भाग १ - प्रस्तावना
भाग २ - रामेश्वरम आणि धनुषकोडी
सफर तामिळनाडुची !- मदुराई (भाग ३)
खरं सांगु का.. कोइंबतोर विषयी मला काहीच माहिती नाही! आम्ही इथे दोनच कारणांसाठी गेलो, एक तर दिर कुठे रहातो, काय काम करतो वगैरे पहायला आणि दोन म्हणजे साड्या! दिराची रुमच मुळात कोइंबतोरच्या बाजारपेठेत असल्याने काही फिरायचा योगही नाही आला. सकाळी उठलो, दणकट सौदेंडियन नाश्ता केला आणि दुकानांमध्ये घुसलो!
(दोन घास खाल्ल्यावर फोटोच आठवलं!!)
(सुचना - साड्या खरेदी प्रेमींनीच हे वाचावं! इतरांनी डायरेक्ट पुढच्या सुचनेपाशी भेटा!)
पुण्यातल्या लोकांना लक्ष्मी रोडवर मोठ्या दुकांनामध्ये खरेदी करण्यातला फोलपणा ठाऊक असतो, पण बाहेरुन आलेल्या व्यक्तिला कानाकोपर्यातली अस्सल माल मिळणारी दुकानं माहिती नसल्याने त्याला लक्ष्मी रोडशिवाय पर्याय नसतो तसंच आमचंही झालं. बाकी कुठलं काहीच ठाउक नसल्याने आम्ही आपले सरळ मोठ्या शोरुम मध्ये घुसलो..
पोथीज, पी.एस.आर इ. मोठ्या मोठ्या दुकानांच्या भव्य शोरुम्स दुतर्फा होत्या. कुठुन सुरवात करावी हाच प्रश्न होता. आम्ही मदुराईमध्ये असताना एका बाईंची साडी आवडली म्हणुन सरळ तिला गाठुन "अय्या! कुठुन घेतली हो? किती छान!" अशा गप्पा ठोकल्या होत्या. जगभरातल्या बायका "कपडा खरेदी" ह्या विषयावर आरामात गप्पा मारु शकतात. त्या बाईंना फक्त तमिळ येत होतं आणि आम्ही हिंदीवाले. पण खाणाखुणा करुन करुन तिला दुकानांची नावं विचारली! तेवढ्यात तिची लेक आली आणि तिला इंग्लिश येत असल्याने तिने सध्याची फॅशन काय वगैरे पासुन इथ्यंभुत माहिती दिली. तिच्याच सल्ल्याप्रमाणे मदुराई ऐवजी कोइंबतोरलाच सगळी खरेदी करायचं ठरवलं तिच्या बोलण्यात पोथीजचं नाव जास्त आलं म्हणुन इथेही पोथीज मध्येच घुसलो.
