बंगाली चित्रपट परीक्षण - 'आशा जावार माझे'

सव्यसाची's picture
सव्यसाची in जनातलं, मनातलं
1 Jul 2015 - 6:59 pm

काही दिवसांपूर्वी कोर्ट चित्रपटाबद्दल लिहिताना मी असे म्हटले होते कि दैनंदिन घटनांचे चित्रण पाहायला मला आवडते. 'कोर्ट' मध्ये न्यायालयातील सुनावणी ही अश्याच दैनंदिन गोष्टींपैकी होती. 'कोर्ट' पाहून झाल्यावर लगेचच तश्याच धाटणीचा एखादा चित्रपट पाहायला मिळेल असे वाटले नव्हते. पण ती वेळ काल आली.
'आशा जावर माझे' हा बंगाली चित्रपट. पण इथे भाषा कोणती याचा काहीच फरक पडत नाही कारण चित्रपटात संवादच नाहीत. पार्श्वसंगीत सुरु असते, लोक बोलतात, रेडीओ वर गाणी सुरु आहेत पण चित्रपटामधील मुख्य पात्रे मात्र काहीच बोलत नाहीत. या चित्रपटाचे इंग्रजी मधील नाव आहे - लेबर ऑफ लव्ह. परंतु हे शब्दशः भाषांतर नाही. शब्दशः भाषांतर आहे In between coming & going. चित्रपट पाहिल्यावर हे शीर्षक खूपच योग्य वाटते.
गेल्या १-२ वर्षात इतका सुंदर आणि प्रतिमांचा भरगच्च वापर असलेला, रोमँटिक चित्रपट पाहण्यात आला नाही. या चित्रपटाला ६२ व्या राष्ट्रीय पुरस्कारामध्ये पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक आणि सर्वोत्कृष्ट ऑडीओग्राफी असे दोन पुरस्कार मिळाले आहेत.

(चित्रपटामध्ये तपशीलावर जास्ती भर असल्याने ते न सांगता काहीच लिहिणे शक्य होणार नाही. तेव्हा ज्यांना कुणाला हा चित्रपट पहायची इच्छा असेल त्यांनी कृपया कथा वाचू नये. )
------------------------------------------------------------------------------------------------------------------
*कथा*
चित्रपटाची सुरुवात होते बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईने. चित्रपटाची नायिका गल्लीबोळातून जोरात पावले टाकत जात आहे. जसा ट्राम चा आवाज येतो तशी ती अजून पटपट चालू लागते. ट्राम मध्ये बसल्यावर केकचा एक तुकडा ती आपला नाश्ता म्हणून खाते, ट्राम मधून उतरून बस पकडून ती बर्याच वेळाने आपल्या कामाच्या ठिकाणी - एका बॅग तयार करणाऱ्या कारखान्यात - पोहोचते.
इकडे घरामध्ये चित्रपटाचा नायक आपल्याला तयार होऊन बसलेला दिसतो. आता तो उठून बाहेरच जाईल कि काय अशी शंका यावी इतपत. पण तसे काही होत नाही. तो कपडे बदलतो, अंघोळ करून खुर्चीत येउन बसतो आणि नायिकेने जो केक खाल्ला तश्याच प्रकारचा केक तोही खातो. थोडा वेळ बसल्यानंतर तो बाजारात जातो. मासे, किराणा सामान वगैरे आणतो, पैसे एका छोट्याश्या डब्यात ठेवतो आणि टेबलवरील झाकून ठेवलेल्या ताटात जे काही वाढून ठेवले आहे ते खातो. त्यानंतर तो झोपून जातो.
त्याला उठवायला म्हणून नायिकेचा फोन येतो. तो उठतो, वाळू घातलेले कपडे आत आणून ठेवतो आणि तयार व्हायला लागतो. जेवणाचा डबा घेतो आणि कामाला निघून जातो. त्याच वेळी नायिका घरी येते. थोडा वेळ बसल्यानंतर ती परत कामाला लागते. फ्रीज मधील सकाळी तयार केलेली भाजी घेऊन ती जेवण करते, भांडी वगैरे घासून झोपून जाते. नायक प्रिंटींग प्रेस मध्ये कामाला आहे. तो सकाळी नायिकेला फोन करतो. त्या आवाजाने ती उठते आणि तो फोन ठेवून देतो.
ती उठून स्वयंपाक करते, स्वतःसाठी आणि त्याच्यासाठी डबे बनवते, एक डबा फ्रीज मध्ये ठेवते, त्याच्यासाठी ताटामध्ये जेवण वाढते आणि कामाला जायला तयार व्हायला लागते. तेवढ्यात चित्रपटाचा नायक दरवाज्यात येतो. पुढचे ५-१० मिनिट ते कुठल्यातरी वेगळ्याच जगात प्रवेश करतात जिथे ते फक्त एकमेकांच्या सोबत आहेत आणि तिथे शब्दांना जागा नाही. त्यानंतर ती दरवाजा उघडते आणि कामाला जायला निघते. नायक तिला पाहायला म्हणून खिडकीत जातो, तेव्हा पुन्हा शहनाईचे सूर ऐकायला येतात.
*कथा समाप्त*

