असंख्य देव देवींच्या गजबजाटात आणखी एक नाव म्हणजे येल्लम्माचे, मुख्यत्वे दक्षिण भारतात प्रस्थ असलेली महाराष्ट्राच्या सीमेपार बेळगाव जिल्ह्याच्या सौंदत्ती येथे मुख्य ठाणे असलेली देवता. दक्षिणेतील मरीआई प्रमाणेच आजारातून बरे करणे, मुलगा होणे अशा प्रकारच्या काम्यव्रतांना पावणारी देवता म्हणून ह्या देवतेचे दक्षिणेत प्रस्थ मोठे आहे. वर्षाचे उत्पन्न ११ कोटी म्हणजे बर्यापैकी असावे.
दक्षिण भारतात येल्लमाच्या बर्याच दंतकथा प्रचलीत आहेत पण यातील बहुतांश दंतकथांचे थोड्या फार फरकाने सार म्हणजे परशुरामाची आई रेणुका हिला पुन्हा जीवंत करण्यापुर्वी रेणुका आणि येल्लम्माच्या चेहर्यांची जमदग्नी अथवा परशुरामाकडून अनवधानाने अदलाबदल केली गेली. आजच्या काळात आपण एखाद्या व्यक्तीचे मुंडके परत लावून परत जिवंत केले जाणे अशा चमत्कारांवर विश्वास ठेऊ शकत नाही.
छायाचित्र सौजन्य By Manjunath Doddamani Gajendragad , via Wikimedia Commons
महाराष्ट्रात आजच्या काळात किमान अभिजन वर्गात तरी या देवतेचे फारसे प्रचलन राहीलेले नसावे. पण उत्तर महाराष्ट्राचा अपवाद वगळता सर्वभागात एल/येल पासून असणारी गावे-दरी-टेकड्या उर्वरीत महाराष्ट्र ते खाली तामीळनाडूपर्यंत मोठ्या प्रमाणात दिसतात. येल्ला हा शब्द येतो कुठून याचे द्रविडीभाषातही नेमके रेकॉर्ड उपलब्ध नसावे. सर्व गाव अथवा स्थल नामे येल्ला या देवतेच्या नावावरुन आल्याचा एकमेव तर्क बांधण्यातील मुख्य अडचण म्हणजे एलाची हे नाम वेलदोड्याच्या वनस्पती तर येला हे नाव 'हिरडा'सम वनौषधी वनस्पतीसाठी मराठीत वापरले गेले असल्याची नोंद मोल्सवर्थात आढळते. अॅलोवेरा मधील अॅलो ह्या शब्दाची वनस्पती नामाची व्युत्पत्ती मुलतः द्रवीडी भाषेतून असल्याचे मानले जाते. 'आले' ह्या वनस्पतीचाही औषधी उपयोग होतो. स्थलनामांचे मोठ्या प्रमाणावर प्रचलन वनस्पतीं नामांवरुनही झाल्याचे दिसून येते जसे की वड आहे अथवा पळस आहे. त्याच प्रमाणे एला अथवा येला पासून चालू होणार्या ग्राम नामांचे प्रचलन येला या वनस्पती वरुन झाले असू शकते का ? अजून एका शक्यतेचा मनात विचार येतो तो म्हणजे येला वर्गीय वनस्पतीत औषधी गुणधर्म असल्यामुळे ह्या वनस्पतीचे आजार देवता मानले गेले आणि काळाच्या ओघात पर्सोनीफीकेशन होऊन देवी रुपात पूजन केले जाउ लागले. परशुरामाकडून रेणूकेवर आघात झाल्या नंतर घाव भरुन यावा म्हणून येला नामक औषधी वनस्पती
वापरली जाऊन पुढे इतर दंतकथा प्रचलीत झाल्या असू शकतील का ? शेवटी हे सर्व कयासच.
येला या देवता नावाचा विचार करताना इला एल नामक वैदीक आणि सेमेटीक उल्लेख असलेली देवता नामांची शक्यताही लक्षात घ्यावी लागते पण देवता नाम उत्तरेतून आले असेल तर त्या नावाची स्थलनामे उत्तरेतही मोठ्याप्रमाणात आहेत असे दाखवून द्यावे लागेल आणि तो बहुधा वेगळ्या संशोधनाचा विषय असेल.