दक्षिडेकडची खरेदीमधली सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे दुकानांमध्ये खुर्च्यांवर बसुन साड्या पहायची सोय! आपल्याकडे जशा गाद्या खाली घातलेल्या असतात, मग त्यावर पसरलेल्या साड्या तुडवत आपण कुठेतरी जागा शोधतो आणि बसतो. तसं इथे नव्हतं. बुटक्या काउंटर सारखी रचना.त्यावर गाद्या घातलेल्या. आपण समोर खुर्ची टाकुन साड्या पहायच्या. सकाळी सकाळी आम्ही पहिलेच गिर्हाईक, दाखवणारे पण मुड मध्ये आम्ही पण मुड मध्ये! खुर्च्या धरुन त्यावर मांडीच ठोकुन बसलो. बजेट म्हणून साधारण जी खरी रेंज आहे त्याच्या पेक्षा हजार रुपये कमीच सांगितले, कारण हे लोक दाखवतातच बजेटच्या वरच्या साड्या हे अनुभवानी माहिती होतं. पुणं काय नि तामिळनाडु काय, मार्केटींग सारखंच! आमचा अंदाज चुकला नाही. एकाचढ एक साड्या दाखवायला सुरवात झाली. सुमारे ५० साड्या पाहुन झाल्यावर मग मी "आता एक काम करा, ह्या रंगातली, तशा बॉर्डरची आणि अशा बुट्ट्यांची... दाखवा.." तो माणुसही भारी, त्याला नेमकं समजलं की माझा चॉईस कोणत्या दिशेला झुकतो आहे. त्याने करेक्ट साड्या काढल्या. पैकी काही साड्यांचे हे फोटो
मग सुरु झाल्या ट्रायल्स! कमरेला बेल्ट बांधुन आणि पदराला ब्लाऊज सारखं गुंडाळुन त्या बाईने मला १५ सेकंदात पर्फेक्ट साडी नेसवली. इतकी नेटकी साडी तर मला लग्नानंतर ४ वर्षानीही नेसता येत नाही. ती साडी घालुन आरशासमोर उभी राहिले आणि एका क्षणात निश्चित झालं.. यही है वोह! साडी कशी हवी, जिचा रंग चेहर्यावर उतरेल! मनासारखी साडी मिळाली! अर्थात माझ्यासाठी नाही तर माझ्या आईसाठी! त्यामुळेच इतका वेळ लावुन, इतका जीव काढुन मी साड्या पहात होते!
तिकडे साबांनीही अर्धे दुकान खाली काढायला लावुन मनाजोगती साडी मिळवली होती. नव्या नव्या साड्या घालुन दोघींनी मिरवुन झालं! गंमत म्हणुन आजुबाजुचे महागाच्या साड्यांचे सेक्शन बघुन दचकुन आलो. एखादी मॉडेलला नेसवलेली साडी पाहुन "हीच माझी साडी" म्हणुन नाचत जावं आणि किंमत पाहुन दुप्पट वेगानी परत यावं, ते ही करुन झालं. कॉटनच्या २-३ साड्या घेऊन झाल्या आणि (आम्ही दोघी तरी) अत्यंत आनंदात बाहेर पडलो!
पुरुष मंडळींना वाटलं झालं.. आता संपली खरेदी! आता काय जेवायचं न जाऊन झोपायचं. आम्ही काही त्यांचा आनंद हिरावुन घेतला नाही. एका हॉटेलात सौदेंडियन जेवण हाणुन त्यांना म्हणलं आता तुम्ही घरी जा, आम्ही अजुन थोड्या साड्या घेऊन येतो! त्यांच्या कडे आधीच्या खरेदीच्या बॅगा सोपवुन आम्ही सासु-सुना मस्त भटकलो. अजुन थोड्या कॉटनच्या साड्या घेतल्या (मग!.. घरातल्या बाकीच्या बायकांना काही नको का?!) स्वस्तात मस्त साड्या मिळाल्या. मग रात्री आईचा फोन आला की "अगं तू सकाळी ज्या साडीचा फोटो पाठवला होतास ना, ती पण मला आवडली आहे, तर ती सुद्धा आण!" मग काय पडत्या फळाची आज्ञा घेऊन दुकान बंद होत असताना पळत जाऊन ती साडी सुद्धा घेऊन आलो. आधी आमचा विचार होता की ही वाढीव बॅग कुरीयरनी पुण्याला पाठवुन द्यायची. पण प्रत्यक्षात मात्र इतक्या महागाच्या साड्या दुसर्याच्या हाती सोपवेनात, म्हणुन मग उरलेली सगळी ट्रिप आम्ही त्या वागवल्या!
(सुचना - धोका टळलेला आहे! आपण पुढे वाचु शकता!)
ह्या व्यतिरिक्त कोइंबतोर बद्दल मला काहिही ठाऊक नाही. तिथे बिर्याणी चांगली मिळते म्हणे, पण ती नॉनव्हेज! त्यामुळे माझा पास. आम्ही तर जेवणात परत वेगवेगळे डोसे, इडलीअप्पम वगैरे पदार्थ हाणले.
