भाग १, भाग २, भाग ३, भाग ४, भाग ५
बॅसिलिकामधून बाहेर येतानाच वॅटिकन म्युझियमकडे लागलेली प्रचंड रांग दिसत होती.पण आमच्या गाईडने आपले बुकिंग असल्याने आपण मागच्या दरवाज्याने थेट प्रवेश करायचा असल्याची आनंदवार्ता दिली.व्हॅटिकन म्युझियमचा मुख्य दरवाजा १९३२ मध्ये मोमोने बांधलाय.त्या दरवाज्यावर मायकेल अँजेलो (याला द ओल्ड मॅन पण म्हणतात कारण मायकेल अॅन्जेलो जवळ जवळ नव्वदीपर्यंत जगला.ते त्या काळात एक आश्चर्यच होतं.) आणि राफाएलचे पुतळे आहेत.कारण या दोन महान कलाकारांनी त्यांच्या आयुष्याचा महत्वाचा काळ इथे व्यतित केला.मायकेलच्या हातात छिन्नी तर राफाएलच्या हातात कुंचला आणि रंगाची पॅलेट आहे.
(जालावरून साभार)
आतमध्ये सुरक्षा व्यवस्थेमुळे काहीही सोबत नेता येत नाही.पर्स इ.स्कॅन करून घ्यायचे.मोठ्या बॅगा जमा कराव्या लागतात.इथेच प्रथमग्रासे मक्षिकापात झाला !आमच्यासोबत पंतप्रधानांच्या गावची काही मंडळी होती.जावे तिथे खावानु पिवानु मज्जा करानु असं ठरवून आलेली लोकं!! आधी पिशव्यांबद्दल सूचना दिलेल्या असूनही हे लोक दोन ट्रॉली बॅगभरून खाण्याचे पदार्थ,इतनी देर चलेंगे तो खाना वाना पडेगाही, म्हणत घेऊन आलेले.दरवाज्यात अडवले गेल्यावर त्यांनी तारस्वरात भांडंण करायला सुरुवात केली,तिथल्या अधिकार्यांशी.त्या हुज्जतीमुळे आमच्या ग्रुपला बाजूला थांबवण्यात आले.त्यात बराच वेळ गेला.त्यांना बॅगा ठेवायला लागल्याने अतिशय नाराज होउन हे लोक ग्रुपमध्ये सामिल झाले.त्यांना वाटत होते,त्यांना बॅगा नेऊन देण्यासाठी कोणीतरी सपोर्ट करायला हवा होता!! आमच्यासारखे अधिर होउन कधी एकदा आतला ठेवा बघायला मिळतो त्याची वाट बघत असताना झालेल्या अनपेक्षित उशिरामुळे नाराज झालेले!
आता फक्त दोनच तासासाठी जगातला एक अतिशय महान कलानिधी बघायला मिळणार होता ज्यात जगातली काही सर्वोत्कृष्ट शिल्पं,चित्रं आणि अनेक कलापूर्ण वस्तू येतात.
पोप हे एखाद्या सम्राटासारखे श्रीमंत झाले होते. त्यामुळे सुंदर शिल्पं,चित्रं घेण हा त्यांचा खाशा शौक बनला होता. या सर्वाला धर्माचे अधिष्ठान देऊन हे संग्रह करणे सुरु झाले.हे संग्रहालय म्हणजे पोपच्या राजवाड्याचाच एक भाग आहे.आजूबाजूच्या भिंती,जिने,ओवर्या,छत यातलं काहीही असं नाही जिथे काहीतरी सुंदर बघण्यासारखं नाही.
सर्व प्रथम लागला पोप पायस ७चा रोमन पुतळ्यांचा संग्रह.इथे अनेक अर्ध पुतळे,पूर्णाकृती पुतळे हारीने ठेवलेले आहेत.सतत पुढे जाण्याच्या घाईत यांच्यावर फक्त एक नजर टाकता येते.अनेक राजेरजवाड्यांचे, ग्रीक देवतांचे पुतळे इथे दिसतात.
इथुन पुढे चालत आपण एका प्रांगणात येतो.इथे मध्ये मोकळी जागा असून बाजूने अनेक देखणे पुतळे ठेवलेले आहेत.
