ऐक स्वखे : त्रिधारा अंतीम भाग ७

नाखु's picture
नाखु in जनातलं, मनातलं
7 May 2015 - 10:48 am

ऐक स्वखे : त्रिधारा: भाग १
ऐक स्वखे : त्रिधारा भाग-२
ऐक स्वखे : त्रिधारा भाग-३
ऐक स्वखे त्रिधारा: भाग ४
ऐक स्वखे त्रिधारा : भाग ५
ऐक स्वखे त्रिधारा : भाग ६
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

मानसशास्त्राच्या शाखेमध्ये नव्यानेच उदयाला आलेल्या 'पॉझिटिव्ह सायकॉलॉजी' शाखेचं मर्मस्थान हेच आहे, की टोकाच्या निराशाग्रस्त मन:स्थितीत एखादी हास्याची झुळूक जादूसारखे काम करते. लगेच व्यक्तीला त्यातून बाहेर काढते असं नाही, पण निदान बाहेर पडण्याच्या अनेक पर्यायांचा विचार करण्याइतकच स्वास्थ्य लाभते.
श्रेष्ठ कवी गुलजार हेही हेच तर सांगतात,

जो होगा वह होकर रहेगा
तू कल कि फिक्र में अपनी आज कि हँसी बरबाद ना कर।
रिश्ते तो यँूही निभाने पडते ही है
क्यू ना हँसी मजाकसे इन्हे गले लगाले हम
शुभांगी पटवर्धन यांच्या २ मेच्या लोकसत्तातील लेखातून साभार

हास्यदिन विशेष

स्वखी भाग अंतीम भाग ३.

आमची बेंगलूरूची (मी बेंगलूरूच म्हणणार माझ्या कर्नाटकच आहे न्ना मगं)ट्रीप छान झाली. हे रजा संपल्याने आणि पुण्यात काही कामे असल्याने लगेच पुण्याला गेले आणि मी पुढचा आठवडा तिथेच काढला.
बेंगलरू जाण्यापूर्वी १ महिना अगोदर आणखी एक आनंदाची घटना झाली त्यामुळे थोडा सहलीच्या खर्चावर काटकसर करावी लागली पण ते चालेल अशीच ही महत्वाची बाब होती.
आमचा चिंचवडमध्येच एम आय डी सी परिसरातील ३ खोल्यांच्या फ्लॅटला (अतिरिक्त) बांधकाम करून प्रत्येकी १ रूम वाढेल असे बांधकाम करण्याचे सोसायटीने ठरवेले त्यामुळे फ्लॅट आता ७५० चौ फूटांचा आणि ४ खोल्यांचा होणार होता.शिवाय त्या निमित्ताने जुन्या टाइल्स्बदल्,स्लाईडींग खिडक्या इ काम करावयाचे ठरले.देवाच्या कृपेने पैश्याची सोय विनासायास झाली.मग मी ही सहल खर्चात काट्-छाट करून राहत्या घरातील किचन ट्रॉलीचे काम रहीत केले.(त्या फ्लॅटचे भाडे सुरू झाले की करू असे मीच यांना समजावले). सहलीला जाण्यापूर्वी माझ्या पसंतीच्या टाईल्स वगैरे निवड करून हे अतिरिक्त काम प्लंबर आदी मंडळींना सांगून आले.
मी परस्पर तिथून गावी (गोकाकला) सुट्टीसाठी जाणार होते पण पुतण्याची मुंज+भावाने शिरवळाला घेतलेल्या घरांची (गूंतवणूक म्हणून घेतलेल्या) वास्तु शांत असल्याने पुण्यात परत आले.
मुंजीच्या दिवशी यांच्या सगळ्या नातेवाईकांची भेट झाली अगदी परगावच्या मावस-आत्ते बहीणी,जाऊबाई यांची. ह्यातील बरेच जण आमच्या मुलाचे मुंजीत आले होते पण तेव्हाची भेट अगदी जुजबी आता मात्र निवांत बोलता आले.काहींना तर मी प्रथमच पाहात होते.सगळ्यांशी भेट झाली, मी इतके सफाईदार मराठी बोलते याचे त्यांना नवल वाटले."शिकविले कुणी" असे म्हणून यांनी त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला पण असे असेल तर तुम्ही कन्नड शिका म्हणून मीही उत्तर दिलेच.
घराचे बांधकामाकडे हेच लक्ष देत होते मी नेमकी "स्त्री दुखण्याचा नेहमीचा त्रास"* होतो आणि आराम म्हणून भावाकडेच एक दोन दिवसांसाठी (चिंचवडम्ध्येच) गेले.
*दरमहिन्याला "त्या" दिवसांत वेदना होतात पण थायरॉईडमुळे असे होते असेच स्त्री रोग्+प्रसूती रोग तज्ञ (डॉ.अजित जोशी)यांनी सांगीतले होते. म्हणून त्यांनी सांगीतलेली गोळी घेतली की आराम वाटत असे.
=====
डॉ जोशीनी सध्या वयोमानामुळे (वय ८०+) दवाखाना बंद केला आहे.

