सफर तामिळनाडुची! - रामेश्वरम (भाग २)

पिलीयन रायडर's picture
पिलीयन रायडर in भटकंती
22 May 2015 - 5:08 pm

भाग १

शनिवारी संध्याकाळी आम्ही मदुराईला पोहोचलो.. वातावरण ढगाळ होतं.. थोडा थोडा पाऊसही चालु होता...आणि धनुषकोडीला जाऊन सुर्योदय पहायचं स्वप्नं त्या पावसात केव्हाचं वाहुन जाऊन एव्हाना रामेश्वराच्या चरणी पोहोचलं होतं.. आता मात्र पुढंच कसं करावं ह्याचा विचारही करवत नव्हता..

नवरा आधीच इथे एकदा येऊन गेल्याने त्याला मदुराई आणि रामेश्वरमची माहिती होती.. मागच्या वेळेस तो जिथे राहिला त्या "कावेरी महल" मध्ये जायचं होतं.. एकतर आमचा मदुराई की रामेश्वरमला मुक्काम हेच डळमळीत असल्याने आणि नवरोबांना आपण सोडुन जग्गात कुण्णी कुण्णी म्हणुन कावेरी महलला जाणार नाही ह्याची खात्री असल्याने बुकींग केलं नव्हतंच.. रिक्षात बॅगा टाकुन मी आणि नवरा साबांना घेऊन पुढे गेलो.. आमचं नशिब थोर असल्याने कावेरी महल फुल्ल होतं! मग पुढचा अर्धा तास "मदुराई की गलियोंमे" फिरण्यात गेला. अखेरीस पुढच्याच गल्लीत "हॉटेल एम्पी" सापडले..

वास्तविक आम्ही काही फाइव्ह स्टार वगैरे हॉटेल शोधत नव्हतो.. ना आमच्याकडे वर तोंड करुन बोलायला कुठलं बुकींग होतं.. पण तरीही... "हॉटेल एम्पी" हे सात भिकार हॉटेल आहे हे मी सगळीकडे नोंदवुन ठेवते.. रया गेलेल्या रुम्स.. मोठे मोठे पण टणक गाद्यांचे बेड्स.. त्यावर कळकट बेडशीट्स.. अंघोळीला गार पाणी.. स्लो सर्व्हिस..आणि त्यामानानी रुमचे भाडे मात्र दणकट इ. अनेक मुद्दे होते.. पण नाविलाज को क्या विलाज...

पुढचे दोन दिवस वातावरण तसेही पावसाळी असणार होते.. दिराला फक्त रविवारी येणे जमणार असल्याने दुसर्‍याच दिवशी सकाळी उठुन ७ च्या पॅसेंजरने रामेश्वरमला जायचे ठरले आणि मंडळींनी ताणुन दिली..

झोपा मस्तच झाल्या असणार कारण उठलो तेव्हा ६.१५ होऊन गेले होते!! ५ माणसांना अंघोळी करुन स्टेशनवर न्यायचे होते.. बाहेर दणादण पाऊस!! धावपळ करत, कुर्मगतीने चालणार्‍या आणि १ किमी साठी ५०/- घेणार्‍या थुत्तरछाप रिक्षातुन स्टेशनवर गेलो.. मी, साबु, साबा नी अबीर कडेवर असे पळत होतो.. दिर न नवरा तिकीट आणि नाश्ता ह्यांच्या भानगडीत होते.. जागोजागी हजारो पाट्या होत्या.. पण प्लॅट्फॉर्म नबंरची पाटीच नाही.. तिथे एका पोलीसाला विचारल्यावर त्याने पलीकडच्या फलाटाकडे बोट दाखवले.. आम्ही रेल्वे ट्रॅक तसाच ओलांडुन पलीकडे गेलो.. आणि आमच्या डोळ्या देखत रामेश्वरमची पॅसेंजर त्याच्याही पलीकडच्या फलाटावरुन हलली!!!

तामिळनाडु... तिथली लोकं.. त्यांचा पाट्या न लावण्याचा मुर्खपणा.. तो पोलीस.. आणि आपण स्वतः सोडुन बाकी इतर अशा समस्त जनांना शुद्ध मराठीत आणि "स्वर टिपेचा" लावुन शिव्या घातल्या.. चुकांचं खापर वरील सर्वांवर फोडलं.. आणि मंडळी आक्खं मदुराई रेल्वे स्टेशन डोक्यावर घेऊन मगच स्टेशनबाहेर पडली..