जाताना रस्त्यात एक मोठे पाईन कोनचे शिल्प लागते.याचे वेगवेगळे अर्थ लावले जातात.त्यातला एक म्हणजे ते शरिरातल्या पिनिअल ग्रन्थीचं प्रतिक आहेत जी मेंदूचा मध्य समजली जाते. इथले हे पाईन कोन शिल्प जगातले सर्वात मोठे आहे.ते व्हॅटिकनच्या मध्यावर महत्वाच्या इमारतीबाहेर लावलेले आहे.
यानंतर मध्यावरचे एक दालन लागते.इथे बागेच्या आजूबाजूला काही विशेष महत्वाची शिल्प दिसतात.त्यातलं अतिशय प्रसिद्ध बेल्वडेअर अपोलो.नेसतं वस्त्र सावरत ऐटीत एक पाय पुढे टाकून उभा असलेला,डोक्यावर कुरळ्या केसांची गाठ मारलेला अपोलो बघण्यासारखाच आहे.नुकतंच हातातून बाण सुटला असावा असा एक हात पुढे.अतिशय डौलदार शिल्प.
(जालावरून साभार)
याच ओवरीत रोमच्या टायबर नदीचे शिल्प आहे.आपण नदीला माता समजतो तर इथे पिता समजले जाते.लाटांवर पहुडलेला वयोव्रुद्ध दिसणार्या टायबरचा हा पुतळा
एका कोपर्यात लाओकूनचा प्रसिद्ध पुतळा आहे.त्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी उसळली होती.कारण हा या संग्रहालयासाठी घेतलेला पहिला पुतळा.या लाओकूनची कथा ट्रॉयच्या युद्धाच्या वेळची.त्याने ट्रोजन हॉर्स ही शत्रूची काहीतरी खेळी आहे असा संशय घेतल्याने,अथेना देवी त्याच्यावर कोपते.कारण देवांना ग्रीकांना जिंकवायचे असते!मग त्याला मारायला अजगररूपी राक्षस पाठवला जातो.या अजगराच्या वेढ्यातून सुटण्याचा प्रयत्न करणारा लाओकून आणि त्याची मुलं या शिल्पात दिसतात.त्यांचे ते प्राणपणाने लढणं,त्या वेदना सर्व भाव भावना एका दगडात कोणा महान शिल्पकाराने जिवंत केलंय. इसवी सनाआधी दोन शतकं इतका हा जुना पुतळा आहे.या शिल्पापासून खुद्द मायकेल अॅन्जेलोने धडे घेतले होते.
यापुढे एका कक्षात सम्राट नीरोचे स्नानपात्र आहे.नीरो हा अत्यंत विलासी सम्राट होता.त्याचे स्नानपात्रदेखिल त्याच्या राहणीमानाला साजेसे! अतिशय दुर्मिळ अशा लाल-जांभळ्या रंगाच्या अफ्रिकन संगमरवराचे हे बनवलेले आहे.हा दगड फक्त सम्राटच वापरू शकत!त्याखालची जमीन देखील अत्यंत देखण्या मोझाईकने नटलेली आहे.आजूबाजूला अनेक उत्तमोत्तम पुतळे आहेत.
हा ब्रॉन्झ मधला हर्क्युलीसचा पुतळा.हा पॉम्पेच्या फोरममध्ये मिळालेला पुतळा आहे.ज्या काळात ओतीव धातूकाम अगदीच दुर्मीळ असे तेव्हाचा हा पुतळा.हर्क्युलीस हा एक शूर योद्धा होता.त्याला अनेक जीवावरची धाडसी कामं कारावी लागायची. त्यावरून अजूनही कोणत्या कठिण कामाला हर्क्युलियन टास्क म्हणण्याची पद्धत आहे.
हा पुतळा म्हणजे मुर्तीमंत ट्रॅजेडी! नृत्य्,नाट्य,कला,संगीत अशा नऊ झ्यूसच्या मुली समजल्या जातात,त्यातली ही ट्रॅजेडीची मूर्ती,मेल्पोमेनी.तिच्या हातात ट्रॅजिक मास्क आहे!
इथुन पुढे जाताना अनेक दालनं लागत राहातात.जमीन बघू का छत बघू का वस्तू असं होऊन जातं.
