काटा वजनाचा -२
असे म्हणतात कि पोटाचा प्रश्न सुटला कि सुटलेल्या पोटाचा प्रश्न सुरु होतो.
तेंव्हा आपल्या पोटाचा घेर किती असावा हे अगोदर लिहिलेले आहे. भारतीय वंशाच्या लोकांसाठी कमरेचा जास्तीत जास्त घेर हा पुरुषांसाठी ३५ इंच आणी स्त्रियांसाठी ३१. इंच हा आहे.हा घेर आपण जेथे प्यांट घालतो त्या कमरेच्या हाडाच्या जरासा वर मोजला पाहिजे आणी हा पोटाचा सर्वात (पुढे येणारा) पुरोगामी भाग यावर मोजला पाहिजे. यापेक्षा जास्त घेर असणार्यांना मधुमेह आणी हृदयविकार याचा जास्त धोका संभवतो.
जाता जाता -- पूर्वी लोक बर्याच दिवसांनी भेटले कि "उरा उरी" भेटत असत
आता "उदरा उदरी" भेटतात
आता एक दुसरे महत्त्वाचे परिमाण म्हणजे कंबर आणि पार्श्वभाग याचे गुणोत्तर (WAIST TO HIP RATIO).
यात आपण कंबरेचा घेर वर म्हटल्याप्रमाणे मोजतो आणी पार्श्वाभागाचा घेर सर्वात जास्त जेथे आहे तेथे मोजला जातो.
हे गुणोत्तर पुरुषांसाठी जास्तीत जास्त १.० असावे
आणी स्त्रियांसाठी ०.९ असावे
स्त्रियांसाठी -- ३६:२४:३६ हि आदर्श कमनीय आकृती समजली जाते. यामध्ये हे गुणोत्तर ०. ६६ असते हे लक्षात घ्या
म्हणजे आपला पार्श्व भाग जर ३६ असेल तर आपली कंबर ३२. ४ किंवा कमी असणे आवश्यक आहे
२४ म्हणजे किती कमी ते लक्षात घ्या. संस्कृत साहित्यात सिंहकटी किंवा कृशोदरी हि वर्णने येतात.
उष्मागतीकीच्या प्रथम सिद्धांता प्रमाणे ( FIRST LAW OF THERMODYNAMICS) प्रमाणे उर्जा हि निर्माण करता येत नाही किंवा नष्ट हि करता येत नाही. तिचे फक्त स्वरूप पालटते. आईन्स्टाइन च्या सिद्धांताप्रमाणे वस्तुमान आणी उर्जा यांचे एकामेकांत रुपांतर करता येते.
याचा अर्थ काय आहे. हवा खाऊन किंवा काहीही न खाता आपले वजन वाढणे शक्य नाही.
आपल्या बँकेत आपला पगार किती येतो आणी आपण खर्च किती करतो यावर ( आय आणी व्यय याच्या विनिमयानुसार) बँकेत शिल्लक किती राहील हे ठरते. तसेच आपण किती खातो आणी किती उर्जा खर्च करतो यावर आपल्या शरीराचे वजन अवलंबून असते हा साधा विचार आहे.
याचा अर्थ असा कि आपले वजन जर जास्त असेल तर आपण जास्त खात आहात किंवा आपला व्यायाम पुरेसा होत नाही किंवा बहुतकरून दोन्ही
एक मुलभूत प्रश्न असा आहे कि वजन कमी का करायचे? का एवढे कष्ट करायचे? उपाशी राहायचे आणी व्यायामहि करायचा?
पहिली गोष्ट स्थूल माणसाना अगोदर म्हटल्याप्रमाणे केवळ हृदय विकार आणी मधुमेह्च होतात असे नाही तर पुरुषांच्या कर्करोगाने मृत्यू पावणाऱ्या लोकांच्या संख्येत १४ % लोक हे थेट लठ्ठपणामुळे कर्करोग होऊन मृत्यू पावतात आणी स्त्रियांमध्ये २० % कर्करोगाचे मृत्यू हे थेट स्थुलपणामुळे होणार्या कर्करोगाच्या संख्येत वाढ होण्यामुळे होतात.
