दुलई.......

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
3 Mar 2015 - 3:31 pm

परवा दोशी फाऊंडेशनच्या नाट्यमहोत्सवाला जाण्याचा योग आला. त्यात शेवटच्या दिवशी नासिरुद्दीन शाह, रत्ना शाह व हिबा शहा यांनी सादर केलेल्या इस्मत चुगताईंच्या कथाकथनाचा कायम लक्षात राहील असा कार्यक्रम झाला. या तिघांनी त्या कथा त्यांच्या अभिनयाची जोड देऊन इतक्या बहारदारपणे सादर केल्या की बस ! अर्थात नासिरुद्दीन शाहच्या दिग्दर्शनाचा त्यात मोठा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही. पण सगळ्यात मोठा वाटा होता त्या कथांचाच.

आता खाली मी इस्मतआपाची एक कथा मराठीत अनुवाद करणार आहे ती त्यांनी १९४२ साली लिहिली. बाई मोठ्या हिंमतवान, समाजावर ढोंगीपणासाठी हलक्या फुलक्या विनोदाने टीकेचे आसूड ओढत. त्यांच्याबद्दल मी पुढे केव्हातरी लिहिनच. त्यांच्या काही कथांचा अनुवादही मी येथे करणार आहे. त्या कथा तुम्ही वाचल्या असतील. मला वाटते त्यांचे मराठीत अनुवादही झाला आहे. पण माझ्या दृष्टीने मी केलेला अनुवाद हा त्यांच्या स्मृतीस वंदन असणार आहे....

दुलई........

थंडीत जेव्हा जेव्हा मी स्वत:ला माझ्या दुलईत गुरफटून घेते तेव्हा त्या दुलईची सावली भिंतीवर एकाद्या हत्तीसारखी डुलते. ती सावली पाहताच माझ्या मनात भुतकाळातील काही आठवणी गर्दी करतात. उसळतातच म्हणाना. काळजी करु नका मी काही तुम्हाला माझ्या दुलईच्या कंटाळवाण्या आठवणींनी बेजार करणार नाही. कारण माझ्या दुलईच्या आठवणी तितक्या काही रम्य व मायेच्या नाहीत. सध्या वापरात असलेल्या ब्लँकेटच्या भिंतीवर नाचणाऱ्या सावल्या माझ्या मते दुलईच्या सावल्यांइतक्या इतक्या काही भयप्रद नसतात.

मी लहान होते तेव्हाची गोष्ट.

मी लहान असताना माझ्या भावंडांशी व त्यांच्या मित्रांशी मारामारी करत असे. मागे वळून पाहताना मी जरा जास्तच आक्रमक होते असे आता मला वाटते. आता माझे मलाच आश्चर्य वाटते की जेव्हा माझ्या वयाच्या मुली कोडकौतुक करुन घेण्यात मग्न असत तेव्हा मी मात्र समोर येणाऱ्या प्रत्येक मुलाशी किंवा मुलीशी पंगा घेत असे. माझ्या भांडणांना कंटाळून माझ्या अम्माने आग्र्याला जाताना एक आठवडा मला तिच्या मानलेल्या बहिणीकडे सोडले. ही तिची मानलेली बहीण एकटीच रहात असे व अम्माला खात्री होती की मला तेथे भांडण्यासाठी कोणीच नसणार. माझ्या भांडकुदळ स्वभावाचा कंटाळा येऊन मला एक प्रकारची शिक्षाच ठोठाविण्यात आली होती म्हणाना.

हीच ती बेगम जान जिच्या दुलईने माझ्या मनावर कधीही न पुसला जाणारा ओरखडा पाडला.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

बेगम जानच्या दरिद्री वडिलांनी तिचा निकाह एका म्हाताऱ्या नवाबाशी लावून दिला होता. कारण काय तर म्हणे तो अत्यंत धार्मिक होता. हे बेगम जानच्या वडिलांना कसे काय माहीत ? तर म्हणे त्यांच्या घरात आत्तापर्यंत कोणीही वेश्या शिरताना पाहिली नव्हती न कोणी नाचणारी बाई. त्यांनी हाजची यात्रा केली होती व मोहल्यातील बऱ्याच जणांना हाजची यात्रा करण्यासाठी आर्थिक मदतही केली होती.

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

या नबाबांना इतर नबाबी शोक नव्हते. ना त्यांनी कबुतरे पाळली होती ना त्यांना कोंबड्याच्या झुंजीवर पैसे लावायचा नाद होता. ते असल्या प्रकारांचा तिरस्कारच करीत. त्यांना एकच नाद होता तो म्हणजे त्यांनी त्यांच्या घरात अनेक तरुण सुकुमार, गोऱ्यापान, नाजुक चणीच्या मुलांना आश्रय दिला होता. त्यांचा सर्व खर्च ते मोठ्या आनंदाने उचलत.
बेगम जानशी निकाह झाल्यावर त्यांनी मोठ्या औदार्याने तिला लागण्याऱ्या सामानासह तिची रवानगी एका मोठ्या घरात केली व तेवढ्याच मोठ्या मनाने ते तिला विसरुनही गेले. बिचारी सुंदर नाजूक बेगम अनेक वर्षे एकांतवासात त्या घरात झुरत पडली होती.

