'वॉर्स ऑफ द रोजीस' या अतिशय गुंतागुंतीच्या युद्धमालेबद्दल थोडक्यात माहिती देणं अतिशय कठीण. या 'कझीन्स वॉर'ने इंग्लंडच्या इतिहासात बऱ्याच उलथापालथी घडवल्या. त्याबद्दल शक्य तितकं सुसंगत आणि जमेल तेवढं थोडक्यात माहितीपूर्ण लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
'वॉर्स ऑफ द रोजीस' म्हणजे 'गुलाबांची युद्धे'. प्लँटाजीनेट वंशाच्या लँकेस्टर व यॉर्क या उपशाखा. लँकेस्टरांचं चिन्ह लाल गुलाब व यॉर्कांचा पांढरा. म्हणून या साधारण १४५५ ते १४८७ दरम्यान झालेल्या दोन घराण्यांमधील युद्धांना अशा नावाने ओळखले जाते. लँकेस्टर इंग्लंडचे राजे होते आणि पाचव्या हेन्रीच्या मृत्यूपर्यंत(१४२२) सगळे बरेच सुरळीत चालले होते. त्याच्या मृत्यूच्या वेळी त्याचा मुलगा सहावा हेन्री म्हणून गादीवर बसला, पण तो अगदीच बाळ होता. त्याच्या वतीने कारभार बघणार्या लोकांमधे सत्ता, मानमरातब आणि पैसा यासाठी साहजिकपणे चढाओढ सुरू झाली. सतत दुसर्यांचे ऐकतच राज्य करायची सवय असलेल्या या राजाला त्यामुळे निर्णयक्षमता अशी नव्हतीच. त्यात त्याचे लग्न इंग्लिश लोकांचे परंपरागत शत्रू असणार्या फ्रेंचांच्या एका राजकन्येशी झाले. हिला हुंडा तर नव्हताच, वरून इंग्लिशांच्या ताबा असलेल्या काही जागा या लग्नात फ्रेंचांना द्याव्या लागल्या, आणि मार्गारेट ऑफ अंजू लग्नापासूनच इंग्लिशांची नावडती राणी बनून आली.(१४४५)
या दोघांचं राज्य म्हणजे मर्जीतील लोकांचा अजीर्ण होईल इतका उत्कर्ष आणि मर्जीत नसलेल्यांचा भरभरून अपमान एवढंच होतं. अनेक चुकलेले निर्णय, नको त्या लोकांना डोक्यावर चढवून बसवणे आणि राणीचे फ्रेंच असणे यामुळे लोकांच्या मनात असंतोष होताच. अशावेळी यॉर्क घराण्याचा प्रमुख रिचर्ड लोकांच्या नजरेत उत्कृष्ट नेता म्हणून भरू लागला. राजाची तिजोरी रिकामी, राजा स्वतः निकामी; तर हा ड्यूक ऑफ यॉर्क प्रचंड श्रीमंत, पराक्रमी होता. याची बायको सिसेली उत्तरेच्या सर्वात प्रभावी नेव्हिल घराण्याची असल्याने उत्तरेकडूनही याला पाठिंबा मिळू शकत होता. त्यात याला मुलगे होते, आणि राजा-राणीला अजून मूल नव्हतं.
