मागच्या एक वर्षापासून आर्थिक परिस्थिती फारच खालावली आहे. धंदा पण साफ बुडाला, डोक्यावर सुमारे ७-८ लाखाचे कर्ज आहे. देणेकरी नुसते उच्छाद मांडून आहेत. ज्यांचे कडून पैसे येणे आहेत ते ढिम्म आहेत. तोंड मिळवणी करता करता नाकीनऊ आले आहेत. ज्यांचे कडून पैसे घेतले त्यात मित्र आणि नातेवाईक सुद्धा आहेत.
नवीन व्यवसाय पुरेसा येत नाही . जो येतो तो फारच तुटपुंजा आहे. अश्या परिस्थितीत कुठलीही फिलोसोफी डोक्यावरून जाते. जसे हे पण दिवस जातील, प्रयत्न करा यश मिळेल, संकटात खंबीर उभे रहा. आणि असेच बरेच.
आजची परिस्थिती बघू जात सर्व कर्जे मिटायला २-३ वर्षे लागतील, पण कुणीच २-३ दिवस सुद्धा थांबायला तयार नाही. प्रत्येकाची स्वताची अडचण आहेच आणि पैश्याचे सोंग नाही आणता येत. तो जिथे लागतो तिथे लागतो.
पैसे येण्याचे सर्व पारंपारिक मार्ग बंद आहेत. जसे बँक लोन, मित्र, इ.
मी अजून निराश नाही. दोन मुले आहेत एक चार वर्षाचा आणि एक ३ महिन्याचा. या नव्या बाळाच्या आगमनावेळी जो काही भयंकर वैद्यकीय खर्च झाला त्यामुळे सगळे बजेट कोलमडले.
आता खरच काय करावे असा प्रश्न आहे. चोरी करावी, कुटुंबासकट आत्महत्या कि सरळ निर्लज्ज व्हावे?
आत्महत्या केल्यावर सगळ्यांच्या काय प्रतिक्रिया येतील ते माहिती आहेत. पैश्यासाठी जीव का दिला वैगेरे वैगेरे. पण जीव गेल्याशिवाय संबंधिताना घटनेचे गांभीर्य कळत नाही. तोपर्यंत त्यांना वाटेल मी खोटे बोलत आहे. माझेकडे पैसे असून द्यायची इच्छा नाही. पण खरेच असे काहीही नाही.
मिपावर बरेच बुजुर्ग आणि जाणते आहेत. काही प्रक्टीकॅल सल्ला द्य. तत्वज्ञान नको. उपाशी पोटाला तत्वज्ञान म्हणजे आंधळ्या माणसाला आरसा.
कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा करू नये.
-------------------
इशारा
१. लेखकाच्या भावना पोचल्या. मात्र सदस्यांनी कृपया सल्ले देताना आपल्या जबाबदारीवर द्यावेत, तसेच लेखकाने स्वतःच्या जबाबदारीवर अंमलात आणावेत.
२. आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा उपाय नाही आणि मिपा अशा कोणत्याही सल्ल्याला उत्तेजन देत नाही किंवा जबाबदार नाही.
३. या लिखाणावर अवलंबून राहून कोणतेही आर्थिक व्यवहार झाल्यास मिपा संस्थळ/चालक/मालक त्याला कोणत्याही प्रकारे जबाबदार नाहीत.
प्रतिक्रिया
18 Sep 2014 - 6:00 pm | सुहास..
:(
मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , पण आत्महत्येचा विचार ही करु नकोस , बाकी सल्ला देण्यास अपात्र आहे !!
