उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाच्या प्रदेशात : भाग १

सुधांशुनूलकर's picture
सुधांशुनूलकर in भटकंती
20 Oct 2014 - 6:08 pm

|| श्री गुरवे नम: ||

डिस्क्लेमर : या भटकंती वृत्तान्तामध्ये खादाडीचे फोटो / वर्णन नाही. त्यामुळे काही मिपाकर हा धागा **वर मारतील, याची पूर्ण कल्पना आहे. मात्र त्यांनी तशा प्रतिक्रिया दिल्याच, तरीही त्यांचं (प्रतिक्रियांचं) स्वागतच असेल (त्यांची प्रतिक्रिया **वर मारली जाणार नाही).

भाग १ : उभयचर (बेडूक, टोड, सापकिरम) आणि सरडे-पाली

पाऊस... उन्हाळ्याच्या दाहक उष्म्याने चराचर तगमगत असताना थंडगार शिडकाव्याने प्रत्येक जीव शांत करणारा ऋतू. पाऊस पडला की सगळ्या सृष्टीचा नूरच बदलून जातो. वनस्पतींना पालवी फुटते आणि सगळ्या सृष्टीलाच सर्जनाचे वेध लागतात.

वनस्पतींवर सगळं प्राणिजगत अवलंबून असतं आणि या वनस्पतींचं परागसिंचन अवलंबून असतं मुख्यत: कीटकांवर. मात्र या कीटकांच्या अनिर्बंध वाढीवर नियंत्रण ठेवणार्‍यांमध्ये प्रमुख आहेत बेडूक, टोड असे उभयचर आणि पाली, सरडे हे सरीसृप (सरपटणारे खवलेकरी). पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये हे जीव अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. जीववैविध्याने समृद्ध अशा पश्चिम घाटामध्ये या सर्व जीवांच्या अनेक जाती आढळतात. अलीकडेच पश्चिम घाटात केलेल्या पावसाळी भ्रमंतीमध्ये या छोट्या, अतिशय महत्त्वाच्या पण दुर्लक्षित जीवांशी ओळख झाली.

पावसाळ्यातल्या नवनिर्माणाच्या उत्सवाची जणू ललकारी मिळते ती बेडकांच्या डराव डराव आवाजाने. पावसाळा हा बेडकांचा विणीचा काळ. जवळजवळ आठ महिने जमिनीखाली सुप्तावस्थेमध्ये दडून राहिलेले हे जीव पावसाच्या सुरुवातीला बाहेर येतात ते मुख्यत: पुनरुत्पादनासाठी. पावसाळा संपल्यावर ते पुन्हा दीर्घ सुप्तावस्थेत जातात. त्यामुळे त्यांना भेटायचं, तर पावसाळ्याचा मुहूर्त गाठायला हवा, म्हणून थेट आंबोलीला जाऊन धडकलो.

थंड हवेचं ठिकाण म्हणून आंबोली जसं प्रसिद्ध आहे, तसंच मोसीनराम आणि चेरापुंजी यांच्या खालोखाल जास्तीत जास्त पाऊस पडणारं ठिकाण म्हणूनही. विविध वनस्पती आणि प्राणी यांनी इथलं दाट पावसाळरान समृद्ध आहे. दाट झाडी आणि चिक्कार पाऊस यामुळे इथे झाडबेडकांच्याही अनेक जाती आढळतात, त्यापैकी एक आहे उडणारा (तरंगणारा) बेडूक (Rhacophorus malabaricus). आणि म्हणूनच ‘उडणार्‍या (तरंगणार्‍या) बेडकाचा प्रदेश’ (Land of Gliding Frog) अशीही आंबोलीची आगळी ओळख आहे.

आंबोलीला जायचं कसं – सावंतवाडीहून अनेक बसेस उपलब्ध आहेत. सावंतवाडी-आंबोली बसचा प्रवास साधारणत: एक-दीड तासाचा. घाटातला रस्ता असल्यामुळे प्रवासात विशेषत: पावसाळ्यात सह्याद्रीचं मनोहर निसर्गसौंदर्य बघता बघता आंबोलीला केव्हा पोहोचतो ते कळतही नाही. आंबोलीला राहण्यासाठी अनेक हॉटेल्स, रिसॉर्टस आहेत आणि खाण्यापिण्याची भरपूर सोय आहे.