अशा रीतीने यॉर्कांचा प्रभाव वाढत असताना लँकेस्टर घराण्याचे आपल्या हक्काला मजबूत करण्याचे प्रयत्न चालू होते. सहाव्या हेन्रीची आई कॅथरीन, हीसुद्धा एक फ्रेंच राजकन्या होती. तिने तिचा नवरा वारल्यावर ओवेन ट्यूडॉर नामक तशा सामान्य माणसाशी लग्न केले होते. तिची या लग्नातली २ मुले-एडमंड आणि जॅस्पर. या दोघांना कुटुंब म्हणून राजाने जवळ केले. अजून एक महत्वाचे लँकेस्टर नाव म्हणजे बोफर्ट(Beaufort). यांनाही सिंहासनावर प्लँटाजिनेट घराण्याचे म्हणून हक्क होता. यांची एकमेव वारसदार मार्गारेट बोफर्ट हिचे लग्न एडमंड ट्यूडॉरशी लावून दिले. लग्नाच्या वेळी ती फक्त ९ वर्षांची होती. या दोघांच्या मुलाला फ्रेंच आणि इंग्लिश अशा दोन्ही राजघराण्यांचा वारसा मिळाला असता आणि त्याचा सिंहासनावर लँकेस्टरांचा वारस म्हणून हक्क असता. दरम्यान, राणी गर्भवती झाली. लँकेस्टरांना बरे दिवस येणार वाटेपर्यंत इंग्लिश लोक फ्रेंचांसोबत एक मोठी लढाई हरले आणि राजाला त्याचा पहिला झोपेचा झटका आला. १४५३ च्या शेवटापासून हेन्रीच्या सर्व जाणिवा अचानक हरवून गेल्या होत्या. राणीला मुलगा झाला. पण राजा जिवंत होता, आणि राज्य करण्यास असमर्थ होता.
अशा वेळी रिचर्ड ऑफ यॉर्कने 'प्रोटेक्टर ऑफ द रेआल्म' अशा पदाने राज्यकारभार बघायला सुरुवात केली. राणीला बाजूला ढकलण्यात आलं. ती मुळात यॉर्क घराण्याला पाण्यात पाही, आता तर ठिणगीच पडली. १४५४ च्या शेवटादरम्यान हेन्री शुद्धीवर आला. आता फासे पालटले आणि यॉर्कांनी सत्ता काबीज केली म्हणून त्यांच्या सूडाच्या योजना जन्मू लागल्या. राणीचा लाडका ड्यूक ऑफ सोमरसेट एड्मंड बोफर्ट हा यातला महत्वाचा कर्ता-करविता होता. राजाचे कान भरून यॉर्कांना राजद्रोही ठरवण्याचा त्याचा बेत हाणून पाडण्यासाठी ड्यूक ऑफ यॉर्क त्याच्या पाठिराख्यांसोबत निघाला. राजाला लाय्सेस्टरला जाता जाता यांनी सेंट अल्बन्सला गाठले. यॉर्कांना शांततापूर्ण वाटाघाटी हव्या होत्या. पण ते काही होऊ शकणार नाही हे बघून त्यांनी राजाच्या सैन्यावर हल्ला केला, आणि अशा रीतीने १४५५ मध्ये उघड उघड युद्धांना सुरुवात झाली. राणीचा महत्वाचा साथीदार आणि सल्लागार एडमंड बोफर्ट या युद्धात मारला गेला.रिचर्ड ऑफ यॉर्कने राजाला ताब्यात घेतले, त्याला लंडनमधे परत आणले, आणि त्याच्या नावाने पुन्हा कारभार बघायला सुरुवात केली.
राजाच्या मानसिक अस्वास्थ्याच्या काळात ट्यूडॉर भावांनी रिचर्डला राज्य चालविण्यास मदत केली होती. पण राजा व ड्यूकमधील भांडणात एडमंड ट्यूडॉर रक्षण करीत असलेल्या वेल्सवर यॉर्क सैन्य चालून आले व त्यांनी एडमंडला कैद केले. त्याचा कैदेत आजारी पडून मृत्यू झाला. त्याची विधवा झालेली पत्नी मार्गारेट यावेळी केवळ १३ वर्षांची होती आणि ७ महिन्यांची गर्भवती होती! तिला मुलगा झाला, पण बाळंतपण इतकं अवघड होतं, की दोघंही आई-मूल मृत्यूच्या दारात होते. पण प्रसूती पार पडली, आणि तिचा मुलगा हेन्री हा ट्यूडॉर घराण्याचा वारस आणि लँकेस्टरांचे अजून एक आशास्थान म्हणून जन्माला आला. इथे मार्गारेट मेली असती, तरी कुणाला काही देणं-घेणं नव्हतं कारण तिने मुलाला जन्म दिला होता. पण ती जगली, म्हणून लगेच वर्षभरात तिला अजून मुलं व्हावीत आणि लँकेस्टरांना अजून वारस मिळावेत म्हणून तिचं अजून एक लग्न लावून देण्यात आलं. पण तिची बाळंतपणात इतकी अतोनात हानी झाली होती, की तिला परत मूल झालं नाही.
