गेले बरेच दिवस 'शटर' बघायचा होता. 'बजरंगी भाईजान' आणि 'बाहुबली'च्या सुनामीपुढे या इवल्याशा जीवाचा काय निभाव लागणार ही धाकधूक होतीच. गेले 2-3 आठवडे काही कारणांमुळे 'शटर' बघायला वेळच मिळत नव्हता. शेवटी गेल्या रविवारी 'बुक माय शो' उघडले आणि 'शटर' शोधू लागलो. 'बजरंगी भाईजान' आणि 'बाहुबली' या दोघांनी इंच न इंच जागा व्यापली होती. पण शेवटी अभिरुची सिटी प्राईडला 'शटर'चा एक खेळ दिसला. लगेच दोन जागा आरक्षित केल्या.
अभिरुची सिटी प्राईडला आम्ही पहिल्यांदाच गेलो. छान ऐसपैस चित्रपटगृह आहे. थोड्या वेळानॆ 'शटर' उघडले. मूळ याच नावाच्या मल्याळी चित्रपटाचा हा मराठी रिमेक आहे.
जित्याभाऊ (सचिन खेडेकर) हा मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारा एक कर्मचारी. मुंबईमध्ये याचं घर आहे. बायको आणि दोन मुली या घरातच राहतात. महिन्याभराच्या सुटीवर जित्याभाऊ घरी आलेला असतो. मोठी मुलगी , परी (कौमुदी वाळोकर) कॉलेजला शिकत असते. तिचं सारखं फोनवर असणं, उशीरा घरी येणं जित्याभाऊला खटकत असतं. त्यात एकदा ती तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत रस्त्यावर गप्पा मारत असतांना जित्याभाऊला दिसते. झालं. जित्याभाऊ खवळतात आणि तिचं लग्न लावून द्यायचं ठरवतात. जित्याभाऊची पत्नी (राधिका विद्यासागर) समंजस असते. ती त्याला समजावून सांगते पण जित्याभाऊ पेटलेले असतात. मुलगी गयावया करते. पण जित्याभाऊ ऐकत नाही. जित्याभाऊला आपल्या मित्रांसोबत थोडं तीर्थप्राशन करण्याची आवड असते. घराच्या समोरच जित्याभाऊचा एक रिकामा गाळा असतो. त्या गाळ्यावरून जित्याभाऊचं सख्ख्या मेहुण्याशी वाजलेलं असतं. जित्याभाऊ आपल्या मित्रांसोबत प्रत्येक संध्याकाळ या दुकानात सत्कारणी लावत असतो. असं सगळं बरं चाललेलं असतं.
एका रम्य संध्याकाळी जित्याभाऊ आणि त्याचे मित्र दुकानात येऊन बसतात. गप्पा सुरू होतात. पण बाटल्या नसतात. म्हणून जित्याभाऊ त्याच्या ओळखीच्या एका रिक्षाचालकाला म्हणजे एक्याला (अमेय वाघ) फोन करून बाटल्या आणायला सांगतो. एक्या बाटली घेऊन येतो. एकच बाटली आणली म्हणून सगळे कुरकुरतात आणि एक्याला शिव्या घालतात. ती बाटली लगेच संपते. आणखी दारू आणायला ते कुठल्यातरी बारमध्ये जायला निघतात. दोन मित्र सकाळी कामावर जायचे असल्याने कलटी मारतात. तिसर्याला बायकोचा फोन आल्याने तो देखील निघून जातो. राहतात जित्याभाऊ आणि एक्या! दोघे रिक्षात बसून निघतात. एक्या दारू आणायला जातो. जित्याभाऊ एकटेच रिक्षाजवळ उभे राहतात. आणि तेवढ्यात मंद सुगंधी वार्याची झुळूक यावी तशी ती तिथे येते. बस थांब्यावर एकटीच उभी राहते. तिचे ते मोहक सौंदर्य जित्याभाऊ बघतच बसतो. रेखीव बांधा, गोर्यापान सपाट पोटावर रुळणारी मुलायम साडी, मादक डोळे...