|| श्री गुरवे नम: ||
उडणार्या (तरंगणार्या) बेडकाच्या प्रदेशात – भाग २.
भाग १ : उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली
पश्चिम घाट म्हणजे जीवविविधतेचा खजिनाच. ‘जागतिक वारसा प्रभाग (World Heritage Site)’ म्हणून जगन्मान्यता लाभलेला प्रदेश. त्यामुळे या भ्रमंतीत उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली यांच्याव्यतिरिक्त इतरही अनेक जीव पाहायला मिळाले. त्यांच्याबद्दल दुसर्या भागात.
भाग २ : वनस्पतिसृष्टी, फूलपाखरं, इतर कीटक, कीटकेतर छोटे प्राणी आणि साप
गेल्या वर्षी जुलै २०१४मध्ये उडणार्या (तरंगणार्या) बेडकाच्या प्रदेशात गेलो होतो. त्याच्या वृत्तान्ताचा पहिला भाग मिपावर टाकायला ऑक्टोबर उजाडला. त्यानंतर डिसेंबरमध्ये ओरिगामी प्रदर्शन होतं, त्याच्या तयारीला लागलो. प्रदर्शन आटोपल्यावर त्याचा वृत्तान्त लिहिला आणि काही दिवसातच असह्य अशी कंबरदुखी (low back pain) सुरू झाली. इतकी, की त्यामुळे फेब्रुवारीमधला कशेळे कट्टाही हुकला. एप्रिलपर्यंत हा त्रास सुरूच होता. या सर्व गदारोळात, ‘उडणार्या (तरंगणार्या) बेडकाच्या प्रदेशात – भाग २’ मिपावर टाकायचा राहून गेला. आता मे २०१५ संपत आला असताना, इतका उशीर झालेला असताना भाग २ टाकावा का? असा प्रश्न पडला. मग ‘It is never too late’, ‘Better late than never’, ‘चांगल्या कामाला उशीर झाला तरी हरकत नाही’, ‘भाग २मध्ये येणार्या प्राण्यांचा पावसाशी तसा काही संबंध नाही’, ‘उशीर झाला तरी मिपाकर आपलेच आहेत (आपण मिपाकरांचेच आहोत), सांभाळून घेतील’ अशी स्वत:च स्वत:ची समजूत घालून भाग २ सादर करतो आहे.
सह्याद्रीत सापडणार्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण वनस्पतींपैकी एक म्हणजे ‘कारवी’. अनेक जातींपैकी ही एक जात, उपडी टाकलेल्या टोपलीसारखी दिसते म्हणून ‘टोपली कारवी’. कारवीच्या एका झुडपाच्या पानांचा फक्त एकच गुच्छ पिवळा दिसतोय.
कारवी सात, आठ किवा बारा वर्षांनी पावसाळ्यात फुलते. जंगलातली सर्व कारवी झुडपं एकाच वेळी फुलतात. सगळं जंगल निळं दिसतं.
जाता जाता : माझ्या अंदाजानुसार या वर्षी २०१५मध्ये पावसाळ्यात सह्याद्रीतली कारवी फुलणार आहे. तेव्हा निसर्गप्रेमी फुलवेड्या मिपाकरांनो, तयार राहा.
नागाच्या फण्यासारखं पान असलेली ही ‘कोब्रा लिली’ आणि रानहळद
पावसाळ्यात जंगलात सर्वत्र दिसणारं दृश्य म्हणजे कवकाचे (Fungiचे) फुटवे, म्हणजेच अळंबी (मश्रूम्स). कवक मृत झाडांवर / फांद्यांवर वाढतात आणि लाकडाचं (लाकडामधल्या सेल्युलोजचं) विघटन करण्याचं महत्त्वाचं काम करतात. जंगलात दिसलेले हे विविध प्रकार.
डेड मॅन्स फिंगर्स, उर्वशी आणि इतर.
गावात ही घंटेसारखी धोतरावर्गीय फुलं दिसली.
