माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग-३ -पॉम्पे

अजया's picture
अजया in भटकंती
22 May 2015 - 11:10 pm

भाग -१, भाग -२

आज आमच्या सहलीचा दुसरा दिवस.इथुन पुढचे दोन दिवस आम्ही नेपल्समध्ये असणार होतो.आज जाताना आधी पाॅम्पे मग सोरेंतो करुन नेपल्सला हाॅटेलला मुक्काम असणार होता.
रोम नेपल्स साधारण तीन तासाचं अंतर आहे बसने.सगळा ग्रुप अगदी वेळेत ब्रेकफास्ट करुन हजर होता.या हाॅटेलच्या ब्रेकफास्ट मेनुमध्ये मस्त केक्स होते.चीज केक,आॅरेंज अपसाइड डाऊन,काॅफी केक,पायनॅपल सिरप टाकलेला केक,चाॅकलेट केक बर्याच व्हरायटी होत्या.शिवाय फ्रेशली बेक्ड गरम गरम क्राॅसाँ! सर्व गोष्टींची चव घेऊनच पोट भरलं!आणि भरल्या पोटी बसमध्ये विराजमान झालो..
बराच वेळ प्रवास होणार असल्याने आमच्या टुर लिडरने सर्वाना एक एक करुन ओळख करुन घ्यायला बोलावलं.ओळखी सुरु झाल्या आणि कळालं की ग्रुपमध्ये सर्वात जास्त डाॅक्टर्स आहेत! सुरुवातीला प्रत्येक डाॅक्टर अभिमानाने आपली स्पेशालिटी, आवडी इ. सांगत होते.हळुहळु दहा एक डाॅक्टर होऊन गेल्यावर उलट सुरु झालं.गेल्या जन्मीच्या पापाची कबुली दिल्यासारखे एकएक जण ओशाळुन मीही डाॅक्टर आहे सांगु लागले आणि त्यांनी मी डाॅक्टर आहे सांगीतले की बसमध्ये एकच हशा पिकु लागला! आणि अडाॅक्टर लोक पुढे होऊन अभिमानाने मी डाॅक्टर नाही आधीच सांगतो म्हणून क्लिअर करायला लागले!!मग मस्त अंताक्षरी सुरु झाली.आमच्या बरोबरचे सर्वात सिनियर 75 वर्षाचे आजोबा दणक्यात नवी जुनी गाणी म्हणायला लागले! भेंड्या लावुन भांडाभांडी करत असताना खिडकीतुन बाहेर एक त्रिकोणी दोन शिखराचा डोंगर जवळ येताना दिसु लागला.त्याचा भोवताल हिरवागार आणि डोंगर मात्र बोडका.एकदम ट्युब पेटली ,अरे! हा तर व्हेसुव्हियस आला! पाॅम्पेचा सर्वनाश करणारा तेव्हाचा खलनायक. ढगांची खोळ पांघरुन शांत दिसणार्या या ज्वालामुखीने तिसरा डोळा उघडुन हाहाःकार उडवला होता हे पाहुन वाटतच नाही!
.
(बसच्या काचेतून काढलेला फोटो आहे हा!)

