(अमेरिकेच्या वायोमिंग राज्यातील अगदी ग्रामीण भाग. एक छोटंसं शहर. सन 2016. गावापासून थोडंसं लांबच असलेलं एक उदासवाणं, काळोखं दिसणारं जुनाट पद्धतीचं घर.)
दारावरची बेल वाजते. श्री. स्टीफन्सन जाऊन दार उघडतात. समोर एक हसतमुख, उमद्या व्यक्तिमत्वाचा डिलीव्हरी बॉय उभा आहे. तो त्यांच्या हातात तत्परतेने एक पार्सल देतो. श्री. स्टीफन्सन यांना अपेक्षित वस्तु पोहोचलेली आहे. त्याला पाहून ते मंदस्मित करतात. डिलीव्हरी बॉय पावतीवर त्यांची स्वाक्षरी घेतो आणि लगेच माघारी वळतो. लगोलग श्री. स्टीफन्सन घरात येतात आणि त्या वस्तूला लावलेली वेष्टणे अधीरपणे फाडून टाकतात. आत त्यांनी मागविलेलं एक काळ्या मुखपृष्ठाचं पुस्तक असतं. “The Coming of Anti-Christ”
बाहेर लांब नजर जाईल तिथपर्यंत मक्याचं शेत दुपारच्या मंद मंद वा-यावर डुलतंय. घरात दोन्ही लहान मुलं कोचावर बसून Tom & Jerry बघत आहेत. त्यातले कर्कश्श्य आवाज कानाला नकोसे वाटतात. तिथेच खुर्चीवर बसून श्री. स्टीफन्सन यांची पत्नी एक विणकामाचं मॅगझीन घेऊन त्यातील डिझाईन्स उत्सुकतेने पाहात आहे. अशा वेळीस ते धडाधड जिन्यावरुन वरच्या मजल्यावर जाऊन आपल्या बेडवर निवांत पुस्तक वाचत पडतात.
गेल्या कित्येक महिन्यांपासून त्यांना कसलातरी संशय येतोय. त्यांच्या सर्वात लहान मुलाचा. खग्रास सूर्यग्रहणाच्या दिवशीच त्यांच्या पत्नीला प्रसूतीवेदना सुरु झालेल्या होत्या. तेव्हांच त्यांच्या मनात काहीतरी संशयाची पाल चुकचुकलेली होती. प्रसूतीदरम्यान अनेक गुंतागुंती होऊन त्यांची पत्नी आणि नवजात अर्भक यांचे प्राण अगदी आश्चर्यकारकपणे वाचलेले होते. त्यांचं मन त्यांना सांगत होतं की ते नवजात अर्भक वाचणं शक्य नव्हतं. तरी पण काहीतरी अघटीत घडलेलं होतं. कुणीतरी त्याला वाचवलेलं होतं.
त्यानंतरच्या चार वर्षांत त्यांचा समज अधिकाधिक पक्का होत गेला. त्यांचा सर्वात लहानगा मुलगा जेम्स. चार वर्षे वयाच्या मानाने अनेकपट ताकद असलेला. निळ्याशार डोळ्यात एक वेगळ्याच प्रकारचे संमोहन असलेला. त्याला फार वेळ उचलून कडेवर घेणे कुणालाही शक्य होत नसे. प्राण्यांना वगैरे मारताना तो फार क्रूर होत असे. श्री. स्टीफन्सन यांनी त्याचा अनेक वेळा अनुभव घेतलेला होता. बरोबरीच्या मुलांना पण तो निर्दयपणे, अमानवी शक्तीने बदडून काढत असे. शेवटी अनेक तक्रारी झाल्यावर त्याची शाळेतून हकालपट्टी करण्यात आली.
यानंतर मात्र ज्या मुलांनी जेम्सची तक्रार केलेली होती त्या सर्वांचा अचानकपणे गूढ मृत्यू घडून येऊ लागला. कुणाला काहीच सांगता येईना की हे काय घडत असावं? संशयाची सुई अर्थातच स्टीफन्सन कुटुंबियांकडे वळली. पण आजच्या काळात अर्थातच witch hunting करता येणं शक्य नव्हतं. पण शेवटी गावाने त्यांना वाळत टाकलंच. श्री. स्टीफन्सन यांची पत्नी या घटनांनी भ्रमिष्ट अशी होऊन स्वतःच्याच कसल्यातरी काल्पनिक विश्वात राहू लागली.
