नपूर्वक व पुरेसं केलं असलं तरी सर्वंकष पातळीवर जी एक भव्यता, एक स्केल आवश्यक होती, तिची उणीव भासते. त्यामुळे पडद्यावरची गोष्ट ही एका शहराची न वाटता पात्रांच्या वैयक्तिक वैमनस्याची एक साधारण गोष्ट वाटते. सिनेमा रखडल्यामुळे असेल की फायनल प्रॉडक्ट मनासारखे न बनल्यामुळे असेल, सिनेमाच्या जाहिरातीकडेही कुणी फारसं लक्ष दिलेलं दिसत नाही. नाहीतर इतका 'महत्वाकांक्षी' वगैरे चित्रपट असताना त्याचा माध्यमातील पेड 'हवा' ऐकू आली नाही. एकंदरीतच हा चित्रापट सिनेमाकाराने जीवावर आल्यासारखा, आता सुरू केलाय तर संपवणे भाग आहे, कर्ज घेतलेय तर फेडणे भाग आहे अशा नाईलाजाने बनवल्यासारखा वाटतो.
काही गोष्टींचा तर कथानकाशी काय संबंध आहे हे मला शेवटपर्यंत कळलंच नाही. कदाचित हा माझ्या तोकड्या आकलनशक्तीचा वा मधूनच गेटकीपरच्या चोरून घेतलेल्या डुलकीचा दोष असावा. उदा. प्रधान महम (कबीर बेदी) हा स्वत: नगरप्रमुख आहे. त्याला हाकलून लावणार्या हरप्पा शहराचा सूड म्हणून मोहोन्जो-दारो हे शहर त्याला हरप्पापेक्षाही समृद्ध करायचे आहे, इथवर ठीक आहे. पण तो स्वत:च प्रमुख असतानासुद्धा सुमेरीयन व्यापार्यांकडून सोन्याच्या बदल्यात शस्त्रांची तस्करी का करतो हे काही कळलं नाही. बाकी कबीर बेदीमुळे चित्रपट थोडा सुसह्य झाला आहे, हे मात्र खरं. तसेच शहराच्या शेजारीच मोठी नदी, धरण, जंगलं असताना हरप्पासारख्या कृषी संस्कृतीचे महत्वाचे शहर असणार्या संपूर्ण मोहोन्जो-दारो शहरात एकही झाड नसावं याचंही मला आश्चर्य वाटलं. अशा बर्याच गोष्टी आहेत. असो.
एक अत्यंत वेगळा विषय डेवलप करत नेण्याची शक्यता, गोष्ट सांगायला उपलब्ध अनोखी पार्श्वभूमी, ऐतिहासिक पोषाखपट बनवण्याचा पूर्वानुभव, ए.आर रहमान-जावेद अख्तरसारखे दिग्गज साथीदार, हृतिक रोशनसारखा 'सामान्य+' कुवतीचा का होईना परंतु एक मेहनती मुख्य अभिनेता इ.इ सगळ्या अनुकूल गोष्टी असताना मोहोंजो-दारो 'अप टू द मार्क' अनुभव का देत नाही, हा प्रश्न खरं म्हणजे दिग्दर्शकाला पडायला हवा पण तो माझ्यासारख्या सामान्य प्रेक्षकाला पडतो. याचं उत्तर दिग्दर्शकाकातीररो- यच्या मनात असलेल्या गोंधळात व निर्मिती रखडण्यात असावं.
माझ्या अंदाजाप्रमाणे असं झालं असावं- आपल्याला मोहोन्जो-दारो/हरप्पा संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर सिनेमा काढायचा हे आधी निर्माता-दिग्दर्शकाने नक्की केलं. मग त्यात 'ष्टोरी' भरली असावी ती साधारणत: अशी:- मोहोन्जो-दारोचा अचानक झालेला र्हास ही मुख्य 'इव्हेंट' दाखवायची हे ठरलं. मग याचं कारण म्हणजे पूर (पुरातत्व संशोधनात असलेल्या एका मतप्रवाहानुसार) हे ठरलं. मग हा पूर धरण बांधल्यामुळे आला (किंवा नियोजशून्य धरणांमुळे पूर येतो) असं दाखवून चार-साडेचार हजार वर्षांपूर्वींच्या कथानकाचा संबंध एकदम आजच्या काळातील अनिर्बंध विकास व त्यामुळे होणारा पर्यावरणाचा र्हास इत्यादींशी जोडायचा.(तसं हा सगळा भाग उत्तरार्धात येतो, जो अधिक रंजक आहे. कारण त्यावर जास्त काम झालं असावं.)
