डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवड्यातील एक संध्याकाळ....
विन्या, मध्या, रम्या आणि अन्या आपआपले बियरचे ग्लास घेऊन बार मध्ये बसले होते.
त्या शहरातल्या वैद्यकीय महाविद्यालयाचे हे चौघेही विद्यार्थी. चौघेही तसे हुशार होते पण अगदी ओवाळून टाकलेले. टगेगिरी करण्यात सगळ्यात पुढे.
त्यातल्या विन्या आणि रम्याचे पिताश्री आमदार आणि मध्या आणि अन्याचे बाप मोठे उद्योगपती.
या दोघा उद्योगपतींनी पक्षाला पैसा पुरवायचा. आणि त्या बदल्यात दोघा आमदारांनी त्यांना सर्व सोयी सवलती पुरवायच्या असा जणू अलिखित करारच होता.
त्यामुळे ही चारही पोरे अगदीच मोकाट सुटली होती. रॅगिंग करणे हा तर त्यांचा अगदी आवडता विषय.
त्या दिवशी बियरचे घुटके घेताना त्यांच्या अशाच गप्पा चालू होत्या.
अचानक विन्या म्हणाला, "अरे ३१ डिसेंबर जवळ आला..".
त्यावर अन्या म्हणाला, "मग यात नवीन काय सांगितलेस? ३१ डिसेंबर जवळ आला म्हणून आम्ही काय नाचू"?
विन्या म्हणाला, "अरे तसं नाही. या वर्षी कोणाचा बकरा करायचा"?
विन्याच्या या वाक्याबरोबर एकदम सगळ्यांची ट्यूब पेटली. त्यांना गेल्या वर्षीच्या ३१ डिसेंबरची आठवण झाली.
गेल्या वर्षी ते असेच बार मध्ये बसले होते आणि नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांचे रॅगिंग कसे करावे यावर चर्चा चालू होती.
अचानक मध्या म्हणाला, "माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आहे".
विन्या म्हणाला, "त्यात काही थ्रिल असले तर सांग. उगीच अचरटासारखा काहीतरी बोलू नको".
त्यावर मध्या म्हणाला, "ऐकून तर घ्या. आपण नवीन प्रवेश घेतलेल्या मुलांपैकी एक बकरा पकडायचा आणि त्याला एक गुलाबाचे फूल द्यायचे आणि त्याला सांगायचे की ३१ डिसेंबरला रात्री बरोबर १२ वाजता त्याने आपल्या कॉलेजच्या शवागारात जाऊन एका विशिष्ट प्रेतावर ते फूल ठेवायचे आणि परत यायचे. आणि त्याने हे व्यवस्थित जमवले तर त्याला घेऊन आपण दणक्यात पार्टी करायची".
हे ऐकून सगळे गंभीर झाले. सगळ्यांनाच ही कल्पना आवडली होती. पण हे सगळे जमवायचे कसे?
अन्याने लगेच प्रश्न विचारायला सुरुवात केली, "अरे पण आपल्याला शवागाराची चावी कशी मिळणार? आणि तो फूल ठेवून आला हे कसे कळणार?"
मध्या म्हणाला, "सांगतो. तो रखवालदार माझ्या चांगला ओळखीचा आहे. तो पक्का दारुडा आहे. त्याला एक बाटली दिली की आपले काम होईल. आपण रात्री दहा वाजताच चावी ताब्यात घेऊन ठेवायची.. ...."
"पुरे पुरे. आले आमच्या लक्षात तुला काय म्हणायचे आहे ते..", तिघेही एकदम म्हणाले.
लगेच तिघांनीही सर्व योजना ठरवली. नवीन आलेल्या मुलांमध्ये एक विनय नावाचा मुलगा होता.
त्याला त्यांनी पकडले. पहिल्यांदा तो तयार होईना पण त्याला थोडेसे "औषध" पाजल्यावर मग तो तयार झाला.
शेवटी एकदाची ३१ तारीख आली. रात्री दहा वाजता मध्या रखवालदाराला "बाटली" देऊन आणि चावी घेऊन आला . एव्हाना त्यांनी विनयला "औषध" पाजून तयार केला होता.
