आई नव्हे, ओल्ड मेड...-बेटी डेविस

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
22 May 2016 - 5:54 pm

गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो...

अाठवणीतला हॉलीवुड/ एक- ‘दि ओल्ड मेड’

एकाच नायकावर प्रेम करणारया दोघी बहिणी. पैकी एकीपासून झालेलं मूल दूसरीच्या कुशीत वाढतंय. हे गुपित फक्त नायक आणि बाळाच्या आईलाच माहित. साहजिकच पोटच्या पोराची काळजी वाटणारी आई, त्या अपत्याला पुरेपूर सुख मिळावं यासाठी धडपडते..., त्याला दुर्गुणांपासून दूर ठेवायचा प्रयत्न करते. शेवटी ‘या’ बहिणीच्या पदरात ‘आई’ चा मान येतोच की...म्हणजेच चित्रपटाच्या शेवटी ते मूल तिला ‘आई’ म्हणतं व तिचं मातृत्व सुखावतं...या कथानकावर हिंदीत बरेच चित्रपट निघाले, निघताहेत...

वर उल्लेखिलेला विषय हॉलीवुडला देखील वर्ज्य नाही.

1939 साली आलेल्या वार्नर ब्रदर्सच्या ‘दि ओल्ड मेड’ चित्रपटाचा विषय हाच होता. बेटी डेविस त्यांत प्रमुख भूमिकेत होती. पण चित्रपटाचा शेवट मात्र बॉलीवुडच्या चित्रपटांसारखा न होता हॉलीवुडच्या परंपरेला साजेसा होता.

‘दि ओल्ड मेड’ ची पार्श्वभूमी 1860 ते 1865 दरम्यान झालेल्या अमेरिकी गृहयुद्धावर आधारित होती. डेलिया अापल्या प्रियकराला धुडकावून एक लक्षाधीशाशी लग्न करते. या भग्नह्रदयी प्रियकराला डेलियाची चुलत बहिण शार्लेट आधार देते. या संबंधांमुळे शार्लेटला एक मुलगीहोते-टीना. हा प्रियकर अमेरिकी गृहयुद्धात खर्ची पडतो. युद्ध काळात शार्लेट एका नर्सरीची संचालिका होते. त्याच नर्सरीत तिची स्वत:ची मुलगी टीना देखील आहे. पुढे डेलिया या नर्सरीला भेट देते, तेव्हां शार्लेट तिला टीनाचा परिचय देण्याचं टाळते. नंतर परिस्थितिमुळे शार्लेट आणि टीना, डेलिया जवळ राहू लागतात. शार्लेट तिच्या मुलांची मेड असते. काळाच्या प्रवाहात पुढे टीना शार्लेटला साफ विसरते.

या फरकाचं सूचक पद्धतीने सुंदर चित्रण केलं होतं.

रात्री झोपण्याकरितां सगळी मुलं आपल्या बेडरुम मधे जातात. तेव्हां गुडनाइट किस करितां डेलिया, शार्लेट सोबत त्या खोलीत येते. नाइट गाउन घालतांना शार्लेट टीनाची मदत करते, तर इतर मुलांची मदत डेलिया करते. झोपण्यापूर्वीची प्रार्थना करण्यासाठी डेलिया मुलांना आवाज देते, तशी टीना पटकन शार्लेटला दूर करुन थेट डेलिया जवळ जाऊन तिला बिलगते. प्रार्थना झाल्यावर मुलं डेलियाला ‘गुड नाइट मम्मी’ म्हणतांत. तेव्हां ती, शार्लेट कडे बोट दाखवून म्हणते-

‘टेल हर गुड नाइट आंटी शार्लेट...’

यावर मुलं तसं करतांत. त्यांचेच अनुकरण करुन टीना देखील डेलियाला गुड नाइट मम्मी व शार्लेटला ‘गुड नाइट आंटी शार्लेट’ म्हणते. तिथेच शार्लेटला कळून चुकलेलं असतं की आपण तर फक्त हिच्या प्रियकराला आपलंसं केलं. पण हिने तर मला माझ्याच मुली पासून दूर केलंय, नकळत माझ्या मातृत्वालाच झिडकारलंय.

