खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडून उठलो. सामान घेऊन दारा जवळ पोचलो, इतक्यांत अजनी स्टेशनचा पहिला साइनबोर्ड मागे गेला. मी पिशवी खांद्यावर चढवली, सूटकेस डाव्या हातात घेतली आणि उजव्या हाताने दांडा धरुन शेवटच्या पायरी वर आलो. आता गाडीचा वेग वाढू लागला होता, आणि मी उडी घेतली...!
आयुष्यांतील काही क्षण अविस्मरणीय असतांत. एखादी घटना घडत असतांना त्याचं अप्रूप वाटत नाही, नंतर कधीतरी ती घटना आठवतांना जाणवतं की आपण काय दिव्य केलं होतं...! जरा काही बरं-वाइट झालं असतं तर...! आईचं माहेर असल्यामुळे लहानपणी वर्षातून एक चक्कर नागपूरचा व्हायचाच. लहानपणी साइकली वर फिरलेलं असल्यामुळे नागपूरचा भूगोल मला ठावूक आहे. ही माहितीच त्या दिवशी माझ्या कामी आली.
1996 साली एक महिना हैदराबाद ला राहून मी परत येत होतो. एपी एक्सप्रेस चं तिकिट घेतल्यानंतर खिशांत तीस च रुपए उरले. आता बिलासपुर पर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग होता. मधे नागपूरला उतरुन मामे भावाकडून मदत घेणे. इथे साहजिकच प्रश्न येतो की खिशांत पैसे नसतांना एक्सप्रेस कां निवडली? एखाद्या पैसेंजर ट्रेन नी जायचं. एक्सप्रेस निवडण्याचं कारण सांगताना आज हसूं येतंय, पण तेव्हां मनांत ‘एयर ब्रेक’ असलेल्या पैसेंजर ट्रेन मधे बसायची इच्छा होती. आणि एपी ला एयर ब्रेक होते.
त्यांचं काय आहे की मी स्टीम इंजिन मधे 5 वर्ष फायरमैन होतो, म्हणून मला वैक्यूम ब्रेक ची माहिती होती. जबलपूर किंवा नागपूर ला जाता-येता पैसेंजर/ एक्सप्रेस मधे वैक्यूम ब्रेक ची कंट्रोलिंग मी बघून चुकलाे होतो. आमच्या फैक्ट्रीत एयर ब्रेक असलेल्या बीसीएन वैगन सोबतच एन बॉक्स मधे कोळसा, आयरन ओर, जिप्सम येत असे. तेव्हां तिथे छोटे डीजल इंजिन (फैक्ट्रीत 350 एचपी आणि 650 एचपी चे डीजल इंजिन होते) शंटिंग करायचे. त्या इंजिन मधे बसून एयर ब्रेक ची कंट्रोलिंग पावर बघितली होती. मालगाडी मधे कंट्रोलिंग पॉवर बघितल्या नंतर मला पैसेंजर ट्रेन मधे एयर ब्रेक ची कंट्रोलिंग बघायची होती. तो पर्यंत आमच्या दक्षिण-पूर्व (आता दक्षिण-पूर्व-मध्य रेलवे) रेलवेच्या पैसेंजर ट्रेन मधे एयर ब्रेकची सुविधा नव्हती आणि ‘एपी’ ला एयर ब्रेक होते. म्हणून ‘एपी’ ची निवड केली.
मी हैदराबादहून गाडीत चढलो. तिकिट घेऊन फलाटावर आलो. नागपूर पर्यंत दिवसाचा प्रवास, म्हणून मी शेवटची जनरल बोगी निवडली. गार्डचा डबा आमच्या पुढे होता. इंजिनकडे तोंड करुन सिंगल सीट वर बसलो, माझ्या मागे चार सीटनंतर डब्याचं दार होतं. ट्रेन सिकंदराबाद हून सकाळी सहा वाजता सुटली आणि मी प्रकृतिचं निरीक्षण करुं लागलो.
‘एपी’ ला 26 डबे हाेते, मी शेवटच्या डब्यांत होतो. आता माझं सगळं लक्ष ड्राइवर च्या ड्राइविंग वर होतं. तो भरधाव जात असलेल्या गाडीचा वेग कमी करायचा, तेव्हां गाडीच्या बदललेल्या अावाजावरुन मी समजून जात असे की ड्राइवर नी ब्रेक लावलाय. तिसरं स्टेशन भुवनगिर येई पर्यंत मी ‘एयर ब्रेक’ ची कंट्रोलिंग समजून चुकलो होतो.
