‘सईमावशी, तू, आदिमामा, संतोषकाका आणि ती प्रतिगामी शिल्पा असे बूर्झ्वा लोक्स माझ्या डिसीजनला बिलकुल धक्का लावू शकत नाहीत !’ स्वराने त्वेषाने हातातला काटा समोरच्या प्लेटमधल्या इडलीत खुपसला आणि दुसऱ्या हातातल्या चमच्याने झटक्यासरशी तिचे दोन तुकडे केले !
इडलीच्या जागी तिला प्रतिगामी शिल्पा, तिची साक्षात जन्मदात्री दिसत असावी की काय अशी मला शंका आली.
‘अगं, आमची काय बिशाद तुला धक्का लावायची ! ..आय मीन, तुझ्या डिसीजनला.. पण जर तुला पार्थ आणि पार्थला तू पूर्णपणे ओळखता आणि पसंतही आहात, तर काय गरज लीविन वगैरेची ?’ मी हळूच माझ्या थंड दहीवड्याला चमच्याने गोंजारले.
स्वरा ही माझी सुंदर आणि सुविद्य भाची. ती पार्थ या तितक्याच देखण्या कुलीन मुलाच्या प्रेमात पडली. साहजिकच पार्थही तिच्या प्रेमात पडला. पण तिनं, ‘लग्न बिग्न करण्याचा जुनाट खयाल आपल्याला पसंत नसल्याने, आपण पार्थशी लीविन-रिलेशनमध्ये राहणार असल्याचं घरी जाहीर केल्यामुळे शिल्पाचं, माझ्या मोठ्या बहिणीचं धाबं दणाणलं ! साहजिक आहे, आमच्या सात पिढ्यांमध्ये लीविन नावाचा आचरटपणा (हा शिल्पाताईचाच शब्द) कुणी केला नसल्यानं, आणि स्वरा ही माझी लाडकी भाची अन मी तिची लाडकी मावशी असल्यानं तिचं मन बदलायच्या किंवा अगदी चपखल शब्दात, ब्रेन-वॉशिंग करण्याच्या आणि लग्न हा अधिक समाजमान्य पर्याय तिच्या मनात भरवण्याच्या मोहिमेवर माझी नियुक्ती झाली होती.
‘डोंचू नो मावशी, दीज बॉईज मे चीट ! काहीतरी असणार त्याच्या बॅड हॅबिट्स. समटाईम्स ही मे ऑल्सो नॉट बी अवेअर ऑफ हिज मायनस पॉइंटस..म्हणून मला आधी लीविन रिलेशन्स करून त्याच्या हॅबिट्स फैंडाऊट करायचय मगच शादी-बिदी ! आयला लग्न म्हणजे सरकारी नोकरी ! एकदा चिकटलो की पक्कीच ! ’ स्वराने इडलीच्या तुकड्याच्या पोटात त्वेषाने काटा खुपसला आणि त्याला सुळावर चढवले. मग त्याला मिरचीची चटणी चाटवावी की सांबारात समाधी द्यावी, याचा तिने एक मिनिट शांतता पाळून विचार केला.
‘पार्थचा काय विचार आहे, याबद्दल ? आणि त्याच्या आई-बाबांचा ?’ मी स्वरात सहजपणा ओतप्रोत भरण्याचा प्रयत्न केला.
‘काय म्हणणार ? त्याचे आई-बाबा लग्नाचाच आग्रह धरताहेत. तेही त्या बूर्झ्वा शिल्पाला सामील ! आणि पार्थ मी म्हणेन तेच करेल !’
अजूनही इडलीचा तुकडा सुळावर लटकत असलेला पाहून मी हळूच सांबाराची वाटी तिच्यापुढे सरकवली. ‘अगं, पण समजा तू लीविन केलीस आणि त्याची एखादी हॅबिट् तुला नाही आवडली, तर तू काय करणार ?’
‘काय म्हणजे ? एंड ऑफ दि रिलेशन !’ स्वराने इडलीच्या तुकड्याचा सांबारात कडेलोट करून मग त्याला पोटात सद्गती दिली.
पण काही क्षण तिच्या करीना-कतरिना-सदृश्य चेहेऱ्याच्या इस्त्रीवर अनिश्चिततेची एक सुरकुती दिसली.
..बहुधा पार्थबरोबर केल्या जाणाऱ्या लीविनरिलेशनशिपला अशीच सद्गती द्यावी लागली तर तिचा बहात्तर हजार आणि पार्थचा अठ्ठ्याहत्तरहजार पगार मिळवून हप्ता जमवलेल्या करोडपतीनगरातील फ्लॅटला अकाली गच्छंती मिळेल असा बूर्झ्वा विचार तिच्या मेंदूला चाटून गेला असावा. पण लगेच ‘फिकर नै’ च्या पुरोगामी सांबारात तिने त्या विचाराचा कडेलोट केला.
‘ओके, आणि समजा, तुझी एखादी हॅबिट् त्याला आवडली नाही तर ?’
...चमचमीत मद्रासी सांबार आणि चटणी युक्त दोन जम्बो इडल्या पोटात गेल्यामुळे तिच्या चित्तवृत्ती पुरेशा प्रफुल्लीत झालेल्या पाहून मी हळूच चाल केली.