19 Sep 2014 - 12:39 pm | विजुभाऊ
माझ्या एका मित्राने त्याच्या सर्व देणेकर्याना बोलावून सांगितले की मी तुमच्या सर्वाम्कडून पैसे घेतले. तुमच्या मदतीबद्दल मी ऋणी आअहे मात्र तुमच्या त्रासामुळे आत्महत्या करायला चाललो आहे. तुमचे पैसे फेडण्यासाठी माझ्या कडे आत्ता एकही पैसा नाही. मी मेल्यावर मिळालेल्या इन्शुरन्सच्या पैशामधून तुमची काय ती देणी दिली जातील मात्र मी आत्महत्ये अगोदर जे पत्र लिहीन त्यात तुमच्या सर्वांची नावे लिहून यानी माझा मानसीक छाळ केला म्हणून मी आत्महत्या करीत आहे असे लिहीन.
अन्यतः मला वेळ द्या एक सहा महिने मी तुमचे पैसे फेडेन हे नक्की.
" हे सर्व घडलेले आहे....... तो मित्र त्याची सर्व देणी फेडून तोट्यात गेलेले सर्व उद्योग बंद करून सध्या भिक्षुकी करत बिनघोर जगतोय."
19 Sep 2014 - 12:45 pm | गवि
थोडेसे अवांतर होतेय, पण अशा केसमधे इंशुरन्स कंपनी कोणतेही पैसे देईल असे वाटत नाही.
जाणकार नसलो तरी तर्काने असे वाटते.
19 Sep 2014 - 12:47 pm | धर्मराजमुटके
बरोबर आहे तुमचे. आत्महत्येच्या प्रयत्नात विमा मिळत नाही पण सुसाईड चीटमधे आपले नाव आले तर नसता मनस्ताप होईल या कल्पनेने लोक पैशासाठी थांबायला तयार असतात.
19 Sep 2014 - 8:29 pm | होकाका
बापरे, म्हणजे त्या मित्राने त्या सर्व देणेकर्यांना डबल धमकी दिली तरः मला विम्याचे पैसे मिळणार नाहीतच पण तुंम्हाला सुद्धा मनस्ताप होईल अशी तजवीज केली जाईल.
20 Sep 2014 - 9:37 am | इरसाल
विजुभौ चुपचुपके च्या शाहिद कपुरची इस्टोरी सांगत आहेत. तो नाय का उडी मारत समुद्रात नी मग परेश रावलला सापडतो.
अवांतर- त्याच पिच्चरात गुज्जु फॅमिली रहाते पश्चिम बंगालात आणी घरात गाणी गातात पंजाबी (इसको जिला क्यु नही घोषीत कर देते वाला )
असो
चोरी करु नका - आपल्याला पचत नाय
आत्महत्या नको- आपल्या मागे आपल्या कुटुंबाचे काय कधी शांत बसुन विचार करा (इमॅजिन करुन बघा).
निर्लज्ज व्हा/नका होवु - पण ते पॉझिटिव्हली, वर लोकांनी लिहिल्या प्रमाणे देणेकर्यांना विश्वास द्या की तुम्ही काहीही झाले तरी त्यांचे पैसे बुडु देणार नाही आहात.
19 Sep 2014 - 2:12 pm | कवितानागेश
हे असं उगाच नाही तिथे इमोशनल ब्लॅकमेलिन्ग करायची गरज नाही.
ज्या विश्वासानी पैसे दिलेत, त्याच विश्वासानी लोकही थांबतील. थोडे थोडे जरे देत राहिले, तरी घेनेकर्याला धीर येतो.
माझ्या एका मैत्रिणीनी एका ओळखीच्यांचे ५०००० रुपये, दर महिन्याला २-२ करत फेडले होते. आणि पोस्ट डेटेड २५ चेक्स देउन ठेवले. तिला नोकरी लागल्यानी हे सगळे येतिल, हे देणार्यालाही नक्की माहित होते.
19 Sep 2014 - 8:31 pm | होकाका
बरोबर आहे. एमोतिओनल ब्लच्क्मेलिन्ग ला काही अर्थ नाही.