जित्याभाऊ हरखून जातो. मेंदूचा ताबा आधीच मदिरेने घेतलेला असतो. त्यातच त्याच्या ट्रक ड्रायव्हर मित्राने त्याच्या गावोगावच्या मादक जानम्सचे फोटो दाखावून जित्याला घायाळ केलेले असते. ही तरुण सुंदरी जित्याच्या हृदयाचा अलगद ताबा घेते. मदिरा, मादकता, मौका, मौसम असे सगळेच मिलनोत्तेजक घटक एकत्र आल्याने जित्याभाऊच्या मनात (?) खळबळ माजते. साला कुछ तो करना पडेगा. ऐसा मौका फिर कहां मिलेगा? पण घरी लाघवी, सालस, सुशील, कर्तव्यदक्ष पत्नी आणि दोन गोड मुली असतात. हे गोंधळात पाडणारे विचार आणि भावनांचे तुंबळ युद्ध जित्याभाऊच्या मनात सुरु होते. चतुर एक्या जित्याभाऊच्या मनातले हे वादळ हेरतो आणि "विचारू का तिला?" असे जित्याभाऊला विचारतो. जित्याभाऊ सुरुवातीला थोडा संकोचतो. टू बी ऑर नॉट टू बी! इक तरफ उसका घर, इक तरफ मयकदा अशी जित्याभाऊची अवस्था होते. जगातला सगळ्यात मोठा प्रश्न! क्या करें क्या न करें ये कैसी मुश्कील हाये! सालस बायको - मादक ती, सुशील बायको - मादक ती, लाघवी बायको - मादक ती...अशी तुलना मन:पटलावर येऊन गेल्यानंतर शेवटी मन:पटलावरचे भावनांचे प्रपात वरचढ ठरतात आणि तो 'विचार!' असे एक्याला सांगतो. एक्या खुशीने तिच्याकडे जाऊन सगळे ठरवतो आणि तिला रिक्षाकडे घेऊन येतो. ती बिनधास्तपणे येऊन बसते. जित्याभाऊ जरा अंग चोरून बसतो. तिच्याकडे बघण्याचं टाळतो. सालं कुठून या लफड्यात पडलो असं त्याच्या चेहर्यावरून दिसायला लागतं. पर अब तो दिल की डील हो गयी.
हॉटेलमध्ये एक्या विचारून विचारून थकतो. कुठेच मनासारखी जागा मिळत नाही. शेवटी जित्याभाऊच्या गाळ्यालाच ते भाग्य प्राप्त होणार हे निश्चित होतं. तिची बडबड चालूच असते. जित्याभाऊने तोंडाला कुलूप लावलेलं असतं. गाळा बघून ती तोंड वेंगाडते. पण चांगले पैसे मिळणार असल्यानं ती तयार होते. तिला भूक लागलेली असते. एक्याला ती पटकन अंडा भुर्जी आणि राईस आणायला सांगते. आपल्या साहेबाचं नशीब फळफळलं म्हणून एक्या खुशीने अंडा भुर्जी राईस आणायला जातो. अर्थातच गाळ्याचं शटर ओढून बाहेरून कुलूप लावूनच त्याला जायला लागतं. आपण परत येईपर्यंत साहेब मोकळे (संदर्भ: मोकळे व्हा) झालेले असतील या खुशीत तो बाहेर पडतो.
इकडे जित्याभाऊला आता लयीच कसंनुसं व्हायला लागतं. हे आपण काय करून बसलो असं वाटायला लागतं. मग तो हळूच एका छिद्रातून आपल्या घराकडे बघायला लागतो. दिवा सुरू असतो. म्हणजे त्याची बायको त्याची वाट बघत जागी असते. हे दयाघना, असा कसा रे मी पापी! असे विचार त्याच्या मनात सडा शिंपीत असतांनाच ती गप्पकन साडीचा पदर खांद्यावरून खाली टाकते. तिचे गोरे सपाट पोट, अतिकमनीय कंबर, आणि अजून बरंच काही बघून त्याच्या मनातले 'मै तुलसी तेरे आंगन की' छाप सडे नायगाराप्रमाणे धुमसणारे भावनांचे बेफाम धबधबे होतात. साला काय त्रास आहे. ये दिल मगरमच्छ की तरह होता है, कितना भी खाये, भूखा ही राहता है...