‘तर, तर ...? पण माझ्या सगळ्या हॅबिट्स त्याला माहितीयेत गं मावशी !’ ती जरा विचारमग्न.
‘जस्ट अॅ ज, त्याच्या हॅबिट्स तुला माहितीयेत...’ माझी दुसरी चाल.
‘ओह, मावशी डोंट ट्राय टु बी स्मार्टर दॅन मी .....?’
‘हाऊ कॅनाय ? तू आगटे घराण्यातली सर्वात तेजस्वी पणती आहेस ना !’
‘ठीकाय, तुला काय म्हणायचंय सांग.’
‘जर लीविनदरम्यान पार्थला तुझी एखादी हॅबिट् आवडली नाही, तर तो काय करेल ?’
‘काय करेल ?’
‘काय ?’
‘ओके ओके, शूट इट, यार मावशी !’
‘व्हेरी सिम्पल ! अगं तो सेकंड लीविन शिप शोधेल !’
हे ऐकून स्वराच्या पुरोगामित्वाची पणती जरा फडफडलीशी वाटली. तिने पुन्हा एक मिनिट शांतता पाळली.
मग रिकामी झालेली इडली-सांबाराची प्लेट निर्णायकपणे बाजूला सारत ती म्हणाली,
‘आय हॅव टु डिस्कस द इश्शू विथ पार्थ.’
अन ‘स्नॅक्स कॉर्नर’च्या बिलाची फिकीर न करता तरतरा जाऊन डिओवर स्वार होऊन भुर्रकन उडाली.
मी मुकाट्यानं बिल चुकतं केलं, मोबाईल काढला आणि शिल्पाताईला फोन केला, ‘मिशन फेल बट स्टिल होप्स अलाईव्ह !’
तर, स्वरा अशी निघून गेली आणि आश्चर्य म्हणजे तिसऱ्याच दिवशी शिल्पाताईचा फोन आला....
‘काम झालं ! कार्टी तयार झाली एकदाची लग्नाला !’
‘सेकंड लीविन’च्या माझ्या ‘गुगली’नं चोख काम बजावलं होतं.
तरीपण ‘सावधान’ कानावर पडेपर्यंत तिला आपल्या कार्टीची ग्यारंटी नव्हती. यथावकाश स्वरा आणि पार्थ लग्नाच्या खोड्यात अडकले आणि शिल्पाताईनं सुटकेचा श्वास टाकला.
नवे जोडपे रीतसर स्वित्झर्लंडला वगैरे जाऊन आले आणि तिसऱ्याच दिवशी स्वरा माझ्या ऑफिसात भुतासारखी उगवली.
‘काय म्हणतेय गं तुझी सरकारी नोकरी ?’ मी साळसूदपणे विचारले.
त्यावर तिने माझ्या टेबलसमोरच्या खुर्चीचे तोंड उलटे मागे फिरवले आणि ती धपकन खुर्चीवर बसली. तिने आपली उजव्या हाताची मूठ आणि डाव्या हातातली दुचाकीची किल्ली धाडकन माझ्या टेबलवर आदळली आणि ती म्हणाली,
‘तरी मी तुला सांगत होत्ये, सईमावशी...’
‘काय झालं आता ?’
‘अगं मला रात्रीची झोप मिळणं मुश्कील झालय...’
‘साहजिक आहे...’ मी खिदळले.
‘चावटपण करू नकोस. अगं , तो ना, घोरी आहे,घोरी !’
‘घोरी ?? पण त्याचं आडनाव चांगलं देशपांडे आहे ना ?’
‘च , तसं नव्हे, तो घोरतो गं, झोपेत. घोरासुर आहे !’
‘घोरासुर ?’
‘रात्रभर डरकाळ्या फोडत असतो !’
‘तुझ्यासमोर ? काय सांगतेस काय ?’
‘झोपेत गं ! जागेपणी काय बिशाद आहे त्याची !’
‘म्हणजे झोपेत घोरतो, इतकंच ना ? हात्तिच्या !’
‘इतकंच? इतकंच ? म्हणजे हे काय थोडं झालं का ?’ स्वराचा पारा शंभरला भिडला.
‘अगं असते सवय एकेकांना ! एवढं काय त्यात ?’
‘अगं पहिल्या दिवशी मी झोपले, तर शेजारून आवाज, ‘सरक सरक सरक, फुस्स्स sss.., सरक सरक सरक, फुस्स्स sss.. काय घाबरले मी !’
‘मग ?’
‘मग काय ? पार्थला हलवलं तर तो कुठला उठतोय ? पुन्हा झोपले, तर पुन्हा सरक सरक सरक, फुस्स्स sss..!’
‘मग ?’
‘मग काय ? सकाळपर्यंत मी सरकतच बसले होते, आपलं, जागीच होते ! सकाळी त्याला विचारलं तर निरागस चेहेरा करून म्हणतो, मी ? घोरतो ? छे, शक्यच नाही !’
‘हम्म..बऱ्याचदा आपण घोरतो हे घोरणाऱ्या लोकांच्या गावीही नसते !’ मी गंभीर चेहेरा करून एक युनिव्हर्सल ट्रुथ सांगितले.
