अवचिता परिमळू...

मनमेघ's picture
मनमेघ in जनातलं, मनातलं
11 May 2016 - 2:16 pm

अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळु ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।
चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करु।।
मज करा का उपचारू । अधिक तापभारू ।
सखी ये सारंगधरू । मज भेटवा का ।।
तो सावळा सुंदरू । कासे पीतांबरू ।
लावण्य मनोहरू । देखियेला।।
भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।
बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।
बाप रखुमादेवीवरू । विठ्ठल सुखाचा ।
तेणे काया-मने-वाचा । वेधियेले ।।

रात्रीची जेवणे झाली, आवरा आवर करून मी झोपायला निघाले. अचानक कुठून तरी मंद सुगंध येऊ लागला. कशाचा बरं सुगंध आहे हां? असा विचार करता कान्ह्याच्या कस्तुरी टिळ्याचा असावा का? असा भास झाला आणि मी मनात म्हटलं, बहुतेक बाहेर आनंदकंद गोपाळु आला!

अवचिता परिमळू । झुळकला अळुमाळू ।
मी म्हणे गोपाळू । आला गे माये ।।

मन एकाच वेळी आनंद आणि भीती यांनी व्यापलं!
तरीही मनाला लागलेली कान्ह्याला पाहण्याची आस वरचढ ठरली...कुणी बघत तर नाही ना? याचा अंदाज घेत बाहेर आले. पण बाहेर आले तर कान्हा नव्हताच तिथे ! असं ठकवलं त्यानं मला. काय करावे हे न सुचून मी काही क्षण तशीच काष्ठवत् उभी होते बाहेर.

चांचरती चांचरती । बाहेरी निघाले ।
ठकचि मी ठेले । काय करू ।।

कान्हा असंच करतो. दर्शनाची आस लावतो आणि दिसत नाही! हा विरहाचा ताप आता सहन होत नाही.
मनातल्या मनात मी तुम्हा सगळ्या सख्यांनाच म्हटलं, काही तरी उपाय करा या माझ्या विरहवेदनेवर. तो सारंगधर आता मला भेटवा, त्याशिवाय जिवाला चैन नाही पडणार!

एवढ्यात...डोळ्यांसमोर प्रत्यक्ष श्रीकृष्ण !!
काय वर्णू त्याचं रूप. बुद्धी, शब्द सगळे थिटेच त्याच्यापुढे. तो श्यामल, सुंदर, आपल्या लावण्याने कुणाचेही मन हरुन घेणारा मनोहर असा पीतांबर नसलेला गोपाळ मला दिसला.
गोपाळ हे नावही सार्थ करीत माझ्या इंद्रियांवरचा ताबाही त्याने माझ्या हाती ठेवला नाही.
मी डोळे भरून त्याला पाहत असताना आनंदातिशयाने डोळे भरून आले. (डोळे भरणे या शब्दावर काय छान श्लेष साधला गेलाय)
डोळे पाण्याने भरल्याने समोरचे अंधुक दिसू लागले. जणु कान्ह्याचा सावळा रंग, पीतांबराचा रंग हे सगळे एकमेकांत मिसळून मोरपिसाचा रंग तयार झाला एकसंध ! आणि पुन्हा तो खट्याळ वनमाळी निसटला !

भरलिया दृष्टी । जव डोळा न्याहाळी ।
तव कोठे गेला वनमाळी । गे माये ।।

आता मात्र मीच मनाला समजावले की कान्हा आहे इथेच, दिसेल पुन्हा. कान्हा संध्याकाळी भेटला होता तेव्हा बोलता बोलता बोलून गेला की "मी सगळीकडेच आहे, अगदी तुझ्यातही!"
ते आठवलं आणि मनाची पक्की धारणा झाली की हे तो हेतुपुरस्सर बोलला होता. मला बोध व्हावा म्हणूनच. मग मात्र मी स्वतःला समर्पित केलं त्या कृष्णतत्त्वात. मगाशी जो मोरपिशी रंग तयार झाला होता तो भास नव्हताच! त्या अंधारात हजार मोरांची पिसे अंगाला स्पर्श करत आहेत असा अनुभव आला. जणू ती मोरपिसे माझे पंचप्राण शोषून घेत होती. त्या आल्हादानं डोळे आपोआप मिटले! मी कान्ह्याशी अनेआन म्हणजे अनन्य झाले होते.