भुवनगिर स्टेशनानंतर डब्याच्या दाराजवळ उभा असलेला एक मुलगा माझ्या समाेर लांब सीटवर बसलेल्या लोकांच्या पाया खाली जागा बनवत सीट खाली झोपून गेला. बसलेल्या लोकांच्या पाया मागे झाकल्यामुळे तो दिसत नव्हतां. 9 वाजता गाडी काजीपेट ला थांबली, तेव्हां टीटीई आला आणि सगळ्यांचे तिकिट चेक करुन निघून गेला, त्या मुलावर त्याची नजर गेलीच नाही. म्हणजेच तो मुलगा डब्ल्यूटी होता आणि टीटीई ला चुकवण्यासाठी सीट खाली लपून बसला होता. दहा वाजताच्या जवळपास बल्लारशाॅ ला ट्रेन थांबली. सडकून भूक लागली होती म्हणून इडली विकत घेऊन खाल्ली, फक्त दहा रुपए...(भूख के सामने किसका बस चलता है?).
इथून गाडी सुटल्यावर मी हाच विचार करत होतो की नागपूर मेन स्टेशनला उतरल्या नंतर स्वावलंबी नगर पर्यंत कसं जायचं...? रिक्शातून उतरताच मावशीकडे पैसे मागण्याचा धीर होत नव्हतां.
‘एपी’ वर्ध्यावरुन येते खरी, पण ती वर्ध्याला न जातां सेवाग्राम हून निघून जाते. त्या दिवशी सेवाग्रामला गाडी फलाटावरुन निघाली. (सहसा असं होत नाही, एक्सप्रेस ट्रेनचा स्टाॅप नसला ती थ्रू असली म्हणजे तिला फलाटावर न घेतां मधल्या लाइनीवरुन जाऊ देतांत.) म्हणून सेवाग्राम स्टेशनावर गाडी ची स्पीड बघून कुणांस ठाऊक एक विचार मनांत चमकून गेला की जरी ‘एपी’ अजनी ला थांबत नसली तरी मी तिथे गाडीतून उतरु शकेन. तिथून स्वावलंबी नगर नक्कीच जवळ होतं. समोर लांब पल्याच्या सीट खाली लपलेला तो मुलगा अातां बाहेर येऊन माझ्याच शेजारी बसला होता.
तो पुटपुटत होता-‘नागपूर में तो साले पकड ही लेंगे...जेब में एक पैसा भी नहीं...।’
हे ऐकतांच मी त्याला म्हटलं-
‘अजनी में ड्राइवर ट्रेन की स्पीड कंट्रोल करेगा, वहां उतर जाना...!’
हे ऐकून तो तर चमकलांच शेजारी बसलेले लोक देखील दचकून माझ्याकडे बघूं लागले.
मी पुढे म्हटलं-
‘नागपूर में उतरकर रिस्क लेने से अच्छा है अजनी में रिस्क लेना. और फिर कोशिश करने में क्या हर्ज है?’
त्याने अविश्वासानं माझ्याकडे बघितलं आणि गप्प राहिला. मला ती हिंदी म्हण आठवली-चोर का दिल कमजोर होता है.
खिडकीतून सोनेगाव (नागपूर) चं विमानतळ दिसतांच मी सीट सोडली. सामान घेऊन मी दारावर आलो. तो तिथेच उभा हाेता. मी त्याला म्हटलं-
‘अजनी में गाडी धीमी होती है तो उतर जाना. मैं भी उतरुंगा.’ त्याचा विश्वासच बसत नव्हतां. तो माझ्याकडे बघतच राहिला. इतक्यांत गाडीचा वेग कमी झाला होता, म्हणजेच इंजिन अजनी स्टेशनाच्या फलाटापर्यंत पोचलं होतं. अजनी फलाटावर चा पहिला साइन बोर्ड मागे पडताच मी पिशवी खांद्यावर घेतली, सूटकेस डाव्या हातात घेऊन त्याला विचारलंं-
‘उतरतो कां...!’
तो चुप होता. तेव्हां मी त्याला म्हटलं-
‘मग दार सोड...’
