"नाही असेच. संध्याकाळी कुठेतरी कॉफी प्यायला भेटलो असतो."
"अम्म्म, उद्याचा दिवस मी थोडी बीजी आहे. पण रात्री जेवणासाठी आपण भेटू शकू. नाहीतर असं कराना, तुम्ही माझ्या घरी रात्री जेवायला या. तुम्हाला काही प्रोब्लेम नसेल तर."
"ओह, नो प्रोब्लेम, मला नक्की यायला आवडेल."
"ठीक आहे उद्या मी दुपारपर्यंत कळवते"
"ओके" डॉक्टरांना जे हवं होतं तसंच होत होतं.
--------------------------------------------------------------------------------------
पुढे चालू...
मार्थाने डॉक्टरांना हॉटेलवर सोडलं आणि ती आपल्या घरी गेली. डॉक्टर रूमवर येवून विचार करू लागले. योजना बनवू लागले. जॉनच्या वेळेला केलेली घाई त्यांना या वेळेला करायची नव्हती. जर संधी मिळाली तरच विषय काढायचा आणि प्रात्यक्षिकापर्यंत पोहचायचं. जर संधी नाही मिळाली तर विषय न काढता तिला काहीच संशय येणार नाही या बेताने जेऊन परत यायचं असं डॉक्टरांनी ठरवलं. रात्री विचार करता करता त्यांना कधी झोप लागली ते कळलं नाही.
दुसऱ्या दिवशी आपल्या प्लानची डॉक्टरांनी मनामध्ये उजळणी करायला सुरवात केली. त्याना डोब्रावर संशोधन करायचे होतेच पण मनातून मार्थाही त्यांना विलक्षण आवडली होती. जमल्यास मार्थाबरोबर रिलेशनशिप ठेवायला ते तयार होते. तसं जर झालं असतं तर त्यांना जन्माचा साथीदार मिळणार होता आणि वर संशोधन करायला डोब्रा स्त्रीदेखील मिळणार होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत मार्थाला न दुखावता तिला कोणताच संशय न येवू देता पुढे जायचे त्यांनी ठरवले.
दुपारी डॉक्टरांना फोन आला. "हाय डॉक"
"हेलो मार्था"
"डॉक, मी आज ८ वाजेपर्यंत फ्री होईन. तुम्ही ९ ते सव्वा ९ ला येऊ शकाल?"
"हो शुअर, कुठे यायचंय?"
"८१०१, गॉसफोर्ड अवेन्यू"
"ओके मी पोहोचतो वेळेवर"
"ओके, मग संध्याकाळी भेटूयात, बाय."
"बाय"
डॉक्टरांनी कधीच कोणाशी डेटिंग केली नव्हती, आज पहिल्यांदाच दे एका स्त्रीच्या आमंत्रणाचा स्वीकार करून डिनरसाठी चालले होते. कोणते कपडे घालायचे, काय करायचे हे देखील माहीत नव्हते. त्यांनी त्यांना आवडणारा सफेद रंगाचा कॉलरवाला टीशर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली. मंद असा परफ्युम मारला. गुळगुळीत दाढी केली व तयार झाले. रूमसर्विस ला फोन करून त्यांनी एक गुलाब फुलांचा गुच्छ ऑर्डर केला. साडेआठ वाजताची गाडी बुक केली. थोडे आनंदी, थोडे नर्वस अशा मनस्थिती डॉक्टर तयार झाले.
बरोबर साडेआठला काउण्टरवरून टैक्सि आल्याची वर्दी मिळाली. डॉक्टर लगबगीने काउण्टरवर आले व तयार असलेला गुलाब गुच्छ घेऊन गाडीत बसले. गाडीत बसताच त्यांनी ए सी चालू करण्यास सांगितले. मार्थाकडे जाताना त्यांना अजिबात घामाघूम होऊन जायचे नव्हते. ड्रायवरला साधारण किती वेळ लागेल असे विचारले. साधारण २५ मिनिटे लागणार होती.