बघता बघता बस पाॅम्पेच्या पार्किंगला आली.आम्ही नेपल्समध्ये आल्याने आता पुढचे दोन दिवस निओपोलिटन जेवण मिळणार होते.आधी जेवुन मग पाॅम्पेवर स्वारी करायची होती.जेवणाचा ठराविक मेन्यु होता.आधी व्हेज सुप मग पिझ्झा ,पास्ता मग आईसक्रिम.जोडीला हवी असल्यास वाईन किंवा साॅफ्ट ड्रिंक्स.व्हेसुव्हियसचा हा भाग उत्तम वाईनसाठी प्रसिध्द आहे!या भागत मोठ्या प्रमाणात द्राक्ष लागवड होते.प्रसिद्ध लॅक्रिमा क्रिस्ती डेल व्हेसुवियो वाईन इथली.लॅक्रिमा क्रिस्ती म्हणजे ख्रिस्ताचे अश्रू !!(साहजिकच आहे म्हणा.वाईनला नाव दिल्यावर आले असतील ;))इटालिअन पिझ्जावर कुठेच टाॅपिंग नसते हे ज्ञान तिथे मिळाले! ती म्हणे अमेरिकनांनी बिघडवलेली पध्दत.इथे पिझ्झावर साॅस ,चीझ,आॅलिव्ह आॅइलची धार.बेस मात्र खरपूस भाजलेला भट्टीमध्ये.पास्तामध्ये देखिल पास्ता साॅस, बेसिल लिव्ह्ज आणि इटालियन हर्ब्ज.वरुन पार्मेसान चीजची पावडर घालुन घ्यायची.पिझ्झाचा जन्मच नेपल्सचा असल्याने नेपल्सवासी आपण करतो तोच पिझ्झा सर्वश्रेष्ठ मानतात!! (नेपल्स इटलीचे पुणे तर नाही!) मांसाहारी लोक कालवं आवडीने खात होते.तो माझा प्रांत नसल्याने मी काही नीट बघितलं नाही! आजुबाजुला गिटार घेउन लोक गात फिरत होते.समोरच्या अमेरिकन ग्रुपने अनेक युरोची टीप देऊन त्यांना खूश करून टाकले.आम्ही भारतीय बाण्याने त्यांच्याकडे निटस दुर्लक्ष केले!
.
मला मात्र तो पिझ्झाही आवडेना आणि पास्ता घशाखाली उतरेना!वाईन तेवढी छान होती पण तिने पोट नाही भरता येत ना! मोठ्या कष्टाने मी पोटभरीसाठी त्या पिझ्झाचे तुकडे मोडले! (गाढवाला गुळाची चव काय म्हणले तरी चालेल पण मला पिझ्झा आणि पास्ता खायला अजिबात आवडत नाही!!)
तर असे जेवण करुन बाहेर आल्यावर सर्वाना आॅडिओ गाईड दिले गेले.त्याचा माईक आमचा गाईड मार्कोकडे असणार होता.त्याने सांगायचे आम्ही ऐकत कळपाने त्याच्या मागे फिरायचे अशी योजना होती.
मार्को!! एक अलिखित सत्य असं आहे की बायकांची टकळी त्यांच्या नवर्यापेक्षा हॅन्डसम माणसापुढे बंद होते आणि बायकोपेक्षा सुंदर स्त्री असेल तर अबोल पुरुष अचानक बोलु लागतात ;)
इथे हा आमचा मार्को तर साक्षात ग्रीक गाॅड दिसत होता! त्यामुळे शांतता पसरली एकदम!! त्याचा आवाजही सुरेख होता आणि सांगायची आवड.त्यामुळे त्याने पाॅम्पेची पूर्वपिठिका जाता जाता रस्त्यात सांगायला सुरुवात केली.
पाॅम्पे हे समुद्राकाठचं गाव.गावाचं बंदर व्यापारीदृष्टीने महत्त्वाचं.त्यामुळे समृध्द.त्यात व्हेसुव्हियसच्या सान्निध्यामुळे अतिशय सुपिक जमिन.त्यामुळे इथे रोमन सम्राटांपासुन अनेक धनिकांची घरं.मोठी बाजारपेठ असणारं टुमदार गाव.इ स 79मध्ये अचानक आले व्हेसुव्हियसच्या मना,त्यातुन मोठे स्फोट होऊ लागले.विवरातुन मोठ्या प्रमाणात राख उडु लागली.या राखेचा थर 20 फुट! त्याखाली आख्खं शहर त्यातल्या माणसा प्राण्या व्यापारउदिमांसह चिणलं गेलं.त्यानंतर अनेक शतकं हे असंच झाकलेलं राहिलं.ते एकोणिसाव्या शतकात केल्या गेलेल्या उत्खननात उघडकीला आलं त्याकाळातली संस्कृती अक्षरशः राखेखाली गोठलेली मिळाली. या तांडवातुन वाचलेले लोक अगदी कमी.गावच्या गाव मरणोन्मुखी पडलेलं.त्यात प्राण्यांपासुन सर्वांची शवं सापडली.ती राखेत दबली गेली असल्याने त्यात पोकळ्या तयार झालेल्या. संशोधकांनी त्यात प्लॅस्टर ओतुन त्याच्या प्रतिकृती जमवल्या आणि नजरेसमोर आली भयानक वेदनादायक मृत्युला सामोरी गेलेली आख्खी संस्कृती.तिथल्या म्युझियममध्ये यातल्या काही गोष्टी बघायला मिळतात.पाय बांधल्याने जागच्या जागी होरपळलेलं कुत्रं शहारा आणुन गेलं .पुढच्या रकान्यात तर पोट जिवाच्या आकांताने धरुन ठेवलेली गरोदर स्त्री तर हात बांधुन बसल्या अवस्थेत मरुन गेलेल्या माणसांची प्लास्टर कास्ट . मरणाच्या तांडवाची ती दाहकता बघवत नाही.त्याचबरोबर तिथे त्याकाळात वापरले जाणारे अनेक रांजण,चुली,संगमरवरी आसनं,स्वैपाकाची मातीची भांडी अशा बर्याच गोष्टी ठेवलेल्या आहेत.त्या काळातल्या जीवनमानाची नीट कल्पना येते.
.
.
.
(जालावरून साभार)
.
येतानाच्या मार्गावर प्रथम लागते ते तिथले अॅम्फिथिएटर.रोमन संस्कृती जिथे आहे तिथे अॅम्फिथिएटर असतेच.सम्राटाचा वेगळा कक्ष अाणि उघडलेल्या जपानी पंख्याच्या आकारात पायर्‍यांची उतरंड अशी रचना आहे.इथे नाटकांचे प्रयोग होत.राजवाड्याचा देखावा तर दोन मजली असे.त्याभोवती सुंदर पुतळे ठेवलेले असत.हे अजूनही चांगल्या अवस्थेत टिकलेले आहे.इथे दर वर्षी पॉम्पेचा संगीत महोत्सव होतो.
.
.
(जालावरून साभार)
त्याच्या आधी तिथली व्यायामशाळा दिसते.रोमन बलोपासना करणारे असल्याने तीही आवश्यक असे.मार्को हे सर्व पूर्वी कसे दिसत असेल हे चित्र दाखवत छान समजावुन सांगत होता.
.
पुढे चालत आलो,बाजारपेठेत रायगडावरच्या बाजारपेठेसारखीच जरा उंचावर दुकानं.
अजुनही पूर्वीचाच दगडी रस्ता वापरात आहे.त्यावर रथांच्या चाकाच्या खुणा दिसतात.
.
प्रथम लागला तेव्हाचा पिझ्झेरिया! गोल पाव भाजायची भट्टी शिल्लक आहे.बाकीचे तपशिल मनाने रंगवायचे आणि चित्रं पहायची!
...
.