नपुंसकता, इंद्रीयशैथिल्य आणी शीघ्रपतन हे आजार हि लठ्ठ पुरुषांत मोठ्या प्रमाणात आढळतात. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे वयाच्या ३५-४० वर्षानंतर बरेच लोक इंद्रीयशैथिल्य आणी शीघ्रपतन हे वयामुळे होते किंवा कामाच्या तणावा मुळे होते असे समजून गप्प बसतात आणी निसर्गाने दिलेल्या एका अतिशय उच्च सुखास मुकतात. बर्याच वेळेस यामुळे नवरा बायकोत एक तर्हेचा मूक असा तणाव निर्माण होतो आणी त्यांच्या आपसातील नातेसंबंधावर परिणाम होतो.
स्त्रियांच्या पाळी मध्ये अनियमितता आणी वंध्यत्व याचे लठ्ठ पण हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे. PCOS/ PCOD (POLYCYSTIC OVARIAN SYNDROME/DISEASE हे आजच्या काळात वंध्यत्वाचे एक क्रमांकाचे कारण आहे.
अतिरिक्त वजनामुळे स्त्रियांची काम वासना कमी होत नाही परंतु आपण आपल्या नवर्याला किळसवाण्या वाटत असू या विचाराने स्त्रिया सम्भोगापासून दूर राहण्याच्या प्रयत्नात असतात. शिवाय अतिवजनामुळे योनीमार्गाचा जंतुसंसर्ग जास्त झाल्याने संभोग वेदनादायक होतो या दोन्ही गोष्टींमुळे युगुलातील संबंध दुरावले जाऊ शकतात.
वाढत्या वजनामुळे माणसांची स्वतःबद्दलची प्रतिमा मलीन झालेली आढळते. त्यांचा आत्मविश्वास डळमळीत झालेला आढळतो. आता अगदी अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे कि लठ्ठ माणसाना सरासरी १०-१५ % कमी पगाराच्या नोकर्या मिळतात.
लठ्ठपणा हा स्त्रियांवर केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक पातळीवरही मोठ्या प्रमाणावर परिणाम घडवून आणतो. सुंदर दिसणे आणी सुंदर राहणे हा स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग आहे. सकाळी उठून चट्टेरी पट्टेरी चड्डी घालून विस्कटलेल्या केसांसह पुरुष पाव किंवा दूध आणायला जाताना सहज दिसतील पण केस न विन्चरता गबाळ्या पेहरावात कोणतीही स्त्री दिसणार नाही. लग्नात सुद्धा एखाद्या पार वाकलेल्या आजीबाई सुंदर साडी नेसून आलेल्या असतात पण त्यांच्या बरोबरचे आजोबा प्यांट आणी शर्टचा मेळ बसत नाही असे दिसतात
एकदा स्त्री लठ्ठ होऊ लागली कि आपण आपल्या जोडीदाराला/ नवर्याला आकर्षक दिसतो कि नाही याची शंका तिच्या मनात सतत राहते. लठ्ठपणामुळे अगोदरचे बरेचसे आवडते वेश आणी पेहराव आपल्याला घालता येत नाहीत याची खंतहि वाटत राहते. आपण कधीतरी बारीक होऊ आणी मग आपल्याला ते पेहराव घालता येतील अशी आशा बाळगून त्यानी ते पेहराव जपून ठेवलेले असतात. आणी लठ्ठ पणा एका विशिष्ट पातळीच्या पलीकडे गेला कि निराश होऊन आणी न्युनगंडाने ती आहार व्यायाम यांच्याकडे दुर्लक्ष करू लागते आणी दुष्ट चक्रात सापडते.
वजन वाढल्यामुळे आपल्या फुप्फुसांवर सुद्धा ताण येतो आणी त्यामुळे धाप लागणे दम लागणे हे विकार जडतात. टोकाची परिस्थिती म्हणजे अतिलठ्ठ व्यक्ती झोपेत श्वासवरोध होऊन २०-३० वयालाच मृत्युमुखी पडतात.