हे शल्य मनांत घेऊनच शार्लेट, डेलियाच्या घरांत ‘मेड’ म्हणून राहू लागते. नंतर ती बरेचदा टीनाला सांगण्याचा प्रयत्न करते की-‘तुला जन्म देणारी आई मी आहे, डेलिया नव्हे...’ पण हे गुपित ती टीनाला सांगू शकत नाही. मुलं मोठी झाल्यावर देखील टीनावर शार्लेटची घारीसारखी नजर अाहे. ती तिला सतत सावध करीत असते-

‘हे करुं नको...ते करुं नको...हे असंच कां केलं...वगैरे-वगैरे...!

हा सगळा जाच टीनाला बिलकुल सहन होत नाही. प्रसंगी टीना तिला झिडकारते-

‘रिडिक्युलस...नैरो माइंडेड ओल्ड मेड...’

म्हणायला देखील कमी करत नाही. चित्रपटाचा शेवट मात्र अनपेक्षित होतो.

टीना चं लग्न ठरतं. त्यावेळी देखील शार्लेट गुपित उघडायचा प्रयत्न करते. ती डेलियाला धमकावते-

‘मी माझ्या मुलीला माझ्या मनाप्रमाणे वागवीन...मी तिला सांगून टाकीन की तिला जन्म देणारी कोण आहे...!’

यावर डेलिया तिला समजावते की असं काही करुं नकाेस. पण शार्लेट थेट टीनाच्या खोलीतच शिरते. तिथे टीना नाइट गाऊन घालतेय. शार्लेट तिची मदत करु लागते. तेव्हां टीना म्हणते-

‘आंटी शार्लेट, तुम्हीं मला मनापासून आवडतां...आज पर्यंत मी तुमच्याशी फार उद्धटपणाने वागले, तरी मला माफ करां...आता मी गेल्यावर मम्मी अगदीच एकटी पडेल...तेव्हां तुम्हींच तिला सांभाळा, तिची काळजी ध्या...’

हे ऐकून शार्लेटला धक्काच बसतो व ती काहीहि न बोलतां तशीच बाहेर येते. तर तिथे डेलिया उभी. तिला बघतांच शार्लेट सांगते-

‘घाबरु नको, मी तिला काहीच सांगू शकले नाही. खरं म्हणजे ती माझी मुलगी नव्हतीच कधी...मी फक्त ितला जन्म दिला. आता मला उमजलंय की मी आपल्याच गुर्मीत वागत आले...माझं सुख, माझी स्वप्नं...यातच मी आयुष्य घालवलं. आज मला कळलंय की खरंच माझी योग्यता आई होण्याची नाही. तूच तिची खरी आई आहेस...’

यावर डेलिया तिला सावरण्याचा प्रयत्न करते, तशी ती पुन्हां उसळते-

‘मला तुझ्या सहानुभूतीची गरज नाही...मी जशी आहे तशीच राहणार...तू जा...तुला टीना बोलावतेय...’

ती जाते...तिथे माय-लेकींमधे झालेल्या संभाषणाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचा शेवट अनपेक्षित होतो.

लग्नानंतर नवरया सोबत जातांना मुली ‘शेवटच्या किस’ चा मान बहुधा आपल्या आईलाच देतांत. टीना मात्र यावेळी मुद्दाम विचारते-

‘आंटी शार्लेट कुठे आहे...’

ती समोर आल्यावर तिला ‘किस’ करुन, गाडीत बसून निघून जाते...शार्लेट मात्र ‘त्या’ गालावर हात ठेवून, भरलेल्या डोळयांनी दूर जाणारया गाडीकडे बघत उभी अाहे...डेलिया येते व तिला सांभाळून घरांत घेऊन जाते...

‘झाकली मूठ सव्वा लाखाची...’ मराठीतील या म्हणी प्रमाणेच चित्रपटांतील शेवटचं दृश्य, शार्लेटचं गुपित न उघडतां तिला मातृत्व बहाल करतं. शार्लेटच्या भूमिकेत बेटी डेविस तर ग्रेटच...