आंबोलीचं पावसाळ्यातलं जीववैविध्य पाहायचं असेल, तर रात्रीच्या जंगलभ्रमंतीला पर्याय नाही. आम्ही दोन रात्री, तीन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ मनमुराद भटकलो. स्थानिक आणि बीएनएचएसचे उत्साही तज्ज्ञ मार्गदर्शक सोबत असल्यामुळे आम्हीही बारा-तेरा जण उत्साहाने फिरायला निघालो. संध्याकाळ झाली आणि बेडकांच्या विविध आवाजांनी आसमंत भरून गेला. रिपरिपत्या पावसात, मिट्ट अंधारात झाडाझुडपांमध्ये आवाजाच्या दिशेने शोध घेतल्यावर सर्वप्रथम दर्शन दिलं ते इवल्याशा झाडबेडकाने. आपले गाल (ध्वनिपिशव्या) फुगवून हे महाशय आपल्या प्रियतमेला आवतण देतात आणि इतर नरांना आव्हान देतात. त्वचा अगदी गुळगुळीत, बुळबुळीत. हा आहे बाँबे बुश फ्रॉग (Bombay bush frog, Raorchestes bombayensis).
Bombay Bush Frog

याच्या आवाजावरून याला ‘टाईपरायटर फ्रॉग’ असंही म्हणतात. याचा आवाज इथे ऐका. (ध्वनिचित्रमुद्रण – वंदन जव्हेरी).

कास्यबेडूक (ब्राँझ फ्रॉग, Bronze frog, Hylarana temporalis). याची पाठ ब्राँझच्या रंगाची. दगडांच्या खबदाडीत राहतो.
Bronze Frog

दुरंगी (बायकलर्ड) बेडूक (Bicoloured frog, Clinotarsus curtipes). याच्या शरीरावर दोन रंग अगदी स्पष्टपणे वेगळे दिसतात. पाठ तपकिरी-राखाडी, तर गळा-छाती-पोट हा खालचा भाग काळा.
Bicoloured Frog

क्रिकेट (Cricket frog, Zakirana sp.) छोटा (३५-४० मि.मी.) बेडूक. नाकापासून पाठीवरून टिरेपर्यंत कमी-अधिक जाडीची पिवळट रेष असते. त्वचा खडबडीत.
Cricket Frog

आखूडतोंड्या (नॅरो माउथ) रामानेल्ला (Narrow mouth frog, Ramanella mormorata). याचं तोंड आखूड असतं. मध्यम आकाराचा. त्वचा अगदी खडबडीत.
आखूडतोंड्या (नॅरो माउथ) रामानेल्ला Narrow mouth frog (Ramanella mormorata).

बरोइंग फ्रॉग (Burrowing frog, Spherotheca sp.) मातीत खणण्यासाठी याच्या मागच्या पायांच्या अंगठ्याजवळ एक छोटासा उंचवटा असतो. त्याच्या साहाय्याने जमीन खोदतो.
Burrowing frog5

बेडोम इंदिराना बेडूक. (Indirana beddomii.) मध्यम आकाराचा बेडूक. दगडांच्या खबदाडीत राहतो.
Indirana1

सुरकुत्या बेडूक (रिंकल्ड फ्रॉग, Wrinkled Frog, Nyctibatrachus sp.) : याच्या पाठीवर आडव्या सुरकुत्यांचं जाळं असतं. रंग जवळजवळ काळा. हासुद्धा जोडीदाराला साद घालत होता, त्या आवाजाच्या रोखाने त्याचा शोध घेतला. वेळ : रात्री साडेबारा.
WrinledFrog1

जरा पुढे, एका डबक्याजवळ त्याची अंडीही दिसली. एखाद्या पाणथळीजवळच्या, डबक्याजवळच्या झाडाच्या पानावर मादी अंडी घालते. एका चिकट पदार्थाने ही अंडी पानाला चिकटलेली असतात. या फोटोमध्ये अंड्यातले अर्धवट वाढलेले बेडूकमासे स्पष्ट दिसताहेत. पूर्ण वाढ झाल्यावर, अंड्यांवर पावसाचं पाणी पडल्यावर हे बेडूकमासे खालच्या पाण्यात सुळकन पडतात, हेसुद्धा आम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. त्याचं चित्रीकरण इथे पाहा. (ध्वनिचित्रमुद्रण : वंदन जव्हेरी.)