कोइंबतोरच्या पुढचं खरं आकर्षण म्हणजे टॉय ट्रेन!!
निलगीरी ब्लु माउंटन म्हणुन ओळखली जाणारी ही टॉय ट्रेन निलगिरी पर्वतांमधुन धावते. आजुबाजुला दिसणार्या निसर्गसौंदर्यामुळे ती अत्यंत प्रसिद्ध आहे. २००५ साली युनेस्कोने दार्जिलिंगच्या हिमालयातुन जाणार्या टॉय ट्रेन सोबत हिलाही "वर्ल्ड हेरिटेज"चा दर्जा दिला आहे. इतकं वर्णन वाचल्यावर हिच्यातुन प्रवास करणं मस्ट होतं. कोइंबतोर जवळ ४० मिनिटावर असणार्या "मेटुपलायम" (MTP) स्टेशन वरुन सकाळी ७ ला ही ट्रेन सुटते. हीचं बुकिंग मिळणंही तसं अवघडच. आम्ही अर्थातच तत्काळवर अवलंबुन! आम्हाला तत्काळ मधुन फक्त ३ तिकिटे मिळाली. आम्ही माणसे तर ४ जाणार होतो. पण नेहमीप्रमाणे दैवावर हवाला ठेवुन निघालो.
कोइंबतोरवरुन सकाळी ६ ला टॅक्सीने निघालो. सकाळची वेळ, थंड वातावरण, आजुबाजुला दिसणारे डोंगर, हिरवागार परिसर, कालच झालेली मनसोक्त खरेदी..! फारच भारी वाटत होतं! त्यात कॅब ड्रायव्हरनी तमिळ रोमँटीक गाणी लावलेली. "वेप्पम" ह्या पिक्चरच्या "Maazaai Varum" ह्या गाणातल्या व्हॉयलीनचा पीस वाजत होता! सगळं कसं जुळुन आलं होतं. ह्या प्रवासाखेरीज काही आयुष्य आहे हेच विसरायला झालं होतं. आजही तो क्षण मनात पक्का कोरला गेलाय. जेव्हा कधीही खुप वैतागायला होतं तेव्हा डोळे मिटुन जर ह्या क्षणाला आठवलं तर मी परत एकदा त्या कॅबमध्ये "Maazaai Varum" ऐकत असते. माझ्या आयुष्यातली दगदग तिकडे दूssssर पुण्याला असते. मी आणि नवरा फक्त आनंदात भटकत असतो..!
असं आनंदात तरंगत तरंगत मेटुपलायमला पोहोचलो आणि समोर ही टॉय ट्रेन उभी!
आनंदाला पारावार न रहाणे किंवा आनंदानी वेडेपिसे होणे अवस्थेत मी एव्हाना पोहोचले होते. ती ट्रेन काय किंवा ते टुमदार मेटुपलायम स्टेशन काय.. स्वप्नच हो!
हे त्या ट्रेनच वाफेचं इंजिन
आतुन ट्रेन अशी दिसते.
एका डब्यात असे ५ छोटे कंपार्ट्मेंट असतात. आणि प्रत्येक कंपार्ट्मेंटमध्ये समोरासमोर टाकलेली २ बाकडी असतात. ज्यात खरं वाटणार नाही पण एका बाकड्यावर "५" लोकांनी बसणं अपेक्षित असतं आणि बाकड्यांखाली सामान ठेवणं. (त्यामुळे १,५, ६, १० हे सीट्स दाराजवळ येतात हे लक्षात ठेवा!) आमच्या एका तिकिटाचा प्रश्न एका ग्रुपमध्ये एक जण कॅन्सल झाला असल्याने टिसीने ऑन द स्पॉट तिकिट देऊन सोडवला. नेमकी ते सिट बाकीच्या ३ सोबतच आले. नवर्याने वाफाळत्या इडल्या, मेदुवडे आणि सांबार नाश्ता म्हणुन आणलं. स्वर्ग म्हणतात ना तो हाच! म्हणलं समर्थांना सांगा, "जगी सर्व सुखी" मी आहे!
