राम जोशी (१७६२-१८१२) - पेशवाईअखेरचा एक मराठी कवि व प्रख्यात लावणीकार. हा सोलापूरचा राहाणारा यजुर्वेदी देशस्थ ब्राह्मण व तेथील वृत्त्यंशी जोशी होत. यानें बैराग्यपर व शृंगारपर उत्कृष्ट लावण्या केल्या आहेत.
छंद:शास्त्रावर व 'छंदोमंजरी' नांवाचा त्याचा एक ग्रंथ आहे. याखेरीज मदालसाचंपू व इतर खंडकाव्यें यानें केली आहेत. मोरोपंताच्या आर्या यानेंच विशेषत: प्रसिद्धीस आणल्या. हा त्या कालांतील लावण्या व पवाडे करणारांचा 'तुरा' होता. याचें सर्व चरित्र विशेषच होतें. स्वभाव, बुद्धीची तीव्रता विद्वत्ता, आयुष्यक्रम, छंदफंद हे सर्व विशेषच होते.
याच्या बापाचें नांव जगन्नाथ. जोशीबुवाचा वडील भाऊ मुग्दल हा नांवाजलेला व्युत्पन्न शास्त्री व पुराणिक होता. बुवा लहानपणीं सारा वेळ तमासगिरांच्या बैठकींत बसत व लावण्या म्हणत. याबद्दल भावानें कानउघाडणी केल्यामुळें घरून निघून हे तुळजापुराकडे गेले. तिकडे त्यांनीं काव्य व व्याकरणाचा अभ्यास केला व कुशाग्र बुद्धीमुळें त्यांत पारंगतता संपादली, पण पुन्हां तमाशांचा छंद धरला. सोलापुरास धोंडी शाहीर याच्या आखाडयांत बुवा प्रथम शिरले. विद्वत्तोमुळें यांच्या लावण्या गोड, रसाळ व प्रौढ असत म्हणून त्या लोकांनां फार आवडूं लागल्या. त्यांच्या लावण्यांत ते आपलें नांव व्यंकटपति, राम, कविराय असें घाली..
कालांतरानं राम जोशी सोलापूर सोडतात. गावोगावी होणाऱ्या लावण्यांच्या स्पर्धांमध्ये आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाग घेण्याचा ते सपाटा लावतात. त्यानिमित्तानं त्यांची भेट बयाबाई या तमासगिरीणीबरोबर होते. या दोघांचा फडावर सामना ठरतो. या सवाल-जवाबामध्ये आपण हरलो तर राम जोशांची बटिक बनून जनम काढू, असं बयाबाई जाहीर करते. तेव्हा आपल्या लेखणीचं सर्व कौशल्य पणाला लावून राम जोशी बाजी मारून जातात आणि त्यांच्या लेखणी-गायनावर बयाबाई फिदा होते. ती त्यांच्या प्रेमात पडते
ते सवाल जवाब रामजोशी चित्रपटाल महाकवि ग,दी,मा,,नी अप्रतिम पणे लिहिले आहेत
ते असे
सवाल: पंचाग सांगता जलम गमविला उगाच सांगता काय भीती....अन चंद्र कोरीपुढं तुमचा काजवा चमकुन चमकल तरी किती...पोथ्या पुराणं वाचुन-वाचुन अक्कल वाढली असंल अती...तर चंदराचं चांदण शीतल का उष्ण का सांगा हो मजप्रती
जवाब: क्षयी कोर तु सूर्यापुढची तेज ओकीसी किती गं....विरहामध्य उष्ण चांदणे...शितल पती संगती ग..
************
सवाल: पाण्यामधली एक अप्सरा सहज भाळली नरावर, अन कधी कोण ते सांगून द्यावे, सवालास उत्तर..जी..जी.जी..
जवाब: पुराणातली वांगी राहू द्या पुराणात असली रं...नागकन्यका उलपी पूर्वी पार्थावर भुलली रं....
