क्रिकेट मधे फास्ट बोलर्स च्या करीयर चा एक पॅटर्न असतो. सुरूवातीला प्रचंड वेग पण अंदाधुंद बोलिंग, नंतर काही दिग्गजांचे मार्गदर्शन मिळाल्यावर एका र्हिदम मधे सेटल होणे, मग प्रचंड फॉर्म चा काळ, बहुतांश प्रतिस्पर्धी टीम्स च्या विरूद्ध मॅचविनिंग परफॉर्मन्सेस, त्यानंतर एखादी दुखापत व नंतर होणारा खेळावरचा परिणाम. त्यामुळे मग कमी वेगाने पण इफेक्टिव्ह बोलिंग करण्याचा एक काळ आणि शेवटी निवृत्ती.
झहीर खान यातून गेला पण एकदम वेगळ्या क्रमाने. फास्ट बोलर करीयरच्या उत्तरार्धात जास्त वेगवान, जास्त आक्रमक व 'लीथल' होत गेला आहे असे क्वचितच पाहिले आहे. २००० साली पदार्पण केलेला झहीर २०११ मधे सर्वात जास्त भारी फॉर्म मधे होता. भारताच्या सुदैवाने वर्ल्ड कप मधे तर प्रचंड प्रभावी! त्यानंतर दुखापत वगैरे अपरिहार्य गोष्टी सुरू झाल्या व शेवटी आज त्याने निवृत्तीची घोषणा केली. भारताला वर्ल्ड कप जिंकून देण्यात व कसोटी क्रिकेट मधे २०१० च्या उत्तरार्धात पहिल्या क्रमांकावर आणण्यात त्याचा प्रचंड वाटा होता.
त्याची सुरूवातीला ओळख झाली ती २००० च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत. कपिल चा अपवाद व झहीर च्या थोडा आधी आलेला आगरकर सोडला तर भारताला आपले बोलर्स यॉर्कर्स टाकून लोकांच्या दांड्या उडवत आहेत हे चित्र फारसे माहीत नव्हते. त्यात लेफ्ट आर्म फास्ट बोलर म्हणजे आपल्या दृष्टीने गल्ली क्रिकेट मधे बोलिंग करणार्या व टीव्हीवर अक्रम ला पाहणार्या आमच्यासारख्या पब्लिक च्या इमॅजिनेशन मधेच शक्य होता :). त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मॅच मधे अॅण्ड्र्यू हॉल ची दांडी त्याने उडवलेली पाहिली तेव्हा भारतीय क्रिकेट बदलत असल्याची खात्रीच पटली. २००० म्हणजे 'दादा' च्या काळाची सुरूवात. झहीर, हरभजन, सेहवाग, युवराज हे साधारण याच काळात आले/स्थिरावले.
नंतर झहीर आपला प्रमुख बोलर कधी बनला कळले पण नाही. त्याने पोत्याने विकेट्स काढल्या आहेत असे फारसे झाले नाही पण प्रतिस्पर्धी संघाच्या प्रमुख बॅट्स्मन ना उडवणे, कॅप्टन ने मोक्याच्या वेळी आणल्यावर हमखास विकेट काढून देणे यात तो तरबेज होता. दुसरे म्हणजे भारताच्या बोलिंग ला जरा 'इंटिमेडेटिंग लुक' आला त्याच्या मुळे. फॉलो थ्रू मधे त्याचा आविर्भाव टीपीकल फास्ट बोलर सारखा असे. त्याआधी श्रीनाथ चा वेग जरी जबरी होता, प्रसाद चा स्विंग चांगला होता तरी त्यांची बॉडी लँग्वेज आक्रमक नसे. झहीर मुळे आपले बोलर्स पहिल्यांदा तसे वाटू लागले.
द. आफ्रिकेचा स्मिथ हा त्याचा सर्वात मोठा 'बनी'. अनेकदा त्याने त्याची विकेट काढलेली आहे. या क्लिप मधे त्या विकेट्स बघायला मिळतील.