रस्त्यात चौक येई तिथे असे दगडी स्पिडब्रेकर दिसतात,रथांना आवर घालणारे!
.
(आंतरजालावरून साभार)
एका दुकानात रांजण दिसतात भिंतींच्या आत घातलेले.इथे त्या काळातली सर्वात महाग गोष्ट मीठ विकले जायचे.कारण बर्फ ,मांस टिकवायला मीठ सर्वांनाच लागे.सॅलॅरियम या लॅटिन शब्दावरुन सॉल्ट हा शब्द आलाय.पुर्वी रोमन सैनिकांना त्यांचा पगार हा मीठ विकत घेण्यासाठी दिलेली रक्कम म्हणजे आजची सॅलरी असा मिळत असे!
.
इथुन पुढे वळण घेऊन रस्ता आला हमामखान्यापाशी.इथे स्त्रीया पुरुषांचे वेगवेगळे हमाम आहेत.त्यात गार पाण्याचे हौद,वाफ घेण्यासाठी(सौना बाथ) लाकडी फळी असणार्या खोल्या,गरम पाण्याचे हौद असणार्या खोल्या आहेत.त्यावर सुंदर चित्र म्हणजेच फ्रिस्कोज आहेत.मस्त सौना घेऊन संगीताच्या साथीवर सुस्नात होणारे रोमन्स होते खरे रसिक!फ्रिस्को म्हणजे ओल्या प्लास्टरवर केलेले रंगकाम.इथे फ्लॅश वापरता येत नसल्याने जमतील तसे फोटो काढले आहेत.
.
.
.
.
.
हाच रस्ता पुढे फोरमला जाऊन मिळतो.इथे मोठा चौक लागतो.त्या काळात तो पुर्णतः संगमरवरी फरशांनी आच्छादलेला असे.समोर व्हेसुवियस.त्याच्या पार्श्वभूमीवर ज्युपिटरचे मंदिर.इथल्या तळघरात त्यांचा खजिना असे.एका बाजूला इथली बॅसिलिका,न्यायालय आदी महत्वाच्या इमारती.दुसर्‍या बाजूला अपोलोच्या मंदिराचे शुभ्र खांब उभे आहेत.
.
.
असं हे नांदतं गाजतं गाव ऐन वैभवाच्या शिखरावर असताना त्यावर काळाचा घाला पडला.दोन हजार वर्षापूर्वीची ती संस्कृती बघताना सतत हुरहुर वाटत राहाते.अचानक असे संकट आल्यावर काय झालं असेल त्यांचं.आयुष्य क्षणभंगूर आहे का म्हणतात ते इथे येऊन पटतं.क्षणात होत्याचं नव्हतं होउन गेलं.मात्र इथल्या भित्तीचित्रांचं आणि कोरीवकामाचं फारसं कौतुक वाटलं नाही.कारण या काळात भारतात अत्यंत सुंदर चित्र आणि शिल्प निर्मिती होत होती.भारतातून सोन्याचा धूर निघण्याचे दिवस ते!
रमतगमत पॉम्पे बघत बसकडे परतलो.परतताना स्मरण वस्तूंची दुकानं दिसली आणि इतका वेळ तोंडाला कुलूप घालून फिरणार्‍या, इटलीला आलो हे सांगण्यासाठीच फक्त आलेली काही मंडळी, शॉपिंगचा विरह सहन न झाल्यासारखी त्या दुकानांकडे धावली!! आम्ही पुढे जायचे असणारे सोरेंतो कसंय त्याचा विचार करत बसकडे आलो.एकदाची मंडळी ग्रूप लिडरने पकडून आणली आणि बस व्हेसुवियसला वळसा घालत सोरेंतोकडे निघाली.कसं आहे सोरेंतो पाहिलच नव्हतं नेटवर,इथे येण्याआधी!अचानक समोर समुद्र ,मागे व्हेसुवियस आणि एक अप्रतिम सुंदर देखावा नजरेसमोर आला.सोरेंतो! पुढच्या भागात...