बिचाऱ्या बेगम जानने या पृथ्वीतलावर जन्म घेऊन मोठी चुकच केली म्हणायची. परमेश्वराच्या या चुकीनंतर तिचे आयुष्य सुरु झाले का ती नबाबसाहेबांची बेगम झाली तेव्हा ? का त्या हवेलीतील अलिशान पलंगावर एकएक दिवस मोजत आपले आयुष्य कंठू लागली तेव्हा?. तिला एक विरंगुळा मात्र होता. तिच्या पलंगाजवळ असलेल्या खिडकीतून तिला नबाबाकडे येणाऱ्या मुलांच्या पोटऱ्या दिसत पण त्यामुळे तिला त्रासच होई. आपल्या नवऱ्याला स्वत:कडे खेचून आणण्यासाठी बेगम जानने काळी जादू, तंत्रमंत्र, ताविज असे सगळे उपाय करुन पाहिले. एवढेच काय तिने कित्येक रात्री कुराणातील आयातींचे पठणही केले पण दुर्दैव तिचे. या सगळ्याचा काहीही फायदा बिचारीला झाला नाही. दगडाला पाझर फुटत नाही हे तिला समजत नव्हते. शेवटी एकटेपणाला कंटाळून बेगमजान पुस्तकांकडे वळली. पण प्रणयकथा व भावनांनी थबथबलेल्या कथा वाचून तिची मानसिक अवस्था अजुनच प्रक्षुब्ध होई. या सगळ्याचा परिणाम म्हणून बेगम जानला निद्रानाश जडला. अनेक रात्री तशाच झोपेविना जाऊ लागल्या. प्रेमाची आस तिला झोपू देईना.

नबाबाला तिच्यासाठी वेळच नव्हता. ते आख्खा दिवस रेशमी सदरे घातलेल्या मुलांच्या मागे मागे करीत. ते जाऊदेत, ते बेगमला बाहेरही जाऊ देत नसत. बाहेरच्या जगाशी बेगमचा संबंध जेव्हा नातेवाईक भेटायला येत तेव्हाच येई. पण ते आल्यावर तिला हा तुरुंगवास आधिक प्रकर्षाने जाणवे. त्या पाहुण्यांचे स्वातंत्र्य बघून तिच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. पाहुणे पाहुणचार झोडत व गरमागरम चविष्ट पेयांचा आस्वाद घेत. बेगम जान मात्र तिच्या नव्या कोऱ्या दुलईत उदासवाणी, उसासे सोडत कुस बदलत तडफडे. तिच्या हालचालींमुळे भिंतींवर वेगवेगळ्या आकाराच्या सावल्या पडत पण त्या एकाही आकारात तिला तिचे भवितव्य दिसत नसे. हे असेच जगायचे असेल तर जगायचे तरी कशाला ? हे असले आयुष्य बेगम जानच्या नशिबात अल्लाने लिहिले होते. पण ती जगली.

तिला या निराशेच्या गर्गेतून बाहेर काढले रब्बूने.

थोड्याच महिन्यात तिने चांगले बाळसे धरले. गालावर चमक आली व तिचे सौंदर्य खुलून आले. त्या मरणावस्थेला पोहोचलेल्या बेगम जानच्या कुडीत जीव फुंकला तेलाच्या मॉलिशने. हंऽऽऽ तुम्हाला या तेलाची कृती कुठल्याही पुस्तकात मिळायची नाही याची मला खात्री आहे.

मी जेव्हा बेगम जानला प्रथम पाहिले तेव्हा ती चाळीशीची असेल. एका कोचावर पुढे रेलून बसलेली ती एखाद्या तैलचित्राप्रमाणे ती भासत होती. रब्बू तिच्या पाठीमागे तिची कंबर चोळत बसली होती. हे मॉलिश चालू असताना एखाद्या घरंदाज स्त्रीप्रमाणे तिने आपल्या पायावर एक शाल ओढली होती. महाराणीच जणू ! तिचा तो रुबाब पाहून मी अवाक झाले. तिच्या जवळ बसून तिच्याकडे बघत रहावेसे मला वाटू लागले. ती दिसतच होती सुंदर व खानदानी. तिचा वर्ण संगमरवरासारखा धबधबीत गोरा होता. संगमरवावर मधे एखादी रेष तरी असते इथे तीही नव्हती. तिचे केस दाट व काळेभोर होते. ती केसांना नेहमीच तेल लावे. केसांचा बरोबर मधे भांग पाडलेला असायचा. अगदी सरळ... काय बिशाद होती एखाद्या केसाची त्या भांगातून बाहेर येण्याची. काळ्याभोर, सलज्ज डोळ्यांवरच्या कोरलेल्या भुवयांची महिरप तिच्या चेहऱ्याला शोभून दिसे. तिच्या पापण्या दाट होत्या व त्या नेहमी वजनाने झुकल्यासारख्या दिसत. पण सगळ्यात आकर्षक होते ते तिचे ओठ. ती ओठांना नेहमी लिपस्टीक लावे पण ती सुद्धा एका विशिष्ठ पद्धतीने. तिच्या कपाळावर, बाजूला बटा रुंजी घालत. मी जेव्हा तिच्याकडे टक लाऊन बघत असे तेव्हा कधीकधी तिचा चेहरा बदले. त्यावेळी तो मला एखाद्या लहान मुलासारखा भासे.
तिची काया मुलायम, गोरीपान होती. त्यावर एकही सुरकती नसल्यामुळे ती गोरी काया तिच्यावर ताणून बसविल्याचा भास होत असे. जेव्हा ती मसाजसाठी तिचे गोरेपान पाय ताणत असे तेव्हा मी चोरुन त्या आरसपानी सौंदर्याकडे पहात बसायचे. तिचा उंच बांधा तिच्या खानदानी सौंदर्यात भरच टाके. तिचे हात मऊशार व नितंब उठावदार होते. रब्बू बेगम जानची पाठ तासन्तास चोळत असे जणू काही हा मसाज तिच्या जीवनाच्या मुलभूत गरजांपैकीच एक गरज होती. जसे जेवण तसा हा मसाज.

एक वेळ जेवण मिळाले नाही तरी चालेल पण मसाज कधी चुकायचा नाही...