त्याच्या जबरदस्त रिवर्स स्विंग बोलिंगची काही उदाहरणे: ही एक न्यू झीलंड विरूद्धची मॅच, भारतातली. इथे "भारतातली" ला वेगळा अर्थ आहे. भारतात कुंबळे विकेट्स काढतो यात आश्चर्य नव्हते, झहीर काढतो, ते ही स्विंग वर, यात होते. भारताच्या मोठ्या स्कोअर ला तोंड देताना किवीज ची अवस्था १७/३ करताना झहीर ने बॉल आत येणार आहे की बाहेर जाणार आहे या गोंधळात सतत ठेवले बॅट्स्मेनना. पहिले दोन ही झहीर नेच काढले होते, पण ही तिसरी स्टीफन फ्लेमिंग ची विकेट म्हणजे स्विंग मुळे होणार्या गोंधळाचे जबरी उदाहरण आहे. नॉर्मल स्विंग ओळखायची व त्याप्रमाणे खेळायची सवय असलेल्या खेळाडूंना बॉल अचानक "रिवर्स" होउ लागला तर खेळता येत नाही, व लाईन लक्षात न आल्याचे ढोबळ पणे दिसणारी उदाहरणे त्याचीच आहेत. बॅट्समन कधी लाईन च्या आत खेळतात तर कधी बाहेर. कल्पना करा - स्टीफन फ्लेमिंग सारखा अनुभवी खेळाडू १७/२ वर खेळायला येतो, आधीचे दोन झहीरनेच उडवले असले (हीच क्लिप पहिल्यापासून पाहा, त्या दोन्ही विकेट्सही जबरी आहेत) तरी त्याचा बॉल सरळ सोडून द्यायचा प्रयत्न करतो. टोटल पोपट. अक्रम यात मास्टर, पण झहीरही जबरी होता.
पिच च्या एका कडेने येउन बॅट्समनच्या 'ब्लॉकहोल' मधे येणारा बॉल कधी आत येउन, कधी बाहेर जाउन तर कधी लाईन होल्ड करून विकेट घेउन जात असे हे बॅट्स्मन ना अजिबात झेपत नसे. क्रीझच्या उत्तम वापराचे बांगला देश विरूद्धचे हे एक उदाहरण
मग मध्यंतरी दुखापत, फिटनेस चा बोलर्स ना होणारा त्रास त्यालाही झाला. साधारण २००५ च्या आसपास तो ही बराच आत-बाहेर होता असे मला आठवते. मग मात्र पुन्हा फिटनेस सुधारून करीयरच्या दुसर्या इनिंग ला आला आणि पहिल्यापेक्षा चांगला बोलिंग करू लागला.
आणि हा २००७ चा इंग्लंड मधला 'जेली बीन्स' चा एपिसोड. पीटरसन वगैरे लोकांनी झहीर ला तो बॅटिंग करत असताना सतावल्यावर मग जेव्हा तो बोलिंग ला आला, तेव्हा पेटलेला होता. ट्रेण्ट ब्रिज ची ही कसोटी त्याने खतरनाक बोलिंग करून जिंकून दिली व आपण इंग्लंड मधे बर्याच वर्षांनंतर मालिका जिंकलो.
यानंतर २००८ मधे त्याच्या जोडीला इशांत शर्मा आल्यावर ती २-३ वर्षे झहीर-इशांत ही जोडी जबरी जमली. मग २०११ च्या सुमाराला अनेक मोठ्या संघांविरूद्ध मॅचेस जिंकून टेस्ट मधे पहिले रँकिंग व नंतर २०११ चा वर्ल्ड कप हे त्याचे महत्त्वाचे योगदान. या कप मधे त्याने नवीन बॉल वर फार भेदक बोलिंग केली नसेल, पण काही ओव्हर्स नंतर जवळजवळ प्रत्येक वेळेला जेव्हा धोनीने त्याचा स्पेल आणला तेव्हा त्याने विकेट मिळवून दिली.
सुंदर बॅटिंग प्रमाणेच सुंदर अॅक्शन असलेल्यांची बोलिंगही बघण्यासारखी असते. त्या दृष्टीने झहीर हा ही इम्रान, होल्डिंग, कपिल, डोनाल्ड च्या रांगेतला. त्याची डिलीव्हरीच्या आधीची उडीसुद्धा आधीच्या अॅक्शनच्या र्हिदम मधेच आलेली असे. तसेच विकेटनंतरचे सेलिब्रेशन सुद्धा एकदम वेगळे होते. दोन्ही हात पसरून पळत बॅट्समनच्या दिशेने येणारा झहीर कायम लक्षात राहील. कारकीर्दीच्या उत्तरार्धात तो इतर बोलर्स ना मार्गदर्शनही खूप करत असे असे वाचलेले आहे. त्याच्यात जर तसे काही कौशल्य असेल तर संघाबरोबर किमान बोलिंग कोच म्हणून त्याचा विचार झाला पाहिजे.
