रेस...सिंहगड ते आयएटी पर्यंत...!

महामाया's picture
महामाया in जनातलं, मनातलं
21 May 2016 - 8:56 am

<strong>माझा पहिला मुंबई प्रवास-एक</strong>
हाईस्कूल मधे असतांना मी शेजारच्या मुलांसोबत रोज पहाटे जॉगिंग करितां जायचो खरा...! तेव्हां कल्पना देखील नव्हती की पुढे मला सिंहगडापासून रेस करावी लागेल.

बिलासपुरला वडील रेलवेत असल्यामुळे आम्ही रेलवे कालोनीत राहायचो. शहरात माझे काका होते-व्यंकटेश शंकर तेलंग. त्यांच्या खासगी लायब्ररीत कपाट भरून पुस्तकं होती (1970 च्या दशकात). लहानपणी मला त्या पुस्तकांचं भारी कौतुक वाटे. पण वाचण्याकरितां पुस्तक मागण्याची हिंमत होत नसे. कारण एक तर मराठी वाचनात गती नव्हती आणी दूसरं महत्वाचं कारण म्हणजे या काकांकडे सगळेच कसे जणूं जिराफच्या कुटुंबातले होते-ऊंचच ऊंच. त्यांच्या कडे बघूनच भीती वाटायची.

माझे वडील पुस्तका सुरेख बाइंड करायचे. 1983 साली मी मैट्रिक झालो, त्या वर्षी प्रथमच काकूंनी रणजीत देसाईंचं पुस्तक ‘श्रीमान योगी’ बाइंड करायला दिलं होतं. 7-8 भागात असलेल्या या पुस्तकातील शिवाजी महाराजांचं चरित्र वाचून मी मराठीच्या प्रेमात पडलो व माझी भीती दूर झाली. मग मी त्यांच्याकडून इतर पुस्तके देखील आणून वाचली. (पुढे काका-काकूंशी चांगलीच गट्टी जमली).
तर...मी वाचलेल्या पहिल्या पांच पुस्तकांपैकी एक होतं बाबा साहेब पुरंदरे यांचं-‘राजा शिव छत्रपती.’
या पुस्तकातील सह्याद्रीच्या वर्णनाने मी भारावून गेलो-
‘अग्नि आणी पृथ्वी यांच्या प्रणयांतून सह्याद्री जन्मांस आला. अग्निच्या धगधगीत, उग्र वीर्याचा हा आविष्कारहि तितकाच उग्र. पौरुषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्री...’
हे वर्णन वाचतांना मी जणूं सह्याद्रीच्या प्रेमातच पडलो व माझ्या मनांत हा विचार दृढ़ झाला की संधी मिळाळी तर शिवाजी महाराजांचा एक तरी किल्ला बघायचाच.
पुढे 1986 सालच्या नोव्हेंबर मधे चुलत भावाच्या लग्नानिमित्त अंबरनाथला जायची संधी मिळाली. वरात तिथून पुण्याला जाणार होती. इथून निघण्यापूर्वी मी काकांचा सल्ला घेतलां (काकूंचं माहेर सांगलीचं असून काकांनी देखील कामानिमित्त मुंबई-पुणेचा बराच प्रवास केलाय).
मी विचारलं-‘पुण्याला बघण्यासारखी जागा कोणती...?’
क्षणाचाहि विलंब न करतां दोघे एकदम उत्तरले-

‘सिंहगड...’

ठरलं..., सिंहगडला जायचं-हा विचार करुनच मी बिलासपुर सोडलं.

अंबरनाथ...,तिथून 25 नोव्हेंबर ला दुपारी 2 वाजता वरात बसनी पुण्याला निघाली. वाटेत खंडाळ्याचं सौंदर्य डोळ्यांत साठवून घेतलं. संध्याकाळी साडे सात वाजता आम्ही शनिवार पेठेतील सुमंगल कार्यालयांत पोहचलो. पुणेरी आतिथ्य मी पहिल्यांदाच अनुभवत होतो. फ्रेश झाल्यावर आधी जेवण, नंतर सीमांत पूजन असा कार्यक्रम होता. तिथे मेजबानांपैकी एक कुलकर्णी भेटले. ‘सिंहगड’ विषय काढताच ते म्हणाले उद्या सुलग्न झाल्यावर आपण चलूं...!
सीमांत पूजन सुरू असतांना शेजारी माझ्याच वयाचा मुलगा बसलेला होता. ओळख झाल्यावर कळलं की तो वधूचा दूरच्या नात्यातला भाऊ होता, तसा तर मी देखील होतो. तो म्हणाला चल फिरून येऊं. मी त्या सोबत निघालो. रात्रीचे दहा-साडे दहा झाले होते. विद्येचं माहेरघर असलेल्या पुणे शहरांत नोव्हेंबरच्या 25 तारखेलाहि मला तशी थंडी जाणवत नव्हती, जशी अामच्या बिलासपुरच्या भागांत जाणवते. मधेच एका जागी तो थबकला, डावीकडील एका घराकडे बोट दाखवून म्हणाला-

‘इथे लोकमान्य टिळक राहायचे...!’

