पंधरा वर्षांपूर्वी एक तंत्रज्ञ काम करायचा हाताखाली, डॅरेन कोल्स्टन नावाचा. "आपलं काम बरं आणि आपण बरं" असा एकाग्र चित्ताने, इतरांमध्ये फारसा न मिसळता रहायचा. उत्तम कमावलेली शरीरयष्टी. त्यामुळे त्यामुळे एक श्वेतवर्णी आणि एक कृष्णवर्णी अशा नटखट म्हणून प्रसिद्ध असलेल्या दोन्ही सहकारी तंत्रज्ञ सहकारी कन्यका त्याच्या आगे-मागे रुंजी घालायच्या, पण हा कुणाच्या अध्ये-मध्ये न पडता, कानांत इअरफोन्स घालून गाणी ऐकत आपलं काम करीत रहायचा.
एकदा संध्याकाळी साडेसहा वाजून गेल्यानंतर आपण एकटेच आहोत आहोत अशा समजुतीने त्याने इअरफोन्स च्या ऐवजी स्पीकर्स वर गाणी लावली होती आणि अशात एका उशीराच्या मीटिंगनंतर मी माझ्या ऑफिसमध्ये आलो. मला गाणं ऐकू आलं, आणि आवडलं म्हणून त्याच्या जवळ जाऊन त्याला तसं सांगितलं. आधी खजील झाला आणि सॉरी म्हणाला, पण मी त्याला म्हंटलं की 'अरे, मला गायक खरंच आवडला, कोण आहे?' तो म्हणाला, "ल्यूथर वॅन ड्रॉस". मी थॅंक्यूं म्हंटलं, आणि 'त्या गायकाची आणखी काही गाणी असतील तर मला दे' म्हंटलं. त्याने दुसर्या दिवशी इतर गायकांबरोबर त्या गायकाची आणखी २-३ गाणी असलेली सीडी मला आणून दिली. ती ऐकून झाल्यानंतर मी तो गायक, त्याने म्हंटलेली गाणी, हे सर्व कामाच्या रगाड्यात विसरून गेलो.
पुढे वर्षभराने डॅरेन ऑफिसमध्ये आला, म्हणाला, "तुम्ही नेहेमी मला पुढे शीक म्हणता, मी कायनेसियालॉजीमध्ये मास्टर्स करायचा निर्णय घेतलाय, करू का?" (Kinesiology: study of the mechanics of body movements) "माझे आई-वडील आता थकले आहेत, मी एकटाच मुलगा आहे, त्यामुळे यापेक्षा आधिक पगार मिळवून देणारी नोकरी किंवा व्यवसाय करू शकलो तर त्यांना हातभार लागेल. पण त्यासाठी हातातली बॅच्लर्सची डिग्री पुरेशी नाही."
पंचविशीच्या आसपासच्या अमेरिकन तरुणाकडून अशी आई-वडिलांबद्दलची जबाबदारीची भावना जरा अनपेक्षित होती, पण बरं वाटलं. मी म्हंटलं, "जरूर कर". त्यानंतर तो मधून दोन-एकदा भेटून गेला, आणि दोन वर्षांनी मास्टर्स झाल्यावर 'स्वत:चं छोटंसं फिटनेस सेंटर सुरू करतो आहे' हे सांगायला आला.
*******************
काही वर्षांपूर्वी मी जिथे होतो त्या ठिकाणची नोकरी सोडून इतरत्र जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी माझ्या फेअरवेल पार्टीला डॅरेन आठवणीने आला होता. मी म्हंटलं, "आई-वडिल कसे आहेत?" म्हणाला, "माझं फिटनेस सेंटर चांगलं चालायला लागलेलं पाहिलं वडिलांनी, पण गेल्या वर्षी गेले ते आजारानंतर. आता आई एकटीच असते माझ्याजवळ." मी म्हंटलं, "आय अॅम सॉरी! यू मस्ट मिस युअर फादर अ लॉट! आय नो द पेन मायसेल्फ." म्हणाला, "हो, त्या वॅन ड्रॉसच्या गाण्यासारखं होतं कधी कधी..."