फूलपाखरं आणि पतंग
फुलं आहेत म्हटल्यावर फूलपाखरं आणि पतंग आलेच. जंगलात मोठ्या आकाराचीही फूलपाखरं आणि पतंग भरपूर आढळतात. मात्र पॅरिस पिकॉक, रेड स्पॉट ड्यूक अशी काही सुंदर फूलपाखरं दिसूनही त्यांचे फोटो काढता आले नाहीत.
राणी पाकोळी (ब्लू मॉरमॉन, Papillio polymnestor) भारतातलं क्र. २चं मोठं फूलपाखरू. पंखांचा विस्तार जवळजवळ १०० मि.मी.
कॉमन मॉरमॉन (Papillio polytes) हे आपल्या आजूबाजूला सहज दिसणार फूलपाखरू. नर आणि मादी दोघेही अगदी भिन्न दिसतात. याला सेक्शुअल डायमॉर्फिझम असं म्हणतात. हा मादीचा फोटो आहे. मादी नरापेक्षा थोडी मोठी असते. ही मादीसुद्धा तीन वेगवेगळ्या रूपांपैकी एक रूप धारण करते – क्रिमझन रोझसारखं ‘रोम्युलस’, कॉमन रोझसारखं ‘स्टिचिअस’ आणि थोडंफार नरासारखं ‘सायरस’. एकाच जातीची दोनपेक्षा अधिक रूपं असण्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. फोटोमध्ये मादीचं ‘सायरस’ रूप आहे.
अँगल्ड पियरो (Caleta caleta) हे एक छोटुकलं फूलपाखरू. लायसानिडी या फॅमिलीत छोटी फूलपाखरं येतात.
मलबार स्पॉटेड फ्लॅट (Calaenorrhinus ambareesa) हे ‘स्किपर’ (हेस्पेरिडी फॅमिलीतलं) फूलपाखरू. या फॅमिलीतली फूलपाखरं विशेषतः अगदी सकाळी किंवा संध्याकाळी दिसतात. कारवीच्या झुडपावर मलबार स्पॉटेड फ्लॅट मादी अंडी घालते.
एखाद्या खडकावर किंवा झाडाच्या खोडावर उगवलेल्या दगडफुलासारखा दिसणारा लायकेन (दगडफूल) मॉथ.
घुबड्या पतंग (आउल मॉथ, Erabus ephesperis) पंखविस्तार १०० मि.मी. पंखांवरच्या दोन मोठ्या ‘डोळ्यांमुळे’ घुबडाच्या डोक्याचा भास होतो.
आणखी एक पतंग.
अस्वल्या सुरवंट (वूली बेअर अळी). अस्वलासारखा केसाळ सुरवंट म्हणजे बहुधा टायगर मॉथची किंवा लेपर्ड मॉथची अळी असावी. अळीची वाढ होत असताना चार ते पाच वेळा कात टाकते. पहिल्या फोटोमधली अळी कात टाकताना दिसते आहे.
अॅटलास मॉथ (Attacus atlas) हा भारतातला (जगातला??) सर्वात मोठा पतंग. त्याचा पंखविस्तार ३०० मि.मी. (एक फूट) इतका मोठा असतो. त्याच्या वरच्या दोन्ही पंखांच्या टोकावर सापाच्या तोंडासारखी आकृती दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याला कोणत्याही प्रकारचे मुखावयव नसतात; म्हणजेच कोशातून बाहेर पडलेला, पूर्ण वाढ झालेला प्रौढ पतंग काहीही खात नाही (खाऊ शकत नाही). त्याची ही अळी. अंगठ्याएवढी जाडजूड. तिने कोष विणायला सुरुवात केल्याचं दिसतंय. म्हणजे महिनाभराने प्रौढ अॅटलास मॉथ बाहेर पडला असेल.