हा बाकूसचा पुतळा.हा ग्रीकांचा वाईन देव! तो (अर्थातच्)कायम आनंदी असतो! त्याचे सुटलेले पोट,हातात वाईनचा चषक आणि दुसर्या हातात द्राक्षाचा घड त्याची खूण पटवतात!
हे वेगवेगळ्या दालनांतील छतावरचे काम!
हे जाताजाता दिसलेलं एक मोझाइक.आजही उचलून स्वयंपाकघरात लावता येईल!
ही हातात ढाल आणि भाला घेतलेली अथेना देवी.मला जमलं असतं तर अनाहितासाठी हिला नक्की उचलून आणली असती!
इथुन पुढे गेल्यावर लागते गॅलरी ऑफ मॅप्स.इथे त्या काळातले प्रचंड मोठे नकाशे लावलेले आहेत.त्या काळातले इटलीतली राज्य त्यांच्या सीमा, तसंच त्या काळातलं जग(१५८०-१५८३) जे फक्त अफ्रिका,आशिया आणि युरोप खंड माहित असल्याने तेवढच दाखवलेलं दिसतं! या सबंध दालनाचं छत सोनेरी मुलामा दिलेल्या सुंदर चित्रांनी नटलेलं आहे
(जालावरून साभार)
यापुढी आहे टॅपेस्ट्री विभाग.राफाएल आणि त्याच्या शिष्यांनी काढलेल्या चित्रांवर हे गालिचे विणलेले आहेत.हे भिंतीवर लावायचे गालीचे. एक एक गालिचा विणायला वर्षानुवर्ष लागत.बहुतेक गालिच्यांवर बायबलच्या नव्या करारातल्या चित्रकथा विणलेल्या आहेत.
आता ओढ लागली होती सिस्टिन चॅपेलची,जे संपूर्ण व्हॅटिकन संग्रहालयाचा मुकूटमणी आहे.चौथ्या सेक्स्टस पोपने स्वतःसाठी बांधून घेतलेल्या चॅपेलला त्याच्यावरून सिस्टिन चॅपेल नाव पडलंय.दालन तसं अंधारं आहे.आत मात्र प्रचंड गर्दी.त्यात निरनिराळ्या भाषांचे लोक अवाक होउन हे दालन बघत असलेले.
पोपविरोध शिगेला पोहोचलेला असण्याच्या काळात मायकेल अॅन्जेलोला ह्या दालनात ख्रिस्ताच्या बारा अनुयायांची चित्रं रंगवायला पाचारण केलं गेलं.मायकेल स्वतःला शिल्पकार समजत असल्याने ह्या कामाला तयार होत नव्हता.पोपने त्याला अगदी गळ टाकून या कामाला लावलं.दोन वर्ष दिवस रात्र खपून मायकेलने अद्वितीय चित्रं रंगवून पोपसकट सगळ्यांना त्यातल्या विचारांनी हदरवून टाकलं.या दालनातली मुख्य चित्रं म्हणजे अॅडमचा जन्म आणि आखरी निवाडा.
बायबलमध्ये मानवाच्या निर्मितीची कथा आहे.त्यावरून स्फुरलेलं हे चित्र.देव अॅडमला प्राण फुंकून सजीव करत असण्याचा क्षण या चित्रात आहे.हे चित्र मानवी मेंदूच्या आकारासारखे दिसते.देव त्यातल्या भावना केंद्रावर्,तसच चित्राभोवतीचा लाल शिंपला पाहिला तर हे चित्र गर्भाशयासारखे तर वार्यावर उडणारे वस्त्र नाळेसारखे दिसते.मायकेलच्या प्रतिभेचा हा उच्चत्तम आविष्कार समजला जातो.कोण्त्याही क्षणी देवाचे बोट अॅडमच्या बोटाला जुळेल आणि तो सजीव होइल असा भास चित्रात होत राहतो.
(जालावरून साभार)
छताचे वेगवेगळे भाग पाडून त्यांमध्ये बायबलमधले अनेक प्रसंग चित्रीत केलेले आहेत.अॅडम इव्हचं नंदनवन्,नोहाची नौका अशा नऊ कथा निवडून त्यावर ही चित्र आहेत.
