नुकतंच केन फॉलेट यांचं 'फॉल ऑफ जायंट्स' हे ८५० पानी जाडजूड पुस्तक वाचून संपवलं. त्यांच्या 'सेंच्युरी ट्रायोलॉजी' मधलं हे पहिलं पुस्तक! मी या लेखकाचं किंवा या पुस्तकाचं नाव ऐकलेलं नव्हतं पण थोडी पाने चाळल्यावर उत्सुकता चाळवली आणि शेवटी हे पुस्तक मी वाचायला घेतलं. साडे आठशे पानांचा हा जाडजूड ठोकळा माझ्या रोजच्या ऑफीसच्या पिशवीत ठेवून मी बसमध्ये वाचन सुरु केलं. वेळ मिळाला तर घरीदेखील वाचू लागलो. पहिली ४०-५० पानं वाचल्यानंतर या पुस्तकाचा अतिप्रचंड आवाका लक्षात आला. कुठलंही पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर त्या पुस्तकाची हलकी नशा चढावी लागते. एखाद्या चोखंदळ मद्यरसिकाला जशी एखाद्या तलम संध्याकाळी गारेगार नदीकिनारी शुद्ध स्कॉचची हळूवार झिंग एक निराळाच आनंद देते; अगदी तशी नाजूक झिंग एखाद्या चांगल्या पुस्तकाच्या पहिल्या काही पानांत अनुभवायला मिळाली तर त्या पुस्तकातून वाचकाला अनुपम आनंद मिळण्याची शक्यता वाढते असा माझा अनुभव आहे.
मागे मी मोठ्या कौतुकाने जे. के. रोलिंगचं 'सिल्कवर्म' विकत घेतलं. महागडं पुस्तक! चकचकीत कव्हर! पुस्तक वाचायला सुरुवात केली आणि पुस्तकाचे पैसे माझ्या डोळ्यादेखत गटारात गेले. थायलंडमधला अविस्मरणीय अल्काझार शो बघतांना मन हरखून गेलं होतं. त्या अतिशय सुंदर मुली ज्या चपळतेने नृत्य करत होत्या ते बघून डोळ्यांचं पारणं फिटलं. त्यात त्या सगळ्या मुलींनी बिकिनीसारखे कपडे परिधान केले होते. मग काय विचारता! लोकांना काय करू आणि काय नको असं होऊन गेलं होतं. बाहेर पैसे देऊन त्यांच्यासोबत फोटो काढून घेण्याची अहमहमिका लागली होती. त्या पोरींनी सगळ्यांना वेड लावलं होतं. नंतर आमच्या गाईडने रहस्योद्घाटन केलं. त्यापैकी कुणीच खरी मुलगी नव्हतं. एकही नाही! सगळ्या ट्रांसजेण्डर! सगळ्यांचे प्रफुल्लित चेहरे जमिनीवर आदळून फुटले. 'सिल्कवर्म' च्या बाबतीत माझा अगदी असाच अनुभव होता. अतिशय रटाळ पुस्तक! भिकार शैली! आणि जे मुख्य रहस्य होतं (खून) ते उघड होतांनाचा प्रवास अगदीच क्लिष्ट आणि अकारण लांबवलेला होता. पुस्तक संपल्यावर मी एकदाचा एक करपट ढेकर दिला. असाच अनुभव 'द वाचमन' या रॉबर्ट क्रेस लिखीत कादंबरीच्या बाबतीत आला. अमेरिकेतल्या नावाजलेल्या पुस्तकांच्या यादीत या पुस्तकाचे नाव बघून मी हे पुस्तक घेतले पर मजा नही आया. जुने-पुराणे कथानक, एक जेम्स बॉन्ड छाप नायक, नेहमीचे तंत्र वापरून तो एका मुलीला वाचवतो वगैरे रटाळ कथानक होते. लेखनशैली खूपच कृत्रिम होती. पण हे पुस्तक 'सिल्कवर्म' च्या तुलनेत किंचित उजवे होते; 'सिल्कवर्म' म्हणजे कंटाळवाण्या लिखाणाचा अर्क होता. पुस्तक लिहिणे ही सोपी गोष्ट नसते. त्यामागचे कष्ट अपार असतात. पुस्तक भिकार आहे असे म्हणणे खूप सोपे असते हे खरेच आहे; पण म्हणून खोटे कौतुक करणे योग्य वाटत नाही. असो.
