११:३० ला येणारी मंडळी बरोबर १२:३० ला माझा दारात होती. तासभर माझा जीव टांगणीला लागला होता. घरच्या बॉस सोबत पुन्हा आश्वासनांची उजळणी करून मी घरचांचा निरोप घेतला.
गाडी जवळ आलो तर माझे तिन्ही परम मित्र माझी गळाभेट घ्यायला आतूर होते आणि मी ही. गाडी पण सांगितल्याप्रमाणे नवीन होती. गाठीभेटी झाल्यावर गाडीत बसायला लागलो तर तिथे मागच्या सीट वर कोणीतरी पांघरुणात लपलेल होत. मी हळूच विन्याकडे पाहिल आणि खुणावलं,
" कोण?".
"अरे तो आपला ड्राइवर आहे", विन्या.
"ड्राइवर? मग गाडी कोणी चालवत आणली?"
"पश्या आणि खंड्या". मी कुतूहलाने त्यांच्या कडे बघितल आणि अजून काही विचारणार इतक्यात विन्या म्हणाला,
"झोपूदे त्याला, जेव्हा हे दोघ कंटाळतील तेव्हा त्याला गाडी देऊ".
मनात म्हंटल, "मजा आहे बाबा ह्याची. कामाच्या वेळी झोप आणि फुकट पगार, अशी नौकरी कुणाला नकोय". असो, गो गोवा अस म्हणून गाडी चालू केली आणि गप्पा मारत मारत निघालो.
विन्या तर कधीच गाढ झोपला होता. पश्या गाडी हाकत होता आणि मी खंड्या गप्पा झोडत होतो. एरव्ही इतका निवांत वेळ नाही मिळत मित्रांशी बोलायला. थोडयावेळाने झोप येऊ लागली. आमचे ड्राइवर साहेब तर ऑलरेडी चंद्राहून मंगळाचा वाटेवर निघाले होते. खंड्या अन पश्या किल्ला लढवत होते.
थोड्या वेळाने गाडी थांबल्यासारखं वाटलं. बघितला तर गाडी थांबली होती. तीन वाजत आले होते. आमचे दोन गडी किल्ला लढवून थकले होते. ड्राइवरला उठवण्याचा प्रयत्न चालू होता आणि काही केल्या तो त्याच्या पांघरूणातून तोंड बाहेर काढायला तयार नव्हता. नवी नवरी, पहिल्या रात्री जसा पदरात आपला चेहरा लपवून बसते, तसंच काहीस आमचे ड्राइव्हरसाहेब करत होते.
चिडून खंड्याने त्याच पांघरून ओढल. तस ड्राइवर साहेबानी हळूच आपल्या सर्वांगाला ताण देत मोठी जांभई देऊन कूस बदलली. आता ड्राइवर साहेब विन्याच्या चादरीत घुसले होते आणि विन्या त्यांच झोपेतच आदरातिथ्य करत होता. आता मात्र पश्या आणि खंड्या भयंकर चिडले आणि दोघांना त्यांनी गदागदा हलवला आणि उठवला. मी भरपूर प्रवास केलेत आणि अनेक ड्राइवर लोक बघितले आहेत पण हे प्रकरण अजबच होत.
शेवटी आमच्यावर उपकार म्हणून ड्राइवर साहेबानी उठण्याची कृपा केली. तोंडावर पाणी मारून ड्राइवरने स्टैरिन्ग हातात घेतला आणि गाडी पुन्हा सुरु झाली. गाडीत बसताना मी पश्याला हळूच विचारल, "नेईल का रे हे ध्यान आपल्याला सुखरूप?". त्याने हात जोडले आणि वर बघितले. झालं आता रात्रभर काही मला झोप यायची नाही, अस मी स्वतःशीच पुटपुटलो आणि थोड्याच वेळाने गाढ झोपलो.
गाडी पुन्हा थांबली. ह्यावेळी ड्राइवर साहेबाना पुन्हा झोप यायला लागली होती. पहाटेचे ५ वाजत आले होते. ड्राइवर साहेबानी पुन्हा आपली पथारी मारली. आमचा झोपेचा खेळखंडोबा करून हा ड्राइवर पथाऱ्यावर पथाऱ्या मारत होता. मी आणि पश्या उठलो होतो, खंड्या किरकिर करत पुन्हा झोपायचा प्रयत्न करत होता आणि आमच्या विन्याला मात्र तिळभरही फरक पडला नव्हता. तो आपला ह्या जन्मात परत कधीच झोपायला मिळणार नाही या आवेशानेच झोपला होता.
अर्धा-पाऊण तास झाल्यानंतर आम्ही कंटाळून बाहेर पडलो. आजूबाजूला बघतलं तर एका बाजूला पेट्रोल पंप आणि दुसऱ्या बाजूला एक टपरी वजा ढाबा होता. मग गाडी पेट्रोल पंपात आणि आम्ही ढाब्यात गेलो. तिथे बघितल तर ढाबेवाला मस्त गरमागरम ऑम्लेट करत होता. भूक नसतानाही २-३ डबल ऑम्लेट हाणले. आता एवढ खाण झाल आणि चहा नाही घेतला तर ते पूर्णब्रह्म आम्हाला पावल नसत.
आता बहुतेक सगळ्यांचा झोप झाल्या होत्या (ड्राइवर धरून). ड्राइवर साहेबानी यावेळी आमच्यावर कृपा दाखवली आणि गाडी स्वतः चालवणार असे जाहीर केले. गाडी हलली तेव्हा उजाडायला लागल होत. छान गार वारा वाहत होता आणि आम्ही सगळे तृप्त जीव गप्पा मारण्यात गुंग होतो.
