माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग २ -रोम

अजया's picture
अजया in भटकंती
18 May 2015 - 11:48 pm

भाग १

व्हिसा मिळाला आणि खरेदीची एकच धांदल उडाली.थोडेसे गरम कपडे घ्यायचे प्रवासी कंपनीने सुचवले होते.कपडे,बूट अशी खरेदी,क्लिनिकला पेशंट्सची कामं आवरणं यात दहा दिवस उडून गेले. शुक्रवारी पहाटे आमचे टर्कीश एयरलाईनचे विमान अगदी वेळेवर इस्तंबुलला येऊन पोहोचले.पुढे इस्तंबुल रोम असे दोन तासानी विमान बदलून जायचे होते.विमानाबाहेर येऊन बघतो तर विमानतळावर अफाट गर्दी.पिक अवरमधलं डोंबिवली स्टेशन झालं होतं.तिथे गेटपाशी आल्यावर कळलं की पुढची फ्लाईट बेमुदत लेट आहे कारण रोमच्या टर्मिनल तीनला आग लागल्याने कालपासून रोमचा विमानतळ बंद आहे! इस्तंबुलचा विमानतळ आपल्या टी टूच्या पुढे अगदीच यस्टीस्टँड दिसत होता.त्यात गेटवर तौबा गर्दी आणि प्रचंड उकाडा.सतत इकडून तिकडे फिरणारे पांढर्‍या कपड्यातले मक्का यात्रेकरू कुठेही उभे राहून नमाज पढत होते.टर्किश डिलाईट्ची चव घेत परत एकदा आमच्या गेटवर आलो,तर गर्दी अजूनच वाढलेली.या विमानतळावर अतिशय अरूंद पॅसेजेस जायला यायला ठेवलेले आहेत्, त्यामुळे लोकांना धक्के खात यावे लागत होते.तेवढ्यात मला बसायला जागा मिळाली.म्हणून त्या सीटरूपी फळकूटावर मी बसून घेतले.तोच समोरून आमच्या ट्रीपमधली वयस्कर मंडळी आली.त्यांना उभं ठेवून आपण कसं बसणार म्हणून जागा त्याना देऊन टाकली आणि चांगल्या कामाचे फळ म्हणून एक तास उशिरा का होइना फ्लाईट जाणार म्हणून घोषणा झाली.बोर्डिंगसाठी चक्क धक्काबुक्की सुरु होती.आम्हाला सर्वांना एकदाचे बोर्डिंग पास मिळाले,विमानात जाऊन स्थानापन्न झालो.मी आणि मैत्रीण शेजारी होतो.आयल सीटवर एक अरब.विमान भरले तरी सुटत नव्हते,बर्‍याच प्रवाशांची बाचाबाची सुरू होती.मग अरब बुवाने आमच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.म्हणजे मधेमधे इंग्रजी शब्द आणि हातवारे !अरब कालपासून ताटकळला होता.त्याच्या मुलीचा फोटो आय पॅडवर दाखवला.आम्ही पण वा वा केलं?मग तो मुद्द्यावर आला! हॅजबंड युवर ना सी?
आम्ही ..ना सी!! गोइन्ग अलोन!!
त्याने अविश्वासाने हात उडवले! इटली नो गुड प्लेस मिसेस!!असं म्हणून तो फोन करायला पुढे झाला आणि त्याच्या जवळून घाण वास येतोय, तो पुढे झाला की असा शोध आमच्या नाकाला लागला! त्याच्या अगदी शेजारीच सुनिता बसली होती,तिला तो वास सहन होईना.माझ्यापर्यंंत तो वास ज रा मंद येत होता,त्यामुळे मी खिदळायला सुरुवात केलीच होती तोवर त्याने त्याचे बूट काढले आणि जो काही मोज्यांचा वास आलाय म्हणून सांगू,बेशुद्ध माणसाला जागं करणारा वास तो.