चिंगी

कविता१९७८'s picture
कविता१९७८ in जनातलं, मनातलं
16 Jan 2016 - 5:29 pm

मी नाही जाणार शाळेत......... नाही नाही म्हणजे नाही, काय ते आपलं सारखं अभ्यास करायचं, दिवस भर त्या शाळेत कोंडुन घ्यायचं ते? कशासाठी गं आई. तुम्ही जाता का? इथे मस्त मज्जा करता घरात बसुन, टी.वी. काय बघता, गप्पा काय मारता सगळे आणि मला तिथे शाळेत डांबुन ठेवता. एक तर रोजची कटकट ती सक्काळी लवकर उठुन शाळेत जा आणि मग दुपारी येउन ट्युशनला जा मग तिथनं येउन पुन्हा कराटे क्लासेस, अबॅकस क्लास मग घरी येउन अभ्यास. पुर्ण दिवस हेच चालु असतं, मी थकते गं आई. कीती तो अभ्यास करायचा. मला नाही गं आवडत अबॅकस, इथे शाळेत गणितात कशीबशी पास होते मी आणि तुझं आपलं काय मला अबॅकस शिकवायचं वेड देवाला माहीत. देव पण अस्साय ना आम्हा लहान मुलांवर असा अन्याय करत असतो बघ, खेळुन सुद्धा देत नाही धड.

हे असे मोठ्ठे लोकं आमच्या माथी मारलेत. सारखी नजर ठेवुन असतात, जरा काही कार्टुन पाहायला गेले की आलेच धावत म्हणुन समजा. पण बघा आता कार्टुनच अशी मजेशीर बनवलीत ती ही आम्हा छोट्यांसाठीच ना? मग? पाहा तो डोरेमॉन कीत्ती कीत्ती छान, त्या लोबीताची तर नुसती ऐश आहे ऐश. लोबिताला जे हव्वं ते सगळं मिळतं त्या डोरेमॉन कडुन, नाहीतर तु आणि बाबा काही मागितलं तर डोळे मोठ्ठे करतात. काय हे अगं. निदान ते डोरेमॉन. हगेमारु , शिशिमारु सारखं कुणाला घेउन या जे माझा अभ्यास करतील , मला हसत खेळात अबॅकस शिकवतील, परीक्षेच्या वेळी माझी स्मरण शक्ती वाढवतील, माझ्या दप्तराचा बोजा उचलतील. माझा सगळा होमवर्क करतील. पण नाही सगळं मलाच करावं लागतं , लहान मुलीवर दयाही येत नाही तुम्हा घरच्यांना. जरा काही नुडल्स खावेसे वाटले की बाबा रागवतात , घरचंच खायचं म्हणतात. अगं रोजच खातो की घरचं, त्यात नवीन अशी चव काये??? नुडल्स कीत्ती चविष्ट लागतात म्हणुन सांगु, ह्म्म्म पण त्याबरोबर तो लालेलाल तिखट असा रस्सा असतो तो नाही आवडत. डोळ्यातुन पाणी यायला लागत माझ्या. पण त्यावर लगेचच आईसक्रीम खाल्लं की कीती बरं वाटतं म्हणुन सांगु. पण तुझं आपलं नेहमीचच सर्दी होते ताप येतो. असं काही नसतं , आईस्क्रीम खाउन जर सर्दी आणि ताप आला असता तर मग मग तो आईस्क्रीम विकणारा भय्या तर हॉस्पीटल मधेच राहत असता. उगा आपलं काहीतरीच , लहान मुलांना घाबरवायचं ते.