बोधुनी ठेले मन । तव जाले अनेआन ।
सोकोनि घेतले प्राण । माझे गे माये ।।

आता माझे प्राणच माझे नाहीत तर काया-वाचा आणि मनाला कान्ह्याशिवाय अन्य काही सुचेल का?
मी काया-वाचा-मनाने कृष्णमयी झाले !

माउली म्हणतात की त्या गोपिकेसारखीच माझी अवस्था आहे. माझ्या काया-वाचा-मनाला आता रखुमादेवीवर विठ्ठलाशिवाय काही दिसत नाही!
माझ्या काया-वाचा-मनाच्या सबाह्य अभ्यांतरी केवळ सुखराशी विठ्ठल आहे!

गोपिकांचे जीवन किती साधे, पण त्यांचा कृष्णप्रति असलेला भक्तिभाव मात्र अत्युच्च ! म्हणून तर उद्धवासारख्या ज्ञानी पुरुषालाही त्यांनी भक्तिमार्ग दाखवला! कसलासा सुगंध येणे ही सामान्य जीवनातली तशी कधीही घडू शकणारी आणि त्यामुळेच सामान्य अशी घटना! पण ही गोपिका त्या सुगंधालाही कृष्णाशी जोडते. तसंच पाहायला गेलं तर ही संपूर्ण रचना त्या गोपिकेच्या धारणेतून तिच्या मनाने मांडलेला कल्पनांचा, भासांचा एक गोफ आहे असं म्हणता येईल. काया-वाचा आणि मन या सगळ्यांना आलंबन एकच श्रीकृष्ण! काय अवस्था असेल ती ! पंच ज्ञानेंद्रियांचे विषय सगळे कृष्णमय !
सुगंध आला तर कृष्णच आला असावा अशी धारणा, डोळे भरून मला दिसतो कोण? तर पीतांबरधर सावळा कृष्णच ! पंचप्राणच त्या कृष्णाने शोषून घेतलेत, माझं काही उरलंच नाही माझ्याकडे !!
किती अनन्यता!! काय कमालीची भावावस्था!!