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग ४ -सोरेंतो,काप्री-ब्लू ग्रोटो

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

22 May 2015 - 11:54 pm | श्रीरंग_जोशी

काय तपशीलवार लिहिलंय कुठेही रटाळपणा न येऊ देता. फोटोजही छानच.
ही सहल छान जगला आहात तुम्ही हे निश्चित.

मधुरा देशपांडे's picture

23 May 2015 - 1:54 am | मधुरा देशपांडे

असेच म्हणते. पुभाप्र.

स्रुजा's picture

23 May 2015 - 6:46 am | स्रुजा

अगदी अगदी! जियो अजया ताई.

चुकलामाकला's picture

23 May 2015 - 9:36 am | चुकलामाकला

+१११

सस्नेह's picture

23 May 2015 - 11:00 am | सस्नेह

कथनरम्य सफरवर्णन !

पिलीयन रायडर's picture

23 May 2015 - 6:13 pm | पिलीयन रायडर

हेच म्हणते..!

पण पुढचे भाग पटापटा का टाकत नाहीस ग???

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2015 - 12:03 am | अत्रुप्त आत्मा

मीठाची गोष्ट भारी वाटली.

माहिती व फोटू आवडले. आजकाल मुले पोम्पेईचे गाणे म्हणतात त्यातही ज्वालामुखीच्या ग्रे क्लाऊडचा उल्लेख आहे. या लेखातून नक्की काय नि किती हानी झाली ते समजलं. पास्ता व पिझ्झ्याचे फोटू असणे अनिवार्य आहे. ;)

रुपी's picture

23 May 2015 - 2:10 am | रुपी

ओळख-परेडचा किस्सा मजेशीर! पॉम्पेबद्दल आधी वाचलेलं आहे, पण इतकी माहिती नव्हती आणि एवढे फोटोही पाहिले नव्हते. तुम्ही स्वतःचे आणि आंजावरचे बरेच फोटो टाकून सगळं डोळ्यासमोर उभं राहिलं, पण फोटो आवडले असं तरी कसं म्हणणार? हे सगळं प्रत्यक्ष पाहताना तर तुम्हाला कसं वाटलं असेल...

पण निदान संशोधकांना सुचावं आणि ते अमलातही आणलं जावं हे काय कमी आहे? भारतात तर मागच्या काही वर्षांत सिंधू संस्कृतीची साक्षीदार असलेली जी शहरे सापडली त्यात बर्‍याच ठिकाणी स्थानिक नागरिकांनी प्राचीन वस्तू, दागिने पळवून विकल्याच्या घटना घडल्या आहेत :(

जुइ's picture

23 May 2015 - 3:00 am | जुइ

फोटोही छानच.

विशाखा पाटील's picture

23 May 2015 - 6:51 am | विशाखा पाटील

सुंदर!

विनोदी निरीक्षणासह गमतीदार वर्णन छान जमले आहे. युरोपचा इतिहास माहीत नसेल तर अळणी होऊ शकते ट्रिप.

एस's picture

23 May 2015 - 7:48 am | एस

लय भारी!

प्रीत-मोहर's picture

23 May 2015 - 8:01 am | प्रीत-मोहर

डिट्टॅलवार वर्णन अगदी आवडलेले आहे.

पैसा's picture

23 May 2015 - 8:49 am | पैसा

मस्त खुसखुशीत लिहिलंय!

त्या मानाने बर्‍यापैकी टिकून राहिलं आहे सगळं. मात्र विनाशाची चित्रं बघताना छाती दडपून गेली. एवढ्या क्षणभंगूर आयुष्यात आपण सगळंच किती घट्ट पकडून ठेवायला बघतो, आणि ते सगळं किती हास्यास्पद आहे हे नव्याने समोर आलं.

प्रचेतस's picture

23 May 2015 - 8:51 am | प्रचेतस

एकदम जबराट लेख.
पाॅम्पेच्या उद्रेकामुळे पसरलेली राख पार महाराष्ट्रात (बहुधा जुन्नर येथे) पोहोचून तिथे एक राखेचा डोंगर तयार झाला असे कुठेशीक वाचले होते.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2015 - 12:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

भारतात सापडणारी राख इ स ७९ मध्ये झालेल्या व्हेसुव्हिअस ज्वालामुखीच्या (ज्याखाली रोमन शहर पॉम्पे गाडले गेले) उद्रेकाची नसून ७४,००० वर्षांपूर्वी झालेल्या आताच्या इंडोनेशियामधील सुमात्रा बेटावरील तोबा ज्वालामुखीच्या उद्रेकाची आहे.