***************
सवाल: पती सोडूनी सती, कोण ती रतली अविरत परक्यासी...खारट त्याचे चुंबन घेई....एका मुखाने शिवा दोन्हीसी...
जवाब: पतीत पावन त्रिभूवन जीवन मुनीजन बोलती स्वर्गधुनी...निंदू नको जरी सिंधूस मिळली...गंगा गंगाधर त्यजुनी...
*****************
सवाल: तुझीच दौलत परंतू दैवे भाळी तुझ्या नाही.. गं...तुझीच असूनी तुझ्या दृष्टीला दुर्मिळ ते पाही गं.... तुझ्याच पाशी जन्मभरी ते रम्य दोन पेले गं...सुधा, हलाहल आणि मदिरा यानी भरलेले गं....
जवाब: कवडी पांढरी, लोलक काळा- लाल जरा कोने गं...जगती मरती जीव झिंगती आतील नजरेने..गं....शुभ्र पांढरे असते अमृत...हलाहलाचा रंगच काळा....सांग गुलाबी नेत्रकडांहून मद्याचा का रंग निराळा...जगवी अमृत, मारी हलाहल, मद्य झिंगवी कैफात...काढून बघ हे गुण तिनही असती तुझीया डोळ्यात...
***************
सवाल: सूर्य उगवता गगनामाजी जळी कमलिनी का फुलती, पूर्ण चंद्रमा नभात दिसता, सागरास का ये भरती...?
जबाब: सूर्य उगवता...कमल उमलते...सिंधू उसळतो चंद्रा बघुनी...शुध्द प्रिती हे एकच कारण ज्ञात्यांनो घ्या ह्रदयी भरूनी
शृंगार कवि रामजोशी ची हि उभ्या महाराष्ट्राला वेड लावणारी लावणी...
सुंदरा मनामधी भरली जरा नाही ठरली हवेलीत शिरली मोत्याचा भांग
अरे गड्या हौस नाही पुरली म्हणूनी विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..
जशी कळी सोनचाफ्याची न पडू पाप्याची दृष्टी सोप्याची नसेल ती नार
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढून सुकूमार... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..
जशी मन्मथ रति धाकटी, सिंहसम कटी, उभी एकटी, गळ्यामधी हार... अंगी तारूण्याचा बहर, ज्वानीचा कहर, मारिते लहर मदन तल्वार...
पायी पैंजण झुमकेदार, कुणाची दार, कोण सरदार हिचा भरतार... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..
नाकामधे बुलाख सुरती, चांदणी वरती, चमकती परती हिच्यापुढ्या फार, किनखाप अंगीचा लाल, हिजपुढे नको धनमाल
कविराज चमकतो हीर, लोकजाहीर इतर शाहीर काजवा वांग ... नारी गं...ग..ग..ग.. जी..जी..
कविराज राम जोशी यांनी शाक्त पंथ स्विकारला असे हि वाचनात येते..विलासि जिवन शैली असल्याने त्यांच्या जवळ लक्ष्मी टिकु शकली नाहि..
"तुमची लावणी अमर आहे. फक्त तिला शृंगारात अडकवू नका...' असा सल्ला मोरोपंतनी त्याना दिला होता..व शाहिरानी अनेक रसाळ कवने पण रचली..
सलाम रामजोशी ना
उत्खनन ,संकलन, सजावट.............पोस्टकर्ता
प्रतिक्रिया
22 Sep 2015 - 6:26 pm | एस
हे नक्की तुम्ही लिहिलंय?
22 Sep 2015 - 6:29 pm | अविनाशकुलकर्णी
उत्खनन ,संकलन, सजावट.............पोस्टकर्ता
22 Sep 2015 - 6:32 pm | आदूबाळ
+१ अकुपीडिया टच नाही जाणवला.
रच्याकने: "सुंदरा मनामधे भरली" या काव्यात मूळ काव्यात यापेक्षा जास्त चरण आहेत.