सोबतच मोहोन्जो-दारोत सापडलेले खालचे शहर- वरचे शहर हे वर्गभेदाचे प्रतीक आहेत असं सुचवायचं. एक दोन प्रसंगातून त्याकाळीही व्यापारी लोक शेतकर्यांचं शोषण कसं करत हे दाखवायचं. नायकाच्या तोंडी दोन-चार समाजवादी वाक्ये पेरायची. एकूण फोकस (व खर्च) मोहोन्जो-दारो 'जसं होतं तसं' उभं करण्यावर होत असल्यामुळे कथानकाकडे 'थोडं' दुर्लक्ष करत सोपं कथानक म्हणजे हिंदी सिनेमाचा ठरलेला फॉर्म्यूला अर्थात गरीब नायक- उच्चभ्रू नायिका, क्रूर खलनायक, नायकाचा विनोदी मित्र, करवलीसारखी मिरवणारी नायिकेची एक मैत्रिण, मुख्य नायक-नायिकांसोबतच त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये फुलत जाणारं राजेंद्र नाथ / मेहमूद छाप प्रेम इ. दिग्दर्शकाने निवडलं असावं. तसं असायला काही हरकत नाही, ते त्याचं स्वातंत्र्य आहे. परंतु इतक्या अनेक गोष्टी एकाच पिशवीत कोंबणं म्हणजे टू मच होतं.
मोहोन्जो-दारो दाखवताना त्यात एक 'ऑथेंटिसिटी' आणणं गरजेचं होतं. ती तशी आणण्याचा सिनेमाकाराने प्रामाणिक प्रयत्नही केलेला आहे. त्याबद्दल त्याला दाद द्यायलाच हवी. त्यामुळे हा सिनेमा फीचर फिल्म आहे की डॉक्युड्रामा आहे अशीही शंका मला सुरुवातीला आली. मोहोन्जो-दारोला वास्तवात सापडलेल्या व त्याची ओळख बनलेल्या प्रसिद्ध वस्तू व वास्तू उदा. पशुपति प्रतिमा, डांसिंग गर्लची मूर्ती, नाणेसदृश विटा, खापरं, ग्रेट बाथ, दुमजली घरं, रस्ते, बाजारपेठा इ. बर्याच तपशीलात दाखवल्या आहेत. पण 'ब्योमकेश बक्शी'विषयीच्या लेखात मी म्हणालो तेच पुन्हा म्हणतो, या सगळ्या गोष्टींची माहिती असण्याची अपेक्षा सामान्य प्रेक्षकाकडून करणे हे अति होतं आणि सिनेमा त्याच्या डोक्यावरुन जाऊ लागतो. तो तसा जावू नये म्हणून लेखक-दिग्दर्शक उरलेलं पूरक कथानक सोपं करण्याच्या मागे लागतो आणि सूचक की सोपं या गोंधळात पडतो.
सूचक की सोपं हा समतोल साधणं फार कठीण आहे. उदा. वास्तवातील मोहोन्जो-दारोत विकसित अशी सांडपाण्याची यंत्रणा होती असं आपण शाळेत कधीतरी वाचलं असतं. आता ही गोष्ट सिनेमात दाखवायची कशी? तर त्यासाठी दिग्दर्शकाने एक शक्कल लढवली आहे. एका मारामारीच्या सीनमध्ये मार खाणारं एक पात्र एका नालीत जाऊन धडपडतं. तिथे काही सेकंदांकरताच आपल्याला घराच्या मोरीतून नालीत जाणारं सांडपाणी आणि वाहणारी नाली दिसते. अशा वेळेला, 'अच्छा! तर त्याकाळी मोहोन्जो-दारोत नाल्यासुद्धा होत्या तर!' असं आपण आपलंच समजून घ्यायचं असतं. (इथे तुम्ही एक अभ्यासू प्रेक्षक आहात हे सिनेमाकार गृहीत धरतो.) हे झालं सूचक तर सामान्य माणसांची, शेतकर्यांची त्याकाळीही कशी पिळवणूक होत होती हे दाखवायला दिग्दर्शकाने अनेक संवाद आणि एका शेतकरी नेत्यासकट दोन-चार कार्यकर्त्यांचे जीव नाहक खर्ची घातले आहेत; त्याकाळी वस्तूविनिमयाने व्यवहार होत अशा शाळकरी गोष्टी सांगण्यासाठीही काही लांबलचक प्रसंग टाकले आहेत. हे झालं सोपं.(इथे मात्र तुम्ही सामान्य प्रेक्षक आहे अशी सिनेमाकार समजूत करुन घेतो.) अशा अनेक अनावश्यक फ्लिपफ्लॉप्सनी पटकथा विनाकारणच क्लिष्ट होत जाते.