आताशी उन्हे उतरुन सावल्या लांब पडू लागलेल्या होत्या. खोलीत दाटलेल्या अंधाराप्रमाणे श्री. स्टीफन्सन यांच्या मनात देखील अंधार दाटलेला आहे. पुस्तकात लिहिलेलं सत्य आहे तर! सैतानाचं पृथ्वीवर येणं कुणीच रोखू शकणार नाही! जेम्सचं एकंदरीत वर्तन, ग्रहणातील जन्म, शरीरावरील चिह्ने, त्याची अमानवी ताकद सारं सारं काही एकाच गोष्टीकडे इशारा करतंय.
श्री. स्टीफन्सन सावकाशपणे बेडवरुन उठतात. काहीतरी ठाम निश्चय त्यांच्या डोळ्यात दिसतोय आता…
***
अमावस्येची एक वादळी रात्र. अवकाळी आलेल्या पावसाने लोक चिडीचूप आपल्या घरात शांत बसलेले आहेत. बाहेर वेड्यासारखी वीज कडाडतेय. वेगवान वा-यामुळं मक्याचं शेत अंगात आलेल्या बाईसारखं अस्ताव्यस्त घुमत आहे. पावसाचे मोठमोठे थेंब कोसळत आहेत. लाईट्स पण गेलेत कधीचे. श्री. स्टीफन्सन यांच्या घरात मेणबत्त्यांच्या मिणमिण प्रकाशाचं वर्तुळ सोडलं तर बाकी अंधारच आहे सर्वत्र.
श्रीमती स्टीफन्सन सकाळीच थोरल्या मुलास घेऊन आपल्या आईला भेटायला गेलेल्या आहेत. श्री. स्टीफन्सन यांनीच तिला आईला भेटून येण्याचा आग्रह केलेला आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत ती येईल. तोपर्यंत त्यांना जेम्सला सांभाळायचं आहे. जेम्सला याने विशेष फरक नाही पडत. आजपर्यंत आईशिवाय राहण्यास तो कधीच घाबरलेला नाहीये. अंधा-या खोलीची पण त्याला कधीच भीति वाटलेली नाहिये. पण आज संध्याकाळी तो जरा अस्वस्थच वाटतोय. श्री. स्टीफन्सन यांनी त्याला तीव्र गुंगीचं औषध दिलंय जेवणातून. तो आता पूर्णपणे बेशुद्धावस्थेत आहे.
श्री. स्टीफन्सन त्याला ओढत ओढत घेऊन तळघरात जातात. तेथील पाय-यांवर त्याचे अचेतन पाय थडाथडा आदळतात. पण बाहेरच्या वादळवा-याच्या जोरदार आवाजापुढे तो आवाज फार क्षीण ठरतो. एकेकाळी या तळघरात फक्त खेळाचं साहित्य ठेवलेलं असायचं. पण आता त्याचा वापर श्री. स्टीफन्सन एका वेगळ्याच कामासाठी करतात. तिथे येण्याची परवानगी कुणाकुणालाच नाहीये. फार काय, त्या तळघराची एकमेव चावी सतत त्यांच्याच खिशाला असते.
तळघरात आता सर्वत्र काळ्या मेणबत्त्यांचा अभद्र प्रकाश पसरलाय. त्या अंधुक प्रकाशात भिंतीवरील हिडीस, ओंगळ तसबीरी अजूनच भयाण दिसताहेत. दूर भिंतीला खेटून एक वेदी उभी केलेली आहे. वेदीवर पूर्ण काळं वस्त्र अंथरलेलं. त्यावर एक भयानक, अमानवी दिसणारी सैतानाची पारंपारिक स्वरुपाची मूर्ती. तिच्यापुढे त्यांच्या स्वतःच्या ताज्या रक्ताचा पंचकोणी तारा त्यांनी आखलेला आहे. शेजारी पशु कापायचा एक मोठा धारदार सुरा आणि रक्त जमा करायला पसरट भांडं. श्री. स्टीफन्सन वेदीवरील Satanic Bible उघडून त्यातील दुष्ट शक्तींच्या आवाहनाचे मंत्र वाचू लागतात. जेम्सची मान त्यांनी डाव्या हाताने पंचकोनावर दाबून तिच्यावर उजव्या हाताने सुरा लावून ठेवलेला आहे. तो मंद प्रकाश, बंद खोलीतील धुपाचा दरवळ, मंत्राचे धीरगंभीर गुंजन…
हळूहळू ते ट्रान्स अवस्थेत प्रवेश करु लागतात.
