शशी कपूर----एक अभिनेता म्हणून हे नाव कधी मला लक्ष द्यावसं वाटलच नव्हतं. लहानपणी कधीतरी टीवी वर ना ना करते प्यार तुम्हिसे कर बैठे म्हणणारा एक छान चॉकलेट हीरो म्हणून इतकीच यांची ओळख. जास्तीत जास्तं दीवार, त्रिशूल मधे अमिताभचा भाऊ किंवा मित्र म्हणून. बस, त्यापुढे या शशी कपूर या हिरोची ची ओळख असली तरीही शशी कपूर ह्या अभिनेत्याची कधीच ओळख नव्हती.
काही दिवसांपूर्वी एक झालं की एक गोड गाणं ऐकायला मिळालं. हे गाणं कशातलं असेल म्हणून शोधत होते तर एक फार छान चित्रपट हाती लागला. हा चित्रपट होता जुनून. दिग्दर्शक श्याम बेनेगल आणि निर्माता शशी कपूर.
ह्या चित्रपटाची जी पार्श्वभूमी आहे तो काळ आहे अठराशे सत्तावन च्या स्वातंत्र्ययुद्धाचा. देशभर इंग्रजी सत्तेविरुद्धचा असंतोष पराकोटीला पोहोचलेला. मंगल पांडेनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाचा झेंडा उभारला होता. त्याला दिलेल्या फाशीने संपूर्ण सैन्य बिथरले होते. दिल्ली, मेरठ, रामपुर, कानपुर येथे सैनिकांचे सशस्त्र उठाव सुरू झाले होते. इंग्रजी सत्तेला आता उलथवून टाकायचेच असा निश्चय करून ठिकठीकाणून सैनिकांच्या तुकड्या एकत्र येत होत्या. अतिशय स्फोटक वातावरण निर्माण झालेले होते.
अशा पार्श्वभूमीवर ही कहाणी फिरते ती जावेद खान या नवाब आणि त्याच्या परिवाराभावती. स्वत: जावेद त्याची बायको फिर्दौस, त्याची चाची, तिचा मुलगा आणि सून. लखनौ मधे राहणारा हा परिवार. जावेद खान चा एक भाऊ सरफराझ खान हा अतिशय कडवा पठाण आहे. हा इंग्रजांविरुद्ध हिरीरीने लढत असतो. मात्र जावेद खान ला या लढाईशी काहीही देणंघेणं नाही. तो तसा आपल्या कुटुंबात आणि पाळलेली कबूतरे उडवण्यात खुश असतो. गावातच एक इंग्रज कुटुंब असतं. या कुटुंबात नवरा, बायको मिरियम त्यांची तरुण मुलगी रुथ आणि आजी असे सदस्य आहेत.
आता जावेदखां हा ह्या रुथ च्या प्रेमात पडलाय. प्रेम म्हणजे खरंतर त्याच्या या प्रेमाला अब्सेशन...जुनून हे अधिक योग्य शब्द आहेत.
एक दिवस या शहरात सुद्धा उठाव होतो. चर्च च्या प्रार्थनेच्यावेळी हिंदूस्थानी सैनिकांची एक सशस्त्र तुकडी हल्ला करते आणि तिथल्या सर्व लोकांची कत्तल करते. रुथ चे वडील सुद्धा या हल्ल्यात मारले जातात.या सगळ्या गदारोळात मरिअम, रुथ आणि आजी हे कसेबसे निसटतात. त्यांना एक हिंदू व्यापारी आसरा देतो. अशा भयानक वातावरणात खरंतर या इंग्रजांना स्वत:च्या घरी ठेवून घेणे म्हणजे मृत्युलाच आमंत्रण. पण तो भला सावकार मात्र या कुटुंबाला ठेवून घेतो.