हि येल्लमा देवता काळाच्या ओघात अजून एका गोष्टीसाठी प्रचलीत झाली ती म्हणजे देवदासी प्रथेसाठी. घरातील एक मुलगी देवी नवसाला पावावी -मुले व्हावीते आजारपणे टळावीत ते आर्थीक अडचणी - म्हणून देवीला दासी म्हणून सोडून देण्याची प्रथा. मुलीचे देवाशी लग्न होणे ठिक येल्लम्मा हि तर देवता तिच्याशी विवाह कसा लागतो हे न उमगलेले कोडे. संत मीरेला देवालाच पती मानायचे आहे प्रजापिता ब्रह्मकुमारी असोत नन असोत अथवा इतर स्त्री सन्यासी त्यांनी इश्वर सेवेत स्वतःला वाहून घेण्यात वावगे काही नाही पण हि देवदासी प्रथा मुलींनी कळत्या वयात घेतलेले निर्णय नव्हेत तर पालकांनी अजाणत्या मुलींवर लादलेले निर्णय. त्यातही बर्याच मुली कुटूंबाच्या गरीबीमुळेही वाहील्या जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, या मुली मोठेपणी समाजातील धनडांडग्यांच्या वासनांना बळी पडू लागल्या १९ व्या शतकापासून कुप्रथे विरुद्ध जनजागृती सुरु झाली. बरेच कायदे झाले. बरेच समाज प्रबोधन झाले त्यामुळे कुप्रथेस बराच लगाम पडला.
या धागा लेखाचे लेखन करण्याचे खरे निमीत्त म्हणजे डिएनए या इंग्रजी वृत्तपत्रात १मे ला आलेले योगेश पवार यांचे हे शोधवृत्त. ह्या शोधवृत्तानुसार दुष्काळामुळे बेकायदेशीर असूनही मुली देवदासी म्हणून काही प्रमाणात तरी वाहील्या जात आहेत, भविष्यातील वासना व्यवसायाची सोय म्हणून निर्लज्ज धनदांडगे गुंतवणूक म्हणून पाहू शकतात हे खेदजनक आहे. (विद्या वेंकट यांचे दुसर्या कारणाने गेल्या वर्षाभरातील दुसरे वृत्तही बरीच इतर माहिती पुरवते.
एक विचार आला की जर येल्लमा देवस्थानाचे उत्पन्न एवढे मोठे आहे आणि आजही आजारपणे आणि असुरक्षीतता ही महत्वाची कारणे जनसामान्यांसाठी आहेत तर देवस्थांनानी सामान्य जनांसाठी वैद्यकीय, व्यवस्थापन, कौशल्य शीक्षण आणि वैद्यकीय सेवांमध्ये गुंतवणूक करून भक्तगणांना अधिक चांगल्या सुविधा का देऊ नयेत ?
* येला समौच्चारण असणारी स्थलनामे
*येळंब, येळा, येळाबारा, येळगी, येलमवाडी, येळवण जुगाई, येळाणे, येळपणे, येळापूर, येळासे, येळवट, येळावेवाडी, येळावी,
येळवी, येळवण, येलचिल, येल्डा, येलदरा, येळदरी, येळेगाव, येळहाती, येळी
* एलामवाडी, ईळये, एलेचपूर, इळेगाव (थडी), एलिचपूर, एल्कापर, एलकुंदे, एलोरी मिर्झापूर इत्यादी
प्रतिक्रिया
3 May 2016 - 10:27 pm | विजय पुरोहित
गंमत म्हणजे हिब्रू भाषेत आणि एकूणच जुन्या बायबलात एल हा ईश्वराचा किंवा सर्वशक्तिमान अस्तित्वाचा समानार्थी शब्द आहे.
3 May 2016 - 10:31 pm | विजय पुरोहित
हिब्रू भाषेत ज्या ज्या शब्दास एल हा प्रत्यय जोडला जातो त्या शब्दाने निर्देशित केलेली वस्तू ही थेट ईश्वराकडून निर्माण केली आहे असे मानले जाते.
उदा. मायकेल हा देवदूत. मायेक = कोण आहे सारखा?
एल = ईश्वर
म्हणजे कोण आहे देवासारखा सर्वशक्तीमान?