‘रिडिक्युलस...नैरो माइंडेड ओल्ड मेड...’-हा शेरा ऐकल्या नंतर तिची भावमुद्रा असो किंवा टीनाच्या खोलीतून बाहेर पडल्यावर तिची खचलेली मुद्रा असो, तिचा अिभनय लाजवाब असाच होता. तरी आठवणीत कायम घर करुन आहे ती गालावर हात ठेवून तृप्त, भरलेल्या डोळयांनी दूर जाणारया टीनाच्या गाडीकडे बघतांनाची तिची ‘ती’ नजर...!

https://youtu.be/bO61XJGPR7A

-----------------------

पुलित्झर विजेता ‘दि ओल्ड मेड’
एडिथ व्हर्टनच्या कादंबरीवर बेतलेल्या जी एकिन्सच्या ‘दि ओल्ड मेड’ नाटकाला 1934-35 साली जेव्हां पुलित्झर पुरस्कार मिळाला, तेव्हां आलोचकांनी यावर भुवया वर केल्या होत्या. त्यांच्या मताप्रमाणे हा पुरस्कार लिलियन होल्मनच्या ‘दि चिल्ड्रन्स हाऊस’ ला द्यायला हवा होता.
एकिन्सच्या नाटकाची कहाणी 1833 ते 1854 या दरम्यान दक्षिणी अमेरिकेत राहणारया दोन बहिणींची होती. डेलिया लोवेल आपल्या प्रियकराला सोडून जेम्स रोलस्टाेनशी लग्न करुन मोकळी होते. या प्रियकराला आधार देते डेलियाची चुलत बहिण-शार्लेट. स्लेम शी संबंधांमुळे शार्लेटला एक मुलगी होते-टीना. शार्लेट टीनाबद्दल डेलियाला काही ही न सांगता एक आश्रमात तिला वाढवते. या दरम्यान शार्लेटचं लग्न रोलस्टोनच्या भावाशी (डेलियाच्या दिराशी) ठरतं. पण...या मधल्या काळांत डेलियाला शार्लेटचं गुपित कळून चुकलंय, म्हणून ती हे लग्न होऊं देत नाही. तसंच शार्लेटला या साठी तयार करते की टीनाला मी माझ्या मुली प्रमाणे वाढवीन, आपण सोबतच राहू...वर्षे उलटतात, आता टीना डेलियाला आई आणि शार्लेटला ‘ओल्ड मेड’ समजते...टीनाचं लग्न ठरतं, तेव्हां देखील शार्लेट तिला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते...पण...

अशी कथा असलेल्या ‘दि ओल्ड मेड’ नाटकाला मिळाला होता पुलित्झर पुरस्कार.

1939 साली दिग्दर्शक एडमंड गोल्डविंग नी हे नाटक रुपेरी पडद्यावर आणलं. नाटकाला चित्रपटांचं रुप देतांना त्याने मूळ नाटकाच्या संहितेत थोडा फेरबदल करुन चित्रपटाचा काळ अमेरिकन गृहयुद्धाच्या आसपासचा ठेवला. चित्रपटांत दाखवण्यांत आलं होतं की स्लेम स्पेंडर हा गृहयुद्धात खर्ची पडतो. या चित्रपटांत शार्लेटची भूमिका केली होती हॉलीवुडची प्रसिद्ध अभिनेत्री बेटी डेविस नी, तर डेलिया लोवेल झाली होती मिरियम हापकिन्स, तसंच स्लेम स्पेंडरच्या छोट्याशा भूमिकेत होता जार्ज बेनेट.

बेटी डेविस हिने एकदा म्हटलं होतं-‘I adore playing bitches...there’s a little bit of bitch in every women and a little bit of bitch in every man...

सर्वांची आवडती नटी

बेटी डेविसचा जन्म 5 एप्रिल 1908 साली (लोवेल) मैसाच्युएट्स मधे झाला. ती सात वर्षांची असतांना तिच्या आई-वडिलांनी घटस्फोट घेतला. पुढे आपल्या आईमुळे डेविस अभिनयाकडे वळली व तिने जान मुरे एंडरसनच्या ड्रामेटिक स्कूल मधे प्रवेश घेतलां. (तिथे ल्यूसी बाल तिची क्लासमेट होती) इथे ती सर्वांची आवडती नटी ठरली. पुढे 1928 साली रोचेस्टरला दिग्दर्शक जार्ज कुकरच्या कंपनीत करती असतांना तिने ब्राडवे वरील नाटकांमधे काम केलं. 1930 साली ती पहिल्यांदाच यूनिवर्सल स्टूडिओ साठी करारबद्ध झाली. 1931 साली ‘ब्रेड सिस्टर्स’ नंतर 1932 साली जार्ज आर्लिंसच्या ‘दि मैन हू प्लेड गॉड’ मुळे ती प्रसिद्धीच्या झोतात आली. 1934 मधे ‘ऑफ ह्यूमन बांडेज’ ने तिला स्थैर्य दिलं, यात ितच्या सोबत लेस्ली हावर्ड होता.