भरपुर शोधाशोध करुन, मदुराईच्या चक्रम लोकांशी हुज्जत घालुन शेवटी एका रिक्षात बसलो आणी जगाच्या दुसर्‍या टोकाला असणार्‍या बस स्टॅण्डला गेलो. मदुराईत म्हणे ५ बस स्टॅण्ड आहेत. प्रत्येक स्टॅण्ड वरुन विशिष्ट गावच्याच गाड्या सुटतात. आमचं नशीब अजुन जोरात असतं तर ते पाचही स्टॅण्ड फिरुन शेवटी आम्ही इष्ट स्थळी पोहोचलो असतो.. पण दुर्दैवानी पहिल्याच फट्क्यात योग्य ठिकाणी नेऊन सोडलं बाबा रिक्षामालकांनी!!

८ ची गाडी.. २.३०-३ तासात रामेश्वरम.. म्हण्जे ११ ला जरी पोहोचलो तरी अजुन एक मज्जा अशी होती की रामेश्वराचं मंदिर दुपारी १२ ला बंद होतं म्हणे.. म्हण्जे एका तासात पळत जाऊन ते मंदिर पाहुन बाहेर येणं आवश्यक होतं... आता जे होईल ते होईल असं म्हणुन निघालो.. रस्ता छान होता.. ढणाढणा गाणी वाजत होती.. पण त्याचंही काही वाटु नये इतकं छान वातावरण होतं.. पाऊस नव्हता पण कडक ऊनही नाही.. आल्हाददायक अगदी.. छोट्या छोट्या गावांमधुन बस जात होती. तामिळनाडु मधले वर्ल्ड फेमस फ्लेक्स जागोजागी झळकत होते! कशाबद्द्ल फ्लेक्स लावलाय हे कळत नव्हतं पण डेंजर फोटो होते एकदम..

टुमदार गावांमधुन जाताना आता समुद्राचा खारा वास यायला लागला.. कधी एकदा ही बस थांबते आणि पळत जाऊन समुद्र बघते असं झालं.. रामेश्वरममध्ये शिरताना हा पंबन ब्रिज लागतो.

Pamban

पंबन ब्रिज भारतातला पहिला आणि सर्वात मोठा (आता बांधलेला वरळी सी लिंक सोडला तर!) समुद्रात बांधलेला ब्रिज आहे.
मोठ्या जहाजांसाठी हा ब्रिज वर उचलल्या जाऊ शकतो.

आता आलंच रामेश्वरम म्हणता म्हणता ११ ला पोहोचलो.. ही बस सोडते तिथुन लगेच ५/- मध्ये दुसरी बस पार मंदिराच्या दारात सोडते. पळत पळत मंदिर गाठले तर कळाले की मंदिर १२-३ नाही तर १-३ बंद असते.. आधी तर हे ऐकुन बरं वाटलं.. पण आत शिरल्यावरचा भुलभुलैय्या पाहुन १ पर्यंत तरी तो रामेश्वर दिसेल का अशी शंका वाटु लागली...

RMM Temple

* आंतरजालावरुन साभार

हे एक भव्य मंदिर आहे.. वरच्या फोटोत दाखवल्या प्रमाणे सर्वात मोठा कॉरिडॉर(?) असणारे हे मंदिर आहे. १२ ज्योतिर्लिंग आणि चार धामांपैकी एक असे हे मंदिर आहे सुद्धा तितकेच सुंदर! आत जायला दोन प्रवेशद्वार आहेत. ह्या मंदिरात रामेश्वराचे मंदिर तर आहेच, शिवाय पार्वतीमातेचेही एक मंदीर आहे. आत गेल्यावर २२ पवित्र विहिरींमध्ये डुबक्या मारायच्या आणि तशाच ओलेत्या अंगाने मुख्य मंदिरात जायचे. आम्ही काही ते केलं नाही.. हे मंदिरातले एक मोठे कुंड..

Kunda

रामेश्वरममध्ये रामायणातल्या प्रत्येक कॅरेक्टरच्या नावाने कुंड आहे.. राम, लक्ष्मण, सीता.. अगदी जटायु सुद्धा.. मला अजिबात नावं लक्षात नाहीत. पण तिथल्या एखाद्या रिक्षावाल्यासोबत डिल केलं की तो १ दिवसात सगळं फिरवुन आणतो.. मी जर काही नावं खाली वर केली तर समजुन घ्या.