कुठलीही कलाकृती कलाकाराची एक रचना असते, कन्स्ट्रक्ट वा डिझाईन असते. मोहोंजो-दारोही याला अपवाद नाही. ही सुद्धा इतर कलाकृतींप्रमाणे एक मॅन्युफॅक्चर्ड, कृत्रिम पटकथा आहे. पण ही कृत्रिमता आपल्या व आपल्या सहकार्यांच्या प्रतिभेच्या अविष्करणातून कशी झाकता येईल, आवश्यक तेथे दुवे कसे सांधता येतील आणि या सगळ्या प्रक्रियेचा एकत्रित परिणाम म्हणून एक एकसंध, कन्विसिंग आणि तरीही रंजक अनुभव प्रेक्षकाला कसा देता येईल यातच लोकप्रिय सिनेमाचं यश असतं. या महत्वाच्या गोष्टीमध्येच हा चित्रपट फसला आहे. तरीही एकवेळ कथानक सोडलं तर इतर बाबींसाठीतरी 'मोहोन्जो-दारो' एकदा पाहण्यालायक निश्चितच आहे.
अखेरीस अनोखी पार्श्वभूमी, त्यासाठी (दावा) करण्यात आलेला रिसर्च वगैरे गोष्टींवर कथानकाचे जुनाटपण आणि जुनीच ट्रीटमेंट पाणी फेरते व आपल्याला कंटाळा येत जातो. आणि मग हा सिनेमा बघायला आपण इतक्या दुरुन टोले घेत का आलो, असा वैचारिक गोंधळ सिनेमागृहाच्या बाहेर पडताना माझ्यासारख्या सर्वसामान्य प्रेक्षकाच्या मनात सुरु होतो आणि यापुढे गड्या आपला 'वर्ल्ड टीव्ही प्रिमीयर'च बरा या विचारावर थांबून तो संपतो.
बाकी हिंदी-मराठी वृत्तवाहिन्यांकडे प्राइमटाईम मध्ये अनेकदा (काही जणांकडे तर दिवसातून तीन वेळा) दाखवण्यासारख्या काही बातम्या नसताना 'प्राचीन मिस्र के रहस्य', 'माया संस्कृती का सच', 'हिममानव का खौफ' यासारख्या छद्म माहितीपटांमध्ये फिलर म्हणून इकडचे तिकडचे इंटरनेटवरचे, सिनेमातले विडीओ दाखवतात तशा 'कहानी मोहोन्जो-दारो की' या कार्यक्रमात या सिनेमातील क्लिपिंग्सचा उत्तम उपयोग आपले 'क्रियेटीव्ह' पत्रकार-संपादक खात्रीने करतील हे मात्र नक्की.
पूर्वप्रकाशन:http://aawaghmare.blogspot.in/
प्रतिक्रिया
23 Aug 2016 - 11:02 am | दा विन्ची
परीक्षण मस्त. बघणार नाही.
23 Aug 2016 - 11:04 am | अभ्या..
माझी भीती खरी ठरली,
धन्यवाद
23 Aug 2016 - 11:36 am | चिनार
छान परीक्षण !!!
पण ह्रितिक रोशनला सामान्य अभिनेता का म्हटलंय ते कळलं नाही. माझ्या मते ह्रितिक एक चांगला अभिनेता आहे. आणि त्याने ते वारंवार सिद्ध केलंय. असो. ज्याचे त्याचे मत
आपल्या परीक्षणावरून कळतंय..की कथा गुंफण्यात आणि मांडण्यात आशुतोष गोवारीकर ह्यावेळी कमी पडलाय.
लगान,स्वदेस,जोधा अकबर यासारखे उत्कृष्ट सिनेमे देणारा आशुतोष पुढल्यावेळी नक्कीच काहीतरी चांगलं घेऊन येईल अशी आशा करतो.