'फॉल ऑफ जायंट्स' वाचतांना हळूहळू नशा चढायला लागली होती. मी बसमध्ये 'फॉल ऑफ जायंट्स' वाचायचे आहे या कल्पनेने मोहरून जात असे. शनिवारी-रविवारी जास्त वाचायला मिळेल म्हणून हरखून जात असे. या पुस्तकाने मला वाचनाचा निर्भेळ आनंद दिला. खरं म्हणजे एक प्रकारचं सुख दिलं. आणि एवढंच नव्हे तर हे पुस्तक वाचून खूप नवीन माहिती देखील मिळाली.
'फॉल ऑफ जायंट्स'ची सुरुवात होते इंग्लंडमधल्या एका कोळसाखाणीशेजारी वसलेल्या गावात. काळ साधारण १९११ च्या मध्याचा. बिल नावाचा पोरसवदा तरुण बापाच्या पावलावर पाऊल टाकून खाणीमध्ये उतरून काम सुरु करणार असतो. खाणीत काम करणं म्हणजे जिवाला धोका हे त्याला माहित असतं म्हणून त्याची अवस्था भेदरलेल्या सशासारखी झालेली असते. पण अन्नासाठी कमावणारे अजून दोन हात ही त्याच्या कुटुंबाची गरज असते. ती गरज ओळखून बिल या कामाला तयार होतो. बिलची बहीण एथेल ही एक हुशार आणि देखणी तरुणी असते. एथेल गावापासून जवळ असलेल्या एका ब्रिटीश सरदाराच्या राजवाड्यात काम करत असते. या देखण्या सरदाराचे नाव फीत्झ असते. खाणीची जमीन या अतिश्रीमंत सरदाराच्या मालकीची असते. फित्झ इंग्लंडच्या राजकारणात सक्रिय असतो आणि त्याच्या महत्वाकांक्षा मोठ्या असतात. फित्झची तरुण बहीण मॉड, त्याची रशियन राजघराण्यातून आलेली पत्नी बिया, आणि एक मावशी असे सगळे व्हाईट हाऊस नावाच्या अलिशान राजवाड्यात राहत असतात. तिथेच एथेल काम करत असते. ब्रिटीश सरदाराचे घर असल्याने तिथे बड्या बड्या लोकांचा राबता असतो. युरोपातली मुत्सद्दी माणसे फित्झच्या घरी मेजवान्यांच्या निमित्ताने येत असतात. खाणकामगार मात्र अगदी हलाखीचं जीवन जगात असतात. आणि त्यांच्या भयानक दारिद्र्याची कणभरदेखील जाण या श्रीमंत लोकांना नसते. युरोपातल्या या मुत्सद्दी लोकांमध्ये असतो जर्मनीचा परराष्ट्र खात्यात नोकरीला असलेला उमदा आणि सहृदय तरुण वाल्टर. याचे वडील कर्मठ जर्मन असतात आणि जर्मनीच्या प्रमुखाचे विश्वासू असतात.
इकडे रशियामध्ये जनता झारच्या जुलुमी राजवटीला कंटाळलेली असते. रशिया पराकोटीच्या दारिद्र्यामध्ये होरपळून निघत असते. खायला अन्न नाही; अंग झाकायला कपडा नाही; रहायला घर नाही अशा दारिद्र्यात रशियन जनता राहत असते. अन्नाचा देशव्यापी तुटवडा असतो. रशियातल्या एका कारखान्यात काम करणारा ग्रिगोरी आणि त्याचा धाकटा भाऊ लेव एका छोट्या खोलीत एकत्र राहत असतात. ग्रिगोरी कष्टाळू आणि प्रामाणिक असतो आणि लेव तितकाच आळशी आणि लबाड असतो. ग्रिगोरीचं आपल्या भावावर खूप प्रेम असतं पण लेव मात्र स्वार्थी असतो. चांगल्या आयुष्यासाठी अमेरिकेला जायचं हे ग्रिगोरीचं ध्येय असतं. त्यासाठी तो ढोरमेहनत करत असतो. नंतर लेवलादेखील अमेरिकेत बोलावून घ्यायचं अशी त्याची योजना असते.