गाडी मार्थाच्या घरासमोर थांबताच त्यांची छाती धडधाडायला लागली. पहिल्याच वेळेला ते एका स्त्रीला भेटायला चालले होते. टैक्सिचे पैसे चुकते करून व आपला पेहराव नीटनेटका करून ते मार्थाच्या घराकडे रवाना झाले. मार्थाचे घर बाहेरून युरोपियन पद्धतीचे बैठे घर वाटत होते. बाहेर छोटेसे अंगण व तीन ते चार बेडरूमचा बैठा बंगला अश्या प्रकारचे घर होते. दारावरच्या घरक्रमांकाची खात्री करून त्यांनी बेल दाबली. दहा सेकांदात अपेक्षेप्रमाणे मार्थाने दरवाजा उघडला. डॉक्टरांना पहाताच मार्था छानसं हसून म्हणाली,
"या डॉक, मी वाटच पहात होते"
डॉक्टरांनी दिलेला गुलाब गुच्छ स्वीकारून तिने त्यांचे आभार मानले व डॉक्टरांना आत येण्यास सांगून तिने दरवाजा बंद केला.
बाहेरून छोटेखानी वाटणारे घर आतून चांगलेच ऐसपैस होते. मोठ्या हॉलला लागून स्वयंपाकघर होते. स्वयंपाक घर उघडेच होते. स्वयंपाकघरातील व्यक्ती हॉलमध्ये बसलेल्याशी गप्पा मारू शकत होती. डॉक्टरांना बसण्यास सांगून मार्था स्वयंपाकघराकडे वळली. आज तिने अंगाला फिट बसेल असा वन पीस ड्रेस घातला होता. केस नेहमीप्रमाणे मोकळे सोडले होते, खूप मादक आणि सुंदर दिसत होती. स्वयंपाक घरातूनच तिने विचारले,
"पत्ता शोधण्यास काही त्रास तर झाला नाही ना डॉक?"
"नाही अजिबात नाही, टैक्सिवाला या भागातीलच होता बहुतेक, पत्ता देताच बरोबर आणून सोडले"
"ओके, तुम्ही काय घेणार, ज्यूस, पाणी की अजून काहि?"
"काहीही चालेल"
"माझ्याकडे चिल्ड बीअर आहे चालेल?"
"हो अगदी"
मार्थाने ग्लासात बीअर सर्व करून डॉक्टरांच्या समोरच्या छोट्या टेबलवर ठेवली.
डॉक्टर म्हणाले, "तुही घे ना मार्था"
"हो, माझं जेवण बनवता बनवता चालूच आहे"
"ओके"
"मी आज झान्झीबारी बिर्याणी बनवली आहे चालेल ना?"
"हो अगदी"
डॉक्टरांनी बॆआर्च घोट घेतला आणि घराचे नरीक्षण करून लागले. एखाद्या साद्या हॉटेलात काम काम करून मार्थाने छानपैकी घर घेतले होते. व ठेवलेही व्यवस्थित होते. आटोपशीर फर्निचर आणि सर्व वस्तू जागच्या जागी होत्या... "मार्था प्रमाणे". हॉलमधूनच समोरचे दोन बेडरूम दिसत होते व त्याही पलीकडे एखाद दुसरी खोली असावी अशा प्रकारची घराची रचना होती. डॉक्टर आपल्या घराचं निरीक्षण करतायत हे लक्षात येताच मार्था म्हणाली,
"आवडलं माझं घर डॉक?"
"हो, मी तेच म्हणणार होतो मार्था अतिशय छान ठेवले आहेस घर"
"थैंक्स डॉक"
"मार्था, एवढ्या मोठ्या घरात तू एकटीच असतेस?"
"हो मध्ये काही दिवस पेईंग गेस्ट होती पण तिचं या शहरातलं काम झाल्यावर ती निघून गेली दोनंच महिन्यापूर्वी. मी आता शोधते आहे कोणी मिळतंय का ते"
"ओके"
मार्थाने झान्झीबारी बिर्याणीचा मोठा बोल जेवणाच्या टेबलावर आणून ठेवला व डॉक्टरांना म्हणाली, "डॉक, जेवण तयार आहे"
डॉक सोफ्यावरून उठून जेवणाच्या टेबलावर आले. दोघांनी बिर्याणी वाढून घेतली व शांतपणे तिचा आस्वाद घेऊ लागले. ते मार्थाचंही निरीक्षण करत होते. मार्थाच्या हाताला विलक्षण चव होती. बिर्याणी खूपच चविष्ट झाली होती. डॉक्टरांनी सहज विषय काढला,
"मार्था, तुझे ब्रेकअप झाल्यानंतर तू दुसरे लग्न करण्याचा प्रयत्न नाही केलास?
