सैराट : एक दाहक वास्तव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
5 May 2016 - 2:41 pm

सैराट चित्रपटाबद्दल खुप लिहिल्या गेलं, बोलल्या गेलं, वाट्सपवर हमरीतुमरीवर येईपर्यंत चर्चा झाल्या. मिपावरही चर्चा रंगली आहेच, ही माझी अजून एक भर.

नागराज पोपटरव मंजुळे दिग्दर्शित सैराट चित्रपट प्रदर्शीत झाला आणि प्रदर्शनापूर्वीच सैराट या मराठी चित्रपटाची चर्चा खुप झाली. आणि चित्रपट प्रदर्शनानंतरही सैराट या चित्रपटाची विविध माध्यमातून अधिक उणेची चर्चा अजूनही विविध पैलूंसह सुरुच आहे, असे दिसते. नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाची चर्चा खुप झाली, एक वेगळा चित्रपट म्हणुन अनेक प्रसार माध्यमांनी दखल घेतलेली होती . सैराट चित्रपटानेही ६६ व्या बर्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नाव केल्याचे वाचनात आले. प्रसिद्ध नसलेल्या सामान्य कलाका्रांना सोबत घेऊन, एक वेगळा अनुभव, एक वेगळा विषय कलात्मक पद्धतीने चित्रपटाच्या माध्यमातून सादर करण्याची परंपरा नागराज मंजुळे यांनी सैराट मधून कायम ठेवल्याचे दिसून येते. index

सैराट, ही तशी एक ग्रामीण करमाळ्याच्या भागात घडत असलेली परश्या (आकाश ठोसर) आणि अर्चना (रिंकु राजगुरु) यांची सरळ साधी प्रेमकथा. कोणी कोणाची जात पाहुन, कोणी कोणाला आवडत नसते, प्रेमात ही अटच नसते. प्रेमाची स्वत:ची एक भाषा आणि प्रेमात स्वत:च एक जगणं असतं. गावगाड्यातील विषम व्यवस्थेतील जातीच्या उतरंडीतून अशी जेव्हा कथा घडत जाते, तेव्हा ती कथा जरा प्रेक्षकांच्या मनात तळाशी खोल जाते. सैराटा चित्रपटाची प्रेमकथा अगदी हिंदी, मराठी चित्रपटातल्या प्रेम कथेप्रमाणेच याही चित्रपटातच रुटीन वळणावरुनच जाते. वरीष्ठ महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकणा-या तरुण तरुणीची ही प्रेमकथा. महाविद्यालयीन जीवन जगणा-यांना आणि जगून गेलेल्यांना आणि चित्रपटातील विविध प्रसंगातून हे नेहमीच पाहिलेलं असल्यामुळे प्रेम प्रसंगाचं काही नाविन्य वाटणार नाही. गावातील प्रतिष्ठीत पाटलाची मुलगी जी अतिशय धीट स्वभावाची, कोणाचीही भीड न ठेवणारी अशी आहे, गावात पाटलांची खूप दहशत आहे, हे विविध प्रसंगातून मंजुळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीने व्यक्त केलं आहे. परशा हा कोळ्याचं पोर, सोबतीला जीव लावणारे लंगड्या, आणि सल्ल्या हे मित्र. परशाला आर्ची आवडते. दोघांचेही स्वभाव वेगवेगळे. असं हे लपून छपून चाललेलं प्रेम पाटलाच्या घरी कळतं. आणि मग पुढे प्रचंड मारहाण, गावात त्यांची असलेली दहशत, प्रिन्सचा वाढदिवस, शिक्षकाला मारलेला फटका, अशी सरंजामशाहीची प्रतिकं चित्रपटातून अनेकदा ठळकपणे येऊन जातात. संस्थाचालकांनी चालविलेल्या महाविद्यालयातून शिक्षकांना काय काय करावं लागतं एक ओझरता प्रसंगं अतिशय सुंदर आलेला दिसतो. परशाच्या घरच्यांनी गाव सोडून जावं म्हणुन आणलेला दबाव, प्रिन्सच दहशत, या गोष्टी असल्या तरी पूर्वार्धात प्रेमकथा अनेक लहान मोठ्या प्रसंगानी उत्तम फुलवली आहे. खुसखुशीत, गालातल्या गालात हसवणारे, आणि प्रसंगी मोकळेपणाने हसवणारे प्रसंग आहेत. प्रेमवीवर कोणाला भीत नसतात. पाटलांच्या समर्थकांकडून मार खाऊन हे प्रेमवीर थांबत नाही. गाव सोडून पळून जातात. , गावगाड्यातील बारव, त्यातील पोहणे, शेती, याचं अतिशय सुंदर छायाचित्रण डोळ्यांना मोहवून टाकतात.