इंग्लंडमध्ये फित्झची बहीण मॉड जर्मन वाल्टरच्या प्रेमात पडते. त्यांचं चोरून भेटणं सुरु होतं. चोरून अजून बरेच चावट प्रकार करणं सुरु होतं. फित्झ पक्का ब्रिटीश असतो. त्याला त्याच्या ब्रिटीश असण्याचा आणि ब्रिटनच्या राजकारणामध्ये त्याचा वावर असण्याचा प्रखर अभिमान असतो. त्यामुळे तो आपल्या लग्नाला संमती देणार नाही अशी भीती मॉड आणि वाल्टरला असते. इंग्लंड आणि जर्मनीमध्ये परराष्ट्र व्यवहार असले तरी दोन्ही देश एकमेकांना पाण्यात पाहत असतात. जर्मनीला इंग्लंडला संपूर्ण युरोपवर राज्य गाजवण्याची संधी मिळू द्यायची नसते. इंग्लंडला जर्मनीच्या लष्करी सामर्थ्याची भीती तर असतेच शिवाय युरोपमध्ये दबदबा कायम ठेवण्यासाठी जर्मनीची सहायतादेखील हवी असते. एकोणिसाव्या शतकात जर्मनीने फ्रान्सशी युद्ध करून फ्रान्सचे दोन महत्वाचे प्रदेश अल्साक आणि लोरेन जिंकून घेतलेले असतात; त्यामुळे फ्रांसला जर्मनीचा राग असतो. जर्मनीला आपल्या लष्करी सामर्थ्याचा आणि राक्षसी महत्वाकांक्षेचा अभिमान असतो.
इकडे रशियाला बाल्कन प्रदेशात आपले वर्चस्व कमी होऊ द्यायचे नसते. बाल्कन प्रदेशात रशियाचा दबदबा कमी झाला तर त्याचा फटका झारच्या व्यापाराला आणि पर्यायाने त्याच्या कमाईला बसणार असतो. रशियाला जर्मनीच्या वाढत्या लष्करी सामर्थ्याची भीती असतेच. रशियाकडे स्वत:चे असे सामर्थ्यवान लष्कर खूप कमी असते. वर्चस्वाच्या या चढाओढीत सामान्य माणसाची मात्र ससेहोलपट होत असते. संपूर्ण युरोपातली जनता दारिद्र्याने त्रस्त झालेली असते. राजकीय स्वार्थ जपणार्या सत्ताधार्यांना मात्र याची अजिबात परवा नसते.
अशी सगळी अस्थिर परिस्थिती असतांना ऑस्ट्रियाने बळजबरीने कब्जा केलेल्या बोस्नियामध्ये ठिणगी पडते. तिथला ऑस्ट्रियाच्या विरुद्ध उभा ठाकलेला एक क्रांतीकारी ऑस्ट्रियाच्या आर्चड्यूकचा म्हणजेच फ्रांझ फर्डिनंडचा २८-जून-१९१४ रोजी सारायेव्होमध्ये गोळी घालून खून करतो. ही ठिणगी पुढे पेटणार्या वणव्याची नांदी असते. ऑस्ट्रियाला प्रचंड संताप येतो. त्यांचा संशय सर्बियावर असतो. ऑस्ट्रिया सर्बियावर आक्रमणाची तयारी सुरू करते. जर्मनीचे आणि ऑस्ट्रियाचे मित्रत्वाचे आणि सलोख्याचे संबंध असल्याने जर्मनी ऑस्ट्रियाला संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन देते. त्यात युरोपवर एकहाती वर्चस्व स्थापन करणे ही जर्मनीची सुप्त इच्छा असतेच. हे होऊ नये म्हणून इंग्लंड जर्मनीविरुद्ध दंड थोपटते. इंग्लंडच्या संसदेमध्ये संभाव्य युद्धावर अनेक चर्चा झडतात. शांततेचे पुरस्कर्ते जोरदार निदर्शने करतात. कोणत्याच देशाच्या सामान्य जनतेला आणि सैनिकांना युद्ध नको असते. जनतेची मुख्य गरज अन्न, वस्त्र, आणि निवारा असते आणि थोड्या-फार फरकाने सैनिकांचीदेखील तीच गरज असते. परंतु राज्यकर्ते, परराष्ट्र खात्यात काम करणारे महत्वाकांक्षी मुत्सद्दी, इतर देशात हितसंबंध असलेले अमीर उमराव अशा लोकांच्या स्वार्थी धोरणामुळे संपूर्ण युरोप एका भयानक युद्धाच्या उंबरठ्यावर उभा असतो. ऑस्ट्रिया आणि सर्बिया यांच्यामध्ये सामंजस्य घडवून आणण्याचे प्रयत्न देखील होतात. जर्मनीला मात्र युद्धज्वर चढलेला असतो. युरोप पादाक्रांत करण्याची ही नामी संधी आहे असे जर्मनीला वाटत असते. वाल्टरच्या वडीलांना युद्ध हवे असते. त्यातून त्यांना स्वत:चा फायदा करून घ्यायचा असतो. वाल्टरला परराष्ट्र खात्याचा मंत्री झालेलं त्यांना बघायचं असतं. एका युद्धामुळे त्यांचे बरेच मनसुबे तडीला जाणार असतात. जर्मनीच्या प्रमुखाला म्हणजेच कैसरला ते युद्ध करणे कसे चांगले राहील असे पटवून देत असतात. फित्झची बहीण मॉड आणि जर्मन वाल्टर यांना युद्ध झाले तर आपल्या आयुष्याचे काय होईल ही चिंता असते. कारण युद्ध झाले तर इंग्लंड आणि जर्मनी शत्रू ठरणार असतात.