एकूण मागच्या दशकातील टीम्स नी एक पॅशन निर्माण केली होती, त्यात झहीरही होता. २०११ च्या कप मधल्या कायम लक्षात राहिलेल्या २-३ इमेजेस पैकी एक म्हणजे भारताची फिल्डिंग चालू होत आहे. रन अप च्या टोकाला केस रंगवलेला ओल्ड हॉर्स झहीर खाली मान घालून बॉल ग्रिप करून काही सेकंद फोकस करत शांत उभा आहे. सगळे कव्हरेज एक मिनीट पॉज होते, मग रन-अप सुरू, प्रेक्षकांचा आरडाओरडा सुरू, त्यानंतर ती क्लासिक फास्ट बोलर अॅक्शन. पुढच्या एक दोन ओव्हर मधे पार्टनरशिप तोडण्याची गॅरण्टी!
गुडबाय झहीर, आम्हा फॅन्स तर्फे धन्यवाद व शुभेच्छा!
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 8:10 am | अभिजितमोहोळकर
झहीरसारख्या टॉप क्लास बॉलरच्या निवृत्तीला शोभेलसा हा टॉप क्लास लेख!!!
16 Oct 2015 - 8:13 am | श्रीरंग_जोशी
भारतीय क्रिकेटमध्ये दीर्घकाळ योगदान देणारे वेगवान गोलंदाज तसे हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके. त्यामध्ये झहीरचे नाव आवर्जून राहील.
गोलंदाज म्हणून झहीर दर्जेदार होताच पण काही वेळा बॅटनेही त्याने कामगिरी बजावली आहे. बहुधा २००१ साली भारतातल्या एकदिवसीय सामन्यात त्याचे सलग चार षटकार अजुनही चांगले लक्षात आहेत. प्रतिस्पर्धी संघ आठवत नाही. कदाचित झिम्बाब्वे किंवा न्युझीलंड असावा.
या लेखात तुम्ही झहीरच्या करियरचा उत्तम आढावा घेतला आहे. क्लिप्सचे दुवे निवांतपणे बघतो.
समायोचित लेखाकरिता धन्यवाद.
16 Oct 2015 - 8:33 am | मुक्त विहारि
https://www.youtube.com/watch?v=K1WJsgYid18
16 Oct 2015 - 8:48 am | श्रीरंग_जोशी
क्लिपसाठी धन्यवाद.
झिम्बाब्वेविरुद्ध हेन्री ओलोंगाला मारले होते.
16 Oct 2015 - 8:18 am | अस्मी
मस्त लेख.
झहीरची भन्नाट बोलिंग ऍक्शन अजूनही आठवतेय. आणि त्याने हेन्री ओलोंगाला मारलेले एकाच ओवरमधले चार सिक्स!!
16 Oct 2015 - 8:30 am | मुक्त विहारि
वाखूसा.
16 Oct 2015 - 8:33 am | किसन शिंदे
भन्नाट लेख! झहीर आपला आवडता बाॅलर..
16 Oct 2015 - 10:08 am | नाखु
शांत तरी संयमीत आक्रमक.
खांदे पाडून बोलींग नाही.
16 Oct 2015 - 8:48 am | चांदणे संदीप
झहीरसारखाच वेगवान लेख आवडला!
झहीरला निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी खूप शुभेच्छा!!
Sandy
16 Oct 2015 - 9:29 am | बोका-ए-आझम
२०११ च्या विश्वचषक अंतिम फेरीतला झहीरचा पहिला स्पेल अविस्मरणीय होता. तसंच मला आठवतोय तो इंग्लंडविरुद्ध टाय झालेल्या सामन्यात त्याने स्ट्राउस आणि बेल ही जम बसलेली आणि शतकी भागीदारी केलेली जोडी फोडली आणि भारताला सामना जिंकायची आशा वाटायला लागली.
16 Oct 2015 - 10:02 am | प्रचेतस
उत्कृष्ट लेख.
16 Oct 2015 - 10:03 am | मृत्युन्जय
सुंदर लेख. जहीर खान आवडता बॉलर होता.