वास्तू अंतीम भाग ३.

स्वखी माहेरी आपल्या मुलांना घेऊन दोन दिवसांसाठी माहेरी गेली. पण दुसर्याच दिवशी दुपारी तीने नवर्याला फोन करून सांगीतले की फारच त्रास होतोय आणि नेहमी इतकाच रक्तस्त्राव होतोय. तेव्हा गेली २ वर्षे उपचार घेत असलेल्या चिंचवडमधल्याच स्त्री रोग्+प्रसूती रोग तज्ञ दाखवू.
त्या फक्त सकाळीच त्यांच्या दवाखान्यात असतात त्यामुळे त्यांच्याशी फोनवर बोलून स्वखीने गोळी मागवली.
संध्याकाळी स्वखीचा नवरा कामावरून येतानाच थेट तीच्या माहेरी गेला. आणि स्त्री डॉक्टरांचे सल्ल्याने चिंचवड स्टेशन नजीच्या रूग्णालयात घेऊन गेला.
स्त्री डॉक्टरांनी ७.३० चे सुमारास येऊन तपासणी केली व काही नाही फक्त वेद्ना शामक इंजेक्षन दिले की आराम वाटेल असे सांगीतले. आधेच्या डॉ़क्टरांकडील पूर्ण फाईलही ह्या स्त्री डॉक्टरांनी पाहिली होती.
खाली ओपीडीमध्ये इंजेशन देऊन "मी वॉर्डम्ध्ये दुसरा (प्रसूतीचा) पेशंट पाहून जाताना येतेच तो पर्यंत आराम करा" असे सांगून डॉक्टर निघून गेल्या. फारच वेदना होत आहेत आणि इंजेक्शन दिल्यावर १५-२० मिनिटांनी उलटी झाली म्हणून स्वखीच्या नवर्याने परिचारिकेकडे "डॉक्टरांना बोलवा" असा तगादा लावला पण एक तासांत आराम पडेल असे डॉक्टरांनीच सांगीतले आहे असे उत्तर मिळाले.
पाण त्यानंतर सुमारे ८.३० ते ९.०० पर्यंतही डॉक्टरांची फेरी न झाल्याने+फारच वेदना होत शेवटी त्यांना आतातरी बोलवा म्हटल्यावर त्या वॉर्डमधून कधीच गेल्या आहेत असे उत्तर मिळाले आणि नर्सला मोबाइएल वर संपर्क साधावा लागला.
"मी ओपीडी मध्ये पेशंट आहे हेच विसरले" असे उत्तर मिळाले.आणि इंजेक्शनचा परिणाम दिसायला एक्-दोन तास लागतील त्यानंतरच आराम वाटेल असे सांगून "तुम्ही एक दिवसासाठी रूग्णालयात दाखल करून घ्या असे सांगीतले.
स्वखीला रात्री १० वाजता दाखल करून तीचा नवरा परत मेहुण्यांकडे गेला तिथून स्वखी साठी दही-भात घेऊन आला. एक दोन चार घासच खाल्ले तिने. जोराची उलटी-व असह्य कळा यामुळे अंगात त्राण नव्हते. रात्रो अकराचे सुमारास डॉ़क्टरबाई त्यांचे पेशट साठी आल्यावर स्वखीला बघून गेल्या तेंव्हाही स्वखी थकलेलीच होती.आणि "काही काळजी करू नका सकाळी तुम्ही घेऊन जाऊ शकाल घरी,आत्ता मी सलाईन लावायला सांगते" असे सांगून डॉ़क्टर निघून गेल्या. स्वखीही ग्लानीने झोपली होती. स्त्री वॉर्ड असल्याने नवर्याला तिथे थांबता येणार नव्हते म्हणून तो घरी गेला आणी..

स्व अंतीम भाग ३.

