तो प्रवाही प्रवास…!

अश्विनी वैद्य's picture
अश्विनी वैद्य in जनातलं, मनातलं
3 Jun 2016 - 5:02 am

नदीकिनारी चालत जाताना उन्हाची ऊब जरा जास्तच जाणवत होती. तळपायांना थोडा गारवा मिळावा म्हणून किनाऱ्यावर लांबच लांब पसरलेल्या हिरव्या, थंडगार लुसलुशीत गालिच्यावर शूज काढून पाय टेकवत एका झाडाखाली बसले. तिथल्या नीरव शांततेचाही एक वेगळाच आवाज कानांना जाणवत होता.

थोड्यावेळाने सहजच लक्ष गेलं. माझ्यापासून अगदी दोन पावलांवरच मुंग्याची चाललेली एक लांबच लांब रांग दिसली…एक एक मुंगी अगदी ओळीने पुढचीच्या बरोबर मागे जात होती…मध्ये येणारे छोटे छोटे दगड, खळगे एका मागोमाग एक सहज ओलांडून पुढे चालली होती. गवताच्या पात्याच्या अगदी वरच्या टोकावरून मध्येच धपकन खाली पडत होती, पण परत तेवढ्याच तत्परतेने वर चढत होती. पुढे काय होते माहित नाही… 'कुठे पोहोचणार, किती लांब जाणार, अजून किती दगड, खड्डे पार करावे लागणार, किती वेळा पडणार', कसलीच कल्पना नाही. पण त्यांचे चालणे मात्र चालूच होते. त्या लांबपर्यंत पसरलेल्या हिरव्यागार गवताच्या एका कोपऱ्यात कुठूनशी सुरु झालेली ती मुंग्यांची रांग आज उगीच जरा जास्तच लक्ष वेधून घेत होती.

वाटलं, असाच चालू असतो का आपला पण प्रवास… चालत आहोत आपण पण त्याच वेगाने…पुढे पुढे….ठरवलंय बरच काही… असं करायचंय, हे करायचंय, ते करायचंय…किती वेळ लागेल, कशा अडचणी येतील माहित नाही… पण चालणं चालूच आहे.…अव्याहत… 'आलंच बहुदा…पोहोचूच आता', असं वाटतंय तोवर त्या ठिकाणांच मृगजळ होतंय…परत नवीन उमेद… नवीन उदिष्ट… पण चालणं चालूच आहे… अविरत…जायचंय कुठेतरी…पण, तो 'कुठेतरी' कुठे आहे हेच कळत नाहीये. सापडेल कदाचित, असेल इथेच…सगळेच चाललेत ना…मग हाच रस्ता बरोबर असेल.…सगळ्यांबरोबरच धरला ना आपण हा रस्ता…भरपूर पगाराचा किंवा परदेशातला जॉब मिळवायचा होता… सगळे हेच करत होते ना…आपणही त्यांच्या बरोबरीने चालत आलो…

हेच तर ठरवलं होतं ना शाळेत असताना, कि खूप कोणीतरी मोठ्ठ व्हायचंय. मग बरेच छोटे-मोठे खड्डे, दगड पार करत आलोय कि आज इथपर्यंत, नोकरी मिळाली, घर झालं, लग्न झालं, कार झाली, परदेशवाऱ्या झाल्या, मुलं झाली, त्यांची चांगल्या शाळेत admissions झाली, हे सगळे आत्ता छोटे छोटे वाटणारे टप्पे पूर्वी खूप लांबचे पल्ले वाटायचे…तेव्हाची 'big destinations होती ती.…सुदैवाने गाठली आपण. पण तरीही या सगळ्या गाठण्यात तो 'कुठेतरी' सापडलाच नाही असंच अजूनह वाटतंय…हरवलाय कुठेतरी…! आज वाटतंय, हे नव्हतं final destination…! चुकला का मग आपला रस्ता, सगळ्यांबरोबर एकाच प्रवाहात वाहत आलो….आयुष्याचे ठोकताळे सगळ्यांचे होते तेच आपणही ठरवले. आनंद, सुख यांच्या पुस्तकात वाचलेल्या व्याख्या खऱ्या आयुष्यातही प्रत्येकाच्या सारख्याच असतात हे गृहीत धरलं. आणि तेच सारं मिळवण्यातला आनंदच खरा मानला. पण मग तरीही अजून का नाही पोहोचलो समाधानाच्या आलेखाच्या त्या उंच टप्प्यावर. अजूनही शोधतच आहोत तिथपर्यंत जायचा रस्ता.