उजव्या हाताने दाराचं हैंडल धरुन डाव्या हातांत सूटकेस सावरत मी शेवटच्या पायदानावर आलो...आता गाडीचा वेग वाढू लागला होता...आणि सूटकेस सांभाळत मी उडी घेतली. पाय जमीनीला लागतांच गाडीच्या दिशेने गाडी सोबत पाच-सहा पाउल धावलो आणि थांबता-थांबता गाडी कडे बघून जोराने आेरडलो-
‘ऐसे उतरते हैं चलती गाडी से...!’
मला माहीत होतं की मी जिथे बसलो होतो तिथे बसलेले लोक माझ्याकडेच बघत होते.
आता मी चारी कडे बघितलं. दुपारचे पावणे चार वाजले होते. चहुंकडे सगळं व्यवस्थित होतं. मी प्लेटफॉर्मच्या पुढे असलेल्या सिग्नल जवळ उतरलो होतो. सूटकेस घेऊन मी फलाटावर आलो आणि गेटजवळ पोचलो. तिथे स्टेशन मास्तर उभा होता. त्याने इतक्यांतच ‘एपी’ एक्सप्रेस ला लाइन क्लीयर दिला होता, ‘एपी’ तिथे न थांबता पुढे निघून गेली. मग हा वाटसरु कुठून टपकलां असेच काही से भाव त्याच्या चेहेरयावर होते. तिकडे दुर्लक्ष करीत मी स्टेशना बाहेर आलो, रिक्षा केला-8 रुपए. रिक्षा मधे मी रिलैक्स होईस्तोवर अजनी चौक अाला. रिक्षा चौक पार करत असतांना मला जणूं जाग आली...! आणि माझ्या एकदम लक्षांत आलं की मी काय दिव्य केलंय ते. रिक्क्षे वाल्या साठी मावशीला पैसे मागावे लागतील म्हणून मी चक्क चालत्या सुपरफास्ट ‘एपी’ मधून उडी मारली होती.
स्वावलंबी नगर ला मावशीच्या घरी पोचल्यावर मी कुणालाच काही सांगितलं नाही. रात्री मामे भाऊ भेटला तेव्हां त्याला सांगितलं. ते ऐकतांच तो सुन्नपणे मला बघतच राहिलां...मग खूप रागावलां. (माझ्या हून मोठा आहे) पण बिलासपुर पर्यंतचे तिकिटचे पैसे त्यानेच दिले.
ड्यूटीवर असतांना यार्ड मधे शंटिंग करणारया इंजिन मधून दहा दा उतरणं, चढ़णं रुटीनचं काम असूं शकतं. पण ‘एपी’ मधून घेतलेली ती उडी...!
त्यानंतर मी असं धाडस कधीच केलं नाही...!
प्रतिक्रिया
19 May 2016 - 2:09 am | राघवेंद्र
IRFCA वरचा लेख इकडे कसा आला वाटले. :)
भन्नाट पराक्रम.
19 May 2016 - 6:14 am | स्पा
जबराटच
रेल्वे विक पोईंट हय, अजुन लिवा
19 May 2016 - 6:40 am | खेडूत
इकडेही आवडला .
अजून अनुभव लिहावेत. रेल्वेत काम करताना अनुभवांचा खजिना जमला असेल.
19 May 2016 - 6:51 am | बहुगुणी
लेखनाचा बिलासपूरी लहेजाही आवडला.
असला वेडेपणा तरूणपणी मीही केला असला तरीही आता मागे वळून पाहतांना -आई-वडील परम विश्वासाने किती जीव टाकून प्रेम करतात ते जाणवल्यावर मुलांच्या असल्या नसत्या धारीष्ट्याचं कौतुक करायची हिंमत होत नाही. [म्हातारपण आलं असावं! ;-)]
19 May 2016 - 7:02 am | कानडाऊ योगेशु
लेख मस्त लिहिला आहे.अगदी तुमच्यासोबतच प्रवास करतोय असे वाटले.
चालत्या सिटीबसमधुन मी ही असेच उतरलो होतो एकदा. एक वळण होते आणि बस हमखास तिथे वळताना स्लो व्हायची त्यामुळे त्यात काही विशेष नव्हते पण त्यावेळी उतरलो व थोडे पुढे चालत गेलो तर राँग साईड ने एक रोडरोलर त्याच्या नेहमीच्या वेगात येत होता. थोड्याफार सेकंदाचाच फरक होता.पण तो रोडरोलर जर थोडा पुढे असता तर काय झाले असते हे आठवुन थरकाप उडाला.!