इथे जावेद खान ला सुगावा लागतो तो की रुथ या कुटुंबाकडे कडे आहे. हा माणूस या रुथच्या प्रेमात पार वेडा झालेला असतो त्यामुळे तो त्या सावकाराच्या अनुपस्थितीत त्याच्या घरात घुसतो आणि रुथ आणि तिच्या आईला ज़बरदस्तीने आपल्या घरी घेऊन येतो. आता या तीन स्त्रिया घरी आल्यावर जावेद ची बेगम साहजिकच विरोध करते. पण तिच्या विरोधाला कोण जुमानणार? जावेद साहेब तर जाहीर करून टाकतात की मी या रुथ शी निकाह लावणार म्हणजे लावणारच.
रुथ अतिशय भेदरलेली आहे. तिने आपल्या जन्मदात्याचा खून होतांना आपल्या डोळ्यांनी बघितले असते. इथे जावेद च्या घरी कसेबसे जीव मुठीत घेऊन ही मुलगी राहात असते. संपूर्ण चित्रपटात एक दोन शब्द सोडले तर तिच्या तोंडून शब्दच फुटत नाही. हिची आई मात्र अतिशय धीराची बाई असते. आपल्या लेकीच्या पुढे ही आई अक्षरश: ढाल बनून सतत वावरत असते. ही बाई जावेद पुढे एक अट ठेवते. खरंतर अटी वगैरे टाकणे तिला परवडणारं नसतंच. परिस्थिती अशी असते की मनात आले तर जावेद कधीही हिचं डोकं उडवून तिच्या मुलीशी जबरदस्तीने निकाह लावू शकला असता. पण तरीही हि जोखीम बाई उचलते आणि यशस्वी सुद्धा होते.
कलाकारांविषयी काय बोलणार? हिंदी रंगभूमी वरचे एक से एक दिग्गज इथे वेगवेगळ्या भूमिकेत ज़बरदस्त काम करून जातात. मग ती भूमिका अगदी एका मिनिटाची का होईना त्यात पर्ल पदमसी असो की सवीता बजाज असो. सहायक भूमिकांमधे लक्षवेधक आहे कुलाभूषण खरबंदा. त्या सावकाराच्या पात्राला ते एक प्रकारचा भारदस्तपणा, खरेपणा देतात. बाकी भूमिकांमधे बेंजामीन गिलानी, दीप्ती नवल, जलाल आगा ही गुणी मंडळी छान प्रामाणिक पणे आपापले काम करतात.
आता मुख्य कलाकार. नसिरुद्दीन शहा कडव्या सरफराझ खान च्या भूमिकेत. इंग्राजंबद्दलचा तिरस्कार, त्यांच्या विरुद्ध लढण्याची ईर्शा. याचबरोबर जावेद खान सारखे आप्तजन देशासाठी लढायचे सोडून कबूतरबाजी मधे रमलेले बघून होणारी चिडचिड. शेवटी एक एक लढाई हरतांना येणारि हताशा, त्रागा सर्व भावना त्याने पडद्यावर जिवंत उभ्या केल्या आहेत.
सुषमा सेठ--अत्यंत ताकदीची ही अभिनेत्री. जावेदची चाची, जावेद आणि त्याच्या बायकोच्या वाद- भांडणात आपलेपणाने मध्यस्थी करणारी कुटुंबातील प्रमुख. आपल्या सुनेचे पोटच्या मुलीसारखे लाड करणारी प्रेमळ सासू अशी अनेक रूपं ह्यांनी फार समर्थपणे सादर केली आहेत. भाषेची खास लखनवी नझाकत, चालण्या-बोलण्यातला नवाबी तोरा सगळं मस्तं आणि सहज.
शबाना आझमी--- यांनी फिरदौस ची भूमिका अफाट जीव तोडून केली आहे. तोंडाने फटकळ पण मनाने साधी. स्वत:ला मूल नाही हे दु:ख आहेच त्यात नवरा कायम तुसड्यासारखा वागतोय. हे सगळं कमीच आहे की काय म्हणून नवर्याचं हे एकतर्फी प्रेमप्रकरण आहेच जोडीला. या सर्व गोष्टींमुळे झालेला त्रागा, मनस्ताप तिच्या देहबोलितून, डोळ्यातून आणि शाब्दिक फटकार्यातून थेट आपल्यापर्यंत पोहोचतो.