16 Oct 2015 - 10:51 am | वेल्लाभट
झहीरच्या क्रिकेट कारकीर्दीचे सिंहावलोकनच केलेत!
खूप छान आणि वाईट वाटलं वाचून. झहीर विल बी मिस्ड. नक्कीच; नेहमीच.
रादर; क्रिकेटच गेल्या दशकासारखं राहिलेलं नाही आता. त्यामुळे 'दॅट' क्रिकेट विल बी मिस्ड ऑलटूगेदर.
बाकी तुमचे क्रिकेटवरचे लेख येत राहूदेत... सॉलिड लिहिता.
16 Oct 2015 - 11:02 am | एस
मस्त लेख. झहीरला शुभेच्छा.
16 Oct 2015 - 11:28 am | नाव आडनाव
झहीरला शुभेच्छा.
बंगलुरूचा एक मस्त विडेओ :)
https://www.youtube.com/watch?v=E3VKtLRyooo
16 Oct 2015 - 11:35 am | उगा काहितरीच
जहीर चांगला बॉलर होता याबद्दल दुमत नाहीये पण २००३ च्या विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात रडवले होते राव त्याने. रच्याकने त्याची उडी व हरभजनची विचित्र ॲक्शन सुरूवातीला बरीच चर्चेत असायची..
16 Oct 2015 - 12:32 pm | ज्ञानोबाचे पैजार
झहीर रणजी खेळायचा तेव्हा पासुनच तो माझा आवडता बॉलर. मुळचा श्रीरामपुरचा असलेला झहीर मुंबई कडुन अंडर १९ खेळायचा आणि बडोद्या कडुन रणजी.
९२ कसोटी सामन्यांमध्ये ३११ विकेट आणि २०० एकदिवसीय सामन्यांमधे २८२ विकेट घेणारा झहीर नेहमीचा स्मरणात राहील.
त्याला २०११ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
पैजारबुवा,
16 Oct 2015 - 12:33 pm | चाणक्य
मस्त लेख. आवडला.
16 Oct 2015 - 2:06 pm | मित्रहो
भारतात फास्ट बॉलर तयार होने आणि त्याने सातत्याने चांगली कामगिरी करुन दाखविणे कठीणच. झहीरने ते करुन दाखविले. दुर्दैवाने 'Unsung hero' 'He bowled extremely well today but not lucky' ही वाक्ये झहीरच्या बाबतीत नेहमीच ऐकायला आली. भारतीय खेळपट्ट्या, आपले क्षेत्ररक्षण अशी बरीच कारणे होती.
२०११ च्या वर्ल्ड कपचा हिरो जसा युवराज होता तसाच झहीर खान. उपांत्यपूर्व सामना, भारत वि. ऑस्ट्रेलिया. सुरवातीच्या पडझडीनंतरही नेहमीप्रमाणे ऑस्ट्रेलिया सावरली आणि झहीर आला. त्याने बराच वेळ खेळपट्टीवर असनाऱ्या पाँटींगची विकेट काढली, ऑस्ट्रेलीया मोठी धावस्ंख्या उभारु शकला नाही. बऱ्याचदा झहीरला विकेट पण मिळत नसे पण त्याची दोन तीन ओव्हर्स समोरच्याची लय बिघडवायला पुरेसे असत.
आज काय परिस्थिती आहे बघा. पस्तीस ओव्हर झाल्या की आपण मोजायला लागतो आश्विनची फक्त दोन ओव्हर्स राहीली बाकीची फास्ट बॉलर्स म्हणजे काही खरे नाही. झहीरला खरेच मिस करतोय. आज परत जाणवते २००० ते २०११ या काळात झहीर काय चीज होता ते.
22 Oct 2015 - 11:22 am | नया है वह
झहीरला खरेच मिस करतोय. आज परत जाणवते २००० ते २०११ या काळात झहीर काय चीज होता ते
16 Oct 2015 - 2:18 pm | श्रीगुरुजी
सुंदर लेख!
२०११ च्या विश्वचषक स्पर्धेत झहीर म्हणजे भारताचे ब्रह्मास्त्र होता. भारताच्या ३३८ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडने सामना जवळपास खेचून आणला होता. परंतु झहीरने दुसर्या टप्प्यात गोलंदाजीला आल्यावर रिव्हर्स स्विंग व यॉर्करचा वापर करून २ षटकात ३ गडी बाद करून एकदम रंग पालटून टाकला होता.