हे ऐकताच माझ्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. त्या घराकडे बघतांना माझे हाथ आपोआप जोडल्या गेले. पुढे आम्ही डेक्कन रोड वर आलो. रोडवर चांगलीच वर्दळ होती. रोडच्या पलीकडे एक भलं मोठं देऊळ होतं, तिथे असलेल्या अंधारामुळे मला थोडी भीती देखील वाटली. आम्ही परतलो तेव्हां पावणे एक वाजून गेला होता.
दुसरया दिवशी सुलग्न झाल्यावर, काकांना सांगून की मी सिंहगडला जातोय, कुलकर्णीं सोबत निघालो. शनिवार पेठेतील गल्ली-बोळ्यांमधून आम्ही भिकारदास मारुती पर्यंत पोहचलो. सिंहगडसाठी बस इथूनच मिळेल...सांगून ते निघून गेले. बस आल्यावर मी त्यांत स्थानापन्न झालो. पावणे बारा वाजता सिंहगडच्या पायथ्याशी उतरलो, तेव्हां बसमधे 8-10 प्रवासीच होते. पुढे जाऊन वर गडाकडे बघतांना मोठी मौज वाटली. मनांत विचार देखील आलां-धावत जाइन, पळत उतरून जाईन...पण गड चढतांना त्याच्या आवाक्याची कल्पना आली. एक तर प्रथमच नैसर्गिक गड चढत होतो, तो देखील नैसर्गिक वाटे वरून. (मुख्य म्हणजे माझ्यावर वेळेची मर्यादा होती, कारण वरातीची बस 4 वाजता सुटणार होती). तरी बरं...चढतांना मी मजेशीर चढत होतो. वाटेत जिथे थोडी मोकळी जागा दिसे, तिथे गावकरी बायका ताक-पाणी घेऊन बसलेल्या होत्या. तिथे थोडी उसंत घेऊन पुन्हां पुढचा प्रवास सुरू करायचा.

तसा मी एकटाच होतो. पण त्याच बस मधे माझ्याच वयाची मुुंबईची चार-पाच मुलं होती, ती सहली करितां आलेली होती. आम्ही ‘आधी कोण चढतं...’ अशी थोडी आपसांत चुरस लावून खेळत, खिदळत, प्राकृतिक सौंदर्याचा आस्वाद घेत-घेत गड चढलो, तर एक वाजला होता. वर गड फिरतांना आत्मिक सुखाची अनुभूती होती मनांत...त्या भावना शब्दांत सांगणं कठीण आहे. तानाजी मालसुरेंची समाधी बघितली. किल्ला सर करतांना त्याने जिथून किल्यांत प्रवेश केला होता, ती जागा बघून मन उत्साहानं भरून आलं. अचंबा देखील वाटला की या अवघड वाटे वरून देखील कुणी गडावर चढूं शकतं. ‘गड आला पण सिंह गेला...’ शिवाजी महाराजांच्या या वाक्याची किंमत तो गड बघितल्यावर उमजली.

दुपारची वेळ...आता भूक लागली होती. तिथे गडावरच राहणारया गावकरी मंडळींकडून कांद्याची भजी विकत घेऊन खाल्ली. सोबत होती लाल मिर्च्यांची झणझणीत चटणी. (त्या अस्सल गावकरी चटणीची चव आज देखील जिभेवर रेंगाळतेय).

आतां मात्र मला परतीचे वेध लागले होते. उतरतांना वाटत होतं-दोन उड्या मारल्या की सरळ खाली पोहचेन. वरून पुणे शहरा कडे बघितलं तर नुसतं धुकं परसलेलं होतं. मी पायथ्याशी आलो तर साडे तीन वाजले होते. स्टाप वर बस नव्हती, पुढची बस पाच वाजतां होती. मी पार नर्व्हस झालो...4 वाजता वरात कार्यालयातून परत निघणार, आणि मी साडे तीन वाजता सिंहगडाच्या पायथ्याशी. तिथे उभं असलेल्या लोकांच्या बोलण्यावरून कळलं की आयएटी पासून दुसरं काही साधन मिळूं शकतं...

‘डूबते को तिनके का सहारा...’