‘मधुर’ अळी : नक्की कोणत्या कीटकाची ही अळी आहे, ते माहीत नाही. तिच्या शरीरावर दिसणारे थेंब हे दवबिंदू नसून, तिने स्रवलेल्या एका गोड मधुकराचे थेंब आहेत. विशिष्ट जातींच्या मुंग्यांना हा गोड मधुकर आवडतो, म्हणून त्या मुंग्या या अळीकडे आकृष्ट होतात. या गोड बक्षिसाच्या बदल्यात मुंग्या अळीला संरक्षण देतात. परस्परहितैषी सहजीवनाचं (सिम्बायोटिक रिलेशनशिपचं) एक सुंदर उदाहरण.
इतर कीटक
नमस्कार किडा (प्रार्थना कीटक Praying Mantis, Mantis religiosa) हा कीटकविश्वातला शिकारी. शिकारीसाठी याच्या हातांची (पायांच्या ‘पुढच्या’ जोडीची) विशिष्ट रचना उपयोगी पडते. अंड्यांच्या रक्षणासाठी मादी एका कडक पिशवीत अंडी घालते. या पिशवीला ‘ऊथेका (Ootheca)’ म्हणतात.
एखाद्या झुडपावर फांद्यांच्या बेचक्यात थुंकीसारखं दिसणारं हे आहे एका किड्याच्या - थुंकीकिड्याच्या (Spittle bug Cosmoscarta sp.) पिल्लाने स्वसंरक्षणासाठी बांधलेलं घरटं.
व्हेस्पिड (??) गांधिलमाशी (Ropalia sp. ???)
प्राण्यांची उत्पत्ती आणि एकपेशीय प्राण्यापासून बहुपेशीय प्राण्यांचा विकास पाण्यामध्ये झाला. हळूहळू पाण्याच्या बाहेर येऊन काही प्राण्यांनी जमिनीवर राहायलाही सुरुवात केली. मात्र सुमारे २५-३० कोटी वर्षांपूर्वी चार चिमुकल्या पंखांच्या साहाय्याने आकाशही पादाक्रांत करणारे पहिले प्राणी म्हणजे कीटक. त्यातही कीटकांच्या प्राचीनतम घराण्यांपैकी एक आहे Order Odonata - चतुर आणि सुई/टाचणी याचं घराणं. आपल्या लहानपणी आपण चतुर पकडून त्याच्या शेपटीला दोरी बांधून त्याला उडवायचा खेळ खेळलेलो असतो, यापलीकडे आपल्याला त्यांच्याबद्दल काहीच माहीत नसतं.
चतुर आणि टाचणी यांना परिसराचे आरोग्य निदर्शक (Indicators of health of environment) म्हणतात. हे उडता उडता शिकार करू शकतात. माणसांचे सर्वात मोठे शत्रू असलेले मच्छर हे चतुरांचं आवडतं अन्न.
पावसाळा हा चतुर-टाचण्यांचाही विणीचा हंगाम. टाचणी/सुई (??? Bambootail) जोडी जमलेली आहे. नर शेपटीने मादीची मान पकडतो. मादीने ‘हो’ म्हटल्यावर दोघे वर्तुळाकार स्थितीत येतात आणि मिलन होतं. फोटो फार चांगला नाहीये, क्षमस्व.
निळ्या पंखांचा कीटक आणि जुवेल बीटल
कीटकेतर प्राणी
भुसकट्या (Wood Louse) जंगलातल्या कुजणाऱ्या लाकडाच्या ओंडक्याखाली सापडतो. धोक्याची जाणीव होताच शरीर गुंडाळून घेतो.
>
गोम (सेंटिपेड) आणि स्कुटीजेरा
अष्टपाद (Class Arachnida) वर्गातला कोळी टॅरांटुला. परदेशातल्या टॅरांटुलासारखा हा विषारी नाही.
कोळ्याच्या जाळ्यावरचे दवबिंदू
माळावरचा दगड उचकटला की त्याखाली विंचू, पाल असं काहीतरी सापडतंच. हा विंचू (Palamnaeus sp.) दिसायला छोटासा असला, तरी आम्ही त्याच्यापासून कमीतकमी पाच फूट अंतर राखून होतो. त्याने त्याचा आक्रमक पवित्रा दाखवलाच.