रब्बूला घरात हा मसाज सोडल्यास दुसरे काही काम लावण्यात आले नव्हते. त्या कोचावर झुकून ती बेगम जानच्या कुठल्या न् कुठल्या अवयवाला मसाज करीत असायची. ते दृष्य बघताच मला कधी कधी अगदी शिसारी यायची. माझ्या शरिराला जर इतक्या वेळा कोणी हात लावला तर मी मरुन जाईन.

हा दररोजचा मसाज कमी होता की काय म्हणून स्नानाच्या दिवशी रब्बू, बेगम जानला खास तेलांनी व सुगंधित उटण्याने तब्बल दोन तास मसाज करायची. व तो इतका जोरजोरात असायचा की त्याची कल्पना करुनच मला मळमळायला लागायचे. दरवाजे त्या वेळेस बंद असायचे. तेलाचे दिवे पेटले की मसाज चालू व्हायचा. बहुतेक वेळा रब्बू एकटीच आत असायची. इतर मोलकरणी बाहेरुन तिला कुरकुरत का होईना, लागेल त्या वस्तू द्यायच्या.

बेगम जानला कातडीचा कसलातरी रोग जडला होता. तिच्या अंगाला भयंकर खाज सुटे. सर्व उपचार, अगदी युनानी, ॲलोपाथी, आयुर्वेद इ. उपचार करुन झाले पण ती खाज तिच्या सुंदर शरीरावर ठाण मांडून बसली होती. सर्व डॉक्टरांनी व वैद्यांनी तिला काही झालेले नाही याचा निर्वाळा दिला होता.
‘कदाचित कातडीच्या खाली कसलातरी संसर्ग झाला असावा’ असे त्यांचे म्हणणे पडले.
‘हे सगळे डॉक्टर वेडे आहेत बेगम ! तुला काहीही झालेले नाही. थोडी उष्णता झाली आहे एवढेच’ रब्बू, बेगम जानकडे डोळे मिचकावत, तिच्या मधाळ नजरेने बघत म्हणे.

जेवढी बेगम जान गोरीपान होती तेवढीच रब्बू काळीकुट्ट होती. तिचा काळा रंग तुकतुकीत होता. चेहऱ्यावर देवीचे व्रण असलेली रब्बू बुटकी, आडव्या बांध्याची होती. शिवाय तिचे पोट बेढबपणे सुटले होते. तिचे हात छोटे पण नाजूक होते. तिचे सुजल्यासारखे दिसणारे ओठ कायम ओले असत. तिच्या शरिराला कसलातरी उग्र दर्प येत असे. तिचे हात मोठ्या कौशल्याने बेगम जानच्या शरिरावरुन फिरत. कधी पाठ, कधी कंबर, मांड्या तर कधी नितंबावरुन. मी बेगम जान जवळ बसले की त्या हातांच्या सफाईकडे टक लाऊन पहात असे.

वर्षभर बेगम जान हैद्राबादी जाळीचा पांढरा कुडता व भडक रंगाचा पायजमा घाले. भर उन्हाळ्यातही ती अंगावर एखादी हलकिशी शाल ओढत असे. पण तिला हिवाळा भयंकर आवडे. मीही ‘अम्मा मला हिवाळ्यातच तिच्याकडे सोडू देत’ अशी अल्लाकडे प्रार्थना करायची. बेगम जान क्वचितच घराबाहेर जाई. गालिच्यावर लोळत, रब्बूकडून मसाज करुन घेताना सुकामेवा खाण्याचा तिला छंद असावा बहुतेक. बाकीच्या मोलकरीणींना रब्बूचा भयंकर हेवा व मत्सर वाटे. ‘चेटकीण मेली ! ती मालकिणीबरोबर उठते बसते, खाते पिते एवढेच काय झोपतेही’ त्या म्हणत व फिस्सकन हसत. फावल्या वेळात या चर्चांना अगदी उत येत असे. अर्थात बेगम जान जशी जगापासून अलिप्त होती तशी या गप्पांपासूनही अलिप्त होती. तिला याने काही फरक पडत नव्हता. तीचे आयुष्य स्वत:च्या व तिच्या त्या खाजेच्या भोवती केंद्रीत होते.

मी अगोदरच सांगितले आहे की मी त्या वेळेस खुपच लहान होते व बेगम जान मला आवडायची. तीही माझे लाड करायची. जेव्हा जेव्हा अम्मा आग्र्याला जायची तेव्हा तेव्हा ती मला बेगम जानकडे सोडायची. माझे उंडारणे व भावांशी मारामाऱ्या करणे हे प्रकरण माझ्या अम्माला झेपणारे नसावे. बेगम जानला ही हे मान्य असावे बहुदा. शेवटी अम्माने तिला बहीण मानले होते ना ! तेथे मला सोडल्यावर मी कुठे झोपणार हा प्रश्र्न उभा राहिला. अर्थात बेगम जानच्या खोलीतच माझी सोय करण्यात आली. तिच्या पलंगाशेजारीच माझी खाट टाकण्यात आली. त्या रात्री आम्ही अकरा वाजेपर्यंत गप्पा मारत पत्ते खेळत होतो. शेवटी डोळे पेंगुळायला लागल्यावर मी माझ्या अंथरुणावर आडवी झाले. रब्बू अजुनही तिची पाठ चोळत बसली होती. शीऽऽऽऽऽऽऽ मी मनात म्हटले व डोळे मिटले. रात्री केव्हातरी मला जाग आली. काळाकुट्ट अंधार पसरला होता. मी जराशी घाबरलेच. शेजारी पाहिले तर बेगम जानची दुलई आत एखादा हत्ती असल्यासारखी हलत होती.

‘बेगम जान’’ माझ्या तोंडातून शब्द फुटेना. तो हत्ती झुलायचा थांबला.

