..नका जाऊ देऊ राया दुपार ही वाया..

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in जे न देखे रवी...
17 Mar 2015 - 11:01 pm

डेरेदार वृक्षांची ह्या पडे गर्द छाया..
नका जाऊ देऊ राया दुपार ही वाया..

बुजगावणेही डोळे मिटुनि निवांत
पाखरांच्या संगतीत उभारले शांत
दूर पास नाही कोणी दोघांस पहाया..

रोमरोम मोहरते तनु माझी बाई..
मोहरली आहे जशी गर्द आमराई..
कोकिळही गातो आहे मन रिझवाया..

तुमच्या तनुला येता शेताचा सुवास..
मनातले पाखरु अन होते कासावीस..
मन उतावीळ झाले पिंजर्यात जाया...

सावलीत सावली ही एकरुप झाली.
दुपारीच चांदण्यांची बरसात झाली.
शेतसुगंधाने झाली तृप्त माझी काया..

----- योगेश

कविता

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

18 Mar 2015 - 7:08 am | सस्नेह

झकास लावणी !

अत्रुप्त आत्मा's picture

18 Mar 2015 - 9:48 am | अत्रुप्त आत्मा

एकच नंबर! :HAPPY:

चुकलामाकला's picture

18 Mar 2015 - 10:18 am | चुकलामाकला

क्या बात! झकास!

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Mar 2015 - 10:51 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता आवडली. मस्तच आहे.

एक शंका आहे.

कवितेमधे वापरलेला "हि" हा शब्द "सुध्दा" या अर्थाने वापरला आहे का "तरी" या अर्थाने?

दोन्ही प्रकारे वेगवेगळे अर्थ निघत असले तरी त्या दोन्ही संदर्भांमधे ही कविता चपखल बसते आहे.

या अर्थाने ही व्दैअर्थी कविता आहे.

पैजारबुवा,

कानडाऊ योगेशु's picture

18 Mar 2015 - 12:58 pm | कानडाऊ योगेशु

यु सेड इट सर!
कविता लिहिताना मला ही हे दोन्ही अर्थ ल़क्षात आले होते.
"ही" चा "तरी" अर्थ घेतला तर "रात्र तर तुम्ही वाया घालवलीच आहे तेव्हा दुपार 'तरी' सत्कारणी लावा" असा अर्थ निघतो व कवितेचा नायक उगाचच अरसिक वाटुन जातो.
दुसरा म्हणजे "सुध्दा" असा अर्थ घेतला तर "दुपारीही सगळे काही जुळून आले आहे तेव्हा..." हा अर्थ लावणीच्या मूडशी सुसंगत वाटतो.
(पण पहीला अर्थ घेऊन नायकाला कवितेत बोलते करण्याचा विचारही मनात आला.)

सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.!

वेल्लाभट's picture

18 Mar 2015 - 2:16 pm | वेल्लाभट

गुड गुड गुड !

क्या बात है भाया!
तेरा काव्य मुझे भाया

एस's picture

18 Mar 2015 - 4:48 pm | एस

धृवपद जरा अजून मीटरमध्ये बसवल्यास झक्कास चाल लागू शकेल.

कानडाऊ योगेशु's picture

18 Mar 2015 - 5:06 pm | कानडाऊ योगेशु

नक्की कुठे गडबड आहे सांगु शकाल काय?
कारण मी ही
डेरेदार वृक्षांची ह्या पडे गर्द छाया..
मधल्या वृक्षांची वर बराच अडलो होतो.
पहीला योजलेला शब्द झाडांची असा होता पण तो तितका ठिक वाटला नाही.
नंतर आमराई हा शब्द वापरुन पाहीला.
डेरेदार आमराईची पडे गर्द छाया..

पण उच्चारताना तो आम्राई असा उच्चारला जातोय.
डिरेल झालेल्या गाडीगत शब्द एकमेकांवर आदळताहेत असे वाटले म्हणुन वृक्ष हाच शब्द ठेवला.
पण अनुकुल बदल करण्यास उत्सुक आहे.

खटासि खट's picture

19 Mar 2015 - 7:59 am | खटासि खट

तरूंची या

कानडाऊ योगेशु's picture

20 Mar 2015 - 7:37 am | कानडाऊ योगेशु

तरूंची मधल्या "त" वर एक मात्रा कमी आहे त्यामुळे त चा उच्चार लांबवावा लागतोय.
अर्थात पूर्ण कवितेत मी वृत्त किंवा मात्रा पाळल्या नाही आहेत त्यामुळे हा शब्दही वापरता येईल.
अर्थाने तरु हा शब्द ही योग्य वाटतो आहे..

आंब्याचे झाड अथवा आमराईला एखादा तीन अक्षरी शब्द आहे का?
कारण हे सगळे प्रकरण आंब्याच्या झाडाखाली होते आहे त्यामुळे त्या संबंधित शब्द मिळाला तर बल्ले बल्ले !

धन्यवाद खट्साहेब.

खटासि खट's picture

20 Mar 2015 - 7:57 am | खटासि खट

आंब्याचंच झाड का बरं ?

कानडाऊ योगेशु's picture

20 Mar 2015 - 9:54 am | कानडाऊ योगेशु

१. कारण पुढच्या कडव्यात आमराई चा उल्लेख आला आहे.
२. व असे देखील पिंपळ/वड ह्या वृक्षांखेरीज आंब्याच्या झाडाची छाया डेरेदार पडते किंबहुना डेरेदार हे विशेषण जास्त करुन मी आंब्याच्या झाडासाठीच वापरलेले वाचले आहे.
३.अजुन एक म्हणजे शेतात आमराई असणे दुर्मिळ नसावे.

चौथा कोनाडा's picture

19 Mar 2015 - 8:41 pm | चौथा कोनाडा

झकास ! आवडली ही फर्मास रचना ! भारी हो !

सांजसंध्या's picture

20 Mar 2015 - 7:26 pm | सांजसंध्या

मस्तच..

कानडाऊ योगेशु's picture

21 Mar 2015 - 11:16 am | कानडाऊ योगेशु

धन्यवाद चौथा कोनाडा आणि सांजसंध्या!