सफर तामिळनाडुची! - कुन्नुर (भाग ५)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
28 May 2015 - 6:26 pm

भाग १ - प्रस्तावना
भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी
सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)
सफर तामिळनाडुची !- कोइंबतोर आणि टॉय ट्रेन (भाग ४)

आम्ही कुन्नुरला उतरणार होतो. ३.५ तासाचा जादुई प्रवास अखेर संपला होता. पण आजुबाजुला नजर टाकल्यावर लक्षात आलं की ज्या जादू संपली नव्हती.. तर आता चहुबाजुला पसरली होती!

कुन्नुर हे उटी जवळ अवघ्या २० किमी वर असणारे गाव. पण उटीपेक्षा फारच गोड्डुलं!! "उटीपेक्षा कुन्नुरला या" असं ट्रिप अ‍ॅडव्हायझर वरच्या फोरम्स मध्ये स्थानिकांनी सांगितलं. बर्‍याच ठिकाणी कुन्नुरचं कौतुक ऐकुन अखेर कुन्नुर मध्येच हॉटेल शोधलं. अनेक महागड्या हॉटेल्स नंतर सहज B & B मध्ये शोधलं तर मिळालं "अल दिवानो!". म्हणलं, वाह काय नाव आहे!! मेल वर बरंच निगोसिएशन करुन अखेर बुकिंग करुन टाकलं. कुन्नुर मध्ये उतरल्यावर रिक्षानी १० मिनिटाच्या अंतरावर हे हॉटेल आहे. हॉटेल जरी अगदी लहानसं असलं तरी आहे फारच क्युट! पाहताक्षणी मनातच भरलं!

El Divano

El Divano 2

view
* हा फोटो आंतरजालावरुन साभार

हॉटेल मधुन दिसणारा नजारा..

El Divano view 2

कुन्नुरमध्ये आमच्याकडे फक्त एकच दिवस होता. त्यात सगळेच पॉईंट्स फिरत बसायची इच्छा नव्हती म्हणून निवडक २-३ जागा पाहुन पुढे बंदिपुरला जायचं होतं. पण ते सगळं नंतर पाहु, आधी जेवायची सोय काय ते पहायला हवं होतं. अल दिवानो वाले ऑर्डर दिली की बाजुच्या हॉटेल्स मधुन आणुन देतात खरं. पण कुन्नुर आणि उटी मधल्या "क्वालिटी" रेस्टॉरंट बद्दल फार वाचलं होतं. ते आमच्या हॉटेलच्या अगदी शेजारीच असल्याने तिकडे कुच केलं.

क्वालिटी मध्ये दुपारी बुफे असतो. नेहमी प्रमाणे सुप, सॅलड ते डेझर्ट असणार असा आमचा कयास. तसंच होतं ते, पण विथ साउथ इंडीयन ट्विस्ट! म्हण्जे साधी कोबीची भाजी हो, पण चारदा घेऊन खाल्ली इतकी क्लास! रस्सम तर अहाहाच!

Quality

आडवा हातच मारला अगदी!! सुप, सॅलेड, मश्रुम इन व्हाईट ग्रेव्ही, पनीर टिक्का, कोबीची साऊथ इंडियन स्टाईल भाजी, रस्सम, सांभार, पुलाव, कर्ड राईस, चायनीज काही पदार्थ, पायनॅपल कस्टर्ड आणि फक्त पायसमवर एवढंच काय ते खाल्लं!! बुफेवर ताव मारल्यावर मिशा पुसुन आधी किचन मध्ये जाऊन शेफ शोधला. त्याला म्हणलं "या महाराजा! तुमचा फोटो मस्ट आहे!"

Chef

हॉटेलचे मॅनेजर श्री. श्रीधर सोबत शेफ श्री. अब्दुल!

कुन्नुरमध्ये भयंकर गारवा होता, त्यात हे असलं जेवण. आता साक्षात रंभा उर्वशी जरी नृत्य करायला उतरल्या असत्या तरी ते पहायला आम्ही जागे रहाणार नव्हतो. दुलईमध्ये घुसुन मंडळी घोरु लागली.

हॉटेल मॅनेजरने गाडी मिळवुन दिली होती. उठल्यावर साईट सीईंगला निघालो. आजुबाजुला भयंकर धुके पसरले होते. अशा धुक्यात काय दिसणार अशी धाकधुक होती. पण आमचा "गाडीवान दादा" फुल्ल कोण्फिडन्स मध्ये आम्हाला "डॉल्फिन्स नोझ" कडे नेत होता.