सौजन्य :संदीप डांगे यांचा प्रतिसादामधून साभार
वैद्यकक्षेत्रातले सगळे डॉक्स वाईट नसतात पण सगळे वाईट डॉक्स वैद्यकक्षेत्रातच असतात हे भयानक सत्य आहे. मला कुणा ईंशुरन्स वाल्याने कापले, माझे कुणी पाकिट मारले, कुणी घरात चोरी केली, अगदी पद्धतशीर उल्लू बनवून लुबाडले तर मला जेवढे दु:ख होणार नाही त्यापेक्षा हजारो पटीने असले डॉक्स नशिबात आले की होतं. पैसे जातात त्याचं दु:ख नाही. चुकीच्या निदान/उपचारांनी जीव जातो, माणूस आयुष्यभर कुणा दुसर्‍याच्या हलगर्जीपणा, अर्धवट ज्ञान, पैशाची लालुच याचे फळ भोगत राहतो. याचं दु:ख मोठं आहे.
पैसे कितीही घ्या, पैशाचा आणि उपचाराच्या खात्रीचा काय संबंध? उपचार, निदान यांची खात्री वादातीत असावी.
वैद्यकक्षेत्रात शं भ र टक्के पारदर्शकता पाहिजेच पाहिजे

आणि रात्री ३.०० वाजता रूग्णलायातून फोन "तुमचा पेशंट व्हेंटेलेटर वर आहे ताबडतोब या"
मी मेहुण्यांना फोन करून होस्पीटल गाठले. थोड्या वेळात मेहुणेही पोहोचले. आणी उपचारांमधला उशीर, अचूक निदान करण्यात केलेली अक्षम्य दिरंगाई्+हलगर्जी यांनी स्वखीची तब्येत आणखीन ढासळली आणी शेवटी स्वतःकडून काहीही होऊ शकत नाही तेव्हा "अदित्य बिर्ला मध्ये " पेशंटला हलवा असा आग्रही सल्ला दिला गेला.
पुढील तपशील आणी संवाद लिहिण्यात आत्ता काहींच हशील नाही आणि पुन्हा मरणयातना अनुभवण्याचे धैर्य माझ्यात नाही.

अचूक निदान दिरंगाई्, जीवनावश्यक सुविधा उपकरणे नसणे (अगदी सोनोग्राफीची सुविधा नसणे) तरी तिथेच दाखल करून घेण्याचा अट्टाहास ( सरळ सरळ कट प्रॅक्टीस दिसत असूनही मी हतबल होतो) पण छत्तीस-सदतीस तास (दि ६ मे रात्री २.३० ते दि ८ मे सकाळी ७ वाजेपर्यंत) व्हेंटीलेटरवर काढून स्वखीने या जगाचा निरोप घेतला दि ८ मे २०१४.

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी

तिला विचारी राजा, "का हे जीव असे जोडावे ?
का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे ?"
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी

का राणीने मिटले डोळे दूर दूर जाताना ?
का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना ?
वार्यावरती विरून गेली एक उदास विराणी

या बरोबर बरेच प्रश्न अनुत्तरीतच राहीले.

  • ज्या हॉस्पीटलमध्ये साधी सोनोग्राफीची सुवीधा नाही तिथेच अ‍ॅड्मिट करून घ्यायचा अट्टाहास का केला, दि ८ ला त्या डॉ़क्टरबाई बिलकुल फिरकल्या नाहीत नंतरही फोनही बंद का ठेवला होता?
  • हॉस्पीटलचे मुख्य जनसंपर्क अधिकारी यांनी (पहाटे ५.०० वाजता) आम्ही पुण्यातून स्पेशालीस्ट बोलावितत आहोत असे सांगून दुपारी १२.३० वाजता मात्र “तुम्ही पेशंटला दुसरीकडे हलवा आम्ही काही करू शकत नाही” असे का सांगीतले?
  • स्वतः स्वखीही हे नेहमीच्या दुखण्यापेक्षा तीव्र दुखते आहे आणी इंजेक्शननंतर उलटी झाली आहे हे सांगूनही त्याचा वैद्यकीय तपशील्-नोंदीमध्ये उल्लेख नाही?

तोंडावर थंड पाण्याचे हबकारे मारवेत आणी त्याच्या मार्‍याने मी एका खोल विवरात जात आहे असेच वाटू लागले. सगळ्यात पहिल्यांदा माझ्या परीचा आणि दादाचा चेहरा समोर आला त्यांनी कितीही हाक मारली तरी मी कुठून आणून देणार त्यांची आई त्यांना ???????