18 Sep 2014 - 6:12 pm | अविनाशकुलकर्णी
काळजी करु नका..मी पण या परिस्थितुन गेलेलो आहे...आत्महत्या करु नका..वेळ खराब असते..अश्या वेळी शांत रहा..देणेक-याना तोंड देत रहा..तोंड चुकवु नका..
दिवस बसुन रहात नाहि..चुल पेटति रहाण्या साठी मार्ग शोधा..ते महत्वाचे..कारण चुल बंद कि अक्कल पण बंद होते..
८०८७९५८९२२ हा माझा नंबर आहे....काहि नाहि तरी सल्ला देवु शकेल..मी पुण्यास रहातो..
धिर सोडु नका...
18 Sep 2014 - 6:31 pm | संदीप डांगे
हिम्मत खूप धरून आहे दादा, म्हणून अजून ताळ्यावर आहे. चूल पेटती आहे. त्याचा तरी अजून प्रश्न नाही. काम करतो आहेच. अविश्रांत. पोटापुरता पैसा येतो पण आता दुसराच प्रश्न उभा राहिला आहे. रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय?
गरिबी फार जवळून भोगली आहे. त्यामुळे त्याची लाज आणि भीती वाटत नाही.
कोई दिन हाथी, कोई दिन घोडा, कोई दिन पैदल चालना जी असे म्हणून लढतो आहे. पण मर्यादा दिसत आहेत म्हणून गोंधळलो आहे.
पाठीशी उभे आहात. बरे वाटते. मित्र-नातेवाईकांशी नाही बोलू शकत. म्हणून मिपा वापरत आहे. क्षमा असावी
18 Sep 2014 - 6:18 pm | सौंदाळा
आत्महत्येचा विचारही करु नका.
बायको आणि मुलांना शक्य असेल तर तात्पुरते माहेरी पाठवा.
स्वतःचे घर, जमीन, दागिने असतील तर mortgage लोन मिळतय का बघा.
शक्य तेवढे खर्च कमी करा.
बायको नोकरी करु शकते का? (जर करत नसेल तर)
जे पैसे येणार आहेत त्याचा पाठ्पुरावा करा.
आणि राग येईल तरी सांगतो मारामारी / शिवीगाळी वगैरे ऐकायच्या तयारीनेच र्हावा.
18 Sep 2014 - 6:39 pm | संदीप डांगे
>>आणि राग येईल तरी सांगतो मारामारी / शिवीगाळी वगैरे ऐकायच्या तयारीनेच र्हावा.
पटले
18 Sep 2014 - 6:24 pm | विलासराव
मित्रा , एकवेळ निर्लज्ज हो , पण आत्महत्येचा विचार ही करु नकोस
बरोबर. मी २००३ ला ४ लाखाला डुबलो होतो. पगार होता ७००० हजार. घर भाड्याचे. घरात एकटा कमावता. तुमच्यासारखीच परीस्थीती. पण आत्महत्या कारावी असा विचारसुद्धा मनात आला नाही.
निर्लज्जपणा स्विकारला. सगळ्यांना सांगीतले कर्जबाजारी झालोय. भिकारी नाही. पै न पै चुकती करेल पण आज वेळ देउ शकत नाही. बरेचजण तयार झाले. एक-दोन जण खळीला आहे. त्यांना सरळ सांगीतले आता तर पैसे आले तरी तुम्हाला सगळ्यात शेवटी देणार, आणी आता जास्त आवाज केला तर देणारच नाही.
मग आणखी ५०००० उसने मिळवले १ वर्षे तब्बेतीत खाण्यापिण्यासाठी.
शांतचित्ताने काम करत करत व्यवसाय वाढवला. ३ वर्षात सर्व देणे देउन ५००-१००० रोज खर्च करायचो बार मधे. आनी एका वर्शाने काम करायचे सोडुन भारतभर फिरलो, मग परदेशात फिरलो.सगळं झाल्यावर विपश्यना करुन ध्यानमार्गावर स्थिर झालो. आणी आता उपदेश करत फिरत असतो.