ही रचना दोन समर्थ गायिकांनी आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. दोन्ही रचना त्या त्या जागी अतुलनीयच आहेत.त्यातल्या किशोरीताईंच्या संगीतरचनेबद्दल थोडेसे....
'सारंगधरु भेटवा' असं म्हणणारी गोपिका किशोरीताईंनी सारंग रागातून आपल्या समोर आणली आहे.
पहिल्यांदा किशोरीताईंच्या आवाजात ही रचना ऐकताना मला असं वाटलं की "किशोरीताई किती ठासून भरल्या आहेत यात, किती प्रखर अभिव्यक्ती आहे. पण जसजसा ही रचना ऐकत गेलो, तसतसे त्यातले अनेक पदर उलगडत गेले. पहिली गोष्ट जाणवली ती ही की किशोरीताई स्वरांना शरण गेल्यात, स्वरांशी अनन्य आहेत. सर्वसामान्यपणे एखादे सुगम गीत, अभंग गाताना त्यात 'भाव' आणून स्वर-शब्द उच्चारले जातात. पण किशोरीताईंची रचना, म्हणजे त्यातले सांगीतिक कॉम्पोझिशन, इतकं प्रभावी आहे की वेगळे भाव ओतावे लागतच नाहीत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मूळ रचना संपूर्ण घेतली गेली आहे.
बोधुनी ठेले मन | तव जाले अनेआन - इथे अनेआन आणि आन- हे पाठभेद मानता येतील. (लताबाईंच्या रचनेत 'आन' एवढाच शब्द वापरलाय).
रचनेच्या सुरुवातीचा आलाप म्हणजे जणू ताईंनी एक 'कॅनव्हास' तयार केलाय, पुढच्या चित्रकलेसाठीचा.
(लताबाईंच्या रचनेतही सुरुवातीचा आलाप तसेच काम करतो स्मित )
या रचनेतली 'झुळकला' या शब्दाचीच कलाकुसर इतकी लोभस आहे की फक्त तेवढंच ऐकत रहावंसं वाटतं. अगदी खरोखरीच परिमळू झुळकल्याचा आभास होतो. 'गोपाळू आला गे माये' यातले 'आला गे माये' या तीन शब्दांना दिलेले झोके आणि स्वरांच्या मींड.. आहाहा !
'ठकचि मी ठेले, काय करु' यातल्या 'काय करू' चे स्वरच त्या गोपिकेची अगतिकता डोळ्यांसमोर उभी करतात. 'काय करू' म्हणून झाल्यावर थोडा विराम आहे तालाला... हीसुद्धा त्या अगतिकतेचीच सूचना !
तो सावळा सुंदरू | कासे पीतांबरू.. यात पीतांबरू या शब्दातला 'पी' छान दीर्घ उच्चारलाय आणि अगदी सहज स्मित
'भरलिया दृष्टी जव डोळा न्याहाळी | तव कोठे गेला वनमाळी गे माये | यातला 'कोठे' हा शब्द.. त्याचे स्वर जणू एक पोकळी दाखवतात. 'वनमाळी गे माये' इथे छंददृष्ट्या एक शब्द कमी पडतो खरं तर आणि म्हणून 'वनमाळी' हा शब्द लांबवला गेलाय जरासा...आणि त्यानेच मजा आणली आहे.
बोधुनी ठेले मन.. सोकोनि घेतले प्राण माझे गे माये.... यानंतरही तालाला किंचित विराम आहे. यातून सांगीतिक दृष्ट्या एक समतोल साधला जातोय असं वाटतं.
तेणे काया मने वाचा- यात काया, मने, वाचा यांचे स्वर एकामागून एक चढते आहेत. अस्तित्वाच्या कायिक, मानसिक आणि वाचिक अशा पायर्‍या चढत जाव्या तसे.
खरं तर माउलींच्या शब्द-रचनेबद्दल लिहिल्यावर अजून काही लिहूच नये असे वाटत होते, पण मला आवडलेल्या जागाही सांगायचा मोह आवरला नाही म्हणून जरा पाल्हाळ लावलं. गेले काही दिवस हे गाणं खूपदा ऐकलंय, दर वेळी अजून काही तरी नवीन सापडतं. ऐकताना अगदी एखादाच क्षण का होई ना... त्या गोपिकेच्या भावविश्वाचा अनुभव येतो. संगीत हा ईश्वराशी जोडलं जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग आहे असं म्हणतात, त्याची प्रचीती येते.

~ चैतन्य दीक्षित.

संगीतआस्वादलेख

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 May 2016 - 2:26 pm | यशोधरा

आवडलं.

मितान's picture

11 May 2016 - 2:40 pm | मितान

फार सुरेख लिहिलं आहे. रसग्रहणाचे उत्तम उदाहरण !!!

वाचता वाचता या ओळी आठवल्या-
केव्हा कसा येतो वारा
जातो अंगाला वेढून
अंग उरते न अंग
जाते अत्तर होऊन... !!!!

तुषार काळभोर's picture

11 May 2016 - 2:57 pm | तुषार काळभोर

सुंदर!

मोगरा फुलला
अवचिता परिमळु
आजि सोनियाचा दिनु
रुणुझुणु रुणुझुणु रे
रंगा येईं वो येईं

संत ज्ञानेश्वर-पं हृदयनाथ मंगेशकर-लता मंगेशकर या कॉम्बिनेशनच्या सर्व रचना अवर्णनीय प्रमाणात आवडतात, त्यामुळे हा लेख बाय डिफॉल्ट आवडला.

नीलमोहर's picture

11 May 2016 - 7:22 pm | नीलमोहर

अगदी हेच.