अतिरिक्त वजनाचा दूरगामी परिणाम हा आपल्या स्नायू आणी सांध्यांवर होत असल्याने स्पॉण्डायलोसीस आणी गुडघेदुखी सारखे आजार आता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत. आणी गुडघ्याच्या सांधे बदलाच्या वाढत्या शस्त्रक्रिया हे याचेच द्योतक आहे.
वजन कमी करण्याचा फायदा दुर्दैवाने ताबडतोब दिसत नाही. स्त्रिया मैत्रिणीच्या लग्नासाठी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन फेशियल (आणी इतर प्रक्रिया) करून आल्या कि पुढचे पाच सात दिवस चेहरा चमकतो. असा दृश्य परिणाम वजन कमी करण्याच्या उपायांनी दोन चार दिवसातच काय दोन चार महिन्यात सुद्धा दिसत नाही. आजच्या तडक आणी तुरंत च्या युगात असे हळू हळू काम करणारे उपाय काय कामाचे.
लष्करात गोव्याला असताना एका माहितीतील अधिकार्याची अतिविशाल पत्नी माझ्याकडे आली माझ्या समोर तब्येतीत बसली आणी डॉक्टर वजन कमी कसं करायचं असे विचारू लागली. मी जवळ जवळ अर्धा तास तिला उपाय (या लेखमालेचे सार) सांगितले. तर ती मध्येच म्हणाली, "डॉक्टर, पण याच्यावर काही गोळी नाही का?"
मी माझे वैफल्य लपवून हसून म्हणालो. दुर्दैवाने नाही.
गोव्याच्या नौसेना मुख्यालयाच्या प्रमुख अधिकार्याची पत्नी पाठदुखीसाठी माझ्याकडे एकस रे काढायला आली होती. अस्थिरोग तज्ञाने तिला वजन कमी करायला सांगितले होते. त्यावर ती मला म्हणाली डॉक्टर, "पार्टीत इतके सगळे छान छान पदार्थ समोर येतात तर त्याला नाही कसं म्हणायचं आणी किती जणांना नाही म्हणायचं ?" मी ओशाळवाणे हसून म्हणालो, "बरोबर आहे"
अशी परिस्थिती बर्याच जणांची आहे खरं.
प्रतिक्रिया
1 Jan 2016 - 8:57 pm | पद्मावति
उत्तम लेखमालीका. वाचतेय.
1 Jan 2016 - 9:03 pm | जेपी
मस्त लेख .पुभाप्र..
(32 इंची)जेपी
1 Jan 2016 - 9:21 pm | भंकस बाबा
अजुन येउद्या.
1 Jan 2016 - 9:30 pm | सर्वसाक्षी
लठ्ठ नसतानाही पोट सुटते त्याचे काय? ते कमी कसे करावे?
1 Jan 2016 - 9:42 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम लेख ! व्यावहारीक उदाहणांसह नेमके मुद्द्यांवर बोट ठेवण्याचे तुमचे कसब स्पृहणीय आहे.
1 Jan 2016 - 10:22 pm | मोगा
छान
1 Jan 2016 - 10:30 pm | खेडूत
वाचतोय...हाही भाग आवडला.
आता परत एकदा रोज चालायला जावं म्हणतोय.
1 Jan 2016 - 11:05 pm | चतुरंग
उपयुक्त लेखन.
(किंचित पुरोगामी)रंगा
1 Jan 2016 - 11:49 pm | हर_हुन्नरी
रसिक वाचकाचं लफडं असं आहे की खाद्य -संस्कृती वरचे आणि तुम्ही ज्या प्रकारचे "उदराकारनियंत्रक २१ अपेक्षित" लेख लिहित आहात असे दोन्ही प्रकारचे लेख चवीने , आवडीने वाचणारा हा वाचक आहे !!
BMI आणि BMW मिळवण्यासाठी पुष्कळ कष्ट करणे आलेच, ते कोण करील !!!