23 Aug 2016 - 11:59 am | ए ए वाघमारे
अहो..सामान्य नव्हे 'सामान्य+'
23 Aug 2016 - 2:09 pm | चिनार
सामान्य आणि सामान्य + मध्ये काय फरक म्हणायचा हो मालक ??
उत्सुकता म्हणून विचारतो...तुमच्या ग्रेडिंग प्रमाणे अजय देवगण कश्यात येतो ?
23 Aug 2016 - 8:42 pm | ए ए वाघमारे
चांगला
23 Aug 2016 - 11:38 am | समीरसूर
उत्कृष्ट परीक्षण! फार छान लिहिले आहे. अगदी मुद्देसूद आणि योग्य निरीक्षणांसह! या चित्रपटात मला रस नव्हताच पण परीक्षण वाचतांना मात्र मजा आली. हृतिक रोशन आता जॉन अब्राहमच्या कॅटेगरीमध्ये गेला आहे. बघवत नाही अजिबात.
ए आर रहमान हा गेली कित्येक वर्षे पाट्याच टाकतो आहे. इन फॅक्ट, काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी गाणी वगळता त्याने सतत पाट्याच टाकलेल्या आहेत.
23 Aug 2016 - 6:45 pm | जगप्रवासी
परीक्षण योग्य मुद्द्यांसहित उत्कृष्टरित्या लिहिलं आहे.
झालंय काय आशुतोषला हा प्रश्न पडतो हा चित्रपट बघताना? मला वाटलं होत की मोहंजोदारो शहर कस वसलं, कस वाढलं यावर चित्रपट असेल पण हे काहीतरी वेगळेच प्रकरण (लगान बघताना आमिरने कशी टीम गोळा केली, एकत्र बांधली आणि नंतर सामना खेळले). मोहन्जो दारो हे गाणं ऐकताना आणि बघताना हसू आवरेना.
एका घोड्यावर बसून दुसऱ्या घोडयाला बाजूने फक्त हात दाखवून कसं शांत करता येईल हा आणि असे अनेक प्रश्न पडले होते हा चित्रपट बघताना.
23 Aug 2016 - 8:47 pm | ए ए वाघमारे
घोड्याचा सीन एका दुसर्या इतिहासकालीन सिनेमातून उचलला आहे. त्याचं नाव 'जोधा अकबर'. जोधा अकबरमध्ये रोशन हत्तीला हुप...हुप्प.. करून शांत करतो की ट्रेनिंग देतो असा प्रसंग आहे. त्या सिनेमातलं मला तेवढंच आता आठवतं. कारण या सीन नंतर मी सिनेमा बंद करुन टाकला.
23 Aug 2016 - 1:24 pm | बोका-ए-आझम
Anachronism म्हणावा असा अजून एक मुद्दा म्हणजे घोडे. सिंधुसंस्कृती आर्यांहून प्राचीन मानली जाते आणि भारतीय उपखंडात घोडे हे आर्यांनी आणले असा अभ्यासकांचा दावा आहे. पण चित्रपटात घोडे दिसतात. बाकी गोवारीकरसाहेब जे.पी. दत्ता आणि मुकुल आनंद यांच्या मार्गाने चालले आहेत असं खेदपूर्वक म्हणावं लागतं.
23 Aug 2016 - 1:35 pm | अनुप ढेरे
घोडा या विषयावर हा लेख वाचनीय आहे.
http://scroll.in/article/813615/despite-hindutva-twists-its-clear-that-t...
23 Aug 2016 - 2:04 pm | बोका-ए-आझम
आणि ड्वाले पानावले. SCROLL चं नाव वाचून तर पाण्याची धारच लागली. सावरकर आणि गोळवलकर या दोघांना एकत्र हिंदुत्ववादाचे प्रणेते म्हणून श्रेय दिल्यावर तर अश्रुपातच झाला. ;)
23 Aug 2016 - 5:00 pm | बोका
घोडा या विषयावर हे सुद्धा वाचनीय आहे.
‘सुरकोटला’ अश्व
1
2
3
23 Aug 2016 - 1:54 pm | किसन शिंदे
हे मुकुल आनंद कोण?
बॉर्डरनंतर वाढलेल्या अपेक्षा रिफ्युजी आणि एलओसीमुळे दणकूण खाली आपटल्या, त्यामुळे जे.पी. दत्ता ठाऊक आहेत.
