सफर तामिळनाडु / कर्नाटकची - बंदिपुर (भाग ६)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
24 Jul 2015 - 5:59 am

भाग १ - प्रस्तावना
भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी
सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)
सफर तामिळनाडुची !- कोइंबतोर आणि टॉय ट्रेन (भाग ४)
सफर तामिळनाडुची! - कुन्नुर (भाग ५)

अनेक कारणांमुळे (सरळ सरळ टंकाळा म्हणता येत नाही म्हणुन...) पुढचा भाग लिहणे झाले नाही. माझ्या लेखांची चातकासारखी वाट पाहणार्या वाचकांनो.. हा घ्या पुढचा भाग!! ;)
.
.
.

ह्या वेळेस आता वाघाची वाट पहायची नाही असा मी पक्का निश्चय केला आणि डोळे मिटुन बसले. माझ्या निश्चयाला कसे धमाकेदार सुरुंग लागणार होते ते थोड्याच वेळात कळणार होतं!!

बंदिपुर हे तामिळनाडु - कर्नाटक बॉर्डर वरचं अभयारण्य. उटी वरुन म्हैसुरकडे जाताना मदुमलाईच्या जंगलातुन रस्ता जातो. जाताना रस्त्यात हत्ती दिसणे तर नित्याचे आहे. पण ह्या जंगलात वाघही आहेत. नशिबात असेल तर वाघही दिसुन जातो. वाघ ह्या प्राण्याने माझ्या डोक्याला किती ताप दिलाय हे मला चांगलं लक्षात असुनही मी बंदिपुरला मुक्काम ठरवलाच. वाघापेक्षाही तिथे जंगलात रहाण्याची सोय होती हे जास्त भारी होतं. कान्हामध्ये हा अनुभव न मिळाल्याने जंगलातला मुक्काम असतो तरी कसा हे पहायची उत्सुकता होती.

खरं तर ह्या जागेचा सोध मला अचानकच लागला. BTR Govt Guest House च्या "वनश्री" ह्या कॉटेजचे रिव्ह्यु विचारणारा एक प्रश्न ट्रिप अॅडव्हायजर वर विचारला होता. त्यातुन BTR Govt Guest House नावाचा एक प्रकार आहे हे समजलं. तर ह्याबद्दल थोडक्यात माहिती अशी:-

१. कर्नाटकात प्रवेश केल्या केल्या, जंगलातच कर्नाटक सरकारनी केलेली रहाण्या खाण्या-पिण्याची सोय म्हणजे हे BTR Govt Guest House. ह्या बद्दल सर्व माहिती http://bandipurtigerreserve.in/index.php?option=com_content&view=article... इथे मिळेल.

3

4

२. सर्व सफारी इथुनच जंगलात जातात. सफारीचे बुकिंगही इथेच होते. त्यामुळे ही जागा अत्यंत सोयीची आहे.

1

३. सफारी:- हा एक मोठा जोक आहे. कान्हाच्या अनुभवाने आम्ही फारच जास्त अपेक्षा घेउन इथे गेलो होतो. प्रत्यक्षात इथे "१" जिप्सी आणि "१" जीप उपलब्ध आहे. (Jeep - 2000/- for 6 people and Gipsy - 3000/- for 5 people)
अर्थातच ही एकुलती एक जिप्सी आणि जीप सरकारी लागेबांधे असणार्‍यांनाच मिळते. आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही सकाळी ६ लाच इथे येऊन बसलात तर फर्स्ट कम बेसिस वर तुम्हाला मिळु शकते. नंतर त्या माणसाने हळुन उद्याच्या सर्व सफार्‍या आधीच बुक झाल्या आहेत, उगाच दगदग करु नकात असं सुमडीत सांगितलं.

मग उरतो पर्याय बसचा. ही सफारी तुम्ही वरच्या साईटवर ऑनलाईनही बुक करु शकता. किंवा ऑन द स्पॉटही तिकिट मिळते. पण बाकी काहीच पर्याय नसल्याने लोक तुटुन पडतात, म्हणुन ऑनलाईन बुक केलेलं बरं राह्तं.
सकाळी ३ वेळा ( ६.३० , ७.३० आणि ८.३० ) अशा १ तासाच्या ३ सफारी आहेत. संध्याकाळी ३ वेळा (३.३० , ४.३० आणि ५.३०) अशा आहेत. तिकिट माणशी १००/- आहे. कार्ड पेमेंट उपलब्ध आहे.

