तमसो मा ज्योतिर्गमय - भाग ३रा (आणि शेवटचा)

भानिम's picture
भानिम in जनातलं, मनातलं
13 Dec 2015 - 9:12 am

आधीचे भाग -

भाग १ - http://www.misalpav.com/node/34053
भाग २ - http://www.misalpav.com/node/34065

तमसो मा ज्योतिर्गमय भाग ३

सूर्यास्त होऊन आता अंधार पसरू लागला होता. गार्गी रडून रडून झोपी गेली होती, आणि वहिनी विमनस्कपणे बसून होत्या. काही वेळाने उठून त्या देवघरात गेल्या. काही बोलणार इतक्यात त्यांची चाहूल लागून भटांनीच त्यांच्याकडे पाहिले आणि त्यांना खुणेनेच ते स्वत: जेवणार नसल्याचे सांगितले.

वहिनी काही न बोलता स्वयंपाकघरात गेल्या आणि गार्गीसाठी म्हणून त्यांनी काही तांदूळ आणि डाळ शिजत लावली.
चुलीवरच्या भाताची रटरट होऊ घातलीच होती, तेंव्हा भटांनी पोथी बंद केली आणि ते चुलीपाशी आले. ते पातेले त्यांनी चुलीवरून उतरविले. मग एक केळीचे पान घेऊन त्या शिजलेल्या भाताचे त्यांनी पंधरा घास करून त्या पानावर मांडले. मग पाण्याचा तांब्या भरून ते चंद्रोदयाची वाट पाहत अंगणात आसनावर बसून राहिले. चंद्रदर्शन होताच त्यांनी चंद्राला वंदन करून आणि गायत्री मंत्राचा जप करून ते पंधरा घास ग्रहण केले, आणि पाणी पिऊन उठले. अंगणामध्ये शतपावली करत ते तोंडाने अस्पष्ट आवाजात मंत्रोच्चारण करीत राहिले.

रुक्मिणी वहिनींनी गार्गीला उठवून कशीबशी तिची समजूत घालून तिला खाऊ घातले. झोपेतच असेलली गार्गी जेऊन परत झोपी गेली. वहिनी झाकपाक करून बाहेर पडवीत आल्या आणि काही न बोलता भटांकडे बघत बसून राहिल्या.

थोड्या वेळाने भट वर आले आणि सोप्यावर सतरंजी अंथरून त्यावर लवंडले. वहिनी त्यांचे पाय चेपायला आल्या तोच पाय आखडून घेऊन त्यांनी हातानेच "नको" अशी खूण केली, त्याबरोबर वहिनींचा बांध पुन्हा एकदा फुटला. "मला क्षमा करा; माझी चूक झाली……. पण त्याची शिक्षा आपण स्वत: घेऊ नये….."

"तुमच्यातल्या मातृसुलभ वात्सल्याने कर्तव्यदक्षतेवर मात केली. ममत्वाचे महात्म्यच तसे आहे. तुम्ही खेद करू नये!" भट म्हणाले; "माझे व्रत आहे पुढच्या मासभर, त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी जेवण बनवू नये, आणि हो, तुम्ही जेऊन घ्या!"

काही दिवसातच बघता बघता कृष्णंभटांच्या व्रताची गोष्ट चहुकर्णी झाली. दिवसभरचा उपवास, ग्रंथ वाचन, रात्री तिथीच्या संख्येएवढे फक्त भाताचे घास; ब्रह्मचर्य आणि मितभाषा !

माघ कृष्ण पंचमीला गंगाधरपंत जहागीरदार, गावातील काही प्रतिष्ठित ब्राह्मणांना घेऊन कृष्णंभटांच्या भेटीला आले. काही साधक बाधक चर्चा झाल्या. कृष्णंभटांनी त्यात अगदी मोजका असा भाग घेतला. चर्चेमध्ये ऐन भरात आलेला स्वातंत्र्य लढा आणि त्याला लागलेले हिंदू-मुस्लिम यांमधील वाढत्या तणावाचे गालबोट, मुस्लिमांच्या स्वतंत्र राष्ट्राची मागणी असाही विषय होता. शेवटी कृष्णंभटांचे हे व्रत कुठले असा विषय निघालाच; आणि भटांना विचारता त्यांनी स्मितहास्याने प्रश्नाला बगल दिली. तेंव्हा एक ज्येष्ठ परिचितांनी हे चांद्रायण व्रतच ना?असे विचारता यावरही भटांनी स्मितच केले. यावर प्रायश्चित्त घेण्यासाठी असे व्रत करतात, अशीही माहिती त्या ज्येष्ठ परिचितांनी पुरविली. कसले प्रायश्चित्त, यावर चर्चा येण्यापूर्वीच सुज्ञपणे गंगाधरपंतांनी; आता कृष्णंभटांना विश्रांती घेऊ द्या, आणि आपण निघावे अशी आज्ञा सर्वांना केली.