झुक्झुक करत ठरल्या वेळेला ट्रेन निघाली. दुरवर दिसणार्या निलगिरी पर्वतांच्या रांगा
डोंगरांमधुन चाललेली गाडी
खळाळणार्या ओढ्यांवरुन जाताना
आजुबाजुचं जंगल
ह्या गाडीची अजुन एक अफलातुन गोष्ट म्हणजे वाटेतल्या लहान लहान स्टेशनवर गाडी थांबवतात. खाली उतरुन आपण आजुबाजुला फिरुन येऊ शकतो. आम्हाला महागडे कॅमेरे सांभाळणं होणार नाही म्हणुन मोबाईलच्या कॅमेरावरच भिस्त होती. पण अस्सल फोटोग्राफर ह्या जागेचं सोनं करतील!
बाजुला सतत सोबती.. निलगिरी!
ब्रिजवरुन जाताना
उटीला घनदाट जंगलातुन जाणारे रस्ते
अशाच एका ठिकाणी थांबल्यावर..
आता चहाचे मळे दिसायला सुरवात झाली. कुन्नुर जवळ आलंय हे लक्षात आलं..
आम्ही कुन्नुरला उतरणार होतो. ३.५ तासाचा जादुई प्रवास अखेर संपला होता. पण आजुबाजुला नजर टाकल्यावर लक्षात आलं की ज्या जादू संपली नव्हती.. तर आता चहुबाजुला पसरली होती!
क्रमशः
(तळटीपः- काही लोकांचा गैरसमज झालय की मी तंजावर, महाबलीपुरम विषयी सुद्धा लिहीणार आहे. तर तसं नसुन आता फक्त कुन्नुर, बंदिपुर आणि म्हैसुर विषयीच लिहीणे बा़की आहे. धन्यवाद!)
प्रतिक्रिया
25 May 2015 - 9:29 pm | दुर्गविहारी
उटीच्या आटवणी ताज्या झाल्या
25 May 2015 - 9:33 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
धोकादायक आणि बाकीचे सगळे फोटो आवडले. =))
25 May 2015 - 9:52 pm | नूतन सावंत
वा! साड्यांचेही साग्रसंगीत फोटो टाकल्याने खरेदी प्रत्यक्ष केल्यासारखे वाटले.टॅाय ट्रेन आणि बाकीचे फोटो बघून मात्र पर्यटनाची भूक वाढली.
25 May 2015 - 10:42 pm | स्नेहानिकेत
साड्यांची खरेदी एकदम जोरात झालेली दिसते.टॉय ट्रेन आणि बकीचे सर्वच फ़ोटो छान आलेत.हा भाग देखील उत्तम जमलाय.
25 May 2015 - 10:43 pm | अजया
साड्या!अहाहा!!मस्त वर्णन!
25 May 2015 - 11:02 pm | डॉ सुहास म्हात्रे
खूप पुर्वी पाहिलेली उटी विसरायला झाली होती... आज सुंदर फोटो पाहून त्या आठवणी परत जाग्या झाल्या. वर्णनही नेहमी प्रमाणेच खुसखुशीत !
25 May 2015 - 11:07 pm | स्रुजा
आहाहा ! काय ते झकास वर्णन तुझं.. दंडवत घे :)
मस्त लिहिलयेस, अगदी बारीक सारीक तपशीलासकट. टॉय ट्रेन एवढी छान आहे माहिती नव्हतं.
25 May 2015 - 11:07 pm | कंजूस
कसं काय जमतं तुम्हाला एवढ्या कमी वेळात एवढ्या साड्या खरेदी करायला?
याच भागाची वाट पाहत होतो.कोइमत्तुर बटर घेतले का ?