नाफिसा अली---अप्रतिम सौंदर्य, निरागस चेहरा, भेदरलेले डोळे आणि दोन चार डायलॉग्स इतकीच या भूमिकेची मागणी होती ती नाफिसा अली ने दोनशे टक्के पूर्ण केलेली आहे.
शशी कपूर----एक अभिनेता म्हणून माझ्या मते जरा बर्यापैकी मर्यादित कौशल्य असलेला हा माणूस स्वत: निर्माता असलेल्या चित्रपटांमधे अप्रतिम अभिनय करून जातो. ही जादू स्वत:च्या चित्रपटामधे काम केले म्हणून आलेल्या जबाबदारीच्या जाणिवेतून झाली असते का उत्तम दिग्दर्शकाबरोबर काम केल्याचा परिणाम. कारण काहीही असो पण हे आहे खरं. कुठे सुहाग आणि नमक हलाल मधील शशी कपूर आणि कुठे जुनून, कलयुग आणि विजेता मधील शशी कपूर, काही तुलनाच नाही.
इथे जावेद खान चा नवाबी तोरा, कबुतरे पाळण्यात आणि उडवण्यात मश्गूल असलेला बेफिकीरपणा. स्वत:च्या बायकोशी नेहमी तिरसट पणे बोलणे. रुथविषयी वाटणारं पराकोटीचं आकर्षण. हे आकर्षण इतकं आहे की हा माणूस स्वत:च्या बायको समोर असतांना बेधडक पणे सांगतो की मला ही मुलगी आवडते आणि मी हिच्याशी लग्न करणार आहे. हे वेड, बेदरकारपणा आणि बायकोच्या मनाची किंचित सुद्धा फिकीर न करण्याची वृत्ती. जावेद खान हे पात्र शशी कपूरने अतिशय मन लावून, जीव ओतून उभं केलं आहे.
लास्ट बट नॉट द लीस्ट.....जेनिफर केंडाल. पडद्यावरची मॅडम मरिअम लॅबडॉर आणि प्रत्यक्षातली सौ. शशी कपूर.
नवरा गमावलेली कसबसा आपला आणि आपल्या मुलीचा जीव वाचवून जावेद खान च्या आश्रयाला आलेली ही स्त्री. बरं हा आसरा पण कसा? की गायीने कसायाकडे आश्रय मागावा असा. कधी कोणाची गैरमर्जी होईल आणि आपला जीव जाईल याची शाश्वती नाही अशा परिस्थितीत ही स्त्री भक्कमपणे परिस्थितीला तोंड देते.
या भूमिकेचे अनेक पैलू आहेत. जिवाच्या भितीनी पार भेदरुन गेलेली. पण अशा प्रतिकूल परिस्थितही स्वत:ची अस्मिता, स्वाभिमान आणि डिग्निटि सांभाळून राहणारी मरिअम.
वरवर राकट दिसणारा जावेद खान आपल्या मुलीच्या प्रेमात पार बुडून गेलाय आणि तो दिसतो तितका काही धोकादायक नाहीये हे एकदा लक्षात आल्यावर मग मात्र त्याच्यापुढे ठामपणे उभी ठाकणारी बाई जेनिफर केंडल यांनी फार छान उभी केली आहे.
कुठेही भारंभार संवाद नाहीत पण चेहरा आणि देहबोली सगळं काही बोलून जाते. आधी जिवाच्या भयाने थरथर कापणारी पण जरा बाजी आपल्या हातात आली आहे हे लक्षात आल्यावर चेहृयावरील, आवाजामधील आलेली एक किंचित जरब. अगदी लक्षात येईल न येईल असा सटल हा फरक या गुणी अभिनेत्रिने इतका अप्रतिम दाखविला आहे की त्याला तोड नाही.
वनराज भाटिया यांचे संगीत आहे. गाणी फारशी नाहीच आहेत. एक अप्रतिम गाणं आहे आशा भोसले यांनी गायलेलं ' सावन की आई बाहर रे'. अगदि एका कडव्याचं पण अतीगोड गाणं आहे हे.
https://www.youtube.com/watch?v=dLM-9Ds1MtY
जालावरून साभार.