‘काय आहे?’ कुठूनतरी बेगम जानचा आवाज आला.
‘मला भिती वाटतेय !’

‘झोप आता. आयातुल कुर्सी म्हण !

मी ती आयात म्हणण्यास सुरवात केली पण मला पुढचे शब्द आठवेनात. खरे तर मला ती तोंडपाठ होती.

‘मी तुमच्याकडे येऊ का बेगम जान ?’

‘नाही ! झोप तू आता !’ तिने मला झटकून टाकले. तेवढ्यात मला कुजबुजण्याचा आवाज आला. हाय अल्ला ! तेथे दुसरे कोणीतरी होते. मी घाबरुन गेले.

‘बेगम जान आपल्या घरात चोर शिरलाय !

‘झोप हं बेटा चोरबीर काही नाही’ हा आवाज रब्बूचा होता. मी डोक्यावर दुलई ओढली. झोप केव्हा लागली ते माझे मलाच कळले नाही. सकाळपर्यंत मी रात्रीचे सगळे नाटक विसरुनही गेले. लहानपणी माझा भुताखेतांवर, सैतानांवर खूप विश्र्वास होता. मी रात्री उठून चालायलाही लागायचे. सगळे म्हणत की कोणी तरी मला झपाटले आहे. या सगळ्याची सवय असल्यामुळी मी रात्रीचा प्रसंग मागे टाकला. बिछान्यावर पहुडलेली उबदार दुलई व तिची सावली मला नेहमीप्रमाणेच निरागस वाटली.

पण दुसऱ्या रात्री मला कोणाच्यातरी हलक्या आवाजातील कुजबूजिने परत जाग आली. बेगम जान व रब्बू खालच्या आवाजात काहीतरी कुजबुजत होते. त्या काय बोलत होत्या ते मला निटसे ऐकू येते नव्हते पण काहीतरी धुसफूस चालली होती हे निश्चित कारण थोड्याच वेळात मला रब्बूच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. मग मांजर ताटली चाटताना जसा आवाज येतो तसा आवाज आला....माझी घाबरगुंडी उडाली. मी अल्लाचा धावा करत दुलईत गडप झाले.

दुसऱ्या दिवशी रब्बू तिच्या मुलाला भेटायला गेली. या कटकट्या मुलासाठी बेगम जानने खूप काही केले होते. त्याला एक दुकानही घेऊन दिले होते एवढेच नाही त्याच्या राहत्या गावात त्याला एक नोकरीही लाऊन दिली होती पण तो सदानकदा चिडलेलाच असायचा. नबाब साहेबांनीही त्याला काही काळ ठेऊन घेतला, त्याला कपडेलत्ते केले पण हा कृतघ्न जो पहिल्याच दिवशी पळून गेला तो रब्बूलाही भेटण्यास परत आला नाही. तो एका नातेवाईकाकडे आला आहे हे कळताच रब्बूने त्याला भेटण्याचे ठरविल्यावर मग बेगम जानलाही तिचे मन मोडवेना.

त्या दिवशी बेगम जान बेचैन होती. तिच्या शरिरातील सगळ्या सांध्यांनी तिच्याशी एकमदमच असहकार पुकारला. बरं तिला दुसऱ्या कोणाचा स्पर्षही सहन व्हायचा नाही त्या दिवशी तिने काही खाल्ले नाही. सगळा दिवस तिने पलंगावर लोळून काढला.

‘‘बेगम जान मी तुझी पाठ चोळून देऊ का ?’ मी न राहवून पत्याचा कॅट पिसता पिसता विचारले. तिने माझ्याकडे रोखून पाहिले.

"खरंच विचारतेय मी !’’ मी हातातील पत्ते बाजूला सारले आणि तिची पाठ चोळून द्यायला लागले. बेगम जान डोळे मिटून शांतपणे पडली होती. रब्बू दुसऱ्या दिवशी येणार होती पण ती आली नाही. इकडे बेगम जानची बेचैनी वाढली. डोके दुखायला लागल्यावर तिने चहाचे कपावर कप रिचविण्यास सुरुवात केली. मी परत तिची गुबगुबीत, मऊ पाठ चोळून देण्यास सुरुवात केली. तिच्या आपण उपयोगी पडतोय ही कल्पना मला सुखवून गेली.

‘हं जरा जोरात चोळ. बंद सोडून टाक !’ बेगम जान म्हणाल्या.

‘जरा अजून खाली खांद्याच्या खाली.....हं बरं वाटतय !’ उसासे टाकत त्या म्हणाल्या.
‘अजून खाली’ बेगम जान म्हणाल्या. तिचा हात तेथे पोहचत होता तरी ती मला तेथे चोळायला सांगत होती. पण ती मला तेथे दाबून देण्यास सांगत होती. तिची सेवा करते आहे या कल्पनेने मला मोठा अभिमान वाटला.

‘हं तिथेच ! बरोबर ! अग मला गुदगुल्या होतायेत’’ त्या हसत म्हणाल्या. मी आपली गप्पा मारत तिला मसाज करीत राहिले.

‘मी उद्या तुला बाजारात पाठवीन हं ! काय पाहिजे तुला ? ती डोळे उघडणारी बाहुली आणायची का?’’

‘नाही बेगम जान मी काय तुला अजून लहानच वाटते की काय ?’

‘अच्छा म्हणजे तू आता मोठी झाली आहेस म्हण की’’ ती हसत म्हणाली.

‘बरं आपण तुला बाहुला आणू बरका ! त्याला तू खूप सजव. मी देते तुला कापडं’’

‘चालेल’’ मी म्हणाले.’’

‘इथे !’’ तिने माझा हात घेऊन जेथे तिला खाजत होते तिथे ठेवला. मी आपली बाहुल्याच्या नादात तिथे चोळत राहिले.

