कालच 'कोडमंत्र' हे मराठी नाटक पाहिले. 'ए फ्यु गुड मेन' या अमेरिकन नाटकावर ते आधारित आहे, हे सुरवातीलाच सांगितले. हेच नाटक गुजराती रंगमंचावरही चालू आहे.
लष्करी शिस्त ही कधीकधी कशी अतिरेकी होऊ शकते , हे या नाटकांत फार चांगल्या तर्हेने दाखवण्यांत आले आहे. लष्करातील अनेक गोष्टी सामान्य लोकांपर्यंत येत नाहीत आणि लष्करी गुपिते शत्रुच्या हाती पडू नयेत, या दृष्टीने ते बर्याचवेळा आवश्यकही असते. पण कधीकधी अधिकाराचा गैरवापर करण्याचा मोह एखाद्या कर्तव्यदक्ष अधिकार्यालाही होतो आणि मग ते निस्तरताना तो कोणाचा तरी बळी देतो.
रवी शेलार हा मराठा रेजिमेंटचा एक जवान असतो. लष्करातील अतिखडतर प्रशिक्षण त्याला तब्येतीमुळे झेपेनासे होते. त्याबद्दल तो वरिष्ठांना अनेकवेळा विनवणीही करतो. पण आपल्या रेजिमेंटची शान जाईल या भीतिने त्याचे म्हणणे ऐकून घेतले जात नाही. उलट, बळजबरीने त्याला 'टफ' बनवण्याचे प्रयत्न केले जातात. त्यांत त्याचा दुर्दैवी मृत्यु होतो. त्याविषयीची केस लष्करी कोर्टात लढली जाते आणि तिथे सत्य पुढे आणण्याचा कसा संघर्ष होतो, या घटनांवर नाटक रंगते.
केस लढवणारी मुक्ता बर्वे आणि कर्तव्यकठोर अधिकारी अजय पूरकर यांनी उत्तम कामे केली आहेत. त्याशिवाय नाटकांत वावरणार्या चाळीस कॅडेटसनीही जबरदस्त साथ दिली आहे. नाटकांत काढायच्याच म्हटले तर काही चुका आहेत, पण एकंदरीत , नाटक आपल्याला खिळवून ठेवते व विचार करायला लावते. नाटकाच्या कथेबद्दल यापेक्षा जास्त लिहिले तर नाटक बघताना मजा येणार नाही, म्हणून संक्षिप्त वर्णन केले आहे. अशा प्रकारचे लष्करी कोर्ट खटल्याचे मराठी नाटक याआधी आलेले नाही.
नाटकातील नेपथ्य, संगीत व पार्श्वसंगीत, प्रकाशयोजना हे सर्व उत्तम आहे. नाटक , एकदातरी जरुर बघण्यासारखे आहे, असे माझ्यासारख्या जातिवंत टीकाकाराचे मत झाले, यामधेच या नाटकाचे यश आहे.
याचे सविस्तर परीक्षण, लोकसत्तामधे, रवीन्द्र पाथरे यांनी केले आहे.
http://www.loksatta.com/manoranjan-news/marathi-play-code-mantra-review-...
प्रतिक्रिया
11 Jul 2016 - 10:52 am | कैलासवासी सोन्याबापु
फ्यु गुड मेन पाहिला आहे, त्यासोबत शौर्य सुद्धा पाहिला आहे, एकंदरीत प्लॉट पाहता नाटक सुद्धा त्याच धाटणीचं वाटते आहे,मुक्ता बर्वे अन संजय पूरकर हाच एक वेगळेपणा आहे, एरवी नवे काही नाही,अजून एक आवर्जून नोंदवायचे म्हणजे, हा पूर्ण सेटप अमेरिकेतला आहे (कथेचा डोलारा) तिथे लष्करी शिस्त जास्त आहे का नाही ते माहिती नाही पण तिथे व्यक्तिस्वातंत्र्य अतिरेकी असावे असे वाटते मला तरी, तो भारतीय फ्रेम मध्ये मला तरी (शौर्य मध्ये) विजोड वाटला होता
11 Jul 2016 - 11:46 pm | बोका-ए-आझम
अ फ्यू गुड मेन मध्ये व्यक्तिस्वातंत्र्यापेक्षाही लष्कर हे कायद्याच्या वर आहे का -Are armed forces above the law हा महत्त्वाचा मुद्दा होता. आणि त्यात अभिनयसम्राट जॅक निकलसन होता. शौर्य एक प्रयत्न म्हणून ठीक होता. पण त्यात तो संघर्ष नीट उभा राहात नाही. आता सांगायला हरकत नाही - असाच एक संघर्ष माझ्या एक शिक्षिका श्रीमती अनुराधा पळधे गेली २० वर्षे करताहेत भारतीय नौदलाशी. त्यांचा मुलगा अपघातात मृत्यू पावला. पण नौदलाने स्वतःची जबाबदारी झटकली. त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या अजूनही झगडताहेत. मला त्यांच्या संघर्षाची आठवण अ फ्यू गुड मेन पाहताना आली आणि असाही विचार मनात आला की कदाचित अमेरिकेत त्यांना आत्तापर्यंत न्याय मिळाला असता.
12 Jul 2016 - 10:19 am | अजया
+१००
मलाही वाचताना पळधे बाईंच्या संघर्षाची आठवण झाली.
बोक्या, जमल्यास त्यांच्या लढ्याची ओळख मिपावर करुन देच.
11 Jul 2016 - 11:47 pm | बोका-ए-आझम
अजय पूरकर असं नाव आहे, संजय पूरकर नाही. परीक्षण छान.
12 Jul 2016 - 9:54 am | तिमा
चुकून संजय पूरकर लिहिले गेले, पण संपादनाची सोय नसल्यामुळे राहून गेले.
या नाटकांत, सेनादल हे कायद्याच्या वर दाखवले नाहीये.
12 Jul 2016 - 10:23 am | राजाभाउ
छान परीक्षण . अ फ्यू गुड मेन आणि शौर्य दोन्हीही पाहिले आहे त्या मुळे नाटक परत पहावे का नाही याचा विचार करतोय.