डिक्लेमर : ज्यांनी पिझ्झा आवडतो आणि करायची इच्छा आहे त्यांनी आवर्जून वाचावे आणि ज्यांना आवडत नाही पण करायची इच्छा आहे त्यांनी ही वाचावे पण ज्यांना दादरच्या प्रकाश हॉटेलमधील भाजणीचं थालीपीठच फक्त आवडतं... त्यांनी जमले तर वाचावे.. म्हणजेच काय ज्यांना वाचायचे त्यांनी वाचावे.. पण यातील घटनांशी तुमचा संबंध आहे असे जाणवले तर लेखिकेला नक्की विचारावे.. :)
मंडळी,
लहानपणापासून तशी मला कुकिंगची (स्वयंपाकाची नव्हे) भारी आवड. तसंही मिपाची एक नंबरची सुगरण ठरले आहे मी..(काय म्हणालात...कोणी ठरवलं??........... ते ... .. हां.. मी आणि एक प्राजु म्हणून आहे मिपावर... अशा आम्ही दोघिंनी मिळून ठरवलं आहे )..
तर.. सांगत काय होते की मला कुकिंगची लहानपणापासून आवड. ... त्यामुळेच नेहमी स्वयंपाक घराबाहेर बसून मी आईला, आजीला, आणि नंतर स्वयंपाक करणार्या बाईना मी नेहमी सुगरणीचे सल्ले देत असे.. (अगदी मेघना भुस्कुटे स्टाइलने..). खरंतर स्वयंपाक ही एक कला असते असं संजीव कपूर म्हणतो. त्याचंही बरोबर आहे कलेची कदर करणारी (तीही लाखांमध्ये) हॉटेल वाली मंडळी भेटली की, अगदी सुरी हातात कशी पकडावी ही सुद्धा कलाच वाटू लागते. पण या कलेला माझ्या कलाने घेणे म्हणजे एक दिव्य आणि त्यानंतर तयार झालेल्या कलाकृती चा आस्वाद घेणे हे दुसरे दिव्य. असो.. तर अशी मी ती कलाकार एकदा कला सादर करावी म्हणून त्या कलादालनात... आपलं स्वयंपाक घरात गेले... आईने सांगितले होते गूळाचा सांजा कर म्हणून. मी कॉलेजला असतानाची ही गोष्ट. तिला विचारलं "रवा कुठं आहे?" ती म्हणाली रॅक वर मधल्या कप्प्यात स्टीलचा लहान डबा आहे.. मी शोधला. रवा घेतला.. मस्तपैकी तूपात परतून गूळ घालून, पाणी घालून शिजवला आणि वरून पुन्हा साजूक तुपाची धार सोडून आपण जरा जास्तच चांगला केला सांजा या आविर्भावात होते.. नंतर समजले ज्या रव्याचा सांजा केला होता तो इडली रवा होता.
एकदा कधीतरी दिवाळीच्या दरम्यान आई चकल्या करत होती. खाली बसून तिने १२-१५ चकल्या करून घेतल्या आणि ओट्यावरच्या शेगडीवर कढईत तेल तापत ठेवले होते त्यात त्या तळून काढणार होती.. मी तिथे काय करण्यासाठी कडमडले आठवत नाही.. पण नेमके तेव्हाच आईने सांगितले, " जरा कढईतलं तेल तापलं का बघ गं.." मी म्हणाले "हो.." आणि नंतर... आईला फक्त माझ्या किंचाळण्याचा आवाज आला.. कारण मी हातची ४ बोटं तेलात घालून तेल तापलं का हे पाहिलं होतं. ती दिवाळी माझी बोटांवर निभावली..
तेव्हापासून मी माझी कला सादर करणार म्हंटलं की, सगळे जण घाबरून बसायचे. लग्ना नंतर माझा स्वयंपाक नवर्यापेक्षा सासूबाईंनाच जास्ती आवडू लागला. नेमकं नवर्याला मीठ कमी आहे असं वाटलं की, सासूबाई म्हणायच्या "मस्त झाली आहे भाजी.." नंतर समजलं.. सासूबाईंना बीपी आहे आणि मीठ कमीच खायचे आहे.. :(
त्यातही नेहमीच्या स्वयंपाकापेक्षा इटालियन, मेक्सिकन, चायनीज या अशा पदार्थांकडे जास्ती ओढा. एक मात्र होत होतं.. या पदार्थांपैकी एकही पदार्थ त्यावेळी घरच्या इतर कोणी विशेष खाल्ला नसल्याने किंवा घरी करायचा प्रयत्न केला नसल्याने मी करेन ते उत्तम असचं होतं..