एक प्रश्न ऑनलाइन खरेदीमुळे हा धंदा बसेल का ?
26 May 2015 - 12:00 pm | पिलीयन रायडर
असं वाटत नाही ब्वॉ.. मी तरी ५० साड्या उचकुन, पोत पाहुन, अंगाला लावुन रंग कसा दिसतोय ते बघुन, पदर - बुट्टे - बॉर्डर इ कॉम्बिनेशन पाहुनच साडी घेईन.. ऑनलाईन मध्ये ही मजा नाही ना..
29 May 2015 - 11:38 am | सविता००१
ऑनलाईन मधे काही मज्जा नाही. पिरा, मस्तच साड्या गं. क्लासच
वर्णन खूप सुरेख. आणि
म्हणलं समर्थांना सांगा, "जगी सर्व सुखी" मी आहे! हे खरच वाटतय तुझं लेखन वाचून. आवडेश
25 May 2015 - 11:58 pm | विलासराव
पॉँडेचरीला एका पार्कमधे टॉय ट्रेनमधे बसायला गेलो तर कोणीच पैसेजर नव्हते. तिथे २ रूपये तिकीट होते. तिथला मनुष्य म्हणाला २० तिकीट घ्या गाड़ी सोडतो. मग ४० रूपयात गाडी बुक केली तेवढ्यात एक मायलेक् आले.मी बुक केली असल्याने मला विचारले व मला ४ रुपये द्यायला सांगितले. मी त्यांना फ्री राइड दिली.
ही गोष्ट आहे जुलै २०१३ ची.
26 May 2015 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा
फ़ोटो मस्स्स्सस्त
26 May 2015 - 12:38 am | मधुरा देशपांडे
नेहमीप्रमाणेच आवडले.
26 May 2015 - 2:02 am | रेवती
आईग्ग्ग्ग! साड्या! मस्त आहेत. तमिळनाडूत हे एक होतं. आपल्या आधीच्या साड्यांपेक्षा कै च्या कै सुंदर साड्या बघायला मिळतात. तमिळनाडूतच रहावं असं वाटायला लागतं. माझी जाऊ मद्रासेत राहते व अगदी तिथल्यासारख्या डोळ्याचे पारणे फेडतील अशा साड्या नेसते. आपण पोथी, नल्ली, सर्वाणा बघत बसतो आणि तिथल्या लोकांची वेगळीच दुकाने ठरलेली असतात. टी नगरात खरेदी केली तर म्हणतात यापेक्षा अण्णा नगरात का नाही केली? आणि अण्णा नगरात केली तर यापेक्षा टी नगरत अमूक एक मस्त मिळते. इथे आपल्यापाशी सगळा मिळून पाव दिवस खरेदीसाठी असतो.
बाकी ती टॉय ट्रेन पाहिल्यावर लगेच जाऊन बसावेसे वाटले.
26 May 2015 - 4:44 am | श्रीरंग_जोशी
लाजवाब झालाय हा भाग. साडीखरेदी अनुभवकथन व ट्रेन राइडचे वर्णन दोन्ही आवडलं.
विलासराव - २०१३ सालात भारतात कुठे हलणार्या वस्तूचं ₹२ तिकिट असू शकतं हे पचवायला खूपच कठीण जातय.
अवांतर - मिनि ट्रेनला बहुतेक वे़ळी टॉय ट्रेन असे संबोधले जाते असे निरीक्षण आहे. टॉय ट्रेन्स उद्यानांमध्ये किंवा जत्रेमध्ये असतात.
26 May 2015 - 7:38 am | विलासराव
पौंडेचेरीला बॉटेनिकल गार्डन आहे.
तिथे २ रूपये टॉय ट्रेन आणि छोटे मत्स्यालय् तिकीट ५ रूपये होते जुलै २०१३ ला.
अगदी खात्रीने.