तिला वाटते की हा आता सुरु करेल पण जित्याभाऊ अजूनही भंजाळलेला असतो. शेवटी ती एका कोपर्यात झोपी जाते. उजव्या कुशीवर झोपल्याने जित्याभाऊला तिची गोरीपान पाठ दिसते. पुन्हा जित्याभाऊंचं मन उसळ्या मारू लागतं. अब तो मै बस भिड ही जाऊंगा. तो जागेवरून हलतो आणि तेवढ्यात तिला जाग येते. याचं अवसान पुन्हा गळतं.
इकडे एक्याला दुपारी जो होतकरू दिग्दर्शक त्याच्या रिक्षामध्ये स्क्रिप्ट विसरलेला असतो तो भेटतो. आपलं स्क्रिप्ट परत मिळणार म्हणून तो खुश होतो. दोघांची भेट भुर्जीच्या गाडीवर होते. तेथे त्या दिग्दर्शकाचा एक विद्यार्थी (रोहित राऊत) येतो आणि त्यांना बीअरच्या बाटल्या देउन जातो. एक्याला जबरदस्तीने बीअर पाजली जाते. दिग्दर्शक आत्ता लगेच स्क्रिप्ट हवं म्हणून एक्याला घेऊन जिकडे जित्याभाऊ आणि ती असतात त्या दुकानाकडे यायला लागतात. मध्येच पोलीस एक्याला श्वासोच्छवास करायला लावून चौकीवर घेऊन जातात. आता बसा रात्रभर चौकीत. एक्याला भलतंच अपराधी वाटायला लागतं. तो जित्याभाऊच्या मोबाईलवर फोन करून घडाघडा सांगून टाकतो. नंतर त्याच्या लक्षात येतं की फोन जित्याभाऊने उचललाच नव्हता! आता आली का पंचाईत! वहिनींनी ऐकलं असेल तर संपलं सगळं. एक्या रडायला लागतो.
दुसरा दिवस उजाडतो. आजूबाजूची दुकानं उघडतात. पुढे काय होते? जित्याभाऊ के अंदर छुपा हुआ नायगारा क्या सच मे शांत होता है? त्याच्या बायकोला ही थेरं कळतात का? 'ती' हा सगळा प्रकार कसा सहन करते? दिग्दर्शकाला त्याची स्क्रिप्ट मिळते का? बाहेर बाजारात जित्याभाऊचे हे प्रताप कळतात का? जित्याभाऊच्या मुलीचं खरंच लग्न होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातच पाहणं इष्ट आहे.
'शटर' हा एक उत्कंठावर्धक चित्रपट आहे. जित्याभाऊच्या मनातली घालमेल, एकूणच मध्यमवर्गाच्या मनात सतत चालू असणारी घालमेल, आपला स्वत:च्या आणि इतरांच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, लोकांना त्यांच्याविषयी कुठलीही माहिती नसतांना चांगलं-वाईट ठरवण्याची आपली घाई, त्यातून घडणारे गैरसमज, लोकांना ओळखण्यात होणार्या आपल्या चुका, इत्यादी बाबींवर 'शटर' नेमके आणि उत्तम भाष्य करतो.
सचिन खेडेकर उत्तम अभिनय करतात. सोनाली कुलकर्णीने 'ती'चा अभिनय उत्तम वठवलेला आहे. अमेय वाघ, राधिका विद्यासागर, जयवंत वाडकर वगैरे नीटनेटके आहेत. कौमुदी वाळोकर (परी) उगवता तारा आहे. ती आकर्षक दिसते. सुरुवातीला तिच्यावर चित्रित झालेले गाणे छान आहे आणि त्यात कौमुदीचा वावर प्रसन्न आहे. चित्रीकरण चांगले आहे.