प्रतिक्रिया
12 Jul 2015 - 1:53 am | एस
वा! काय छान लेख लिहिलाय!... शशि कपूरचा त्याने निर्मिती केलेल्या चित्रपटांमधील अभिनय खरोखर वाखाणण्याजोगा असे. पृथ्वी थिएटर जिवंत ठेवण्यात शशि कपूर, जेनिफर कपूर आणि त्यांची मुलगी संजना कपूर यांचा सिंहाचा वाटा आहे.
विजेता हा माझा आवडता चित्रपट आहे. पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमधील त्या चित्रपटाचे चित्रिकरण फारच छान वाटते. जुनूँ नक्कीच पाहीन.
17 Jul 2015 - 1:12 pm | विजुभाऊ
स्वॅप भौ.
विजेता चित्रपट मला माझ्या मुलाला दाखवायचाय.
त्याची सी डी वगैरे कुठे मिळेल का?
17 Jul 2015 - 6:04 pm | एस
सीडी/डीव्हीडी बद्दल सांगता येणार नाही. अलूरकरांकडे कदाचित. पण शक्यता फारच कमी.
मी दूरदर्शनवर पाहिला होता.
12 Jul 2015 - 2:06 am | यशोधरा
जुनून चित्रपट मलाही खूप आवडला होता. सगळ्यांचीच कामे तुम्ही लिहिल्याप्रमाणे उत्तम झाली आहेत, कोणा एकाविषयी बोलावे असे नाहीच!
जेनिफर ह्यांचे रुथला जरब देणारे एक वाक्य अजूनही लक्षात आहे, "Ruth, this mustn't happen again.." तिच्याविषयीची काळजी, परिस्थितीची जाणीव असल्याने एकूणच वाटणारे भय आणि तत्सम भावना एका संवादफेकीतून आणि देहबोलीतून खूप उत्तम रीत्या दाखवल्या होत्या..
12 Jul 2015 - 4:22 am | स्वाती२
छान लिहिलयं! जुनून खूप आवडला होता.
12 Jul 2015 - 4:54 am | सानिकास्वप्निल
खूप सुरेख लिहिले आहे, नक्की बघणार जुनून.
12 Jul 2015 - 6:28 am | स्पंदना
पाहिलाय अस स्टोरीवरुन वाटत्य. (चित्रपटाची कथा "श्टोरी" म्हंटल्याशिवाय चित्रपटाची वाटत नाही ;) )
पण नक्की आठवत नाही. पाहेन परत एकदा.
12 Jul 2015 - 8:14 am | पुणेकर भामटा
ऊत्सुकता चाळवलिये...
लवकरच पाहिन म्हणतो....
12 Jul 2015 - 10:37 am | अजया
छान परिचय.नाव ऐकुन होते.पाहिलेला नाही. आज शोधुन बघतेच हा चित्रपट
12 Jul 2015 - 10:56 am | डॉ सुहास म्हात्रे
खूप सुंदर चित्रपट. नसिरुद्दीन शहा प्रभावी शब्दफेकीमुळे त्याच चित्रपटापासून लक्षात राहीला तो आजतागायत.
12 Jul 2015 - 3:30 pm | स्नेहानिकेत
खुप छान लिहिलय.जुनून नक्की पहाणार
12 Jul 2015 - 3:37 pm | जडभरत
खूप छान परिचय दिलाय. मी लहानपणी कधीतरी पाहिलाय. पण इतकासा आठवत नव्हता. आता आवर्जून पाहणार.
12 Jul 2015 - 7:28 pm | श्रीगुरुजी
खूपच सुंदर रसग्रहण केलंय. अतिशय आवडलं.