*****************
मी आई आणि वडिलांच्या विषयी आधी लिहिलं होतं. परवा भावाचा व्हॉट्सॅप मेसेज आला होता वडिलांच्या श्राद्धाविषयी. तेंव्हा पुन्हा एकदा वॅन ड्रॉसचं गाणं आठवलं. त्या गाण्याचे शब्द शोधले, आणि त्यांचा भावानुवाद इथे देतो आहे. मूळ गाणं ऐकाच!
मी पूर्वी खूप लहान असतांना
निरागसपणा संपला नसतांना
बाबा मला उंच उडवून झेलायचे
माझ्या अन आईच्या बरोबर डोलायचे
झोप येईपर्यंत मला गोल फिरवायचे
आणि हळूच नेऊन निजवायचे
मला खात्री असायची
प्रेमाच्या वलयाची
पुन्हा मिळावं आवर्तन एक
बाबांबरोबर नर्तन एक
न संपणारं गीत म्हणेन मी सदा
फक्त मिळू दे तो नाच पुन्हा एकदा
मतभेद होता माझ्यात अन आईत
धावत असे मी बाबांकडे घाईत
खूप वेळ ते मला हसवत
गोड बोलून मला फसवत
माझ्याकडून करून घ्यायचे
तेच, जे आईला हवे असायचे
त्या रात्री मला झोप लागली
की रूपया ठेवायचे उशीखाली
स्वप्नातही नाही आलं, बाबा दूर जातील थेट
मला हवीय केवळ एक नजरभेट
शेवटचा पदन्यास एक
बाबांबरोबर नर्तन एक
न संपणारं गीत म्हणेन मी सदा
फक्त मिळू दे तो नाच पुन्हा एकदा
बरेचदा आईच्या बंद दारावरून जाताना
मी ऐकलंय तिला बाबांसाठी रडतांना
माझ्याहून आधिक मग मी तिच्यासाठी
प्रार्थना करतो देवाची मोठी
नेहेमी नाही करत तू पण आता इतकं कर रे
बाबांसाठी झुरतेय ती आयुष्यभर रे
एकदाच दोघांना चालू दे तालात
माझ्याकडे पाहून हासु दे गालात
रोज झोपी जाताना एवढंच स्वप्न पाहीन
आयुष्यभर देवा, तुझा ऋणी राहीन
पुन्हा मिळावं आवर्तन एक
बाबांबरोबर नर्तन एक
न संपणारं गीत म्हणेन मी सदा
फक्त मिळू दे तो नाच पुन्हा एकदा
Dance With My Father
By Luther Vandross
Back when I was a child
Before life removed all the innocence
My father would lift me high
And dance with my mother and me
And then spin me around 'til I fell asleep
Then up the stairs he would carry me
And I knew for sure I was loved
If I could get another chance
Another walk, another dance with him
I'd play a song that would never ever end
How I'd love, love, love
To dance with my father again
When I and my mother will disagree
To get my way I would run from her to him
He'd make me laugh just to comfort me, yeah, yeah
Then finally make me do just what my mama says
Later that night when I was asleep
He left a dollar under my sheet
Never dreamed that he would be gone from me
If I could steal one final glance
One final step, one final dance with him
I'd play a song that will never, never end
'Cause I'd love, I'd love to dance with my father again
Sometimes I'd listen outside her door
And I'd hear how my mama cried for him
I pray for her even more than me
I pray for her even more than me
I know I'm praying for much too much
But could you send back the only man she loved
I know you don't do it usually
But dear Lord, she's dying
To dance with my father again
Every night I fall asleep
And this is all I ever dream
Songwriters: LUTHER VANDROSS, RICHARD MARX
प्रतिक्रिया
3 Aug 2016 - 6:16 am | स्मिता_१३
ह्युदयस्पर्शी! बाबांची आठवण आली प्रकर्षाने !