मग काय विचारता...! तिथून तडक निघालोच...आणि आयएटी पर्यंत चक्क रेस केली. माझं नशीब की तिथून लगेचच मला बस मिळाली. मी त्यातल्या त्यांत शहाणपणा केलाच की. शहरात शनिवार वाड्याच्या एरियांत बस पोहचल्यानंतर एक बोर्ड बघून मला वाटलं-अरेच्या...रात्री इथेच तर फिरत होतो ना आपण...तिथे बस हळूं होताच मी उतरून गेलो...आणी लवकरच मला माझी चूक कळली. शेवटी धीर धरून समोरहून येणारयाला विचारलं-‘सुमंगल कार्यालय कुठे आहे...’ त्याने सांगितलं-सरळ जाऊन डाव्या हाताच्या बोळीतून जा, समोर कार्यालय आहे...म्हणजेच मी जणूं मंदिराची प्रदशिक्षा घालतोय या थाटात त्या कार्यालयाची प्रदशिक्षा पूर्ण करून चुकलो होतो. त्या गल्लीतून मी कार्यालया समोर आलो तर आमची बस समोर उभी होती. (इंडियन टाइम ची प्रचीती पुन्हां आली) सगळी मंडळी त्यांत स्थानापन्न झालेली होती, आणी ड्राइवर नारळ फोडण्याच्या तयारीत होता. बस मिळाली...मी सुखावलो.
बस सुरू झाली, मी आपल्याच तंद्रीत होतो...सिंहगडावर जाऊन आलो होतो पण थकवा, भूक वगैरे मला काही-काही जाणवत नव्हतं. त्या धुंदीत काकांचं रागवणं सुद्धा मला जाणवलं नाही,

ते म्हणत होते-

‘चांगलं लग्न घराचं जेवण सोडूण कुठे हिंडत होता उपाशी...!’

त्यांची शंका रास्त होती. परततांना खंडाळ्याचं रात्रीचं सौंदर्य डोळ्यांत साठवून घेतलं. रात्री अडीच वाजतां अंबरनाथला घरी पोहचल्यावर काकूनी आपल्या समोर बसवून मला जेवूं घातलं.

तेव्हां ती म्हणाली-‘काय रे...कुठे होता दिवस भर...!’

मी तिला काय सांगणार...

मनांत मात्र मी म्हणालो-‘बाबा साहेबांनी मला सिंहगडावर यायचं आमंत्रण दिलं होतं, तुझ्या मुलाच्या लग्नाचं निमित्त साधून, मी तिथं गेलो होतो...!’

त्या ‘रेस’ ची आज देखील आठवण झाली की अंगावर शहारा येतो...जर त्या दिवशी मला आयएटी पासून बस मिळाली नसती तर...! कारण मी पहिल्यांदाच एकटा घराबाहेर पडलो होतो. एखादं कार्य एकट्याने अटैंड करण्याची ती माझी पहिलीच वेळ होती.

रवींद्र दत्तात्रय तेलंग
क्रमश:...

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

कंजूस's picture

21 May 2016 - 9:20 am | कंजूस

वाचतोय.

सिरुसेरि's picture

21 May 2016 - 9:46 am | सिरुसेरि

छान अनुभव . पुर्वी पुण्यामध्ये सुमंगल कार्यालयातले लग्न म्हणुन त्या लग्नाला सुलग्न असे म्हणत असावेत .

बिलासपुरसारख्या महाराष्ट्रापासुन दुर असलेल्या ठिकाणी मराठी पुस्तकांचे इतके चांगले वाचनालय आहे हे खुप
महत्वाचे आहे .

पद्मावति's picture

21 May 2016 - 6:02 pm | पद्मावति

पुर्वी पुण्यामध्ये सुमंगल कार्यालयातले लग्न म्हणुन त्या लग्नाला सुलग्न असे म्हणत असावेत .नाही.
माझ्या माहितीप्रमाणे सुलग्न म्हणजे लग्न लागल्यावर जेव्हा नवरा आणि नवरी स्टेज वर बसतात आणि लोकं त्यांना भेटायला येतात तेव्हा लोक नवरा नवरीची डोकी एकमेकांवर आदळतात त्याला सुलग्न म्हणतात. विदर्भ, एम पी मधल्या मराठी लग्नांमधे हा सोहळा असतो.

बोका-ए-आझम's picture

22 May 2016 - 11:56 am | बोका-ए-आझम

अजूनही डोकं दुखतंय! ;)

महामाया's picture

21 May 2016 - 6:28 pm | महामाया

‘विदर्भ, एम पी मधल्या मराठी लग्नांमधे हा सोहळा असतो...’

असं नाहीए...1986 साली मी पुण्याला जे लग्न अटैंड केलं होतं त्यांत देखील सुलग्न हा सोहळा झाला होता...

‘नवरा-नवरीची डोकी एकमेकांवर आदळतात...’

अगदी बरोब्बर...नातेवाईकांमधे एकाध-दोन असे असतांतच ज्यांना फक्त नवर-नवरींची डोकी आदळ्यांतच मजा येतो...

सिरुसेरि's picture

21 May 2016 - 9:00 pm | सिरुसेरि

धन्यवाद . छान माहिती .