19 May 2016 - 7:50 am | श्रीरंग_जोशी
मनापासून लिहिलेलं प्रांजळ अनुभवकथन आवडलं. रेल्वेनी भरपूर प्रवास केला आहे त्यातही विद्यार्थीदशेत सर्वाधिक प्रवास केला आहे. त्यामुळे खिशात अगदी जुजबी पैसे शिल्लक असताना लांबचा प्रवास करण्याच्या तुमच्या अनुभवाशी जोडून घेता आलं.
तुमच्या रेल्वे अभियांत्रिकी क्षेत्रातील व्यावसायिक अनुभवांविषयी वाचायला आवडेल.
19 May 2016 - 8:53 am | मुक्त विहारि
रेल्वेत काम करत असतांनांचे अज्जून काही अनुभव असतील तर जरूर लिहा.
(कोणे एके काळी आमच्या घराण्यात, घरटी २-३ जण तरी रेल्वेत असायचे.म्हणजे बाप पण रेल्वेत आणि त्याची २-४ मुले पण रेल्वेत.आजकाल मराठी माणूसच रेल्वेत मिळत नाही.)
19 May 2016 - 9:32 am | तुषार काळभोर
तुमच्याकडची रेल्वेतल्या अनुभवाची पोतडी इथे उघडी करा. बघू द्या आम्हाला..
माझी आता पर्यंत कधीही चालत्या बसमधून (रेल्वेने मोजून १० पेक्षा जास्त वेळा प्रवास केलेला नाही) उतरायची हिंमत झालेली नाही अन् पुढेही होईलंसं वाटत नाही.
19 May 2016 - 12:04 pm | संजय पाटिल
चांगल लिहीलय..
एक वर्ष मिरज- कोल्हापुर रोज अप डाउन करत होतो. तेव्हा ओव्हर ब्रीज च्या जीन्या जवळ असेच उतरायचो.. पण एपी सुपर फास्ट, तेही स्टॉप नसताना? दंडवत.. ____/|\____
19 May 2016 - 12:11 pm | चांदणे संदीप
रेल्वे प्रवासातले बरेच अनुभव...किस्से डोळ्यासमोर तरळून गेले!
Sandy
19 May 2016 - 12:31 pm | वेल्लाभट
छान लिहिलंत.
धाडसांचं असंच असतं. करताना काही वाटत नाही; आठवून फाटते.
19 May 2016 - 12:42 pm | सस्नेह
रोचक लेख.
स्वागत आहे मिपावर.
19 May 2016 - 12:47 pm | बोका-ए-आझम
हा जिव्हाळ्याचा विषय आहे. विमानप्रवास ही एक सोय आहे. रेल्वे प्रवास हा खरा प्रवास. त्यातून भारतीय रेल्वे म्हणजे भारतच असतो. तुमचे या निराळ्याच जगातले अनुभव ऐकायला आवडतील.
19 May 2016 - 1:04 pm | सुबोध खरे
लेख छान आहे.
रेल्वेत नोकरी करणारा माणूस तिकीट काढतो?
लाल का पिवळा पास खिशातून फक्त थोडासा वर काढला आणी स्टाफ आहे सांगितलं कि टीसी काहीहि विचारत नाही असे अगणित वेळेस आणी सगळ्या रेल्वेत (उत्तर ते दक्षिण आणी पश्चिम ते पूर्वोत्तर) पाहिले आहे .
19 May 2016 - 1:50 pm | स्मिता.
अगदी बरोबर बोललात! रेल्वे कर्मचर्यांची लाल/पिवळी डायरी असते. तिची रुंदी जरी शर्टाच्या खिश्यात बसेल अशी असली तरी लांबी जरा जास्त असते. त्यामुळे रेल्वे कर्मचारी ती डायरी कायम शर्टाच्या खिश्यात ठेवून प्रवास करतात. टिसीला काही सांगायचीही गरज नसते, तो पाहूनच समजतो. हे ज्ञान रेल्वेमधे काम केलेल्या साबुंकडून मिळालंय.