23 Sep 2015 - 5:38 am | बहुगुणी
यकुंच्या ब्लॉगवर यातलं काही वाचलं होतं. हा त्याचा दुवा. आणि दुसरा एक लेख इथे आहे.
22 Sep 2015 - 6:49 pm | अभ्या..
अकुकाका येताय काय सोलापुरला. माझ्या ऑफिससमोर रामजोशांचे घर आहे. जोशीगल्लीत. अभ्यास करा जरा इथे राहून.
22 Sep 2015 - 7:45 pm | मी-सौरभ
त्यांचा टी शर्ट रेडि केलास की ते येतील आसे वाटते ;)
23 Sep 2015 - 6:04 am | चाणक्य
अभ्या 'नाडी' अचूक पकडत असल्याने अकुंचा टी शर्ट भन्नाट असणार हे लिहून ठेवतो. (अकु ह.घ्या.)
23 Sep 2015 - 6:08 am | चाणक्य
रामजोशींचा परिचय आवडला. अफाटच प्रतिभा दिसतीये. पण ते 'पोस्टकर्ता' कोण ते पण सांगा म्हणजे त्यांनाही योग्य ते श्रेय मिळेल.
23 Sep 2015 - 6:49 pm | डॉ सुहास म्हात्रे
रामजोशींचा परिचय आवडला !
23 Sep 2015 - 8:38 pm | शिव कन्या
हटातटाने पटा रंगवूनी ...... राहिलं!
विस्तृत लेखन यावे.
24 Sep 2015 - 11:13 am | पद्मावति
खुपच रोचक माहिती. एका वेगळ्याच व्यक्तिमत्वाची खूप छान ओळख. खूप वर्षापूर्वी दूरदर्शन वर एक मालिका आली होती त्यात अरुण गोवील राजकवी आणि अर्चना जोगळेकर नर्तकि असते. बहुतेक ती मालिका अर्ध्यवरच बंद केली होती, नक्की काहीच आठवत नाही. हा लेख वाचून आता वाटतेय की ती मालीका बहुतेक रामजोशी यांच्या जीवनावरच होती की काय.
25 Sep 2015 - 6:48 pm | सिरुसेरि
फूलवंती - हे त्या मालिकेचे नाव . 'हि मालिका ब. मो. पुरंदरे यांच्या एका कथेवर आधारीत आहे' असे त्या मालिके च्या शीर्षकांमध्ये दाखवत असत.
24 Sep 2015 - 8:16 pm | श्रीनिवास टिळक
बहुगुणी यांनी दिलेल्या दुव्यावर श्री मंदार जोशी यांच्या लेखात राम जोशीन्बद्दल अधिक महत्वपूर्ण माहिती वाचावयास मिळाली. जोशी लिहितात " 'लोकरंजनावाचून लोकशिक्षणाला हातच घालता येणार नाही,' असा युक्तिवाद करीत राम जोशी त्या वेळी सर्वांना लोकभाषेतील संध्या ऐकवतात." यावरून बहुजन आणि ब्राह्मण समाजात समन्वय घडवून आणण्याची कुवत राम जोशीन्मध्ये होती पण नियतीला ते मान्य नसावे. असो. राम जोशी यांनी सादर केलेली लोकभाषेतील संध्या पुन्हा कुठे ऐकायला/वाचायला मिळेल का? मिळत असेल तर अजूनही बहुजन-ब्राह्मण समाज जोडण्यात तिची काही अंशी मदत होऊ शकेल.
25 Sep 2015 - 3:51 pm | बॅटमॅन
केशवकरणी अद्भुतलीला नारायण तो कसा | तयाचा सकल जनांवर ठसा |
माधवमहिमा अगाध गोडी गोविंदाच्या रसा | पीत जा, जिव होईल थंडसा ||
हे त्याचे सुरुवातीचे दोन चरण आहेत. संध्येतली चोवीसही नावे पुढे क्रमाने येतात.