आम्ही उटीचे ते १७६० हेअर पिन बेंड गरगरत पार पाडले, रस्त्यात डोळे ताणु ताणु प्राणी शोधले आणि कसे बसे दुपारी ३.३० ला बंदिपुरला पोहोचलो. सफारीची सुव्यवस्था समजली. आता बसच्या मंजुळ आवाजात कोणते प्राणी आमची वाट बघत थांबणारेत असा प्रश्न पडला. मग रुम तरी दाखवा म्हणुन कॉटेज गाठलं.

1

व्यवस्था अतिउत्तम नसली तरी भिकारही नव्हती. सरकारी जुने कॉटेजेस आहेत. आत लाकडी मच्छरदाणीवाले पलंग आहेत. एक अँटिक ड्रेसिंग टेबल आहे. रुम एवढंच मोठं बाथरुम आहे. आणि रुम + बाथरुम च्या चौपट बाहेर व्हरांडा आहे. लाईट नव्हतेच. ते म्हणे ७ नंतरच येणार होते. चहा, जेवण आणि नाश्ता जवळच्या कॅन्टीनमध्ये मिळतो. पण हे सगळे गौण मुद्दे आहेत.

Govt guest house

hatti

murti

murti 2

murti 3

सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही जंगलात रहाता. हरणं तर शेकड्यानी आजुबाजुलाच फिरत असतात. माकडं आहेत. रात्री मस्त चांदणं पडलेलं असतं. गार वारा.. हत्तीचे चित्कारण्याचे आवाज येत असतात. झाडांच्या पानांची सळसळ..

harin

मला कुठेही जाण्याची इच्छा नव्हती. मी सरळ रुम गाठुन जाउन झोपले. नवरा मात्र सफारी मुड मध्ये असल्याने ५.३० च्या सफारीला निघाला. सासुबाई आणि अबीरलाही घेउन गेला. मी ट्रान्स मध्ये त्या रुममध्ये झोपुन गेले.

मी अशी अंतराळात तरंगतच होते की अचानक खिडकीवर टकटक झाली. मी डोळे किलकिले करुन पाहिले तर एक माणुस टक लावुन माझ्याकडे पहात होता. आणि मग जोरजोरात हातवारे करायला लागला. मी किंचाळत सुटले. माझ्या किंचाळण्यानी मीच दचकले आणि खडबडुन जागी झाले. बघितलं तर काय... समोरचा माणुस नवरा होता!! आणि अजुनही "लवकर चल.. बाहेर ये" म्हणुन नाचत होता. मी तशीच अर्धवट झोपेत उठुन त्याच्या मागे निघाले. काय तर म्हणे वाघाचं सायटींग झालं होतं (जंगलात लोक असंच बोलतात.. वाघ दिसला नाही म्हणायचं.. सायटींग झालं असं म्हणायचं!!) तर कदाचित आपल्यालाही दिसेल म्हणुन नवरा बिचारा धावत पळत मला न्यायला आला. मला अर्धवट झोपेतच बसमध्ये बसवलं. मला तर वाघ दिसणार नाहीचे ह्याची खात्रीच होती. मी निवांत डुलक्या खात बसले. जिथे ४-४ तास जंगलात फिरुन वाघ दिसला नव्हता, तिथे ह्या खडखडत्या बसमधुन तासाभरात कुठुन दिसणार होता वाघ??? सगळ्या गाड्या अर्थातच वाघ दिसला त्या दिशेने वळल्या होत्या. आम्ही पण गेलोच. एका तळ्यापाशी सगळ्या गाड्या टक लावुन बघत उभ्या होत्या. म्हणलं झाला ह्यांचा टाईमपास सुरु. उगाच पब्लिकला एका दिशेने बोट दाखवुन दिलं की झालं. लोक खुळे होऊन बघत बसतात. मी सुद्धा पेंगुळल्या डोळ्यांनी उगाच बघितल्या सारखं केलं... आणि खाडकन माझी झोप उडाली... तिथे वाघ होता....!

नाही हो.. असा बसल्या बसल्या जंगलात नीट वाघ दिसला तर आयुष्यात मजा काय.. हे महाशय चिखलात लोळुन, तळ्याकाठी आमच्याकडे पार्श्वभाग करुन पसरले होते. आणि पाच पन्नास लोक आपल्या उठण्याची वाट बघत आहेत ह्याची अजिबात पर्वा न करता लोळत होते. गाड्या बिचार्‍या तासभर ताटकळल्या. कॅमेरे बोर झाले. शेवटी डायवर निघाला. वाघराव काही नीटसे दिसले नाहीतच. खालच्या फोटोत तुम्हाला दिसला तर बघा..

vagh

आमच्या साबा ह्यातही खुश होत्या. आता उद्या सकाळी तुम्ही परत सफारी करा म्हणाल्या. नक्की नीट वाघ दिसेल. आता काय माझ्या मनात आशा नावाची बेक्कार गोष्ट निर्माण झाली होती. मी सकाळी उठुन तिन्ही सफारी करणार हे तर निश्चित होतं.