रशियामध्ये ग्रिगोरी एका तरुण मुलीला काटेरिनाला पोलीसांपासून वाचवतो. पोलीस तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न करत असतांना ग्रिगोरी येऊन तिला वाचवतो आणि घरी घेऊन येतो. ग्रिगोरीला ती आवडते. पण ती ग्रिगोरीच्या भावाच्या म्हणजे लेवच्या प्रेमात पडते. ग्रिगोरी हे दु:ख पचवतो. लेव आणि काटेरिना जवळ येतात आणि त्यातच ती गरोदर राहते. लेव एका गुन्ह्याखाली पोलीसांना हवा असतो. गुन्हा गंभीर असल्याने लेव ग्रिगोरीकडे मदतीची याचना करतो. ग्रिगोरी भावावरील प्रेमापोटी लेवला आपले नुकतेच खरेदी केलेले अमेरिकेचे तिकिट आणि पासपोर्ट देऊन टाकतो. ते दोघे खूप सारखे दिसत असल्याने लेव जहाजावर चढून ग्रिगोरीच्या पासपोर्टवर अमेरिकेच्या प्रवासाला निघतो. ग्रिगोरीला आपले स्वप्न अशा पद्धतीने धुळीला मिळाल्याचे बघून खूप वाईट वाटते. पण तो अश्रू पुसून काटेरिनाची आणि लेवच्या होणाऱ्या अपत्याची काळजी घ्यायची असे ठरवतो. काटेरिनावर अजूनही त्याचे प्रेम असते पण ती आपल्या धाकट्या भावाची प्रेयसी असल्याने त्याच्या मनात सतत एक अपराधी भावना असते. अस्थिर रशियामध्ये एका अपत्याला घेऊन एकट्याने जगणं सोपं नसतं म्हणून काटेरिना ग्रिगोरीला लग्नासाठी गळ घालते. त्या दोघांचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून ग्रिगोरी निरीच्छेने तयार होतो. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काटेरिना ग्रिगोरीला कृतज्ञता म्हणून आपले तन समर्पित करण्याची तयारी दर्शवते पण ग्रिगोरी चिडून तिला दूर ढकलतो. त्याच्या दृष्टीने हे पाप असतं. नंतर काटेरिना त्याची समजूत काढते आणि शेवटी ग्रिगोरी तिचा स्वीकार करतो. लेवच्या मुलावर ग्रिगोरीच्या पोटच्या मुलाइतकंच प्रेम असतं.
युद्धाच्या आघाडीवर बाल्कन प्रदेशात आपले वर्चस्व रहावे म्हणून रशिया फ्रांसला युद्धात मदत करण्याचे ठरवतो. जर्मनीला रशियासोबत गुंतवून ठेवणे फ्रान्ससाठी गरजेचे असते. फ्रान्सला मदत करण्यामागे जर्मनीला रशियामध्ये आक्रमण करण्यापासून रोखणे हादेखील रशियाचा उद्देश असतो. जर्मनीचा सगळ्यांनीच धसका घेतल्याने सगळे देश जर्मनीच्या आणि ऑस्ट्रियाच्या विरोधात उभे ठाकतात. फ्रान्सवर हल्ला करण्यासाठी जर्मनी बेल्जियमकडे त्यांच्या हद्दीतून मुक्त प्रवेशाची मागणी करते पण बेल्जियम या मागणीला ठाम नकार देते. शेवटी युद्ध टाळण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरतात आणि जर्मनी बेल्जियमवर हल्ला करून युद्धाला सुरुवात करते. १९१४ च्या ऑगस्ट महिन्यात पहिल्या महायुद्धाला सुरुवात होते आणि सगळ्याच देशांचे नागरिक, सैनिक धास्तावतात.
जर्मनीने बेल्जियमवर हल्ला केल्यानंतर रशिया जर्मनीवर आक्रमण करते. दारिद्र्याने गांजलेल्या रशियन जनतेला पकडून युद्धावर पाठवलं जातं. रशियाच्या सैन्याची अतिशय दयनीय अवस्था असते. घालायला कपडे नाहीत, बर्फापासून संरक्षण करण्यासाठी सामग्री नाही, अन्न नाही, कुठलीच वैद्यकीय सुविधा नाही अशा विपन्नावस्थेत रशियन सैनिक जर्मनीवर आक्रमण करतात. अर्थात त्यांच्या आक्रमणात जोश नसतो. ग्रिगोरीला देखील सैनिक म्हणून मनाविरुद्ध आघाडीवर यायला लागतं. इकडे जर्मनीकडून वाल्टर युद्धात उतरतो. फित्झ फ्रान्समध्ये जाऊन युद्धात उतरतो.