डॉक्टरांची अक्षम्य हलगर्जीपणामूळे एक साधा सरळ संसार उध्वस्त झाला होता हेच कटू सत्य होते.पण त्याचा माझ्याकडे काहीही पुरावा नव्हता हे त्याही पेक्षा मोठे कटू वास्तव होते.

सौजन्य : पैसाताईंचा प्रतिसादामधून साभार डॉक्टर्स चांगले असतात तसे वाईट असतात. पेशंटही सर्व प्रकारचे असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती. म्हणून कोणीच कोणाला सरसकट झोडपू नये.

========================
कल्पनाशक्ती जिथे संपते तिथूनच वास्तवाची सुरुवात होते. आणी कधी कधी अदभुत आणि विदारक असते याचा पनर्प्रत्यय आला.सुरुवातीचे सहा महिने अतिशय कष्टप्रद गेले. नैसर्गीक आपत्तीची तीव्रता नंतरच्या विध्वंसखुणांवरूनच येते तसेच झालयं माझं, अजूनही त्याच्या उध्वस्तखुणा मोजत आहे घरभर !

ज़िंदगी ...
कैसी है पहेली, हाए कभी तो हंसाये
कभी ये रुलाये ज़िंदगी ...
कभी देखो मन नहीं जागे
पीछे पीछे सपनों के भागे
एक दिन सपनों का राही
चला जाए सपनों के आगे कहाँ
ज़िंदगी ...

=========================
या दरम्यान माणसांचे खरी ओळख (?) झाली.
"इतके देवधर्म करीत होती काय उपयोग झाला त्याचा ?"
पासून "खरच भाग्यवान आहे,सवाष्ण गेली,सोनं झालं" पर्यंत शेरे-ताशेरे ऐकून.
==========================================
अश्या सांत्वनोपाचारात काही निर्भेळ स्नेहीही क्षेम्-कुशल साठी भेटून गेले. सर्वश्री आत्मुदा,चौराकाका,वल्लीदा,धन्याशेठ यांनी तर समक्ष भेटून मला धीर दिला. आणि अजूनही संपर्कात असतातच. याच कालावधीत मी मिपावर जास्त सक्रीय झालो. समृद्द मिपा परिवाराचा मी एक घटक आहे याची जाणीवच एक उभारी देणारी बाब आहे

आयुष्यात सुदैवाने कुठल्याही व्यसनाचे नुसते बोटही धरले नसल्याने व्यसनांनीच माझा हात धरण्यापासून वाचलो.
पूर्वायुष्यात मला आईच्या मायेने, मदत केलेल्या हितचिंतकानी केलेले संस्कार म्हणा की माझ्या शाळामास्तरांनी दिलेली स्वावलंबन्+सचोटीची शिकवण म्हणा, मी फार कमी वयात पैसे कमवूनही सगळ्या व्यसनांपासून दूरच राहिलो.
आणि त्याचे महत्व आत्ता कळाले.त्या सर्व अज्ञात मदत्-हातांचा आणि शिक्षकांचा मी आजन्म ऋणी आहे.

जीवनात जरी जगण्याला तोल होता तरी ताल (लय= Rytheme) स्वखी मुळेच आला हे निर्वीवाद सत्य !

धाग्याच्या समारोपासाठी हे अनावृत्त पत्र स्वखे तुझ्यासाठी

स्वखे
तू म्हणशील सारखे स्वखे काय म्हणतोस आता, आधी तर सखी,सखे म्हणायचास, सांगतो तुझ्या भाषेत थोडासा विक्षीप्तपणा म्हण, पण स्वखे म्हणजे तू सखी आणी मी स्व तर स्वखी म्हणजे स्व आणी सखी यांचे स्वतंत्र अस्तित्व अबाधीत ठेऊनही नवे अस्तीत्व असलेला माझा सहजीवन प्रवासी.

काय म्हटलीस असं जड बोलू नकोस तर ऐक तू माझ्यावर कधी देवधर्म अट्टाहसाने लादले नाहीस का,मी तुझ्या निष्काम देव भक्तीला अडथळा केला नाही.माझ्या आवडी निवडींना जसा तुझा होकार होता तितकाच तुझ्या स्वावलंबन कमाईला माझा सक्रीय देकार होता.