छान लेखमाला !!
…. पोटाचा सर्वात (पुढे येणारा) पुरोगामी भाग यावर मोजला पाहिजे. - अहो या शब्दाची आता भीती वाटते हो ! तुम्ही म्हणजे थेट काही जणांच्या पोटावरच … असो ;)
2 Jan 2016 - 10:58 am | मुक्त विहारि
हा पण भाग मस्त...
पुभाप्र.
2 Jan 2016 - 11:44 am | सिरुसेरि
छान लेख व महिती . याविषयावरूनच "अर्थार्जन कोणासाठी ? स्वतासाठी का डॉक्टरांसाठी ?" या माहितीपुर्ण पुस्तकाची आठवण झाली.
2 Jan 2016 - 5:44 pm | उगा काहितरीच
बापरे ! इतकं सगळं वाचलं की विचार बदलतोय . वजन कमी कराव असाही विचार येतोय मनात.
-(थोsssडासा जाड) उका
2 Jan 2016 - 5:49 pm | विवेकपटाईत
लेख आवडला.माझे हि असेच होते. मला खा मला खा म्हणणारे सुंदर खाद्य पदार्थ शिवाय दिल्लीत प्रत्येक लग्नात कमीत कमी २५-३० खाद्य पदार्थ असतातच. काय करणार - पोटावर ताबा सुटणारच. हृद्य कापून घेतले तरी पोट काही ऐकत नाही.
2 Jan 2016 - 7:46 pm | सुबोध खरे
पोटावर ताबा
नव्हे "जिभेवर" ताबा हवा
अहो बाजारात विविध वस्तू कपडे सुद्धा आकर्षक तर्हेने मांडून ठेवलेले असतात आणी २० % ते ९० % सवलतीच्या दरातहि असतात. तेथे हि अतिरिक्त खरेदी केली जाते परंतु खिशात पैसे असतील तर.
लग्नात/ समारंभात असणारे जेवण नेहमी जास्त होते याचे कारण आपल्याला तेथे पैसे भरावे लागत नाहीत.
जाता जाता -- मला एक "अचाट आणी अफाट" कल्पना सुचली.
लग्नात आहेर घेण्याऐवजी जेवायच्या पदार्थांना रोख किंमत लावायची आणी ते पैसे सार्वजनिक कामाला दान दिले जातील अशी घोषण करायची ( उदा प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा किंवा टाटा कॅन्सरला देणगी दिली जाईल).असे केले तर लोक आपले खाणे "निम्म्याने" तरी कमी करतील शिवाय अशा सेवाभावी संस्थेला देणग्याही मिळतील.
2 Jan 2016 - 11:19 pm | palambar
discovery वर " my 600 lb life" हा कार्यक्रम बघितला
कि वाटते आपण काही एवढे जाड नाही. तेवढेच
समाधान.
3 Jan 2016 - 3:34 am | रेवती
वाचतिये.
3 Jan 2016 - 9:05 am | पैसा
सुरेख चालली आहे लेखमाला. लग्नाच्या जेवणावळीचा खर्च घेऊन दान करायची कल्पना अफलातून आहे! एकूण जगातले बहुतेक आजार अन्नाचा अभाव किंवा अति उपलब्धता यामुळे आलेले दिसतात.
3 Jan 2016 - 2:35 pm | कवितानागेश
पार्टीतले पदार्थ एअर फ्रायर मध्ये बनवून ठेवायचे, असा एक आधुनिक उपाय सुचवते! ;)
3 Jan 2016 - 7:58 pm | सुबोध खरे
यात फक्त तेलाचा वापर कमी करता येईल.
पोट "थोडेसे भरेस्तोवर" खाण्या ऐवजी पोट "फुटेस्तोवर" खाणार्यांचे काय?
यामुळे मला ती कल्पना सुचली.
ती कल्पना अचाट अशासाठी आहे कारण ती अतिशय उपयुक्त असली तरी बहुसंख्य लोकांना ती अव्यवहार्य वाटणारी आहे आणि पचणारी नाही.