इतक्या धावपळीनंतर जेव्हा आपण फक्त तेलाच्या दिव्यांच्या प्रकाशात रामेश्वराला चालु असलेला अभिषेक आणि आरती पहातो तेव्हा सगळी दगदग विसरायला होते! तामिळनाडुच हे एक आहे. माझ्या सारखे देवावर विश्वास न ठेवणारे लोकही इथली मंदिरं पाहुन भारावुन जात असावेत.. एक तर भव्यता.. स्वच्छता.. आणि सर्वात सुंदर म्हणजे केवळ दिव्यांच्या प्रकाशात दिसणारा देव! ज्या कुणी अनाम कलाकारांनी ही मंदिरं घडवायला जीव ओतला असेल त्यांना मनोमन दंडवत घातला!

दर्शन झालं.. नॉर्मली लोक मग नाहेर पडतात आणि पुढच्या रस्त्याला लागतात.. पण अर्थातच तसे काही आमचे योग नव्हते.. आमच्या समोर लाईन मध्ये लागलेला दिर आणि नवरा अर्धा तास झाला तरी येईनात म्हणुन शेवटी पुढच्या मंदिरात असतील अशा विचाराने आम्ही पार्वतीच्या मंदिरात गेलो.. मग अजुन पुढच्या... करत करत संपलं सगळं पाहुन.. तरी हे बंधु गायब.. भुकेनी आता उपस्थिती जाणवुन द्यायला सुरवात केली होतीच.. साबांचा पारा भयंकर चढला होता.. पार अगदी मंदिरा बाहेर जाउन शोधुन आलो.. आधी मनाला भावलेली मंदिराची भव्यता आता डोक्यात जाउ लागली..!! सरते शेवटी जोडगळी डुलत डुलत येताना दिसली.. "दिसला नाहीत.. म्हणलं असालच इथे कुठेतरी..." असं थंड आवाजात बंधु "काय मग कसं काय?" च्या चालीत बोलले.. बर थंड अशासाठी की भिजुन आले होते.. म्हणजे कुठल्या तरी कुंडात डुबक्या मारत बसले असणार.. वर "आता काही बोलु नका.. आम्ही चुकलो बिकलो असलो तरी कुंडात डुबकी मारली आहे.. त्यामुळे सगळे हिशोब निल आहेत.." हे म्हणुन आम्हालाच गप्प केलं..

मग हे सगळं बारदान घेऊन जेवणाची शोधाशोध केली.. मंदिराबाहेरच ७०-८०/- मध्ये उत्तम थाळी (म्हण्जे भात + सांबार + इतर क्षुद्र पदार्थ) पोळी बिळी मागायची नाही. केळीच्या पानावर दणादणा भात वाढत रहातात.. आणि आजुबाजुला पाहुन आपण गोळे करुन हाणत रहायचं असा कार्यक्रम असतो..! आमच्या मते आम्ही १ क्विंटल भात संपवल्यावर जेव्हा हात वर केले तेव्हा वेटरच्या मते आम्ही जेवलोच नव्हतो..!

आता मात्र वेध लागले होते "धनुषकोडी"चे.. तसल्या वातावरणात सुर्योदय काही बघायला मिळणार नव्हताच.. पण किमान जास्तीत जास्त वेळ तिथे घालवायला मिळावा म्हणुन आम्ही धडपडत होतो.. रामेश्वरम मध्ये ५ जण बसतील अशा मोठ्या रिक्षा असतात. त्या ४००-५००/- मध्ये महत्वाची ठिकाणं दाखवुन आणतात. असाच एक रिक्षावाला आम्ही पकडला. त्याला म्हणलं आधी "धनुषकोडी".. मग वेळ उरला तर बाकीचं... पण "उरलेलं बाकीचं" बद्दल सांगायला मला काही मुळात लक्षातच नाहीये त्यामुळे रामेश्वरम मधल्या काही मह्त्वाच्या जागांचे फोटो देऊन ठेवते.

कोदंडधारी रामाचे मंदिर

Ram Temple

हनुमान मंदिर

Hanuman

हे काय होतं ते मला कळलं नाही

1

गुगलमध्ये जे बिभीषण मंदिर म्हणुन दिसते ते मंदिर. धनुषकोडीला जाताना मध्येच एक रस्ता डावीकडे जातो. त्या रस्त्याचा शेवट म्हणजे हे मंदिर आहे.