पिझ्झा हा प्रकार तसा भारतात फार पटकन प्रिय झाला. जस जसं त्याचं कौतुक कानावर येत गेलं तसतसा तो खाण्याची इच्छाही प्रबळ होत गेली. आणि आचानक कोल्हापूरातल्या राजारापुरीतल्या हिंदुस्थान बेकरी मध्ये पिझ्झा मिळतो असं कानावर आलं. मोर्चा वळवला हिंदुस्थान कडे. तिथे गेल्यावर पाहिलं तर तिथे बर्गर, व्हेजी पफ्फ.. या आणि अशा प्रकारच्या अनेक पदार्थांनी वर्णी लावली होती.. पिझ्झाही होता. त्यावेळी कोल्हापूरात पिझ्झा असा कुठे मिळत नव्हता त्यामुळे पहिल्यांदाच खात असलेला तो पिझ्झा.. म्हणजे भरपूर चीज आणि काही भाज्या .. आणि पॉप अप टोस्टर मधून काढलेला कडक ब्रेड टोस्ट.. असा जोरात चावून खाटकन आवाज करत आणि नको इतके गरम असलेले ते चीज टाळ्याला पोळवत आम्ही "वॉव.. सह्ही.. " असं म्हणत पोटात ढकलला.. .. पुढे पुण्यात आल्यावर पिझ्झा हट मध्ये ( तेव्हा फक्त जे एम रोड वरच होतं ते)एकदा पिझ्झा खाल्ला आणि पिझ्झा पिझ्झा म्हणतात तो असा असतो आणि तो खरंच चांगला लागतो असा दृष्टांत झाला. नंतर मग कोथरूडला करिष्मा जवळ पिझ्झा हट सुरू झाले आणि मग तिथे येणे जाणे.. ऑर्डर करणे सुरू झाले..
पण मी ठरले जातीची सुगरण.. पिझ्झा पिझ्झा.. आहे काय त्यात इतकं.. म्हणून घरी पिझ्झा करायचा ठरवलं..(ए... कोण म्हणालं रे माकडीणीच्या हाती कोलीत??).. म्हणून मग बाजारातून पिझ्झा बेस आणले.. त्यावर भाज्या शिजवून, केचप घालून, वरून चीज घालून एका तव्यावर ठेवून भाजलं.. कुकरचा एक डबा त्यावर पालथा घातला..(ओव्हन सारखा फिल देण्यासाठी) आणि मस्त पिझ्झा केला. काय आहे माहिती आहे का.. आमच्या घरी कोणाला एखादा पदार्थ चांगला झाला नाहीये असं म्हणताच येत नाही. त्यामुळे पिझ्झाही एकदम सह्ही वाटला.
यथावकाश आमचे विमान भारतातून अमेरिकेला आले. मग इथे आल्यावर तर काय... काय करू आणि काय नको. स्पॅगेटी करून झाली, वेगवेगळ्या प्रकारे पास्ता करून झाला, व्हेजी पप्फ्फ करून झाले, गार्लिक ब्रेड करून झाला, बेक्ड व्हेजिटेबल्स इन व्हाईट सॉस करून झालं.. पण अजून पिझ्झ्याला हात नव्हता घातला. मैत्रिणींकडून ऐकत होते की, पिझ्झाचं पिठ कसं मळायचं.. काय काय घालायचं. टॉपिंग्ज कोणकोणते घालायचे ,चीज कोणकोणतं वापरायचं... इ. इं. इथे आल्यापासून जेव्हा जेव्हा पिझ्झा खाल्ला तो पिझ्झा हट नाहीतर डॉमिनोज चा. त्यातल्या त्यात झोपडीचाच (पिझ्झा हट) आवडायचा. लेकाला तर फारच आवडायचा.. पिझ्झा ऑर्डर करणार म्हंटलं की स्वारी खुश एकदम. मग त्यावर पायनेपल, ऑलिव्ह्ज.. इ. इ. असे टॉपिंग्ज हवे.. अशा चर्चा त्याच्या सुरू व्हायच्या. चीज पिझ्झा तर त्याचा लाडका.. मग म्हंटलं आता नुसते सल्ले ऐकणं बास मैत्रीणींकडून.. आता आपणच घरी पिझ्झा करायचा. ५-६ संकेतस्थळांवरून पिझ्झाची रेसिपी वाचली. ५-६ संकेतस्थळावर एकच रेसिपि ५-६ वेगवेगळ्या प्रकाराने सांगितली होती.. आता काय करणार?? मग त्या ५-६ वरून मी माझी स्वत:ची अशी एक रेसिपी ठरवली आणि घेतला करायला.
