चित्तर यांचा 'मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक' हा लेख वाचून आमची संतापाने लाही लाही झाली आहे. एकतर अशा लेखाची मूळ कल्पना आमची. त्यात तात्या अभ्यंकरानी गडबडीने या विषयावर लिखाण केले तेंव्हा आम्ही कसेबसे शांत बसलो पण आता या मूषकदौडीत चित्तर हेही उतरले, एवढेच नव्हे तर या विषयावर आपलेही लिखाण सुरु आहे अशी सर्किट यांनी धमकी दिल्याने आम्हाला हा आक्रमक पवित्रा घेऊन या विषयावरील प्रताधिकार सिद्ध करण्यासाठी हा लेख लिहिणे भाग पडत आहे. (सर्किट यांनी आता सन्जोप राव यांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःची 'शैली' निर्माण करणे आवश्यक झाले आहे. नुकत्याच वादाच्या भोवर्यात अडकलेल्या एका सज्जानाने सर्किट यांना 'सन्जोप रावांचा गंडा बांधा, मोठी मजल माराल' असे वारंवार (म्हणजे एकदा) सुचवल्याने सर्किट यांनी जुलैत गंडाबंधन आयोजित केले आणि ऐन वेळी कल्टी मारली असे आमचा गुप्तहेर कळवतो. ) त्यातून 'संजोपराव तात्यांवर जळतात असं मला सुचवायचं नाही'' या वाक्याचा तर आम्हाला कमालीचा म्हणजे कमालीचा संताप आला आहे. या वाक्याचा 'संजोपराव तात्यांवर जळतात असंच मला सुचवायचं आहे' असाच अर्थ अभिप्रेत आहे, हे न कळण्याइतके आम्ही दुधखुळे आहोत असे चित्तर यांना म्हणायचे आहे काय? हे वाक्य लिहून चित्तर यांनी आमचा वैयक्तिक अपमान नव्हे तर व्यावसायिक गौप्यस्फोट करुन औचित्यभंग केला आहे असे आमचे मत आहे. अहो, असे कुठे उघड लिहायचे असते का? त्यातून सन्जोप राव यांना चक्क नऊ वेळा भेटून आपण तीन चार वेळाच भेटलो असे सुचवून चित्तर यांनी उरलेल्या भेटींत काय झाले ते आता आठवतही नाही ही आत्मघातकी कबुली दिली आहे (तरी मी सांगत होतो, की आता पुरे! इति सन्जोप राव) , हे फार म्हणजे फारच झाले!
'मी व तो' या शैलीचे हे लिखाण हीसुद्धा आमचीच कल्पना बरं! नंतर कुणी बेडेकर की कुबलांनी ती आपल्या नावार खपवली असे ऐकून आहे.तर ते असो. आंतरजालावरचे खरे दणकेबाज लेखक कोण यावर आम्ही आमचे अस्सल मत व्यक्त करण्याची आता वेळ आली आहे. आमच्या मते आंतरजालावर मराठी लेखन करणार्या पहिल्या दहा लेखकांची यादी खालीलप्रमाणे आहे:
१. सन्जोप राव
२.सन्जोप राव
३.सन्जोप राव
४.सन्जोप राव
५.सन्जोप राव
६.सन्जोप राव
७.सन्जोप राव
८.सन्जोप राव
९.सन्जोप राव
१०.सन्जोप राव
सन्जोप राव यांच्यासारखा लेखक गेल्या दहा हजार वर्षांत झाला नाही असे आमचे ठाम मत आहे. (अशा शैलीची वाक्ये मराठीतले कोणीसे साहित्यीक वापरत असत म्हणे, पण ही मूळ कल्पना आमचीच.) सन्जोप राव यांच्या 'मरणा, काय तुझा तेगार!' वगैरे फुटकळ लिखाणाचा चित्तर यांनी उल्लेख केला आहे, यातून त्यांच्या व्यासंगाचा अभाव दिसून येतो. आमच्या मते सन्जोप राव यांच्या 'पाय मातीचे' या कथेइतकी सरस कथा दहा हजार वर्षांत वगैरे... दुर्दैवाने कूपमंडुकी समीक्षक मंडळींनी तिला 'फसलेली कथा' वगैरे म्हटले, पण या बद्धकोष्ठी मंडळींचे हे असेच असते. राज्याच्या मुख्यमंत्र्याने स्विस बँकेत रिव्हॉल्वर घेऊन जाणे यासारख्या चमकदार कल्पना सन्जोप राव यांच्या चित्तचक्षुचमत्कारिक कल्पनाशक्तीचेच पैलू दाखवतात. इंग्रजीतल्या कुणी जेफ्री आर्चर नावाच्या भडभुंज्या लेखकाने या कथेवरुन स्फूर्ती घेऊन एक कथा पाडली आहे असे म्हणतात, पण तो किस्सा पुन्हा कधीतरी...