तोबा उद्रेक हा गेल्या १,००,००० वर्षातील सर्वात मोठा आणि महाप्रचंड उद्रेक होता. त्या राखेने संपूर्ण भारतीय उपखंड झाकून टाकले होते आणि अजूनही तिचे भारतात ६ मीटर पर्यंतच्या जाडीचे थर सापडतात तर अगदी दूरवर म्हणजे ग्रीनलँडच्या बर्फापर्यंत त्या राखेचे अवशेष सापडतात. या उद्रेकामुळे पृथ्वीच्या वातावरणात पसरलेल्या धुळीने सूर्यकिरणांना अटकाव होऊन हिमयुगाचा एक अतिथंड कालखंड सुरू झाला होता.

व्हेसुव्हिअसचा उद्रेक तुलनेने फार छोटा होता आणि त्याने आजूबाजूचा काही परिसर बाधित झाला होता. परंतु, त्या उद्रेकात गाडल्या गेलेल्या पायथ्याजवळील पॉम्पे शहरामुळे त्याकाळच्या रोमन संस्कृतीचे अवशेष उत्तम अवस्थेत राहीले आहेत; पॉम्पेच्या ऐतिहासिक महत्वाचे व जगप्रसिद्धीचे हे मुख्य कारण आहे.

नविनच माहिती मिळाली ही.

तिमा's picture

23 May 2015 - 4:29 pm | तिमा

तोबा उद्रेक हा गेल्या १,००,००० वर्षातील सर्वात मोठा आणि महाप्रचंड उद्रेक होता

म्हणूनच 'तोबा तोबा' असं म्हणतात काहो ?
लेखमाला वाचत आहे.

रेवती's picture

23 May 2015 - 4:42 pm | रेवती

बापरे! काय उद्रेक असेल, ज्याची राख जुन्नरपर्यंत आली. नवीन माहिती मिळाली.

काळा पहाड's picture

24 May 2015 - 12:37 am | काळा पहाड

बहुधा हा तोच उद्रेक होता (http://en.wikipedia.org/wiki/Toba_catastrophe_theory) ज्यानं मानवजात जवळजवळ संपूर्णपणे नामशेष झाली होती. या ज्वालामुखीय उद्रकामुळे साधरण १० वर्षांचा ज्वालामुखीय हिवाळा सुरू झाला (कारण राखेमुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोचत नव्हता) आणि पुढे १००० वर्षं जगाचं तपमान घटलेलं होतं. ७५,००० वर्षापूर्वी झालेल्या या उद्रकातून वाचलेले जगात फक्त १५,००० मानव उरले होते. आजचे सर्व मानव हे या १५,००० मानवांचे वंशज आहेत. या वाचणार्‍या मानवजातीत ३ समूह होते: १)आफ्रिका जिथून पुढे मानवांचा प्रसार जगभर झाला २) ज्वालापुरम (कुर्नूल जिल्हा, आंध्रप्रदेश) आणि ३) इंडोनेशिया.

अजया's picture

23 May 2015 - 9:31 am | अजया

बापरे!पाॅम्पेची राख महाराष्ट्रात?

श्रीरंग_जोशी's picture

23 May 2015 - 10:21 am | श्रीरंग_जोशी

नुकतीच आखातातले धुळीच्या वादळाची धुळ पुण्यापर्यंत पोचले होते.
आइसलंडच्या ज्वालामुखीमुळे २०१० अन २०११ साली युरोपातून अमेरिकेकडे विमानांचे येणे अवघड झाले होते. १९९१ च्या कुवेत अन इराक युद्धाच्या वेळी तेथील तेलविहिरींना मोठ्या आगी लागल्या होत्या त्याचे काळे ढग काश्मिरपर्यंत पोचल्याचे वाचले होते.

रच्याकने, अधिक शोध घेता घेता जुन्नरजवळील टेफ्रा पॉम्पेचे नसून इंडोनेशियातील टोबा ज्वालामुखीच्या महाउद्रेकातून आलेला आहे.
अधिक माहितीसाठी शोधनिबंध येथे आहे.

http://www.academia.edu/3904734/Age_of_the_Bori_volcanic_ash_and_Lower_P...

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2015 - 10:29 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

अप्रतिम लेख आणि त्याच्याहुन अप्रतिम फोटु!!!

(नेपल्स इटलीचे पुणे तर नाही!)