आता हा बाबा कधी उठतो असं झालं होतं.त्यात त्याला गप्पा मारायचा भारी उत्साह आलेला.सुनिताने ती बालरोगतज्ञ असल्याचे सांगितल्यावर त्याने मुलीचा फोटो परत दाखवून काहीबाही विचारायला सुरुवात केली,तिने मग मी आलेच म्हणत पळ काढला.मग त्याचे लक्ष खिडकीतल्या माझ्याकडे गेले!! तो मी डेंटिस्ट आहे हे सांगितल्यावर दात दाखवेल या भीतीने मी,आय नो डॉक्टर ,हाऊसवाईफ असे सांगून माझी सुटका करून घेतली!!! विमान उडल्या उडल्या एयर होस्टेसकडून कोलोन फवारलेला टिश्यु घेऊन नाकाला लवून बसलो !अजून चालतेची विमान,वास हा सरेना करत!!संपले अखेर ते दोन तास आणि विमानातून अफाट पसरलेले रोम एकदम सामोरे आले! आहा रोम!!
विमानातून उतरल्यावर लगेच हॉटेलला न जाता आधी कोलोसिअम बघायचे होते.बस अगदी पंधरा मिनिट चालली असेल आणि ते समोर दिसले,आपली केशरी जादू संध्याकाळची उधळत,गेली दीड हजार वर्ष लोकांना स्तिमित करत उभे असणारे कोलोसिअम!
.(आंतरजालावरुन साभार)
इथे आम्हाला आमची गाईड फ्रँचेस्का भेटली.उशीर झाला असल्याने घाईघाईने आत घेऊन गेली. रोम जळताना फिडल वाजवत बसलेल्या सम्राट निरोच्या प्रासादासमोरच्या तळ्याची ही जागा. निरोनंतर आलेल्या फ्लावियन सम्राटांनी थोडी लोकाभिमुखता दाखवण्यासाठी हे अ‍ॅम्फीथिएटर बांधले.त्या काळात तळे बुजवून जमिन तयार करून ट्रॅव़्हेटाईन दगडात ही इमारत बांधली आहे.केशरी वर्णाच्या या दगडामुळे संपूर्ण इमारत केशरी दिसते.
बाहेर एक भिंत्,मध्ये पॅसेज आत परत एक भिंत.बाहेरच्या भिंतीची कमानींची रचना,त्या कमानीमध्ये सुंदर पुतळे ठेवलेले असायचे. आणि मग स्टेडियमसारखी पायर्‍यांची रचना.सम्राटासाठी जरा उंचावर वेगळा कक्ष्,तसाच व्हेस्टल व्हर्जिन्स आणि सिनेटच्या लोकांसाठी तळात जरा रूंद मानाच्या जागा. मधोमध अरीना.हा लॅटिन हरिना म्हणजे वाळूवरून आलेला शब्द आहे.इथे लढतीत वाहणारे रक्त शोषुन घ्यायला वाळू पसरलेली असे.त्याखाली अनेक खोल्या,बोगदे दिसतात.तळमजल्याला चार बाजूंना दारं.एका बाजुने गुन्हेगार कैदी ख्रिश्चन तर दुसर्‍या बाजुने त्यांच्याशी लढाई करण्यासाठी आणलेली हिंस्त्र जनावरं अरिनामध्ये येत. प्रेते बाजूला काढायल दुसरे दार वापरले जाई.इथेच ग्लॅडिएटर्सच्या लढती होत.सम्राटाला माणसं जिवंत किंवा मृत ठेवायचा अधिकार असे. त्या काळात पन्नास हजारच्यावर प्रेक्षक बसायची इथे व्यवस्था होती.तरीही सर्व बाजूनी असलेल्या ऐंशी दारांतून पाच मिनिटात हे थिएटर भरता किंवा रिकामे करता येत असे.
.