काही बाबी खटकतात. जित्याभाऊसारख्या शिकलेल्या अधिकार्याचे ट्रक ड्रायव्हरसोबत बसून दारू पिणे, प्रत्येक निर्णय रिक्षावाल्यावर विसंबून घेणे, आतातायीपणे शिकणार्या कमी वयाच्या मुलीचे लग्न ठरवणे, वगैरे जरा अतार्किक वाटते. स्क्रिप्ट हरवलेला दिग्दर्शक, मध्येच येऊन एक निरर्थक गाणे म्हणणारा रोहित राऊत, रिक्षावाल्याला दारू पाजण्याचा प्रसंग, इत्यादी धागे खूप जास्त ताणल्यासारखे आणि अनावश्यक वाटतात. 'शटर' या एका कल्पनेभोवती अधिक रोमांचक चित्रपट बनवता येणे शक्य होते. थोडे रोमांच कमी पडल्याचे जाणवले. नको ती उपकथानके जोडल्याने चित्रपटाचा पसारा विनाकारण वाढल्याचे वाटले. एक्याची कांगावा करणारी आजी हे एक गरज नसतांना घुसवलेले प्रकरण! तोच प्रकार त्याच्या व्हिसाबाबत! हे प्रसंग वगळले असते तर चित्रपटात अधिक जान आली असती. पण एकूणात बघण्यासारखा वेगळा चित्रपट म्हणून 'शटर' चे कौतुक करावे लागेल. चित्रपट बघतांना मजा येते हे खरं. तेव्हा वेळ मिळाला तर हे शटर जरा उघडून बघाच!
प्रतिक्रिया
22 Jul 2015 - 3:37 pm | पगला गजोधर
परीक्षण अतिशय प्रवाही छान लिहिलंय, त्यामुळे लगेच मनाशी खुणगाठ बांधलीये मी आपलं परीक्षण वाचून,
की हा चित्रपट बघणार नाही.
24 Jul 2015 - 9:27 am | समीरसूर
जाऊ द्या, आता बायोस्कोप किंवा एखादे झकास नाटक बघा. बाहुबली देखील चालेल. खूप तारीफ ऐकली आहे.
22 Jul 2015 - 4:12 pm | द-बाहुबली
ज्या लोकांनी फोनबूथ बघीतला आहे ते लोक शतरवर थुंकायचा तरी विचार करतील का ? याचा विचार करुन जर दिग्दर्शकाने पटकथा आणि स्क्रिप्ट हाताळणी केली असती तो कुछ बात बनती... कसली उत्कंठा अन कसलं काय... रटाळ चित्रपट अन रटाळ सोकु सुध्दा... काय म्हातारी दिसते यात.
24 Jul 2015 - 9:24 am | समीरसूर
फोनबूथ आणि शटरची तुलनाच नाही करता येणार. तो थरारक होता, शटर हा मध्यम-वर्गाच्या माणसाच्या मनोवृत्तीवर आधारलेला चित्रपट आहे. दोन्ही चित्रपट अगदीच वेगळे आहेत. शटरचा रोख अगदीच निराळा आहे. आणि तो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात शटर यशस्वी झालाय. म्हणून तर एवढे बलाढ्य चित्रपट येऊन देखील शटर तीन आठवडे चित्रपटगृहात चालला. :-) आजकाल हिंदी चित्रपटदेखील एवढे दिवस चित्रपटगृहात पाहत नाहीत.
22 Jul 2015 - 4:43 pm | अद्द्या
शटर नाव वाचून मी इंग्रजी / कोरियन भयपटाचं परीक्षण असेल असं समजून उघडला धागा
22 Jul 2015 - 5:21 pm | प्रसाद गोडबोले
तर हे शटर जरा उघडून बघाच!
>>>>
तद्दन बकवास आणि थर्ड क्लास चित्रपट आहे हा ... अजिबात पैसे वाया घालवु नका ...
सचिन खेडकर विशयीचा आदर कमी झाला आणि सोनाली कुलकर्णी पेक्षा आपली जुनीच सोनाली कुलकर्णी सो कुल आहे ह्यावर परत एकदा शिक्कामोर्तब करण्यात आलेले आहे !
22 Jul 2015 - 6:15 pm | मी-सौरभ
त्या पिक्चर पेक्षा तुमचं परिक्षण लई ब्येस हाये.
पिक्चर लई बोरं होतं...
22 Jul 2015 - 6:27 pm | पद्मावति
हा चित्रपट का बघावा किंवा का बघू नये दोन्हीही बाजू तुम्ही छान मांडल्या आहेत.