अवांतर,
तिथेच अरविंदो आश्रमात सकाळचा नाष्टा ,दुपारचे आणि रात्रीचे जेवण हे सगळे मिळून फ़क्त २० रूपयात मिळते. चकाचक डबलबेड रुम दिवसाला १५० रुपये.
जेवनात दुध दही फळे यांचा समावेष असतो. ब्राउन ब्रेड तिथेच तयार होतो. आश्रमाच्या गायी आहेत त्यामुळे एकदम शुद्ध दूध.
कोणीही जाऊन राहु शकतो.
श्रीरंग हे सर्व २०१३ ला हे पचते का बघा?
26 May 2015 - 7:45 am | श्रीरंग_जोशी
मी वर लिहिलेले वाक्य म्हणजे आश्चर्याचा सुखद धक्का बसल्यानंतरचे उद्गार होते.
गेल्या काही वर्षांत मी उत्तर भारतात फिरलोय त्या सर्व ठिकाणी व आपल्या महाराष्ट्रातही स्वस्ताईची अशी उदाहरणे कधीच दिसली नाही. म्हणून असे काही प्रथमच वाचले की पचवून घ्यायला कठीण जाते.
महाराष्ट्रात शेगावच्या मंदिर परिसराबाबतही लोकांकडून असेच काहीसे ऐकले आहे पण बहुधा इतक्याही कमी किमती नसाव्यात.
26 May 2015 - 9:10 am | विलासराव
शेगावला १०/१५ रूपयामधे चांगल्या प्रतीचा नाष्ता, लस्सी, ज्यूस मिळतो.
जेवण ४०/५० रूपये पोटभर.
आनंदसागरला टॉय ट्रेन आहे . मला आठवते त्याप्रमाणे २०१२ ला
१० रूपये टिकिट होते.
जबलपुर ते गौरीघाट तिकीट २०१२ ला २ रूपये होते.
जयपुरला सायकलरीक्षा वाले २ रूपये घेतात जर खरेदिला जायचे असेल तर कारण जार आपन खरेदी केलि तर त्यांना कमीशन मिळते.
आज इतनाही!!!
26 May 2015 - 5:33 am | कंजूस
अवांतर आहे परंतू हे खरे आहे-
आमच्या येथील बागेतल्या लहान मुलांच्या ट्रेनचे तिकीट एवढेच आहे.
१)काही पालक पाच तिकीटे घेतात पाच राइडससाठी.
२)काही नगरपालिकेत काम करणारे कर्मचारी ही तिकिटे त्यांच्या कार्यालयातून "फुकट"(complimentery) मिळतात ती आणतात.
उटिच्या मिनीट्रेनचे एंजिन गाडी वरती चढतांना मागे ढकलण्यासाठी लावतात का?
26 May 2015 - 9:24 am | सिरुसेरि
या मालिकेतील सर्व लेख व प्रतिसाद खुप माहितीपुर्ण व उपयुक्त वाटले . एक लक्षात आले की - नोकरी , व्यवसाय व पर्यटन या निमित्ताने बरीच मराठी माणसे दिर्घ , मध्यम किंवा कमी कालावधीसाठी तामिळनाडुमध्ये (चेन्नई , कोइंबतुर व इतर ठिकाणी) राहायला आहेत किंवा जाउन येउन असतात . परंतु या सर्वांना एकत्र जोडु शकेल असा एखादा फोरम / इंटरनेट बेस्ड ग्रुप (फेसबुकवर ) जसा की 'मराठी पिपल इन तामिळनाडु' उपलब्ध असायला हवा होता . त्यामुळे ही मंडळी एकमेकांना महत्वाची माहिती ,उपयुक्त सुचना , मदत ,चर्चा-विचार यांची देवाणघेवाण नेटवर तसेच त्यांच्या सोयीने प्रत्यक्ष भेटुन करु शकतील . ज्याचा सर्वांनाच फायदा होइल .