‘पण म्हणजे आता तू रोज रात्री सरकतेस की काय ?’ मी लगेच काळजीयुक्त सुरात विचारले.
‘छे रोज नाही गं ! दुसऱ्या दिवशी तो ‘धपक धपक ढूss म्म’ करू लागला’
‘काय, म्हणतेस काय ?’
‘हो ना ! दोन दिवस धपक धपक करून झाल्यावर आणखी चार दिवस ‘थिर्रर्र कुचूकुचू फटाक, फिस्स.. ‘ चा मारा झाला. आणि सध्या ‘चटक मटक कडबा खा..’ सुरु झालय.’
‘ओ माय गॉड ! ‘
‘तरी मी तुला सांगत होते, लीविनच बरी म्हणून ! त्याची सवय आधीच समजली असती ना ! मग लग्न-बिग्न ढिंच्याक !’
‘म्हणजे मग आता तू ढिंच्याक करणार की काय ?’ माझ्या डोळ्यासमोर शिल्पाताईची क्रुद्ध मुद्रा ढिंच्याक ढिंच्याक करू लागली.
‘हं, आता काय करतेय ? लग्न म्हणजे सरकारी नोकरी. पोष्टाच्या स्टँपसारखी चिकट ! एकदा चिकटला की पक्का ! तुला सांगत होते ना मी. तुझ्यामुळे मी या लग्नाच्या फंदात पडले.’
‘हे, हे म्हणजे, धिस इज मात्र टू मच हं, सरे’
‘हजार वेळा सांगितलंय , मला सरे म्हणू नको !’
‘ओके स्वरे, लग्नाचा डिसीजन कुणाचा होता ? तुझाच ना ? तू काय म्हणालीस, की आम्ही बूर्झ्वा लोक्स तुझ्या डिसीजनला बिलकुल धक्का लावू शकत नाही, होय की नाही ?’
पॉईंटमे दम था. स्वरा गप्प बसली. स्वराशी मुद्द्यानं भांडलं तर ती रेजिस्ट करू शकत नाही, हे मला तिच्या बालपणापासून माहिती. उगीच का तिचं बारसं जेवले होते ?
‘ओके, आता मी जर लग्न डिसमिस केले तर शिल्पा आणि बाबा माझं फेसबुक कायमसाठी बंद करून टाकतील, आय मीन जन्मात तोंड बघणार नाहीत माझं.’
‘यु आर राईट , डार्लिंग !’
‘तेव्हा सईमावशी, तू काहीतरी आयडीया काढ पार्थचं घोरणं बंद करायला ‘
‘इतकंच ना ? तू डर मत, ये मावशी तेरे लिये कुचबी कर सकती है, बसंती !’ मी मनात हुश्श केलं.
मग आम्ही महात्मा फुले रोडवरच्या पुस्तकांच्या दुकानात गेलो.
‘घोरण्यावरचे अक्सीर उपाय’ हे पुस्तक आहे का हो तुमच्याकडे ?’ मी दुकानदाराला विचारले.
‘असलं काही पुस्तक नाही.’ साधारण मंगळावरच्या प्राण्यांकडे पाहावे तसे त्याने आमच्याकडे का पाहिले हे मला समजले नाही.
‘मग ‘आजीबाईंचा बटवा’ ?’’
‘तो आजीबाईंकडेच मिळेल.’ त्याने थंडपणे पुन्हा सांगितले.
‘च, अहो या नावाचे पुस्तक, हो !’
‘त्यावर तो पुस्तकांच्या ढिगाआड अदृश्य झाला. पुन्हा अवतीर्ण झाला तेव्हा त्याच्या हातात एक चतकोरभर पुस्तक होते. ‘पन्नास घरगुती औषधी तोडगे‘ .
‘हे चालेल का ?’
मी आणि स्वराने ते चाळले पण घोरासुराच्या आक्रमणावर पन्नासपैकी एकही तोड दिसेना.
मग आम्ही आम्ही करोडपतीनगरातल्या, स्वरा आणि पार्थच्या थ्रीबीएचकेमध्ये आलो. एक एक कप कॉफी रिचवली आणि लॅपटॉप घेऊन गूगलबाबांना पाचारण केले.
सुदैवानं गुगलबाबा लगेच प्रसन्न झाले आणि एका पानावर ‘घोरण्यावरचे जालीम उपाय’ असे लिहिलेले दिसले. लगेच पानाची लगालगा प्रिंट काढली. तेव्हा काही सोप्पे उपाय मिळाले.
१. घोरणाऱ्या माणसाला एका कुशीवर झोपवणे
२. झोपण्यापूर्वी नाकात तूप घालणे
३. झोपण्यापूर्वी तांब्या भरून गरम पाणी पिणे.
४. उंच उशी घेणे
५. सीझस्नोर हे स्प्रे-औषध झोपण्यापूर्वी घशात फवारणे.
‘वा वा हे तर सोप्पे आहेत उपाय ! स्वरा, युवर प्रॉब्लेम फिनिश्ड !’ मी चुटकी वाजवली.
इतक्यात पार्थ हापिसातून आला. त्यालापण ‘जालिम उपाय’ सांगण्यात आले.