दिवसेंदिवस व्रताच्या कष्टाने भटांना क्षीणपणा जाणवू लागला होता. रोज हिंदू-मुस्लिम यांच्यातील वाढती तेढ, आणि काही ठिकाणी उसळलेले दंगे यासंबंधीच्या वार्ताही कानावर येत होत्या. भटांच्या मनामध्ये कसला तरी अनामिक घोर लागून राहिला होता; आणि व्रतामुळे त्यांना मन:शांती काही लाभत नव्हती. असे करता करता फाल्गुनातील वद्य त्रयोदशी उगवली. उद्या व्रताच्या उद्यापनाचा दिवस. गंगाधरपंतांसहित गावातील काही जवळच्या परिचितांना उद्याचे उद्यापनाच्या भोजनाचे आमंत्रण अगोदरच गेले होते.

राम प्रहर उलटल्यानंतर भट विश्रांती घेत पडले होते, तितक्यात त्यांना दिन्डीबाहेरून कोणी हाक घालत आहे असे वाटले आणि ते बघायला पुढे गेले. दिंडीबाहेर एक मनुष्य अदबीने उभा होता. प्रश्नार्थक मुद्रेने भटांनी त्याच्याकडे पाहताच दोन पावले सरकून दबक्या आवाजात तो म्हणाला - "हुजूर, मला मेहरुन्निसासाहिबा यांनी पाठविले आहे. झुबेदाका पैगाम आहे. सध्याच्या परिस्थितीमुळे पनाहगाह बहोत तकलीफमध्ये आहे. आपल्याला येऊन मुलाला घेऊन जायची अजीजीने दर्ख्वास्त केली आहे!!!" ते लोक परसो पनाहगाह खाली करून जाणार आहेत!"

काय बोलावे हे भटांना कळेना. ते त्या माणसाकडे पाहतच राहिले.

"काय उलटा पैगाम घेऊन जाऊ, पंडितजी?" त्याने विचारले. काही न बोलताच कृष्णंभटांनी त्याला हातानेच परत जाण्याचे सुचविले; आणि ते परत त्याच्याकडे कोऱ्या नजरेने पाहत राहिले. काही वेळ घुटमळून तो निराश मुद्रेने परत फिरला.

कृष्णंभट सुद्धा परत घराकडे वळले. परत येऊन ते सोप्यावर सतरंजीवर पडून आढ्याकडे पाहत राहिले. सायंकाळी सूर्यास्तापूर्वी त्यांनी स्नानसंध्या केली, आणि व्रताचे उपचार सुरु केले. पण त्यांचे कशातच खरे लक्ष नव्हते. रात्री त्यांना झोप लागली नाही. रात्रभर ते आरण्यक वाचत राहिले. "असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मामृतं गमय।।….."

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून रुक्मिणी वहिनींची लगबग सुरु झाली. ब्राह्मणभोजनाची तयारी म्हणजे काही सोपे काम नव्हे. अंगणात शिष्यवृन्दाने यज्ञाची तयारी चालविली होती. भटदेखील उपचाराप्रमाणे सर्व कामे करत होते, आणि शिष्यांना मार्गदर्शन करीत होते. पण त्यांना कशातच स्वारस्य वाटत नव्हते.

यज्ञ सुरळीतपणे पार पडला. ब्राह्मण भोजनात ब्राह्मण तृप्त झाले. रुक्मिणी वहिनींना तर मणाचे ओझे डोक्यावरून उतरल्याप्रमाणे मोकळे वाटत होते.