यावरुन आठवले, ऐहिक हेही आमचे एक आवडते लेखक. (की लेखिका? हापण एक वादाचा मुद्दा) तात्या अभ्यंकरांच्या गुटगुटीत साहित्यीक शरीरावर चरणारी एक जळू या भूमिकेतून केलेले त्यांचे लिखाण आम्हाला अत्यंत आवडते. ऐहिक म्हणजे साक्षात आम्हीच आहो, असे काही तांत्रिक माहितीच्या आधाराने सर्किट यांनी तात्या अभ्यंकरांना त्यांच्या (म्हणजे सर्किट यांच्या, तात्या अभ्यंकर कुठे जाणार? फारफारतर देवगडला! नाहीतर पुण्याला!) अलीकडील भारतभेटीत सांगितले आणि त्यावर तात्या अभ्यंकरांनी भर मित्रमंडळ चौकात गाय छापची एक भरभक्कम पिंक टाकली आणि 'बायलीला!' असे उद्गार काढले असे आमचा गुप्तहेर (म्हणजे आजानुकर्ण नव्हे!) कळवतो. पण ऐहिक म्हणजेच महेश वेलणकर हे तात्या अभ्यंकरांना सांगायला सर्किटराव कसे विसरले कोण जाणे! पण ते असो, ऐहिक यांच्या 'थोरामोठ्यांच्या सहवासात' आणि 'आपलं प्रिंशिपल है बंधो' या विडंबनात्मक लेखांनी साक्षात ठणठणपाळ फिका पडला असता असे आमचे मत आहे. समजा तात्या अभ्यंकरांनी लिखाण बंद केले (तेवढं कुठलं हो नशीब! -इति सन्जोप राव) तर ऐहिक कसे लिहितात -करेक्शन - कशा लिहितात - ते पहायला आम्ही उत्सुक आहोत.
अत्त्यानंदराव हेही आमचे एक अत्यंत आवडते लेखक. त्यांचे लिखाण वाचत असताना पांढर्या रंगाचे एक (गिर्रेबाज असे लिहिणार होतो, पण ते विशेषण इथे लागू नाही!) गुबगुबीत कबूतर संगणकाच्या आत बसून आपल्या चोचीने संगणकाच्या पडद्यावर टकटक करत आहे, असा आम्हाला भास होतो. कुणी जरा आपल्या अस्तन्या सरसावू द्या, अत्त्यानंदजी सरसावलेच समेट करायला! अत्त्यानंदांच्या शालीन मधाळ लिखाणाचे आम्ही फ्यान आहोत.
याशिवाय केशवसुमारांचे गुरुजी (आणि 'जो मी नाही' असे 'अदिभौतिक' सत्य पटवण्यासाठी चित्तर यांना आकाशपाताळ एक करावे लागले ते) खोडसाळपंत, गोळेगुरुजी, 'किस्से ओकारीचे' सारखे अजरामर साहित्य लिहून ठेवणारे अनिकेतसमुद्र यांनीही मराठी जालविश्वात मोलाची भर घातली आहे. पण ते किस्से पुन्हा कधीतरी... (ही पण मूळ आमचीच शैली हो!)
प्रतिक्रिया
19 Sep 2007 - 8:30 pm | विसोबा खेचर
अत्त्यानंदराव हेही आमचे एक अत्यंत आवडते लेखक. त्यांचे लिखाण वाचत असताना पांढर्या रंगाचे एक (गिर्रेबाज असे लिहिणार होतो, पण ते विशेषण इथे लागू नाही!) गुबगुबीत कबूतर संगणकाच्या आत बसून आपल्या चोचीने संगणकाच्या पडद्यावर टकटक करत आहे, असा आम्हाला भास होतो.
खुर्चीतून खाली पडायच्या बेतात आहे! :)
तात्या अभ्यंकरांच्या गुटगुटीत साहित्यीक शरीरावर चरणारी एक जळू या भूमिकेतून केलेले त्यांचे लिखाण आम्हाला अत्यंत आवडते.
यातलं 'गुटगुटीत साहित्यीक शरीरावर चरणारी एक जळू' हे सहीच :)
पण रावशेठ, अजून बरेच लेखक, कवी राहिले की हो! :)
बाय द वे या निमित्ताने का होईना, आपल्यासारख्या तळपत्या लेखंदराने प्रथमच आपली तलवार मिसळपावावर चालवली ही भाग्याची गोष्ट! आणि ती नेहमी अशीच इथे तळपत राहो हीच इच्छा!