कारण लोकापवाद -- एक तर लग्नाला बोलावलं आणि आमच्या खाण्याचा खर्च आम्हालाच करायला लावतात. त्यापेक्षा बोलवायलाच नको होते.
माझा मूळ मुद्दा शेवटी हाच आहे कि केवळ आलोच आहोत आणि समोर पदार्थ आहेत( आपल्याला कुठे पैसे भरायचे आहेत) तर पोट भरले असेल तरीही खाऊन घ्या हि वृत्ती घातक आहे.
आपण बटर पनीर, व्हेज माखनवाला, मलई युक्त मालपुवा खातो आणि कॅलरी जास्त झाल्या म्हणून डाएट कोक पितो.
3 Jan 2016 - 7:59 pm | सुबोध खरे
पुढेच तीन दिवस मी गुजरात मध्ये कॅम्पला जात आहे तेंव्हा प्रतिसाद देणे शक्य होणार नाही. परत आल्यावर पुढे चालू करीन.
5 Jan 2016 - 3:17 pm | इरसाल
मान्यवर,
जर आपण गुजरातेत, वडोदरा स्थानी येणार असाल तर आपणास समक्ष माझ्या घरी भेटण्यास आवडेल.कुठे येत आहात (जर बडोद्यात) तर मी आपणाला घ्यायला येईन.
7 Jan 2016 - 9:01 am | सुबोध खरे
सौराष्ट्र मध्ये उपलेटा येथे गेलो होतो मुंबई राजकोट विमानाने आणि तेथून रस्त्याने ११० किमी.
त्यामुळे वडोदरा येथे येणे शक्य होण्यातील नव्हते. आमंत्रणाबद्दल धन्यवाद
4 Jan 2016 - 1:44 am | रमेश आठवले
गुजरातमध्ये गोड्या तेलाचा दर डोई खप जगात सर्वात जास्त आहे. बचके रेहना !
4 Jan 2016 - 8:16 am | सिरुसेरि
"लग्नात आहेर घेण्याऐवजी जेवायच्या पदार्थांना रोख किंमत लावायची आणी ते पैसे सार्वजनिक कामाला दान दिले जातील अशी घोषण करायची" हि कल्पना छान आहे . आजकाल लग्नामध्ये महागड्या गाड्या आहेर म्हणुन दिल्या जातात , त्याऐवजी किंवा त्यासोबत ट्रेडमिल आहेर म्हणुन देण्याची गरज आहे .
4 Jan 2016 - 12:08 pm | नाखु
प्रश्नाला हात घालणारा आणि अगदी हृदयआपासून तब्येतीत लिहिला आहे.
मी या आणि बाजीगर यांचे लेखाने प्रभावीत होऊन चालते व्हायचा चंग बांधला आहे..
आई भवानी आणि सजग मिपाकरांच्या सदिच्छांनी हा प्रकल्प सुफळ संपुर्ण होवो हीच ईच्छा.
बाळ्सेदार मुलाचा बाप नाखु
4 Jan 2016 - 3:32 pm | एस
आमेन! आमेन!
4 Jan 2016 - 6:46 pm | मानस्
वयाच्या ४०शी नंतर चयापचय (metabolism)कमी होतं असं ऐकलंय,ते खंर आहे का? मग तेंव्हा आहार कमी करण्याचा सल्ला बरच लोक देतात हे योग्य आहे?
5 Jan 2016 - 1:21 pm | स्मिता.
लेखमाला वाचतेय, अगदी माझ्याकरताच लिहिताय असं वाटतंय :(
5 Jan 2016 - 4:05 pm | सूड
माहितीपूर्ण!! पुभाप्र.
5 Jan 2016 - 5:02 pm | सस्नेह
अगदी वास्तवदर्शी लिखाण. सध्या तरी मी वजन वाढवावे कसे या चिंतेत असल्याने वाचताना करमणूक होते आहे.
11 Jan 2016 - 3:36 pm | अभिजीत अवलिया
वाचतोय. अतिशय उपयुक्त माहिती....