‘‘ऐक ! तुला नवीन फ्रॉक आणायला लागतील आता. उद्या मी शिंप्याला बोलावणे पाठविते. आपण तुला नवीन फ्रॉक शिवून घेऊ. तुझ्या आईनेच माझ्याकडे कापड देऊन ठेवले आहे’’.

‘‘मला नको ते लाल कापड किती घाण दिसते ते !’’ हे बोलताना माझा हात नको तेथे घसरला. बेगम जान मात्र डोळे मिटून शांत पहुडली होती. ‘‘हाय अल्ला असे म्हणून मी माझा हात बाजूला झटकला.

‘‘जरा लक्ष दे. माझ्या बरगड्या दाबते आहेस तू. मोडशील एखादी’’ बेगम जान हसत म्हणाली. मला उगिचच शरमल्यासारखे झाले.

‘‘ये झोप माझ्याजवळ...’’ तिने मला जवळ घेतले. मी तिच्या हाताची उशी केली.
‘‘किती हडकुळी आहेस ग तू ! सगळ्या बरगड्या दिसताएत तुझ्या’’ असे म्हणून तिने माझ्या बरगड्या मोजण्यास सुरुवात केली. मी विरोध केल्यावर ती म्हणाली,

‘ये जवळ ये ! मी काही तुला खात नाहीये. आणि हा स्वेटर किती घट्ट होतोय तुला. अंगातही काही गरम घातले नाहीस’’. मला काहीतरी विचित्र वाटत होते.

‘माणसाला किती बरगड्या असतात ग ?’’ तिने विषय बदलला.

‘‘एका बाजूला नऊ व दुसऱ्या बाजूला दहा’’. मी माझे शाळकरी ज्ञान पाजळले.

‘‘हात बाजूला कर तुझा, आपण मोजुया...एक..दोन्....तीन.... !’’

मला तेथून पळून जावेसे वाटत होते पण तिने मला घट्ट धरुन ठेवले होते. मी तिच्या पकडीतून निसटायचा प्रयत्न केल्यावर बेगम जान जोरजोरात हसायला लागली. आजही तिचा तो चेहरा आठवला की माझा थरकाप उडतो. तिच्या कपाळावर व ओठावर घामाचे बिंदू जमा झाले होते व डोळे मिटले होते. तिचे हात थंडगार पडले होते. तिने तिची शाल बाजूला सारली. त्या कुडत्यात तिची रंगकांती कणकेच्या गोळ्यासारखी चमकत होती. कुडत्याची बटणे खुली होती व एका बाजूला ओघळली होती.

वेळ संध्याकाळची होती व अंधार पसरत होता. एका अनामिक भितीने मला घेरले. बेगम जानने माझ्याकडे बघताच मला रडू कोसळले. एखाद्या भुताने झपाटल्यासारखी ती मला एखाद्या कणकेच्या बाहुलीला दाबावे तशी सगळीकडे दाबत होती. मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण माझ्या घशातून शब्दही उमटला नाही. थोड्यावेळाने तिचा हा झटका ओसरला. तिचा श्वास जड झाला. तिचा चेहेरा पांढुरका व रोगट दिसू लागला. मला वाटले ही आता मरणार. मी तेथून पळ काढला....

नशिबाने त्याच रात्री रब्बू आली. घाबरुन मी लवकरच झोपले व डोक्यावरुन दुलई ओढली. पण मला झोप येईना. अम्मा आग्र्याहून येण्यास इतका वेळा का लावतीये कोणास ठावूक ! मी बेगम जानची एवढी धास्ती घेतली होती की मी सारा दिवस इतर मोलकरणींबरोबर घालवला. मला त्या खोलीत पाय टाकण्याची शरम वाटू लागली. मी कोणाला काय सांगणार ? कशी सांगणार की बेगमजान जी माझे एवढे लाड करायची तिलाच मी घाबरत होते.

त्या दिवशी बेगम जान व रब्बूमधे परत धुसफुस झाली. त्यामुळे वाईट इतकेच झाले की बेगम जानचे लक्ष माझ्याकडे वळले. मी ऐन थंडीत दिवसभर बाहेरच उंडारत होते हे लक्षात आल्यावर मी न्युमोनियाने मरेन अशी तिला भिती वाटली.

‘‘बाळा तुला माझ्या अब्रुचे धिंधवडे काढायचे आहेत का ? तुला काही झाले तर तुझ्या अम्माला काय उत्तर देऊ मी ?’’ तिने मला जवळ बसवले. शेजारच्या टिपॉयवर चहाची किटली आणि इतर सामान होते.

‘‘चहा बनव माझ्यासाठी ! तो पर्यंत मी कपडे बदलते’’ मी खाली बघून चहाचे घोट घेत होते. हल्ली ती मसाज घेताना मला बोलाविणे पाठवायची. मी जायची पण तिचा तो मसाज सुरु झाला की तेथून पळ काढायची. मला आता अम्माची जबरदस्त आठवण येऊ लागली. माझ्या भांडकुदळ स्वभावासाठी ही शिक्षा फारच होती. अम्माला माझे मुलांबरोबर खेळणे आवडत नसे. आता मला सांगा काय वाईट होते त्यात ? ते काय वाघ सिंह होते का मला खायला ? आणि कोण होती ही मुले? माझे भाऊ आणि त्यांचे लहान मित्र. अम्माचा मुलींनी मुलांमधे मिसळण्याला सख्त विरोध होता आणि इथे तर जगातील सर्व दुष्टांपेक्षा भयानक अशा बेगम जानशी माझी गाठ पडली होती. मला पळून जावेसे वाटू लागले. पण मी असाहय्य होते व शेवटी इच्छेविरुद्ध हे सहन करत होते.