पूर्ण लावणी इथे पाहता येईल.
http://www.transliteral.org/pages/z100220050704/view
लोकशाहीर रामजोशी नामक १९४७ सालचा पिच्चर आहे त्यात हा प्रसंग वर्णिलेला आहे. ते लोकरंजन, लोकशिक्षण वगैरे डायलॉग त्यातलेच आहेत. तो प्रसंगच खूप बहारदार वर्णिलेला आहे.
सवाई माधवराव पेशवे दरबारात स्थानापन्न होतात. लावणीला सुरुवात होते तोच वे.शा.सं. नीळकंठशास्त्री थत्ते, सुब्राव महाराज वगैरे लोक येऊन "ब्राह्मण असूनही तमाशासारखा नीच धंदा करतो" म्हणून रामजोश्यांची यथेच्छ निंदा करतात. तेव्हा रामजोशी म्हणतात की "लोकरंजनावाचून लोकशिक्षणाला हातच घालता येणार नाही". तेव्हा सुब्राव महाराजांचे पुत्र म्हणतात की "तू काय लोकशिक्षण देणार ? संध्येची २४ नावे तरी कधी घेतलीयेस का?" तेव्हा रामजोशी म्हणतात की "संध्येतच ब्राह्मण्य सिद्ध होणार असेल तर ही घ्या माझी लोकभाषेतील संध्या." मग ते ही लावणी ऐकवतात, खूष होऊन पेशवे थत्तेशास्त्रींना बसा म्हणतात आणि मुख्य लावणी सुरू करण्याची आज्ञा देतात. मग रामजोशी ठेवणीतली छेकापन्हुती बाहेर काढतात,
"सासुसासरा पति यांदेखत अधरामृतमाधुरी | घेतसे काय वदावे तरी?"
"तो नंदाचा मूल काय गे सांग कन्हैय्या हरी | नव्हे गं हा मधुकर पंकज हरी!"
एकेक कडवी म्हणत जातात तसे पागोट्यांसोबत पगड्याही डोलू लागतात, पुढे
"कुंजात मधुपगुंजारव यमुनातटी | होळी खेळतो हरी करुनि राधा नट आपण नटी |" ही लावणी म्हणून साक्षात् गोकुळ उभे करतात. पेशवे स्वहस्ते त्यांच्या पागोट्यात शिरपेच खोवून 'काव्यशिरताज' हा किताब बहाल करतात.
असा तो एकंदर सीन आहे. तो पूर्ण सिनेमाच अतिशय सुंदर आहे. मुद्गलशास्त्रींच्या रूपाने एका कर्मठ ब्राह्मणाची भूमिका गदिमांनी मस्त निभावलीये. मध्येच मोरोपंतही एका सीनपुरते येऊन जातात. बाकी जयराम शिलेदारांबद्दल काय बोलावे? हंड्रेड परसेंट रामजोशी.
25 Sep 2015 - 3:55 pm | बॅटमॅन
बयाबाईची भूमिका हंसा वाडकरांनीही खूप छान निभावलीये. रामजोशी विरुद्ध बयाबाई हा सुरुवातीचा सवालजबाब जो घेतलाय त्याला तोड नाही.
बाकी 'सुंदरा मनामधि भरली' ह्या लावणीचे चित्रीकरणही निव्वळ अफाट आहे. लावणी वगैरे ऐकणे शिष्टसंमत नसल्याने जुने जाणते ब्राह्मण कसे पोत्याआड तोंड लपवून मागच्या लायनीत बसतात आणि डुलत डुलत कशी दाद देतात तो शीन तर जगातभारी आहे.
25 Sep 2015 - 9:58 pm | एस
चित्रपट खरंच मस्त आहे. असे कृष्णधवल चित्रपट हल्ली कुठे पहायला मिळत नाहीत.