ट्रीप सार्थकी लागली :)

कविता१९७८'s picture

23 May 2015 - 11:00 am | कविता१९७८

वाह मस्तच

नूतन सावंत's picture

23 May 2015 - 11:25 am | नूतन सावंत

सुरेख्,मी शाळेत असताना सहावीत सरांनी सांगितलं होतं,जन्माला यावे आणि नेपल्स पहावे.त्याची आठवण झाली.फिरतेय तुझ्याबरोबर.

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2015 - 12:31 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चालली आहे सफर !

पॉम्पेच्या रुपाने दोन हजार वर्षापूर्वीच्या रोमन संस्कृतीचे रुप जतन झालेले आहे. ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या रुपाने झालेल्या मृत्युच्या भयानक थैमानामुळे आजच्या पिढीला त्या काळच्या जीवनाचे प्रत्यक्ष सबळ पुरावे मिळाले ! हा झाला निसर्गाचा विचित्र न्याय !!

चोख वर्णन आणि चपखल प्रकाशचित्रांमुळे पॉम्पेचा स्वतःच फेरफटका मारत आहोत असे वाटले. पुभाप्र.

सविता००१'s picture

23 May 2015 - 12:43 pm | सविता००१

अजया, मस्तच लेखमालिका. फोटोही सुरेख. पण विनाशाच्या चित्रांनी जाम कसतरी झालं. तुला हे पहाताना तर काय झालं असेल????

सानिकास्वप्निल's picture

23 May 2015 - 3:03 pm | सानिकास्वप्निल

वाह! क्या बात है !
उत्तम माहितीपूर्ण लेख ताई आणि फोटो ही सुरेख.
अलिकडेच Apocalypse Pompeii नावाचा रटाळ सिनेमा टिव्हीवर पाहण्यात आला, सिनेमा जरी तद्दन फालतू होता तरी त्यात दाखवलेले प्मॉपे, माऊंट व्हेसुव्हियसची आठवण लेख वाचून आली.

उमा @ मिपा's picture

23 May 2015 - 4:49 pm | उमा @ मिपा

फिरायला जावं तर असं जावं.
खूप आवडलं वाचताना. वाचन तुला आवडतंच त्यामुळे तुला माहिती मिळणं काही अवघड नाही, शिवाय इतकं छान लिहितेयस, माहिती, बारकावे, तुझं निरीक्षण … त्याबद्दल लव्ह यु! पुभाप्र.

वाह ! तुझे कौतुक करायला शब्द नाहीत माझ्याकडे "इ लोवे यू ":)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

23 May 2015 - 9:48 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

धागा वर आणतोय.

त्सुनामीतुन धागा वर काढणारे शूर वीर कॅप्टन!!धन्यवाद!

टवाळ कार्टा's picture

23 May 2015 - 11:00 pm | टवाळ कार्टा

आठवणी जागवल्या

इशा१२३'s picture

24 May 2015 - 12:24 am | इशा१२३

सुरेख अजया.पोम्पेइ बद्दल मात्र वाचवत नाहि.दुर्दैवि लोक.

स्पंदना's picture

24 May 2015 - 11:57 am | स्पंदना

पोम्पई बद्द्ल खुप वर्षांपुर्वी वाचल होतं. तुझ्यामुळे आज पहायला मिळाले.
मस्त चालली आहे सफर.

लालगरूड's picture

24 May 2015 - 12:52 pm | लालगरूड

Pompeii चित्रपट पहा. भयानक आहे सगळे. गुलामाची लढाई चालू असताना उद्रेक होतो। सर्व शहर नष्ट झाले

चित्रगुप्त's picture

24 May 2015 - 1:55 pm | चित्रगुप्त

छानच माहिती आणि फोटो.
त्या ग्रीक गॉड मार्को चा फोटो काढला असेल ना ? आमालाबी बघू द्या की तो उमदा तरूण कसा दिसतो त्ये.

अजया's picture

24 May 2015 - 2:10 pm | अजया

:)

अनिता ठाकूर's picture

24 May 2015 - 2:20 pm | अनिता ठाकूर

भाग २ व ३ वाचले. लेखनशैली छान आहे. लिहित्या रहा. आम्ही वाचते राहू.

पॉइंट ब्लँक's picture

24 May 2015 - 6:02 pm | पॉइंट ब्लँक

प्रवास वर्णन आणि इतिहास याचा छान संगम निर्माण केलाय :)

आमची पण घर -बसल्या Ponpeii ची सफर घडली...

मस्त भाग ताई..आमचे वेळेअभावी पॉम्पेला जायचे राहिले. आता पुढच्या वेळी हे नक्की बघु.

हा भागही खुप छान जमलाय..आता पुढचा भाग वाचते

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 1:47 pm | दिपक.कुवेत

सहल अधीकाअधीक रोचक होत चाललीये.