(जालावरून साभार)
आता बघायचं ते समोरची पूर्ण भिंत व्यापणारं अखेरच्या निवाड्याचं एकमेवाद्वितीय चित्र.आपण केलेल्या बर्या वाईट कर्माप्रमाणे अखेर देव आपल्याला स्वर्गात किंवा नरकात धाडतो हे दाखवणारे हे प्रचंड मोठे चित्र आहे.मायकेल ठरवून चित्र न काढता सुचेल तसं कढत जाई.हे चित्र त्याने चार पातळ्यात रंगवलेले आहे.या चित्रात अगदी खालच्या पातळीला उजवीकडे पृथ्वी तर डावीकडे पाताळ आहे.दुसर्या पातळीवर देवदूतांनी तूतारी फुंकल्याचे ऐकून मृतात्मे जागे होऊ लागत आहेत.त्यांच्यावर मास चढून माणसं बनत आहेत.देवदूत त्यांना आकाशात चढवत आहेत.मध्यभागे गुटगुटीत येशू उभा आहे.तो डाव्या हाताने पुण्यात्म्यांना वर स्वर्गाकडे ओढून घेत आहे तर डोक्यावर उगारलेल्या उजव्या हाताने पाप्यांना नरकात ढकलतो आहे.त्याच्या या शक्तीप्रदर्शनाकडे बारा संत आणि मेरी स्तिमीत होउन बघत आहेत. स्वर्गात देवदूत आदराने क्रॉस वाहत आहेत तर नरकात यम छळ करत आहे.या चित्रात मायकेलने अनेक नियम झुगारून लावले.या चित्रातला येशू नेहेमी चित्रात दिसतो तसा लुकडासुकडा ,दीनवाणा न दिसता चांगला पैलवान गडी दिसतो.तसंच चर्चमधले चित्र असूनही सर्व पात्र नग्न आहेत! त्यावेळी या चित्राने हाहा:कार उडवला होता.मायकेलवर अश्लिलतेचे आरोप करण्यात आले! याचे उत्तर म्हणून मायकेलने त्याच्यावर आरोप करणार्याला चित्रात यमाचा चेहेरा दिला!.तो स्वतःही संत बर्थोलोम्युच्या सोललेल्या कातडीला स्वतःचा चेहेरा देऊन आहेच चित्रात!
(जालावरून साभार)
या सिस्टिन चॅपेलमध्ये नव्या पोपची निवड केली जाते.निवड होईपर्यंत इथून काळा धूर सोडला जातो.पोपची निवड झाल्यावर पांढरा !
या सर्वांशिवाय इथे चित्र शिल्पांची अनेक दालनं आहेत."दोनच डोळे माझे उत्सव जातो वाया "अशी स्थिती होउन जाते! माझ्या आवडत्या चित्रकारांची भेट मात्र राहून गेल्याची हूरहूर आहे कारण कमी पडलेला वेळ.या चित्रांसाठी मी परत इथे जाणारच.दोन तीन तासात बघणं केवळ अशक्य आहे.अतोनात गर्दीमुळे बर्याच ठिकाण इच्छा असुनही फोटोस्टॉपही घेता यायचा नाही.त्यामुळे या भागात जालावरची चित्रं जास्त घ्यावी लागली.
परत येताना व्हॅटिकनचे जगातले चिमुकले पोस्ट ऑफिस दिसले.ते बंद होण्याची वेळ झाली होती.तिथे झटपट एक कार्ड विकत घेतले.मग लाईन लावून स्टँप घेतला.कार्ड कोणाला पाठवायचं ते मात्र नक्की होतं.माझ्या वडिलांना.आम्हा भावंडांना लहानपणापासून चित्र शिल्प कला संगीत सगळ्याची जाणिवपूर्वक ओळख देणार्या !त्यामुळेच आम्हाला आमच्या व्यवसायापलिकडे जाऊन पुलं म्हणतात तसं जीवन जगायला शिकता येतंय ,कलेचा आनंद घेऊन...
(क्रमशः)
प्रतिक्रिया
12 Jun 2015 - 10:14 am | मदनबाण
सुरेख लेखन ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Uncensored Trailer [Full Version] Nagrik Marathi Movie
बोला विठ्ठल ! :- नागरिक
12 Jun 2015 - 10:17 am | अनुप ढेरे
मस्तं! त्या लास्ट जजमेंट चित्रावर, आणि इतरही चित्रांवर शेकडो वर्षांमध्ये दिव्याची काजळी धूळ याची पुटं चढली होती. २०-२५ वर्षांपूर्वी त्यांच रेस्टोरेशनच काम केलं गेलं जे १०-१२ वर्ष चालू होतं बहुदा. लास्ट जजमेंटच्या एका कोपर्याप जुना एक प्याच तसाच ठेवला आहे म्हणे, फरक दाखवून द्यायला.