26 May 2015 - 10:13 am | मदनबाण
हा भाग "खरेदी स्पेशल " झाला आहे ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;) :-Ellie Goulding
26 May 2015 - 10:27 am | टवाळ कार्टा
मला साड्यांमधले शष्प काही समजत नै पण तिसर्या फोटोतली साडी भन्नाट आवडलेली आहे...टकी भेटल्यावर अश्शीच्च साडी घेणार तिच्यासाठी ;)
26 May 2015 - 10:59 am | आदूबाळ
+१ हो हो मलापण तीच साडी आवडली.
【पण टकीसाठी नै घेणार ;)】
26 May 2015 - 11:10 am | मदनबाण
भरजरी किंवा रंगीबेरंगी साड्या तर सुंदर असतातच पण, गोल्डन बॉर्डरच्या व्हाईट साड्या पण जबरी दिसतात... अगदी "टिपीकल साउथ स्प्येश्यालिटी"... आता यासाठी काय उदा. देउ बर ?
ह्म्म.....
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding
26 May 2015 - 3:57 pm | सूड
पांढरा आणि सोनेरी रंगाचं कॉम्बिनेशन कुठेही सुरेख दिसतं, सात्विक वाटतं.
26 May 2015 - 5:58 pm | रेवती
किती ते साधे उदाहरण म्हणाय्चे!
26 May 2015 - 11:56 am | पिलीयन रायडर
आयला!! चक्क जुळली रे आपली आवड!
हीच्च ती साडी!!
29 May 2015 - 11:41 am | सविता००१
सेट सारी आहे. तिकडे सगळ्या शुभकार्यांमध्ये आणि लग्नात मस्ट.
आणि अशा साडीची रेंज ३००/- पासून ५००००/- पर्यंत असते असं माझ्या सौधेंडिअन मैत्रीणीने सांगितलं.
26 May 2015 - 11:17 am | मितान
पिरा, खूप छान !!
सगळे भाग आवडले. 'निवांतपणा' हे तुझ्या प्रवासाचे वैशिष्ट्य दिसतेय :)
26 May 2015 - 12:09 pm | पैसा
जबरदस्त लिहिते आहेस!
26 May 2015 - 12:24 pm | पलाश
या लेखनशैलीत कितीही भाग लिहिलेस तरी आवडतील. शैली अगदी खास.
साड्या खरेदी आणि सर्वच फोटो छान.
26 May 2015 - 12:29 pm | सिरुसेरि
गोल्डन बॉर्डरच्या व्हाईट साड्या - त्यांना 'केरळ सिल्क' म्हणतात . असिन सुद्धा मुळची केरळचीच आहे .
26 May 2015 - 12:35 pm | मदनबाण
ओक्के... समजले ! :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;):- Ellie Goulding
26 May 2015 - 5:26 pm | रायनची आई
पिरा..काय लिहितेस ग..अगदी मी स्वतः तिकडे जाऊन फिरतेय असा भास झाला. साडयान्चे आणि ट्रेन चे फोटो बघून तर डोळे निवले..
26 May 2015 - 6:21 pm | सानिकास्वप्निल
मस्तं वर्णन आणि साड्या हा जिव्हाळ्याचा विषय.. २ नंबरची साडी खूप आवडली :)
29 May 2015 - 11:31 pm | सांगलीचा भडंग
मस्त प्रवास आणि खरेदी पण साडी खरेदी चे तर वर्णन भारी . एका ट्रेनिंग साठी चेन्नइ ला गेलो असताना साडी खरेदी करण्याचा योग आला होता . तो अनुभव आठवला . फारसे काही कळत नसताना तास भर गेला होता .नल्ली सिल्क का असे काय तर दुकान होते ती नगर चेन्नई ला . आणि त्याच रोड वर दागिने ची काय दुकाने बघून तर फुल मजा येते .एकदम मजबूत दागिने. माझा एक मित्र होता सौथवाला तो तर म्हणत होता महाराष्ट्र मध्ये एकदम छोटे आणि मोजके दागिने असतात.