माळावरचा खेकडा
ब्राह्मणी सापसुरळी (स्किंक Mabuya carinata)
जंगलातल्या एका अन्नसाखळीच्या शिखरावर असणारे प्राणी म्हणजे साप. दाट पावसाळरानामध्ये अनेक विषारी / बिनविषारी साप दिसतात. खापरखवल्या, मलबार चापडा अशा काही जाती फक्त पश्चिम घाटातच सापडतात, इतर कुठेही सापडत नाहीत.
बेडोम मांजर्या (Beddome’s Cat Snake Boiga beddomei) निमविषारी.
बेडोम कीलबॅक (Beddome’s Keelback Amphiesema beddomei) बिनविषारी.
खापरखवल्या (Bombay Shiled Tail Uropeltis macrolepis) हा फक्त सह्याद्री पर्वतरांगांमध्येच आढळणारा बिनविषारी साप. झळाळीदार निळा/काळा रंग, निमुळतं होत गेलेलं तोंड आणि तिरकी छाटल्यासारखी जाड शेपटी एवढ्या खुणांवरून सहज ओळखता येतो. गांडुळासारखे छोटे जीव हे त्याचं खाद्य.
दिवड (Checkered Keelback Water Snake Xenochrophis piscator) पाणथळीत आढळणारा साप. बिनविषारी. याच्याबद्दल गैरसमजच फार - हा साप पाहिल्याचं दुसर्याला सांगणार्याचा म्हणे मृत्यू ओढवतो. तसंच, हा पाण्याबाहेर आला, तर विषारी होतो.
हिरव्यागार चाबकासारखा हरणटोळ (Common Vine Snake, Whip snake, Ahaetulla nasuta) सर्वत्र आढळतो. निमविषारी, चाबकासारखा लांबसडक, त्रिकोणी टोकदार तोंड, मोठ्या गोल सोनेरी डोळ्यांची उभी बाहुली. झाडावर दिसतो. याच्याबद्दल एक समजूत म्हणजे, झाडावरून डंख मारून हा साप आपली कवटी फोडतो.
मलबार चापडा (मलबार पिट व्हायपर Trimeresurus malabaricus) हे पश्चिम घाटाचं वैशिष्ट्य. विषारी. सरडे, बेडूक, छोटे पक्षी वगैरे खातो. झाडावर बघायला मिळतो. तसा शांत असला, तरी डिवचल्यावर मात्र हल्ला करतो. या महाशयांचं जेवण झालेलं दिसतंय.
एक अविस्मरणीय अनुभव
रात्रीच्या फेरफटक्यानंतर जंगलात एक अविस्मरणीय दृश्य पाहिलं. एका ठिकाणी सर्वांनी आपले टॉर्च आणि मोबाइल बंद केले. गुडुप अंधार झाला. मग एका झाडाच्या खोडावर हिरवट रंग प्रकाशमान झाला. ही होती स्वयं(जीव)प्रकाशी (बायोल्युमिनसंट) अलगी. पावसाळ्यातच, दाट अरण्यातच दिसते. मागे भीमाशंकर वृत्तान्त लिहिला होता, तेव्हा प्रतिसादामध्ये वल्लींनी अशा प्रकारच्या निळ्या अलगीचा, गोनिदांनी तिला ‘ज्योतीवंती’ असं सुंदर नाव दिल्याचा उल्लेख केला होता, ते आठवलं. आजूबाजूला मिट्ट काळोख होता. अलगीचा प्रकाश इतका मंद होता की फोटो काढणं अशक्यच होतं.
जळवांचा जलवा
पावसाळ्यातल्या ओल्या रात्री जंगलभ्रमंती करायची असेल, तर जळवांना खंडणी म्हणून थोडंसं ‘रक्तदान’ करावंच लागतं. कितीही जामानिमा केला, तरीही जळवा कुठूनतरी कशातरी अंगावर चढतातच. दोन-तीन मि.ली. रक्त पिऊन तृप्त होऊन त्या गळून पडल्यावरच, त्या आपल्या अंगावर चढल्या होत्या याची जाणीव होते. त्यांच्या लाळेतल्या रक्तगोठणरोधक आणि बधीर करणार्या रसायनांमुळे जळू शरीरावर छेद करते ते समजतच नाही. मला चार-पाच जळवा लागल्या. एक तर थेट मानेपर्यंत पोहोचली होती. अशा तर्हेने मी आठ-दहा मि.ली. रक्तदान केलं.
मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब
हल्ली सर्वत्र मोठ्या प्रमाणावर जंगलतोड होते आहे. ती रोखण्यासाठी स्थानिकांचा सहभाग अत्यावश्यक असतो. स्थानिकांचा सहभाग असेल तर अगदी प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या ठिकाणचंही वन अनाघ्रात राखता येतं. मनोहर (काका) भिसे हे असेच एक स्थानिक. स्वतंत्र व्यावसायिक असलेले काका लहानपणापासूनच निसर्गप्रेमी. इथलं जंगल हेच आपलं सर्वस्व आहे, हे जाणून त्यांनी वनसंवर्धनासाठी ‘मलबार नेचर कॉन्झर्व्हेशन क्लब’ ही संस्था स्थापन केली. संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी एक म्हणजे वन मार्गदर्शक म्हणून स्थानिक तरुणांना तयार करणं. शुभम आळवे असाच एक तरुण त्यांच्या तालमीत तयार झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तंत्रशिक्षण घेऊन स्वत:च्या पायांवर उभा राहिलेला शुभम आज वनविद्येमध्ये इतका तज्ज्ञ झालाय की अनेक उच्चशिक्षित जीवशास्त्र संशोधकही काकांप्रमाणेच शुभमचीही मदत घेतात.
काका, शुभम यांच्यासारखे स्थानिक हीच वनसंवर्धनाची आशास्थानं आहेत. त्यांच्यासारख्यांच्या आणि वनविभागाच्या प्रयत्नांमुळेच आपलं वनवैभव जोपासलं जाईल याची खातरी वाटते. त्यांना अनेक धन्यवाद आणि शुभेच्छा.
प्रत्येक वेळी जंगलभ्रमंती केल्यावर अनेक नव्या गोष्टी समजतात. मला किती गोष्टी माहीत आहेत असा भ्रम दूर होऊन, मला आणखी कितीतरी गोष्टी माहीत नव्हत्या त्याची माहिती होते. दुसऱ्या शब्दात – आपल्या ‘अज्ञानाचं’ ‘ज्ञान’ होतं. हवेत तरंगणारा ‘मी’ जमिनीवर येतो. माझे पाय जमिनीवरच राहतात. म्हणूनच मला जंगलात जायला आवडतं.
श्रेयनिर्देश :
छायाचित्रं : स्वानंदी नूलकर
ध्वनिचित्रमुद्रण : वंदन जव्हेरी
प्रजातींची ओळख : मृगांक प्रभू
स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शक : महादेव (काका) भिसे व शुभम आळवे
प्रतिक्रिया
31 May 2015 - 5:19 am | यशोधरा
वा! सुरेख!
पहिल्या भागाची लिंकही द्या प्लीज.
निळी कारवी पाहिली आहे, पिवळी पहिल्यांदाच पाहिली!
31 May 2015 - 6:44 am | कंजूस
वा फारच छान ! ज्योतवंती:तीनचार वेळा काटक्या आणून फ्रिजमध्ये ठेवल्या होत्या आठ दिवस प्रकाशित राहिल्या होत्या.एका निसर्गप्रेमीकडून याबद्दल दम मिळाल्यावर हे उद्योग बंद केले.याचा फोटो नयन खानोलकरने काढलेला एशिअनफोटोग्राफीच्या कवरवर पंधरा वर्षांपुर्वी आलेला. नुलकरसाहेब याचा एक स्लाइडशो करतील याची वाट पाहतोय.
31 May 2015 - 9:49 am | प्रचेतस
अतिशय सुंदर.
