दगडाचे सुप : एक भावांतरीत रशियन लोककथा

कैलासवासी सोन्याबापु's picture
कैलासवासी सोन्याबापु in जनातलं, मनातलं
13 Feb 2015 - 5:40 pm

उरल डोंगररांगा रशिया देशाच्या पश्चिमेला आहेत व पार उत्तर दक्षिण पसरलेल्या आहेत, ह्या पर्वतराजीतल्या उत्तरेकडच्या टोकाला भयानक थंडी असते, तिकडच्याच एका गावात घडलेली ही गोष्ट. नादिया नावाची एक म्हातारी स्त्री गावाबाहेर आपल्या रानातल्या प्लम व चेरींच्या टुमदार बगिच्यात लहानशी बंगली बांधुन राहात असे, दुर्दैवाने तिचा मुलगा तुर्कांसोबतच्या युद्धात दुर दक्षिणेला कॉकेशस पर्वतांमधे झालेल्या एका युद्धात झार मालकांसाठी मरण पावला होता, व तिचा नवरा एकदा उरल मधेच तावदा नदीत मासे पकडायला गेला असताना मरण पावला होता "ग्रेगोरी गेला" हे ऐकुनच तिला धक्का बसला होता. अशी ही म्हातारी नादिया म्हातारवयामुळे व आलेले संकटाचे डोंगर झेलुन थकल्यामुळे आजकाल तिरसट व चिडचिडी झाली होती परवाच तिने व्होल्गा पारिचेव्होबा चा मुलगा इवान ह्याला घोड्याच्या वादीने फ़ोडले होते कारण त्याने नादियाच्या बागेतील एक चेरी चा घोस तोडुन खाल्ला होता. सबंध गाव तिला घाबरुनच असे. मुलगा व नवरा दक्षिणेला गेले व देवाने हिरावुन घेतले म्हणुन ती दक्षिणेतुन आलेल्या कोणाचा ही रागराग करित असे. वरतुन ती गावाच्या उत्तर टोकाला राहात असे म्हणुन ती दक्षिणेला वसलेल्या गावचा व गावक~यांचा पण राग करीत असे.
अशीच एकदा नादिया रात्री झोप येत नाही म्हणुन बायबल वाचत बसली होती. तोच तिच्या दारावर टकटक झाली, म्हातारी नादिया तिरीमिरीत उठली व दार वाजवुन घाबरवणा~या पोराला बोल लावायचे म्हणुन दार उघडले तो काय नवल, तिला एक तरुण शिपाई दिसला, बर्फ़-पाण्यात भिजलेला तो जीव करुण झाला होता, पण नादियाच्या खाष्ट स्वभावाला तोड नव्हती.
"काय आहे?? इतक्या रात्री काय खुशाल दारे बडवताय"
"माय, मी दुर सैबेरीयातुन आलोय ग, तिकडे छावणी होती माझी, मी माझा घोडा हरवला म्हणुन आमच्या कर्नल ने मलाच तो शोधुन द्यायचा आदेश दिला . तो दिला व आता मी सुट्टीवर घरी जातो आहे, मी मुरमान्स्क चा आहे, फ़िनलंड देशाच्या सरहद्दीवर आहे माझा गाव."
"हे बघा माझ्या कडे तुम्हाला काही मिळणार नाही सांगुनठेवते. नसती नाट्के करु नका व्हा चालते"
तसे त्या शिपायाची मुद्रा अजुनच काळवंडली. गयावया करीत तो म्हणाला
"नका नका माय असे म्हणु नका तुमच्या गावच्या शिवेवरच माझा पाय मोडलाय हो, दया करा, पुर्ण गावात फ़क्त तुमच्या टेकडीवरच्या घरातच दिवा दिसला म्हणुन आलोय मी"
"नाही त्रिवार नाही, मर तुझ्या कर्माने जा चालता हो" असे म्हणत नादिया दार धडकणार इतक्यात तो बोलला
"माय, ऐकुन तरी घे ग, बघ माझ्या पिशवीत सगळे आहे, मला फ़क्त तुझी ओसरी दे व एक जग भरुन पाणी दे, मी माझे दगडाचे सुप करुन पितो अन झोपतो तुझ्याच पडवीत, सकाळी उठुन जाईन माझ्या वाटेने", तेव्ढ्यात दुर डोंगरात एक लांडग्याची बांग ऐकुन म्हातारी पण थोडी द्रवली. खरे तर तिचे कुतुहल चाळवले गेले होते
ती लगबगीने एक जगभरुन पाणी घेऊन आली, येताना पुटपुटतच आली "काय पण म्हणे थेरं, अन दगडाचे सुप म्हणे"