1

2

धनुषकोडी बीच वरील मंदिर

1

1

1

धनुषकोडीला जायची गंमत अशी आहे की ह्या रिक्षा तुम्हाला फक्त धनुषकोडी बीच पर्यंत नेतात. पण तो काही भारताचा शेवट नव्हे. तिथुन पुढे ३ किमी वर साधारण पणे भारताचे शेवटचे टोक आहे. पण तिथे रस्ता जात नाही. तिथे जायला मिनीबस सारख्या गाड्या आहेत. दुसरा काहिही पर्याय नसल्याने काहीच्या काही पैसे मागतात. (साधारण १००-२००/- माणशी) त्यांना एका ट्रिपचे जे काही पैसे अपेक्षित असतील तेवढे मिळाल्याशिवाय गाडी हलत नाही.

1

परत आभाळ भरुन यायला लागलं होतं.. आम्ही थोडेच लोक होतो.. त्यामुळे माणशी जास्त पैसे दिले तर गाडी हलेल म्हणे.
न देउन सांगतोय कुणाला...! नक्की आहे तरी काय पुढे ह्याची उत्सुकता घेऊन त्या गाडीत बसलो...

धनुषकोडी

1

* आंतरजालावरुन साभार

धनुषकोडी हे भारताचे एक टोक आहे. पण केवळ तितकेच नाही.. पुर्वी इथे एक रेल्वे स्टेशनही होते. छोटेसे गाव होते. वस्ती होती.. १९६४ साली.. २२ डिसेंबरला आलेल्या एका मोठ्या चक्रीवादळात हे गाव वाहुन गेले.. नुसतेच गाव नाही तर पंबन वरुन आलेली पॅसेंजर.. आतील ११० प्रवासी आणि ५ कर्मचार्‍यां सकट एका मोठ्या लाटेने ओढुन नेली.. ह्या वादळात पंबन ब्रिजचेही नुकसान झाले.. त्यानंतर हे गाव "घोस्ट टाऊन" म्हणुन ओळखले जाऊ लागले. आता इथे कुणाचीही वस्ती नाही.. फक्त मासेमारांच्या तुरळक झोपड्या दिसतात..

जशी गाडी डांबरी रस्ता सोडुन रेतीमध्ये घुसली तसं समजलं की का हे लोक इतके पैसे घेत आहेत.. रेतीमध्ये गाडी वेड्यासारखे हेलकावे खात होती. आधीच्या ज्या गाड्या गेल्या होत्या त्यांच्या टायर प्रिंटवरुनच गाडी न्यायची.. क्षणोक्षणी वाटत होतं की आता ही गाडी उलटणार.. पण ड्रायव्हर अण्णा एकदम निवांत होते.. इनके खुन मे रजनीकांत दौडता होगा!

2

3

आजुबाजुला फक्त समुद्री वनस्पती.. पक्षी.. लाटांच्या पाण्यानी झालेला फेस.. आणि आता हा शेवट आलाच म्हणता म्हणता दिसत रहाणारे जमिनीचे तुकडे..

4

5

6

जागोजागी धनुषकोडीमधले भग्नावषेश दिसत रहातात. इथेले रेल्वे स्टेशन.. चर्च इ. इमारतींचे हे अवषेश..

7

8

9

10

11

12

धनुषकोडीमध्ये म्हणलं तर बघायला काहीही नाही.. ना चमचमती रेती.. ना स्वच्छ समुद्र.. ना नितळ पाणी.. ना हिरवीगार झाडी.. ना डोळे दिपतील अशा वास्तु... एक वेगळंच वातावरण आहे तिथे... अशा काहीही नसलेल्या ठिकाणी सुद्धा लोकांच्या झोपड्या आहेत..

13

मऊ मऊ रेतीत चालावं म्हणलं तर सर्वत्र पसरलेली काटेरी झाडी आहेत..

14

15

आणि तरीही... इथुन जाऊच नये असं वाटावं असं काहीतरी तिथे आहे... एक चिरंतन शांतता इथे रहात असावी... त्या चक्रीवादळापुर्वी ह्या जागेत किती मानवी भाव भावना नांदल्या असतील.. किती आवाज ह्या समुद्राने ऐकले असतील.. लहान मुलाच खिदळणं असेल किंवा निरोपाचे हुंदके असतील.. बांगड्यांची नाजुक किणकिण असेल किंवा रेल्वेची कर्कश्श शिट्टी असेल... काहीच किलोमीटरवर असलेल्या रामेश्वरम सारखी लगबग इथेही होत असेल.. ही लगबग पोटात घेऊन गाडी झुक्झुक करत येत असेल...