कोलोसिअमला फेरी मारत बाहेर परत आलो.तिथेच सम्राट कॉन्स्टान्टाईनची सुरेख कमान आहे.दुसर्‍या एका रोमन सम्राटावर विजय मिळवल्याचे प्रतिक म्हणून ही कमान बांधलेली आहे.तिच्यावर सम्राटाची स्तुति करणारे देखावे कोरलेले आहेत.या सम्राटानेच रोममध्ये प्रथम ख्रिस्चनांना त्यांचा धर्म पाळण्याची परवानगी दिली.तो मरताना त्याला बेशुद्धावस्थेत बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात आलं आणि तो आणि त्याची आई हेलेना यांना संतपद दिलं गेलं,धर्माचे सेवक म्हणून!कॉन्स्टंटाईनंतरही इतर सम्राट या कमनीखालून विजय मिरवणूका काढत असत.
.
.
कमानीच्या बाजूलाच पॅलेटाइन टेकडी आहे.इथेच रोम प्रथम वसलं म्हणून ही जास्त महत्वाची.या टेकडीवरच एका धनगराला लांडगी दोन जुळ्या बालकांना दूध पाजताना दिसली.ती बालकं धनगराने मोठी केली. अशी आख्यायिका आहे.ते भाऊ रोम्युलस आणि रीमस.पुढे रोम्युलसने रोम भरभराटीला आणले.गावचा तट बांधताना तो कायमचा राहावा म्हणून इथे रीमसचा बळी दिला गेला! या भागात नंतर अनेक सम्राटांनी महाल बांधले.त्याचे अवशेष जागोजागी दिसत राहातात. याच टेकडीसमोर पुरातन जुपिटर मंदिराचे अवशेष आता उरले आहेत.
.
.
वेळेअभावी रोमन फोरममात्र बघायचा राहून गेला.आता बस रोम शहर दाखवत हळूहळू निघाली.प्रथम लागले ते सर्कस मॅक्झिमस. इथे रथांच्या शर्यती होत.
. (चित्र आंतरजालावरून साभार.)
मग पिआझा व्हेनेत्झिया सुरु झाला.कारण या भागाची जागा व्हेनिसच्या दोजची असे.समोर भलंमोठं विक्टर एमॅन्युएलचं स्मारक दिसायला लागलं.पांढरंशुभ्र.एकावर एक चढणार्‍या पायर्‍या, त्यांच्या दोन्ही बाजूला पुतळे असणार्‍या या ठाशीव स्मारकाला रोमवासी मात्र टाईपरायटर म्हणतात! मधोमध विक्टर एम्मॅन्युएलचा मोठा पुतळा आहे.गॅरिबाल्डीने पोपची सत्ता उलथवून या जर्मन राजाला इटलीचा राजा बनवला.स्मारकाच्या दोन्ही टोकांना क्वॉड्रिगा म्हणजे पंखधारी घोड्यांचे शिल्प आहे.
.
.
या पालाझ्झो वेनेझ्झियामध्ये अनेक सुंदर इमारती आहेत.सगळ्याच राजवाड्यासारख्या दिसतात हे विशेष!तिथेच एका इमारतीबाहेर झेंडे लावलेला सज्जा आहे .इथुन मुसोलिनी भाषणे देत असे.
.
.
.
बघत परत कोलोसिअमच्या भागत आलो.कमानीच्या आवारातच स्मरणवस्तू विकणार्‍यांनी दुकानं मांडलेली आहेत. तिथेच ग्लॅडिएटरची वेशभुषा करुन फोटोसाठी हिंडणारे लोक फिरत असतात.आमच्या ग्रुपमधल्या एका पाप्याचे पितर म्हणावे अशा किरकोळ अंगयष्टीच्या काकांनी त्या बलदंड ग्लॅडिएटरच्या पोटात ते मोठ्या त्वेषाने तलवार खुपसत आहेत असा फोटो काढला आणि आमचे हसणे लपवायला आम्हाला ग्रुपपासून जरा लांब जावे लागले ;)तर तिथे अजून दोन जणी आमच्याच ग्रुपमधल्या तेच करायला आलेल्या!एकमेकींकडे नुसते पाहूनच आमच्या समान शील,व्यसनाच्या कुंडल्या त्याक्षणीच जुळल्या!! आणि पुढची ट्रिप मस्तच होणार याची नांदी सुरु झाली!