ऑस्करची हुलकावणी

सामरसेट मॉमच्या कथेवर आधारित ‘ऑफ ह्यूमन बांडेज’ मधील बेटीने केलेली वेट्रेसची भूमिका खूपच गाजली. पण एकेडमी ऑफ मोशन पिक्चर्स एंड साइंस ने त्यावर्षी तिला सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचं साधं नॉमिनेशन देखील दिलं नाही. या वर्षी सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचं पािरतोषिक ‘इट हैपन्ड वन नाइट’ चित्रपटांकरितां क्लाडिया कोलबर्ट ला देण्यांत आलं. (राज कपूर-नरगिसचा ‘चोरी-चोरी’ व आमिर खान-पूजा भट्ट चा ‘दिल है कि मानता नहीं’...याच चित्रपटावर बेतलेले होते) तेव्हां लोकांनी बेटीची तरफदारी करतांना मोठ्या प्रमाणावर संस्थेला पत्रे देखील पाठविली होती.

पदरात पडला ऑस्कर, पण...

‘ऑफ ह्यूमन बांडेज’ मधील ऑस्कर हुकला म्हणून काय झालं, पुढच्याच वर्षी 1935 साली बेटी ने ‘डेंजरस’ मधील जाेएस हीथ या भूमिकेकरितां आपलं पहिलं-वहिलं ऑस्कर पटकावलं. पण बेटी मात्र या पहिल्या ऑस्करच्या पुतळयाला कन्सोलेशन प्राइजच (सांत्वना पुरस्कार) मानायची. तिचं ठाम मत होतं की 1934 सालच्या ‘आॅफ ह्यूमन बांडेज’ मधे ऑस्कर न देऊं शकल्यामुळेच तिला हे ऑस्कर देण्यांत आलंय. मुख्य म्हणजे तिला स्वत:ला असं वाटायचं की या वर्षीच्या ऑस्कर करितां ‘एलिस एडम्स’ मधील भूमिकेसाठी कैथरीन हेपबर्न खरी दावेदार होती.

धाउसी पाऊल

1936 साली बेटी डेविस ने स्टूडियाे सिस्टमचा विराेध केला आणि ती थेट लंडनला निघून गेली. तिथे तिने ब्रिटिश कंपनी सोबत काम केलं. पुढे हे वादळ शमल्यावर वार्नर ब्रदर्सनी तिच्याशी पुन्हां करार करुन तिचं पारिश्रमिक वाढवलं. यामुळेच बेटीला चांगले चित्रपट मिळाले आणि तिने मिळालेल्या संधीचं सोनं केलं. 1938 साली विलियम वॉयलर दिग्दर्शित ‘जेजेबेल’ साठी तिने ऑस्कर पटकावला (यात तिच्यांसोबत हेनरी फोंडा होता). पुढील वर्षी 1939 साली तिचे आल टाइम ग्रेट असे चार चित्रपट आले-‘डार्क विक्टरी’ (हंफ्री बोगार्ट), ‘जुआरेज’, ‘दि ओल्ड मेड’ आणि ‘दि प्राइवेट लाइफ ऑफ एलिजाबेथ एंड ससेक्स’ (एरॉल फ्लिन). तिने आपल्या कारकीर्दीत 101 चित्रपटांमधे काम केलं, त्यापैकी तिला ऑस्करसाठी दहा नॉमिनेशन मिळाले...

बेटी आणि सिगारेट

बेटी डेविस आणि सिगारेट यांचं अतूट नातं होतं. तंबाकू उद्योगाला (टोबैको) वाढ होण्यांत ज्या महाभागांनी हातभार लावला त्यांत बेटीचा सिंहाचा वाटा होता. खासगी आयुष्यांत तिने किती सिगारेटी फुंकल्या, याचा तपशील माहीत नसला तरी त्यां काळी सिगारेटी शिवाय बेटी डेविसची कल्पनाच कुणाला मान्य नसे. स्क्रीनवर तिला सिगारेट ओढतांना बघणं हा एक अपूर्व सोहळा असे...