हे सगळं करणं त्यांना फारच सोपं गेलंय. थोडासा मानसिक बिघाड झालेला मुलगा योग्य मार्गावर आणणं काही अवघड नव्हतं त्यांना. पण त्यांनीच त्याच्यातील सैतानी शक्तीच्या बातम्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. आपल्या पत्नीलाही कसलीतरी जडीबूटी खायला घालून त्यांनी भ्रमिष्ट करुन ठेवलंय. जेम्सच्या लहानग्या मित्रांचे खून देखील त्यांनीच अघोरी शक्तींच्या सहाय्याने घडवून आणलेले आहेत. जन्मतःच अतिशय ताकदवान असलेला हा मुलगा आपल्या सैतानी स्वामीला अर्पण करण्याची संधी गेले अनेक महिने ते शोधत आहेत. आज ती वेळ आलेली आहे. मंत्रोच्चार संपतात आणि त्यांचा सुरा धरलेला उजवा हात वर जातो.
इतक्यात प्रचंड वेगानं त्यांचं डोकं गरगरतं. हातातील सुरा गळून पडतो. दोन्ही हात डोक्यावर दाबून धरुन श्री. स्टीफन्सन मागे वळून पाहतात. आश्चर्य साकळलेले त्यांचे डोळे मोठे मोठे झालेले आहेत. मागे त्यांची पत्नी बार्बरा हातात एक हॉकीस्टिक घेऊन उभी आहे. सोबत तिची आई.
“माझ्या आईला वाटलेलंच होतं तू असलं काहीतरी करणार म्हणून. तिला तसा संशय ब-याच दिवसांपूर्वी आलेला होता. म्हणून तिनं मला दुपारीच परत निघण्याची घाई केली.”
त्या दोघी एकमेकींकडे बघून सूचकतेने हसल्या.
“शेवटी मी जन्म दिलाय त्याला. तुला असं काहीतरी कसं करु देईन?”
डोक्यातील प्रहाराच्या वेदना श्री. स्टीफन्सन यांच्या सर्व शरीरभर पसरत आहेत. रक्त डोळ्यात उतरु लागलंय. बेशुद्धीनं त्यांचा पुरता ताबा घेण्यापूर्वी त्यांनी बार्बराच्या तोंडून शेवटचे एकच वाक्य ऐकलेः
“त्याचा बळी माझ्या हातूनच जाणार आहे मूर्खा….”
प्रतिक्रिया
13 Apr 2016 - 4:29 pm | मराठी कथालेखक
कथा चांगली आहे, पण वर्तमानकाळ आणि भुतकाळाचं मिश्रण झालंय.
13 Apr 2016 - 4:32 pm | विजय पुरोहित
धन्यवाद. हा पहिलाच प्रयत्न आहे अशा प्रकारे लिहिण्याचा. वर्तमानकाळ वापरुन कथा अधिक प्रत्यक्ष घडते आहे असे वाचकाला वाटेल असा अंदाज होता. अशा वेळीस स्वसंपादन असायला हवे होते ही गरज फार अधोरेखित होते.
13 Apr 2016 - 4:43 pm | मराठी कथालेखक
पण एकूणातच कथा भूतकाळ वापरुन सांगितली तरच चांगली वाटते असं मला वाटतं कारण आपण एकदा 'घडलेली' गोष्ट सांगत असतो. ती पुन्हा पुन्हा घडत नसते.
साहित्याप्रकारांचा औपचारिक अभ्यास केलेले इथे काही मार्गदर्शन करु शकतील का ?
13 Apr 2016 - 7:50 pm | अभ्या..
आदूबाळ, गवि, विशाखा पाटील आणि अतिवासताई.
औपचारिक नसतील कदाचित पण अभ्यास दांडगा
15 Apr 2016 - 5:50 pm | विजय पुरोहित
साहित्याप्रकारांचा औपचारिक अभ्यास केलेले इथे काही मार्गदर्शन करु शकतील का ? मान्यवरांच्या मार्गदर्शनाच्या अद्याप प्रतिक्षेत!