आधी त्याने ही कल्पना धुडकावूनच लावली. पण मग स्वराचा आणि त्याचा, ‘सुखी सहजीवन’ या विषयावर एक छोटासा ‘प्रेमळ’ परिसंवाद झाल्यावर त्याने तोडग्यांच्या प्रयोगाला मान्यता दिली. आणि मी समाधानाने हा इतिवृत्तांत सांगायला शिल्पाताईकडे गेले.
जेमतेम आठ दहा दिवस गेले आणि स्वरा परत हजर !
‘मावशी !’
‘बोल, काय म्हणतोय तुझा घोरासुर ?’
‘....उडत उडत ढगात ज्जा !’
‘..आँ ??’
‘कालचं लेटेस्ट व्हर्जन, घोरण्याचं !’
‘आं ? आणि ते पाच जालिम तोडगे ?’
‘ते केव्हाच गेले ढगात !’
‘म्हणजे ?’
‘झोपताना कुशीवर झोपला तरी पार्थ रात्री परत आपोआप उताणा ! त्यामुळे तोडगा नं. १ फेल !’
‘धत ! दुसरा ?’
‘अगं पार्थ ना आधी तयारच नव्हता लहान बाळासारखं नाकात तूप-बीप घालायला !’ स्वरा खिदळली,
‘मग मी चादर घेतली अन बाहेर सोफ्यावर जाऊन झोपले. म्हटलं एकटा घोर किती घोरतोस ते ! मग तयार झाला..खु खु..’ पुन्हा ती खुसखुसली, ‘पण काहीच उपयोग झाला नाही. फरक इतकाच पडला की आधी घोरताना त्याचं तोंड उघडं असायचं ते नाकात तूप घातल्यावर बंद झालं ! आणि त्यामुळे घोरण्याचे सूर पहिल्यापेक्षा जोरात घुमू लागले.’
‘हरे राम ! मग ते पाणी पिऊन बघितलं का गरम करून ? आणि उंच उशी ?’
‘हो, त्याचापण काही उपयोग नाही झाला, उलटं रात्रभर पार्थचं पोट गुरगुर करत होतं. त्यामुळे त्याला झोप फार वेळ लागली नाही आणि त्यामुळे घोरण्याचा पिरिअड तेवढा जरा कमी झाला . आणि उंच उशी घेऊन झोपल्यावर दुसरे दिवशी सकाळी त्याची मान उंटासारखी पुढे आली आणि हापिसात सगळे त्याला बघून खु खु करायला लागले !’
‘अर्रर्र, आणि तो स्प्रे ?’
‘हो, अगं, दहा दुकानं शोधल्यावर एकदाचा तो मिळाला. त्यासाठी मला एक हाफ-डे खर्ची घालावी लागली. आणि तो घशात फवारल्यावर पार्थ तर गार झोपला पण त्याच्या वासानं मला मात्र रात्रभर मळमळायला लागलं !’
‘अगं, पण त्यानं स्प्रे मारल्यावर तुला का मळमळू लागलं ?’ बावळटासारखं मी नव-विवाहितांना विचारू नये असा प्रश्न विचारला.
‘इश्श, मावशे, तूपण ना ...!’ इथे स्वरा इतकी झकास लाजली, की यंव रे !
‘बापरे ! म्हणजे आता ही घोर समस्या आणिकच घन-घोर झालीय तर !’ मी आता विचारात पडले.
काही मिनिटं डोक्याचा कीस पाडल्यावर मला एकदम कुठंतरी वाचलेलं आठवलं, की पोटाचा वाढीव घेर हाच घोरण्याला कारणीभूत असतो. तेव्हा घोर नाहीसा करण्यासाठी घेर कमी केला पाहिजे. उपाय अन तोडगे करण्यापेक्षा मुळातच घाव घालायचा !
‘युरेका !’ मी एकदम ओरडले, ‘स्वरे, सापडला उपाय !’
‘सांग सांग लवकर माझं डोकं आता सरक, धपक, सुर्रर्र नी फुस्स यांनी जाम झालय बघ !’ स्वरासारखी स्मार्ट मुलगी अशी ‘जाम’ वैतागलेली मी तिच्या चोवीस वर्षाच्या आयुष्यात प्रथमच पहात होते.
‘अगं की नै पार्थच्या पोटाचा घेर कमी झाला ना, तर त्याचं घोरणं हमखास बंद होईल बघ ! मी ना, मृदुता बारीककर च्या पुस्तकात वाचले होते एकदा.’ मी उत्साहाने युरेकावाला इलाज सांगितला.
‘मृदुता बारीककर ? म्हणजे ती वेट-लूज वाली ? ओह मग नक्कीच खरं असणार ! शी इज रिअल्ली ग्रेट ! माझ्या ऑफिसातल्या मैत्रिणीने ट्राय केलेला गं तिचा कोर्स. एकदम झीरो फिगर झालेली तिची. हा पार्थ ना, आयटी जॉबमुळे दिवसभर बसून असतो ना ऑफिसात, म्हणून त्याची ढेरी पुढे आलीय ! येस्स, आता रोज सकाळी हाकलतेच त्याला जिममध्ये !’
आणि डिओची चावी गरागरा फिरवत ती भुर्रकन गेलीसुद्धा !