आणि अचानक... एक लाट... हे सगळं पोटात घेउन गेली असेल...
..केवळ माणसं किंवा रेल्वेच नाही... तर इथला आवाज... इथल्या भावभावना... सगळंच...

मागे आक्रंदायलाही कुणी शिल्लक राहिलं नाही... एका क्षणात सगळं शांत....

16

पण तरीही ही स्मशान शांतता नाही... ह्या नीरव वातावरणाला कोणताही भावच नाही... सगळं बोलणं.. वाटणं.. समजणं... जिथे संपुन जातं.. आणि मग जे उरतं.. ते...

.....काहीच नसलेपण....

17

.... फक्त.... शांssतता....

क्रमशः

प्रतिक्रिया

पाटील हो's picture

22 May 2015 - 5:15 pm | पाटील हो

फोटो छान आलेत .
आता वाचतो

टवाळ कार्टा's picture

22 May 2015 - 5:23 pm | टवाळ कार्टा

मस्त

मधुरा देशपांडे's picture

22 May 2015 - 5:24 pm | मधुरा देशपांडे

काय छान लिहिलं आहेस. धनुषकोडीचे वर्णन तर अंगावर काटा आणणारे.

मोदक's picture

22 May 2015 - 5:26 pm | मोदक

वाचतोय..!!

जिन्गल बेल's picture

22 May 2015 - 5:26 pm | जिन्गल बेल

..

काळा पहाड's picture

22 May 2015 - 5:30 pm | काळा पहाड

झक्कास लेख. तुमची रेल्वे चुकली तिथपर्यंत वाचली पण लेख कॉरिडॉर एवढाच मोठा असल्याने आता घरी जावून आरामात वाचेन. बाकी फोटो (विशेषतः ब्रिजचा) क्लास आहेत.

लॉरी टांगटूंगकर's picture

22 May 2015 - 5:30 pm | लॉरी टांगटूंगकर

भारीच!

सौंदाळा's picture

22 May 2015 - 5:32 pm | सौंदाळा

कडक
फोटो मस्त

ज्या लेखनाची व फोटूची वाट बघत होते ते लगेच दुसर्‍या भागातच येईल अशी अपेक्षा नव्हती. वाचून मस्त वाटले.
याची दोन कारणे. एक, डॉ. कलाम यांच्या अग्नीपंख या पुस्तकात वाचलेला पंबन पूल, धनुष्कोडी वगैरे नावांशी आपण जोडले जातो. हा लेख पाहून आजच अग्नीपंख पुन्हा कितव्यांदातरी वाचायला घेते. दुसरे म्हणजे, अचानक हाती लागलेला तमिळ शिनेमा, ज्याचे नाव योग्य रितीने म्हणतीये की नाही हे माहित नाही पण 'कन्नतिल मुथमित्तल' असे काहीसे असावे. त्याची कथा आवडली व सगळा सिनेमा दोनदा सबटायटल्स मध्ये वाचला/पाहिला. त्या शिनेमात तुझ्या फोटूमध्ये आहेत ती ठिकाणे आहेत. तू शेवटी केलेले वर्णन आणि चित्रपटातील काही सीन्स यांचा संबंध थेट नसला तरी नक्की काय आहे हे चित्रपट पाहूनच समजेल.
या मालिकेचे पुढील भाग वाचीनच पण माझ्यासाठी तमिळनाडू पाहणे इथेच संपलेय.
तुम्ही शेवटच्या गाडीचे जादा पैसे भरून का होईना जाऊन आलात व ते फोटू इथे टाकलेस याबद्दल भरपूर आभार.

पिलीयन रायडर's picture

22 May 2015 - 5:41 pm | पिलीयन रायडर

या मालिकेचे पुढील भाग वाचीनच पण माझ्यासाठी तमिळनाडू पाहणे इथेच संपलेय.

नाय नाय नाय रेवाक्का!!! तामिळनाडु अजुन लय भारी हाय...
ये तो सिर्फ शुरवात है!!