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2015 - 6:11 pm | प्रभाकर पेठकर

पाँपेई हे उध्वस्त शहर पाहताना, त्याकाळात झालेल्या विनाशाच्या कल्पनेने अंगावर काटा येतो. अजूनही त्या आठवणी अंगावर शहारा उमटवितात.
पाँपेई वर एक प्रतिसाद नाही एक स्वतंत्र धागाच होऊ शकेल. दुर्दैवाने तेव्हढा वेळ नसल्याने हा प्रतिसाद प्रपंच.
७९ साली सकाळी अकरावाजता हा ज्वालामुखी उद्रेक पावला. त्या काळच्या १०००० वस्तीचे हे महत्वाचे शहर. फक्त २००० प्रेते सापडली बाकीच्यांचा पत्ता नाही. परदेश व्यापार, सागरी बंदर आणि त्यातून येणारी समृद्धता हे शहर अनुभवत होत. हा काळ आजपासून १९३५ वर्षांपूर्वीचा आहे हे पाहता पाँपीई शहराची नगर रचना बरीच प्रगत आणि कौतुकास्पद म्हणता येईल. रस्ते, स्पिड ब्रेकर्सची कल्पना, करमणूकीची ओपन थिएटर्स, त्यातील सर्वसामान्य आणि प्रतिष्ठीतांची आसन व्यवस्था, अचानक आग लागल्यास कमीत कमी वेळात सर्व प्रेक्षकांना सुरक्षित बाहेर पडण्यासाठी केलेली व्यवस्था सर्व रचना कौतुकास पात्र आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दुकाने आहेत. वरील धाग्यात दाखविलेले दुकान मिठाचे नसून (माझ्या गाईडच्या माहितीनुसार) कॅफेटेरीया आहे. ती रांजणे ही वेगवेगळ्या सुप्स ना गरम ठेवण्यासाठीची 'बेन मेरी' (Bain Marie) आहेत. तार्किक दृष्ट्या ते बरोबर वाटतंं. असो. पण हेच बरोबर आहे असा माझा दावा नाही.
जिथून आपण ह्या शहरात किंवा वस्तीत प्रवेश करतो तो भाग बहुदा गावाबाहेरचा असावा. कारण इथेच आपण पाहतो ती वेश्यांची गल्ली आहे. बंदर-शहर असल्याने व्यापारी जहाजांची सतत येजा असायची आणि महिनोंमहिने घरापासून दूर असणार्‍या खलाशी आणि इतर कर्मचार्‍यांची शारिरीक भूक/गरज इथे भागविली जायची. गल्लीच्या तोंडाशीच, उद्दीपित अवस्थेतील पुरुष लिंग कोरलेले आहे. ते, 'हीच वेश्यांची गल्ली आहे' असे दिशादर्शक म्हणून वापरले आहे. ह्या मागील कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. आत मध्ये कोनाड्यांसारखे भिंतीतले ६X३ फुटी दगडी कट्टे आहेत. हेच शय्यास्थान. ह्याच्या समोर फक्त पडदा असायचा. आणि त्या पडद्याआड शरीर व्यवहार चालायचा. एका केंद्रात ४ ते ६ असे कोनाडे असायचे, एक प्रतिक्षालय असायचे. भिंतींवर कामसुत्रातील रंगीत रेखाटणे होती. रंग आजही टिकून आहेत. हे कामसुत्र पाँपेईने त्या काळात भारतातून आयात केलेले आणि स्विकारलेले होते. श्लीलश्लीलतेच्या पलीकडे जाऊन पाहिल्यास गल्लीची रचना, कलात्मकता, वाखाणण्याजोगे आहे. गावाबाहेर पण गावाला लागूनच असल्यामुळे वेश्यांनाही गावाने सन्मानाने स्विकारले होते हे जाणवते. त्या पुढे घरे. सार्वजनिक स्नानगृह (पुरुषांसाठी आणि स्त्रीयांसाठी वेगवेगळे) थंड आणि गरम पाण्याच्या सोयी सकट पहायला मिळतात. श्रीमंतांच्या वाड्यांमध्ये स्नानगृह वाड्यातच असायची. शिवाय, श्रीमंतांच्या प्रशस्त घरांना तांब्याच्या पाईपने पाणीपुरवठा केलेला होता. त्याकाळची तांब्याची पाईपलाईन आजही अस्तित्वात आहे. बाकी जनतेला सार्वजनिक नळावर जावे लागायचे. तो काळ हा गुलामांना बाळगण्याचा होता. काम नसले की ह्या गुलामांना पायाला साखळी बांधून एखाद्या खांबाला जखडून ठेवायचे. अशाच जखडलेल्या अवस्थेत गुदमरून मेलेल्या एका गुलामाचे शिल्प आहे. असे अनेक मेले असतील पण इटली सरकारने फक्त एक- एक व्यक्ती प्रातिनिधीक स्वरुपात ठेवल्या आहेत. अनेक छोट्या मुलांचे, बाळांचे मृत देह हाती लागले होते. पण ते बघवणार नाहीत म्हणून प्रदर्शनार्थ ठेवलेले नाहीत. घरासमोर कारंजे, रंगीत फरशीची नक्षी आणि लोखंडी गेट हे शौक करण्याची परवानगी फक्त श्रीमंतानाच होती. गुलाम आपल्या मालकाला त्याने मागितलेली रक्कम देऊन किंवा एखादा मालक कनवाळू असेल तर स्वतः मरायच्या आधी गुलामाची सुटका करायचा. त्या नंतर त्या गुलामाला स्वतःचे आयुष्य जगायचे स्वातंत्र्य असायचे. मात्र त्याला आपल्या नांवा पुढे त्या मालकाचे नांव लावावे लागायचे. (हल्ली बायका माहेरचे आणि सासरचे अशी दोन्ही नांवे लावतात तसे).
सार्वजनिक सूर्यमंदीर आहे. बलीवेदी आहे. तिथे प्राण्यांचे बळी चढविले जात. बाकी त्या काळातील भांडीकुंडी आहेत. तिथे एके ठिकाणी एक जाते होते. ते दाखवून आमची गाईड म्हणाली, 'त्या काळी हे दगडी यंत्र धान्य दळायला वापरायचे.' तिला मी म्हणालो आमच्याकडे खेडोपाडी अजुनही वापरतात. तिला भयंकर आश्चर्य वाटले. राजकिय भाषणांसाठी पटांगण आणि दगडी चौथराही आहे. पूर्वी हे शहर समुद्राला लागून होतं. ज्वालामुखीच्या राखेने समुद्र २ किलोमिटर मागे हटवला आहे. हा सर्व प्रदेश अत्यंत सुपिक बनला आहे. पाँपेई शहराला आजही ज्वालामुखीचा धोका आहे. तज्ञांच्या मते आता पुन्हा ज्वालामुखीचा उद्रेक झाला तर होणारे नुकसान ७९ च्या नुकसानापेक्षा कित्येक पटीने जास्त असेल. ते शहर रिकामे करावे म्हणून सरकार तिथल्या रहिवाशांना विनवित असते, दुसर्‍या ठिकाणी जमीन आणि आर्थिक मदत सुद्धा देऊ करते. पण लोकांना जागा सोडायच्या नाहिएत. ज्वालामुखीचा एकदा उद्रेक झाला म्हणजे काय सारखासारखा होत नसतो अशा अंधश्रद्धेपोटी लोकं आहे तिथेच राहणे पसंद करतात. पुन्हा असा उद्रेक होऊ नये एव्हढीच इश्वरचरणी प्रार्थना.