स्वखे तुला आठवतय लग्न झाल्यावर सुरुवातीला एक दोन वर्षे "ही कर्नाटकची तू पुण्यातला मग काय "love marraiage" का ? अश्या चौकशी प्रश्नांनी हैराण होत असू.

यावर मी दिलेले उत्तर अजूनही लक्षात आहे ना "no its lovely Marriage" आणि गेली पंधरा वर्षे ही वा़ख्या तुझ्यामुळे अक्षरशः जगलोय मी!

तू म्हणायची अजूनही तुझी चेष्टा-मस्करी करायची सवय काही गेली नाही खरंच तू Serious कधी होणार,देवाने इतकी मोठी चेष्टा केलीय माझी तरी मी Serious पे़क्षा Sincere होणे जास्त आवडेल.

तूला आठवते आपल्या परीच्या जन्मा आधी आपण डॉ.अजित जोशी (स्त्री रोग्+प्रसूती रोग तज्ञ)कडे गेलो होतो.
तुला ते बेटा म्हणूनच हाक मारीत.मलाही त्यांनी बजावले होते ही माझी मुलगीच आहे म्हणून.
डॉ जोशी : "काही काळजी करू नकोस सगळं नॉर्मल आहे, मग कसलं टेंशन घेतेस तू ?
स्वखी : टेंशन नाही पण थोडी काळजी वाटते आणी त्यासाठीच आले होते.
मी : नाही सर "हीला स्वतःला कशाचं टेंशन नाही याचंच टेन्शन येतेय बहुतेक"
स्वखी : "बघा असे सारखी चेष्टा-मस्करी करतात"
डॉ जोशी : मग बरेच आहे की, अशीच हसरी आणि आनंदी रहा या दिवसांत्.(तूझी थायरॉईड ची पथ्ये आणि औषधे चालू होती हे त्यांना ठाऊक होते)अगं इतका हसवणारा नवरा लाभलाय तुला.
स्वखी : मला फक्त तुमच्या दवाखान्याच्या नुसत्या पायर्‍या चढल्या तरी बरं वाटतं
डॉ जोशी : मग सांग तुझ्या नवर्‍याला शतपावली साठी इथे घेऊन यायला.
त्यावेळी तू प्रसन्न हसलीस. खरं सांगू तुझ्या पेक्षा मलाही टेंशन आले होते पण ते लपविण्यासाठी हसणे-हसविणे यासारखा ऊपाय नाही.

तू अगर उदास होगा, तो उदास हूँगी मैं भी
नज़र आऊँ या ना आऊँ, तेरे पास हूँगी मैं भी
तू कहीं भी जा रहेगा, मेरा साया, साथ होगा ...

आत्ता आत्ता कुठे मी तुला समजू-उमजू लागलो होतो,

हे सारं मी मिपावर का लिहिलं याच तुला जरा नवल वाटेल थोडासा रागही येईल, सांगतो आयडींच्या नावावर जाऊ नको हे आयडी जरी विचित्र आणी वेगळे असले तरी त्याच्या मागची माणसे अस्सल आणि खरी-खुरी आहेत अगदी तुझ्या-माझ्यासारखी जिंदादील आणि माझी कहाणी मी त्यांना नाही सांगणार तर कुणाला ?
माझ्यापेक्षाही श्रेष्ठ अनुभवसंपन्न आणी बहुरंगी जीवन जगणारी माणसं आहेत इथे पण ती झूल उतरवून माझ्या चार ओळी ते वाचतात धीरही देतात ते मला लाख मोलाचे आहे.

तेव्हा तु ही माझ्याबरोबर मिपाकरांना विनंती कर की तुमच्या सदीच्छा-स्नेहभावना अश्याच राहू देत आपल्या मुलांना, कारण पोरकेपणापेक्षा, परकेपणाचे घाव खोलवर आत जखम करतात. मला बालपणी मिळाले तसे समाजाचे प्रेम्+आधार त्यापे़क्षा कांकणभर जास्तच मिळू दे. मिपाचा अर्थ माझ्यासाठी तरी सचोटीने रहा सन्मार्गावर रहा मित्र (कायम) तुझ्या पाठीशी आहे

आता फक्त तुझ्या साठी
माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे का माहीत नाही पण तुझ्यावर आहे तेव्हा तूच देवाला सांग

ओ रे माझी ओ रे माझी ओ ओ मेरे माझी
मेरे साजन हैं उस पार, मैं मन मार, हूँ इस पार
ओ मेरे माझी, अबकी बार, ले चल पार, ले चल पार
मेरे साजन हैं उस पार...