Wrinkled Frog Eggs. सुरकुत्या (रिंकल्ड) बेडकाची अंडी Wrinkled Frog Eggs. सुरकुत्या (रिंकल्ड) बेडकाची अंडी

कॉमन झाडबेडूक (Common Tree Frog, Polypedates maculotus) आपल्या कोकणात सर्वत्र आढळणारा झाडबेडूक. आपल्या घराजवळही दिसू शकतो. झाडावर आणि जमिनीवर वावरतो. ‘टक् टक् टक्’ असा आवाज करतो. पाणथळीजवळच्या, डबक्याजवळच्या झाडाच्या पानावर मादी अंडी घालते. पूर्ण वाढ झाल्यावर बेडूकमासे खालच्या पाण्यात पडतात.
कॉमन झाडबेडूक (Common Tree Frog Polypedates maculotus)

उडता (तरंगता) झाडबेडूक - र्‍हॅको (Malabar Gliding Frog, Rhacophorus malabaricus). चार-पाच तास अंधारात, रिपरिपत्या पावसात, जळवांचा त्रास चुकवत, वणवण करून शेवटी रात्री सव्वा-दीड वाजता सर्व परिश्रमांचं चीज झालं. आंबोलीची ओळख असलेले हे महाराज दिसले. पश्चिम घाटाचं हे अनोखं वैशिष्ट्य. रंगाने अगदी पानासारखा हिरवागार आणि सडपातळ शरीराचा, मध्यम आकाराचा (नर ६५-७० मि.मी., मादी ७५-८० मि.मी.) हा झाडबेडूक हवेत ८-१० मीटर चक्क तरंगू शकतो. त्यासाठी त्याच्या चारही पायांच्या बोटांना गुलाबीसर रंगाचे पडदे असतात. फोटोमध्ये ते स्पष्ट दिसत आहेत.
Rhaco, Malabar Gliding Frog (Rhacophorus malabaricus) उडता (तरंगता) झाडबेडूक, Rhaco, Malabar Gliding Frog (Rhacophorus malabaricus), उडता (तरंगता) झाडबेडूक,

एखाद्या पाणथळीजवळच्या, डबक्याजवळच्या झाडाच्या पानावर मादी फेसाळ घरटं बनवून त्यात अंडी घालते. मग नर त्याचं फलन करतो. मादी बराच काळ अंड्यांवर बसून राहते. अंड्यातले बेडूकमासे पूर्ण वाढल्यावर खालच्या पाण्यात पडतात.
Rhaco Nest

पाण्यापासून थोडेसे दूर राहणारे टोड हे बेडकांचे भाईबंद. यांची त्वचा कोरडी, खरखरीत आणि गठुळीदार (कणीदार) असते. बेडकांच्या वरच्या जबड्यात दात आणि पायांना पडदे असतात, तसे यांना नसतात. जमिनीवर राहायला हे सरावलेले असतात. असं असलं, तरी ते अंडी मात्र पाण्यातच घालतात.

आंबोली टोड (Yellow striped toad / Amboli toad, Xanthophryne tigrinus.) टोडांची छोटी जात (३५-४० मि.मी.). पश्चिम घाटात सर्वत्र – अगदी मनुष्यवस्तीजवळही - आढळतो. पाठीवर पिवळ्या उभ्या पट्ट्यांची नक्षी.
Amboli toad / Yellow striped toad

कॉमन टोड (Common toad, Duttaphrynus melanostictus) टोडांची सर्वात मोठी जात. मादी नरापेक्षा आकाराने मोठी. पावसाळा हा विणीचा काळ असल्यामुळे ही जोडी जमली होती. हा टोड रात्री खूप मोठ्या प्रमाणात कीटक फस्त करतो.
Common Indian Toad Common Indian Toad Mating

या उभयचरांप्रमाणेच, कीटकांच्या संख्येवर नियंत्रण ठेवणारे प्राणी म्हणजे पाली आणि सरडे हे पायवाले सरीसृप (सरपटणारे खवलेकरी). यातले काही दिनचर, तर काही निशाचर. यांच्या बर्‍याच जाती दगडाखाली, दगडांच्या खबदाडीत राहतात. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी, इंग्लिशमध्ये म्हणतात ना - ‘Leave no stone unturned’ , त्याप्रमाणे माळावरचा प्रत्येक दगड शब्दश: उचकटला.