२ कप ऑल परपज फ्लोर म्हणजे मैदा, १ पॅकेट यीस्ट, अर्धाकप कोमट पाण्यात यिस्ट आणि १/२ चमचा साखर घालून ठेउन द्यावे. मग मैद्यात मिठ, तेल आणि हे अर्धाकप पाणी घालावे एकसारखे हलवावे आणि मग लागेल तसे पाणी घालून पिठ पोळीच्या पिठाप्रमाणे मळून घ्यावे. ४० मिनिटांनी.. ते फुगलेले असेल. ते पुन्हा हाताने मळून घ्यावे आणि पुन्हा ३० मिनिटे ठेवावे. पुन्हा फुगले की, त्याचा पिझ्झा करावा. तो कसा?? तर... हवा तेवढा गोळा घेऊन, बेकिंग पॅन ला तेलाचा हात लावून, तो गोळा थोडा मैद्यात घोळवून थापावा मग त्यावर मारिनारा सॉस, भाज्या, चीज घालावे आणि ३५० फे. वर १०-१२ मिनिटे बेक करावे. झाला पिझ्झा..
ह्यात तेरेकि... सगळं जमवलं. पिठ मळून ४० मिनिटे ठेवलं.. ते फुगलेलं पाहून आज मै उपर आसमॉं निचे अशी अवस्था झाली. पुन्हा मळलं आणि ३०मिनिटे ठेवलं.. पुन्हा फुगलं. मग काय मी आणखीनच उपर गेले आणि आसमान आणखीनच निचे आलं.. पीठाचा गोळा घेतला मैद्यात घोळवून बेकिंग पॅन वर अगदी निगुतीने थापायला सुरूवात केली. मंडळी, मी भाकरी छान करते बरं का.. म्हणजे तसं लोक्स म्हणतात. तर भाकरीप्रमाणे कडा पातळ आणि मधे जाड असा.. इतका सुबक पिझ्झा थापला मी की काय सांगू. अगदी तोच चंद्रमा नभात.. च्या चालीवर तोच पिझ्झोबा पॅनात.. त्यावर मारिनारा सॉस लावला, भाज्या घातल्या आणि मस्त पैकी चीजही घातलं. आणि दिला ठेऊन गरम ओवन मध्ये. तो फुगायला जसा लागला तसं मला भरून येऊन लागलं.. येस्स! अखेर मी पिझ्झा केलाच.. पण........................ तो असा काही फुगला .. काय सांगू.. अहो बनपावच झाला हो. म्हणजे मी निगुतीने थापलेला पिझ्झा हा कडेने पातळ केल्यामुळे चिज सगळं खाली आलं होतं ओघळून आणि मधे जाड ठेवल्यामुळे पिझ्झा नाही तर तो बनपाव झाला. नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव.. :(
अस्सा राग आला होता मला.. म्हंटलं असो.. पुढचा गोळा घेतला आणि मग तो मध्ये थोडा कमी जाड ठेवून कडेला जाड थापला.. तो ओव्हन मध्ये अगदि हवा तसा झाला.
लेकाला आवडला आणि मी भरून पावले.. त्यातच एकदा तू नळीवर सर्फिंग करता करता संजय टुम्मा दिसला पिझ्झा करताना. आणि त्याने दिलेल्या टिप्स वापरून मग मी पिझ्झा करू लागले.. नंतर केलेला पिझ्झा इतका सुंदर झाला की, प्राजक्ता हट सुरू करावे की काय असे वाटू लागले. ३-४ वेळा केल्यावर मी अगदिच पिझ्झा प्रविण झाले...
मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं..
- प्राजु
प्रतिक्रिया
20 Dec 2008 - 3:30 am | संदीप चित्रे
>> मग काय मी आणखीनच उपर गेले आणि आसमान आणखीनच निचे आलं..