हे फक्त मी मागेन देवाकडे
हो मन की किताब से तू, मेरा नाम ही मिटा देना
गुन तो न था कोई भी, अवगुन मेरे भुला देना
मुझको तेरी बिदा का...
मुझको तेरी बिदा का मर के भी रहता इंतज़ार

मेरे साजन...
मत खेल जल जाएगी, कहती है आग मेरे मन की
मत खेल...
मत खेल जल जाएगी, कहती है आग मेरे मन की
मैं बंदिनी पिया की चिर संगिनी हूँ साजन की

तू ये मी तुला नक्की ओळखीन (कुठल्याही जन्मात) फक्त एकदाच हाक मार "कार्ट्या"

तुझाच
स्वखीत ला स्व

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

शिवोऽहम्'s picture

7 May 2015 - 11:05 am | शिवोऽहम्

असे अनुभव येऊ नयेत कोणाच्या वाट्याला..

पुलेशु.

प्यारे१'s picture

7 May 2015 - 11:16 am | प्यारे१

___/\___

......

अजया's picture

7 May 2015 - 11:45 am | अजया

शब्द नाहीत _/\_

पहिल्यापासुन वाचावे लागेल .. वाचतो.. आजच पाहिली ही सिरिज

पगला गजोधर's picture

7 May 2015 - 12:11 pm | पगला गजोधर

जो होगा वह होकर रहेगा
तू कल कि फिक्र में अपनी आज कि हँसी बरबाद ना कर।
१++++

प्रचेतस's picture

7 May 2015 - 12:27 pm | प्रचेतस

अस्वस्थ करणारं.

तुमच्या गहिर्‍या नात्याला सलाम!

फारच अनपेक्षीत आणि धक्कादायक शेवट होता,
पण हे सारं निभावूनही तुम्ही जो सकारात्मक द्रुष्टिकोण ठेवलाय त्याबद्दल तुम्हाला " हॅट्सऑफ " !!

शेवटच्या भागाने अंगावर शहारा आणि डोळ्यात पाणी आणले...

आता काय बोलावे ते कळत नाही .... मधल्या भागात काही प्रसंग तुटकसे आले त्याचे कारण कळाले.. जस जसे पुढे वाचत आलो तस तसे हे लिखान खरे आहे वाटुन वाचत राहिलो आणि शेवटी मी तुमच्या बरोबर आहे असेच वाटत होते .

(अवांतर : डॉ अजीत जोशी .. सारसबागेजवळील ना ?)

मित्र पाठीसीच नाही मित्र सदैव तुमच्याबरोबर आहे...

सौंदाळा's picture

7 May 2015 - 1:42 pm | सौंदाळा

_/\__/\__/\_

निशब्द

मास्टरमाईन्ड's picture

7 May 2015 - 2:49 pm | मास्टरमाईन्ड

___/\___

समीरसूर's picture

7 May 2015 - 3:27 pm | समीरसूर

Manaalaa chaTakaa laavaNaare likhaaN...

Aapalyaa dhairyaas trivaar salaam! SahachaariNee jine aapalyaa aayushyaala ek Naveen artha dilelaa asato tiche achanak jaaNe kitee vedanaadaayee asate yaachaa pratyay aapalyaa likhaaNaatoon aalaa...ti nusatee sahachaariNee nasate; tee preyasee asate, maitreeN asate, mitra asate, aaee asate, mulagee asate...sagaLyaa naatyaaMmadhalaa olaavaa tichyaa Thaayee asato.

Aapali likhaaNaachee haatoTee vilakshaN aahe.

AapaNaalaa dev adhikaadhik shaktee devo hee prarthanaa...svata:chee kaaLajee ghyaa. MisalPaav aaNi aamhee saare aapalyaa sobat sadaiv aahot. Kadheehee haak maaraa...

Maajhyaa laptop warun Marathi type karataa yet naaheeye mhaNoon English madhoon lihaave laagatey. Gairasoyeebaddal kshama asaavee...login saaThee mee username copy karoon vaaparale.

अंतरा आनंद's picture

7 May 2015 - 6:06 pm | अंतरा आनंद

तुटक वाटल्याने नीट वाचले गेले नव्हते पण शेवट सुन्न करुन गेला.

चुकलामाकला's picture

7 May 2015 - 7:03 pm | चुकलामाकला

+11

अत्रुप्त आत्मा's picture

7 May 2015 - 6:13 pm | अत्रुप्त आत्मा

....