बेगम जान त्या दिवशी अगदी नटून थटून बसली होती. अत्तरांचा अगदी घमघमाट सुटला होता. माझे लाड करु लागली. पण माझे आपले एकच पालुपद सुरु होते,
‘मला घरी जायचंय !’’

‘‘ये बस इथे ! आज आपण बाजारात जाऊया बरका.’’

पण माझे आपले एकच पालुपद ‘‘मला घरी जायचंय !’’ शेवटी मी रडू लागले. बाजारात मिळणाऱ्या सर्व खेळण्यांपेक्षा, खाऊपेक्षा मला घरी जायचे होते.

‘‘तुझे भाऊ तुला बदडून काढतील’’ हसत हसत बेगम जानने माझ्या गालावर चापट मारली.

‘‘चालेल मला !’’ मी रडत रडत म्हणाले.

‘‘बेगम जान कच्चे आंबे आंबट असतात’’ रब्बू फिस्सकारली.

ते ऐकल्यावर मात्र बेगम जानला कसलातरी झटका आला. जो सोन्याचा हार तिने मला थोड्यावेळापूर्वी देऊ केला होता त्याचे भिंतीवर आपटून तुकडे झाले. तिच्या मखमली दुपट्ट्याच्या चिंधड्या झाल्या व ज्या केसांची भांग सोडून बाहेर येण्याची हिंमत नव्हती त्या केसांच्या जटा झाल्या. त्या झटक्यामधे ती भेसूर किंचाळत होती. मी बाहेर पळाले.
बऱ्याच वेळेनंतर मिनतवाऱ्या काढल्यावर बेगम जान भानावर आली. मी तिच्या खोलीत डोकावून पाहिले तेव्हा रब्बू तिला मसाज करीत होती.

‘‘जुते काढा !’’ रब्बूने बेगम जानच्या बरगड्या दाबताना म्हटले. एखाद्या उंदरासारखी मी पटकन माझ्या दुलईत शिरले.
थोड्याच वेळात अंधारात तो विचित्र आवाज येऊ लागला. अंधारात मला बेगम जानची दुलई हत्तीसारखी झुलताना मला अंधुकशी दिसत होती.

‘‘अल्ला ! काय आहे हे !’’

त्या दुलईतील हत्तीने एकदम उसळी घेतली व खाली बसला. माझी वाचाच बसली. तो हत्ती परत झुलायला लागला. पण त्या दिवशी काही झाले तरी मी दिवा लावायचे ठरविलेच होते. हत्तीने परत उसळी घेतली. त्याला बहुदा उडी मारायची होती. परत जिभल्या चाटण्याचा आवाज आला जणू काही कोणीतरी लोणच्याचा आस्वाद घेते आहे. हं आता माझ्या लक्षात आले. बेगमजानने आज दिवसभरात काही खाल्ले नव्हते ना. त्या रब्बू चेटकणीने बेगम जानचा सगळा सुकामेवा गडप केला असणार. मी जरा वास घेण्याचा प्रयत्न केला पण अत्तर व हिनाच्या वासाशिवाय त्या खोलीत कसलाही वास येत नव्हता.
थोड्याच वेळात ती दुलई परत हलू डुलू लागली. आता तिने इतके भितीदायक आकार धारण करण्यास सुरुवात केली की माझी पाचावर धारण बसली. असे वाटत होते की एखादा मोठा बेडूक माझ्यावर उडी मारण्याची तयारी करतोय की काय !
न राहवून मी अम्माला साद घातली,

‘‘अम्मीऽऽऽऽऽऽ’’

पण कोणीही माझ्याकडे लक्ष दिले नाही. ती दुलई आता माझ्या मेंदूत शिरुन मोठी होत माझ्या मेंदूचे तुकडे करते की काय असे मला वाटू लागले. मी चाचपडत माझे पाय खाटेच्या दुसऱ्याबाजूला लांब केले व दिव्याचे बटन शोधले. मी बटन दाबले. त्या दुलईतील हत्तीने आतल्या आतच एक कोलांटी उडी मारली. दुसऱ्याच क्षणी ती हवा सोडलेल्या खेळण्यासारखी सपाट झाली. पण त्याने कोलांटीउडी मारतान दुलईचे एक टोक एक चांगले फूटभर वरती उचलले गेले...

‘‘या अल्ला ! या अल्ला !!!’ माझा श्वास कोंडला. गुदमरुन मी माझ्या दुलईत घुसले.....

मुळ लेखिका : इस्मत चुगताई.
चित्रे : अनुप कामत
भाषांतर : जयंत कुलकर्णी.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कपिलमुनी's picture

3 Mar 2015 - 3:53 pm | कपिलमुनी

भाषांतर छान जमले आहे . मूळ कथेचा बाज आणि सौंदर्य ( ?) टिकून राहिले आहे.
वाचताना उगीचच ब्लास्फेमी आठवले

अत्रन्गि पाउस's picture

3 Mar 2015 - 4:02 pm | अत्रन्गि पाउस

खतरनाक कथावस्तू आणि घट्ट शैली ....अतिशय अस्वस्थ करणारी कथा

सविता००१'s picture

3 Mar 2015 - 4:29 pm | सविता००१

अतिशय अस्वस्थ करणारी कथा
असंच म्हणते.

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 4:34 pm | टवाळ कार्टा

मचाक स्टैल?

कपिलमुनी's picture

3 Mar 2015 - 5:06 pm | कपिलमुनी

यू टू ?
एका लहान मुलीच्या नकळत्या वयात झालेल्या शोषणावर किंवा अनुभवावर बेतलेली संवेदन्शील कथा आहे.
तिला डायरेक्ट मचाकच्या लयनीत ?

दुर्दैवाने अशा घटना घडतात पण बोलल्या जात नाहीत.