सिस्टीन च्यापेल मध्ये फटू काढणं देखील अलाऊड नाहीये. जपानी कंपनीकडे ते अधिकार आहेत म्हणे.
12 Jun 2015 - 10:24 am | अजया
फोटो काढता येतात आता पण अंधारात,फ्लॅश बंद ठेवुन.त्यात अफाट गर्दी.त्यामानाने जागा कमी.फोटो काढणं तसंही अवघड जातं.
12 Jun 2015 - 10:27 am | खटपट्या
खूप सुंदर फोटो,
आता वाचतोय.
12 Jun 2015 - 10:42 am | स्पा
एकदम भारी सुरु आहे :)
12 Jun 2015 - 10:59 am | विशाल कुलकर्णी
मस्त लेख आणि सुंदर फोटो ! त्या चित्रांबद्दल अजून डिटेलमध्ये वाचायला आवडेल. धन्यवाद !
12 Jun 2015 - 11:15 am | नूतन सावंत
अजया,अतिसुरेख.शेवटही भावला.
12 Jun 2015 - 11:47 am | चुकलामाकला
वा!सुरेख!
12 Jun 2015 - 11:48 am | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर वर्णन आणि चित्रांसह मस्तं चालली आहे सफर !
पुभाप्र.
12 Jun 2015 - 12:30 pm | कपिलमुनी
फोटो आणि वर्णन छान !
अवांतर : हे कोणत्या चित्रपटामध्ये दाखवला आहे ?
12 Jun 2015 - 12:30 pm | एस
अप्रतिम!
12 Jun 2015 - 12:59 pm | सुचेता
आम्ही च प्रत्यक्श पहात आहे अस वाटतय
12 Jun 2015 - 1:03 pm | खेडूत
छान !
मीही तिथे काढलेले काही फटू हितंच चिकटवावेत म्हणतो...
12 Jun 2015 - 5:09 pm | अजया
अरे वा!टाका टाका फोटो.
12 Jun 2015 - 1:16 pm | पद्मावति
नेहमी- सारखेच उत्तम अनुभव कथन.
12 Jun 2015 - 1:34 pm | स्वच्छंदी_मनोज
सुंदर. उत्तम अनुभव कथन.
12 Jun 2015 - 1:38 pm | स्वाती राजेश
लेखन आणि फोटो.. :)
12 Jun 2015 - 1:39 pm | विशाखा राऊत
मस्तच लेखमाला
12 Jun 2015 - 5:17 pm | स्मिता श्रीपाद
सुरेख झालाय हा भाग पण अजया ताई...
12 Jun 2015 - 5:25 pm | गिरकी
छान वर्णन गं अजयातै … अब तो इटली होनैच मंगताय.
12 Jun 2015 - 5:36 pm | रेवती
क्या बात है! अगदी डोळे विस्फारून बघत रहावं असं संग्रहालय आहे.
12 Jun 2015 - 5:42 pm | सूड
सहीच!!
12 Jun 2015 - 5:46 pm | अत्रुप्त आत्मा
फोटो आणि माहिती ,छान.
12 Jun 2015 - 5:52 pm | प्रचेतस
कैच्याकै भारी आहे हे.
ब्राउनच्या 'एन्जल्स एंड डेमन्स' मध्ये सिस्टिन चापेलचा परिचय झाला होता.
चित्रं आणि शिल्पं पण जबराट आहेत. भारतीय शिल्प आणि चित्रशैलीत अशी एनाटोमिकल शिल्पचित्रं अगदी अभावानेच आहेत.
12 Jun 2015 - 5:58 pm | स्वाती दिनेश
म्युझिअमची सफर छान!परत एकदा मनाने तिथे पोहोचले..
एकदा इस्टरच्या सुटीत वॅटिकनच्या गर्दीत गेलो होतो त्याची आठवण झाली.