सुमारे पावणेबारा वाजता त्यांनी विनयला चावी देऊन 'बेस्ट लक' म्हणून पाठवून दिले. इकडे विनय शवागाराजवळ जाऊन पोहोचला तेव्हा बाराला पाच मिनिटे कमी होती. त्याने दार उघडले आणि तो आत गेला.
आत गेल्याबरोबर आतली थंड हवा एकदम त्याच्या अंगावर आली. आतली थंड हवा, मंद प्रकाश आणि रॅकवर ठेवलेली प्रेते हे पाहून त्याच्या अंगावर सरसरुन काटा आला.
त्या क्षणी त्याला असे वाटले की हे सर्व सोडून आपण बाहेर पळून जावे. पण त्याचा ईगो त्याला स्वस्थ बसू देईना. आता इथपर्यंत आलो. आता फक्त फूल त्या प्रेतावर फूल ठेवायचे आणि बाहेर धूम ठोकायची. असा विचार करुन तो पुढे निघाला.
त्याला सांगितलेले प्रेत चौथ्या रांगेत शेवटचे होते. तो एक एक रांग पार करत चौथ्या रांगेपाशी आला. नाही म्हटले तरी त्याच्या मनावरचे दडपण वाढतच होते.
तो चौथ्या रांगेतून सरळ निघाला. एक, दोन, तीन, चार.... करीत शेवटी एकदाचा तो रांगेच्या शेवटच्या प्रेताजवळ येऊन पोहोचला. त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती. घसा कोरडा पडला होता. हातपाय थरथरत होते. तो शेवटच्या प्रेताच्या बाजूला येऊन थांबला. थरथरत्या हाताने त्याने गुलाबाचे फूल त्या प्रेताच्या छातीवर ठेवले.
आणि तो वळणार इतक्यात त्या प्रेतावरच्या चादरीखालून एक पांढरा हात बाहेर आला आणि त्याने विनयचा हात पकडला.
त्याचा इतकावेळ रोखून धरलेला धीर आता सुटला. 'औषधाची' धुंदी खाडकन उतरली. इतका वेळ रोखून धरलेला श्वास एकदम स्फोटासारखा बाहेर पडला.
जीवाच्या आकांताने तो सुटण्याची धडपड करु लागला. प्रेतावरची चादर हळूहळू खाली सरकू लागली आणि एक पांढराफटक चेहरा दिसू लागला. विनयने तिकडे पाहिले मात्र...
एक घुसमटती किंकाळी त्याच्या घशातून बाहेर पडली आणि तो खाली कोसळला.
चादरीखाली झोपलेला मध्या खो खो हसत बाहेर आला आणि चेहर्याला आणि हाताला लावलेले पीठ झटकू लागला. एव्हाना बाकीचे तिघेही आत अले होते. त्यांचीही हसून मुरकुंडी वळली. चौघेही त्याला उचलून बाहेर घेऊन आले आणि त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करु लागले. पण तो काही शुद्धीवर आला नाही. थोड्याच वेळात त्यांच्या लक्षात आले की तो मेला आहे. आता मात्र त्या चौघांना घाम फुटला. काय करावे हे त्यांना सुचेना.
शेवटी विन्या म्हणाला, "याची आपण लगेच विल्हेवाट लावली नाही तर आपले काही खरे नाही."
त्या शवागारच्या मागच्या बाजूला थोड्या अंतरावर पडीक जागा होती. तिथे एक जुनी पडीक विहिर होती.
त्या चौघांनी विनयचे प्रेत त्या विहिरीजवळ आणले आणि ३-४ जड दगड बांधून विहिरीत टाकले आणि ते आपपल्या घरी परत गेले.
त्या प्रकरणाचा फारसा बोभाटा झाला नाही कारण विनय नाहीसा झाला एव्हढेच सगळ्यांना कळले. परंतु त्याचा शोध न लागल्यामुळे आणि त्याचे प्रेतही न सापडल्यामुळे हळूहळू या प्रकरणावर पडदा पडला.