"काय रे दगडाचे कधी होते का सुप??"
"हो माय, हा खास दगड आहे, मी एकदा युद्धात जखमी झालो होतो तेव्हा मी सेंट पिटर ची मनापासुन करुणा भाकली होती तेव्हा मला शांत झोप पण लागली अन दुसरे म्हणजे उठलो तेव्हा माझ्या उजव्या मुठीत हा दिव्य दगड होता."
"बघु बघुच तुझे हे दिव्य दगडाचे सुप म्हणुन म्हातारी नादिया दाराच्या उंब~यावर ठाण मांडून बसली"
गडी कामाला लागला, पहिले त्याने जवळच्या काही काड्या गोळा केल्या त्यांची आगोटी तयार करुन त्यावर सैनिक शिधा शिजवत ते भांडे ठेवले. त्यात खुप जपुन कोटाच्या आतल्या खिश्यात ठेवलेला एक वाटोळा गोटा ठेवला व म्हातारीने दिलेले पाणी त्यात ओतले.
"माय, हे सुप ढवळायला तुझ्याकडे पळी असेल काय ग?"
"काय कटकट आहे, माझ्याकडे नाहीये काही पळीबिळी" असे म्हणत म्हातारी उठली व शेवटी पळी घेऊनच आली "हे घे शिपुर्ड्या, अजुन काही मिळायचे नाही सांगुन ठेवते"
बराचवेळ गडी पाणी ढवळत बसला. मग हळुच स्वगत बोलल्यागत बोलला "सफ़रचं...... चक्चक चक"
चौकस झालेली म्हातारी म्हणाली "काय रे काय म्हणालास तु?"
"काही नाही माय, ह्या सुपात जर सफ़रचंदाच्या फ़ोडी घातल्या तर असली लज्जत येते, पण जाऊ दे तुझ्याकडे कुठली ह्यावेळी सफ़रचंद असणार ग" असे म्हणुन तो पाणी ढवळत बसला...
"नाही का म्हणुन आहेत माझ्या कडे सफ़रचंदे थांब आणते," म्हणत म्हातारी घरात पळाली व तीन सफ़रचंदांच्या चांगल्या फ़ोडी करुन घेऊन आली "पुरेत काय रे?
"बख्खळ झाली माय बस कसे आहे सफ़रचंदांनी गोडमिट्ट होते ग दगडाचे सुप, म्हणुन मी किनई त्यात दोन चार बटाटे घालत असतो, पण नसतील तुझ्याकडे बटाटे..... असो"
शिपाईगड्याचे बोलणे ऐकुन ते संपायच्या आतच म्हातारी बटाटे चिरायच्या उद्योगाला लागली होती, दोन बटाटे पुरेत ग माय त्याने स्वयंपाकखोलीत असणा~य़ा नादियाला ओरडुन सांगितले.
बटाटे टाकुन पण तो काही काळ ते सुप ढवळत बसला, थोड्या वेळाने हसुच लागला तसे म्हातारी नादिया चिडुन म्हणाली
"हसायला काय झालंय तरी काय मेल्या???"
"काही नाही ग माय, ह्या सुपात किनई बोकडाचे खारवलेले मांस फ़ार मस्त लागते व लज्जत वाढवते, सैबेरीयाच्या छावणीत तर बोकड नसला तर आम्ही ह्यात रेंडीयर टाकत असु...ते आठवले अन हसलो बघ"
"देऊ का तुला खारवलेलं बोकडाचं मांस?" "
"नको नको माय कश्याला उग्गीच तुला त्रास" असे म्हणुन तो सुप ढवळत बसला........
"त्यात कसला आला आहे त्रास म्हणत नादिया उठली व चांगली खारवलेली कलेजीच घेऊन आली"
मटण टाकुन तो तसाच ढवळत बसला, थोड्या वेळाने घाबरा झाला तसे नादिया म्हणाली "काय रे असा का घाबरा झाला तु?"
"मी जातो माय....."
"ते काही नाही आधी कारण सांग, ते सुप पुर्ण कर अन मग मर कब्रस्तानात जाऊन"
"अगं, मला सेंट पिटर चा आदेश आहे ग, ह्या दैवी सुपात जर मी कांदा नाही घातला तर मला नरकवास होईलच पण मला लांडगे फ़ाडुन खातील अन मगच मी मरेन. आता तुला कांदे मागणे काही मला रुचत नाही, त्यापेक्षा मी पळतोच कसा!!!!!"