म्हणाला "अरे साब, एकबार जोरसे हवा आयी तो १ मिनिट्मे ये सब हट जायेगा.. आप चलो तो.."

चलो तर चलो..!

Dhuka

फक्त आणि फक्त चहाचे मळे, चहाची हिरवीगार झुडपं, त्यात "एक कली दो पत्तीया" करत चहाची पानं तोडत असणार्‍या बायका, वळणावळणाचे रस्ते असा माहौल होता. आजुबाजुला निलगिरी पसरला होता, पण त्याची भव्यता धुक्यात लपुन गेली होती.

Dhuke 2

बर्‍याच वेळानंतर डॉल्फिन नोझ आले. मुळात असे वेगवेगळे पॉईंट्स का बनवले आहेत तेच कळत नाही. कुन्नुरमध्ये कुठेही उभे रहा तेच दृश्य सतत दिसत रहाते.. निळेशार आकाश, हिरवेगार चहाचे मळे आणि मागे उभा निलगीरी..! त्यासाठी कोणत्याही विशिष्ट ठिकाणी जायची गरजच नाही. पण तरी आम्ही गेलो.

असा डोंगरावर एक पॉईंट होता, समोर दरी, आणि जिथे उभं राहुन आपण पहातो ती जागा लंबु़ळ्की आहे म्हणुन म्हणे "नोझ"!! तिथे एक माणुस दुर्बिण घेऊन उभा होता. दहा रुपयात, १० सेकंदात, ५ पॉईंट्स दाखवत होता. ते पॉईंट्स म्ह्णजे समोर दिसणारा धबधबा, एक झोपडी आणि असंच काहीबाही. वास्तविक हा पागलपणा होता, पण प्रत्येक जण १०/- देऊन तो करत होता. न जाणो काही बघायचं राहुन गेलं तर!

त्यापैकी दुर्बिणी शिवायही डोळ्यांना दिसणारा आणि कानाला ऐकु येणारा धबधबा.

dhabadhabaa

ह्यानंंतर जाऊन धडकलो "हायफिल्ड टी फॅक्टरी" मध्ये.

HF Tea Factory

ह्या फॅक्टरी मध्ये चहा बनतो आणि मग त्याचा लिलाव होतो. मोठ मोठ्या कंपन्या हा चहा विकत घेऊन मग त्याला आपलं नाव देतात. आत गेलं की तिथे बसलेल्या माणसाने फॅक्टरी बघायचीये का म्हणुन सरळ आम्हाला गाईड प्रमाणे व्यवस्थित सर्व दाखवुन आणले. आधी त्याने चहाचे झाड, त्याचे शास्त्रीय नाव, कोणती पाने तोडायची, कोणत्या पानाचा कोणता चहा बनतो (वरच्या कळीचा व्हाईट टी - कॅन्सर साठी उत्तम, मग दोन पानांचा - ग्रीन टी - अ‍ॅण्टीऑक्सिडंट आणि उरलेल्या खालच्या पानांचा नेहमीचा चहा) हे सांगितले. हे झाड छाटत रहावे लागते. छाटले नाहीच तर ते इतके मोठेही होते.

Tea Tree

पुढे जाऊन मग ही पाने वेगवेगळी करुन वाळवतात, मग कटर मध्ये बारिक होऊन त्यावर फर्मेंटेशनची क्रिया होते, मग चाळुन वेगवेगळ्या प्रतीचा चहा बनतो. (सर्व काही जसं आठवतय तसं लिहीलय, चु.भु.दे.घे)

वरच्या ह्या प्रक्रियेचे काही फोटो

Dryer

Tea Tree

dryer

सर्व पाहुन झाल्यावर बाहेर Factory Outlet मध्ये आलो. तिथे वेगवेगळ्या चवींचे चहा मिळतात. आधी चव घेउन हवा तो चहा तुम्ही घेऊ शकता. मसाल्याचे पदार्थ, वेगवेगळी औषधी तेलं वगैरेही बरंच काय काय मिळतं. आम्ही सगळंच थोडं थोडं घेतलं. गाईडने पैसे काहीच घेतले नाहीत. बहुदा त्यांना कमिशन मिळत असावी.