झहीरचे २००० मधील पदार्पणही सनसनाटी होते. चँपियन्स ट्रॉफीचा भारताचा पहिला सामना केनयाविरूद्ध होता. त्यात झहीर व युवराज या दोन नवोदीत खेळाडूंनी पदार्पण केले होते. दुसरा सामना स्टीव्ह वॉ च्या बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाविरूद्ध होता. भारताची प्रथम फलंदाजी होती. युवराजने फलंदाजीला आल्यावर केवळ दुसर्याच चेंडूवर स्क्वेअरलेग मधून चौकार मारून धडाक्यात सुरूवात केली व नंतर केवळ ८० चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. नंतर झहीरने जबरदस्त आक्रमक गोलंदाजी करून स्टीव्ह वॉ चा त्रिफळा उडविला होता. "भारताचे नवोदीत खेळाडू इतके आक्रमक असतील याची आम्हाला कल्पना नव्हती" असे तो सामना भारताने जिंकल्यावर स्टिव्ह वॉ म्हणाला होता.
आक्रमक देहबोली, प्रभावी रिव्हर्स स्विंग आणि जबरदस्त यॉर्कर ही झहीरची प्रमुख अस्त्रे. दुर्दैवाने २०११ नंतर दुखापतीमुळे त्याच्या कारकीर्दीला ग्रहण लागले. या महान खेळाडूच्या कारकीर्दीला सलाम!
16 Oct 2015 - 2:54 pm | कपिलमुनी
२००० ची चॅम्पियन ट्रॉफी झहीर आणि युवराजच्या पदारपणाने लक्षात राहीली.
भारतात डावखुरा वेगवान बॉलर ही दुर्मिळ गोष्ट होती . आणि भारतीय पाटा खेळपट्ट्यांवर सतत घाम गाळणे त्याहून अवघड !
२०००- २०१४ झहीरने वेगवान गोलंदाजी संभाळली.
या महान खेळाडूच्या कारकीर्दीला सलाम!
16 Oct 2015 - 3:08 pm | पद्मावति
मस्तं लेख. समयोचित.
16 Oct 2015 - 3:38 pm | अद्द्या
जबरा लेख . नेहमीप्रमाणेच .
पठाण आणि झहीर अगदी आवडते गोलंदाज .
16 Oct 2015 - 4:02 pm | चतुरंग
झहीरखान!एकदम मस्त बॉलर. कपिलनंतर याचीच अॅक्शन लक्षात राहील अशी होती. फास्ट बॉलर्समधे सुंदर रन अप फार कमी जणांचा असतो. मायकेल होल्डिंग, सर रिचर्ड हॅडली, इम्रान, कपिल असे काही खंदेवीर लागलीच डोळ्यासमोर येतात.
एकूण रिवर्स स्विंग आणि यॉर्कर्स ही अस्त्रे अतिशय कल्पक रितीने वापरणारे गोलंदाज हे प्रभावी कामगिरी करु शकतात त्यात झहीरचा नंबर नक्कीच फार वरचा लागेल. आमच्या नगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूरचा असल्याने एक वेगळीच आत्मियता त्याच्याबद्दल वाटते! सलाम झहीर. वी विल मिस यू!!
16 Oct 2015 - 4:55 pm | जगप्रवासी
माझा आवडता बॉलर. ह्याचा योर्कर, रिवर्स स्विंग सगळेच अफलातून. पहिल्या १० ओवर्स मध्ये विकेट नक्की असायची.वी विल मिस यू!!
16 Oct 2015 - 5:20 pm | खेडूत
सुंदर लेख .
काल त्याच्या निवृत्तीची बातमी वाचल्यावर अशा लेखाची अपेक्षा होतीच.
गेल्या दशकातला हा आवडता बॉलर. नव्या चेंडूवर त्याची बोलिंग पहाणे म्हणजे मेजवानी असे. अजून काही सामने त्याला मिळायला हवे होते असं वाटत होतं . सचिन, सौरव, राहुल, लक्ष्मण, सेहेवागसारखे फलंदाज संघात असताना दुसरीकडे बॉलिंगची बाजू भक्कम करण्यात झहीरचा मोठा वाटा होता.