3 Aug 2016 - 6:17 am | स्मिता_१३
कवितेचा अनुवाद सुंदर.
3 Aug 2016 - 9:11 am | एस
अतिशय सुंदर लिहिलंय. भावानुवाद फारच छान!
3 Aug 2016 - 1:58 pm | शलभ
+१
3 Aug 2016 - 9:28 am | यशोधरा
भावानुवाद आवडला. मूळ गाणं घरुन ऐकण्यात येईल.
3 Aug 2016 - 9:31 am | ज्ञानोबाचे पैजार
छानच लिहिले आहे. हे इंग्रज पण दिसतात तसे नसतात.
वाचताना माझ्या अशाच एका मित्राची आठवण आली.
गाणे खुप सुंदर आहे आणि भावानुवादा मुळे मुळ गाण्यातल्या भावना आमच्या पर्यंत पोचल्या.
पैजारबुवा,
3 Aug 2016 - 11:02 am | राजाभाउ
भावानुवाद आवडला
3 Aug 2016 - 11:06 am | मुक्त विहारि
मस्त..
3 Aug 2016 - 11:06 am | स्पा
खुपच छान ललिहिलय मुळ गाणे ऎकतो आता
3 Aug 2016 - 11:08 am | मुक्त विहारि
https://www.youtube.com/watch?v=WQDLu0tRASI
3 Aug 2016 - 1:22 pm | सिरुसेरि
छान आठवणी
3 Aug 2016 - 2:07 pm | अभ्या..
आह्ह्ह्ह्ह. अल्टीमेटच बहुगुणीसाह्यबा.
मला हे गाणे आवडते खूप.
3 Aug 2016 - 2:31 pm | विनायक प्रभू
गुणी पोस्ट
3 Aug 2016 - 2:50 pm | नाखु
आणि त्याला जोड गाण्याची, दोन्ही खूप आवडले..
3 Aug 2016 - 3:42 pm | जगप्रवासी
आईवरचा लेख आणि बाबांसाठी लिहिलेली कविता दोन्ही खूप आवडले ....
खासकरून या ओळी खूप आवडल्या.
काय करतोय जगावेगळं?
कसलं ध्येय? कसलं नाव?
सोडून द्यावं सगळं, सगळं
आता घ्यावी घरी धाव
3 Aug 2016 - 6:16 pm | पैसा
....
3 Aug 2016 - 6:19 pm | अजया
अप्रतिम. फार आवडला भावानुवाद.
3 Aug 2016 - 10:59 pm | ज्योति अळवणी
आवडलं
3 Aug 2016 - 11:32 pm | रातराणी
अप्रतिम!
6 Aug 2016 - 12:51 am | अभिजीत अवलिया
सुन्दर...
6 Aug 2016 - 12:57 am | खटपट्या
माझे बाबा नुकतेच निवर्तले...
त्यामुळे लेख वाचून डोळे पाणावले
6 Aug 2016 - 2:13 am | रुपी
अहाहा.. काय सुंदर लिहिलं आहे.. भावानुवाद फारच सुरेख.
6 Aug 2016 - 7:30 am | रेवती
भावानुवाद आवडला.
6 Aug 2016 - 7:58 am | चौकटराजा
हे गीत फार सुंदर आहे. तसेच गायक ही सुरेल गोड आवाजाचा. पुन्हा याची इतर गीते ऐकीन. या गायकाची ओलख करून
दिल्याबद्दल बहुगुणी साहेब अत्यंत खुषी.
यातील पहिले कडवे म्हणजे माझ्या बाबांचे वर्णन नाही. कारण त्यानी मला घेत असे निजवले की नाही आठवत नाही.पण बाबा
म्हणून हे तंतोतंत माझे वर्णन आहे. माझ्या तारूण्यातील गमतीशीर भागाची यामुळे आठवण ताजी झाली.