हैदराबादला पळुन गेल्यावर दोघांचा संसार फुलतो. इथे चित्रपट संथ झाल्यासारखा वाट्तो. पूर्वार्धात असलेला खुसखुशीतपणा विनोद, ते संवाद हरवलेले असतात. मान, सन्मान, समाजातील प्रतिष्ठा, अपमान, पाटलांना सतत बोचत जाते. आणि मग चित्रपट्गृह अगदी शांत होऊन जातं, हा प्रसंग उत्तम उतरला आहे. चित्रपट योग्य जागी संपला. पार्श्वसंगीत उत्तम आहेच, गाणीही तशी लोकप्रिय झाली आहेत. अर्चना उर्फ रिंकु राजगुरुचा लाजवाब अभिनय, बोलण्याची लकब, भाव मारुन जाते. आकाश ठोसरही दिसायला चांगला आहे, लंगडा प्रदीप, सल्ल्या, पाटील, मंग्या, (नावं माहिती नाहीत) यांचा अभिनयही झकास आहे, एकुण काय एकवेळा चित्रपट बघायला हरकत नाही.

मानव जातीच्या इतिहासाचा विचार केला की जातीच्या उच्च आणि कनिष्ठ जातीचा लढा नवा नाही. प्रत्येक जातीच्या माणसानं आपापल्या पायरीनं राहावं, या सांस्कृतिक वारशांची मोडतोड प्रेम, जमीन, गावातील राजकारण, प्रतिष्ठा, आणि अनेक कारणांनी झालेली दिसून येते. विविध जात पंचायती, त्यांचे नियम, त्यांची दहशत, अनेकदा वर्तमानपत्रातून वाचायला मिळते. माणसं शिकली आणि जात अजून घट्ट रुतून बसली. आपापल्या अस्मिता, प्रतिष्ठा, पणाला लागलेल्या दिसून येतात. सैराट चित्रपट समाजातील वास्तवच अधोरेखित करतो. जातीव्यवस्थेला जसा धर्माचा आ्धार देऊन जशी विविध बंधने लादल्या गेली तशी ही बाकीची उतरंड परावलंबी आणि पंगू झालेली दिसते. आता काळ बदलून गेला आहे, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक उन्नती या गोष्टीमुळे आता जातीय विषमता वरवर कमी झाली तर आत तितकीच घट्ट आणि धुसफुसत आहे, असेच चित्रपट पाहिल्यानंतर म्हणावे लागते. चित्रपट आवडलाच हे वेगळे सांगणे न लगे.

कलाविचार

प्रतिक्रिया

तर्राट जोकर's picture

5 May 2016 - 2:54 pm | तर्राट जोकर

लेख आवडला. या लेखानिमित्त पर्श्याच्या बापाचं एक निसटतं वाक्य आठवलं. बाप पर्श्याला चिडून फटके देत म्हणतो, "मोठ्यांच्या नादी कशाला लागायचं, इतकं शिकून काय उपेग." झटका बसतो ते ऐकून. शिकून काय उपयोग. उच्चनिचतेचे बंध मोडणारे म्हणून शिक्षण समजले जाते. पर्श्याचा बाप पण काय समजतो ....

मृत्युन्जय's picture

6 May 2016 - 1:50 pm | मृत्युन्जय

चागले शिकुन सावलीतली नौकरी बघ हा परश्याच्या बापाचा डायलॉग सुद्धा असाच मनात घर करुन बसतो.

अपरिचित मी's picture

5 May 2016 - 2:55 pm | अपरिचित मी

______/\________
एवढं detail मध्ये मी कधीच लिहू शकत नाही...
तुम्ही चांगलं लिहिलंय...

नीळा's picture

5 May 2016 - 3:07 pm | नीळा

आवडल पीक्चर

मी पयला

परिक्षण आवडलं, सिनेमा चालू असताना कमेंट पास करुन हैराण करणारं अतिउत्साही पब्लिक ओसरुन गेलं की बघायला जायचा विचार आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 May 2016 - 3:27 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आमच्याकडे हे पब्लिक तसं कमी वाटलं. पण तोंडाची टकली अधुन मधुन चालूच होती, नाय असं नाही.
झिंगाटच्या वेळेस पब्लिकच्या अंगात आलं होतं सिक्युरीटीवाल्यांनी जाग्यावर जाऊ जाऊ जाऊ दम भरला.

कसला आनंद मिळतो या पब्लिकला काय माहिती

-दिलीप बिरुटे

नाखु's picture

5 May 2016 - 5:25 pm | नाखु

आणि निरपेक्ष समीक्षणाबद्दलही.

ह्या एकाच कारणामे विलंब करणार आहे सिनेमा पहायचा.

टाईमपास-१ आणि प्रकाश बाबा आमटेच्या वेळी आलेल्या अनुभवातून शहाणा झालेला

चांदणे संदीप's picture

5 May 2016 - 3:27 pm | चांदणे संदीप

आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा
आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा
सरांनी लिहीलय परीक्षण...
आतातरी सैराट पहायलाच हवा! ;)

Sandy

चौकटराजा's picture

6 May 2016 - 9:48 am | चौकटराजा

तुम्ही जे काय काव्य टाकलंय ना ते " त्या" आवाजात इथे ऑडिओ मधे टाका ना !