ह्म्म भरते हो दप्तर, काय मेलं ते रोजचं काम, रोज दप्तर भरा, काय गरज आहे त्याची, सगळी पुस्तके शाळेतच नाही का ठेवता येत? त्या टीचर कुठे घरी घेउन जातात दप्तर? काही जड सामान त्या नेत नाही घरी आणि आम्ही मात्र रोज बोजा न्या. आणि होमवर्क केला नाही तरी बाई मारतात? त्या निशा मॅडम आहेत ना त्याच नेहमी रागावत असतात , काय माहीत त्यांचा प्रॉब्लेम काये तो... मधेच त्यांचा फोन काय वाजतो, सारख्या रागावत असतात त्या फोनवर आणि फोन ठेवला की आमच्यावर. तश्या त्या चांगल्या आहेत , अधुन मधुन बाजुच्या वर्गाच्या सरांकडे गप्पा मारायला जातात तेव्हा इतकी मज्जा येते आम्हाला. मोकळा वेळ मिळतो ना , मग आम्ही लगेचच गप्पा मारायला लागतो. माझ्या बाजुला शलाका बसते. कित्ती कीत्ती आवडते ती मला, आम्ही दोघी एकाच बेंचवर बसतो, ती डब्यात छान छान खाउ आणत असते, कधी केक, तर कधी कुकीज, कधी मॅगी तर कधी ब्रेड आणि जॅम. कीती वेगवेगळे पदार्थ करुन देते तिची आई तिला. कीती चांगली आहे ना तीची आई. शलाका मला रोज डब्यातलं खायला देते, तिच्याकडे काय एकेक पेन्सिली असतात म्हणुन सांगु आई तुला, आणि खोड रबर आणि शार्पनरची तर रास आहे तिच्याकडे. वेगवेगळ्या आकाराचे आणि सुगंध असलेले, तु तर मला साधासा कॅम्लीनचा पांढरा वास नसलेला खोडरबर देतेस तो ही जुना, मळका आणि दादाने त्यात करकटक घुसवुन त्याला होल पाडलेला असा. मलाही नवीन खोडरबर हवाय.

अगं मी काय सांगत होते त्या अंजली मॅडम आहेत ना त्यांचा तास आम्हाला आवडतो. छान आहेत , आम्हाला चित्रकला शिकवतात. कीती मज्जा येते म्हणुन सांगु, अज्जिबात मारत नाहीत की रागवत ही नाहीत. रंग कसे भरायचे ते मस्त शिकवतात त्या. आहेत ही मस्त गोलु गोलु - गोबर्‍या गोबर्‍या. पुर्ण वर्गाला खुप खुप आवडतात त्या. नेहमी हसवत असतात आम्हाला. आणि ते इशान सर आम्हाला पी.टी. शिकवतात. तेही मस्तच आम्हाला ग्राउंडवर जायला मिळतं. लंगडी, कबड्डी , खो - खो खेळायला मिळतं, काय मज्जा येत म्हणुन सांगु. पण त्या सुरंगी मॅडम आहेत ना त्या नाही का गणित शिकवत, कंटाळा येतो गं आई गणिताचा. सारखं आपलं बेरीज आण वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. आता मला सांग वजाबाकी करताना एक प्रश्न विचारला मॅडमना तर त्यांनाच उत्तर येत नव्हतं म्हणुन त्यांनी मला मारलं. अगं त्या विचारत होत्या पाच पक्षी आहेत त्यातले २ पक्षी उडुन गेले तर कीती पक्षी उरले?? तर मीच त्यांना प्रश्न विचारला अहो मॅडम पण ते पक्षी गेले कुठे?? तर ती मागची भुमी हसायला लागली आणि मॅडमने मला धपाटा दिला एक. काय सांगु यांना स्वत:ला काही येत नाही आणि आम्हाला मारतात, आम्ही लहान ना त्यांना माहीतीये आम्हाला मारलं की आम्ही पुन्हा प्रश्न विचारणार नाही ते. असुदे पण त्या भुमी मुळे मार मिळालाय न मला , आता बघतेच तिला, उद्या रीसेस मधे बरी मागुन तिची शेंडीच ओढते, लागु दे तिला बरं, नाही तर काय कुणी सांगितलं होतं चुगली करायला. ती हसली नसती तर मॅडमने मला मारलं नसतं ना.

जिग्नेश सर आम्हाला इंग्रजी शिकवतात. काय हुश्शार आहेत म्हणुन सांगु. आणि कीती मस्त शिकवतात. नाही समजलं तर पुन्हा समजावतात. त्या बाणे मॅडम भुगोलवाल्या कीती बोलतात त्या, काही कळत नाही सर्व डोक्यावरुन जातं, खारे वारे कुठुन वाहतात म्हणे , आता आम्हाला काय माहीत कुठुन वाहतात ते? आणि काय वारे आपल्याला डोळ्याने दिसतात का तर समजेल की कुठुन आले आणि कुठे चाललेत ते. काल पियुशाला मारलं त्यांनी काय तर म्हणे खंडा बद्द्ल माहीती द्या. नावे सांगा. बिचारी पियुशा ती म्हणाली "मॅडम मला श्रीखंडा बद्द्ल माहीती आहे , आमच्या घरी कालच श्रीखंड पुरी केली होती". तर दिला एक धपाटा बाणे मॅडमनी. आता काय चुकलं त्यात मला ही श्रीखंड खुप खुप आवडतं मी तर चापुन जेवते मस्त. बाणे मॅडमना आवडत नसेल श्रीखंड म्हणुन राग काढला पियुवर. बिच्चारी पियु. मला बसमधे रोज जागा देते शेजारी. आई उद्या कर ना श्रीखंड पुरी नाहीतर ब्रॅड बरोबर तरी दे श्रीखंड आणि जास्तच दे गं पियुशा ला पण देईन. जोशी सर भौतिकशास्त्र शिकवतात. काही कळ्ळ्त नाही मला , सगळं डोक्यावरुन जातं. काय तो विषय आहे का? भौतिक नाव ऐकुनच कंटाळा येतो काय अभ्यास करणार. जाउदे विज्ञान हा विषयच आवडत नाही मला , नावच नको त्याचं.