"नाही डॉक, त्यानंतर मी खूप उदास होते, त्यामुळे कशातच मन लागत नव्हतं. एक दोन महिने खूप निराशेत गेले. चुकीच्या माणसाची निवड केल्याचा पश्चाताप झाला. शेवटी मग जॉब शोधायला सुरवात केली आणि मग हा हॉटेल मधला जॉब मिळाला.
"ओके"
"आता सेटल झालीय तर लग्नाचा विचार करायला हरकत नाही"
"बरोबर आहे तुझं, तुला लगेच मिळेल कोणीही साथीदार"
"असं का वाटतंय तुम्हाला डॉक?"
"कारण तू सुंदर आहेस, तुझा स्वभाव चांगला आहे, नोकरी आहे, स्वत:च घर आहे"
"ओके म्हणजे एवढं सर्व असलेली मुलगी तुम्हीही शोधताय तर"
"अम्म्म… तसं नाही पण तुझ्याकडे सर्व गोष्टी आहेत ज्या एखाद्या उपवर मुलीकडे असायला पाहिजेत."
"हम्म…. "
दोघांचाही जेवण आटोपले होते, डॉक म्हणाले, "वॉशरूम कुठे आहे?"
"दोन बेडरूमच्या मध्ये आहे बघा?"
"ओके"
डॉक्टर हात धुवता धुवता विचार करत होते कि ते काही जास्त तर बोलले नाहीत ना ! हात धुवून आल्यावर ते सोफ्यावर रील्याक्स मूड मध्ये बसले व समोरच्या टीवीवर बातम्या पाहू लागले. तोपर्यंत मार्थाही स्वयंपाकघरातील काम आवरून आली व डॉक्टरांपासून थोडंसं अंतर ठेवून बसली. ती येताच डॉक्टरांनी टिविचा आवाज कमी केला व म्हणाले., "खूप छान झालं होतं जेवण मार्था. तुझ्या हातात खरंच जादू आहे"
"थैंक्स डॉक ! तुमचा अजून किती दिवस मुक्काम आहे इथे?"
"तसं माझं काम संपत आलंय पण आता तू वेगवेगळी ठिकाणं दाखवणार आहेस म्हटल्यावर थांबावसं वाटतंय"
"ओह"
"खरंच मार्था, कालचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप आनंदाचा दिवस होता, खूप मजेत गेला कालचा दिवस आणि हे सर्व तुझ्यामुळे झाले. दुसरं कोणी असतं तर मला नाही वाटत कि एवढा एन्जोय करू शकलो असतो. खरंच मी तुझी कंपनी एन्जोय केली"
"मी सुद्धा डॉक"
"खरंच ????"
"हम्म्म"
असं म्हणताच डॉक्टरांनी आपला हात अलगद मार्थाच्या हातावर ठेवला. मार्थाने काहीच प्रतिकार केला नाही, म्हणाली, "मला कळतंय डॉक कि तुमच्या माझ्याबद्दल काय भावना आहेत. पण हे सर्व जमेल का?"
"का नाही मार्था?" डॉक्टर आता उतावीळ झाले होते. त्यांनी मार्थाच्या हातावरील पकड घट्ट केली.
"तुम्ही भारतीय, मी नायजेरियन… आपल्या संस्कृती भिन्न आहेत."
"चालेल मार्था अशी लग्न झालेली आहेत."