"या ३१ डिसेंबरला त्या घटनेला एक वर्ष पूर्ण होईल.", अन्याच्या या वाक्याने सगळे भानावर आले.
"मग या वर्षी काय करायचे?", रम्या म्हणाला, "की नुसतीच बियर पिऊन साजरा करायचा"?
"मग दुसरे काय करणार?", अन्या म्हणाला.
मध्या म्हणाला, "पण मी काय म्हणातो, की आपण गेल्या वर्षीचाच प्रयोग करायला हरकत आहे? या वर्षी आपण आपल्या वर्गातलाच एक बकरा पकडूया. आपण नेहमीच शवागारात जात असल्यामुळे त्याला जास्त भीती वाटणार नाही."
हो-ना करत शेवटी सगळे तयार झाले. या वेळीसुद्धा मध्यानेच झोपायचे कबूल केले.
त्यांच्या वर्गात प्रकाश नावाचा एक मुलगा होता. तो जरा आगाऊ आणि जास्त पुढे पुढे करणारा होता. हे चौघे त्याला एकदा घेऊन बारमध्ये गेले आणि आडून आडून त्याच्याकडे हा विषय काढला. तो आपणहूनच म्हणाला, "मला जर १००० रुपये कोणी दिले तर मी हे करायला तयार आहे. भिती कसली त्यात. दिवसा जातो ते रत्री जायचे इतकेच."
लगेच मध्या म्हणाला , "आम्ही चौघे मिळून तुला २००० रुपये देतो."
प्रकाश म्हणाला, "चालेल. पण त्यातले १००० रुपये मला आधी पाहिजेत".
मध्या म्हणाला, "ठीक आहे. आम्ही तुला १००० रुपये ३१ ला संध्याकाळी देऊ. पण जर रात्री तू आलास नाही तर आमच्याशी गाठ आहे."
अशा रीतीने सर्व ठरवून सगळे बाहेर पडले.
ठरल्याप्रमाणे रात्री साडेअकरा वाजता प्रकाश हजर झाला. विन्या, अन्या आणि रम्याने त्याला गुलाबाचे फूल आणि चावी दिली. तो चावी बोटावर गरगरा फिरवत निघून गेला. त्याला हा सर्व प्रकार माहित होता. आपल्याला निरोप द्यायला तिघेच आले होते त्यामुळे मध्या शवागारात झोपलेला असणार हे सुद्धा त्याच्या लक्षात आले. त्यामुळे तो बिनधास्त निघाला. तो शवागाराजवळ आला आणि दार उघडून आत गेला. इकडे हे तिघेही बाहेर येऊन थांबले.
प्रकाश ठरलेल्या प्रेताजवळ आला आणि त्याने त्या प्रेताच्या छातीवर गुलाब ठेवला. त्याबरोबर ते प्रेत ऊठू लागले.
त्याबरोबर प्रकाशने त्या प्रेताला खाली दाबून धरले आणि म्हणाला, "मध्या, नाटाकं पुरे झाली. आता ऊठ आणि बाहेर चल आणि माझे उरलेले १००० रुपये काढ. तुला काय वाटले मी असा तसा घाबरेन"?
असे म्हणून त्याने चादर खसकन ओढून काढली. आणि चादरीखाली त्याने जे पहिले ते बघून त्याची बोबडीच वळाली. विचित्र आवाजात ओरडत तो कसाबसा बाहेर आला आणि त्या तिघांच्या समोरुन धडपडत पळून गेला. तिघेही हसून हसून बेजार झाले.
रम्या म्हणाला, "मोठा फुशारक्या मारत होता. आता बघ कसा जीव घेऊन पळाला. चला आपण आत जाऊन मध्याला घेऊन येऊया".
असे म्हणून तिघेही आत गेले आणि मध्याला हाका मारू लागले. पण मध्या काही उत्तर देईना.
अन्या म्हणाला, "आता हा साला आम्हाला येडा बनवतो आहे की काय"?