ब्रूक्स जंगल पाल (ब्रूक्स गेको, Brooke’s Gecko, Hemidactylus brookii) खडकांवर, दगडांच्या खबदाडीमध्ये राहणारी पाल. दगडाच्या रंगाशी ही अगदी सरूप (Chemoflage) होऊन गेली आहे.
Brooks Gecko BrooksGecko5

भूचर पाल (ग्राउंड गेको, Ground Gecko, Geckoella dekkanensis.) निशाचर पाल. डोळ्याची बाहुली उभी. राखाडी-तपकिरी मानेवर पाठीवर पाच आडवे पिवळे पट्टे. जमिनीवर आणि झाडावर वावरते.
भूचर पाल (ग्राउंड गेको Ground Gecko Geckoella dekkanensis)

ठेंगू जंगल पाल (ड्वार्फ गेको, Dwarf Gecko, Cnemaspis sp.) जंगल पालींमधली छोटी जात. हिच्या डोळ्यांची बाहुली गोल असते. डोक्यापासून शेपटीपर्यंत पिवळ्या रंगाची, इंग्लिश उलट्या ‘व्ही’ ( _/\_ ) आकाराची नक्षी. टेकड्यांवरच्या ओलसर पावसाळरानांमध्ये मुख्यत: खडकाळ भागात सापडते.
Dwarf Gecko

इलियट सरडा (Elliot’s Calotes, Calotes ellioti). बागांमध्ये आढळणारा सरडा. शरीरावरच्या हिरवट तपकिरी रंगसंगतीमुळे परिसराशी अगदी सरूप (Chemoflage) होऊन जातो.
Elliot's garden lizard, इलियट सरडा

सापकिरम
सापकिरम (सिसिलिअन, Ceacilian, Ichthyophis diadem??) : हे सापांसारखे आणि गांडुळासारखे दिसतात, पण हे सापही नाहीत आणि गांडुळासारखे किरम (कणाहीन कृमीही) नाहीत. हे आहेत बेडकांचे भाईबंद उभयचर ‘सिसिलिअन’. यांनाही पाठीचा कणा असतो. उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचे पाय झडून गेले आणि डोळे अगदी छोटे होऊन त्यावर एक संरक्षक पडदा आला. हे जमिनीच्या खाली ओलसर जागी राहतात. गांडुळं आणि मातीतले अगदी छोटे जीव हे त्यांचं खाद्य. याचं दर्शन ही एक पर्वणीच, कारण हे मातीखाली दडलेले असतात.
Ichthyophis, देवगांडूळ Ichthyophis, देवगांडूळ

पश्चिम घाट म्हणजे जीवविविधतेचा खजिनाच. ‘जागतिक वारसा प्रभाग (World Heritage Site)’ म्हणून जगन्मान्यता लाभलेला प्रदेश. त्यामुळे या भ्रमंतीत इतरही अनेक जीव पाहायला मिळाले. त्यांच्याबद्दल दुसर्‍या भागात.
(क्रमश:)

श्रेयनिर्देश :
छायाचित्रं : स्वानंदी नूलकर
ध्वनिचित्रमुद्रण : वंदन जव्हेरी
प्रजातींची ओळख : मृगांक प्रभू
स्थानिक तज्ज्ञ मार्गदर्शक : महादेव (काका) भिसे व शुभम आळवे

प्रतिक्रिया

सूड's picture

20 Oct 2014 - 6:29 pm | सूड

मस्त!!

कपिलमुनी's picture

20 Oct 2014 - 6:36 pm | कपिलमुनी

माहितीपूर्ण धागा!

आहाहा....काय ते फटू अन प्राणी. दिल खूष हो गया!!!!

शिद's picture

20 Oct 2014 - 7:11 pm | शिद

जबराट फोटोसहित नाविन्यपूर्ण माहितीनं ओतप्रोत भरलेला धागा.

माहितीपूर्ण धागा आणि सुरेख फोटो.ते दगडी रंगाचे बेडुक दिसायला सरावलेली नजरच लागत असेल! अाम्हा भूचरांना या दुर्मिळ उभयचरांचे दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद!

वेगळी जीवसृष्टी पहायला मिळाली.

सौंदाळा's picture

20 Oct 2014 - 7:57 pm | सौंदाळा

कोणाची हिंम्मत आहे इतक्या सुंदर धाग्याला फाट्यावर मारण्याची.
मस्त वर्णन आणि फोटो.
क्रमशः वाचुन मन सुखावले.

प्रभो's picture

20 Oct 2014 - 8:23 pm | प्रभो

एक वेगळाच धागा!! भारी!