हा चित्रपट मी अलंकार चित्रपटगृहात पाहिला होता. वेगळ्या कथानकामुळे चित्रपट आवडला होता. शशी कपूरने स्वतः अनेक मसाला चित्रपटात कामे केली. परंतु निर्माता या नात्याने त्याने जुनून, कलयुग, विजेता, उत्सव असे एकदम वेगळे चित्रपट बनविले. उत्सव चित्रपटातील भूमिकेच्या गरजेसाठी त्याने वजन वाढविले आणि तेच त्याला घातक ठरले. वाढलेल्या वजनामुळे नंतरच्या काळात त्याचे फारसे चित्रपट आलेच नाहीत. अर्थात कपूर घराण्यात असलेली प्रचंड वजनवाढीची परंपराही त्याच्या वजनवाढीला कारणीभूत होती.
12 Jul 2015 - 9:12 pm | रातराणी
परीक्षण आवडले. नसीरुद्दीन शहा आणि शशी कपूर दोघे आवडते कलाकार. नक्की पाहणार.
12 Jul 2015 - 9:46 pm | रेवती
असा शिनेमा आहे हे माहित नव्हते. परिक्षण आवडले. आता बघण्याची गरज वाटत नाही कारण कलाकार चांगले असताना त्यांचा अभिनय बघणेही कधीकधी अंगावर येते........लढाई वगैरे असेल तर जास्तच!
13 Jul 2015 - 4:44 pm | बोका-ए-आझम
सुंदर चित्रपटाचे तितकेच छान रसग्रहण. शशी कपूर आवडता अभिनेता असल्यामुळे त्याचे बहुतेक सगळे चित्रपट पाहिले आहेत. चांगल्या दिग्दर्शकाकडे त्याचे अभिनयगुण जास्त खुलायचे. दीवार पूर्णपणे अमिताभचा चित्रपट असूनही शशी कपूरला विसरता येत नाही. जुनून तर अप्रतिम आहेच. जेनिफर कपूरची मुख्य भूमिका असलेला आणि शशी कपूरनेच निर्माण केलेला, अपर्णा सेन दिग्दर्शित ३६ चौरंगी लेन हाही नितांतसुंदर चित्रपट आहे.
13 Jul 2015 - 4:59 pm | खटपट्या
खूप सुंदर परीक्षण..
लहानपणी चित्रपट पाहील्यासारखा वाटतोय.
परीक्षणामुळे पुन्हा पहाण्याची इच्छा झालीय...
13 Jul 2015 - 6:47 pm | पद्मावति
सर्व प्रतिसादांचे मनापासून आभार. खटपट्या, रेवति, रातराणी - तुमचे मन:पूर्वक धन्यवाद.
बोका ए आज़म- ३६ चौरंगी लेन नक्की पाहणार.
श्रीगुरुजी---उत्सव चित्रपटात शशी कपूर यांचे वजन जास्तं दिसतच होतं नंतर त्यांच्या करियर ला घातक ठरलं, बरोबर.
जडभारत, स्नेहानिकेत, अजया, पुणेकर भामटा, स्पन्दना, सनिका, स्वाती --खूप खूप आभार.
डॉ. म्हात्रे- नसिरुद्दीन शहा विसरला जाणे शक्यच होत नाही.
यशोधरा-- अगदी, अगदी. रुथ चं तुम्ही म्हणता ते वाक्य लक्षात राहतं.
स्वॅॅप्स--विजेता पुन्हा एकदा बघिन. खूप आधी बघितला होता पण नीट लक्षात नाही. फक्त शशी कपूर आणि रेखा आठवतात. मस्तं चित्रपट.
13 Jul 2015 - 6:58 pm | मधुरा देशपांडे
चित्रपटाची खूप छान ओळख. नक्की पाहणार.
16 Jul 2015 - 2:18 pm | अभिरुप
नसीर साहेब आवडते कलाकार्,त्यामुळे हा चित्रपट पाहणे आलेच.
कपूर साहेबांचा विजेता हा सिनेमा पण अप्रतिम आहे.
16 Jul 2015 - 2:49 pm | इनिगोय
फार छान परिचय. पाहण्याचा प्रयत्न नक्की करेन. सुरूवात वाचून आमीर खानच्या अर्थची आठवण झाली. त्यातही रुत आगयी रे हे एक छान गाणं होतं.