यानंतर स्वराने पार्थच्या मागे असा काही जिमचा झक्कू लावून दिला की, माणसाचं पोट हे ‘पापी’ असतं याची त्याला बालंबाल खात्री पटली आणि देवानं माणसाला असलं पोट का दिलं असावं हा अनादि काळापासून मानवजातीला पडलेला गहन प्रश्न त्याला रोज छळू लागला.
महिनाभर जिमचा घनचक्कर घामटा काढल्यावर पार्थचे पोट पँट्च्या पट्ट्याच्या तिसऱ्या छिद्रात सामावण्याइतके आटोक्यात आले. तरी अजुनी ते बॉडी-मास-इंडेक्सच्या मापात आले नसल्यामुळे घोरी परंपरेत फारसा फरक पडला नव्हता.
याच सुमारास ऑफिसने ईआरपी मॅनेजमेंट सेटअप नावाच्या त्र्यांगड्यापोटी माझी तीन महिन्यासाठी हैद्राबादला रवानगी केली. त्यामुळे पार्थच्या पोटाच्या घन-घोर केसबद्दल अपडेटस मला मिळू शकले नाहीत.
गावात परत आल्यावर पहिले मी स्वराच्या घरी धाव घेतली. दार उघडले ते शिल्पाताईने.
‘अरे ! ताई, तू इथे आज ? ‘
मला आता दोघीपण इथेच भेटणार म्हणून आनंद झाला.
‘मी पंधरा दिवस झाले इथंच आहे गं, सई.’
‘आं ? आणि ते का ?’
‘इश्श, स्वराला चौथा ना आता ! तिला कडक डोहाळे लागलेत गं ! तिचं हवं-नको पाहायला नको का ?’
‘अरे ! काँग्रॅक्ट्स ताई ! वॉव, तू आणि मी आता आज्जी होणार तर !’
इतक्यात आतून स्वरा आली. तिच्या पोटाचा आकार आता पार्थच्या पूर्वकालीन पोटाशी मॅचिंग झालेला दिसत होता !
‘काँग्रॅक्ट्स स्वरा !’ मी ओरडले, ‘अँड व्हॉट अबाउट द घोरी मॅन पार्थ ?’
‘अगं सईमावशी, आता पार्थचं पोट एकदम सपाट झालाय ! अँड एस्केप फ्रॉम दि घोरी प्रॉब्लेम ! तो आता बिलकुल घोरत नाही. बिग हँड टु मृदुता ! येप्प ..!’
इतक्यात पार्थ ऑफिसातून आला.
मी कौतुकाने त्याचं पँटीच्या मापात बसलेलं आज्ञाधारक सपाट पोट बघतच राहिले.
पार्थने धपकन खुर्चीत अंग टाकले आणि तो हताशपणे म्हणाला,
‘पण सईमावशी, घोरीज आर नॉट यट आउट ऑफ होम, ओन्ली पोझिशन्स हॅव आल्टर्ड !’
‘म्हणजे ?’
‘....आता मी स्वराचं ‘घुर्रर्र खिसखिस हुडूत ..हुडूत.. ‘ ऐकत रात्री काढतो आहे....!!!’
प्रतिक्रिया
11 Mar 2015 - 4:55 pm | लॉरी टांगटूंगकर
==)) मस्त!!!
11 Mar 2015 - 5:00 pm | अबोली२१५
हा हा हा मस्तच…. आमच्याकडे जरा वेगळा प्रोब्लेम आहे …. माझा नवरा रात्रीचे दात चावतो (स्वतःचे ).
काही उपाय आहे कृपया उपाय सांगा… :)
11 Mar 2015 - 6:34 pm | बॅटमॅन
च्यामारी =))
11 Mar 2015 - 9:29 pm | हाडक्या
:))))
12 Mar 2015 - 5:20 am | स्पंदना
डेंटिस्ट कडे प्लास्टिकची ट्रान्स्परंट अशी अगदी पातळ डेंचर करुन मिळते. ती वापरायला सुरवात कर, या मुळे दात चावणे कमी नाही होणार, पण त्या दात खाण्याने जे दात चावण्याने दाताम्चे झिजुन नुकसान होते, ते थांबेल.
20 Mar 2015 - 1:33 am | स्रुजा
:lol:
खूप उपाय सुचतायेत हो पण तुम्ही बहुधा गांभीर्याने प्रश्न विचारलाय. :P
सांगायचा मोह झाला होता पण तुम्ही स्पंदना ताईने सांगितलंय तसंच करा तुर्तास.
22 Mar 2015 - 4:54 pm | भिंगरी
मला एकानी जालीम उपाय सांगितला होता.दातात वाळू ठेवायची.(कल्पनेनेच शहारे येतात,)
11 Mar 2015 - 5:20 pm | नगरीनिरंजन
झकास! मस्त गमतीदार चक्र.
11 Mar 2015 - 5:32 pm | रेवती
मनोरंजक कथा.
11 Mar 2015 - 6:00 pm | एक एकटा एकटाच
आवडेश
11 Mar 2015 - 8:29 pm | एक एकटा एकटाच
या कथेत मला आवडलेली गोष्ट म्हणजे
सुरुवातीच मावशी आणि भाचीचं स्नेक्स कॉर्नरमधल संभाषण.