मस्त वाक्य... हसलोच ना एकदम :)
------
(कथेचं तात्पर्यः तुमच्या खूप आवडीचा पदार्थ प्राजुने करणं धोक्याचे आहे. तिच्या मुलासारखा आपणही तो पदार्थ खाणं सोडून देण्याचा धोका उद्भवेल का? ) :?
ह.घे. प्राजु :)
20 Dec 2008 - 5:17 am | प्राजु
कथेचं तात्पर्यः तुमच्या खूप आवडीचा पदार्थ प्राजुने करणं धोक्याचे आहे. तिच्या मुलासारखा आपणही तो पदार्थ खाणं सोडून देण्याचा धोका उद्भवेल का? )
काय रे तुझी मिसळीची आवड कमी झाली काय रे... ?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Dec 2008 - 5:16 am | स्वप्निल..
प्राजु ताई,
पिझ्झा पुराण मस्तच आहे..
>>मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं..
:? :? :?
स्वप्निल
20 Dec 2008 - 5:16 am | शितल
>>नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव..
हे हे हे
:)
पि़झ्झा मी खात नाही त्यामुळे अजुन घरी प्रयोग केला नाही. :)
बाकी पि़झ्झा पुराण आवडले. :)
21 Dec 2008 - 1:06 pm | टारझन
>>नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी
=)) =)) =))
=)) =)) =))
बेक्कार ! आम्ही आशी शैली आमच्या #इन्क्लूड < शैली.ह > मधे टाकावी म्हणतोय !! अर्थात सोर्स कोड फ्री असेल तर ;)
अवांतर : लेख अगदी ताजाताजाच वाचलेला ... पण अंमळ आळशीपणात प्रतिक्रीया पुर्वपरिक्षणाला प्रतिक्रिया पोस्ट झाली असं समजून टॅब क्लोजवलेला !!
20 Dec 2008 - 6:40 am | रेवती
जमलाय पिझ्झा.
इडली रव्याचा सांजा?
ही ही ही.:)
बनपाव झाला काय पिझ्झ्याचा....
मज्जा आली वाचून.
रेवती
20 Dec 2008 - 7:08 am | चकली
पिझ्झा चांगला जमण्याआधी फसलेले अनेक प्रयोग आठवले.
>>>मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं..
हे खास!
चकली
http://chakali.blogspot.com
20 Dec 2008 - 8:26 am | विसोबा खेचर
मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं..
खरं आहे. बिचार्या तुझ्या लेकाने आणि आमच्या जग्गूभावजींनी अनेक पदार्थ अलिकडे खायचे सोडून दिले आहेत. लग्न करून आमचा जग्गू फसला बिचारा! :)
काय सांगू.. अहो बनपावच झाला हो. म्हणजे मी निगुतीने थापलेला पिझ्झा हा कडेने पातळ केल्यामुळे चिज सगळं खाली आलं होतं ओघळून आणि मधे जाड ठेवल्यामुळे पिझ्झा नाही तर तो बनपाव झाला. नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव..
बाकी बनपावपुराण क्लासच! :)
आपला,
(पिझ्झा, बर्गर हे प्रकार कधीही न आवडलेला) तात्या.
--
साला, तुमच्या त्या पिझ्झा/बर्गरपेक्षा आमचे मिसळ, थालिपीठ, दडपेपोहे लाख पटींनी बरे!
20 Dec 2008 - 8:54 am | पिवळा डांबिस
३-४ वेळा केल्यावर मी अगदिच पिझ्झा प्रविण झाले... मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला..
काही असो, पोरगं मात्र स्मार्ट आहे....:)
प्राजुताई तुला एक मंत्र देतो.....
पिझ्झ्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे डो बनवा (त्यासाठी १००० रेसेपी वापरा!!!), निरनिराळ्या प्रकारचे तवे वापरा, पिझ्झा स्टोन आणा, काहीहि करा, पिझ्झा कधीच पिझ्झेरियासारखा बनत नाही.....
जोपर्यंत आपल्याकडे त्यांच्यासारखा दोन्ही बाजूंनी उष्णता देणारा मूव्हिंग ओव्हन नाही (किंमत $५००० फक्त!!!!) तोपर्यंत!!!!:)
त्यावर एकच उपाय.....