हे असं प्रवाहात वाहत जाण्यापेक्षा जे आतून करावसं वाटतंय त्याचाच ध्यास घेवून केलेल्या प्रवासाचा रस्ता आपल्यापुरता आपणच तयार करायला हवा होता का… कदाचित नसतो पोहोचलो अगदी शेवटच्या destination पर्यंत, पण तो स्वतः निवडलेला रस्ता चालण्यातला प्रत्येक टप्प्यावरचा आनंद हेच त्या प्रवासाचं समाधान तरी असलं असतं.
पूर्वीची पेन्शन वाली सरकारी नोकरी आणि आत्ताची पाच-सहा आकडी पगार असलेली IT मधली नोकरी…परिस्थितीत फरक फक्त एवढाच पडलाय…पण रस्ता अजूनही तोच…तसाच… प्रवाहानं ठरवलेला…सगळे करताहेत म्हणून बरोबरच आहे असं ठरवून निवडलेला….यात चुकीचं काही नसेलही…पण त्या प्रवासात आनंद आणि समाधान कुठेतरी मिळतंय का हे महत्वाचं…. कारण प्रवासाच्या शेवटी destination असं काही नाहीच मुळी… आयुष्यभर आपण जे चालतोय, पळतोय तेच जगणं होतं. आणि म्हणून फक्त तो प्रवासच महत्वाचा होता… त्या वरची समाधानाची ती ठिकाणं महत्वाची होती… आणि त्यामुळच तो रस्ताही महत्वाचा होता… आणि म्हणूनच कदाचित आपण स्वतः निवडलेला…!

तेवढ्यात, हा सगळा मनातला विचित्र गोंधळ चालू असताना त्या झाडावरून एक छोटंसं पान हळूच निखळून पायाजवळ पडलं, वाऱ्याच्या हलक्या झोता बरोबर हेलकावे घेत जमिनीपासून परत थोडं वर उडालं, परत खाली आलं, वजनानं हलकं असल्यानं वाऱ्याबरोबर पुन्हा उडून थोडं लांब गेलं…त्या हेलकावे घेणाऱ्या पानावर स्थिरावलेल्या नजरेसमोर मग आयुष्यात अनुभवलेले हेलकावेही त्या क्षणी उगाच जाणवले…पुढे किती उडणार होतं आणि शेवटी कुठे जावून पडणार होतं ते पान, कोण जाणे. आपलाही प्रवास पुढे अजून त्या 'कुठेतरी' च्या शोधात किती हेलकावे खाणार आहे कोण जाणे. त्या मुंग्यांची रांगही पुढे इतकी लांब गेली होती, कि नजरेच्या एका टप्प्यापर्यंतच ती दिसत होती, ती ही पुढे कुठे गेली कोण जाणे.…!

अश्विनी वैद्य

जीवनमानविचार

प्रतिक्रिया

मनातले विचार छान उतरवलेत.

अश्विनी वैद्य's picture

3 Jun 2016 - 3:47 pm | अश्विनी वैद्य

धन्यवाद...!

असंका's picture

3 Jun 2016 - 9:29 am | असंका

सुंदर!
आवडलं..!

धन्यवाद!

एस's picture

3 Jun 2016 - 1:22 pm | एस

सर्वज्ञ म्हणत असत. प्रवासातला (पक्षी: कामातला) आनंद सर्वात महत्त्वाचा. तेच इथेही लागू होतं.

अश्विनी वैद्य's picture

3 Jun 2016 - 3:53 pm | अश्विनी वैद्य

अगदी खरय...ज्यांना तो मिळतो त्यांचा प्रवास सुखकर होतो

पद्मावति's picture

3 Jun 2016 - 3:48 pm | पद्मावति

खूप सुंदर.

अश्विनी वैद्य's picture

4 Jun 2016 - 4:45 am | अश्विनी वैद्य

धन्यवाद

जव्हेरगंज's picture

4 Jun 2016 - 7:58 pm | जव्हेरगंज

ओढून ताणून केलेला विचार!

आसो, शुभेच्छा!