आम्ही निपाणी पर्यंत NH ४ वर राहायचं ठरवलं. निपाणीच्या थोड पुढे गेल की आंबोली घाटला जाणार एक वळण लागत. त्या वळणावर एक छान उडपी हॉटेल आहे . तिथे उतरून सर्वानी पुन्हा चहापान आणि नाश्ता उरकला. गाडी आंबोलीच्या दिशेने जायला लागली आणि अचानक पाऊस सुरु झाला. ऐन थंडीत आलेल्या ह्या पावसाने प्रवासात बहारच आणली.
आंबोली घाटातून दिसणारे सह्याद्रीचे उंच उंच कडे, त्यावर नाचणारे काळे पांढरे ढग आणि मधुनच येऊन जाणारी पावसाची सर फारच सुंदर आणि डोळ्यांना तृप्त करणारं दृश्य होत. आंबोलीच्या खाचखळग्यांनी आमचा प्रवास मंदावला जरूर पण त्यामुळेच आमच्या डोळ्याचे पारणे फिटतील असे नजारे आम्हाला पाहायला मिळाले.
दिवस बऱ्यापैकी डोक्यावर आला होता आणि आम्हीपण आंबोली मागे सोडून सावंतवाडीच्या जवळपास आलो होतो. तेवढ्यात ड्राइवर साहेबांनी आपला नवीन बॉम्ब टाकला,
"गाडीला नंबर प्लेट नाही. ती इथेच लावून घेऊ उगाच गाव्यात गेल्यावर दंड होईल".
आम्ही आश्चर्याने, कुतूहलाने, चिडुन, केविलवाणे होऊन इ. इ. शक्य तितक्या भाव भावनांनी एकमेकांकडे बघितल. संध्याकाळी जेव्ह ही जनता निघाली होती, तेव्हा गाडी नवीन आहे हे सांगितल होत. पण गाडीची नंबर प्लेट पाहायच कोणाच्याच लक्षात आल नव्हत. आता मात्र विन्या तापायला लागला होता. त्याने कुरकुर सुरु केली होती.
"१५-२० मिनिटात होईल लावून ", ड्राइवर दिलास्या खातर बोलला. पण आम्हाला काही त्याच्यावर भरवसा नव्हता.
ड्राइवर साहेबानी सावंतवाडीत एक रेडियम स्टिकर वाला शोधून काढला. त्याच्याकडून पट्टी बनवायच एस्टीमेट घेतल आणि निगोसिएशन सुरु झालं. थोड्या वेळ वाटाघाटी चालल्या पण काही यश येईना.
"ओ ड्राइवर, ते जे पैसे मागतील ते द्या आणि पट्टी लावून घ्या. हे असले काम तुम्हाला आधी नाही का करता येत. फुकट वेळ चालला आहे ह्यात", विन्या चिडून ओरडलाच ड्राइव्हरवर.
"आहो हा काही पैसे मागत आहे..."
"ते आम्हाला काही माहित नाही. जे मागतो ते द्या आणि निघायचं बघा" पश्याचा सूरही' चढायला लागला होता.
ड्राइवरने दिलेले २० मिनिटं केव्हाच संपून वर तासभर होत आला होता. आता आम्ही सगळेच संतापलो होतो आणि ड्राइवरच्या नावाने बोंबाबोंब करायला लागलो होतो. शेवटी नाईलाजाने ड्रायव्हरने ती पट्टी वाकडी-तिकडीच चिटकवून गाडी काढली. वर गाडी काढताना आम्हालाच ऐकवला की, कसा आमच्या आततायी पणामुळे महागाची पट्टी लावावी लागली आणि ती पण वाकडीच लागली.
आम्हाला तर असं झाल होत की, ह्या ड्राइव्हरलाच उचलून फेकूनद्याव गाडीतून. एकतर हा शहाणा रात्रभर झोपला, वर साहेबांनी नाही तिथे नाहीत्या कारणाने गाडी थांबवून आमचा वेळ वाया घालवला. पण करता काय, गोवा समोर होत, म्हणून माफ केला त्याला. हळू हळू एक एक गाव ओलांडत आम्ही पुढे सरकत होतो. रास्ता आता रुंदावत चालला होता. हवा दमट होत होती. दूर वर निळ्या रंगाचा डोह दिसायला लागला होता. अक्षय क्षितीजाचा पाठलाग आता संपत आला होता. गेले ४०-४२ तास जे गोवा डोक्यात दिसत होत ते आता समोर आल होतं.
आम्ही सगळ्यांनी मनातल्या मनात म्हंटलं.. अखेर गो.. गो.. गोवा...
प्रतिक्रिया
15 Aug 2016 - 10:10 pm | किसन शिंदे
अजून लिहा की..गोव्यातले गमतीदार अनुभव वैगेरेंवर
16 Aug 2016 - 3:16 am | एनिग्मा
पिक्चर अभी बाकी है मेरे भाय!
16 Aug 2016 - 2:13 am | पिलीयन रायडर
चांगला झालाय हा ही भाग! शैली आहे तुमच्या लिखाणाला.. मजा येतेय वाचताना!
क्रमशः असावं असं वाटतंय.. कारण जर सुरवात इतकी दिव्य असेल तर मुख्य ट्रिप अजुन खत्रा असायला हवी.. तेव्हा येऊ द्या पटापटा पुढचे भाग!
बाकी अशा ड्रायव्हरचा कुणी खुन केला नाही ह्याचं आश्चर्य वाटलं! मी असते तर त्याला झोपेतच दरीत फेकुन आले असते..
16 Aug 2016 - 3:58 pm | अनिरुद्ध प्रभू
उगाच वाट बघुक लाव नको...
पुभाप्र
16 Aug 2016 - 4:47 pm | एस
भारी! पुभाप्र.