चोरी प्रकाशाची (१)

सस्नेह's picture
सस्नेह in जनातलं, मनातलं
25 Jul 2016 - 3:04 pm

...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! ,
अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...!
आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब.
जलसंपत्तीप्रमाणेच वीज ही राष्ट्रीय संपत्ती आहे. आता संपत्ती म्हटली की चोरीचा धोका आला ! आणि ही संपत्ती काही कडीकुलुपात ठेवता येत नाही. तेव्हा हिचे संरक्षण म्हणजे एक अवघड प्रकरण आहे.
विजेची चोरी हा गुन्हा आहे आणि त्याबद्दल फौजदारी केस आणि तुरुंगवाससुद्धा होऊ शकतो. तरीही याबद्दल एक प्रकारची बेफिकिरी दिसून येते. सर्वसाधारण पणे पश्चिम महाराष्ट्रापेक्षा पूर्वेकडे हे प्रमाण जास्त आहे. काही प्रतिष्ठित उद्योगधंदेसुद्धा वीज-चोरीसारख्या अनिष्ट गोष्टी सर्रास करताना आढळले आहेत.
वीज चोऱ्या पकडण्यासाठी खास पथके नियुक्त केलेली असतात. पूर्वेकडच्या भागात अशाच एका पथकाचे नियंत्रण करण्याची एकदा वेळ आली होती. तेव्हा विजेची चोरी करण्यात आणि ती पकडण्यातही किती कल्पकता असते हे बघायला मिळाले. त्यातले काही मजेदार किस्से.
भाग बरेचदा अनोळखी असे. पोलिसांचे जसे खबरे असतात, तसे आमचेही. हे खबरे म्हणजे लोकल माहितगार व्यक्ती. त्या त्या भागातल्या वायरमन लोकांना सर्वसाधारणपणे चोऱ्यावाले ठाऊक असत. पण त्यांनी चोरी पकडली तर नंतर त्या भागात काम करणे जिकिरीचे होई. म्हणून ते प्रत्यक्ष भाग न घेता आम्हाला मार्ग दाखवत. पुढे चोरी पकडली तरी ते तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करणे फार तापदायक काम असे. डायरेक्ट मीटरमध्ये लुडबुड केलेली बरेचदा वरवर पाहणी करून दिसत नाही. मग मशीन लावून युनिटची तुलना केल्यावर फरक दिसे. त्यानंतर मीटर काढून सील करून त्यावर ग्राहक आणि साक्षीदाराची सही घेणे, ते व्यवस्थित सील करणे, तपासणीला पाठवणे, मग टेम्परिंग कन्फर्म झाल्यावर चोरीचा हिशेब काढणे इ. सोपस्कार होत. तत्पूर्वी ग्राहकाकडून अंदाजे फरकाची रक्कम भरून घ्यावी लागे. तिथेच मतभेद होत. वीज चोर काही केल्या सहकार्य करीत नसे. चोरी नेमकी कधीपासून सुरू होती, ते कळायला पुष्कळदा मार्ग नसे. मग कमीतकमी कालावधी म्हणजे सहा महिन्याच्या बिलाची फरक रक्कम काढून कोटेशन द्यायचे आणि रक्कम भरून घ्यायची. ही रक्कम ग्राहक काही केल्या मान्य करत नसे.
ग्रामीण भागात दादागिरी. ‘चोरी बिरी काही नाही, बिल भरणार नाय, कनेक्शन बंद करू देणार नाय’ ही भाषा. मग पोलिसांची मदत घ्यावी लागे. हजार लफडी.
एकदा एका घरात मीटरमध्ये गडबड आहे असे अनेक जणांकडून कळले होते. पण चेकिंगला गेले की घरमालकिणीला दुरूनच दिसे. मग ती पाळलेला कुत्रा मोकळा सोडे आणि आपण घरात जाऊन दार बंद करून बसे. कुत्रा वायरमन लोकांना कंपाउंडच्या आत येउच देत नसे. मग आमच्या वायरमनने एकदा गुंगीचे औषध घातलेले बिस्कीट आधीच कुत्र्याला चारले आणि मग मागील दाराने जाऊन चेकिंग केले. चोरी होतीच. मीटरमध्ये अंदाधुंद गडबड. मशीन लावायची गरजच पडली नाही. टेम्परिंग सरळ दिसत होते. सापडली ना चोरी न काय ? घरमालकीण कधी न ऐकलेल्या शिव्या देऊ लागली. पोलिसांचं नाव काढल्यावरच गप्प झाली.
असाच आणखी एक किस्सा.
बऱ्याच दिवसापासून ही केस सस्पेक्टेड होती. दुमजली घर. मीटर जिन्यात अत्यंत अडचणीच्या ठिकाणी. तिथे उजेड बेतास बात होता. मीटर बघायला दिवसासुद्धा टॉर्च वापरावा लागे.