माझी इटलीची भ्रमणगाथा - भाग-३ -पॉम्पे

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

18 May 2015 - 11:59 pm | श्रीरंग_जोशी

वाह, काय ते फटू, काय ते वर्णन. खूपच छान झालंय स्थलवर्णन.

तो मी डेंटिस्ट आहे हे सांगितल्यावर दात दाखवेल या भीतीने मी,आय नो डॉक्टर ,हाऊसवाईफ असे सांगून माझी सुटका करून घेतली!!!

हहपुवा =)) .

माझ्या एका फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने बूट मोजे काढून ठेवल्याने वास येत होता. तर हवाईसुंदरीने येऊन नम्रपणे त्यास बुट पायांत घालण्याची विनंती केली.

रुपी's picture

19 May 2015 - 12:23 am | रुपी

पहिल्या भागावर प्रतिक्रिया देण्याआधीच दुसरा भाग आला! तरी पुढचे भाग एकदम वाचावेसे वाटत आहेत, इतकी लेखनशैली छान आहे.

फोटोही छानच!

राघवेंद्र's picture

19 May 2015 - 12:41 am | राघवेंद्र

खुप ओघवते प्रवासवर्णन आणि छान फोटो !!!
पु. भा. प्र.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2015 - 1:36 am | डॉ सुहास म्हात्रे

धमाल चालली आहे इतालियाची सहल ! फोटो तर मस्तच !!

पुभाप्र.

आदूबाळ's picture

19 May 2015 - 1:44 am | आदूबाळ

जबरीही! इस्तांबूल विमानतळाबद्दल सहमत. गुढघ्यात मेंदू असेल तरच तिथे नोकरीवर ठेवतात.

अदि's picture

19 May 2015 - 9:45 am | अदि

हहपुवा :D

..पण फुकट टर्किश डिलाईटमुळे इस्तन्बूल विमानपत्तनाचे सर्वकाही माफ.

रेवती's picture

19 May 2015 - 2:39 am | रेवती

वाचतिये. फोटू आवडले.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

19 May 2015 - 7:02 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मस्तं.

बाकी तुम्ही त्या अरबाला डेंटीस्ट आहात हे सांगायला हवं होतं. त्या निमित्तानी त्याच्या दातांवर चार आडवे-उभे ठो़के टाकुन "मोजीवासाचा" बदला घेता आला असता ;)

चुकलामाकला's picture

19 May 2015 - 8:01 am | चुकलामाकला

आवडेश!

प्रीत-मोहर's picture

19 May 2015 - 9:09 am | प्रीत-मोहर

धम्माल. बाकी डेंटीस्ट्बै खोटे बोल्लात ना!!आता तो अरब हा लेख वाचत असेल तर काय म्हणेल?

सस्नेह's picture

19 May 2015 - 9:13 am | सस्नेह

इटालियन पिझ्झाशी स्पर्धा करणारा खुसखुशीत इटाली-सफर-वृत्तांत !

नूतन सावंत's picture

19 May 2015 - 9:24 am | नूतन सावंत

अजय,शैली मस्त आहे तुझी.तुझ्यासोबत फिरायला मजा येतेय.बाकी प्रीमोशी सहमत.तो अरब जर हा लेख वाचत असर तर.....फोटोही सुरेखच.

कविता१९७८'s picture

19 May 2015 - 9:52 am | कविता१९७८

मस्त वर्णन, मस्त फोटो

गणेशा's picture

19 May 2015 - 10:24 am | गणेशा

छान चालु आहे भ्रमणगाथा... लिहित रहा .. वाचत आहे...

पॉइंट ब्लँक's picture

19 May 2015 - 10:25 am | पॉइंट ब्लँक

छान प्रवास वर्णन आणि मस्त फोटो.

उमा @ मिपा's picture

19 May 2015 - 10:42 am | उमा @ मिपा

प्रीमो, सुरन्गीताई... आणि ते पाप्याचे पितरवाले काका हा लेख वाचत असतील तर …
मस्त लिहितेयस अजयाताई! पुढचा भाग पटकन लिही गं.

बोका-ए-आझम's picture

19 May 2015 - 10:44 am | बोका-ए-आझम

अजयातै, आतापर्यंतची वाटचाल मस्तच!काही वर्षांपूर्वी ह्यातली काही स्थळं पाहण्याचा योग आला होता. तुमच्या लेखांमुळे पुन:प्रत्ययाचा आनंद मिळेल!