23 Aug 2016 - 2:01 pm | वाल्मिक
हम ,अग्नीपथ ह्याचे दिग्दर्धन केले आहे
प्रचंड उत्साह असलेला पण आता हयात नसलेला माणूस
23 Aug 2016 - 2:20 pm | बोका-ए-आझम
दोन्हीमध्ये अमिताभ सोडला तर बाकी काही खास नव्हतं. पण खुदा गवाह हा असह्य अनुभव होता. नुसता भव्यतेचा हव्यास, पण कथा काहीच नाही. गाईड, शोले, मुघल-ए-आझम हे कथेमुळे भव्य झाले. भव्यतेने कथेवर कुरघोडी केली नाही. खुदा गवाह आणि मोहेंजोदारो ही भव्यतेपुढे कथेने मार खाल्ल्याची चपखल उदाहरणं आहेत.
23 Aug 2016 - 2:05 pm | चिनार
अग्नीपथ, हम, खुदा गवाह, त्रिमूर्ती वाले मुकुल आनंद !!
लगान,स्वदेस काराची तुलना मुकुल आनंद सोबत म्हणजे कैच्या कै झालं राव..
23 Aug 2016 - 2:20 pm | किसन शिंदे
नव्वदीत शाळकरी वयात पाह्यलेले अग्नीपथ आणि हम प्रचंड आवडले होते. खुदा गवाह आणि त्रिमूर्ती फार बोअर चित्रपट. आणि त्रिमूर्ती हा सुभाष घईंनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे अशीच माझी समजूत होती.
23 Aug 2016 - 2:27 pm | चिनार
त्रिमूर्ती हा सुभाष घाई छापचं सिनेमा होता..
23 Aug 2016 - 2:31 pm | किसन शिंदे
घईंच नाव निर्माता म्हणून दाखवतंय म्हटल्यावर दिग्दर्शकाला काय काम उरणार? =))
23 Aug 2016 - 2:35 pm | चिनार
हे बी खरंय किसनदेवा...
रच्याकने हल्ली कुठे असतात ते शोमन सुभाष घई..
23 Aug 2016 - 3:03 pm | संदीप डांगे
https://www.whistlingwoods.net/
चित्रपट प्रशिक्षण संस्था काढली आहे साहेबांनी, लाखो रुपये फी आहे वर्षाला. चित्रपट काढण्यापेक्षा त्याच्या शिक्षणाचा धंदा हमखास हिट होईल हे जाणले. हे सर्व शक्य झाले आमच्या साहेबांच्या धोरणामुळे!
23 Aug 2016 - 3:04 pm | चिनार
क्या बात है !!
23 Aug 2016 - 2:22 pm | बोका-ए-आझम
मोहेंजोदरोमध्ये दिसत नाही हाच तर मुद्दा आहे.
23 Aug 2016 - 2:29 pm | चिनार
जाऊ द्या हो...एखादा प्रयत्न फसतो..
लोकांचं मत माहिती नाही पण मला जोधा अकबर सुद्धा फार आवडतो..
23 Aug 2016 - 2:32 pm | किसन शिंदे
जोधा अकबर मलाही आवडलेला चित्रपट होता. पण लगान आणि स्वदेस फार जास्त आवडले होते.
23 Aug 2016 - 2:39 pm | बोका-ए-आझम
नंतर व्हाॅट्स युवर राशी पासून आशुतोष गोवारीकरचा classes आणि masses असा गोंधळ उडायला सुरुवात झाली. त्यातून भलेभले सुटलेले नाहीत. असो.
23 Aug 2016 - 3:00 pm | चिनार
असा गोंधळ का उडाला असेल ह्याविषयी थोडंसं...
लगान हा हिंदी सिनेमातला एक मैलाचा दगड मनाला जातो. आणि तो आहेच ह्यात वाद नाही. पण व्यावसायिक दृष्ट्या लगानला गदर आणि काहीच दिवसांनी आलेल्या मुझे कुछ केहना है या चित्रपटांनी धोबीपछाड दिली होती.
माझ्या दृष्टीने हे दोनही सिनेमे अतिसामान्य होते. पण सिनेमांचं व्यावसायिक गणित वेगळंच असतं. प्रेक्षकांना काय आवडेल ह्याचा नेम नाही. हा आशुतोषला बसलेला पहिला धक्का असावा.