लेव रशियातून पळून इंग्लंडला येतो आणि तिथे लोकांना फसवून तिथूनदेखील पळ काढून शेवटी अमेरिकेतील बफेलो शहरात येतो. तिथे एक रशियन माफियाच्या बारमध्ये नोकरीला लागतो. मालकाच्या मुलीशी प्रकरण केल्याने मालक त्याला आपल्या मुलीशी लग्न करण्यास भाग पाडतो. तरी पुन्हा तो बारमधल्या एका मुलीशी प्रकरण करतो. मालक चिडून त्याला युद्धासाठी सुरू असलेल्या सैन्यभरतीत पाठवतो आणि आपले वजन वापरून त्याला युद्धावर पाठवण्याची तजवीज करतो. युद्धामध्ये अमेरिका तटस्थ असते. जर्मनीच्या इंग्लंडवरील आणि त्यांच्या जहाजांवरील भीषण बॉम्बहल्ल्यात अमेरिकी नागरिक मृत्युमुखी पडतात. शेवटी अमेरिका युद्धात पडण्याचा निर्णय घेते.
इकडे इंग्लंडमध्ये बिल युद्धावर जातो. तो नेमका फित्झच्या तुकडीत असतो. एथेल फित्झच्या राजवाड्यावर नोकरीला असतांना फित्झ आणि एथेलचे प्रेम-संबंध जुळलेले असतात आणि त्या संबंधांतून एथेल गरोदर राहते. आपली इभ्रत जाऊ नये म्हणून फित्झ एथेल आणि त्यांच्या होणाऱ्या अपत्याचा अपमानास्पदरीत्या त्याग करतो. त्यामुळे एथेल चिडते. एव्हाना युद्धाची धुमश्चक्री सुरु झालेली असते. शह-काटशह, सूड, इर्षा, स्वार्थ अशा भावनांवर स्वार झालेले युद्ध संपूर्ण युरोपला गिळंकृत करते आणि जगाचा घास घेण्यासाठी आ वासते. इंग्लंडचे गुलाम देश (भारत, आफ्रिकेतले काही देश) आपसूक मित्र राष्ट्रांकडून युद्धात ओढले जातात. जपान मित्र राष्ट्रांकडून युद्धात उतरते. लाखो सैनिक मरतात. न भूतो न भविष्यति अशी प्राणहानी होते. अन्नाचा मोठा तुटवडा निर्माण होतो. सैनिक कंटाळतात. त्यातच रशियामध्ये क्रांती होऊन बोल्शेविक विचारसरणीचा लेनिनचा गट रशियाच्या झारच्या जुलुमी राजवटीविरुद्ध क्रांती करतो. ग्रिगोरी त्या गटात सामिल होऊन क्रांतीमध्ये महत्वाची भूमिका बजावतो. जर्मनी या गटाला गुप्तपणे पैसा पुरवते. या गटाशी इंग्लंडचे सैन्य इंग्लंडच्या संसदेची परवानगी न घेता युद्ध सुरु करते. यामागे फित्झचे कारस्थान असते. रशियामध्ये बोल्शेविक गटाशी युद्ध जिंकून बायकोच्या माहेरची म्हणजेच झारची अफाट इस्टेट आपल्या मुलांसाठी हस्तगत करायची असा त्याचा डाव असतो. इंग्लंडचे सैनिक चिडतात. बिलचा फित्झवर राग असतोच. त्याच्या सख्ख्या बहिणीला फित्झने फसवलेले असते. तो या गुप्त गोष्टी एथेलला कळवतो. एथेल एव्हाना लंडनमधल्या एका वृत्तपत्रात लिखाण करत असते. बिलच्या सांकेतिक भाषेतल्या पत्रातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर ती लंडनमध्ये इंग्लंडच्या दुटप्पी धोरणावर सडकून टीका करते.
अशा रीतीने कथानकातले सगळे नायक निरनिराळ्या ठिकाणी युद्धावर जातात. अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष वुड्रो विल्सन युद्धात न उतरण्यासाठी खूप प्रयत्न करतात पण शेवटी अमेरिकेला युद्धात मित्र राष्ट्रांकडून उतरावंच लागतं.
इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, ऑस्ट्रिया, बेल्जियम, रशिया, अमेरिका अशा देशांमध्ये घडणारी ही एक अद्भूत कादंबरी आहे. राज्यकर्त्यांच्या हट्टापायी लढल्या गेलेल्या या युद्धाचे खूप वाईट परिणाम झाले. जनतेच्या आणि लष्कराच्या मनाविरुद्ध लढले गेलेले महायुद्ध म्हणून या युद्धाची नोंद झाली. या युद्धातून एक सत्य बाहेर आलं आणि ते म्हणजे युद्धात कुणीच जिंकत नसतं. जे जिंकतात तेदेखील हरतातच. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉड आणि वाल्टर यांचं प्रेम फुलतं. ते शेवटी एकत्र येतात का हे वाचणं हा अतिशय रोमांचकारी अनुभव आहे. ग्रिगोरी, लेव, आणि काटेरिना एकमेकांना भेटतात का? लेव रशियाला परत जातो का? ग्रिगोरी शेवटी त्याचे अमेरिकेचे स्वप्न पूर्ण करतो का? बिलचे काय होते? एथेलचे काय होते? फित्झ परत इंग्लंडला येतो का? या प्रश्नांची नुसती उत्तरं मिळवण्यासाठी 'फॉल ऑफ जायंण्ट्स' वाचणं तितकसं महत्वाचं नाही.
युद्धाची दाहकता, अशा दाहक पार्श्वभूमीवरदेखील फुलणारे प्रेम आणि ते प्रेम जिंकावं म्हणून माणसांनी दाखवलेली अद्वितीय अशी इच्छाशक्ती, सीमेवर लढण्याची इच्छा आणि त्राण नसतांनाही कर्तव्य चोख पार पाडण्याची इमानी आणि प्रामाणिक वृत्ती, विपन्नावस्थेत असलेल्या जनतेविषयी सैनिकांना वाटणारी सहानुभूती, अमीर उमराव, सरदार, सत्ताधारी, राजकारणी यांची जनतेला वेठीस धरून उखळ पांढरं करून घेण्याची संतापजनक अशी स्वार्थी वृत्ती अशा अनेक मानवी भाव-भावनांचे मनोरम पट अनुभवायचे असतील तर त्यासाठी ही कादंबरी वाचणं, अनुभवणं आवश्यक आहे.
केन फॉलेट हे एक सिद्धहस्त लेखक आहेत. 'सेंच्युरी ट्रायोलॉजी' मधली पुढची दोन पुस्तके देखील इतकीच उत्कंठावर्धक आहेत. लेखकाची लेखनशैली ओघवती आहे. माणसामाणसांतले गुंतागुंतीचे भावविश्व लेखकाने अतिशय सुंदर पद्धतीने चितारले आहे. युद्धाची वर्णने तर निव्वळ लाजवाब आहेत. 'फॉल ऑफ जायंट्स' ही एक भान हरपून वाचण्यासारखी कादंबरी आहे.
एखाद्या मोठ्या घटनेभोवती सामान्य लोकांचे आयुष्य कसे फिरते, घडते, उध्वस्त होते, ढवळून निघते याचे अनोखे आणि रंजक चित्रण म्हणजे 'फॉल ऑफ जायंट्स' ही कादंबरी होय. नक्कीच वाचावी अशी कादंबरी!
प्रतिक्रिया
4 May 2016 - 5:09 pm | मुक्त विहारि
म्हणून प्रतिसाद दिला....
आता लेख वाचतो.
4 May 2016 - 5:21 pm | मुक्त विहारि
धन्यवाद...
4 May 2016 - 6:11 pm | प्रसाद प्रसाद
छान ओळख. वाचन यादीत टाकले आहे.
4 May 2016 - 6:17 pm | मृत्युन्जय
काय खतरनाक कथानक आहे. पुस्तकाची ओळख देखील तितक्याच उत्कृष्ट शब्दांमध्ये करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
5 May 2016 - 10:35 am | नाखु
फाम मोठ्या कॅन्व्हासवर(पार्श्वभुमी?) कथानक दिसतेय. आणि मांडलेय पण उत्तमपणे.
आम्च इंग्लीश वाचन अजिबात नसल्याने अनुवादापर्यंत वाट पहाणे आले.
निवडक अनुवादीत वाचक नाखु
6 May 2016 - 9:25 am | समीरसूर
अनुवाद झालाय की नाही माहिती नाही. काही माहिती गवसल्यास नक्की कळवतो.
4 May 2016 - 6:46 pm | एस
वाचायला हवी. फार सुंदर पुस्तकपरिचय!
4 May 2016 - 8:43 pm | अस्वस्थामा
मस्तच हो समीर भौ. उत्सुकता चाळवलीय. पुस्तक तसं आत्ता आत्ता २०१० मध्ये आलेलं दिसतंय (मला वाटलेलं खूप जुनं असेल).