हेनरी फोंडा ने एकदा म्हटलं होतंं-

‘I’ve been close to Bette Davis for thirty years and I have the cigarette burns to prove it.
--------------------

चित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

तुषार काळभोर's picture

22 May 2016 - 6:39 pm | तुषार काळभोर

आमचा इंग्रजी चित्रपटाशी संबंध केवळ दे मार पुरता.
आस्वाद घ्यावेत असे हिंदी व इंग्रजी सिनेमे कधी पहिलेच नाहीत. किंबहुना चित्रपट आस्वाद घेण्यासाठी कधी पहिलेच नाहीत.
त्यामुळे चित्रपटांविषयी, विशेषतः विसाव्या शतकाच्या पहिल्या निम्म्या भागातले, कोणी असं passionately बोलतं, तेव्हा खरंच खूप कौतुक वाटतं.

अजून उत्तमोत्तम चित्रपटांची ओळख करून द्या, ही विनंती.

महामाया's picture

22 May 2016 - 6:49 pm | महामाया

अापका आदेश सर-आंखों पर।

जव्हेरगंज's picture

22 May 2016 - 7:11 pm | जव्हेरगंज

चांगल्या चित्रपटांच्या यूट्यूबवरच्या अनुवादीत लिंका दिल्यास उपकृत राहू !!!

महामाया's picture

22 May 2016 - 7:18 pm | महामाया

लेखा सोबत चित्रपट ‘दि ओल्ड मेड’ ची एक लिंक दिलेली आहे...

https://youtu.be/bO61XJGPR7A

लिंक बघितल्यावर आलमोस्ट चित्रपट बघण्याचा आनंद मिळेल...

या इंग्रजी चित्रपटांचं इंग्रजी सोपं, कळण्यासारखं आहे...

यू ट्यूब मुळे त्या चित्रपटांचा आस्वाद घेता येईल...

और आने दो...

पद्मावति's picture

22 May 2016 - 9:46 pm | पद्मावति

सुंदर ओळख.

All about Eve. बेटीची मार्गो चॅनिंग आणि अॅन बॅक्स्टरची इव्ह यांची जबरदस्त जुगलबंदी आहे त्यात. त्याबद्दल बेटीला आॅस्कर मिळालं नसलं तरी त्यात तिचा अभिनय हा बावनकशी आहे.

All about Eve. बेटीची मार्गो चॅनिंग आणि अॅन बॅक्स्टरची इव्ह यांची जबरदस्त जुगलबंदी आहे त्यात. त्याबद्दल बेटीला आॅस्कर मिळालं नसलं तरी त्यात तिचा अभिनय हा बावनकशी आहे.

महामाया's picture

22 May 2016 - 10:15 pm | महामाया

‘आल एबाउट ईव’ एका वाक्यांत चित्रपटाची समीक्षा सुंदर केलीय.

गेल्याच आठवड्यात बघितला...चुकीने...

म्हणजे मला अभिप्रेत होता ‘दि ग्रेट लॉय’...

पण मिळाला ‘आल एबाउट ईव’

सुरवाती चे पाच मिनिटे बघतांना अॅन बॅकस्टर नी मनाचा ठाव घेतला आणि पिक्चर संपला तेव्हां पहाटेचे सव्वा चार झाले होते...

थोडा सा रुटीन सोडून होता...

अाठवणी सांगणारा...

मजा आली...

तुम्ही पुन्हां आठवण करुन दिली...

‘दि ग्रेट लॉय’ बद्दल लवकरच...भेटूं...

आणि हो...बेटी डेविस एकच चित्रपटा पुरती नाहीये हो...

तिचं ‘इन दिस अवर लाइफ’, ‘वाच इट आॅन दि राइन’, ‘दि ग्रेट लॉय’ देखील पुन्हां-पुन्हां बघण्यासारखे आहेत...

महामाया's picture

22 May 2016 - 10:19 pm | महामाया

‘वाच आॅन दि राइन’

प्रियाजी's picture

23 May 2016 - 4:01 pm | प्रियाजी

लेख फार आवडला. पुढेही असेच हॉलीवूडमधील चांगले चित्रपट व अभिनेता/अभिनेत्रींची ओळख करून देणारे लेख लिहावेत.

चांदणे संदीप's picture

23 May 2016 - 4:24 pm | चांदणे संदीप

महामाया.... जियो!

वाटच पाहत होतो जणू या लेखाची! अप्रतिम!

खूब जमेंगी तुम्हारी और हमारी! और आन्दो!

Sandy

रातराणी's picture

25 May 2016 - 1:09 am | रातराणी

पहायला हवा. छान ओळख.

प्राची अश्विनी's picture

25 May 2016 - 9:42 am | प्राची अश्विनी

+11