काय जमेल तसा बोध घ्या यातुन.
कृपया वरचे सगळे खरे आहे. चेष्टा समजु नये.
18 Sep 2014 - 6:34 pm | संदीप डांगे
धन्यवाद दाद, हुरूप आला थोडा
18 Sep 2014 - 8:25 pm | जेपी
जास्ती लिहीत नाही.
व्यनी टाकतोय.जमल्यास संपर्क करा.
19 Sep 2014 - 5:16 pm | विलासराव
डांगे साहेब हे माझे मित्र आहेत दादाभाउ कुटे: हे महाराष्ट्र क्रिक्रेट टीमचे कर्णधार होते: बुद्दीबळ खेळले आहेत राज्यापातळीवर.
दोन मुले आहेत. पोटासाठी डोंबीवलीवरुन फोर्ट्ला येतात गेली २० वर्षे, तिथे त्यांचा टेलीफोन बुथ आहे. कायम आर्थिक अडचण असते कारण मोबाईलमुळे आजकाल फोन कमी वापर होतो. आजच त्यांचा फोन आला होता सामनात बातमी आली १५ तारखेला म्हनुन.
http://216.15.199.42/dainiksaamana/Details.aspx?id=23644&boxid=12913375
18 Sep 2014 - 6:31 pm | सुहास पाटील
आत्माहत्या अजिबात करू नका. वेळ निघून जांइल. घरच्यांचा विचार करा. वर सांगितल्या प्रमाणे घरच्यांची काही दिवस माहेरी सोय कर. आणि हो पडेल ते काम करा त्यातून पैसे मिळावा. तुम्ही मेहनत करताय असे चित्र निर्माण झाले कि देणेकरी तुमच्यावर विश्वास ठेवतील
18 Sep 2014 - 6:37 pm | मृत्युन्जय
देणेकर्यांना आज उद्या करु नका. एकदा धीर धरुन स्पष्ट सांगा की ४ वर्षे लागतील. नंगे से खुदा भी डरता है. त्यांना सांगा की मला मारुन किंवा त्रास देउन तुम्हाला तुमचे पैसे मिळणार नाहित. पैसे परत हवे असतील तर याकाळात तुम्हाला त्यांचे पैसे परत करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी मोकळीक द्या. डोक्यात अक्कलेचा भाग असलेले लोक ऐकतील. एवढे सांगुनही जे मुर्ख महाभाग ऐकणार नाहित त्यांच्या तगाद्याखातर आत्महत्या करणे मुर्खपणा आहे. ही परिस्थिती आहे ती हाताळावीच लागेल. स्वतःशी प्रामाणिक रहा. तो प्रामाणिकपण तुमच्या बोलण्यातुन जाणवु द्या. तुमच्या गरजा कमी करा आणि थोडे थोडे करत सगळ्यांना परतफेड करत रहा. तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल खात्री पटल्यास तगादा कमी होइल. एखाद्याचे १००० देणे असेल तर ते १० रुपयांनी जरी कमी करता आले तरी बघा. अगदीच पैसे मिळत नाहित म्हटल्यावर ओक वैतागतात, थोडे थोडे मिळताहेत म्हटल्यावर आशेने दम धरतात
18 Sep 2014 - 6:50 pm | संदीप डांगे
तुमचे म्हणणे पटले. तुम्ही सांगितलेला मार्ग बरोबरच आहे.
ज्यांचे कडून येणे आहेत त्यांच्या शब्दावर ज्यांना द्यायचे त्यांना शब्द दिला. आता पंचाईत झाली कि देणारे देत नाहीत आणि मी खोटा ठरलो.
ज्यांचे ६ लाख द्यायचे त्यांना ३ लाख दिले, तरी उरलेल्या तीन लाखासाठी ते जीव घेऊन मागे लागले आहेत. ते नातेवाईक आहेत आणि त्यांची अडचण पण १००% खरी आहे. अशी मेख बसली आहे कि बस.