5 May 2016 - 1:03 am | यशोधरा
पुस्तक परिचय आवडला.
5 May 2016 - 10:04 am | प्रमोद देर्देकर
हल्ली खुप कमी लिहता काय? बरेच दिवस झाले चित्रपटाचे परिक्षण आलेले नाहीये तुमच्याकडुन. कादंबारीचा परिचय आवडला.
6 May 2016 - 9:05 am | समीरसूर
सध्या जमत नाहीये हे खरं. पण जमेल तितके लेख वाचतो आणि जमलं तर प्रतिक्रियापण देतो. धन्यवाद!
5 May 2016 - 11:40 am | बोका-ए-आझम
अप्रतिम परिचय. केन फाॅलेट फार छान लिहितात. एखादी जगद्विख्यात आणि सर्वव्यापी घटना घेऊन तिचा सामान्य माणसांवरचा परिणाम दाखवण्याची त्यांची शैली फार छान आहे. त्यांचं आय आॅफ द नीडल वाचा. फार सुंदर आहे.
सिल्कवर्मबद्दल सहमत. In fact जे.के.राॅलिंग्ज बाईंनी राॅबर्ट गॅलब्रेथ नावाने लिहिलेल्या तिन्ही कादंबऱ्या धन्यवाद आहेत. पूर्ण निराशा.
6 May 2016 - 9:07 am | समीरसूर
अगदी अगदी. 'सिल्कवर्म' ने घोर निराशा केली होती म्हणून जेकेचं कुठलंच पुस्तक वाचायचं नाही असं ठरवून टाकलंय.
5 May 2016 - 1:02 pm | चिगो
आजकाल फारसं वाचायला आवडत नाही, पण तुमच्या पुस्तकपरीचयामुळे ही "ट्रायोलॉजी' वाचेन कदाचित..
अवांतर : रोलिंग्सबाईंचं प्रचंड कौतुक ऐकून असल्याने त्यांचं 'ककू'ज कॉलींग' विकत घेतलं होतं.. मलापण रटाळ वाटलं. थोडक्यातच पुन्हा जे शेल्फमध्ये गेलंय, ते अजून तिथंच आहे..
6 May 2016 - 9:15 am | समीरसूर
मी एका किलोवर विक्रीस उपलब्ध असलेल्या जुन्या पुस्तकांच्या प्रदर्शनातून अर्धा किलोमध्ये बसतील अशी दोन पुस्तके नवीन 'सिल्कवर्म' इंटरनेटवरून विकत घेतलं त्याच सुमारास घेतली होती. 'डेडली मेडिसिन' आणि 'रोजरी गर्ल्स' अशी ती पुस्तके होती. रु. ६० मध्ये ही दोन पुस्तके मला मिळाली. रु. १२० हा इंग्रजी पुस्तकांचा किलोचा दर होता. ही दोन पुस्तके 'सिल्कवर्म'पेक्षा कितीतरी पट जास्त रंजक, उत्कंठावर्धक आणि थरारक होती. खूप मजा आली वाचतांना. 'सिल्कवर्म' मात्र ५००-६०० चं नवीन पुस्तक आणि ते देखील अगदी नावाजलेल्या लेखकाचं असूनदेखील निराशाजनक होतं. असो. भट्टी जमत नाही कधी कधी सिद्धहस्त लेखकांची. मारिओ पुझोला तरी 'गोडफादर' नंतर विशेष असं काही जमल्याचं ऐकिवात नाही. 'ओमेर्ता' वगैरे कसे होते माहित नाही.
6 May 2016 - 9:19 am | यशोधरा
पुझोचे फूल्स डाय नाही आवडले?
6 May 2016 - 9:19 am | यशोधरा
पुझोचे फूल्स डाय नाही आवडले?
6 May 2016 - 9:22 am | समीरसूर
चांगलं आहे का? मी ऐकलेलं नाही. वाचायला पाहिजे. या माहितीसाठी धन्यवाद! :-)
6 May 2016 - 12:02 pm | अद्द्या
जबरदस्त पुस्तक आहे ते ,
पुस्तक सोडता नाही येत मधेच इतकं गुंतवून ठेवतं
6 May 2016 - 10:34 pm | यशोधरा
मला आवडलं.
16 May 2016 - 6:59 am | स्पा
भारी पुस्तकपरिचय,बर्याच दिवसांनी दिसलात
अवांतर: अचानक वाचन कमी झालय, पुस्तक हातात घेतलं की बोर होतं,लवकरच हा पॅच जाइल अशी आशा करतो
5 May 2016 - 1:02 pm | अद्द्या
एका चांगल्या कादंबरीची इतकी सुंदर ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद .
नेट वर थोडी शोधाशोध करता या सिरीज मधली पुढची पुस्तके हि मिळाली. (कोणाला हवी असल्यास मेल आयडी द्या )
पुढचे ३-४ आठवडे चांगले जाणार असं दिसतंय :)
परत एकदा धन्यवाद
6 May 2016 - 9:21 am | समीरसूर
नक्की जाणार . पुढची दोन पुस्तके - 'विंटर ऑफ द वर्ल्ड' आणि 'एज ऑफ एटरनिटी'.
16 May 2016 - 12:39 pm | स्पा
मले पाठव रे
17 May 2016 - 4:16 pm | अद्द्या
मेल आयडी दे,
पाठिवतो
5 May 2016 - 1:45 pm | सस्नेह
इतक्या व्यापक आणि गुंतागुंतीच्या कथानकाची गुंफण करणे हे मोठेच कौशल्य आहे.
6 May 2016 - 9:18 am | समीरसूर
सगळ्यांना प्रतिक्रियांसाठी मनापासून धन्यवाद!
'फॉल ऑफ जायंट्ण्स' ही कादंबरी मला खूप आवडली. वाचून बघा. एक निराळाच अनुभव येईल हे नक्की.
6 May 2016 - 12:22 pm | लालगरूड
कुणाकडे जर कोणत्याही कादंबरीच्या pdf फाईल असतील तर लिंक द्यावी
6 May 2016 - 1:12 pm | राजेंद्र मेहेंदळे
पण ईंग्लिश वाचनाचा वेग फार कमी आहे. त्यामुळे रटाळ वाटते वाचताना. अर्थात अनुवाद झाल्यावर वाचीन.
7 May 2016 - 11:43 am | विवेक ठाकूर
अतिशय आवडले. युध्दात राजकीय इर्षेपायी सामन्यजनच भरडले जातात. मला नेहेमी वाटत आलं आहे की ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन कुणीच लष्करात भर्ती झालं नाही तर राजकीय नेते काही घंटा करू शकणार नाहीत .
16 May 2016 - 12:28 am | प्रणित
केन फॉलेट यांचं "On Wings of Eagles" छान आहे
16 May 2016 - 12:18 pm | समीरसूर
सगळ्यांना धन्यवाद
16 May 2016 - 12:24 pm | अद्द्या
सुरुवात केली आहे हे पुस्तक वाचायला ,
आवडतंय :)
17 May 2016 - 11:58 am | समीरसूर
मस्तच! नंतर नंतर पुस्तकाचा आवाका हळूहळू वाढत जातो आणि कथानक रोमांचक होत जातं. तुम्हाला आवडेल बहुधा ही कादंबरी! शुभेच्छा!
17 May 2016 - 12:38 pm | चंद्रनील मुल्हेरकर
छान पुस्तक परीचय,अनुवादीत आले तर वाचावे म्हणतो.आमचे विंग्रजी यथा तथाच असल्याने डिक्शनरी घेऊन बसावे लागेल.
17 May 2016 - 1:41 pm | तुषार काळभोर
इथपर्यंत... ते पहिल्या भागचे आहे की ट्रायॉलॉजीचे?
17 May 2016 - 2:59 pm | समीरसूर
प्रश्न मला नीट कळला नाही. पण 'फॉल ऑफ जायंण्ट्स' हे पहिले पुस्तक आहे ट्रायोलोजीमधले आणि या घटनेपुढे अजून पुस्तक बरेच आहे.
17 May 2016 - 3:54 pm | तुषार काळभोर
तेच विचारायचं होतं की जेव्ह्ढं कथानक दिलंय ते पहिला भाग "फॉल ऑफ जायंट्स"चं आहे की पूर्ण सेंचुरी ट्रायॉलॉजीचं?
म्हणजे हे फक्त पहिला भाग "फॉल ऑफ जायंट्स"चं आहे आणि सेंचुरि अभी बाकी है!
17 May 2016 - 5:12 pm | समीरसूर
जेवढं कथानक लेखामध्ये दिलेलं आहे ते फक्त 'फॉल ऑफ जायण्ट्स'चं आहे. पुढील दोन पुस्तकातील कथानक निराळे आहे. आणि मी दिलेलं आहे त्यापेक्षा कथानक अजून खूप जास्त आणि गुंतागुंतीचं आहे. पण वाचायला जबरा मजा येते. तिथे पण वाल्टर नावाचा परश्या आणि मॉड नावाची अर्ची आहेच की... ;-)
17 May 2016 - 3:07 pm | पथिक
वाचायला घेतलं आहे