क्रमशः
(अनाहितामध्ये पूर्वप्रकाशित)
प्रतिक्रिया
4 Aug 2016 - 1:03 pm | एस
बापरे! जीओटीचे स्फूर्तिस्थान?
पुभालटा.
4 Aug 2016 - 2:00 pm | पगला गजोधर
गेम ऑफ थ्रोन्स
लँकेस्टर = लँनिस्टर
यॉर्क = स्टार्क
4 Aug 2016 - 3:42 pm | उडन खटोला
नुकतंच बघायला सुरु केलंय.
सगळा मसाला ठासून भरलाय. पळवत पळवत बघतो. 'योग्य' ठिकाणी थांबतो. ;)
लेख माळा सवडीने वाचण्यात येईल. सध्या पोच.
4 Aug 2016 - 4:43 pm | अद्द्या
अवांतर होतोय त्याबद्दल क्षमस्व
पण "योग्य " ठिकाण कोणते हे न बघताच कसं ठरवणार ?
Plots कसे कळणार फक्त ' योग्य ' ठिकाणे बघून ?
पण असो. .ज्याची त्याची आवड
4 Aug 2016 - 4:55 pm | उडन खटोला
घोड्याचं हृदय खाणारी ती कोण ती तुमची बघून काय प्लॉटमध्ये काय बदल होणार? ओंगळवाणे प्रकार आहेत ते. ते पळवतो. बाकी सगळं बघतोय. कल्जी क्रू न्ये.
4 Aug 2016 - 5:04 pm | अद्द्या
_/\_
चालूदे
4 Aug 2016 - 4:42 pm | अद्द्या
पूर्ण मालिकेचे नाही
पण red wedding चे आहे .
4 Aug 2016 - 7:00 pm | स्रुजा
+१. किती तरी पॅरलल्स आहेत जीओटी आणि ईंग्लड च्या इतिहासात.
वॉर ऑफ रोजीस मराठीत वाचुन खुप छान वाटतंय. the other boleyn girl पाहिल्यानंतर वाचला होता. तो सिनेमा बघुन ८ दिवस डोकं बधीर झालं होतं ! आपला इतिहास किती ही यादवी असली, बंडाळी असली, लाथाळी असली तरी असा नव्हता !
4 Aug 2016 - 7:29 pm | पगला गजोधर
स्रुजा ताई,
मी इथे तुम्ही मांडलेल्या मताशी थोडा असहमत आहे. (कृ. राग मानू नये)
आपला इतिहास हा फारच क्वचित डॉक्यूमेंटेड होता, किंवा इतिहास हा लिखित स्वरूपात जतन करायचा असतो अशी कन्सेप्ट नव्हती.
इंग्रजांच्या भारतात आगमनानंतर इतिहास डॉक्यूमेंटेशन वैगरे सुरु झालं. फार फार तर त्या पूर्वी पुराणंकथा होत्या त्याला विश्वासपूर्वक कोणी इतिहास म्हणू शकत नाही. ज्या काही बखरी वैगरे होत्या, त्या ज्यांनी लिहिल्या, ती लोकं ज्या राजाच्या /संस्थानाच्या पदरी असतं त्यांचा उदो उदो प्रकार वाटतो.
असो, उठता बसता ज्या शिवाजीमहाराजांच्या नावाचा उपयोग करणाऱ्या सर्व राजकीय पक्षांना हे ही गावी नसते , कि त्यांचा इतिहास ह्युम नामक इंग्रज अधिकाऱ्याने डॉक्यूमेंट करण्यास सुरुवात केली.
त्यामुळे आपला इतिहास, आपला इतिहास (इंग्रजपूर्व )असं काही जास्ती विशेष विश्वसनीय नाही.