आणि झालंच तर ह्यात तंजावर आणि महाबलीपुरम तर नाहीचेत!! ते आणखीन वेगळंच ;)

प्रीत-मोहर's picture

22 May 2015 - 8:48 pm | प्रीत-मोहर

येस पिरे. महाबलीपुरम!!! मी प्रेमात पडलीये महाबलीपुरमच्या.

आधी चेन्नै ला रहायच म्हणुन नाक मुरडत रहायला गेले होते. तिथुन परतताना चेन्नै/ तमिलनाडुच्या प्रेमात पडले होते.

हा भागही उत्तम झालाय

तुषार काळभोर's picture

22 May 2015 - 5:36 pm | तुषार काळभोर

फोटो बरोबरचं वर्णन एकदम मस्त.

झकासराव's picture

22 May 2015 - 5:38 pm | झकासराव

फोटो तर छान आहेतच पण लेखनशैलीही उत्तम. :)

वाह काय सुंदर लिहिलयेस. मी सकाळच्या घाईत पण नीट वाचुन काढला अख्खा भाग. फोटो पण मस्त च.

राही's picture

22 May 2015 - 6:01 pm | राही

छान. आणि 'डुबकी मारल्यावर पापे निल' तर खासच.
देवळाचे खांब रंगवलेले आहेत का? मला आठवतेय त्या प्रमाणे काळेशार दगडी खांब होते. आणि आत गाभार्‍यापर्यंत जाताना मध्ये मध्ये पाण्याचे तीन-चारतरी वाहाते उथळ बांधीव पाट होते. त्यात पाय बुडवून शुद्ध होऊन पुढे जायचे.
स्पष्ट आठवतंय की तिथे महाराष्ट्रीय ब्रह्मवृंददेखील होता आणि एकूनच कोणीही वेगवेगळ्या पूजा-अर्चनांसाठी भरीस पाडत नव्हते. गाभार्‍याच्या उंच चौथर्‍यावर उभे राहून फक्त दर्शन घ्यायचे, तिथे समोरच्या मूर्तीला खाली वाकून नमस्कार करायचा नाही असा काहीतरी प्रघात होता. आमच्यापैकी कुणीतरी अजाणता तो मोडला तेव्हा सगळे पुजारी काहीतरी भयंकर पाप घडलेय अश्या आविर्भावात आम्हांला समजवायला आले होते.
मालिका छानच चाललीय. दणकेबाज आणि फटकेबाज.

गाभार्‍याच्या उंच चौथर्‍यावर उभे राहून फक्त दर्शन घ्यायचे, तिथे समोरच्या मूर्तीला खाली वाकून नमस्कार करायचा नाही असा काहीतरी प्रघात होता.

सध्या हिंदू देवाला नमस्कार करताना मुसलमान ज्या पद्धतीनं नमाज पढतात तसा वाकून डोकं टेकून नमस्कार करतात. ही प्रथा हिंदूंनी मुसलमानांकडून उचलली की उलट?

वर्णन खूपच उत्तम उतरले आहे.

प्रसाद१९७१'s picture

22 May 2015 - 6:13 pm | प्रसाद१९७१

@ पिरा - दोन दिवस वाट बघत होतो दुसरा भाग कधी येतोय ह्याची.

आता तिसरा भाग लवकर टाका.

सविता००१'s picture

22 May 2015 - 6:23 pm | सविता००१

अफलातून लिहिते आहेस. खूप आवडलं.

छान वर्णन !! धनुष्कोडी ला नेऊन आणलंस. :)

प्रवास मालिका मस्तच .. पुभाप्र .. 'कन्नतिल मुथमित्तल' बद्दल थोडेसे -'कन्नतिल मुथमित्तल' हा मणीरत्नमच्या दहशतवाद/दहशतवादी या विषयांवर आधारीत असलेल्या चित्रपटांमधील एक गाजलेला क्लासिक चित्रपट आहे . रोजा ,बॉम्बे , दिलसे , रावण या मालिकेतला एक. एका तामिळ भारतीय कुटुंबामध्ये राहणारी अनाथ लहान मुलगी , तिला आपल्या खरया आईला भेटविण्यासाठी श्रीलंकेला ते कुटुंब घेउन जाते , व शेवटी एल टी टी मध्ये असणारया आईशी तिची भेट असे कथानक आहे . मणिरत्नम दिग्दर्शक - अभिनय - माधवन - नन्दिता दास - ए र रह्मानचे संगीत व अप्रतिम लोकेशन्स , फोटोग्राफी असे कॉम्बिनेशन एकदम जुळुन आले आहे .