बॅटमॅन's picture

7 May 2015 - 6:16 pm | बॅटमॅन

_/\_

आतिवास's picture

7 May 2015 - 8:47 pm | आतिवास

काय प्रतिसाद द्यावा ते कळत नाही.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 May 2015 - 9:16 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

निश्शब्द. जुन्या खपल्या काढल्या गेल्यात वाचुन. :/

बहुगुणी's picture

7 May 2015 - 11:11 pm | बहुगुणी

त्रिधारेने असं वळण घेतलं असेल अशी कल्पनाही नव्हती, त्यामुळे धक्का बसलाच; पण तुमच्या धैर्याला मनापासून प्रणाम!

'भल्या माणसांच्या आयुष्यात असली संकटं मुळात यावीतच का' हा अगम्य-उत्तरी प्रश्न असतो, तुमच्यापुरतं बोलायचं झालं तर "अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी" असं म्हणू नका, डाव रंगला हेच किती महत्वाचं होतं त्याची जाण ठेवा.

कदाचित अवांतर वाटेल, पण माझ्याही वैयक्तिक आयुष्यात थोडीशी अशीच परिस्थिती उद्भवू शकली असती त्यावेळच्या एका प्रसंगाचं तुमच्यासारखं मिपावर सार्वजनिकरीत्या मांडायचं धाडस करतो आहे: कित्येक वर्षांपूर्वी अनपेक्षितपणे आलेल्या एका जीवघेण्या आजारातून माझ्या पत्नीला डॉक्टरांनी प्रयत्नपूर्वक सोडवून आणलं होतं तेंव्हाची गोष्ट. ती असहाय्य अवस्थेत वेदनांनी तळमळत असतांना मी तिचं मन रमावं म्हणून तिचा हात हातात धरून हळू आवाजात काही-बाही बोलत रहायचो, एकामागे एक अशी गाणी गुणगुणत रहायचो. असंच एकदा अनाहूतपणे पाडगांवकरांचं वरील गाणं गुणगुणत असतांना तिचा बांध फुटला, आणि म्हणाली 'नको रे डाव मोडला असं म्हणूस!' मी गाणं थांबवून सॉरी म्हणून, इतर काही विषयाकडे संभाषण वळवलं. पण ते शब्द मनात घर करून राहिलं होते, मग पुढे कधीतरी खास तिच्यासाठी ते गाणं शब्द बदलून लिहिलं. पाडगांवकरांची क्षमा मागून आज तेच शब्द तुमच्यासाठी खाली देतो आहे, पण पुन्हा एकदा, 'स्वखीमुळे डाव रंगला होता आणि तुम्ही दोघांनी जोडीने तो सजवलात', हेच लक्षात ठेवा! आयुष्य सह्य होईल.

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
हृदयांमधूनी डाव मांडला, सजली एक कहाणी

राजा वदला मला समजली, शब्दावाचून भाषा
माझ्या नयनांसवे बोलती, तुझ्या हातच्या रेषा
गात्रामधल्या स्पंदनी तेंव्हा फुलून आली राणी

हृदयांमधूनी डाव मांडला, सजली एक कहाणी

राणी गाई गुणगुण अलगद, अधरांमधली गाणी
भल्या पहाटे, धूसर वाटा, नव्या गावचे पाणी
अन राजाला क्षणात दिसली, त्याची प्रेमदिवाणी

हृदयांमधूनी डाव मांडला, सजली एक कहाणी

तिला विचारी राजा का गे हृदय असे डोलावे
का प्रेमाने फुलण्यासाठी, श्वास असे तोलावे
या प्रश्नाला उत्तर नव्हते चुंबनी हरवे राणी

हृदयांमधूनी डाव मांडला, सजली एक कहाणी

मग राणीने मिटले डोळे, स्पर्श हळू करतांना
अन राजाने मिठीत घेता, जुळून आल्या ताना
वार्‍यावरती तरुन गेली, एक-अनेक तराणी

हृदयांमधूनी डाव मांडला, सजली एक कहाणी

भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी
हृदयांमधूनी डाव मांडला, सजली एक कहाणी

प्रचेतस's picture

7 May 2015 - 11:17 pm | प्रचेतस

प्रतिसाद अतिशय आवडला.

अनपेक्षित शेवट... तुटक पणा जाणवला होताच. पण आज एकसंध चित्र उभं केलंत. भयानक काढली आजची दुपार...