दोघींचे ही तत्कालीन मूड्स
इडली आणि दहिवडा खाण्याच्या स्टाईलने मस्त दाखवलेत
जबरी......
11 Mar 2015 - 8:55 pm | अमित खोजे
तेच म्हणतो,
इडलीच्या तुकड्याच्या पोटात त्वेषाने काटा खुपसला आणि त्याला सुळावर चढवले. मग त्याला मिरचीची चटणी चाटवावी की सांबारात समाधी द्यावी, याचा तिने एक मिनिट शांतता पाळून विचार केला.
अजूनही इडलीचा तुकडा सुळावर लटकत असलेला पाहून मी हळूच सांबाराची वाटी तिच्यापुढे सरकवली.
इडलीच्या तुकड्याचा सांबारात कडेलोट करून मग त्याला पोटात सद्गती दिली.
अप्रतीम!
=))
11 Mar 2015 - 6:08 pm | मृत्युन्जय
हाहाहा. नेहमीप्रमाणेच झक्कास.
11 Mar 2015 - 6:10 pm | कपिलमुनी
हलकी-फुलकी कथा आवडली
11 Mar 2015 - 6:34 pm | बॅटमॅन
हाण्ण तेजायला. त्यावरून ती कविता आठवली.
आजा घोरतसे तसाच मुलगा, ती सूनही घोरते |
नातू आणि तशीच नात शयनी, घुर्घूर घुंकारिते |
झोपेचे मम जाहले खवटसे, त्या रात्रिला खोबरे |
आले मात्र हसू, मला गवसले घोरी घराणे खरे ||
सोपानदेव चौधरी हे कवी असून कवितेचे नाव 'इतिहाससंशोधन' असे आहे.
11 Mar 2015 - 7:09 pm | प्रचेतस
=))
11 Mar 2015 - 8:49 pm | अत्रुप्त आत्मा
ह्ही ह्हा ह्हा ह्हा ह्हा ! =))
12 Mar 2015 - 1:11 pm | नाखु
लेख जबहर्या
आणि बॅट्याच संशोधन एक्दम जबराट..
चिखल्फेक-रणधुमाळीतील सुखद झुळूक म्हणून हा आल्हाददायी लेखाकरीता मनःपूत धन्यवाद.
12 Mar 2015 - 3:55 pm | सस्नेह
पूर्ण कविता दे रे बट्टमणा
12 Mar 2015 - 4:09 pm | बॅटमॅन
मला तेवढीच माहिते ओ. मो रा वाळंब्यांच्या व्याक्रणपुस्तकात कशाचे तरी उदा. म्हणून तेवढे एक कडवे दिले होते. पूर्ण शोधावी लागेल.
11 Mar 2015 - 6:45 pm | सौन्दर्य
मस्त, हलका फुलका लेख. आवडला.
11 Mar 2015 - 6:50 pm | आदूबाळ
अगदी थेट मंगला गोडबोले. शीर्षकापासून ते शेवटच्या टर्नपर्यंत. ये बात!
बादवे - लोकरंगमध्ये विनोदी कथांसाठी आवाहन येते आहे. त्यात पाठ्वून द्या.
12 Mar 2015 - 11:36 am | पलाश
+१००.
मस्त खुलवली आहे गोष्ट!!! :)
11 Mar 2015 - 7:09 pm | प्रचेतस
लै भारी
11 Mar 2015 - 8:05 pm | प्रियाजी
धमाल! गम्मत! घरोघरीचे अनुभव! लेख खुप आवडला.
11 Mar 2015 - 8:13 pm | प्रीत-मोहर
हा हा हा सॉल्लीडे हे
11 Mar 2015 - 8:52 pm | अत्रुप्त आत्मा
मी अत्ता एक गावी कामाला गेलो असता, तिकडे एका माणसानी आंम्हा सर्वजणांची झोप घनं घोरानी खराब केली होती.. मी तर पहिल्याच दिवशी त्याचे ताल-सूर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र.... तिथेच बोंबल्यावर रेर्कॉर्ड केले.. आणि दुसर्या दिवशी त्याला ऐकू जाइल असे दोन तिनदा वाजविले... पण त्याचेवर कोनताही ढीम्म परिणाम झाल नाही. :-/ मग आमच्या गण्याने रात्री त्याच्या नाकावर दहिवड्यावर मिरपूड टाकावी,तशी तपकिर टाकली... असे दोनदा झाल्यावर तो आमच्या हॉलमधून दुसरिकडे जाऊन झोपला. =)))))
11 Mar 2015 - 9:31 pm | हाडक्या
घोरी-ग्रस्तांचा केलेला असा छळ पाहून खूप दु:ख झाले बुवा.. :|
अशा घोरी-द्वेष्ट्यांचा निषेध..!!
11 Mar 2015 - 10:10 pm | अत्रुप्त आत्मा
@घोरी-ग्रस्तांचा केलेला असा छळ पाहून खूप दु:ख झाले बुवा.. :|>> अहो. काय करणार ? त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सांगूनंही ते दुसरीकडे झोपायला जाइनात. वर आंम्हालाच म्हणे.तुंम्ही जागा बदला..
मग घेतला त्याचा.....बदला! :D
11 Mar 2015 - 9:00 pm | स्वाती दिनेश
मस्त गोष्ट!