झहीरबद्दल ऐकलेली आणखी एक गोष्ट म्हणजे शालेय अभ्यासात सुद्धा तो चांगला होता. बारावीनंतर त्याला चांगले गुण मिळून अभियांत्रिकीला प्रवेश मिळाला होता असं माझे प्राध्यापक सहकारी म्हणत . पण आपल्या सुदैवाने त्याने क्रिकेट खेळायचे ठरवले. त्या काळी (१९९६-९७) अभियांत्रिकीच्या जागा तुलनेने कमी होत्या आणि किमान तीन चार हजार जणांना प्रवेश मिळत नसे हे महत्वाचे !
त्याची आकडेवारी एकत्रित इथे पहाता येईल.
16 Oct 2015 - 9:10 pm | मदनबाण
मस्त लेख...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-नगाड़ा संग ढोल बाजे ढोल बाजे... :- Goliyon Ki Raasleela Ram-leela
16 Oct 2015 - 9:22 pm | जव्हेरगंज
वर्ल्डकप २०११ च्या फायनलला झहिरच्या सुरुवातीच्या ओव्हर अफलातुन होत्या..
क्लास लेख.
16 Oct 2015 - 9:47 pm | पैसा
उत्तम लेख!
16 Oct 2015 - 9:47 pm | सचिन कुलकर्णी
ग्रेग चैपेल्ने (इतर वरिष्ठ खेळाडूंप्रमाणेच) झहीरलाही संपवायचा व्यवस्थित प्रयत्न केला हेही लक्षात राहील.
16 Oct 2015 - 10:38 pm | सौन्दर्य
अतिशय सुंदर, नीटनेटका आणि क्लिपिंग्जची रेलचेल असलेला तुमचा लेख खूप आवडला. क्लिपिंग्ज मुळे खूप चांगली मेजवानी मिळाली. असेच लिहित रहा आणि आम्हाला मेजवानी देत रहा.
18 Oct 2015 - 7:01 am | सुधीर कांदळकर
ओघवता आणि वरील एका प्रतिसादात म्हटल्यापमाणे वेगवान लेख. प्रतिस्पर्ध्यांना त्यांच्या देशात जाऊन माज दाखवणारा पहिला भारतीय गोलंदाज. २००० सालची स्टीव्ह वॉ ची दांडी संस्मरणीय. फलंदाजाला चकवून चेंडू यष्टीजवळून गेला की उंदराला खेळवत असल्याचा त्याच्या चेहर्यावरचा भाव आणि ते कुत्सित हास्य - खासकरून पॉन्टीन्गविरुद्ध आणि एकंदरीतच मिजासखोर म्हणूनच भारतीयांना आवडणरी देहबोली लाजबाब.
एक फारसा न गाजलेला प्रसंग आठवला. कधी नव्हे तो मिड ऑफला वर्तुळाच्या आत उभा होता. हालचाल करून फलंदाजाची एकाग्रता घालवायचा प्रयत्न त्याने केला. अंपायरला वाटले तो रेषेच्या बाहेर जातो आहे. बहुधा निवृत्तीला आलेला डेव्हीड शेफर्ड - अंपायरने त्याला पुढे उभे राहायला सांगितले. हा उर्मट पठ्ठ्या जेमतेम दोन पावले पुढे झाला आणि मी बरोबर उभा आहे असे उद्धटपणे खूणावले. अंपायर चांगला असल्याने मला वाईट वाटले. तोच हेअर असता तर बरे वाटले असते.
दुसरा एक मजेशीर प्रसंग. आफ्रो आशियाई कप एकदा झाला होता. आशियाचे नऊ गडी बाद झाल्यावर शोएब अख्तर आणि झहीर फळ्दाजी करीत होते आणि आपण मोठे फलंदाज असल्यासारखे एकमेकांना सूचना देत होते. हहपुवा झाली होती ते पाहून.
तिरंगा उंच ठेवणार्या आवडत्या झहीरला मानाचा मुजरा.
21 Oct 2015 - 12:19 pm | वेल्लाभट
आता सेहवागबद्दलही लेख येऊद्या.
दूध पितो म्हणून खिल्ली उडालेला, पण भल्याभल्यांना 'पाणी' पाजणारा भारतीय क्रिकेटचा आणखी एक वाघ क्रिकेटच्या जंगलातून बाहेर गेला.
21 Oct 2015 - 8:44 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला. झहीर नेहमीच 'गुड बॉय' वाटत आला आहे.
स्वाते