4 Aug 2016 - 9:59 pm | पिशी अबोली
पण म्हणून तो इतिहास माहीत करून घ्यायची काही साधनंच नाहीत असंही नाही ना पगलाभाऊ. आपला इतिहास अगदीच काही अज्ञात नाही. इंग्रजांची डॉक्युमेंटेशनची चिकाटी या गोष्टी सोप्या करते एवढंच.
कोणताही इतिहास सोज्वळ नाही, हे मान्य. पण जगाला सभ्यता शिकवण्याचा आव आणणाऱ्या इंग्रजांकडे काही फार आदर्श परिस्थिती होती असं नाही, एवढंच म्हणायचंय. अर्थात ते काही आपला इतिहास नाकारत नाहीत. पण माती खाणारे काही आपणच नव्हतो. सगळी माणसं इकडून तिकडून सारखीच शेवटी.
4 Aug 2016 - 10:33 pm | स्रुजा
रागावण्याचा प्रश्न नाही पग भाऊ :) पिशीशी सहमत.
शिवाय ईंग्लंड च्या इतिहासात वडिलांनीच मुलीचं लग्न होण्याआधी किंवा झाल्यानंतर ही तिला नवर्यासकट एकाच हेतुने दुसर्याच्या घरी पाठवण्यापासून ते इन्सेस्ट पर्यंत सगळं आहे. आपण घातलेले गोंधळ हे भाऊबंदकीतुन , यादवीतुन, परधार्जिणेपणातुन आलेले होते तरी घरच्या मुलींचा सौदा करण्यापर्यंत वेळ गेली नाही. राजे महाराजांशी झालेली लग्नं कदाचित ग्रे एरिया मध्ये येतील ही पण काहीही झालं तरी ती लग्नं होती.
5 Aug 2016 - 2:11 pm | पगला गजोधर
हे आपण म्हणू शकतो कारण, त्यांचा इतिहास डॉक्यूमेंटेड आहे.
आपला इतिहास डॉक्यूमेंटेड नसल्याने हे आपण ठामपणे म्हणू शकत नाही. "इन्सेस्ट" हा प्रकार आपल्या इथे नव्हता किंवा झालाच नाही, असेही कोणी ठामपणे म्हणू शकत नाही. उदा. द्यायचेच झाले, तर महात्मा ज्योतिबा फुलेंनी, अश्या मुलींसाठी प्रसूतिगृहे काढलेली होती, ज्या वयाच्या ७ व्या ८ व्या वर्षी विधवा झालेल्या, परंतु वयात आल्यावर, त्यांना दिवस गेलेले. (त्यांना दिवस जायचे कारण त्यांचा भोग घेतला जायचा), व एकदा का दिवस गेले, तर त्या मुलीवर एकतर अघोरी गर्भपाताचे प्रकार तरी व्हायचे, किँवा ती मुलगी विहिरीत/नदीत उडी तरी मारायची वा ढकलली जायची.
असो आजही वर्तमान पत्र उघडल्यावर, सख्या बापाकडून बलात्कार्याच्या बातम्या वाचून मन विषष्ण होते, आणि बहुतेक वेळा आईला याची कल्पना असलेली आढळते. त्यामुळे "इन्सेस्ट" हा प्रकार आपल्या इथे नव्हताच किंवा झालाच नाही किंवा होतच नाही, कारण आपली संस्कृती महान वैगरे ...... वैगरे ..
या गोष्टी खटकतात.
5 Aug 2016 - 9:41 pm | स्रुजा
नाही नाही, तुम्ही म्हणताय तो बलात्काराचा भाग आहे. तो नात्यात होवो किंवा नात्याबाहेर ..बलात्कार अमानुष, हिन च समजला जातो. शिवाय संस्कृती महान वगैरे काही माझा मुद्दा नव्हता. माझा मुद्दा हा आहे की इन्सेस्ट ला किंवा लग्न झाल्यावर देखील एखाद्या राजाच्या अंतर्महालात मुलीला पाठवणे यात वावगं न वाटणे किंवा ती वहिवाट असणे अशातला भाग आपल्याकडे नव्हता. यात वावगं न वाटणे हे वाक्य अधोरेखित आहे.