चांदणे संदीप's picture

6 May 2016 - 1:35 pm | चांदणे संदीप

मजा घेताय सर! लयीत/ठेक्यात म्हणता येईल एकवेळ त्या...पण "त्या" आवाजात नाही म्हणता येणार मला!
हा...हा... पण कल्पना करूनही हसू फुटलेच!

Sandy

अनिरुद्ध प्रभू's picture

5 May 2016 - 3:34 pm | अनिरुद्ध प्रभू

लेख आवडला..

प्रचेतस's picture

5 May 2016 - 4:40 pm | प्रचेतस

सर्वप्रथम सर लिहिते झाल्याबद्दल खूप आनंद झाला.
नेहमीच्या मनमोकळ्या शैलीतच हे लिहिलं गेलं आहे. चित्रपट पाहीन किंवा न पाहीन हे माहीत नाही. कदाचित पाहणारही नाही.
हे असले चित्रपट आवडत नाहित हे कारण. मी महेश कोठारे,जब्बार पटेल फ्यान क्लबातला. मंजुळे, उमेश कुलकर्णी ह्यांचे चित्रपट जडच जातात.

कानडाऊ योगेशु's picture

5 May 2016 - 4:43 pm | कानडाऊ योगेशु

हे असले चित्रपट आवडत नाहित हे कारण.

+१
असले चित्रपट पाहणे म्हणजे विकतचे दुखणे घेतल्यासारखे होते. लव सेक्स और धोका मधेही त्यातल्या "लव" भागात असा प्रकार दाखवला होता व दोन चार दिवस झोप आली नव्हती. इथे तर संगीत भाषा वगैरे वापरुन पूर्ण हिप्नोटाईझ करुन जरा तसा काही शेवट केला असेल तर ते दृष्य मनातुन घाल्वणे फार अवघड आहे.

सर शेवटच्या दोन ओळी बाबत हजार वेला सहमत.
आणि parshyachya वडिलांचे वाक्य काही चुकीचे नाही आहे.

सर शेवटच्या दोन ओळी बाबत हजार वेला सहमत.
आणि parshyachya वडिलांचे वाक्य काही चुकीचे नाही आहे.

जेपी's picture

5 May 2016 - 9:00 pm | जेपी

लेख आवडला..
पण चित्रपट पाहणार नाही..
उगाच अधिर/बधीर होण्यात अर्थ नाही.
नितीन आगे ला विसरली तशी याची झिंग लगेच विरेल..

(अतिसंवेदशील)जेपी

उगा काहितरीच's picture

5 May 2016 - 9:57 pm | उगा काहितरीच

अजून तरी पाहिला नाही. सहजासहजी पहायला मिळाला तर पाहीन .

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2016 - 9:52 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखनाबद्दल मत व्यक्त करणार्‍या सर्व प्रतिसादकर्त्यांचे आणि मिपाकर सदस्य आणि वाचकांचे मनःपूर्वक आभार.

मित्र प्रचेतस आणि किसन शिंदे यांच्या सर कधी लिहिताय, कधी लिहिताय
अशा धोशांमुळेच कच्च-बच्चं लेखन करता आलं. मनःपूर्वक आभार.

आपला व्यक्तिगत अनुभव चित्रपटातल्या कथनाशी अजिबात न जोडता तट्स्थपणे
लेखन केलं म्हणुन खुश होऊन झिंगाटवर खतरा डान्स करणार्‍या आर्चीचेही आभार. :)

परशा बिरुटे :)
(आभारी)

ते सैराट मुळे शक्य झालं. मीपण सैराट पाहिला पण इतकं चांगलं लिहिता येत नसल्यामुळे परीक्षण लिहिलं नाही.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

6 May 2016 - 3:38 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कौतुकाबद्दल धन्स. मोसादचं दमदार लेखन करणा-या लेखकाने कौतुक केलं हे पाहुन भारी वाटलं. बाकी, सैराट बद्दल स्वतंत्र लेखन कराच. काय आवडलं आणि काय नाही, काही सूटलेल्या, काही चुकलेल्या, आणि आत थेट भिडलेलं कोणत्याच जातीचा अंगरखा न घालता चित्रपट किती पोहोचतो, आपल्या नजरेतून मन मोकळं लिहाच. मला वाचायला आवडेल...!

''आखिर थक हार के लौट आया मैं बाजार से,
उसकी यादों को बंद करने के ताले कहीं नहीं मिले"

-दिलीप बिरुटे

''आखिर थक हार के लौट आया मैं बाजार से,
उसकी यादों को बंद करने के ताले कहीं नहीं मिले"

आहाहाहा. क्या बात क्या बात.
प्राडॉ सर खजिना लैच मोठा आहे तुमच्याकडे असल्या चीजांचा.
बादवे तुमच्या परिक्षणाबद्दल काय बोलणार आम्ही. परफेक्टच असते ना सगळे.
(सैराट) अभ्या

तर्राट जोकर's picture

6 May 2016 - 4:55 pm | तर्राट जोकर

''आखिर थक हार के लौट आया मैं बाजार से,
उसकी यादों को बंद करने के ताले कहीं नहीं मिले"

>> व्वा. असे गहरे मारायची सवय ठेवा हो. तुम्ही आपले अधीमधी बरसून जाता.