19 May 2016 - 1:57 pm | स्पा
समस्त रेलेवे कर्मचाऱ्यांची नसते. फक्त कामगार वर्ग वापरतो ती डायरी
19 May 2016 - 2:11 pm | स्मिता.
नेमकी माहिती कळवल्याबद्दल धन्यवाद!
19 May 2016 - 4:22 pm | सोनुली
आवडले. एक्सप्रेस प्रवास एकट्याने करणे हेच खूप रोमांचक आहे.आणखी लिहावे.
1 Nov 2016 - 1:42 am | राघव कारेमोरे
1 Nov 2016 - 1:42 am | राघव कारेमोरे
1 Nov 2016 - 9:33 pm | महामाया
अापल्या ला काय अभिप्रेत आहे...
स्पष्ट होत नाहीये...
1 Nov 2016 - 1:43 am | राघव कारेमोरे
1 Nov 2016 - 1:43 am | राघव कारेमोरे
1 Nov 2016 - 8:53 am | अनिरुद्ध.वैद्य
चालत्या रेल्वेतुन उडी मारणे हा प्रकार बेकारचं. तुम्ही ते केलतं अन काही झालं नाही हे चांगलं.
बाकी, तुमचा अनुभव वाचला अन माझ्या वडलांनी घेतलेल्या उडीची आठवण आली.
त्यांनी असेच धाडस गीतांजलीतुन केले होते. फक्त इतकं प्लान करुन नाही तर डायरेक्ट. ते एकदा नागपुरवरुन भुसावळला परत निघाले होते, पण चुकुन रायपुरकडे जाणार्या गीतांजलीमध्ये बसले. अन नंतर बरीच भवती न भवती करता करता गाडीने वेग घेतला. मग शेवटी फलाट संपत आल्यावर बाबांनी उडी घेतली, पण गाडी बरीच पुढे येउन गेली होती अन उडी थेट रुळांवर गेली.
नशीब बलवत्तर फक्त पायांच्या दुखापतीवर निभावलं अन १५ दिवसांमध्ये सगळं ठिक झालं. जर उडी चुकली असती अन ते पडले असते किंवा त्याचवेळी इतर कुठली ट्रेन येतं असती तर काय झालं असतं ह्याचा विचारही करवत नाही.
1 Nov 2016 - 9:31 pm | महामाया
मी माझा अनुभव लिहिलाय...
त्याला कारण देखील दिलंय...
चालत्या गाडीतून उडी घेऊन खूप छान काम केलं, ज्याची वाहवा व्हायला हवी, अशातला ही भाग नाही.
अनुभव लिहितांना अशीच एखादी आगळी-वेगळी घटनाच लिहितो आपण...
नागपूर-इटारसी मार्गे भोपाळला जातांना मी मुद्दाम दिवसाची गाडी गोंडवाना एक्सप्रेस निवडली. नागपूरच्या पुढे एक घाट सेक्शन आहे...तिथे एक्सप्रेस गाडीला देखील मागे दाेन इलेक्ट्रिक इंजन लागतात...धक्का द्यायला म्हणा किंवा कंट्रोल करायला म्हणा...पन्नाशीच्या घरांत देखील इथे मी गाडीच्या दारावर असतो...जिकडे इंजिन वळतं त्याकडच्या दारावर...चालत्या गाडीत इंजन वळतांना बघतांना मज्जा येते...
तसंच इटारसीच्या पुढे बुधनी स्टेशनावर शेवटचा सिग्नल पार होताच मी दारावर येतो...कारण तिथून गाडी डावीकडे वळण घेते...एकदम स्पष्ट दिसतं की समोर आपली गाडी पहाड चढतेय...
सफर म्हणजे सफर हो हिंदीतला-‘जिंदगी एक सफर है सुहाना...’
इंग्रजी चा suffer नव्हे...
आणि आयुष्याच्या एका टप्यावर असा एखादा निर्णय घेतो माणूस...एखादाच...जो त्याला आयुष्यभर पुरतो...
आठवून बघा तुमचा ही असेल...
1 Nov 2016 - 12:23 pm | मित्रहो
रेल्वे, एपी, अजनी सारच जवळच वाटल. कालच तेलंगणा एक्सप्रेसने प्रवास केला. आता नाव बदलले. हे अग्निदिव्य करायचे वय असते तेंव्हाच मजा येते.