टि फॅक्टरी समोर दिसणारे विहंगम दृश्य

view

ह्या नंतर थेट गेलो "सीम्स पार्क" मध्ये

सीम्स पार्क ही एक उतारावर बांधलेली फार मोठी बाग आहे. व्यवस्था सुद्धा उत्तम आहे. उताराच्या शेवटी एक तळे आहे. त्यात पुर्वी बहुदा बोटींग वगैरे असावं.

seems park

माझ्याकडचे इथले फोटो सापडत नाहीत म्हणून हे काही आंतरजालावरुन साभार

seems park 2

seems park 3

घनदाट झाडं, शांतता, पक्ष्यांची किलबिल, कमालीची स्वच्छता, कलात्मक रचना ह्यामुळे सीम्स पार्क ही आवर्जुन पहावी अशी जागा आहे. कधीतरी इथे जाऊन नुसतेच पक्ष्यांचे आवाज ऐकत बसायला फार आवडेल मला..!

दुसर्‍यादिवशी उठुन आम्ही उटी मार्गे बंदिपुरला जाणार होतो. उटी पहाण्यात तसा काही इंटरेस्ट नव्हता आम्हाला पण वाटेत आहेच म्हणुन जाणार होतो. जाताना मात्र डोळ्याचं पारणं फिटावं असा निसर्ग! आज स्वच्छ सुर्यप्रकाश होता. काल जे डोंगर धुक्यामुळे दिसत नव्हते ते आज निळ्यारंगाच्या नाना विविध छटांमध्ये दिसत होते. ह्या डोंगर रांगांना Blue Mountain का म्हणतात ते आता समजत होतं. गाडी थांबवुन तिथेच बसुन रहावं आणि मनभरुन हे सौंदर्य डोळ्यात साठवावं असं वाटत होतं!

on the way to ooty

on the way to ooty 3

long

जाताना दोडाबेट्टा पहायचाही इरादा होता, पण तो रस्ता चांगला नसल्याने तिथे जाता आले नाही. उटी सुरु झालं आणि सगळीकडे नुसता गजबजाट. अपेक्षेप्रमाणे उटीचा अनुभव काही कुन्नुर एवढा सुखद नव्हता. कुन्नुरला अत्यंत गारवा होता तर उटीला चक्क उकडत होतं. रोझ गार्डनला गेलो तर तिथे सिझन नसल्याने की काय पण फारसे गुलाब नहते आणि जे होते ते ही सुकत चाललेले. उटी लेकला गेलो तर तिथे तर जत्राच होती. आलोच आहोत म्हणुन थोडं बोटींग केलं.

ooty lake

उटीला फार वेळ घालवण्यात अर्थ नाही हे कळुन चुकलं. त्यापेक्षा लवकर पोहोचुन दुपारची सफारी तरी गाठता येईल म्हणुन आम्ही बंदिपुरचा रस्ता धरला. गाडी मदुमलाई नॅशनल पार्क मधुन धावत होती. इथे एरवी सुद्धा हत्तींचे कळप दिसतात म्हणे. नॅशनल पार्कने परत माझ्या मनावर गारुड केलं. परत माझे डोळे "search" मोड मध्ये गेले. खरं तर इतक्या मोठ्या अपेक्षा आणि इतके कमी चान्सेस घेऊन नॅशनल पार्कमध्ये फिरणं म्हणजे छळ आहे नुसता. पण एकदा ते व्यसन लागलं की पाय वळतातच.

ह्या वेळेस आता वाघाची वाट पहायची नाही असा मी पक्का निश्चय केला आणि डोळे मिटुन बसले. माझ्या निश्चयाला कसे धमाकेदार सुरुंग लागणार होते ते थोड्याच वेळात कळणार होतं!!

क्रमशः

सफर तामिळनाडु / कर्नाटकची - बंदिपुर (भाग ६)

प्रतिक्रिया

फोटू व लेखन आवडले. चहाच्या मळ्याची व फ्याक्टरीची सफर आवडली. त्यासंबंधित एका फोटोत डावीकडे सूर्यकिरणे चांगली आलीयेत. सगळीकडे हिरवाई पाहून छान वाटले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

28 May 2015 - 6:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

खुप छान!!!!