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 5:18 pm | टवाळ कार्टा

मुनीवर...भावना पोचल्या माझ्यापर्यंत...पण कदाचित चित्रे मिपाच्या संस्कृतीत बसणार नैत आणि त्यामुळे धागा उडेल असे वाटले त्यामुळे... :)

जयंत कुलकर्णी's picture

3 Mar 2015 - 5:23 pm | जयंत कुलकर्णी

टकासाहेब, तुम्हाला इस्मत चुगताईंबद्दल किती माहीती आहे याची कल्पना नाही. पण असती तर तुम्ही हे वाक्य कदाचित लिहिले नसते. अर्थात हा माझा भ्रमही असू शकेल.......

जयंत कुलकर्णी's picture

3 Mar 2015 - 5:25 pm | जयंत कुलकर्णी

तुमचा खालचा प्रतिसाद वाचून माझा तो भ्रम होता हे निश्चित केल्याबद्दल धन्यवाद !

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 6:02 pm | टवाळ कार्टा

नाही...काहीच नाहिये...मी फक्त मिपाच्या आजवरच्या माझ्या अनुभवातुन प्रतिक्रिया लिहिलेली...नाही आवडल्ली तर संमंने माझे सगळे प्रतिसाद (या धाग्यावरून) उडवावे

जयंत कुलकर्णी's picture

3 Mar 2015 - 6:08 pm | जयंत कुलकर्णी

त्यापेक्षा इस्मत चुगताईंचे लेखन व त्यांच्याबद्दल वाचलेत तर बरे होईल.
प्रतिसाद राहुदेत....ते येथे असले म्हणजे जरा नोंद राहील आणि पुढे लेखकांना असले मचाक येथे टाकू नये याची ताकिदही राहील......
:-)

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 6:12 pm | टवाळ कार्टा

नक्की...आणलैन है का कै?

पिलीयन रायडर's picture

3 Mar 2015 - 6:11 pm | पिलीयन रायडर

अरे पण माणसा लेख कुणी टाकलाय ते ही बघ ना..
बरं ते ही सोड.. लेखन किती दर्जेदार आहे हे वाचुन कळतेच ना.. मग इतक्या चांगल्या लेखावर "मचाक" टाईप प्रतिक्रिया? खरंच.. वाईट वाटलं..

काका.. अत्यंत सुंदर अनुवाद!! धन्यवाद

जयंत कुलकर्णी's picture

3 Mar 2015 - 6:23 pm | जयंत कुलकर्णी

टकासाहेबांची काही चूक नाही. जनरेशन गॅप का काय म्हणतात ते आहे ते. ही गॅप नुसती वयातच पडत नाही...हे लक्षात घ्यायला हवे..... चूक माझी आहे.

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 6:36 pm | टवाळ कार्टा

कशाला आणखी खिजवताय... :(
आता माझा १ आठवडा मिपासंन्यास (उद्यापासून सुरू)

जयंत कुलकर्णी's picture

3 Mar 2015 - 6:54 pm | जयंत कुलकर्णी

अरे काय......

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 9:49 pm | टवाळ कार्टा

मिपाच्या लेटेस्ट फ्याशननुसार संन्यास घेतोय...मला म्हैतै जास्त वेळ दूर नाही राहू शकत...पण वाचनमात्र राहीन

स्पा's picture

3 Mar 2015 - 9:57 pm | स्पा

संन्यास अगदी कायमचा घेतलात तरी मिपा ला का ही... फरक पडणार नाहीये :D

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 10:04 pm | टवाळ कार्टा

मी कधी म्हणालो तसे
बाकी चालूदे...

जो गरजते है वो बरसते नही!! =))))

सविता००१'s picture

4 Mar 2015 - 12:46 pm | सविता००१

टका, खरच, पहायला हवं होतंस लेख कुणी टाकलाय ते.
तुम्हारा चुक्याच!! :(

माम्लेदारचा पन्खा's picture

3 Mar 2015 - 4:51 pm | माम्लेदारचा पन्खा

विश्वेश्वरा.....

टवाळ कार्टा's picture

3 Mar 2015 - 5:18 pm | टवाळ कार्टा

कथेच्या अनुशंगाने या अल... असे म्हणावे :)

माम्लेदारचा पन्खा's picture

4 Mar 2015 - 11:13 am | माम्लेदारचा पन्खा

चित्रं नसती तरी चाललं असतं.....चुकीचा पायंडा नको पडायला..

धुण्या पुसण्याच्या कवींनी काय करावं मग? :-))

प्रचेतस's picture

3 Mar 2015 - 6:27 pm | प्रचेतस

कथा आवडली.
इस्मत चुगताई हे फक्त नाव ऐकलं होतं, त्यांच्या कथांचा परिचय आतापर्यंत मात्र कधीच झाला नव्हता.

अन्या दातार's picture

4 Mar 2015 - 4:36 pm | अन्या दातार

असेच म्हणतो.

सानिकास्वप्निल's picture

3 Mar 2015 - 6:39 pm | सानिकास्वप्निल

भाषांतर छान जमले आहे.
इतर कथांचा अनुवाद ही वाचायला आवडेल.

चुकलामाकला's picture

3 Mar 2015 - 7:17 pm | चुकलामाकला

अनुवाद आवडला, पण कविता महाजननी पण केलाय ना अनुवाद?
पूर्वी वाचलेला आठवतोय.

विशाखा पाटील's picture

3 Mar 2015 - 7:33 pm | विशाखा पाटील

अनुवाद आवडला. पुढील कथांच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

3 Mar 2015 - 8:06 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कथेचा सुंदर अनुवाद !

मूळ कथा वाचली नाही, पण अनुवाद आवडला.

मधुरा देशपांडे's picture

3 Mar 2015 - 9:44 pm | मधुरा देशपांडे

अनुवाद आवडला.