घरात बारा पंधरा माणसे. वर-खाली मिळून आठ-दहा खोल्या. आठ दहा ट्यूबलाईट्स, दोन फ्रीज, दोन टीव्ही,आणि इतर भरपूर वापर. पण बिल जेमतेम पन्नास युनिट्स. वायरमनला पक्की खात्री होती की चोरी आहे. पण मीटरच्या पारदर्शक कव्हरमधून टॉर्चच्या उजेडात काहीच संशयास्पद आढळत नव्हते. कुठे अन कशी गडबड केलीय तेच समजत नव्हते. बरं, जास्त तपास अन चिकित्सा करायचा प्रयत्न केला तर वायरमनचीच गचांडी धरली जाण्याची शक्यता.
मागच्याप्रमाणेच आम्ही तिघे चौघे सस्पेक्टेड स्पॉटवर गेलो. जाताना दुसऱ्याच भागातल्या वायरमनला बरोबर घेतले होते. मोठा टॉर्च बरोबर नेला होता. अडचणीच्या चिंचोळ्या जिन्यात आमचे पथक खाटखुट करू लागताच घरातले अन शेजारचे दहा-पाच मेंबर गोळा झाले अन आमचे अंधारातील कृष्णकृत्य (?) टाचा उंचावून उत्सुकतेने पाहू लागले.
नित्याप्रमाणे त्या भागातील नेहमीच्या वायरमनला पाचारण केले गेले. तो आल्यावर पहिले त्याची झाडाझडती. मग मुख्य काम सुरु झाले.
चोरी ओळखण्याची हमखास पद्धत म्हणजे मीटरचा मेनस्विच बंद करायचा अन मग घरातील लाईट्स अन विजेची उपकरणे एकामागोमाग एक सुरु करायची. एक जरी सुरु झाले, तरी चोरी आहे, हे निश्चित झाले. त्याप्रमाणे वायरमनला मेनस्विच बंद करण्यास फर्मावले आणि ट्रायल घेतली. मेनस्विच बंद असूनही वरच्या मजल्याच्या अर्ध्या भागातील सर्व लाईट्स आणि उपकरणे सुरूच होती !
म्हणजे चोरी आहे हे नक्की झाले. आता कुठून अन कशी ते शोधल्याशिवाय पंचनामा कसा करणार ? आम्ही पाच जणांनी मिळून डोळ्यात तेल घालून सगळे वायरिंग तपासले. घरातील वायर अन वायर पिंजून काढली. मीटर खालून वरून तपासले. पण छे ! कुठेच काही गडबड दिसेना. आता काय करावे ? चक्कीत जाळ झाला !
मग खाली जाऊन आम्ही डोक्याला डोकी लावली. पलीकडच्या भागातून बोलावून आणलेल्या वायरमनमामांनी युगत लढवली. आम्हाला डोळा मारला आणि शेजारीच रहात असलेल्या घरमालकाच्या पुतण्याला हाक मारून गल्लीच्या कोपऱ्यावर घेऊन गेले. आम्ही पलीकडच्या गल्लीतल्या हॉटेलात च्यापाणी करत बसलो.
इकडे पुतण्याला वायरमनने हॉटेलात नेऊन चहा पाजला आणि अघळपघळ गप्पा सोडल्या. चुलत्या-पुतण्यांचे काही बरे नव्हते, ही गोष्ट वायरमनमामांना ठाऊक होती. चहा पोटात गेल्यावर पुतण्या बोलता झाला. मीटरची मेख त्याला बरोब्बर माहिती होती.
लगेच मामा परतून आले आणि आम्हाला फोन मारला. गेलो.
परत बघे मंडळी जमा झाली. मामांनी खिशातून एक भक्कम चाकू काढला. मीटर अन भिंतीच्या मधल्या सापटीत टॉर्चचा झोत टाकला आणि चाकूचे पाते आत खुपसले. जsरा ताण दिला अन फट मोठी झाली. मग त्यांनी आम्हाला एकेकाला येऊन फटीत डोकवायला सांगितले. बघतो तर काय, त्या फटीतून एक केबल मीटरच्या बाहेरून थेट भिंतीत गेलेली दिसली. आमच्या खांबावरची केबल मीटरमध्ये जाण्यापूर्वीच तिला वाटा फुटल्या होत्या. भिंतीला बेमालूम आरपार भोक पाडले होते अन त्यातून ती केबल जिन्याच्या आधार-पाईपमध्ये अलगद शिरली होती ! आणि तिथून छुप-छुपके वरच्या अर्ध्या मजल्याला वीज पुरवत होती !
झाले. समोरच्या बघ्यांमधल्याच दोघांना पकडले आणि पंच बनवले. पंचनामा केला. मालकाची घाबरगुंडी उडालेली. त्याच्या सह्या घेतल्या. बिलाचे रेकॉर्ड काढून हिशेब केला आणि फरकाचे बिल काढून मालकाच्या हातात ठेवले.
या प्रकाशाची किंमत काही हजारात गेली होती !
(क्रमशः )

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

निर्धार's picture

27 Jul 2016 - 8:58 pm | निर्धार

बाकी महावितरणाच्या ऑनलाइन पेमेंट च्या सुविधेने रांगेची कटकट टळली.