3 May 2016 - 10:33 pm | विजय पुरोहित
बाकी शेवटच्या 2 परिच्छेदांशी सहमत. असल्या घाणेरड्या, नीच, स्वार्थी प्रथा बंदच व्हायला हव्यात.
3 May 2016 - 10:41 pm | विजय पुरोहित
नव्या बायबलमधील सेंट मॅथ्यूज गाॅस्पेलमध्ये येशूच्या क्रूसिफिक्शनचे वेळीस तो एलोई एलोई लमा सबख्तनी असे उद्गार काढतो. म्हणजे:
हे ईश्वरा तू माझा त्याग का केलास?
3 May 2016 - 10:53 pm | शिवोऽहम्
देवाच्या नावांत 'एलोहिम' हा शब्द हिब्रु बायबलच्या जुन्या करारात आलेला आहे. विशेष म्हणजे एकेश्वरवादाचा पुरस्कार करणार्या धर्माचा हा शब्द अनेकवचनी आहे.
या एवढ्या क्षीण सुतावरून डॅन ब्राऊनच्या 'लॉस्ट सिंबॉल' मध्ये नोएटिक सायन्सचा, फ्रीमेसनरीवर आधारीत तथाकथित स्वर्ग उभा केला आहे.
3 May 2016 - 11:16 pm | गामा पैलवान
विजय पुरोहित,
मला यावरून अल्ला हा शब्दही एल सारखा वाटू लागलाय.
आ.न.,
-गा.पै.
4 May 2016 - 12:30 am | शिवोऽहम्
कारण मूळ संज्ञा 'अल् इलाही' अशी आहे. यावर बरीच भवति न भवति चर्चा धर्ममार्तंडांनी केलेली आहे. असाही एक प्रवाद आहे की अल्लाह हा शब्द जुन्या अल् लत् नावाच्या अरेबियन देवतेशी संबंधित असावा, याला कारण म्हणजे प्रेषित महंमदाच्या तोंडी सैतानाने घातलेली काही वचने. या सगळ्या प्रकरणाला 'किस्सा अल-घरानिक्' किंवा सैतानाची वचने (Satanic Verses) म्हणून ओळखतात.
3 May 2016 - 10:29 pm | प्रचेतस
येल्लम्मा देवीचे प्रचलन झाडावरुन आले असायची शक्यता आहे. कारण येल्लमेचा नवस फ़ेडताना एका समूहाला मी स्वत: पाहिले होते ज्यात त्या मुलीला झाडाच्या पाना फ़ांद्यांनी सम्पूर्ण अंग आच्छादून वाजतगाजत आणले जात होते. जणू ती मुलगी हे एक झाडच होते.
3 May 2016 - 10:40 pm | शिवोऽहम्
याला 'लिंब नेसवणे' म्हणतात..
3 May 2016 - 10:50 pm | प्रचेतस
धन्यवाद.
लिंब नेसवणे हे विशिष्ट नाव माहीत नव्हते.
4 May 2016 - 10:59 am | गणामास्तर
येल्लम्मा वर एक प्रकरण आहे अनिल अवचटांच्या 'संभ्रम' पुस्तकात. त्यात त्यांनी देवदासी प्रकारावर बऱ्या पैकी प्रकाश टाकलाय. कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागात अजूनही येल्लम्मा चे प्रस्थ आहे.
4 May 2016 - 12:59 pm | अभ्या..
कोल्हापूर, सांगली, मिरज, सोलापूर आदी भागातील वेश्याव्यवसायात सौन्दत्तीच्या बर्याच देवदासी असतात असे ऐकून आहे. सोलापूर भागात यल्ल्लव्वा, यल्लम्मा देवीची अनेक मंदिरे आणि असंख्य भाविक आढळतात. बर्याच कानडी भाषिकात यल्लव्वा, यल्लालिंग हे नाव सुध्दा आढळते.
(लेखाच्या शीर्षकावरुन मला सोलापूरातील जुन्या पिढीतले गाजलेले पोस्टर आर्टिस्ट यल्ला दासी यांची आठवण झाली. ते दोघे होते. त्यांची आडनावे यल्ला आणि दासी अशी होती. बहुधा पद्मशाली समाजाचे ते. आंध्रातले)