अग्गा बाब्बौ...काय पिच्चर आहे तो!!!! अतिप्रचंड आवडलेला. विशेषतः कुटुंबातील दैनंदिन जीवनाचे इतके हुबेहूब आणि अप्रतिम चित्रण क्वचितच कुठे बघावयास मिळेल. अति उच्च. _/\_

'कन्नतिल मुथमित्तल' बघण्यात येईल.

किसन शिंदे's picture

22 May 2015 - 6:52 pm | किसन शिंदे

लेखन फारच आवडले, त्याबरोबर तो काॅरीडाॅरचा फोटोही कल्ला आलाय.

पिलीयन रायडर's picture

22 May 2015 - 6:53 pm | पिलीयन रायडर

अहो तो आंतरजालावरुन साभार आहे हो..!! आम्ही काढलेला सापडत नाहीये.. :(

तो आंतरजालावरचा फोटो सौरभ चटर्जी ने काढलाय. काही महिने त्याच्याबरोबर काम केल्याने त्याला व्यक्तीशः ओळखतो. अगदी अवलीया मुलगा आहे.
corridor
सौरभची फेसबूक प्रोफाईल लिंक: https://www.facebook.com/saurabhchatterje?fref=ts

रवीराज's picture

22 May 2015 - 7:15 pm | रवीराज

आवडले.

आम्ही जेव्हा रामेश्वर केले त्यावेळी त्या २२ कुंडात डुंबलो होतो, मात्र धनुषकोडी नव्हते केले.

या वर्णनाचे आणि धनुष्कोडी इथपर्यंत जशीच्या तशी आणण्याचे १००+

धमाल लिहिलं आहेस.धनुष्कोडीचं वर्णन खिन्न करणारं.पुभाप्र.

हाही भाग खूप छान. संपूर्ण सफरीची वाट पाहत आहे. पुभाप्र.

खंडेराव's picture

22 May 2015 - 9:27 pm | खंडेराव

आणि धनुष्कोडीचे वर्णनही मस्त..नक्कीच बघणार. भारतात अशा खुप कमी जागा अस्तित्वात असतील जिथे आधी माणसे रहात होती, आत्ता नाहियेत. बाकी तानाडुचे रिक्षावाले म्हणजे देशातले सगळ्यात अफाट.

पैसा's picture

22 May 2015 - 9:37 pm | पैसा

अगदी सुंदर लिहिलं आहेस.

लेखन शैली ...... केवळ अप्रिम.... तामिळनाडू सारखी...... धनुष्यकोठी बाबत पाहीले आहे टिव्ही वर..... डॅा.कलामांच्या पुस्तकाची आठवण झाली..... फोटो खुपच छान.....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

22 May 2015 - 10:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

फोटो खुप सुंदर आलेत. पुभाप्र.

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2015 - 12:08 am | अत्रुप्त आत्मा

फोटु, श्टुरी सबकुछ ए१

रुपी's picture

23 May 2015 - 1:38 am | रुपी

फारच छान लेखनशैली.
धनुषकोडीबद्दल लिहिलेलं वाचताना आणि फोटो पाहताना तुम्ही वर्णन केलीये तशीच नीरव शांतता वाटली एवढं सुंदर लिहिलं आहे.

शिवाय एकाच वेळी तिकडे पॉम्पे आणि इथे धनुषकोडीबद्दल वाचून आपण निसर्गापुढे किती क्षुद्र आहोत याची जास्तच तीव्रतेने जाणीव झाली!

बाकी तुमच्या नवर्‍याचा आणि दिरांचा किस्सा वाचून मला आमच्या घरातले राम- लक्ष्मणच आठवले. फरक इतकाच की अशा वेळी माझ्या साबा, साबु कुणाचाच पारा चढला नसता! अशी घुळघुळ न आवडण्याचं खातं फक्त माझ्याकडेच आहे! :(

एवढ्या सुंदर लिखाणात इतके ellipses मात्र खटकतात! लेखाच्या शेवटच्या भागात त्यामुळे प्रभावीपण आलं आहे, पण उर्वरीत लेखात थोडे कमी करता आले तर छान असं मला वाटतं.