कंजूस's picture

28 May 2015 - 6:43 pm | कंजूस

लेखनशैली आणि फोटो रोम्ब नल्लारिक्याय

नूतन सावंत's picture

28 May 2015 - 7:21 pm | नूतन सावंत

मस्त.फक्त कून्नुरला जाण्याची इच्छा सदमा पहिल्यापासून मनात बाळगली आहे.काही न काही कारणाने राहूनच जातेय.ऑस्ट्रेलियाला जाऊन तिथला निलगिरी पाहणे झाले पण इथला काही भेटत नाहीये.फोटो पाहून इच्छा बळावली आहे.टी फॅक्टरी बाहेरचा फोटो मस्तच आहे.

मोदक's picture

28 May 2015 - 7:22 pm | मोदक

भारी वर्णन.

तेथे टेस्ट केलेला चहा आणि घरी आणलेला तोच चहा एकाच चवीचे आहेत का..?

पिलीयन रायडर's picture

29 May 2015 - 11:23 am | पिलीयन रायडर

हो. आम्ही जिंजर आणि मसाला आणले होते बहुदा.
पण अर्थात चहा ही गोष्ट दुध किती, पाणी किती, उकळलं किती ह्यावरही अवलंबुन असल्याने ते गणित आपल्या हिशोबानी बसवायचं. मला तरी आवडला हा चहा.

सूड's picture

28 May 2015 - 7:48 pm | सूड

छान, पुभाप्र

प्रचेतस's picture

29 May 2015 - 9:53 am | प्रचेतस

भारीच.
चहा फॅक्टरी पाहून महाराष्ट्रात एकमेव ठिकाणी असणार्‍या आंबा घाटातील चहाच्या मळ्यांची आठवण झाली.

a

a

बॅटमॅन's picture

29 May 2015 - 1:14 pm | बॅटमॅन

आयला हे माहिती नव्हते.

कोल्हापूरचे टेकवडे म्हणून शेतकरी होते त्यांनीही अगोदर चहा घ्यायचा प्रयोग यशस्वीरीत्या करून दाखवला होता, त्यांपैकीच आहेत हे लोक की दुसरे कोणी?

पिलीयन रायडर's picture

29 May 2015 - 2:01 pm | पिलीयन रायडर

महाराष्ट्रात चहाचे मळे आहेत हे मलाही माहिती नव्हतं.
कुठे आहे हे नक्की?

प्रचेतस's picture

29 May 2015 - 11:23 pm | प्रचेतस

मलकापुराहून पुढे गेल्यावर आंबा गावाच्या थोडं अलीकडे डावीकडे डोंगरावर हे मळे आहेत.

प्रचेतस's picture

29 May 2015 - 11:24 pm | प्रचेतस

बहुधा टेकवडेच असावेत हे.

सुंदर वाटले कुन्नर आणि तुमची या दिवशीची ट्रीप.
अगदी मुन्नार ट्रीपची आठवण झाली... अगदी हुबेहुब चित्रण...

पुढे उटीचा प्लॅन होता तो रहित करुन कुन्नुरच करावा असे वाटत आहे.. नक्कीच जानार आहे तेंव्हा पुन्हा तपासतो.. वाचन खुण साठवलेली आहे

पिलीयन रायडर's picture

29 May 2015 - 11:21 am | पिलीयन रायडर

उटी आता कमर्शियल झालं आहे. नुसतं बांधकामच दिसतं सगळी कडे. कुन्नुरमध्ये अजुन तरी तसं झालेलं नाही.
शिवाय बजेट चांगलं असेल तर कुन्नुरमध्ये खुप भारी हॉटेल्स आहेत. ती तर अगदी चहाच्या मळ्यातच आहेत.

त्यासाईडला जाणार असाल तर टॉयट्रेन आणि कुन्नुर मस्ट सी! बंदिपुरचा भाग उद्या टाकेन, त्याचाही कदाचित उपयोग होईल.

गणेशा's picture

29 May 2015 - 11:48 am | गणेशा

धन्यवाद ताई... नक्कीच उटी कॅन्सल करतो आहे.. पण या ट्रीप ला वेळ आहे.. या वर्षीची प्लॅन्ड राजस्थान आहे.. आणि साईड बॅकअप प्लॅन सिंधुदुर्ग आहे.
पुढच्या वर्षी लेह लडाख आहे, त्यामुळे २०१६ एंड किंवा २०१७ च उजाडेल इकडच्या साठी...