सतीश कुडतरकर's picture

19 May 2015 - 11:13 am | सतीश कुडतरकर

दुसरा धागा आला पण!

मस्त. मिपाच्या भाषेत पुभाप्र

सानिकास्वप्निल's picture

19 May 2015 - 1:50 pm | सानिकास्वप्निल

हाहाहा!! मज्जा आली वाचताना
भारी लिहिलयं, लेखनशैली मस्तं
फोटो पण सुरेख.

स्नेहल महेश's picture

19 May 2015 - 2:03 pm | स्नेहल महेश

छान प्रवास वर्णन

अत्रुप्त आत्मा's picture

19 May 2015 - 2:15 pm | अत्रुप्त आत्मा

छाण लिवलय.. मधे हु हु हु करायला लावणारं.

पियुशा's picture

19 May 2015 - 2:40 pm | पियुशा

व्वा जियो अजया जियो !!!!
आउर आन दो , बहुत बढिया लिखा है, कॉमेडि का तडका दिया है :)

Mrunalini's picture

19 May 2015 - 3:20 pm | Mrunalini

ताई...
मस्त झालाय गं हा पण भाग..
अरबाचा अनुभव भयानक... माझी तर त्या वासानीच वाट लागली असती.

स्पंदना's picture

19 May 2015 - 3:23 pm | स्पंदना

टी टू बद्दल सहमत.कसल सुन्दर आहे आपल् एअरपोर्ट आता.त्या पुढे ओस्सि एअरपोर्ट अगदी ष्टण्ड वाटतात।
बाकी पुढच सगळ रोम वर्णन वाचताना रोमांच येन्या ऐवजी काटा अला अंगावर.
येऊ दे पुढचा भाग.

सविता००१'s picture

19 May 2015 - 4:23 pm | सविता००१

खूप छान लिहिते आहेस अजया. मस्तच

अनन्न्या's picture

19 May 2015 - 4:42 pm | अनन्न्या

अगदी खिळवून ठेवलस!

मोहनराव's picture

19 May 2015 - 5:09 pm | मोहनराव

वाचतोय.. रोम म्हणजे एकच नंबर आहे बघण्यासाठी. छान वर्णन.
माझ्याकडे २००६ साली काढलेले फोटोज आहेत. इथे टाकले तर चालेल का?

अजया's picture

19 May 2015 - 8:52 pm | अजया

टाका की!

मोहनराव's picture

27 May 2015 - 1:32 am | मोहनराव

dsferrgtdgdtry

छान फोटो.विशेषतः फोरममधला.

कपिलमुनी's picture

19 May 2015 - 6:10 pm | कपिलमुनी

ईटलीची सफर छान सुरु झाली आहे.

विमानातला वासाचा त्रास :
दिल्लीहून येताना एकजण छोले भटुरे खाल्ल्याची गुप्त साक्ष दर १०-१५ मि. ने देत होता .. सर्वच प्रवासी हैराण झाले होते . इथे तर खिडकी उघडायची पन सोय नसते :(

पैसा's picture

19 May 2015 - 7:40 pm | पैसा

छान लिहिते आहेस!

प्रचेतस's picture

19 May 2015 - 8:00 pm | प्रचेतस

सुरेख भटकंती.

कॉन्स्टान्टाईनला मरताना बेशुद्धावस्थेत बाप्तिस्मा देऊन ख्रिश्चन करण्यात आलं हे माहीत नव्हतं. त्याने ख्रिस्तियन धर्म स्वीकारल्यावर युरोपात वेगाने त्याचा प्रसार झाला हे माहीत होतं पण त्यामागची वस्तुस्थिती भलतीच आहे हे तुमच्या लेखाद्वारे समजले.