नंतर आशुतोषने शाहरुखसारख्या सुपरस्टारला घेऊन स्वदेस केला. स्वदेस हा नितांत सुंदर सिनेमा आहे. पण व्यावसायिक दृष्ट्या हा सिनेमा फार यशस्वी झाला नाही. म्हणजे बघा, एकतर सुपरस्टारला घ्या..चांगला सिनेमा बनवा..आणि तरीसुद्धा व्यावसायिक अपयश !! दुसरा धक्का..
त्यानंतर आशुतोषने मोठे आवाहन पेलले ते पिरीयड फिल्म चे...कथा,ऐतिहासिक संदर्भ, सेट्स, निर्मितीमूल्य,संगीत,अभिनय या सगळ्याच पातळीवर जोधा अकबर उत्तम सिनेमा होता. तरीसुद्धा व्यावसायिक यश यथातथाच होते..
माझ्या मते आशुतोषच कसं झालंय...दोन अंकी नाटकाच्या जमान्यात तो अजूनही तीन अंकींच्या प्रेमात आहे..
गोष्ट थोडक्यात सांगून पैसे कमवायचे हे त्याला जमत नाही..कदाचित तो त्याचा पिंड नाही.
असो...मी त्याचा चाहता आहे...आणि वरील तीन सिनेमांसाठी नेहमीच राहील...
23 Aug 2016 - 3:12 pm | संदीप डांगे
If he is focusing not on making movies but on making money then he will surely be loosing money...
बहुतेक गोवारिकर साहेबांना स्वतःची शैली सापडलेली नाही, किंवा लोक काय करतात ते करुन पाहण्याचा प्रयत्न दिसतो. एनिवे, अशुतोष एक उत्तम दिग्दर्शक आहे हे निर्विवाद सत्य आहे. फक्त त्याच्या सोंगट्या फिल्मलाईनमधे नीट बसत नाहीयेत एवढेच.
23 Aug 2016 - 3:19 pm | चिनार
If he is focusing not on making movies but on making money then he will surely be loosing money...
ह्यातला "he " जर आशुतोष असेल तर सहमत डांगे बुवा..
पण जनरल स्टेटमेंट असेल तर असहमत...फक्त पैश्यावर डोळे ठेऊन सिनेमा बनवणारे आणि कमावणारे भरपूर निर्माता दिग्दर्शक आहेत आपल्याकडे..
23 Aug 2016 - 3:27 pm | संदीप डांगे
थे आशुतोष बद्दलच आहे. आशुतोष व अविनाश दोघांनाही जवळून ओळखतो. कर्मधर्मसंयोगाने ओळखी झालेल्या. स्वभाव माहित आहे.
23 Aug 2016 - 1:44 pm | वाल्मिक
सुमेरीयन व्यापार्यांकडून सोन्याच्या बदल्यात शस्त्रांची तस्करी का करतो हे काही कळलं नाही.
ती शास्त्रे घेऊन हडप्पा वर हल्ला करायचा असतो
23 Aug 2016 - 1:46 pm | पैसा
छान परीक्षण. सिनेमा मुद्दाम थेटरात जाऊन बघणार नाही.
23 Aug 2016 - 2:03 pm | पद्मावति
खूप छान आणि नेमके परीक्षण.
ट्रेलर मधेच नायिकेचा ग्रीक कॉस्ट्यूम, घोडे इत्यादी प्रकार पाहून मला दचकायला झालं होतं.
23 Aug 2016 - 2:13 pm | समीर_happy go lucky
चांगले परीक्षण
23 Aug 2016 - 2:58 pm | एस
परीक्षण तुफान आहे. चित्रपट टुकार असणार ही भीती साधार खरी ठरली तर.
23 Aug 2016 - 3:38 pm | इल्यूमिनाटस
थेटरात जाऊन बघणार नव्हतोच, पण पीडी मध्ये घेऊन बघण्याचा विचार होता
आता तोही मूड गेला
23 Aug 2016 - 4:59 pm | स्वाती दिनेश
परीक्षण आवडले.
स्वाती
23 Aug 2016 - 7:14 pm | बोका-ए-आझम
हा लेख मिपावर नाहीये बहुतेक. याची लिंक मिळेल काय?
23 Aug 2016 - 8:01 pm | ए ए वाघमारे
बरोबर आहे.तो लेख मिपावर नाही.