कंजूस's picture

20 Oct 2014 - 8:24 pm | कंजूस

ईऽऽ नाही म्हणणार. बेडुक, पालींसारखे बिलबिलीत जीव बघून असा बऱ्याचवेळा उदगार ऐकू येतो. मी हुऽऽश्श म्हणेन कारण नवीनप्रकारचा धागा आला.
छान सुधांशु नुलकर. लेख दोनदा वाचला. फोटोही आवडले. आपण पळसदरीला भेटल्यावर या सहलीबद्दल तुम्ही सांगितले होतेच. वर्णनाची वाट पाहतच होतो.
पक्षांना ओळखण्यासाठी पायात कडी घालतात. आठ महिने गायब होणाऱ्या या गुळबुळीत प्राण्यांचा त्यांच्या जागेवरच पाहारा ठेवायला काय युक्ती वापरत असतील?

बेडकांना दिर्घायुष्य लाभो.त्यांच्या सुंदर फाट्यांवर कोणाचा जीव न जडो आणि आंबोलीच्या पावसाळी रात्री डराव डराव, टक टक आसमंतात घुमू दे.

जयंत कुलकर्णी's picture

20 Oct 2014 - 8:27 pm | जयंत कुलकर्णी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire
तेथे काढलेला एक फोटो....हाही फक्त दांडेलीतच सापडतो असे सांगण्यात आले...

एस's picture

20 Oct 2014 - 8:32 pm | एस

आंबोलीची ट्रीप करण्याची ह्यावर्षीची संधी हुकली होती. पुढच्या वर्षी नक्कीच जाणार! तुम्ही कोणत्या ग्रुपबरोबर गेला होतात, इत्यादी माहिती दिल्यास आभारी असेन.

जयंत कुलकर्णी's picture

20 Oct 2014 - 8:36 pm | जयंत कुलकर्णी

माफ करा वरचा आंबोलीला रात्री काढलेला फोटो आहे....

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Oct 2014 - 12:13 am | डॉ सुहास म्हात्रे

एका वेगळ्या विषयावरचा अतिशय सुंदर फोटोंनी भरलेला माहितिपूर्ण लेख !

"क्रमशः" वाचून विशेष आनंद झाला !! पुभाप्र.

प्रचेतस's picture

21 Oct 2014 - 8:58 am | प्रचेतस

हेच म्हणतो.
पुढच्या वेळी आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येणार.

बोका-ए-आझम's picture

21 Oct 2014 - 1:59 am | बोका-ए-आझम

सुंदर लेख!

मुक्त विहारि's picture

21 Oct 2014 - 5:53 am | मुक्त विहारि

पुभाप्र..

आम्हाला न नेल्याबद्दल, निषेध...

यशोधरा's picture

21 Oct 2014 - 6:09 am | यशोधरा

लेख आवडला.

खटपट्या's picture

21 Oct 2014 - 8:38 am | खटपट्या

फोटो बघुनच मजा आली.
आता वाचतोय !!

किसन शिंदे's picture

21 Oct 2014 - 9:02 am | किसन शिंदे

जबराटच!

काका, या डिसेंबरात कर्नाळ्याला चला की.

सुधांशुनूलकर's picture

21 Oct 2014 - 4:15 pm | सुधांशुनूलकर

सर्व प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार.

@सूड, कपिलमुनी, बॅटमॅन, शिद : हे सर्व प्राणी प्रत्यक्ष पाहून आमचंही दिल खूश झालं होतं. या सॄष्टीच्या निर्मात्याला _/\_.
@अजया : सोबत स्थानिक माहितगार तज्ज्ञ मंडळी होती, त्यामुळे खूप काही बघायला मिळालं. विशेषतः जमिनीखाली राहण्यार्‍या सिसिलियनला शोधणं हे येरागवाळ्याचे काम नोहे.
@जयंतराव, ही भूचर पाल सगळ्या पश्चिम घाटात सापडते. (दांडेलीतही सापडत असेल.)
@रेवती - मीसुद्धा यातले बरेच जीव पहिल्यांदाच पाहिले.
@किसनद्येवा - या डिसेंबरात कर्नाळा जमवायचा प्रयत्न करू या.
@मुवि : आम्ही (भीमाशंकरला आणि आंबोलीला) गेलो तेव्हा तुम्ही इथे नसल्याबद्दल णिशेद
@वल्ली : पुढच्या वेळी आम्हीसुद्धा तुमच्याबरोबर येणार ऐवजी आपण सर्व बरोबर जाऊ हे जास्त योग्य. याच उद्देशाने भीमाशंकर सहल केली होती.
@कंजूस : तुम्हाला खूपच वाट पाहायला लावली...
@स्वॅप्स : आम्ही BNHSबरोबर गेलो होतो. आपण स्वतंत्रपणेही जाऊ शकतो, तिथल्या स्थानिक मंडळींची मदत होईल. त्यांचे संपर्क क्र. माझ्याकडे आहेत. शक्यतो पावसाळ्याच्या सुरुवातीला जावं.