16 Jul 2015 - 9:35 pm | मनीषा
जुनुन मला सुद्धा अतिशय आवडलेला चित्रपट आहे.
माझ्या मते शशी कपुर एक चांगला अभिनेता आहे. आणि निर्माता म्हणून त्याने वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्मिती केली आहे.
जेनीफर कपुर बद्दल अगदी सहमत . त्यांची ३६ चौरंगी लेन मधील भूमिका सुद्धा अप्रतिम आहे.
16 Jul 2015 - 9:50 pm | पैसा
जुनून पाहिला आहे. शिवाय तो ज्यावर आधारित आहे ते रस्किन बाँडचे अ फ्लाईट ऑफ पिजन्सही वाचले आहे. सिनेमा मूळ कादंबरीशी बराच प्रमाणिक आहे. या सिनेमाला त्या वर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता बहुतेक.
17 Jul 2015 - 12:34 am | मयुरा गुप्ते
तुमचं परिक्षण वाचुन कालच यु-ट्युब वरुन शोधुन काढुन बघितला.
चांगला वाटला.
शशि कपूर खासचं. रगेल आणी रंगेल नबाब छान जमलाय. शबाना ठिक-ठाक, मला विशेष आवडत नाही ती. जरा आक्रस्ताळी वाटते, अर्थात ह्या चित्रपटात तशीच आवश्यकता होती.
नासिर, सुषमा, जेनिफर, कुलभुषण, त्या त्या भुमिकेसाठी अतिशय योग्य निवड. देशभक्तिची गाणी नाहीत, उगाच जास्त फिल्मी शो बाजी नाही ह्या जमेच्या बाजु.
मुठभर देशभक्त सोडले तर बर्याच जनसामान्यांत गोर्या कातडी विषयी वाटणारं आ़़र्कषण, मग त्या पाठोपाठ येणारी आस्था, वर्तन ह्याचे छोटे छोटे नमुने बेमालुम टाकले आहेत.
ह्या मनोवृतीचा फायदा इंग्रजानी उठवला नसता तरच नवल होतं आणि त्याच जोरावर मरियम रुथ च्या लग्नाची सशर्त तयारी दर्शविते ह्यातच पुढच्या दिडशे वर्षांची बीजे रोवली गेली असावित.
--मयुरा.
17 Jul 2015 - 12:51 pm | पद्मावति
अभिरूप--धन्यवाद, विजेता पुन्हा बघणार आहे. सुंदर चित्रपट.
इनिगोय--रुत आ गयी रे--मस्तं. छान आठवण करून दिली.
मनीषा- येस, ३६ चौरंगी लेन बघणार आहे अजुन नाही बघितला.
पैसा--धन्यवाद प्रतिसाद आणि पुस्तकाच्या माहितीबद्द्ल.
मयुरा--थॅंक्स खूप. चित्रपट बघून मला आवर्जून अभिप्राय दिल्याबद्दल. छान अभिप्राय.
18 Jul 2015 - 7:48 am | एक एकटा एकटाच
मस्त लिहिलाय लेख
आजवर हां चित्रपट पाहिला नव्हता.
ह्या विकेंडला "जूनून" पहाणार.
18 Jul 2015 - 6:05 pm | केतकी_२०१५
पद्मवति, तुम्ही लेहिलेले परिक्षण अवदले. जूनून नक्कि बघीन.
तुमची परिक्षण लेहिन्याची शैली मल नेहमीच अवदते.
धन्यावाद!
19 Jul 2015 - 8:24 am | सविता००१
परीक्षण.
पाहिलाय हा सिनेमा आणि अत्यंत आवडला होता
आता परत पहाते
तुम्ही फार सुंदर लिहिलंय
वाचताना डोळ्यांसमोरून प्रत्येक फ्रेम चालली आहे असं वाटलं इतकं सुरेख लिखाण.
28 Oct 2015 - 11:31 pm | एकप्रवासी
छान आहे.......