"………. " मार्था काहीच न बोलता टिविकडे बघत विचार करू लागली आणि डॉक्टर मार्थाकडे पाहू लागले. मार्थाचं ते मूर्तिमंत आफ्रिकन सौंदर्य डॉक्टरांना आव्हान देऊ लागले. त्यांनी दुसरा हात पुढे केला व मार्थाचा चेहरा आपल्याकडे वळवला. व मार्थाकडे बघू लागले. दोघांची नजरानजर होताच सर्व बांध गळून पडले. डॉक्टरांनी मार्थाचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद धरला व तिचे चुंबन घेण्यासाठी ते पुढे सरसावले. मार्थाही बेभान झाली होती. आणि इथेच डॉक्टरांमधील शास्त्रज्ञ जागा झाला व त्यांनी मार्थाची मान उलट दिशेने फिरवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी असे करताच मार्था सावध झाली आणि त्याच वेळेला डॉक्टरांच्या डोक्यात मागून एका बेसबॉल स्टिक चा प्रहार झाला. अचानक झालेल्या या हल्ल्याने डॉक्टर घाबरले आणि त्यांनी स्वत:चे डोके गच्च पकडून खाली बसकण मारली. डोक्याची कळ कमी होताच त्यांनी वर पाहिले तर हातात बेसबॉल स्टिक घेऊन जॉन उभा असलेला त्यांना दिसला. आता मात्र डॉक्टरांची बोबडी वळली, कसतरी म्हणाले, "जॉन, तू इथं कसा?"
"का डॉक?, मी इथे असायला नको होतं? त्या दिवसाची सणसणीत लाथ तुम्हाला कमी वाटली का? माझंच चुकलं, मी तुम्हाला सोडून दिलं"
"पण मार्था……."
"होय, मार्था माझी बायको. तुमच्या सारख्या लोकांमुळे आमचा वंश संपायला आलाय पण आम्ही तो वाढवायचा ठरवलंय. पण असं दिसतंय कि तुम्ही काही आम्हाला जगू देणार नाही. त्या दिवशी जे प्रात्यक्षिक दाखवलं त्यानं तुमचं समाधान झालं नाही? म्हणून मार्थाची मान फिरवायला निघाला होतात? तसाही आमचा वंश संपत चाललाय, चला तुम्ही आमच्या वंशात सामील व्हा"
असे म्हणून जॉनने झटकन पुढे होऊन डॉक्टरांची मान ३६० अंशात फिरवून टाकली
दुसर्या दिवसाच्या वर्तमानपत्रात मुख्य बातमी होती, "प्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ डॉ. शेणोय यांचा गूढ मृत्यू"
(समाप्त)
प्रतिक्रिया
8 Nov 2014 - 5:18 am | जेपी
भलतीच कलाटणी दिली की !!!
कथानक आवडले.
8 Nov 2014 - 7:21 am | लॉरी टांगटूंगकर
कथा आवडली. सुरुवातीपासूनच इंट्रेष्टींग बनत चालली होती.
अवांतर-आता झान्झीबारी बिर्याणी कुठे मिळेल हे शोधणे आले.
8 Nov 2014 - 8:41 am | स्वप्नज
उत्तम कलाटणी.. मस्त जमलीय... झान्झीबारी बिर्याणी कुठे मिळेल (मार्थाचे घर सोडून सांगा.).
8 Nov 2014 - 8:51 am | खटपट्या
मन्द्या, स्वप्नज आणि जेपी धन्यवाद.

ही घ्या झान्जीबारी बिरयाणी
8 Nov 2014 - 9:55 am | विजुभाऊ
अन ही घ्या त्याची रेशीपी.
http://www.zanzinet.org/recipes/dishes/biriani.html
8 Nov 2014 - 9:44 am | बोका-ए-आझम
खल्लास कलाटणी!
8 Nov 2014 - 10:01 am | ज्ञानोबाचे पैजार
लै भारी, आवडली.
पैजारबुवा,
8 Nov 2014 - 10:24 am | एस
सदैव शास्रज्ञा तू झोपी जायचे
न जागृती तुवा, अथवा मरायचे!