"थांब मेल्या , बीनकांद्याचा मेलास तर माझ्या डोक्याला मढ्याचा ताप होईल तुझ्या" असे म्हणत नादिया २ कांदे चिरुन घेऊन आली
"माय तु जीव वाचवलास बघ माझा!!!!!!"
"झाले का रे बाबा तुझे दिव्य सुप???"
"थोडा धीर धर माय"........
थोड्यावेळाने तो एकदम उठला व जोरजोरात नकारार्थी मान हलवत जायला लागला
"ए बाबा काय झाले?"
"अग माय हे सुप करायच्या आधी त्यात २ चमचे लोणी, चिमुटभर मीठ व काळी मिरी नाही घातली तर पुर्ण सुप खराब होते. व ते देवाचे नाही सैतानाचे सुप होते, असो आजचा दिवसच खराब आहे, येतो मी"
तो जोडे घालेस्तोवर म्हातारी विचारमग्न झाली व हळुच म्हणाली "मागुन मीठ-मिरी-लोणी" घातले तर नाही का चालत रे?"
"अग पण ते आहे का तुझ्याकडे? नाही उगाच तुला कश्याला त्रास"
"नाही नाही त्रास कसला.... देवाचे काम सैतानाचे व्हायला नको, मला पण थोडे पुण्य लागु देत की"
मीठ मिरी लोणी आले, तसे सुपचा रंग मस्त खुलुन आला.... व ते उकळु लागले.
"आता झाले का रे ते सुप??"
"हो "आई" ते सुप झाले आहे"
"आई" अरे देवा अंधारात अधु डोळ्यांना दिसले नाही खरे आहे पण मी आवाजही कसा विसरले..... अरे तु तु तु माझा मिखाईल... अरे तु जिवंत..... मिखाईल!!!!!"
म्हातारी ढसाढस रडु लागली तसे पोरगा म्हणाला. "आई, मी वारल्याची अवाई उठली ..... काही दिवसांनी बाबा पण गेले..... पण तुला देवाने चांगले आरोग्य दिले होते ना? म तु अशी का झालीस???, हे बघ आई देवाने आपल्याला सगळे दिले असते आपणच ते शोधु शकत नाही, घरात सफ़रचंदापासुन ते लोण्यापर्यंत सगळे आहे पण जर ते काढण्याची वृत्तीच आपल्याकडे नसेल तर कसे होणार माऊले????"
"आज मी गावात आलो ते कुठे न जाता घरी यायला निघालो तसे व्होल्गा परिचेव्होबा भेटली, ती म्हणाली तु खुप खाष्ट झाली आहे व नवरा-मुलगा गेल्या पासुन तु दैवाला दोष देत जे चांगले आहे ते न पाहता देखील सारखी चिडत असतेस, म्हणुन तुला समजवायसाठी हे सुप पुराण केले बघ".... म्हातारी आता शांत पणे घळा घळा डोळ्यातन आसवे गाळत होती
ती हळुच उठली येशुच्या तसबीरीपुढे उभी राहीली व कन्फ़ेशन देऊ लागली... तसे मिखाईल सुप घेऊन आत आला थोड्या वेळाने दोघ मायलेकरु गरम ऊन सुप पिउन झोपी गेले.
सकाळी नादिया उठली कधी नव्हे ते तिने आरश्यात स्वतःलाच हसताना पाहिले व स्वतःच हरखली, ती टोपले घेऊन बागेत गेली भरघोस लहडलेल्या चेरीं मधुन तिने टोपलीभर चेरी तोडल्या व व्होल्गा मावशीच्या दारात उभी राहुन हाळी दिली
"व्होल्गाsssssss कुठेस गं????"
आता भांडायचे असा विचार करुनच ती पण बाहेर आली, तो काय!!! आक्रित व्हावे तसे नादियाने वाकुन तिच्या हाताचा मुका घेतला व म्हणाली "माफ़ी मागायला आले मी"
"जाऊ द्या ना काकी काय तुम्ही पण ,मी लहान आहे माझी कसली माफ़ी मागताय" असे व्होल्गाही म्हणाली..
असे म्हणुन टोपली भर चेरी इवान ला देऊन म्हातारी प्रसन्न मुद्रेने घरी आली
नादियाच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती, तिने जवळच्याच खेड्यातल्या एका सुंदर मुलीशी मिखाईल चे लग्न लावुन दिले व पुढे मुला-सुना-नातवंडात राहुन उरलेले आयुष्य मजेत घालवु लागली