आणि काय रे संजोपा, आमच्या शांतारामबापूंच्या पिंजरावर होऊन जाऊ द्या काहीसं फक्कडसं हे तुमास्नी अजून किती डाव इनवायचं? अहो खुद्द मालक लिवा लिवा म्हनत्यात असा अणुभव तुमास्नी इतर कुठल्या संस्थाळावर आला आहे का? (असो, आज दुपारी एक विद्वान आम्हाला फरक विचारत होते, याची या णिमित्ताने आठवण झाली..:)
आपला,
(यनावालांचा, प्रमोदकाकांचा आणि बिरुटेशेठचा लाडका!) तात्या.
19 Sep 2007 - 8:38 pm | विकेड बनी
>>चित्तर यांचा 'मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक' हा लेख वाचून आमची संतापाने लाही लाही झाली आहे.
आणि माकडाच्या हाती कोलित मिळाले. अरे हे मिसळप्रेमींचे संकेतस्थळ आहे का भेसळप्रेमींचे?
आता असले अस्सल नाहीतर नक्कल लेख नंदन, चौकस, वाचक्नवी, अत्यानंद यांच्याकडून वाचावे लागणार का काय?
कोण नाहीतर पोष्टमन येतीलच टुरटुर करायला.
19 Sep 2007 - 8:44 pm | विकास
मस्त! यावरून आचार्य अत्र्यांच्या "आम्ही कोण?" या केशवसुतांच्या मुळच्या कवितेवरील विडंबनाची आठवण झाली!
आम्ही कोण? म्हणून काय पुसतां दांताड वेंगाडुनी? ।
फोटो मासिक पुस्तकांत न तुम्ही का आमुचा पाहिला? ॥
किंवा गुच्छ तरंग अंजली कसा अद्यापि ना वाचिला? ।
चाले ज्यावरती अखंड स्तुतिचा वर्षाव पत्रांतुनी? ॥ १ ॥
....
काव्याची भरगच्च घेऊनि सदा काखोटिला पोतडी, ।
दावूं गाउनि आमुच्याच कविता आम्हीच रस्त्यामधे, ॥
दोस्तांचे घट बैसवून करुं या आम्ही तयांचा उदे ।
दुष्मानांवर एकजात तुटुनी की लोंबवू चामडीं! ॥ ३ ॥
....
19 Sep 2007 - 8:53 pm | आजानुकर्ण
तात्यांच्या भाषेत प्रतिसाद द्यायचा तर
ह हा हि ही हु हू हे है हो हौ हं हः
जबरदस्त. :)
(सुप्तहेर) आजानुकर्ण
19 Sep 2007 - 9:06 pm | प्रमोद देव
अत्त्यानंदराव हेही आमचे एक अत्यंत आवडते लेखक. त्यांचे लिखाण वाचत असताना पांढर्या रंगाचे एक (गिर्रेबाज असे लिहिणार होतो, पण ते विशेषण इथे लागू नाही!) गुबगुबीत कबूतर संगणकाच्या आत बसून आपल्या चोचीने संगणकाच्या पडद्यावर टकटक करत आहे, असा आम्हाला भास होतो.
खुर्चीतून खाली पडायच्या बेतात आहे! :)
हसणं आवरणं कठीण होऊन बसलंय!
बाकी चित्तरना धन्यवाद! कारण त्यांच्यामुळेच संजोपजी लिहायला प्रवृत्त झालेत.
आंतरजालावर मराठी लेखन करणार्या पहिल्या दहा लेखकांची यादी खालीलप्रमाणे आहे:
१. सन्जोप राव
२.सन्जोप राव
३.सन्जोप राव
४.सन्जोप राव
५.सन्जोप राव
६.सन्जोप राव
७.सन्जोप राव
८.सन्जोप राव
९.सन्जोप राव
१०.सन्जोप राव
ह्या बाबतीत १०१% सहमत!
रावसाहेब तेव्हढे हरितात्या-अंतू बर्वा कडे पण एकदा लक्ष द्या ना! केव्हापासून मोठ्या आशेने वाट पाहताहेत ते!
20 Sep 2007 - 12:14 pm | स्वाती दिनेश
लेख आवडला,सही!..विकास यांनी म्हटल्याप्रमाणे केशवकुमारांच्या आम्ही कोण? ची आठवण झाली..
स्वाती
22 Jul 2010 - 8:41 pm | क्रेमर
'मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक' ही मालिकाच वाचनीय आहे.
-क्रेमर (पूर्वीचा अक्षय पुर्णपात्रे (पूर्वीचा कर्क))
_________________
सोळा कुकांनी मिसळीची वाट लावली आहे का? बाकी चालू द्या.
17 Sep 2019 - 11:17 pm | भीडस्त
असलं भारी वाचायला मिळायचं मिसळपाववर.
या लिखाणाच्या तपपूर्तीनिमित्त धागा वर आणल्याचा आनंद