24 Jul 2015 - 9:33 am | समीरसूर
शटर खरं म्हणजे एक साधी गोष्ट आहे. बहुधा त्याचा थरारपट दिग्दर्शकाला करायचा नव्हता म्हणून त्याची हाताळणी त्याने साधी ठेवली आहे. शटरचा जो माणसाची घालमेल आणि मध्यमवर्गाची मानसिकता यावरचा फोकस होता तो थरारपट केल्याने हरवला असता. आणि या दृष्टीकोनातून शटर एक चांगला चित्रपट आहे. अगदी आटापिटा करून बघण्याची गरज नसली तरी एकदा पहायला काहीच हरकत नाही. शटर बघतांना मजा येते. आता अर्थात तो थिएटर्समधून गेलेला आहे. आता जाल किंवा टीव्हीवरच बघता येईल.
22 Jul 2015 - 6:35 pm | पाटीलअमित
लोक फक्त सोनालीचा बांधा बघायलाच जाणार आहेत ,ट्रेलर वरूनच कळातेय
22 Jul 2015 - 6:52 pm | उगा काहितरीच
सध्या वेळच नाही बघायला .
22 Jul 2015 - 7:02 pm | रेवती
चित्रपट जालावर आल्यानंतर बघीन. त्यात काहीतरी रक्तपात वगैरेही दाखवलाय. म्हणजे मारामारी, खून असण्याची शक्यता आहे.
22 Jul 2015 - 7:03 pm | पाटीलअमित
तुम्ही piracy म्हणत आहात का ?
22 Jul 2015 - 7:07 pm | रेवती
नाही. चांगला कायदेशीर व्यवहार करून जालावर चित्रपट यायला जरा जास्त दिवस लागतात. तसा आला की मग! यावर मागे एका धाग्यात चर्चा झाली असल्याने पुन्हा तीच चर्चा करत नाही.
24 Jul 2015 - 9:16 am | समीरसूर
नाही. तसलं काही नाही. चित्रपट वाटतो तितका भयावह नाहीये. एक साधी गोष्ट पडद्यावर छान पद्धतीने सांगितली आहे. रक्तपात, हिंसा वगैरे काही नाही. नाही म्हणायला वेश्या वगैरे ही पार्श्वभूमी आहे पण त्याव्यतिरिक्त काही नाही. बिनधास्त बघा. अर्थात मुलांना बघू द्यायचा की नाही, बघू द्यायचा असेल तर कसे समजावून सांगायचे, वगैरे प्रश्न आहेतच. पण मला नाही वाटत काही प्रॉब्लेम आहे म्हणून.
22 Jul 2015 - 7:11 pm | सत्याचे प्रयोग
अख्खा सिनेमाच टाकलाय राव तुम्ही. उगीच पाहिला सिनेमा पैसे वाया गेले ना आमचे. आधीच टंकायचं ना परीक्षण
22 Jul 2015 - 7:12 pm | पाटीलअमित
इथे ह्या comment ला like बटन पाहिजे होते
24 Jul 2015 - 9:17 am | समीरसूर
एनीवे, तो काही सस्पेंस सिनेमा नव्हता. आणि अख्खा कुठं टाकलाय? रहस्य कायम ठेवलंय की. :-)
23 Jul 2015 - 11:55 am | जडभरत
परीक्षण प्रवाही आणि विनोदी भाषेत लिहिलंय. एकदा बघण्यासारखा तरी नक्कीच वाटतो चित्रपट. मस्त परीक्षण!!!
23 Jul 2015 - 12:52 pm | तुडतुडी
जित्याभाऊ खवळतात आणि तिचं लग्न लावून द्यायचं ठरवतात. >>>
मुंबईमध्ये मर्चंट नेव्हीमध्ये काम करणारे इतके मागास लोक राहतात ?
23 Jul 2015 - 11:39 pm | पाटीलअमित
सदर चित्रपट मलयालम चा remake आहे
spoilers warning
त्याचे परीक्षण इकडे वाचू शकता
http://sandeeppalakkal.blogspot.in/2013/12/shutter-malayalam-movie-non-u...
24 Jul 2015 - 8:25 am | अत्रुप्त आत्मा
मराठी वाहिन्यांवर उघडेल,तेंव्हा शटर पाहू!
3 Mar 2019 - 5:59 am | एकुलता एक डॉन
हा चित्रपट कुठे मिळू शकेल का ?