स्वाती
12 Jun 2015 - 8:36 pm | पियुशा
वाह मस्त लै भारीए एकच नम्बर :)
12 Jun 2015 - 8:54 pm | कविता१९७८
मस्तच गं, सगळंच सुंदर, पुढल्या खेपेस नक्की फोटो घे
12 Jun 2015 - 9:22 pm | त्रिवेणी
मधले २ भाग राहिलेत अजुन. पण सगळीच माहिती कशी लक्शात रहाते ते सांग.
12 Jun 2015 - 10:50 pm | अजया
अगं आधी त्यावरची पुस्तकं वाचायची.नेटवरुन माहिती घ्यायची.त्याच्या नोट्स काढुन मी रोज जे बघायचं त्याच्या सोबत घेऊन जायचे.त्यामुळे आपल्याला काय बघायचंय हे नेमकं कळतं.नाहीतर नुसताच फेरफटका होतो.त्या जागेचं काय महत्व,कोणता पुतळा कशाचा हे माहित नसेल तर अशा अफाट ठिकाणी जाण्यात अर्थ नाही.ते सगळं रिफर करुन लिहिते आहे.रोमराज्यमधुन काही संदर्भ घेतले आहेत तर काही त्या त्या ठिकाणच्या आॅफिशियल वेबसाईटवरुन.
12 Jun 2015 - 9:54 pm | पैसा
सुरेख लिहिलंय आणि फोटो बघूनच डोळ्याचं पारणं फिटलं!
12 Jun 2015 - 10:56 pm | मधुरा देशपांडे
मस्त सुरु आहे सफर. तुझ्या अभ्यासु वृत्तीला दंडवत. आणि पुन्हा हे सगळे आमच्यापर्यंत पोचवते आहेस, त्याबद्दल धन्यवाद. मला ईटलीत फिरताना नक्कीच याचा फायदा होईल.
बाकी ते खावानु पिवानु मज्जा करानुचे नमुने खूपच पाहिलेत, त्यामुळे अगदीच समजु शकते.
12 Jun 2015 - 10:59 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
खुप छान लिहिलयं आणि फोटोही सुंदर.
12 Jun 2015 - 11:04 pm | रुपी
फारच सुंदर लेखन! आणि तुम्ही हे सगळं पाहण्याआधी एवढी माहिती काढून नोट्स घेतल्या त्याचंही कौतुक आहे! यापुढे फिरताना मीही थोडा अभ्यास करुन जात जाईन.
त्या मानवाच्या निर्मितीच्या चित्राचं नाव काय आहे?`
12 Jun 2015 - 11:08 pm | अजया
creation of Adam नाव आहे त्या चित्राचं.
12 Jun 2015 - 11:09 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
त्या चित्रावर शेकड्यानी व्यंगचित्र आणि मेम्स काढले गेलेत.
12 Jun 2015 - 11:55 pm | रुपी
धन्यवाद.
12 Jun 2015 - 11:15 pm | आतिवास
''इटली"ला गेलं पाहिजे एकदा तरी - असं वाटायला लावणारी लेखमाला.
13 Jun 2015 - 12:48 am | जुइ
खास करून एवढी सगळी माहिती संकलित करून तू परत आमच्या समोर आणत आहेस. इटली ला एकदा तरी गेलेच पाहिजे अस प्रत्येक भाग पाहून वाटत आहे.
13 Jun 2015 - 2:51 pm | भुमी
अप्रतिम शब्द चित्र सहल :सर्वच भाग अतिशय सुरेख
13 Jun 2015 - 4:56 pm | स्पंदना
लाओकुनच शिल्प पाहिलं आणि डोळे निवले बाई!!
खरच!! काय जादू असते कलाकाराच्या हातात ना?
अन तशीच जादू तुझ्या लिखाणात सुद्धा आहे अजया!!
आज सगळ्या भागांची शिस्तीत वाचुन रसस्वादाची आणि दाद देण्याची कामगीरी संपली. आता नविन भागाच्या प्रतिक्षेत.
13 Jun 2015 - 5:25 pm | अनन्न्या
काही भाग वाचायचे राहिलेत अजून.
13 Jun 2015 - 6:48 pm | सुधीर कांदळकर
प्रत्यययकारी लेखन. वाचू की चित्रे पाहू असे वाटले. पाचेक वर्षापूर्वी एन्जल्स अॅण्ड डेमन्स वाचतांना व्हॅटिकनबद्दल कुतूहल वाटले होते. चित्रे पाहून फारच आवडले.