तिघेही मध्या झोपला होता तिथे आले. आणि त्या प्रेतावरची चादर बाजूला केली. आणि पाहतात तर काय.... ते दुसर्याच कोणाचे तरी प्रेत होते.
आता मात्र त्यांना घाम फुटला. ती जागा अनोळखी वाटू लागली. अचानक सर्व वातावरण गारीगार झाल्यासारखे वाटू लागले.
विन्या म्हणाला, "अरे, मग हा मध्या नक्की गेला तरी कुठे"?
अचानक त्यांच्या मागून आवाज आला, "मध्या आता अशा जागी गेला आहे, जिथून तो कधीच परत येणार नाही".
तिघांनीही एकदम मागे वळून बघितले. आणि समोर जो चेहरा दिसला तो पाहून ते जागीच थिजले. तो चेहरा ते कसे विसरु शकत होते?
वेडावाकडा झालेला चेहरा, बाहेर आलेले डोळे, जागोजागी किडेमुंग्यांनी कुरतडलेली कातडी अशा भयभीषण अवतारातला विनय त्यांच्यासमोर उभा होता,
"तुम्ही माझ्या जीवाशी खेळलात.", तो म्हणाला, "पण आता मला या खेळात मजा येते आहे."
त्या तिघांच्याही चेहर्यावर प्रेतकळा पसरली.
"पण 'तिकडे' माझ्याबरोबर खेळायला कोणीच नाही, म्हणून मी मध्याला घेऊन जातो आहे. तुम्हाला मध्याला पहायचेच असले तर तो बघा तिकडे." त्याने बोट दाखवलेल्या दिशेला त्यांनी पाहिले. तेव्हा त्यांना आत्यंतिक भितीने वेडावाकडा झालेला मध्याचा चेहरा दिसला. तो केव्हाच मेला होता.
"तो शेवटचा रॅक आहे. आणि त्या रॅकवर अजून तीन जागा रिकाम्या आहेत. पण तुम्ही घाबरु नका. मी दर वर्षी एकेकालाच नेणार आहे. ते सुद्धा ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीच. तेव्हा टेक केअर आणि विश यू हॅप्पी न्यू इयर....". असे म्हणून तो हळूहळू हवेत विरुन गेला.
तिघेही बेशुद्ध होऊन खाली कोसळले........
प्रतिक्रिया
26 Dec 2008 - 10:57 pm | मन्जिरि
खल्लास भितिने बोबडि वळलि छान जमलि आहे
26 Dec 2008 - 11:14 pm | भिडू
मस्त... मज्जा आलि वाचताना
26 Dec 2008 - 11:27 pm | प्राजु
छान कथा. शेवट काहीसा असाच असणार याची कल्पना आलीच होती.
वातावरण निर्मिती छान झाली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Dec 2008 - 11:31 pm | व्यंकु
ही कथा याआधी वाचली आहे कुठे ते विसरलो
26 Dec 2008 - 11:39 pm | शाल्मली
छान कथा.. पुढे साधारण काय घडणार असेल याची कल्पना येत होतीच..
आवडली.
--शाल्मली.
27 Dec 2008 - 12:42 am | इनोबा म्हणे
सुरुवातीची कथा(विनयची) खूप वर्षांपासून पुण्यातल्या 'ससून रुग्णालयातील काही डॉक्टरांचा किस्सा' या नावाखाली भरपूर वेळा ऐकून झाली आहे. शेवट काय होणार हे ही गृहीत धरले होते. वातावरण निर्मीती मात्र छान केली आहे.
पु.ले.शु.
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
27 Dec 2008 - 12:59 pm | दिपक
वातावरणनिर्मीती छानच, वेगवान कथा
आवडली :)
पु.ले.शु.
--दिपक
30 Dec 2008 - 4:52 pm | अनिल हटेला
कथा मस्तच जमलीये....
:SS :-SS
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
30 Dec 2008 - 5:00 pm | shweta
हि कथा हि ढापलेली आहे !
कार्ट्या ...
30 Dec 2008 - 5:04 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्या विहीरीत विनयला ढकललं तिथे कैर्यांचं झाड होतं का रे कार्ट्या? ;-)
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.