डोक्युमेंटेशन बद्दल थोड्या वेळाने येऊन लिहीते.
4 Aug 2016 - 1:04 pm | यशोधरा
सुरेख लिहितेस.
4 Aug 2016 - 1:35 pm | राजाभाउ
मस्त सुरुवात. पुभाप्र.
4 Aug 2016 - 1:37 pm | आदूबाळ
काळा बाण या कादंबरीची आठवण झाली!
4 Aug 2016 - 1:50 pm | पद्मावति
वाह, मस्तं. पु.भा.प्र.
4 Aug 2016 - 1:53 pm | सिरुसेरि
लंडनमध्ये वेंबली पार्कच्या पुढे ट्यूडॉर गार्डन हा भाग आहे . तो ट्यूडॉर भावांनी बांधला असावा .
4 Aug 2016 - 1:54 pm | पैसा
मस्त लिहिते आहेस. राजघराण्यातले हेवेदावे आणि अंतर्गत यादवी सगळ्या जगभर सारखीच!
4 Aug 2016 - 2:14 pm | सामान्य वाचक
पु भा प्र
4 Aug 2016 - 3:08 pm | sagarpdy
पु भा प्र
4 Aug 2016 - 3:18 pm | अमितदादा
मस्तच....
4 Aug 2016 - 3:36 pm | प्रीत-मोहर
भारीच!!!
4 Aug 2016 - 4:04 pm | अभ्या..
अपरिचित नावांची इतकी गुंतागुंत आमच्या चिमुकल्या मेंदूला झेपत नाही तस्मात पास.
माफ कर गं बहिणाबाई.
4 Aug 2016 - 4:43 pm | अद्द्या
मस्तच ..
येउदेत पुढचा भाग :)
4 Aug 2016 - 5:09 pm | सुंड्या
मस्त लिहलंय. पुभाप्र...
4 Aug 2016 - 8:38 pm | पिशी अबोली
सर्वांना धन्यवाद.
4 Aug 2016 - 9:22 pm | प्रवास
खूपच छान !!
4 Aug 2016 - 10:27 pm | चैतू
पुढचे भाग वाचायला आवडेल.
5 Aug 2016 - 5:35 am | कैलासवासी सोन्याबापु
व्हो!!! काय लेख आहे राव!! एक नंबर प्रकरण जमले आहे पिशीताई! मला स्वतःला इंग्लिश इतिहासात कायम एक गॅप वाटत असे माझ्याकडे असलेल्या माहितीत, आता बहुतेक पूर्ण फॅक्टफ़ाईल, ट्रिव्हिया सहित अपडेट होईन!
पुभालटा
5 Aug 2016 - 6:18 am | डॉ सुहास म्हात्रे
इतिहातील रोचक प्रकरणाची सुंदर सुरुवात ! पुभाप्र.
5 Aug 2016 - 10:20 am | पिशी अबोली
धन्यवाद. पुढील भाग टाकला आहे.
माझा काही फार मोठा अभ्यास नाही या विषयाचा. पण महत्वाच्या घटना तेवढ्या या दोन भागांत टाकण्याचा प्रयत्न केला. :)
5 Aug 2016 - 5:48 pm | अस्वस्थामा
मस्त लिहिलंय हो. खरं तर सगळ्याच इतिहासात अशा इंटरेश्टींग गोष्टी असत्यात फक्त असं लिहिणारे पायजेत. :)
तेवढे दोन्ही भाग जोडून टाका की म्हंजे सोप्पे होईल जरा.
5 Aug 2016 - 9:52 pm | इडली डोसा
मी इंग्लंडच्या इतिहासाबद्दल अगदिच अज्ञानी आहे. तुझा लेख खूपच ओघवता आहे त्यामुळे वाचायला छान वाटला आणि आवडला. पुढचे भाग पण नक्की वाचणार.