बाकी ते "मदुराई की गलियोंमे" -"रतलाम की गलियोंमे" सारखं वाचायचं असं गॄहीत धरलं आहे!

श्रीरंग_जोशी's picture

23 May 2015 - 2:00 am | श्रीरंग_जोशी

पहिला भाग वाचून व्यवस्थित वातावरणनिर्मिती झाली होती.
या भागाने कहर केला आहे. बहुधा चेन्नई अन कन्याकुमारी यांच्याखेरीज इतर तामिळनाडूविषयी फारसे कधी वाचले नव्हते.

धनुषकोडीप्रमाणे अमेरिकेच्या फ्लोरिडातील चिंचोळ्या बेटांवर फिरलोय पण अधिक विशेष असे वाटत आहे.
ही प्रवासवर्णनमालिका पर्वणी बनत चालली आहे.

पुभाप्र.

धनुष्कोडीच्या रूपाने वेगळाच तामिळनाडू बघायला मिळतोय.

सिरुसेरि's picture

23 May 2015 - 2:08 pm | सिरुसेरि

चेन्नइकडुन महाबलीपुरमला जायला दोन समांतर रस्ते आहेत - ओ एम आर रोड ( जुना महाबलीपुरम रोड) व इसीआर रोड ( इस्ट कोस्ट रोड) . तिथुन पुढे डावीकडचा फाटा महाबलीपुरमला जातो तर उजवीकडचा फाटा पुड्डुचेरीला ( पोंडीचेरी) जातो . महाबलीपुरमच्या जवळच कांचीपुरम आहे जिथे श्री शंकराचार्यांचे (कांचीकोटी) हे पीठस्थान आहे.

सस्नेह's picture

23 May 2015 - 3:18 pm | सस्नेह

सुंदर ष्टैल लिहिण्याची !
महाबलीपुरम आणि कुंभकोणमच्या प्रतीक्षेत..
(१९८५ ला तमिळनाड पालथा घातलेली) स्नेहांकिता

सानिकास्वप्निल's picture

23 May 2015 - 3:20 pm | सानिकास्वप्निल

लेखन आवडले.
वाचतेय.

उमा @ मिपा's picture

23 May 2015 - 4:32 pm | उमा @ मिपा

पाऊस, गचाळ हॉटेल, गाडी चुकणे हे सगळं वाचून कसं manage केलं यांनी असं वाटू लागलेलं, त्यात अबीर सोबत. पण रामेश्वरम देवळाचं वर्णन, धनुषकोडी गावाबद्दल वाचून आधीचं सगळं विसरले. हे तुझ्या लेखनशैलीच यश! खूप आवडलं.

स्पंदना's picture

24 May 2015 - 12:23 pm | स्पंदना

सुंदर लिहीते आहेस पिरा!
एकूण धनुषकोडी म्हणजे अधुनिक पॉम्पेइ किंवा जूने माळण गाव! थकायला होतं विचार करुन!
बाकि रामेशवरम अन उपरोक्त वर्णन एकदम भारी.

पॉइंट ब्लँक's picture

24 May 2015 - 3:10 pm | पॉइंट ब्लँक

छान प्रवास वर्णन आणी फोटो. पण

धनुषकोडीमध्ये म्हणलं तर बघायला काहीही नाही.. ना चमचमती रेती.. ना स्वच्छ समुद्र.. ना नितळ पाणी..

हे फारसं पटलं नाही. सात वर्षांपुर्वी मार्च महिन्यात भेट देली होती. एकदम स्वच्छ पांढरी वाळू आणि मस्त निळे पाणी हे चित्र आजही डोक्यात फिट बसले आहे. इतका सुंदर समुद्र किनारा मी त्यानंतर पाहिला नाही.

स्नेहानिकेत's picture

25 May 2015 - 9:10 pm | स्नेहानिकेत

खुपच सुरेख लिहिले आहेस पिरा.धनुषकोडी चे वर्णन खुप भावले.
पम्बन ब्रिज च फ़ोटो जबराट आलाय.

अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम ..

खुप सुंदर प्रवासवर्णन

आर्या१२३'s picture

28 Dec 2016 - 2:42 pm | आर्या१२३

केवळ अप्रतिम! डोळे निवले हे धनुष्कोडी चे फोटो पाहून. भारताच्या एका टोकावर उभे राहण्याच काय फिलिंग येत असेल ना! कॉरिडोअर चा फोटो जबरी. आणि वर्णन तर झकासच!