मेमध्ये तिथे गेलो, तर सस्तन प्राणी पाहायला मिळतील. आम्ही कदाचित जाऊ, जायचं ठरवलं तर शक्य तितक्या मिपाकरांना व्यनि करीन.

दिवाळी अंकानंतर भाग २ टाकावा म्हणतो... तुम्हा सर्वांप्रमाणे मीही मिपा दिवाळी अंकाची वाट पाहतो आहे.

मदनबाण's picture

21 Oct 2014 - 4:23 pm | मदनबाण

मस्त माहिती आणि फोटो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-US fund flow into Pakistan occupied Kashmir dam floods Delhi with concern

विलासराव's picture

21 Oct 2014 - 4:23 pm | विलासराव

लेख आनी फोटो अप्रतीम.मी एका मित्राबरोबर आंबोलीला उतरलो होतो पण आम्हाला तिथे काहीच खास न वाटल्याने फक्त जेवण करुन चालत तो नागझीरा की असंच काय नाव असलेला धबधबा पहायला गेलो जो बेळगाव रोडवर आहे. तो तर ईतका गोटा आनी साधारण असा होता की फारच निराशा झाली. मग तसेच बेळगावला गेलो. बेळगाव मात्र फार आवडले होते.

बाकी अवांतरः नूलकर साहेब मलापण न्या मिपाकरांबरोबर.

प्यारे१'s picture

25 Oct 2014 - 6:20 pm | प्यारे१

लेख चाळला. फोटो उत्तम आहेत. सुंदर लेखमाला होईल अशी खात्री आहे.
मराठीत अशा विषयावर लेखन कमी असावं असा अंदाज आहे.

पु भा प्र

नूलकर गुरूजींची कमाल आहे ब्वॉ!

सुंदर छायाचित्रे आणि माहिती.

पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

सुन्दर फोटो अन छान माहिती.
पुभाप्र

जॅक डनियल्स's picture

27 Oct 2014 - 12:03 am | जॅक डनियल्स

खूप सुंदर लेख आहे. मलबार बेडूक तर आपला आवडता बेडूक आहे. बेडकाचा आवाज लोकांना आवडत का नाही? याचा मला खूप वेळा प्रश्न पडतो. प्रियकराने प्रेयसीला घातलेली ती एक सुंदर साद असते. अजून लेख येउद्यात.

कपिलमुनी's picture

27 Oct 2014 - 2:29 pm | कपिलमुनी

लौकर येउ द्या

अनुप ढेरे's picture

27 Oct 2014 - 3:25 pm | अनुप ढेरे

वाह! जबर्‍या...

सुखी जीव's picture

29 Oct 2014 - 1:46 pm | सुखी जीव

सुन्दर फोटो अन छान माहिती.

ज्ञानोबाचे पैजार's picture

2 Nov 2014 - 1:12 pm | ज्ञानोबाचे पैजार

नुलकरकाकांना मनापासुन धन्यवाद,
बेडकांमधे पण इतके प्रकार असतात हे माहित नव्हते.
पुढच्या भागाच्या प्रति़क्षेत.

तु नळीवर उडणार्‍या बेडकाचा व्हिडो मिळाला

ज्यांना वरील व्हिडो दिसत नसेल त्यांनी इथे क्लिकावे

पैजारबुवा,

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Nov 2014 - 12:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

भन्नाट व्हीडिओ आहे !

बहुगुणी's picture

5 Nov 2014 - 3:38 pm | बहुगुणी

दुव्याबद्दल दुवा!

कपिलमुनी's picture

6 Nov 2014 - 2:51 pm | कपिलमुनी

डोळ्यांचे पारणे फेडणारा व्हिडीओ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Nov 2014 - 8:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख माहितीपूर्ण आहे, आवडला. अजून येऊ द्या असेच.

-दिलीप बिरुटे