ही कथा मी फ़ार म्हणजे फ़ार लहान असताना ऐकली होती, जशीच्या तशी नाही पण जशी आठवेल तशी गाभा तोच ठेवत पुनर्रचना करायचा हा माझा प्रयत्न आहे, मुळ कथेतली गावे व्यक्तिरेखा वेगळ्या आहेत, पण त्यातला रशियन लोककथेचा टच तसाच ठेवण्यासाठी मी माझ्या कल्पनेतली नावे व जागा घातल्या आहेत, नेहमीप्रमाणेच कथा काल्पनिक नाही पण पुर्नरचना करताना काल्पनिक झाली आहे थोडी, रशियन लोककथेवर आधारीत!!!!!!!!!!

कथाभाषांतर

प्रतिक्रिया

कविता१९७८'s picture

13 Feb 2015 - 5:51 pm | कविता१९७८

ही दुसर्‍या संस्थळावर प्रकाशित आहे का मी आताच या ३-४ महीन्यात वाचलीये.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 5:55 pm | डॉ सुहास म्हात्रे

आवडली !

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Feb 2015 - 6:37 pm | कैलासवासी सोन्याबापु

हो ही आधी इतरत्र प्रकाशित आहे ही कथा

सूड's picture

13 Feb 2015 - 8:32 pm | सूड

आवडली!!

अत्रन्गि पाउस's picture

13 Feb 2015 - 8:44 pm | अत्रन्गि पाउस

कित्येक दिवसांनी एक साधी सुधी 'गोष्ट' वाचली (कथा नाही ..कथा म्हणजे जरा व्यमिश्र वाटते त्यामानाने)...
खूप खूप बरे वाटले ...मनापासून धन्यवाद ...

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Feb 2015 - 9:30 pm | कैलासवासी सोन्याबापु

मी लहान असताना श्रीकांत गोवंडे ह्यांच्या एका बालकथा संग्रहात ही कथा वाचल्याचे धूसर स्मरत होते तशीच केली पुनरबंधणी

सोन्या, मिमवर ही कथा तेव्हा टाकली होतीस. आता मिम गायबलेच आहे राव..

कैलासवासी सोन्याबापु's picture

13 Feb 2015 - 9:33 pm | कैलासवासी सोन्याबापु

अरे वा आमच्या मीम पासून च्या कालाकांडया पाहिलेले लोक्स् आहेत म्हणाचे नाही इथे आनंद जाहला

मितान's picture

13 Feb 2015 - 9:50 pm | मितान

मीम वर वाचली होती कथा. खूपच मस्त !
अजुन असतिल अशा गोष्टी तर सांगा की...