परंतु कुन्नुर नक्कीच .. मला हा भाग प्रचंड आवडला आहे..
-----

हॉटेल चे म्हणताल तर मोठी.. लहान चा प्रश्नच नाही.. फक्त ती ठिकाणे शहरापासुन लांब हवीत... निसर्गात हवीत ही एकच इच्छा..
तुमच्या ह्या लेखामुळे जी मुन्नारची आठवण आली त्या वेळेसचे हे १२ किमी जंगलात आणि चहाच्या मळ्यात असणारे मी राहिलेले हॉटेल आठवले... खुप सुंदर .. तुम्ही दिलेले हॉटेल पण खुप सुंदर आहेच
ग्रेट एस्केप रिसोर्ट
great escape

सविता००१'s picture

29 May 2015 - 11:33 am | सविता००१

मस्त आणि लै भारी लिहिलंयस. फोटू जबराट

लॉरी टांगटूंगकर's picture

29 May 2015 - 12:13 pm | लॉरी टांगटूंगकर

+१

स्मिता श्रीपाद's picture

29 May 2015 - 12:29 pm | स्मिता श्रीपाद

खुप खुप मस्त झालाय हा भाग.

रायनची आई's picture

29 May 2015 - 12:45 pm | रायनची आई

पिरा, तुम्ही नोव्हेम्बर मधे गेला होतात ना..त्यावेळी क्लायमेट कस होत? कारण ट्रिप अ‍ॅड्वायजर वर आहे की नोव्हेम्बर पासून खूप गारठा वाढतो म्हणून..त्यापेक्षा एप्रिल ते जून पर्यंत बेस्ट सिझन असतो..तुम्हाला कस वाटल?

पिलीयन रायडर's picture

29 May 2015 - 1:00 pm | पिलीयन रायडर

बाकी ट्रिप मध्ये हे वातावरण आमच्या फारच पथावर पडलं कारण सगळीकडे थंड हवा, कडक ऊन नाही त्यामुळे भरपुर फिरलो. पण कुन्नुरला मात्र दणकट थंडी होती. फरशीवर पाय ठेववत नव्हता अशी. पण मला आवडतं अशा वातावरणार फिरायला. अर्थात संध्याकाळी सुर्यास्तानंतर मात्र बाहेर पडायची हिम्म्मत नव्हती.

पण बाकी सर्व ठिकाणी काही त्रास झाला नाही.

बॅटमॅन's picture

29 May 2015 - 1:13 pm | बॅटमॅन

लेखाबद्दल अनेक धन्यवाद. उटीपेक्षा कुन्नूरची व्हिजिट करावी लागेलसं दिसतंय.

श्रीरंग_जोशी's picture

29 May 2015 - 11:44 pm | श्रीरंग_जोशी

हा ही भाग खूपच आवडला. वर्णन अन फोटोज दोन्हीही खासंच.
सहलीतला प्राधान्यक्रम अनुकरणीय आहे.

दक्षिण भारत सहलीमध्ये कुन्नुर हे आवर्जुन जायचे ठिकाण राहील माझ्यासाठी.

अवांतर - महाराष्ट्रात थंड हवेच्या काही ठिकाणी कॉफीचे मळे आहेत. चहाच्या मळ्यांबाबत प्रथमच ऐकलं.

अत्रुप्त आत्मा's picture

30 May 2015 - 12:50 am | अत्रुप्त आत्मा

छान फोटू आणि लेखन

मधुरा देशपांडे's picture

30 May 2015 - 1:21 am | मधुरा देशपांडे

मस्त चालली आहे सफर.

रुपी's picture

30 May 2015 - 2:39 am | रुपी

ते हॉटेल खरंच खूप गोडुलं आहे..

ज्योत्स्ना's picture

30 May 2015 - 4:26 pm | ज्योत्स्ना

मस्त चाललीये दक्षिणवारी. सगळे भाग छान लिहीलेत.

पॉइंट ब्लँक's picture

30 May 2015 - 4:46 pm | पॉइंट ब्लँक

कुन्नुर छानच टिपलय तुम्ही. प्रवास वर्णन नेहमीप्रमाणे मस्त!

कुन्नुर मस्तंच.छान सुरु आहे सफर!

वर्णन नेहमीप्रमाणेच जोरदार.

सगळे भाग सुरेख चालले आहेत.....येऊ द्या अजुन.....

आहाच एकदम, लय मज्ज्या केलित राव

इणो घेणे आले ;)

मस्त मस्त !!! सगळे भाग जमेल ... तसे वाचतेय ...सुंदर फोटो ..आणि लेखनशैली तर कमालीची खिळवून ठेवणारी...