चित्रपटामध्ये चितारलेला काळ हा मंदीचा आहे. चित्रपट सुरु होण्याच्या आधी रेडिओ वर एक मिल बंद झाल्याची बातमी येते. सगळ्यांनाच आपल्या नोकर्या वाचवण्याची चिंता असणार्या काळामध्ये चित्रपटाचे कथानक घडते. नायक आणि नायिकेला जी कामे आहेत ती टिकवून ठेवल्याशिवाय पर्याय दिसत नाही. त्यामुळे दिवस असो व रात्र ते पर्वा न करता काम करत राहतात. त्यांच्या या अश्या दैनंदिन आयुष्यात दोघांनी मिळून घालवावे असे ते प्रेमाचे क्षण किती यावेत? परंतु त्यांचे प्रेम आपल्याला पूर्ण चित्रपटात जाणवत राहते. त्यांच्यात संवाद नाहीत पण त्यांच्यातील मूक संवाद चित्रपटभर बरेच काही सांगून जातो. जरी ते समोरासमोर नसले तरी एकाने सांगावे आणि दुसर्याने ते काम करावे अश्या पद्धतीने ते दोघेजण मन लावून घरातील कामे करताना दिसतात. याच वेळी दुसरी व्यक्ती आपल्यासोबत नाही याचे वैषम्यही त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत राहते.

चित्रपटामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले आहे. उदा: नायक जो केक खातो त्याचे प्लास्टिकचे आवरण तो खालीच टाकतो. जेव्हा नायिका दुसर्या दिवशी घर झाडत असते तेव्हा तो कागद आपल्याला फ्रेम मध्ये दिसतो. त्याने आणून ठेवलेले किराणा सामान प्रत्येक गोष्टी बरणीत भरतानाचा आवाज वेगळा येतो. ती सकाळी जी उदबत्ती लाऊन जाते , ती नायकाची अंघोळ होईपर्यंत संपलेली असते. ती जेव्हा घरी येते तेव्हा नायक अजून एक उदबत्ती लाऊन गेलेला असतो ती संपत येते. हेच चक्र दुसर्या दिवशी पण पाहायला मिळते. सकाळी ती ट्राम पकडायला जाताना कॅमेरा तिच्याबरोबर जातो असे आपल्याला वाटत राहते पण जसा ट्राम चा आवाज ऐकू येतो तसा तसा कॅमेरा मागे राहायला लागतो. जेव्हा तो सकाळी प्रेस मधून सायकलवर परत येतो तेव्हा कॅमेरा परत त्याची साथ करतो पण काही सेकंदातच तिला भेटण्याचा उद्देशाने तो सायकल जोरात चालवू लागतो आणि कॅमेरा मागे राहायला लागतो. बर्याच गोष्टी ज्या आपण दैनदिन दिवसामध्ये पाहत नाही त्या या कॅमेरा ने चित्रपटामध्ये पाहिल्या आहेत , आपल्याला पाहायला लावल्या आहेत.
चित्रपटामध्ये बरीच जुनी गाणी तसेच शहनाई वापरली आहे आणि ती त्या त्या क्षणांना अतिशय चपखल बसली आहेत. चित्रपटाचे ध्वनी संयोजन अतिशय उत्कृष्ट आहे. आवाजांबद्दल थोडेसे वरती लिहिले आहेच परंत मागून येणारे शाळेतील मुलांचे आवाज, प्रिंटींग करणाऱ्या मशीन चा आवाज, बॅग तयार करणाऱ्या मशीनचा आवाज, सायकलच्या पॅडलचा येणारा आवाज,ट्राम, बस, पंखा, नळाचे पाणी, कढईतील उकळणारे पाणी, ते पाणी उकळून वाफ झाल्यावर तेल ओततानाचा आवाज, वेगवेगळ्या पक्षी आणि प्राण्यांचे आवाज हे सगळे अगदी सुस्पष्टपणे आपल्यापर्यंत पोहोचतात. यातील काही आवाज आपल्या परिचयाचे नसले तरी ते वेगळे आहेत आणि दोन आवाज मिसळून गोंगाट होतोय असे अजिबात वाटत नाही. या सर्व आवाजामधूनही कुठेतरी शांतता आणि एकटेपणा जाणवत राहतो. तो एकटेपणा आणि शांतता त्या दोघांच्या आयुष्यातील आहे हे ते बाजूचे आवाज सतत आपल्यावर बिंबवत राहतो.
जरूर पाहावा असा हा चित्रपट!

चित्रपटआस्वादसमीक्षा

प्रतिक्रिया

दमामि's picture

1 Jul 2015 - 7:23 pm | दमामि

अतिशय सुंदर!!!!!