चौकटराजा's picture

19 May 2015 - 8:04 pm | चौकटराजा

१ आपण कोणत्या भागात निवास केलात ? टर्मिनी, वॅटिकन की आणखी कुठे ?
२. रोम विमानतळावरून एक्स्प्रेस ने गावात गेलात की बसने ?
३.रोम मधे चालत फिरलात की कसे ? ( माझ्या भावाने १९९३ साली पुरते रोम चालत जाउन पाहिले होते )

१.आम्ही रोमच्या आयडिआ हाॅटेल रोमा झेड ३ या ईस्टर्न सबर्ब मधल्या हाॅटेलात उतरलो होतो.सिटि सेंटरपासुन १०-१२ किमी असावं.हाॅटेल्स,बस,सर्व तिकिटं ही पर्यटन संस्थेने बुक केलेली होती.त्यामुळे त्यांच्या किंमतीची माहिती नाही.साधारण ५-६०००रु दर दिवशी दर असावा.त्यात ब्रेकफास्ट समाविष्ट होता.ब्रेकफास्ट या हाॅटेलातला सगळ्यात छान होता,काॅन्टिनेन्टल असला तरी.
२.रोम विमानतळाबाहेर पर्यटन संस्थेची बस उभी होती.तीनेच सर्वत्र फिरलो.
३.सिटि सेंटरला काही अंतरावर बस थांबवावी लागते.पुढे सर्वत्र चालतच फिरावे लागते.कारण टुरिस्ट बसेसना आत बंदी आहे.हे पूर्ण इटलीत आहे.एका पार्किंग स्टाॅपवर बस उतरवुन देते.पुढे चालत बघत जायचं.

मधुरा देशपांडे's picture

19 May 2015 - 8:30 pm | मधुरा देशपांडे

दोन्ही भाग आवडले. इस्तांबुल विमानतळाबाबत सहमत. पुभाप्र.

चित्रगुप्त's picture

19 May 2015 - 10:55 pm | चित्रगुप्त

छान सुरुवात. चौकटराजांनी लिहिल्याप्रमाणे प्रवास, निवास, वाहने, म्युझियम्स आदिंच्या तिकिटांच्या किंमती, वगैरे माहितीही देत रहावी, म्हणजे पुढे कधी असा प्रवास करणारांना उपयोगी होईल.
पुभाप्र.

हा भाग पण झककास..पुभाप्र

जुइ's picture

20 May 2015 - 12:27 am | जुइ

वर्णन आणि फटू दोन्हीं आवडले!

काळा पहाड's picture

20 May 2015 - 12:37 am | काळा पहाड

रोम जळताना फिडल वाजवत बसलेल्या सम्राट निरोच्या

रोम जळताना सम्राट निरो फिडल वाजवण्याची कथा बहुधा अतिरंजित आहे. निरोनं बहुधा रोम वाचवायचे प्रयत्न केले पण ते काही त्याला जमलं नाही. निरोनं ख्रिश्चनांशी जे शत्रुत्व घेतलं होतं त्याचा परिणाम म्हणून नंतर राज्यकर्त्या ख्रिश्चनांनी ही कथा लिहिली असावी. अथवा फिडलिंग या वाक्प्रचाराचा/क्रियापदाचा परिणाम म्हणून (metaphor for his ineffectiveness) फिडल वाजवण्याची कथा आली असावी. मूळ गोष्ट अशी आहे की फिडल हे नीरोच्या काळात नव्हतंच.
http://history.howstuffworks.com/history-vs-myth/nero.htm
http://www.history.com/news/ask-history/did-nero-really-fiddle-while-rom...

तो एक रुढ झालेला वाक्प्रचार आहे.नीरो हा लोकाभिमुख सम्राट नव्हता.त्याचं त्याच्या छंदामध्ये लक्ष जास्त होतं.त्याच्या कारकिर्दीत प्रजा त्याला कंटाळलेली होती.स्वतःच्या आईचा वध करणारा,अतिशय उधळ्या अशी नीरोची प्रतिमा जनतेत होती.ख्रिश्चनांचा अतोनात छळ करणे हाही एक छंदच होता त्याचा!त्यांनी हा वाक्प्रचार रुढ केल्याची शक्यता आहेच.