विविध प्रकारचे कीटक, फुलपाखरे, पतंग तसेच इतर वनस्पती सह्याद्रीत भटकतांना खूप वेळा पाहिलेत पण त्यांची नावे, वैशिष्ट्ये माहित नव्हती.
कारवीला फुलोरा आला की कारवी मरते आणि नवी कारवी रूजते असे ऐकले होते.
बाकी तुमच्याबरोबर जंगलभ्रमंती करायला फारच आवडेल. ते नुसतं जंगल पाहणं होणार नाही तर जंगल जगणं होईल.
31 May 2015 - 11:27 am | ज्ञानोबाचे पैजार
कारवी बद्दल पहिल्यांदाच माहिती मिळाली. असे कुंभमेळ्याचे कॅलेंडर वनस्पतीही पाळत असतील असे कधी वाटले नव्हते.
कारवी सारखे कॅलेंडर फॉलो करणार्या अजून कोणत्या वनस्पती असतात?
ह्या चतुरांची पैदास वाढवून डासांवर नियंत्रण मिळवता येईल का?
(डासांच्या कटकटीला भयंकर वैतागलेला) पैजारबुवा,
31 May 2015 - 12:06 pm | नन्दादीप
यंदा कुठे जाणार आहात पश्चिम घाटात?? ठिकाण कळवलत तर मिपाकर पण येवू शकतील...
31 May 2015 - 4:56 pm | राही
फोटो फारच छान.
कास पठारावर टोपली कारवी गेल्या वर्षी फुलली होती.
वरती ज्ञा.पै. यांनी विचारलेय त्यांच्यासाठी अवांतर : कारवीप्रमाणे बांबूसुद्धा ठराविक काळाने फुलतो. काही जाती चाळीस तर काही साठ वर्षांनी फुलतात. या फुलांमध्ये गहूदाण्यासारख्या बिया धरतात. या बिया जमिनीवर पडून रुजतात. मूळ झाड मरून जाते. एरवी बांबू हा शेवंती, केळी किंवा आल्याच्या खोडासारखा जमिनीखालून कोंब फुटून पसरतो.(rhizome). पूर्वी आदिवासी लोक ह्या बिया गोळा करून त्यांचे पीठ खाद्य म्हणून वापरीत. पण ह्या बिया म्हणजे उंदीर-घुशींची पर्वणी. त्यावर ताव मारून उंदीर-घुशींची पैदास वाढते आणि बिया संपल्या की मग ही फौज शेतातल्या पिकात धुडगूस घालते. म्हणून पूर्वी असे म्हणत की बांबू फुलला की दुष्काळ पडतो. पीक कमी येते.
(
31 May 2015 - 6:10 pm | एस
अविस्मरणीय अनुभव निव्वळ वाचनातूनही देणारा लेख. सह्याद्रीत हिंडताना यातले बरेच निसर्गसहचर पाहिले, पण आवर्जून त्यांचे फोटो फारसे घेतले नव्हते. इथून पुढे ही चूक आवर्जून सुधारेन.
बाकी निसर्गाइतका काटेकोर गणित पाळणारा दुसरा कोणी नसावा. वर्षभराच्या कमाल आणि किमान तापमानांची बेरीज एका विशिष्ट संख्येइतकी झाल्याशिवाय लिलीला बहर येत नाही. :-)
31 May 2015 - 7:33 pm | सुधांशुनूलकर
सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार.
@ यशोधरा : या लेखाच्या सुरुवातीलाच भाग १ चा दुवा दिला आहे. यासाठी भाग १ : उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली या लाल अक्षरांवर टिकटिकवा.
कारवीची फुलं निळीच असतात, इथे 'पानांचा' एक गुच्छ पिवळा झालेला दिसतो आहे. आता पावसाळ्यात कारवीला फुलोरा येईल.
@ कंजूस : तुमच्याकडेही असाच चित्रखजिना आहे.