संध्याकाळी ७-८ कॅन्टीन मध्ये खुप सुंदर डॉक्युमेंट्री दाखवतात ती पाहिली. मग चांगली डॉक्युमेंट्री दाखवली म्हणुन वाईट जेवण देतात. ते गिळलं. आणि तसल्या सुनसान जंगलातल्या रुममध्ये कुडकुडत येऊन झोपलो. पानांची सळसळ आणि हत्तीचे चित्कार वगैरे चालुच होते. दुपारी त्याची मज्जा वाटत होती. आता भीती वाटायला लागली. राम राम म्हणत डोक्यावर चादर घेऊन गुडुप झालो.

सकाळी उठुन पहिलीच सफारी गाठली. अजुनही सगळी कडे धुकं होतं. अशात प्राणी दिसणं अवघडच होतं.

dhuka

pakshi

harina

बायसन, हत्ती असे नेहमीचे कलाकार होतेच. बिचार्यांना कुणी ढुंकुनही पहात नव्हतं. सगळे आपले वाघाच्या मागे.

baison

वाटेत दिसणार्‍या प्रत्येक गाडीला "दिसला का हो?" विचारत विचारत डायवर काका तासाच्या जागी २ तास गाडी फिरवत बसले. पण श्या... नशीबच बेक्कार... खरं तर भयानक कंटाळा आला होता. नको आता पुढची सफारि, जाउन झोपु थोडं असा विचार जोर धरायला लागला. बसने बुकिंग ऑफिसला परत सोडलं. काय करावं ह्याचा विचार चालु होता की अजुन एक प्रायव्हेट सफारीची गाडी आली. ह्यात एक अतरंगी फॅमेली होती. वडील-मुलगी आणि मुलगा, सगळेच वाघामागे वेडे लोक जंगलो जंगली फिरत असतात. त्यांनी अगदी रस्त्यावर एखादं कुत्रं दिसावं इतक्या सहजपणे आम्हाला "वाघ ना.. दिसला की.." असं सांगितलं..

"दिसला??? कुठे???"

"काल त्याने शिकार केली ना.. त्याच जागी फिरतोय तो.."

आक्ख्या मदुमलाई जंगलात कुठे असणार हा वाघ हा प्रश्न आता संपला होता. आता एका डेफिनाईट जागेत वाघ फिरतोय अशी पक्की खबर मिळाली आणि आम्ही ताबडतोब पुढच्या सफारीसाठी बसमध्ये चढलो. उन्हं चढल्याने वाघ राव दिसणार का अशी धाकधुक होतीच. पण आपल्या शिकारीच्याच आसपास तो फिरणार हे नक्की होतं. डायवर काका पण बिगीबिगी आले. पुन्हा लोक्स डोळे ताणुन सज्ज झाले.

काकांनी बाकी टाईमपास न करता सरळ कालच्या तळ्यापाशी गाडी नेली. तिथे काहीच नव्हतं. म्हणुन मग थोडीशी आजुबाजुला फिरवावी अशा विचाराने १०० पावलं पुढे नेली. आणि काय सांगु महाराजा... वाघाच नखही दिसत नव्हतं पण तिथे वाघ आहे हे समस्त प्रजेला एका क्षणात नीट समजलं..

गाडीच्या उजव्या हाताचं एक झुडुप दणादणा हलत होतं आणि वाघराव मिटक्या मारत, हाडं फोडत शिकारीवर ताव मारत होते.. १५ फुटांवर आम्ही स्तब्ध होऊन ते ऐकत होतो. अरे काय टेरर आहे की गम्मत..

zudup

पण कसं असतं की प्रत्येक गोष्टीची गम्मत थोडाच वेळ असते. ५ मिनिटं झाली.. १० झाली.. अर्धा तास झाला.. झुडुप आपलं हलतय आणि आम्ही आपले डोळे फाडुन ते पहातोय. मग प्रजेला कंठ फुटला. आधी कुजबुज सुरु झाली.. मग गप्पाच सुरु झाल्या. हे महाराज आपलं मम्मम करुन तिकडुन तिकडेच निघुन जाऊ नयेत म्हणजे मिळवलं.. मला तर चिंता डायवर काकांची होती. वाघ तर वाघ, त्यांची मर्जी फिरली तर ते "संपला एक तास.. चाल्लो मी" करुन सरकारी हिसका दाखवु शकतात हे माहिती होतं. पण काकांनाही घाई नसावी. ते ही निवांत बसले होते. आणि अचानक.....