स्वाती
11 Mar 2015 - 9:05 pm | सामान्य वाचक
...
11 Mar 2015 - 9:24 pm | यशोधरा
मस्तच लिहिलंय! एकदम हलकं फुलकं! खूप हसले =))
11 Mar 2015 - 9:59 pm | अजया
कथा आवडलीच!
-अघोरी अजया!!
11 Mar 2015 - 10:40 pm | इशा१२३
जाम हसले!मस्त लिहिलेय.
12 Mar 2015 - 12:43 am | रुपी
मस्त मजेशीर लिहिले आहे!
12 Mar 2015 - 5:24 am | स्पंदना
लिव्ह इनचा फुगा असा आणि जरा फुगवुन फोडलास तर मावशे? लय भारी!!
पंचेस तर काय वर्णावे? अगदी खुद खुद्वुन गेले.
झकास!! बोले तो शॉल्लीड!!
12 Mar 2015 - 6:17 am | मुक्त विहारि
(घोरी) मुवि
12 Mar 2015 - 8:24 am | यसवायजी
यंव रे यंव!
झक्कास
12 Mar 2015 - 9:30 am | बोका-ए-आझम
कथा मस्त! एकदम प्रसन्न!
- (१२ ही स्वरांत घोरणारा) बोका-ए-आझम!
12 Mar 2015 - 9:40 am | खटपट्या
वा !! सरक सरक सरक, फुस्स्स sss.धपक धपक ढूss म्म,थिर्रर्र कुचूकुचू फटाक, फिस्स
12 Mar 2015 - 12:06 pm | सुप्रिया
खुसखुशित हलकी फुलकी कथा.
12 Mar 2015 - 12:56 pm | मितान
मस्त हलकीफुलकी आणि प्रसन्न गोष्ट !
घरातल्या घोरासुरांमुळे त्रस्त अघोरी मितान
12 Mar 2015 - 1:04 pm | गिरकी
मावशी, भाची आणि घोरपडे सगळेच आवडले आहेत :)
आता कुणी घोरत असलं की 'घुर्रर्र खिसखिस हुडूत ..हुडूत' करतंय की 'उडत उडत ढगात जा…' ते पाहण्यात येईल.
12 Mar 2015 - 4:11 pm | एस
पुरोगामी नवस्वातंत्र्यवळवळीवर घुर्र्र्रूक्कन् टीका करणारा प्रतिगामी लेख. णिशेद णोंदवण्यात आल्या आहे... ;-)
12 Mar 2015 - 4:23 pm | सस्नेह
हुडुत हुडुत ढगात ज्जा...!
12 Mar 2015 - 4:28 pm | एस
नवबूर्झ्वा...!
19 Mar 2015 - 5:25 pm | सस्नेह
वाचक आणि प्रतिसादकांना धन्यवाद !
ही कथा मराठी दिन स्पर्धेत द्यायची होती, खरं तर. पण काही कारणामुळे रेंगाळली.
तुमचे प्रतिसाद हेच बक्षिस ! +)
19 Mar 2015 - 5:30 pm | कविता१९७८
मस्त कथा
19 Mar 2015 - 6:34 pm | सुबोध खरे
फारच छान लिखाण आहे
प्रतिसाद द्यायचा राहून गेला.
आता रेल्वेच्या वातानुकुलीत डब्यातून अशा घनघोर लोकांपायी जाणे नकोसे वाटते. पूर्वी थंड झोप लागत असे. तसाच प्रश्न लग्न घरी सुद्धा येतो. एखादा माणूस घरर्ररर्र फुस्सस्स करत असेल तर रात्रभर जागे राहण्याचा प्रसंग येतो.
19 Mar 2015 - 7:26 pm | पैसा
मस्त खुसखुशीत कथा!
19 Mar 2015 - 7:55 pm | Mrunalini
हा हा हा... काय मस्त लिहलिये कथा.
20 Mar 2015 - 1:31 am | स्रुजा
अप्रतिम, ऑफिस मध्ये बसून पण पूर्ण वाचून काढायचा मोह आवरेना. काय मस्त लिहिलयेस. हसून हसून लोकांचं लक्ष वेधून घेतलं मी. आणि पंचेस तर लाजबाब.
20 Mar 2015 - 2:46 am | वॉल्टर व्हाईट
कथा आवडली. फार छान खुलवली आहे. भाचीचे निरागसपण कथेतल्या पात्रात तुम्हाला छान उतरवायला जमलेय.
(फक्त सध्याची यंगस्टर्स 'बूर्झ्वा' शब्द वापरायची नाहीत असे वाटुन गेले)
20 Mar 2015 - 10:48 am | सस्नेह
मलापण लिहिताना तसेच वाटले. पण दुसरा मॉडर्न शब्द सुचला नाही.
तुम्ही सुचवता ? माझ्या शब्दसंपदेत भर.. +)
20 Mar 2015 - 9:07 pm | वॉल्टर व्हाईट
IMHO, ईंग्रजीच वापरायचा झाला तर ऑर्थोडॉक्स सहज वाटतो.