पुण्यात अफलातून विजचोरी केली जाते

मार्मिक गोडसे's picture

29 Jul 2016 - 10:39 pm | मार्मिक गोडसे

पुण्यात अफलातून विजचोरी केली जाते

तुमचं बरय बाबा, तुम्ही काहीही म्हटले तरी तुमचे कपडे कोणीही काढू शकणार नाही.

कुठल्याही थराला जाऊन कौतुक करु शकता
हा एका स्वतंत्र धाग्याचा विषय आहे माझ्या आयुष्यात पुणेकराने पुण्याच्या कुठल्या गोष्टींची बढाई मारली.
मी तर एका पुणेकराकडुन चक्क आमच्या पुण्याचे नाल्याची तारीफ या कानाने ऐकली आहे.
मला तर ते ऐकुन " कौन कहता है नाला-ए-पुलु को बेअसर ? वैग्रे वाटुन तिथेच चाक हो गये.
असो या गंभीर धाग्यावर उगा अवांतर नको.

जव्हेरगंज's picture

30 Jul 2016 - 6:55 pm | जव्हेरगंज

चक्कीत जाळ झाला!!!

:)

हेमन्त वाघे's picture

5 Aug 2016 - 8:29 am | हेमन्त वाघे

चक्कीत जाळ ? हा वाक्यप्रचार मी फार थोड्या वेळा वाचला या आहे - तर याचा अर्थ काई ??

हा चक्कीत चाळ असा पण वापरला जातो का?

संदीप डांगे's picture

5 Aug 2016 - 8:41 am | संदीप डांगे

"चकचकीत जाळ"

हेमन्त वाघे's picture

5 Aug 2016 - 9:30 am | हेमन्त वाघे

Chakkit Chaal

साधा मुलगा's picture

30 Jul 2016 - 8:14 pm | साधा मुलगा

पुढील भागाच्या प्रतीक्षेत !

गम्पत पाटील's picture

1 Aug 2016 - 10:36 pm | गम्पत पाटील

रिडर म्हणुन काम करतोय त्यामुळ मंडळाचा आणि लोकांचा धुमाकूळ रोजच बघतोय

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2016 - 12:56 am | पिलीयन रायडर

वा वा! ताई एकदम हॅपनिंग फिल्ड मध्ये आहेत पण काही म्हणा!!

पुढचा भाग टाका की!

उडन खटोला's picture

2 Aug 2016 - 11:28 am | उडन खटोला

>>>...ती गेली की क्षण क्षण युगांसारखा होतो, ती आली की सळसळत चैतन्य येते, आनंद येतो, जीवनात जान येते ! ,
अशी ही ‘ती’ म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून पहिलीच आहे नेहमी...!
आणि ती आहे वीज ! -- आजच्या युगातली एक जीवनावश्यक बाब.

हा परिच्छेद म्हणजे शाळेतला निबंध जोरकस लिहायचा असला की घ्यायचा रन अप वाटतोय.

जागु's picture

2 Aug 2016 - 11:47 am | जागु

नविन विषय. छान.

पुण्यात स्लम एरिया मधे एक जण चोरीचे कनेक्शन घेतो,आजु बाजुचे पाच सहा लोक त्याच्या कडून कनेक्शन घेतात,चोरी सापडली तरी सगळे चोर दंड विभागुन भरतात,आहे की नाही अफलातून चोरी
:)

दिवा बत्ती साठी कोणी वीज चोरी करत नाही. घरघुती ग्राहकात जलतापक,पाण्याची मोटा,वातानुकूलित यंत्र, या जास्त वीज खपत होणाऱ्या उपकरणासाठी होते .

उडन खटोला's picture

3 Aug 2016 - 9:09 pm | उडन खटोला

शतकानिमित्त पेट्रोमॅक्स ची बत्ती, दोन मेणबत्त्या, एक लोहचुंबक आणि न सर्दाळलेली काडेपेटी.

ब़जरबट्टू's picture

4 Aug 2016 - 11:47 am | ब़जरबट्टू

आता फ्लॅट सिस्टिम मुळे ते वीज चोरण्यातले स्किल गेले राव.. गावाकडे जाऊन कधी कधी हौस पूर्ण करून घेतो.. :)

कमवू's picture

6 Aug 2016 - 1:50 pm | कमवू

मस्त
लेख आवडला