छान चालु आहे सफर. अरब बाबाने मजा आणली :)

त्या बिचार्‍या रिमस ला का मारुन टाकलं? लहान असतानाच का? :(

मस्त अजया.तुझ्याबरोबर परत एकदा रोम फिरून आले.मध्य रोममघल्या या पुरातन वास्तु बघताना आपण त्या काळात वावरत आहोत असे वाटते.कलोसिअम बस मधुन लांबुन दिसल्यावर इतका काहि आनंद झाला कि बास.मग प्रत्यक्ष तिथे गेल्यावर काय बघु असे झाले होते.बाकि ती कमानीचे दुरिस्तीकाम पुर्ण झालेले दिसतेय.गेल्यावर्षी बांबुकाठ्यांचा आधार देउन काम चालु होते.

नाही दुरुस्ती सुरुच असते.म्हणूनच आंतरजालावरचा फोटो वापरलाय.मात्र आता झाकलेला भाग कमी आहे.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

21 May 2015 - 5:39 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मीना प्रभूंच्या पुस्तकात वाचले होते.पण अजया नी सांगीतलेले जास्त आपले वाटतेय..अशीच सफर घडव इटलीची..

दिपक.कुवेत's picture

25 May 2015 - 1:39 pm | दिपक.कुवेत

मजा येतेय वाचताना. तुझी लीखाणाची शैली आवडल्या गेली आहे.

मस्त वर्णन !!! आज निवांतपणे वाचले ...फोटोही सुंदर ...

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2015 - 4:25 pm | प्रभाकर पेठकर

सुंदर वर्णन.

कोलॅसियम बद्दल आख्याईका बर्‍याच आहेत. तिथे घोड्यावर बसून मारामार्‍या चालायच्या. त्यात प्रतिस्पर्ध्याचा वध केल्याशिवाय खेळ (?) संपायचा नाही असे म्हणतात. पण आमच्या गाईडने सांगितले असे कांही नव्हते. पण जखमी योद्ध्याने हार स्विकारली की खेळ थांबायचा. नंतर जिंकलेल्या (आणि कदाचित हरलेल्याही) योद्ध्याच्या जखमांमधून वाहत्या रक्ताला 'तीर्थ' म्हणून प्राशन केले जायचे. त्याने आपल्याही शरीरात विरता संचारते असे मानायचे.

कोलॅसियम पासून जवळच 'माऊथ ऑफ ट्रूथ' नांवाचा एक चार फुटी चेहरा आहे. त्याच्या तोंडात हात देऊन तुम्ही जर कांही खोटे बोललात तर तो प्राणी तुमचा हात खाऊन टाकतो अशी आख्याईका आहे. हा चेहरा 'रोमन हॉलीडेज' ह्या चित्रपटात घेतला आहे. ग्रेगरी पेक आणि ऑड्री हेबर्न ह्यांच्यावर चित्रीत केलेले एक दृश्य त्यात आहे. (म्हणूनच) पाहायला गेलो होतो. टूरिस्टांची बरीच मोठी रांग होती. पण लवकर लवकर आणि शांततेच सरकत होती. १५ मिनिटांच्या प्रतिक्षेनंतर त्या चेहर्‍यापर्यंत पोहोचलो.

श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 8:04 pm | श्रीरंग_जोशी

रोमन हॉलीडे हा चित्रपट परवाच पाहिला. आपला दिल है के मानता नही त्यावर थोडाफार बेतला आहे.

त्या कृष्णधवल चित्रपटात तेथील स्थापत्यसौंदर्याचे मनोहर दर्शन होते. रस्त्यावरील गलबलाट व काही प्रमाणात बेशिस्त पाहून अगदी आपल्यासारखे वाटते :-) .

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2015 - 10:06 pm | प्रभाकर पेठकर

१९५३ चा काळ आहे रोमन हॉलीडेचा. तसही इटली आहे सुद्धा आपल्या भारतासारखच.

अजो's picture

10 Jun 2015 - 1:23 am | अजो

छान प्रवास वर्णन

कौशिकी०२५'s picture

27 Jun 2015 - 12:20 pm | कौशिकी०२५

मस्तं सफर घडतेय इटलीची अजयाताई तुमच्यामुळे. प्रवासवर्णन असुनही अतिशय रोचक व खिळवून ठेवणारी स्टैल आहे तुमच्या लिखाणाची.

हा भागही सुरेख! पेठकरकाका म्हणताहेत तो चेहरा पाहिला की नाही?