21 Mar 2015 - 3:59 pm | एस
बूर्झ्वा हा शब्दच कित्येकांना माहित नसतो. पण एक काळ असा होता की मला हा चक्क मराठी शब्द वाटत असे. त्याचे मूळ फ्रेंच स्पेलिंग पाहिल्यावर धक्काच बसला होता. ही अतिशयोक्ती नसून पूर्वीच्या डाव्या विचारांकडे झुकलेल्या भारतीय विचारमनाची एक प्रचीती आहे. आता सगळंच पार बदलून गेलंय. :-)
21 Mar 2015 - 5:22 pm | आदूबाळ
:D अगदी अगदी.
मला फ्रेंच स्पेलींग (bourgeois) वाचूनही विशेष प्रकाश पडला नव्हता.
24 Mar 2015 - 12:40 pm | बॅटमॅन
अगदी अगदी!!!!!!!! मलाही तेच वाटायचं.
24 Mar 2015 - 12:44 pm | टवाळ कार्टा
हायला मलापण...च्यायला मराठी मिडियम मध्ये शिकूनपण हा शब्द एकदाही कोणत्या यत्तेत वाचला नव्हता
24 Mar 2015 - 12:55 pm | सस्नेह
'बूर्झ्वा' मध्ये जो दम आहे, तो 'ऑर्थोडॉक्स' मध्ये नाही असे वाटते +)
बूर्झ्वा म्हटलं की कसं श्या दिल्यासारखं वाटतं +D
24 Mar 2015 - 2:04 pm | बॅटमॅन
प्लीज़, डोंट गिव्ह एनी आयडियाज़! विग्रहबुद्धी अतिशय तीव्र आहे अत्रस्थांची. =))
24 Mar 2015 - 4:15 pm | टवाळ कार्टा
=))
20 Mar 2015 - 3:12 am | मधुरा देशपांडे
जबरदस्त लिहिलंय. एकेक पंचेस आणि डिटेलिंग. मस्तच.
20 Mar 2015 - 11:37 am | सविता००१
कसलं मस्त लिहिलं आहेस स्नेहाताई...
जाम हसले वाचून.
जबरदस्तच.
:))
20 Mar 2015 - 12:57 pm | ज्ञानोबाचे पैजार
अप्रतिम,
जबरदस्त लिवल आहे.
ते मावशी आणि स्वराचे हाटेलातले संवाद तर जबरदस्तच जमले आहेत आणि त्या संवादा दरम्यानच्या हलचालींचे वर्णन तर अशक्यच आहे.
लै भारी, लै म्हणजे लैच भारी.
पैजारबुवा,
20 Mar 2015 - 9:09 pm | अर्धवटराव
खुपच मस्त :)
पण एक प्रश्न पडलाय... लिव-इन डिसीजनपर्यंत पोचलेल्या बयेला घोरी प्रॉब्लेम माहित असुन नये? थोडं अवघड आहे हे स्विकारणं ;)
20 Mar 2015 - 10:41 pm | सस्नेह
वो ऐसन भय्या,
के आखिर पिक्चर और ट्रेलर मे कुछ तो फरक रैता हय ना ;)
21 Mar 2015 - 8:05 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
"घोर" लिवलया तै!!! =))
21 Mar 2015 - 5:13 pm | विवेकपटाईत
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी एवढी सुंदर गोष्ट वाचताना भयंकर मजा आली.
22 Mar 2015 - 9:40 am | श्रीरंग_जोशी
:-) .
विचित्र शीर्षकामुळे हा लेख आतापर्यंत उघडुन पाहिला नव्हता.
22 Mar 2015 - 10:01 am | जेपी
मस्त लेख वाचुन मजा आली..
(अघोरी) जेपी
22 Mar 2015 - 5:00 pm | भिंगरी
धमाल आली वाचताना. आणि लिवीन चा प्रश्न तर किती सहज सोडवलास.
+++++++++++++++११११११११११११११११
22 Mar 2015 - 5:22 pm | चाणक्य
मजा आली वाचताना. अंतु बर्वा मोड - लेखणीत मजा आहे हा तुमच्या
23 Mar 2015 - 6:35 am | जुइ
खुप हसले :))
24 Mar 2015 - 8:47 am | आनंदी गोपाळ
मस्त झालिये ष्टोरी. मज्जा आली वाचून.
आनंदाचे क्षण दिल्याबद्दल धन्यवाद!
24 Mar 2015 - 1:03 pm | क्रेझी
१नंबर आहे हा लेख मज्जा आली वाचतांना :)
25 Mar 2015 - 7:56 am | मनीषा
मजेशीर
मावशीचा सल्ला ... लै भारी
25 Mar 2015 - 1:56 pm | बाबा धुमाळ
गंमतीशीरच कथा झालीय ही. इडलीच्या तुकड्याच्या पोटात त्वेषाने काटा खुपसला आणि त्याला सुळावर चढवले. मग त्याला मिरचीची चटणी चाटवावी की सांबारात समाधी द्यावी, याचा तिने एक मिनिट शांतता पाळून विचार केला. अजूनही इडलीचा तुकडा सुळावर लटकत असलेला पाहून मी हळूच सांबाराची वाटी तिच्यापुढे सरकवली. इडलीच्या तुकड्याचा सांबारात कडेलोट करून मग त्याला पोटात सद्गती दिली. हे असच पूर्वी पु ल देशपांडे म्हणून एक होते ते लिहायचे.