पुभाप्र
13 Jun 2015 - 7:11 pm | सुधीर कांदळकर
सगळे भाग आवडले.
धन्यवाद.
13 Jun 2015 - 11:18 pm | इशा१२३
सुरेख अजया.हा हि भाग छान.पु भागाच्या प्र.
13 Jun 2015 - 11:34 pm | उमा @ मिपा
आधीच्या सर्व भागांप्रमाणेच हाही भाग अप्रतिम, याचा शेवट अतिशय भावला!
13 Jun 2015 - 11:54 pm | सानिकास्वप्निल
क्या बात है!!! अप्रतिम झालाय हा भाग, फोटो पण मस्तं.
तुझ्या लिखाणामुळे पुन्हा एकदा इटलीला जावेसे वाटत आहे, नव्याने बघावेसे वाटत आहे :)
14 Jun 2015 - 6:48 am | भाग्यश्री कुलकर्णी
खास लिहलंयस..वाचन त्या ठिकाणी पोहोचवतंय..जियो..बहुत बढीया...
14 Jun 2015 - 1:49 pm | Maharani
हा भागही अप्रतिम..
14 Jun 2015 - 11:27 pm | श्रीरंग_जोशी
या लेखमालिकेतले पूर्वीचे सर्व भाग उत्तम असले तरी या भागाची गोष्ट काही औरच.
एकदम कळस गाठलाय. काय ती सौंदर्यदृष्टी अन काय तो अभ्यास.
हे सर्व शेकडो वर्षांपासून इतकं व्यवस्थित जतन करुन ठेवलं गेलय अन पर्यटकांसाठी खुलं आहे हे आपले नशिबच म्हणायचे.
15 Jun 2015 - 1:52 pm | प्रभाकर पेठकर
अप्रतिम शिल्प-चित्रकला. अशा शिल्प-चित्रांचा आनंद लुटण्यासाठी आवश्यक ती रसिकता आणि अभ्यास लिखाणातून ठायी ठायी दिसून येतो आहे.
16 Jun 2015 - 12:55 pm | गणेशा
आजच सर्व भाग वाचुन संपवले..... सुंदर लेखमाला.. मला या इटलीची माहीतीच नव्हती.. या लेखमाळे मुळे झाली...
धन्यवाद ....
16 Jun 2015 - 1:13 pm | बॅटमॅन
लेखमाला संपल्यावरच वाचू असे ठरवले होते पण मथळा पाहिल्यावर राहवले नाही. शब्द कमी पडतात, इतकेच सांगतो. एकदा गेलेच पाहिजे.
16 Jun 2015 - 4:25 pm | सस्नेह
हे खरे रोम.. भव्य सांस्कृतिक वारसा मिरवणारे !
16 Jun 2015 - 5:24 pm | papilon
वाह ! अप्रतिम आणि माहितीपूर्ण
19 Jun 2015 - 1:20 pm | शशांक कोणो
अजया,
अतिशय सुरेख.... फोटो पाहून मन भरत नाही. तुम्ही हे सगळे प्रत्यक्ष पाहिलेत. खूपच चांगला अनुभव असेल.नाही? इटलीला जोडून जमल्यास ग्रीस आणि तुर्कस्थान करावा. एक वर्तुळ पूर्ण होईल.
19 Jun 2015 - 4:43 pm | अजया
धन्यवाद.इजिप्त,ग्रीस अाणि तुर्कस्थान यादीत आहेच.
6 Jul 2015 - 2:09 am | यशोधरा
सुर्रेख!
18 May 2016 - 9:28 pm | उल्का
आज आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनी वाचण्याचा योग आला.
उर्वरित भाग पण वाचते आहे. :)
19 May 2016 - 4:44 pm | निशाचर
माहितीपूर्ण लेख आवडला. पुनर्भेटीचा आनंद मिळाला. ईथेच कारावाज्जिओने (Caravaggio) काढलेलं चित्र प्रथम पाहिलं होतं. मायकेल अँजेलो पे़क्षा आता कारावाज्जिओ जास्त आवडतो!
लेखमालेतील बाकीचे लेख नक्की वाचणार.