धडपड्या's picture

3 Mar 2015 - 11:15 pm | धडपड्या

मागे कुठेतरी मेणाचा पुतळा की तत्सम नावाची कविता वाचलेली.. ती त्या मुलांचे मनोगत सांगत होती.. त्यावेळेसच मनावर एक चरा उमटलेला... हे वाचून तो आणखीनच खोलवर गेलाय... जबरदस्त लिखाण, आणि त्यपेक्षा अनुवाद...

संदीप डांगे's picture

3 Mar 2015 - 11:50 pm | संदीप डांगे

लेख वर आणन्याची गरज आहे.

अनुवाद चांगला आहे हे खरंच असलं तरी हल्ली मिपावरही काय लिहीलंय पेक्षा कुणी लिहीलंय हे महत्त्वाचं असतं का असं वाटून गेलं!! उद्या हाच लेख कोण्या इतर आयडीने टाकला असता तर त्याकडेही एक सुंदर अनुवाद म्हणून पाह्यलं गेलं असतं का, हा प्रश्न पडला.

पिलीयन रायडर's picture

4 Mar 2015 - 4:35 pm | पिलीयन रायडर

हा लेख तरी इतका व्यवस्थित आहे, की मला वाटत नाही की जयंत काकांच नाव असतं काय किंवा नसतं काय, प्रतिसादांमध्ये फरक पडला असता. मुळ लिखाणच दर्जेदार आहे.. त्यात काकांनी सुद्धा संयत शब्दात अनुवाद केला आहे. विषय गंभीर आहे.. चावटपणा करायचा म्हणुन मुद्दाम लिहीलेलं नाही (ते कुणी एक डॉक्टर होते ना.. तसे लेख..)..

तस्मात.. दाद लेखाच्या दर्जाला जात आहे.. लेखकाला नाही..

पिराशी सहमत.कथा आवडली.पुढचे अनुवाद टाकाच काका.पुकप्र.

चुकलामाकला's picture

5 Mar 2015 - 8:45 am | चुकलामाकला

सहमत!

चुकलामाकला's picture

5 Mar 2015 - 8:47 am | चुकलामाकला

सूड साहेबांशी सहमत असे म्हणायचे होते

स्नेहल महेश's picture

4 Mar 2015 - 3:13 pm | स्नेहल महेश

अनुवाद आवडला

नाखु's picture

4 Mar 2015 - 3:57 pm | नाखु

शिवाय अनुभव विश्व मनातल्या कोंडमार्‍यासमवेत समर्थपणे मांडल्याबदाल विशेश धन्यावाद

पैसा's picture

4 Mar 2015 - 5:22 pm | पैसा

अतिशय संयत शब्दात आणि खोल जखम करणारा अनुवाद.

फार सुरेख अनुवाद! पैसा ताईंनी म्हटल्याप्रमाणे संयत आणि खोल जखम करणारा!

कानडाऊ योगेशु's picture

4 Mar 2015 - 8:16 pm | कानडाऊ योगेशु

परिणामकारक अनुवाद आहे.
ह्यावरुन फायर आठवला.

मनीषा's picture

4 Mar 2015 - 10:33 pm | मनीषा

चांगला आनुवाद .
मूळ कथा वाचली नाहीये . पण तुम्ही केलेल्या अनुवादामुळे इतर भाषेतील साहित्य वाचायला मिळते आहे.

जयंत कुलकर्णी's picture

5 Mar 2015 - 9:09 am | जयंत कुलकर्णी

सर्वांना धन्यवाद !

खटपट्या's picture

5 Mar 2015 - 11:20 am | खटपट्या

मा कथा खूप आवडली. माझं मराठीतलं खूप वाचायचं राहीलंय याची जाणीव झाली..
चित्रे कोणी काढली आहेत कळेल का?

बॅटमॅन's picture

5 Mar 2015 - 11:33 am | बॅटमॅन

अतिशय परिणामकारक कथा. चुगताईंचे नावच फक्त ऐकून होतो आजवर.

स्मिता चौगुले's picture

5 Mar 2015 - 1:13 pm | स्मिता चौगुले

http://hindisamay.com/kahani/Indexkahani.htm या लिंकवर इस्मत चुगताईंचे लेखन(हिंदीमध्ये) आहे बरेचसे.

महासंग्राम's picture

1 Apr 2016 - 2:17 pm | महासंग्राम

वाह ... खूब सही भाषांतर केलय काका !!! १९४२ साली अशी कथा लिहायला प्रचंड हिम्मत लागली असेल ..

नाना स्कॉच's picture

1 Apr 2016 - 2:56 pm | नाना स्कॉच

_____/\______

उगा काहितरीच's picture

1 Apr 2016 - 3:32 pm | उगा काहितरीच

बापरे १९४२ ला ही कथा ! डेरींगबाज होत्या की लेखिका . बाकी कथा अप्रतिम आणी अनुवादही छानच जमलाय.

सुबक ठेंगणी's picture

25 Aug 2016 - 10:31 am | सुबक ठेंगणी

इस्मत आपाची "लिहाफ" कथा इंग्रजीतून आणि हिंदीतूनही वाचली आहे.
ही कथा लिहिल्यावर कामक्रीडा, समलैंगिकता वगैरे धर्मबाह्य आणि बंडखोर विषयांवर लिहिल्याबद्दल जाहीर माफी मागावी म्हणून इस्मत आपांवर बराच दबाव आला. कोर्टात केसही लढावी लागली. त्या ती स्वतःच लढल्या आणि तथाकथित धर्मरक्षकांना कथेत कामक्रीडेशी थेट संबंधीत एकही शब्द दाखवता न आल्यामुळे केस जिंकल्यादेखील.
काकांनी इस्मत आपांविषयी लिहावं ही नम्र विनंती.