माझे सर्व लेख ब्लॉगवर संग्रहित आहेत.मला ती लिंक वरच्या लेखातच द्यायची होती पण सकाळपासून काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाल्यामुळे ब्लॉग अॅक्सेस होत नाहीये.
तूर्त या लेखाची माबोवरची लिंक देतो आहे.
डिटेक्टीव्ह व्योमकेश बक्षी – संदर्भासहित स्पष्टीकरण करा !
23 Aug 2016 - 8:15 pm | ए ए वाघमारे
वरील लेखात एक 'पुणेरी पाणचट पाणीपुरी' चा ज्वालाग्राही उल्लेख आहे. तस्मात दमाने घ्यावे !
23 Aug 2016 - 8:18 pm | संदीप डांगे
=)) =))
जौदे, आमाले पाणीपुरी म्हणलं कि फकस्त आकोला आठोते.
23 Aug 2016 - 11:05 pm | बोका-ए-आझम
घरीच एवढं खायला घालतात की बाहेर जाऊन खायला भूकच नाही राहात. आता न सांगता गेलं पाहिजे कधीतरी.
23 Aug 2016 - 11:02 pm | बोका-ए-आझम
मला स्वतःला सुशांतसिंग राजपूतचा ब्योमकेश बक्षी आवडला होता. बाकी ब-याच पुणेकरांनी पाणीपुरीवर लिहून आपली जळजळ दाखवून दिली आहे. हे वाचल्यावर असहिष्णुता म्हणजे काय याची textbook case मिळाली.
23 Aug 2016 - 7:26 pm | पगला गजोधर
वाघमारे सर लिहित रहा
अजुन लेख्न वाचायाला आवडतिल....
23 Aug 2016 - 10:09 pm | माम्लेदारचा पन्खा
जरा बाजीराव मस्तानी बघ की बाबा......संजयने तेव्हा तिथे बाजीरावच्या शेजारी बसून राज्य कारभार करत असल्यासारखा काढला होता सिनेमा !
23 Aug 2016 - 10:32 pm | मयुरा गुप्ते
गोवारिकर जेव्हां कन्फ्युज नसतो तेव्हा लगान्,स्वदेस सारखे सिनेमे काढतो पण जशी त्याची कन्फ्युजन लेव्हल वाढत जाते..व अगदी टोकाला पोहोचते तेव्हा मोहंजोदारो सारखे चित्रपट येतात. नक्कि काय दाखवायचयं का सांगायचयं हे न कळल्यामुळे प्रेकक्षकांना गोंधळात टाकलेलं आहे.
बाकी परिक्षण एकदम मस्त. पॉईंट टु पॉईंट पटलेला आहे..
अजुनही येऊद्या लेख.
--मयुरा
23 Aug 2016 - 10:58 pm | विखि
अपेक्षित च होत हे, मुकुल आनन्द चा विषय निघाल्यावर अग्निपथ आठवल्या शिवाय रहात नाय, विजय दिनानाथ चोहान खतर्नाक केला होता अमिताभ ने, मिथुन ला तर नॅशनल अॅवार्ड मिळाला होता, क्रिश्नन अय्यर एम ए :)
बाकि 'हम' सोडला तर बेक्कार पाट्या होत्या, खुदा गवाह बघुन झाल्यावर अस वाटल दोन दिवस थेटरातच होतो, सम्पता सम्पना पिकचर, 'त्रिमुर्ती, सल्तनत' तर पुलिस कस्टडीत टॉरचर म्हनुन दाखवले तर पटापटा गुन्हे कबुल होत्याल
23 Aug 2016 - 11:29 pm | मंदार कात्रे
पीरियड फिल्म आहे
मी रात्री १० ते १२.३० पाहिला . नन्तर रात्रभर डोक्यात फक्त सिन्धु संस्कॄति आणि मोहेन्जोदारो घुमत राहिल
25 Aug 2016 - 12:00 pm | नाखु
"लोहा लोहेको काटता है"चा अर्थ...
23 Aug 2016 - 11:34 pm | रुपी
भारी लिहिलंय.. वाचायला मजा आली :)
24 Aug 2016 - 6:41 pm | भंकस बाबा
अजुन अशीच परीक्षण वाचायला आवड़तील
25 Aug 2016 - 2:24 pm | ए ए वाघमारे
सर्व प्रतिसादकांचे औपचारिक आभार!