15 Apr 2016 - 6:13 pm | DEADPOOL
पण एकूणातच कथा भूतकाळ वापरुन सांगितली तरच
चांगली वाटते असं मला वाटतं कारण आपण एकदा
'घडलेली' गोष्ट सांगत असतो. ती पुन्हा
पुन्हा घडत नसते.
साहित्याप्रकारांचा औपचारिक अभ्यास केलेले इथे काही
मार्गदर्शन करु शकतील का ?>>>>>>>>>
आपल्या जिलब्या टाकताना एवढा विचार करायला पाहिजे. जरा चांगल्या कथा तरी येतील.
15 Apr 2016 - 6:21 pm | मराठी कथालेखक
माझ्या कथा/लेखांविषयी बोलायचं असेल तर त्या धाग्यावर प्रतिसाद द्यावेत. उत्तर मिळेल.
13 Apr 2016 - 4:33 pm | राजाभाउ
भारीच
ट्विस्ट वर ट्विस्ट. माझंच डोकं गरगरतय आता :)
13 Apr 2016 - 5:39 pm | बाबा योगिराज
काहीतरी वेगळं लिहिन्याचा प्रयत्न आवडला.
छान.
13 Apr 2016 - 5:58 pm | नीलमोहर
Anti-Christ वाले बरेचसे चित्रपट डोळ्यांसमोरून तरळून गेले.
13 Apr 2016 - 7:34 pm | सिरुसेरि
"द स्केलेट्न की" ची आठवण झाली .
13 Apr 2016 - 7:47 pm | टवाळ कार्टा
सुरुवात अगदी ६६६ सरखी सारखी वाटली :)
13 Apr 2016 - 8:37 pm | मानसी१
नाही कळली ब्वा !!
आई पण त्या लहान मुलाचा बळी देणार का?
14 Apr 2016 - 3:23 pm | मराठी कथालेखक
बरोबर.. म्हणजे कळली आहे ना तुम्हाला
14 Apr 2016 - 11:45 am | DEADPOOL
______/\_______
ट्रीपल ट्विस्ट.
अजून येऊ द्या!
15 Apr 2016 - 9:08 pm | विजय पुरोहित
धन्यवाद साहेब!!!
14 Apr 2016 - 5:38 pm | उगा काहितरीच
खतरनाक... !
14 Apr 2016 - 7:19 pm | जव्हेरगंज
कथाबीच एकदम जबरदस्त आहे!
मांडणी थोडी ठिकठाक केली तर फार दमदार कथा होऊन जाईल !!
वर्तमानकाळ आणि भुतकाळाचं मिश्रण>>> हो यामुळेही थोडं अडखळायला झालं !!
15 Apr 2016 - 11:34 am | विजय पुरोहित
धन्यवाद जव्हेर भाऊ...
14 Apr 2016 - 8:07 pm | विद्यार्थी
लै भारी!
15 Apr 2016 - 2:42 pm | पद्मावति
मस्तं! शेवटचा ट्विस्ट जबरदस्त.
15 Apr 2016 - 2:59 pm | गणामास्तर
छान आहे कथा.
मला राहून राहून शेवटी रत्नाकर मतकरींची 'कळकीचे बाळ' ही कथा आठवत होती.
15 Apr 2016 - 3:57 pm | राजेंद्र मेहेंदळे
मस्त जमलेय कथा
15 Apr 2016 - 4:10 pm | mugdhagode
एक थी डायन
15 Apr 2016 - 4:26 pm | ब़जरबट्टू
जमलीये, ट्विस्ट थोडे जास्त वाटले..
15 Apr 2016 - 5:05 pm | असंका
अरे देवा!...अघोरी!!
काय हे मांत्रिक महाराज!!
15 Apr 2016 - 6:44 pm | भाग्यश्री कुलकर्णी
जबरदस्त
17 Apr 2016 - 10:25 am | विजय पुरोहित
सर्व वाचक व प्रतिसादक यांना धन्यवाद!!!
17 Apr 2016 - 10:40 am | इडली डोसा
आणि
ये बात कुछ हजम नही हुई!
पण मस्त अघोरी कथा!
17 Apr 2016 - 10:40 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
ल्हान मुलगा आणि अमानवी शक्ती वगैरे वाचुन द ओमेन सिरीजची आठवण झाली. छान जमलिये.