एस's picture

1 Jul 2015 - 11:13 pm | एस

वा!

इतक्या सुंदर चित्रभाषेचा चित्रपट फार क्वचित पहायला मिळतो. फार छान ओळख करून दिलीत. हा चित्रपट कुठे पहायला मिळेल?

उगा काहितरीच's picture

2 Jul 2015 - 12:10 am | उगा काहितरीच

सुंदर ओळख करून दिलीत, मिळाला कि निश्चितपणे पाहीन .

वॉल्टर व्हाईट's picture

2 Jul 2015 - 1:46 am | वॉल्टर व्हाईट

छान चित्रपट दिसतोय, लवकरच बघेन. कथावस्तु स्पॉईलर अलर्ट टाकुन पांढर्‍या अक्षरांत ठेवली तर उत्तम होईल.

चुकलामाकला's picture

2 Jul 2015 - 9:17 am | चुकलामाकला

वा! चित्रपट कस पहावा हे या परि़क्षणावरून कळ्ते.

खेडूत's picture

2 Jul 2015 - 9:31 am | खेडूत

सुन्दर ...!
कुठे पहायला मिळेल?

लिमिटेड रिलीज आहे, त्यामुळे इच्छा असुनही बघता येत नाही :(

Labour Of Love

चुकलामाकला's picture

2 Jul 2015 - 10:18 am | चुकलामाकला

सद्ध्या मुंबैत फक्त परेलला आहे

बॅटमॅन's picture

2 Jul 2015 - 12:16 pm | बॅटमॅन

मस्त!

सव्यसाची's picture

2 Jul 2015 - 1:07 pm | सव्यसाची

@दमामि : धन्यवाद.
@स्वॅप्स : नक्कीच. चित्रपटात जे सौंदर्य टिपले आहे ते वाखाणण्याजोगेच आहे. खाली मनिष यांनी काही चित्रपटगृहांची नावे दिली आहेत. लिमिटेड रीलीज आहे. दिग्दर्शक युट्युब वर रीलीज करणार होता, पण ते होइल की नाही याची कल्पना नाही. जर रीलीज झालाच तर जरुर पाहा.
@उगा काहितरीच: धन्यवाद. मिळाला तर पाहाच. :)
@वॉल्टर व्हाईट : चित्रपट छान आहेच. व्हाइट केले नाही. पण सुचना दिली आहे कि कथानक वाचु नये म्हणुन. प्रतिक्रियेसाठी धन्यवाद.
@चुकलामाकला : धन्यवाद सर. :)
@खेडुत : खाली मनिष यांनी लिस्ट दिलीच आहे. आपण यापैकी कुठल्यातरी शहरात असाल तर पाहु शकता.
@मनिषः धन्यवाद.
@बॅटमॅन : धोन्नोबाद. :)

मदनबाण's picture

3 Jul 2015 - 12:48 pm | मदनबाण

परिक्षण आवडले ! अशाच हटके चित्रपटांबद्धल लिहत रहावे ही विनंती. :)

पण इथे भाषा कोणती याचा काहीच फरक पडत नाही कारण चित्रपटात संवादच नाहीत.
अगदी ! हेच माझ्यासाठी गाण्यांच्या बाबतीत देखील आहे. :)
मध्यंतरी यू-ट्यूबवर वेगवेगळ्या गाण्यांच्या शोधात फिरत असताना एक गाणं सहज ऐकल... आयटम साँग हल्ली कुठल्या चित्रपटात नसतात ? मग बांगला चित्रपट कसा अपवाद असेल ? ;)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- حلا الترك و مشاعل بنيتي الحبوبة

सव्यसाची's picture

4 Jul 2015 - 9:05 am | सव्यसाची

सर,
धन्यवाद.
गाण्याच्या बाबतीत म्हणाल तर माझे पण असेच आहे. बरीच तमिळ, कन्नड, तेलुगु, बंगाली गाणी आवडतात जरी त्यांचे बोल नाही कळले तरी. त्यावेळी संगीत महत्वाचे वाटते.

सानिकास्वप्निल's picture

3 Jul 2015 - 2:05 pm | सानिकास्वप्निल

वाह!! काय सुंदर ओळख करुन दिली आहे ह्या चित्रपटाची.
नाव नोट करुन ठेवले आहे, कधी मिळालाच तर नक्की बघणार.
धन्यवाद.

सव्यसाची's picture

4 Jul 2015 - 9:05 am | सव्यसाची

धन्यवाद. :)

पैसा's picture

3 Jul 2015 - 4:12 pm | पैसा

किती छान ओळख करून दिलीय! मस्तच! बघायला कधीतरी मिळेल. निदान दूरदर्शन वर तरी!

सव्यसाची's picture

4 Jul 2015 - 9:06 am | सव्यसाची

धन्यवाद ताई.
दूरदर्शन वर येईल पण कधी येईल काही सांगता येत नाही. त्याआधीच युट्युब वर रिलीज व्हावा अशी अपेक्षा आहे.