"आला...." मी चित्कारले..

पुन्हा सगळे चिडीचुप..

पुढच्या सेकंदाला महाराजांनी एंट्री मारली..

entry gif

entry

entry

vagh

बसच्या उजवी कडच्या झुडुपातुन निघुन रस्ता ओलांडुन महाराज डाव्या बाजुच्या गवतात येऊन पोझ देऊन बसले. घ्या मेल्यांनो काय फोटो घ्यायचेत ते!

डाव्याबाजुला येऊन फोटो काढताना अचानक लक्षात आलं की उत्साहात आपण बसच्या दारात येऊन फोटो काढतोय. वाघ समोरच आहे. ही काही जिप्सी नव्हे. दोन उड्यांमध्ये वाघोबा आपल्याला मिठीत घेउ शकतात. पण महाराज तासभर मिटक्या मारत ब्रेकफास्ट करुन आलेले असल्याने तसलं काही झालं नाही!

लोकांनी मनसोक्त फोटो काढले.. वाघोबांनी काढु दिले.. मग वैतागुन ते आले तसे निघुन गेले.. पब्लिकही नाचत बागडत परत आली.
आलो की दणकट नाश्ता केला नि बॅगा भरुन समोरच्या रस्त्यावर जाऊन उभे राहिलो. मिळेल त्या बसने म्हैसुर गाठायचं होतं. आणि दुसर्‍या दिवशी संध्याकाळी बंगलोरहुन पुण्याला जाणारी रेल्वे पकडायची होती. सिंपल..!

पण असं काही सिंपल होत नसतं हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलं असेलच. १७ बॅगा घेउन ४ माणसं रस्त्यावर उभी होती आणि एका काडीच्या नेटवर्कवर फोन खणखणला

"हां ते तुमचं उद्याच रेल्वेच तिकिट कन्फर्म झालं नाहीये.. तत्कालचं तिकिट वेटींगवर गेलं होतं... मी आत्ता पाहिलय!" सासुबाईंचे दुसरे सुपुत्र पलीकडुन वदले.

आणि डोक्यावरच्या झाडावर नाचणार्‍या माकडाचे खिक्कन दात काढले...

क्रमशः

प्रतिक्रिया

हाहाहा .. जबरदस्त हातोटी आहे तुझ्यात प्रसंग रंगवण्याची. खरंच मी वाट पाहत होते पुढचा भाग कधी येतोय त्याची. आता याच्या पुढे जास्त भाव खाऊ नकोस लवकर टाक तो पण भाग.

सविता००१'s picture

24 Jul 2015 - 6:56 am | सविता००१

लै भारी. पटपट टाक की पुढचे भाग. छळू नको.
मस्तच लिहितेस.

असंच छळत रेंगाळत लिहायचं. रानात हेच होतं.काय तो विचित्र माणूस झोपूनही देत नाही काय म्हणु वाघाचं साइटिंग -माकडाने खिक्कन दात काढले----

सुंदरवादा लेखना.लवकर लवकर लिख माडी

कंजूस's picture

24 Jul 2015 - 10:30 am | कंजूस

फोटोगळु बहळा सुंदरवादा

विशाखा पाटील's picture

24 Jul 2015 - 11:43 am | विशाखा पाटील

मस्त चुरचुरीत लिहिलंय!

एकदम मजा आली वाचून.

वेल्लाभट's picture

24 Jul 2015 - 1:54 pm | वेल्लाभट

सुसाट लिहीलंयत. मस्त
सूर्यकिरणांचा आणि हरणांचा फोटो..... एक्क्क नंबर !

डॉ सुहास म्हात्रे's picture

24 Jul 2015 - 2:11 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त खुसखुशीत लिहीलंय. उगी वेळ न घालवता पुढचे लेख टाका बरं... आळस हा माणसाचा एक नंबरचा शत्रू असतो ! :)

फारच सुन्दर!
वाघ बाहेर येतानाची व्हिडिओ क्लिप मस्त..

लवकर पुढ्चा भाग येउ दे!

छान खुसखुशीत वर्णन नेहमीप्रमाणे.

मित्रहो's picture

25 Jul 2015 - 11:09 am | मित्रहो

वाघ दिसला तर, नशीबवान
मुळात जंगल सफारीला वाघ दिसेल ही अपेक्षा ठेवून जाउच नये. अपेक्षाभंगचा दुःखच वाट्याला येत. त्यापेक्षा जे आहे ते आनंदाने बघावे.

लेख मस्त, मजा आली वाचताना.

सगळी लेखमाला खुप छान झालीय