25 Sep 2015 - 8:16 pm | श्रीनिवास टिळक
Batmanजी: राम जोशी यांची केशवकरणी हि लावणी आणि या www.transliteral.org या संस्थळावर ती उपलब्ध आहे त्याचाही संदर्भ दिल्याबद्दल धन्यवाद. तेथे दिलेली सर्व माहिती सावकाश वाचणार आहे. पांडुरंग शास्त्री आठवले यांना राम जोशीन्बद्दल काही माहिती होती किवा नाही याची कल्पना नाही. पण फुटीर हिंदू समाजात संस्कारान्च्या माध्यमातून एकजूट निर्माण करणे हे त्यांचे एक ध्येय होते. त्याचा एक भाग म्हणून गुजरातेत त्यांनी कोळी बांधवाना प्रतिदिन संध्या करावयास शिकवली हे सर्वश्रुत आहे.
26 Sep 2015 - 1:05 am | बॅटमॅन
ही माहिती माझ्यासाठी नवीन आहे. अनेक धन्यवाद!
25 Sep 2015 - 9:46 pm | दा विन्ची
हटातटाने पटा रंगवुनि जटा धरिशि कां शिरी ।
मठाची उठाठेव कां तरी ॥
वनांत अथवा जनांत हो कां मनांत व्हावे परि ।
हरीचें नांव भवांबुधी तरी ॥
काय गळ्यांत घालुनि तुळशीची लांकडे ।
ही काय भवाला दूर करितिल माकडें ।
बाहेर मिरविशी आंत हरिशी वांकडे ।
अशा भक्तिच्या रसा-रहित तूं कसा म्हणविशी बुधा ।
हरिरस सांडुनि घेशी दुधा ॥
भला जन्म हा तुला लाधला खुलास ह्रदयीं बुधा ।
धरिसी तरि हरिचा सेवक सुधा ।
टिळा टोपिवर शिळा पडो या बिळांत करिसी जपा ।
तथापि न होय हरीची कृपा ।
दर्भ मुष्टिच्या गर्भि धरुनि निर्भर पशुची वपा ।
जाळिशी तिळा-तांदुळा-तुपा ॥
दंडकमंडलु बंड माजविशी मुंड मुंडिशी तपा ।
न सार्थक लटक्या सार्या गपा ॥
ही बारबार तलवार येईल काय पुन्हां ।
ह्या दुर्लभ नरदेहांत ठेविशी कुण्हा ।
भगवंत भुकेला भक्तीचा पाहुणा ।
वर्म कळेना धर्म घडेना कर्म चित्त न द्विधा ।
सदा हरि कविरायावर फिदा ॥
आठवणीतली गाणी या संस्थलावरून साभार
26 Sep 2015 - 1:28 am | शिव कन्या
झालं जमा. धन्यवाद दा विन्ची. :-)
25 Sep 2015 - 9:47 pm | दा विन्ची
सुंदरा मनामध्ये भरली जरा नाही ठरली हवेलित शिरली मोत्याचा भांग ।
अरे गड्या हौस नाहीं पुरली म्हणोनि विरली पुन्हा नाहीं फिरलि कुणाची सांग ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
जशि कळी सोनचाफ्याची न पडु पाप्याची दृष्टी सोप्याची नसंल ती नार ।
अति नाजुक तनु देखणी गुणाची खणी उभी नवखणी चढुन सुकुमार ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
जशि मन्मथ रति धाकटी सिंहसमकटी उभी एकटी गळ्यामध्यें हार ।
अंगि तारुण्याचा बहर ज्वानिचा कहर मारिते लहर मदन तलवार ।
पायी पैंजण झुमकेदार कुणाची दार ? कोण सरदार हिचा भर्तार ?
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
नाकामध्यें बुलाख सुरती चांदणी वरती चमकति परति हिच्यापुढे फार ।
किनकाप अंगिचा लाल हिजपुढे नको धनमाल ।
कविराज चमकतो हीर लोकशाहीर इतर शाहीर काजवा वांग ।
नारी ग ऽऽऽ , ग ग ग जी ।
सुंदरा मनामध्ये भरली.. सुंदरा ।
आठवणीतली गाणी या संस्थलावरून साभार
25 Sep 2015 - 11:06 pm | रामपुरी
माहीतीपूर्ण लेख