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 3:11 pm | वैभव जाधव

___/\___
ज्ञानोबा माऊली... 20 वर्षाच्या आयुष्यात किती आयुष्य जगलं या प्रतिभावंत संतकवींनी. चपखल उपमा, रसाळ शब्द आणि अकृत्रिम प्रेमाची अभिव्यक्ती.

लता मंगेशकरांनी गायलेलं ऐकलं आहे आणि प्रत्येक वेळी ऐकत च राहावं वाटतं.

प्रीत-मोहर's picture

11 May 2016 - 4:04 pm | प्रीत-मोहर

__/\__

वैभव जाधव's picture

11 May 2016 - 4:19 pm | वैभव जाधव

थोडं आणखी लिहावंसं वाटलं.

ज्याचं ध्यान करायचं तो आणि मी जेव्हा वेगळे उरत नाही, म्हणजे त्रिपुटी चा लय होतो ती स्थिती इथं माऊली वर्णन करत आहेत.

आपण थोडं गायकीच्या अंगानं लिहिलं असल्यानं त्याबद्दल बोलावं की नाही या संभ्रमात आहे.

ज्या डोळ्यांनी श्रीहरि ला पहावं ते डोळे त्याचेच झालेत, एकभावाने सगळीकडे हरि च आहे मग बघणं उरत नाही अशा अर्थे.

पिशी अबोली's picture

11 May 2016 - 4:35 pm | पिशी अबोली

____/\____

अप्रतिम! वाचनखूण साठवत आहे.

आताच बाहेर भरून आलेले कृष्णरंगी आभाळ, बासरीच्या आवाजाइतका मधुर पाऊस, आणि मातीचा आलेला 'अवचिता परिमळू' या वातावरणात हे ललित वाचायला मिळालं.. आज काय भाग्य होतं काय माहीत!

मनमेघ's picture

12 May 2016 - 9:01 am | मनमेघ

तुम्ही अजून एक आयाम दिलात त्या 'अवचिता परिमळु' ला.
किशोरीताईंच्या गाण्यात त्यांचा आलाप सुरू होण्यापूर्वीचे सतारीचे सूर, बासरीची तान यातूनही असाच पावसाच्या वातावरणाचा 'फील' अगदी भरलेला आहे.

खूप सुंदर रसग्रहण … यातला "ळ" चा वापर त्याला अजून गोलाई आणि गोडवा देतो

घाटी फ्लेमिंगो's picture

11 May 2016 - 8:13 pm | घाटी फ्लेमिंगो

अचूक निरीक्षण मोरेसाहेब...!!

मनमेघ's picture

12 May 2016 - 8:53 am | मनमेघ

'ळ' आहेच गोलाईयुक्त. त्यात माउलींचे नेहमीचे 'उ'कारांत शब्द माधुर्य अजूनच वाढवतात.

नीलमोहर's picture

11 May 2016 - 7:20 pm | नीलमोहर

लताबाईंच्या आवाजातील हे गीत अतिशय आवडतं, मन शांत होऊन जातं या रचना ऐकतांना,
परिमळू आणि अळूमळू तील गोडवा शब्दांपलिकडचा..
__/\__ माऊली

घाटी फ्लेमिंगो's picture

11 May 2016 - 8:12 pm | घाटी फ्लेमिंगो

आधी आकलन न झालेल्या बर्याच गोष्टी कळल्या तुमचा लेख वाचून... धन्यवाद.

अत्रन्गि पाउस's picture

11 May 2016 - 10:23 pm | अत्रन्गि पाउस

षड्ज ते तार षड्ज हि एक अप्रतिम मिंड आणि नंतर बागेश्रीत्ला टिपिकल म प ध हा वक्री पंचम ...
हे इतके नितळ फक्त आणि फक्त लता

मारवा's picture

11 May 2016 - 10:32 pm | मारवा

फार सुंदर लिहीलय
भिडल मनाला
आतपर्यंत

मनमेघ's picture

12 May 2016 - 8:51 am | मनमेघ

प्रतिसादांबद्दल सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद !
लेखात किशोरीताईंच्या गाण्याबद्दल लिहिले आहे म्हणून त्यांच्या गाण्याची लिंक देतो
इथे ऐका.

काय सुंदर लिहिलं आहे !