बाप रे! डॉक्टर खल्लास झाला एकदम... बरं झालं आम्ही डॉक्टर नाही झालो ते. :-)
8 Nov 2014 - 12:57 pm | स्वप्नज
>>>>> डॉक्टरांनी मार्थाचा चेहरा दोन्ही हातांनी अलगद धरला व
तिचे चुंबन घेण्यासाठी ते पुढे सरसावले. मार्थाही बेभान
झाली होती. आणि इथेच डॉक्टरांमधील शास्त्रज्ञ
जागा झाला <<<<
अशा वेळीही डॉक प्रोफेशनल राहतोय याचा अर्थ डॉकलाच दुसर्या डॉकची गरज आहे. एखाद्याने कार्यभाग उरकल्यावर मान इ. अवयव फिरवून पाहिले असते.,
8 Nov 2014 - 1:22 pm | खटपट्या
:)
8 Nov 2014 - 4:18 pm | माझीही शॅम्पेन
अगदी अगदी
दोन्ही पार्ट्या जरा गोन्धलळेल्याच वाटतात .. डॉक्टर काय आपल मिशन सोडणार नाहीत मग एवढी "डेटा-डेटी" कशाला केली म्हणाव
8 Nov 2014 - 6:09 pm | आदूबाळ
कथा आवडली.
8 Nov 2014 - 8:02 pm | जुइ
शेवट अधीक आवडला.
8 Nov 2014 - 10:18 pm | सस्नेह
कथा वाचायला.
पण लौकर संपवली. अजून 2 भाग यायला हवे होते.
8 Nov 2014 - 10:57 pm | खटपट्या
धन्यवाद, पण काही लोक म्हणत होते की पाणी घालून पातळ केली....
8 Nov 2014 - 11:01 pm | श्रीरंग_जोशी
कथा खूपच छान रंगली. शेवटचे धक्कातंत्र तर जोरदारच.
9 Nov 2014 - 12:53 am | मुक्त विहारि
आवडली....
9 Nov 2014 - 7:34 am | खटपट्या
विजुभाऊ, बोका-ए-आझम, पैजार बुवा, स्वॅप्स, माझी शॅम्पेन, आदुबाळ, जुई, स्नेहांकिता, श्रीरंग आणि मूवी सर्वांचे आभार.
11 Nov 2014 - 8:18 am | मुक्त विहारि
श्री. खटपट्या ह्यांचे पण आभार...
आता पुढल्या कथेच्या अपेक्षेत...
9 Nov 2014 - 2:42 pm | प्रचेतस
तिन्ही भाग आताच वाचून काढले.
खतरानक झालीय कथा.
10 Nov 2014 - 9:56 am | खटपट्या
धन्यवाद वल्लीदा !!
10 Nov 2014 - 10:46 am | प्रसाद१९७१
मस्त च कलाट्णी. छान जमली आहे.
10 Nov 2014 - 11:23 am | सौंदाळा
अत्यंत आवडली
10 Nov 2014 - 1:29 pm | अजया
छान कथा.मजा आली वाचायला!
10 Nov 2014 - 9:33 pm | Maharani
छान शेवट..मजा आली वाचताना..अजुन एखादा भाग चलला असता..
10 Nov 2014 - 11:32 pm | खटपट्या
प्रसाद१९७१, सौन्दाळा, अजया, महारानी धन्यवाद. माझा हा दुसराच प्रयत्न होता !!
तुमच्या सर्वांच्या प्रतीसादामुळे अजुन लिहीण्याचा हुरुप येतो.
पुढ्ची कथा सत्यघटनेवर आधारीत आहे.
11 Nov 2014 - 5:00 am | स्पंदना
खट्याक!!
एकदम मस्त कथा हं खटपट्या भाउ.
आन हे बघा कथा कुठवर फुलवायची ते तुम्ही ठरवल पाहिजे, उअगा उठुन कुणी पातळ केली म्हणालं, म्हणुन आवरती नाय घ्यायची.
(स्वतःला पाहिजे तेव्हढ पाणी घालुन झ्याक मटन रस्सा बनवणारी अपर्णा)
11 Nov 2014 - 5:59 am | खटपट्या
हे बरोबर.
11 Nov 2014 - 9:42 am | स्पा
बाबो शेवट भन्नाट केलात राव
मस्तच
11 Nov 2014 - 3:01 pm | S.प्रशांत
मस्तच कथा होती !!!
11 Nov 2014 - 3:54 pm | विजुभाऊ
खटपट्या काका.
तो भाग चार आणि पाच मी टाकू का?
11 Nov 2014 - 8:43 pm | खटपट्या
टाका की.....
आणि काका नका ना म्हणू.
11 Nov 2014 - 6:52 pm | शिद
जबराट वळण घेतलं की कथेनं शेवटच्या भागात. मस्तच.