@ वल्ली : कारवीला फुलोरा आला की कारवी मरते आणि नवी कारवी रूजते हे अगदी बरोबर आहे. या काळातली एक विशेष गोष्ट म्हणजे कारवीचा मध.. खूप औषधी समजला जातो. बाकी तुमच्याबरोबर भटकायला मलाही आवडेल. बघू या, कसं, कुठे आणि केव्हा जमतंय ते.
@ ज्ञानोबाचे पैजार : ह्या चतुरांची पैदास वाढवून डासांवर नियंत्रण मिळवता येण्यापेक्षा पाणी साठू न देणं, गटारं साफ करून वाहती ठेवणं आणि गप्पी मासे यासारखे उपाय जास्त योग्य आहेत.
@ राही बातुमच्या स्पष्टीकरणासाठी आभार.
@ नन्दादीप, स्वॅप्स : येत्या पावसाळ्यात कोयना, भीमाशंकर मनात आहे. अशा भमंतीला मिपाकरांबरोबर जायला नक्कीच आवडेल. म्हणूनच यापूर्वी भीमाशंकरला आणि वेळासला मिपाकरांबरोबरच गेलो होतो.
31 May 2015 - 7:38 pm | यशोधरा
ओह, त्या दुसर्या फोटोमधे ती पाने आहेत होय!
दुव्यासाठी धन्यवाद. माझ्या पटकन ल़क्षात आले नाही.
1 Jun 2015 - 12:37 am | डॉ सुहास म्हात्रे
फारच सुंदर आणि माहितीपूर्ण लेख. उत्तम प्रकाशचित्रांनी त्याची लज्जत अजूनच वाढवली आहे.
कितीही उशीर झाला तरी तुमचे लेखांची मिपाकर उत्सुकतेने वाट पहात असतात हे प्रतिसादांत स्पष्टपणे दिसत आहेच !
1 Jun 2015 - 12:51 am | श्रीरंग_जोशी
अतिशय अभ्यासपूर्ण लेखन. हे आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी तुम्ही घेतलेल्या अविरत कष्टांसाठी मनःपूर्वक धन्यवाद.
या निमित्ताने वनसंधारणासाठी काम करणार्या सर्व स्वयंसेवकांना दंडवत.
1 Jun 2015 - 2:17 am | जुइ
वेगवेगळ्या प्रकारचे किटक, वन्सपती यांची सखोल माहिती आवडली. फोटोही खासच आले आहेत.
1 Jun 2015 - 1:27 pm | झकासराव
क्या बात है!!
बरच पेशन्सच काम आहे असे फोटो मिळवणं.
मेहनत लक्षात येत आहे. :)
मलबार पिट व्हायपर बघायला मिळणं हे ही दुर्मिळ आहे.
1 Jun 2015 - 3:15 pm | अजया
अप्रतिम लेख आणि फोटो.जंगल फिरुन आल्यासारखं वाटलं वाचताना,फोटो बघताना.धन्यवाद.
1 Jun 2015 - 4:14 pm | सानिकास्वप्निल
उत्तम माहितीपूर्ण लेख आहे हा.
कीटक, वनस्पतींबद्दल दिलेली माहिती आवडली.
2 Jun 2015 - 10:26 pm | पद्मावति
आणि ही माहिती आमच्या पर्यंत पाहोचवल्या बद्दल धन्यवाद.
2 Jun 2015 - 10:41 pm | प्रचेतस
पुन्हा एकदा धागा वाचला. परत आवडला.
4 Jun 2015 - 9:15 pm | पैसा
हा लेख वाचायचा ठेवला होता! आज वेळ मिळाला! खासच आहे!
4 Jun 2015 - 10:57 pm | सुधीर
माहितीपूर्ण लेख आवडला. पण फुलपाखरू सोडलं तर बाकीच्या 'बिचार्या' जीवांची एकतर भीती तरी वाटते किंवा किळस तरी वाटतो. त्यामुळे पावसाळ्यात बाहेर पडावसं वाटत नाही. 'ज्योतीवंती' च्या अनुभवाचं कुतुहल क्षमन तुमच्यासारख्यांच्या लेखनातूनच करतो.