कधी इटली पर्यटनाचा योग आलाच तर पाँपेई चुकवू नका.

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 7:57 pm | श्रीरंग_जोशी

मूळ धाग्यातील माहितीतली ही भर खूपच आवडली. मनःपूर्वक धन्यवाद.

प्रचेतस's picture

10 Jun 2015 - 8:26 am | प्रचेतस

हेच म्हणतो.
पेठकर काकांचा अतिशय माहितीपूर्ण प्रतिसाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 2:13 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर माहितीपूर्ण प्रतिसाद !

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2015 - 6:13 pm | प्रभाकर पेठकर

अजया,
तुमचे लेखन आणि छायाचित्र इतके प्रभावशाली आहेत की एव्हढा प्रदीर्घ वर्णन लिहायचा मोह आवरला नाही.

अजया's picture

9 Jun 2015 - 6:18 pm | अजया

_/\_पेठकर काका.
पाॅम्पेचं वर्णन बरंचसं गाईड सांगतो त्यानुसार आहे.त्रुटी असु शकतात.तुमच्या प्रतिसादाने माहितीत भर पडली.धन्यवाद.

मदनबाण's picture

10 Jun 2015 - 11:20 am | मदनबाण

वाचतोय..., पेठकर काकांचा प्रतिसाद देखील आवडला. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
Everything You Wanted To Know About Indian Army's Operation In Myanmar
From ‘insertion’ to ‘kill’ and ‘out’: How India’s elite troopers avenged militant strike in Manipur

कौशिकी०२५'s picture

27 Jun 2015 - 12:43 pm | कौशिकी०२५

लेख व प्रतिसाद वाचनीय... मस्तं मस्तं

यशोधरा's picture

6 Jul 2015 - 1:27 am | यशोधरा

मस्त जमला आहे हा भाग पण.
त्या मार्कोचा पण एक फोटो काढायच होता की! आपल्या पियुशाला राकु म्हणून चालला असता का? :D