सगळी उपकरणे फेकून द्यावी आणि सरळ एक लार्ज पिझ्झा ऑर्डर करावा.....
१० डॉलर गेलेले परवडले.....
अनुभवातून शहाणा झालेला,
यलोनॉटी अंकल
20 Dec 2008 - 8:58 am | प्राजु
आय एम फुल्ली इन ऍग्रीमेंट विथ यू.... यलो नॉटी अंकल.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Dec 2008 - 10:13 am | आनंदयात्री
मस्त पिझ्झ्यासारखेच खुसखुशीत लिहले आहेस !
मजा आली वाचतांना. :)
अवांतर १ :
आमच्या धमालरावांच्या बायकोने परवा घरी बोलावुन चांगले ४ पिझ्झे खाउ घातले होते आम्हाला, आहेच मुळी सुग्रण ती ! आम्हाला तिने केलेला पिझ्झा अगदी विकतच्या पिझ्झ्यासारखाच वाटला. त्याची आठवण येउन अंमळ हळवा झालो. (चवथा पिझ्झापण तीन साडेतीन मिनिटात संपवल्यावर बिचारी ती सीतामाई तुळशीने पान शोधायला गेली.)
अवांतर २ :
तिने केलेल्या पिझ्झ्यावर तसे माझे मत पडले होते की थोडी साखर घालायला हवी होती. कारण पुण्यात आल्यापासुन अन पुणेकरात वावरायचे शिकल्यापासुन अगदी तांबड्या रस्श्यात पण साखर नसली की आम्ही उगाच तक्रार करतो.
20 Dec 2008 - 4:20 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मस्त पिझ्झ्यासारखेच खुसखुशीत लिहले आहेस !
सहमत!
मग पिझ्झा खायला कधी घालणार प्राजु? (धम्या-धमीने बोलावलं तरी चालेल.)
20 Dec 2008 - 9:59 pm | प्राजु
आता भारत दौर्यामध्ये धम्याच्या घरी जाणं आलंच. धम्या, धमीला सांगून ठेव हो..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
20 Dec 2008 - 1:43 pm | योगी९००
नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव..
=)) =)) =))
मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं..
:S :S
तसे लेखन करण्याच्या बाबतीत आम्ही तुम्हाला लेकासारखेच आहोत..त्यामुळे आम्हाला चालेल पिझ्झा..
खादाडमाऊ
(पिझ्झा खाण्यास तरसलेला..)
20 Dec 2008 - 1:46 pm | अवलिया
मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं.
अरेरे !! :$
डिक्लेमर मस्त.
-- अवलिया
अवलियाची अनुदिनी
21 Dec 2008 - 11:58 am | सखाराम_गटणे™
>>मी पिझ्झा प्रविण झाल्यापासून माझ्या लेकाला पिझ्झा आवडेनासा झाला.. त्याने पिझ्झा खाणं सोडून दिलं..
बिचारा मुलगा,
कोणतेहे खाद्य पदार्थ सोडायचा, प्राजुला सांगावे काय?
प्राजु सुगरण आहे हे फोटो बघुन दिसतेच आहे.
----
सखाराम गटणे
22 Dec 2008 - 7:33 am | प्राजु
पिझ्झा आवडलेल्य, न आवडलेल्या सर्वांचे मनापासून आभार..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
22 Dec 2008 - 6:41 pm | झकासराव
मी हातची ४ बोटं तेलात घालून तेल तापलं का हे पाहिलं होतं.>>>>>>>>>. :)) :)) :))
नवरा म्हणाला.. टॉपिंग्ज म्हणून जर स्मॅश केलेल्या भाज्या आणि त्यावर थोडा पावभाजी मसाला टाकला असता.. तर निदान पाव भाजी म्हणून तरी खाता आला असता हा बनपाव..>>>>>>>> =)) =)) =))
मस्त खुसखुशीत आहे पिझ्झा पुराण.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :)
http://picasaweb.google.co.in/zakasrao
22 Dec 2008 - 7:00 pm | मनस्वी
:D :D
पिझ्झा प्रकरण आवडले.
22 Dec 2008 - 10:21 pm | स्पंदन
वाचुन मी पण पिझ्झा खाणे सोडले....
25 Dec 2008 - 12:49 am | साना
:> प्राजु पिझ्झा पुराण च इतक सही झालय की आता तुझ्या हातचा पिझ्झा पण खायलाच हवा!