हो बसते होमवर्क करायला , आधी कुठल्या विषयाचा होमवर्क करु?? हम्म्म्म.. मला नं हिंदी विषय खुप आवडतो. साधा नि सोप्पा. आम्हाला नं जय सर हिंदी शिकवतात. एवढं मस्त शिकवतात म्हणुन सांगु, आम्ही अधे मधे गप्पा मारल्या तरीही काही बोलत नाहीत. सर खुप चांगले आहेत आमचे. आणि भीम आणि चुटकी पण हिंदीतच तर बोलतात. कीती मस्त वाटतं ऐकायला. आणि तो आपला दुधवाला भैया नाही का हिंदीमधे बोलत, काल मला म्हणाला "गुडीया , कौनसी इस्कुल मा पढत हौ ? मी सांगितलं त्याला "अरे भैयाजी, वो नाके पे बसस्टॉप के सामने से जो रोड जाता है ना उसके डावे साईड्लाच है माझं स्कुल. लग्गेच समजलं त्याला, मग काय आहेच मी हुश्शार हिंदी मधे. आजकाल तर मी आजीलाही हिंदी शिकवत असते. पण तीला जमतच नाही काही. हम्म्म हिंदी झाल्यावर कुठल्या विषयाचा अभ्यास करावा बरं........... , चित्रकला!!! वाह मस्त आयडीया. बाकीचा होमवर्क उद्या गणिताच्या तासाला मागे बसुन पुर्ण करते. जाउदे आधी दप्तर भरते मग करते बाकीचं. अंं.. भुक लागलीये. आई आधी जेवायलाच वाढ कसं , जेवते आणि टी.वी. बघुन झोपते, उद्या सकाळी लवकर उठुन दप्तर भरेन गं आई. काय गं आई. नेहमी ओरडत असतेस. ज्जा मी नाही बोलणार तुझ्याशी...... कट्टी.

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

बोका-ए-आझम's picture

16 Jan 2016 - 9:42 pm | बोका-ए-आझम

दिवाकरांच्या चिंगी चा पुढचा भाग!

पैसा's picture

16 Jan 2016 - 11:00 pm | पैसा

नाट्यछटा आवडली! खूपच छान आहे!

एक एकटा एकटाच's picture

17 Jan 2016 - 6:27 am | एक एकटा एकटाच

मस्तय

स्नेहश्री's picture

17 Jan 2016 - 8:46 am | स्नेहश्री

Wow. Mast ch. Khup diwasani natyachata form vachanat ala

मुक्त विहारि's picture

17 Jan 2016 - 9:41 am | मुक्त विहारि

मस्त....

कवितानागेश's picture

17 Jan 2016 - 10:00 am | कवितानागेश

हेहेहे!

सस्नेह's picture

17 Jan 2016 - 2:19 pm | सस्नेह

गोड.

अजया's picture

17 Jan 2016 - 4:14 pm | अजया

छान लिहिलंय.काश अशा चित्रकलेच्या मॅडम आम्हालाही असत्या ;)
रागवणार्या मॅडमना एक प्यारभरी झप्पी द्यायची ना चिंगीने!उगाच रागवत नसतील ;)

अर्रर्र पियुशाने मार खाल्ला च च च ;(

Maharani's picture

17 Jan 2016 - 10:08 pm | Maharani

Mastach...majja aali vachatana

भिंगरी's picture

17 Jan 2016 - 10:24 pm | भिंगरी

मस्तंच लिहीलंय

इशा१२३'s picture

17 Jan 2016 - 10:55 pm | इशा१२३

मस्तच आहे चिंगी. आवडली .

अदि's picture

18 Jan 2016 - 1:21 pm | अदि

छान !!

पद्मावति's picture

18 Jan 2016 - 3:43 pm | पद्मावति

मस्तं आहे.

मी-सौरभ's picture

19 Jan 2016 - 6:07 pm | मी-सौरभ

आवडेश