कृष्णंभटांना अत्यंत थकवा आला होता आणि ते झोपले होते. रुक्मिणी वहिनी त्यांच्या पायाशी बसून त्यांचे पाय चेपून देत होत्या. दुसऱ्या प्रहरानंतर भट उठले आणि त्यांनी नित्यकर्मे उरकली. नंतर ते सोप्यावर विचारग्रस्त बसून राहिले. त्यांना खूपच थकवा आला असणार असा कयास करून सुज्ञपणे काही न बोलता रुक्मिणी वहिनी आपली कामे करीत होत्या, आणि गार्गी सुद्धा तिच्या नेहमीच्या उद्योगामध्ये गुंगली होती.

का कुणास ठाऊक, भटांच्या कानात एकच सुक्त रुंजी घालत होते….. "असतो मा सद्गमय…… तमसो मा ज्योतिर्गमय…… "

रात्रीचे जेवणदेखील अशाच शांततेत पार पडले. शतपावली करून भट झोपायच्या खोलीत गेले आणि पलंगावर पडताना त्यांना अचानक खूप ग्लानी आली. डोळ्यासमोर एक प्रकाश पसरला, आणि त्यांच्या तनामनाला व्यापून एकाच सुक्त घुमत होते…… "असतो मा सद्गमय…… तमसो मा ज्योतिर्गमय…… "

पहाटे कृष्णंभट लवकरच उठले. नेहमीप्रमाणे त्यांनी गोदावरीकडे प्रस्थान केले. सर्व नित्यकर्मे करून ते गुरुकुलात गेले, आणि त्यांनी एक शिष्याकरवी कुशाभाऊ टांगेवाल्याला निरोप घातला.

विद्यार्थ्यांना संथा देऊन झाली, तेंव्हा कुशाभाऊ टांगा घेऊन गुरुकुलाबाहेर उभाच होता. भटांनी त्याला टांगा हमीद चौकाकडे घ्यायला सांगितला तेंव्हा तो भटांकडे आश्चर्याने पाहतच राहिला. भटांनी जेंव्हा त्याच्याकडे थोडे कडकपणे पाहिले तसा तो वरमला, आणि त्याने चाबूक हवेत फडकवला. टांगा हमीद चौकाकडे घेऊन जाणाऱ्या हमरस्त्याशी जोडणाऱ्या छोट्या रस्त्याच्या दिशेने चालू लागला.....

('धर्म' या हिंदी कलात्मक चित्रपटावर आधारित. मूळ चित्रपटातील कथा वाराणसी मध्ये घडलेली दाखवली असली तरी प्रस्तुत कथापट नाशिकमध्ये घडल्याचे कल्पिले आहे. नाशिकच्या वर्णनात आणि प्रत्यक्ष भौगोलिक तपशिलात; त्याचप्रमाणे धार्मिक विधींच्या तपशिलात काही तफावत आढळल्यास ते लेखकाचे कलात्मक स्वातंत्र्य समजावे)

कथा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

13 Dec 2015 - 4:15 pm | पद्मावति

सुंदर!

पैसा's picture

13 Dec 2015 - 5:52 pm | पैसा

खूप सुरेख झाले आहे रूपांतर!

भानिम's picture

13 Dec 2015 - 6:27 pm | भानिम

धन्यवाद!

एस's picture

13 Dec 2015 - 6:32 pm | एस

सुंदर रूपांतर!

भानिम's picture

13 Dec 2015 - 6:49 pm | भानिम

यूट्युबवर हा चित्रपट जरूर पहावा. भावना तलवार दिग्दर्शित असुन पंकज कपुर आणि सुप्रिया पाठक यांनी अप्रतिम भूमिका केल्या आहेत. चित्रपटाचा शेवट मला पटला नसला तरी चित्रपट मनाला स्पर्शून गेला.

नम्रपणे नमुद करू इच्छितो की कथाबीज जरी चित्रपटातून घेतले असले तरी ही कथा स्वतंत्रपणे अविष्कारली आहे.

यशोधरा's picture

13 Dec 2015 - 6:54 pm | यशोधरा

कथा आवडली.

सिनेमाही पाहिला आणि आवडला. धन्यवाद!