सुन्न केलंत...

वरचा बहुगुणी यांचा प्रतिसाद केवळ अप्रतिम आहे. मन स्थिर करायला मदत करणारा आहे...

स्वाती२'s picture

8 May 2015 - 12:43 am | स्वाती२

वाचून सुन्न झाले.

मधुरा देशपांडे's picture

8 May 2015 - 3:45 am | मधुरा देशपांडे

निःशब्द.

फार अस्वस्थ झाले. बहुगुणींचा प्रतिसाद आणि तुमचं धैर्य , दोन्ही मुळे, नि:शब्द !

प्रियाजी's picture

8 May 2015 - 2:40 pm | प्रियाजी

नाखु,तुमच्या धैर्याला मनापासून प्रणाम. स्वखीचा देव तुम्ही व तुमच्या पिल्लांच्या सतत असाच पाठीराखा राहो. बाकी जास्त काही बोलवत नाही.

पलाश's picture

18 Jun 2015 - 11:18 am | पलाश

अगदी असंच म्हणते !! _/\_

शित्रेउमेश's picture

8 May 2015 - 3:52 pm | शित्रेउमेश

खूप अस्वस्थ झालो.... अनपेक्षित शेवट... सुन्न केलंत...

रातराणी's picture

9 May 2015 - 2:18 am | रातराणी

केवढी मोठी परीक्षा :(

यशोधरा's picture

9 May 2015 - 9:18 am | यशोधरा

:(

एक एकटा एकटाच's picture

9 May 2015 - 7:57 pm | एक एकटा एकटाच

इतके दिवस राखून ठेवलेली तुमची त्रिधारा ह्या अंतिम भागानंतर
आज एक सलग वाचली.

काय प्रतिसाद द्यावा सुचत नव्हत
आणि प्रतिसाद न देता रहावत नव्हत.

आताही काय बोलाव ते सुचत नाहीय. अगदीच सुन्न झाल्यासारख वाटतय.
तुम्ही आणि तुमची सखी ह्या दोघांनाही

_/\_

जेपी's picture

9 May 2015 - 8:10 pm | जेपी

फक्त वाचलय ..
काय बोलण जमणार नाय

झकासराव's picture

12 May 2015 - 5:35 pm | झकासराव

:(

आज सलग वाचली त्रिधारा..
काहि सुचत नाहिये.

gogglya's picture

14 May 2015 - 9:32 pm | gogglya

झालो आहे... काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहीये!

काजुकतली's picture

18 Jun 2015 - 10:45 am | काजुकतली

डोळ्यात पाणी आणले शेवटाने... :(

त्रिवेणी's picture

18 Jun 2015 - 12:14 pm | त्रिवेणी

मी आज पहिल्यांदा वाचायला घेतले आणि तो ही हा अंतिम भाग.
अर्धाच वाचु शकले अजुन वाचायची हिंमत नाही होत आहे.खुप अस्वस्थ झाले.

नाखु's picture

25 Jun 2015 - 9:27 am | नाखु

स्वखे आज तुझा वाढदिवस

भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण

कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर -

चित्रपट सौजन्य : तुझ्यावाचून करमेना

तुझेच
दादा-ताई आणि स्व

अविनाश पांढरकर's picture

25 Jun 2015 - 3:43 pm | अविनाश पांढरकर

झालो आहे... काय प्रतिक्रिया द्यावी हेच कळत नाहीये!

लव उ's picture

30 Jun 2015 - 3:24 pm | लव उ

काय प्रतिसाद द्यायचा कळत नाहीए?

पैसा's picture

2 Oct 2015 - 4:24 pm | पैसा

त्रिधाराचा शेवट असा झाला याची कल्पनाच नव्हती. काय बोलू? कसं सहन केलंत सगळं?

देव जर कुठे असलाच तर तुम्हाला आणि मुलांना सावरायला मदत करत असेल असं मानून घेते. असं काही ऐकलं की देव आहे यावर विश्वास ठेवावा असं वाटत नाही.

तसे पाहिले तर सखी या लेखांच्या रूपाने आमच्याही ओळखीची झाली आहे. ती आहेच इथे! :((

बोका-ए-आझम's picture

2 Oct 2015 - 6:03 pm | बोका-ए-आझम

शब्द संपले नाखु. :(

बरेच दिवस धीर होत नव्हता पण आज सगळे भाग वाचून काढले.
काही शब्द नाहीत.