डोळे पाण्याने भरल्याने समोरचे अंधुक दिसू लागले. जणु कान्ह्याचा सावळा रंग, पीतांबराचा रंग हे सगळे एकमेकांत मिसळून मोरपिसाचा रंग तयार झाला एकसंध !

मगाशी जो मोरपिशी रंग तयार झाला होता तो भास नव्हताच! त्या अंधारात हजार मोरांची पिसे अंगाला स्पर्श करत आहेत असा अनुभव आला. जणू ती मोरपिसे माझे पंचप्राण शोषून घेत होती.

हे फारच आवडले.

ऐकताना अगदी एखादाच क्षण का होई ना... त्या गोपिकेच्या भावविश्वाचा अनुभव येतो.

हेवा वाटला वाचून.

धनंजय माने's picture

13 May 2016 - 4:52 pm | धनंजय माने

सुरेख लिहीलंय. प्रणाम.

मुक्त विहारि's picture

13 May 2016 - 5:06 pm | मुक्त विहारि

मस्त

या काव्यात "गे माये" असं काहि नाहिच. ते खरं तर "गोम मयी" आहे (त्यातली गोम कळायच्या लायकीचं हे संस्थळ नाहि).
केवळ एकच व्यक्ती आहे जो खरं काव्य आणि सत्य रसग्रहण करु शकेल इथे. त्यांना पाचारण करावे हि संमं ल नम्र विनंती.

*** सॉरी बरं का मनमेघ ***

वैभव जाधव's picture

14 May 2016 - 3:12 am | वैभव जाधव

प्रतिसाद अस्थानी आणि अत्यंत अकारण असा आहे. वरचे सुंदर निरूपण वाचून देखील असल्या भोंगळ प्रकाराची आठवण येत असेल तर..... ते बॅन झालेत. सोडा!

हो, तसा तो आहेच. छान निरुपण चाललं असताना असल्या भोंगळ प्रकाराची आठवण व्हावी हि माझि माझ्यासाठीच शरमेची गोष्ट आहे. पण ज्ञानदेवांच्या रचनांना सुद्धा आपल्या विटा लावण्याची अहंमन्यता कुठुन येते याचं राहुन राहुन आश्चर्य वाटतं... आज सुद्धा.
असो. रसभंग केल्याबद्द्ल क्षमस्व.

मनमेघ's picture

14 May 2016 - 12:27 pm | मनमेघ

तेथील सभासदच ठरवतात.
बाकी तुम्ही कुणाबद्दल बोलताय ते मला समजत नाही.
माझे सदस्यत्व जुने असले तरी लेखनाच्या बाबतीत नवाच आहे मी.

ज्ञानदेवांच्या रचनाना स्वतःच्या विटा>>
छे छे, असले दुःसाहस नाही हे. एक प्रामाणिक प्रयत्न आहे भावग्रहणाचा. यातले काय आवडले नाही ते सांगायची कृपा करा. आणि अवांतर जे काही असेल त्यासाठी खव किंवा व्यनि वापरूया. कसे?
~ चैतन्य दीक्षित

मनमेघ's picture

14 May 2016 - 12:28 pm | मनमेघ

तेथील सभासदच ठरवतात.
बाकी तुम्ही कुणाबद्दल बोलताय ते मला समजत नाही.
माझे सदस्यत्व जुने असले तरी लेखनाच्या बाबतीत नवाच आहे मी.

ज्ञानदेवांच्या रचनाना स्वतःच्या विटा>>
छे छे, असले दुःसाहस नाही हे. एक प्रामाणिक प्रयत्न आहे भावग्रहणाचा. यातले काय आवडले नाही ते सांगायची कृपा करा. आणि अवांतर जे काही असेल त्यासाठी खव किंवा व्यनि वापरूया. कसे?
~ चैतन्य दीक्षित

भाग्यश्री कुलकर्णी's picture

14 May 2016 - 1:34 pm | भाग्यश्री कुलकर्णी

सुंदर अप्रतीम रसग्रहण.

रातराणी's picture

16 May 2016 - 10:25 am | रातराणी

सुरेख!