हाडक्या's picture

13 Feb 2015 - 10:39 pm | हाडक्या

ह्या गोष्टीचे इतके वर्जन्स आहेत (मीच ३-४ वाचलेत) की बोलायची सोय नाही. फक्त दर वेळेस सैनिकच असतात दगडाचे सूप बनवणारे.. :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 10:44 pm | डॉ सुहास म्हात्रे

असुद्या हो. शेवटी काय, सूप चवदार झाले म्हणजे झाले :)

हाडक्या's picture

13 Feb 2015 - 10:53 pm | हाडक्या

शेवटी काय, सूप चवदार झाले म्हणजे झाले

अगदी अगदी..
गम्मत म्हणजे कालच रात्री याचे अजून एक वर्जन The Pragmatic Programmer या (तद्दन तांत्रिक) पुस्तकात वाचले म्हणून योगायोग जास्तच जाणवला..

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 8:00 am | कैलासवासी सोन्याबापु

बरोबर आहे हड़क्या भाऊ, ह्याची अनेक वर्शन आहेत! कारण मुळात ही एक "लोककथा" आहे ना!!! सामान्य जनतेत circulate होणारी सामान्य गोष्ट!

शब्दबम्बाळ's picture

14 Feb 2015 - 1:21 am | शब्दबम्बाळ

हि गोष्ट रविवार सकाळच्या सप्तरंग पुरवणीमध्ये मी चौथी पाचवीत असताना आली होती १५-१६ वर्ष होऊन गेली! :)
छान वाटलं पुन्हा वाचून…

अरे....दगडाची आमटी या नावाने ही गोष्ट वाचली होती. त्यात ठिकाणाबद्दल काही माहिती नव्हती. पण छान कथा होती खरी. हीही तशीच छान आहे.

श्रीरंग_जोशी's picture

14 Feb 2015 - 2:49 am | श्रीरंग_जोशी

छान रंगली आहे गोष्टं.

रुपी's picture

14 Feb 2015 - 2:51 am | रुपी

आवडली..

आनन्दिता's picture

14 Feb 2015 - 4:59 am | आनन्दिता

खुप लहान असताना ऐकली होती. खुप मस्त !!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 7:58 am | कैलासवासी सोन्याबापु

सर्वांचे मनःपुर्वक आभार देवानु!

अगदी साधी सरळ गोष्ट...लहानपणी वाचलेल्या गोष्टींसारखी.

धन्यवाद!

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 11:18 am | कैलासवासी सोन्याबापु

ह्या कथेचे एक वर्शन "किशोर" मधे ही आले होते बहुतेक!!

सुहास झेले's picture

14 Feb 2015 - 12:07 pm | सुहास झेले

मस्तच... अश्या हलक्याफुलक्या कथा वाचायला खूप मज्जा येते राव.... और आंदो :) :)

कैलासवासी सोन्याबापु's picture

14 Feb 2015 - 12:11 pm | कैलासवासी सोन्याबापु

अण्णा आले अण्णा आले दिल्लीत न जाता इकडे आले

आभारी आहे देवा!!

विनिता००२'s picture

14 Feb 2015 - 1:27 pm | विनिता००२

मस्त गोष्ट! अजून येवू देत.

सविता००१'s picture

14 Feb 2015 - 2:02 pm | सविता००१

मासिकात वाचली होती अशीच काहीशी कथा. छान आहे.

जेपी's picture

14 Feb 2015 - 2:29 pm | जेपी

आस

आवडली कथा.

hitesh's picture

14 Feb 2015 - 4:58 pm | hitesh

बहुतेक इयत्ता सातवीच्या पुस्तकात आहे.. मराठी माध्यम तिसरी भाषा

विवेकपटाईत's picture

14 Feb 2015 - 6:13 pm | विवेकपटाईत

कदाचित वीस वर्षांपूर्वी ही कथा वाचली होती. आज ही वाचताना तेवढाच आनंद मिळाला. धन्यवाद

ज्योति अळवणी's picture

14 Feb 2015 - 6:40 pm | ज्योति अळवणी

आवडली कथा

अर्धवटराव's picture

14 Feb 2015 - 8:45 pm | अर्धवटराव

रशीयन ग्रामीण बाज आणि मराठी संवादांचं योग्य बॅलन्स झालय.
कथा आवडली.