एका मित्राचे दीड लाख द्यायचे त्याला १५ हजार दिले. आणि म्हटले बाबा जर कळ काढ जसे येतील तसे तुला देतो, तर त्याच्या वडिलांचे दिवसाला १० फोन.
18 Sep 2014 - 6:37 pm | पिंगू
ही पण वेळ जाईल, पण केव्हा. जेव्हा तुम्ही हातपाय माराल तेव्हाच.
तेव्हा हात पाय मारणे चालुच ठेवा, नक्कीच तुम्ही वाईट परिस्थितीतून वर याल.
18 Sep 2014 - 6:51 pm | संदीप डांगे
रात्र दिवस एक करून जी कामे केलीत त्याचे पैसे वेळेवर येत नाहीत. त्यामुळे जरा खचून जायला होते. प्रचंड मेहनत करून देखील हाताला यश नसेल तर माणसाने नेमके करायचे काय?
18 Sep 2014 - 8:37 pm | पिंगू
धंद्यामध्ये कधीसुद्धा वेळेवर पैसा येईलच याची खात्री नसते. त्यामुळे गाठीशी थोडाफार पैसा बांधून पुढे जावे लागते.
केलेल्या कामाचे पैसे मिळतीलच, पण ते अमुक वेळेवर मिळतीलच याची खात्री देता येत नाही.
त्यामुळे आशा सोडून देऊ नका, एवढेच सांगू शकतो. कारण त्याच्यावरच आपण सारे जिवंत आहोत.
18 Sep 2014 - 6:39 pm | रेवती
आत्महत्या करू नका. इथे येऊन बोललात ते बरं केलत.
18 Sep 2014 - 6:51 pm | संदीप डांगे
पाठीशी उभे आहात. बरे वाटते. मित्र-नातेवाईकांशी नाही बोलू शकत. म्हणून मिपा वापरत आहे. क्षमा असावी
18 Sep 2014 - 6:40 pm | सूड
आत्महत्या हा पर्याय होऊ शकत नाही..बाकी सल्ले देण्यास अपात्र आहे. लवकरात लवकर आपल्या प्रयत्नांना यश येऊन सर्व सुरळीत होवो.
18 Sep 2014 - 6:51 pm | प्रसाद१९७१
निर्लज्ज व्हा हा तर सल्ला आहेच पण त्या आधी
१. बायको मुलांना बायकोच्या माहेरी पाठवा. तिच्या माहेरच्यांना स्पष्ट कल्पना देवुन.
२. जे काही दागिने असतील ते विचार न करता विका आणि जमेल तेव्हडे कर्ज फेडा.
३. अजुन ही काही विकण्यासारखे असेल ( जसे की ४ चाकी वगैरे ) ती वीका आणि कर्ज फेडा.
४. घर भाड्याचे असेल तर ते बदलुन कमी भाड्याच्या घरात जा.
५. घर स्वताचे असेल तर बरेच सोप्पे होइल. सरळ विकुन टाका, घरावर लोन असेल तर ते फेडा आणि छोट्या भाड्याच्या घरात रहायला जा.
मुख्य म्हणजे तुमच्या जीवनशैलीतुन हे दाखवून द्या की तुम्ही मुद्दाम लोकांचे पैसे अडवून ठेवले नाहीयेत. ( मी माझ्या मित्राला पूर्वी ५०००० दिले होते, तो ते परत करत नव्हता पण गोव्याला बायको मुलांबरोबर गेला होता. त्याने पैसे परत न करण्यापेक्षा त्याच्या ह्या वागण्याने जास्त दुख झाले )
19 Sep 2014 - 9:20 am | टवाळ कार्टा
हे मात्र करु नका...ते घर तुमच्या नावावर असले तरी अख्खे कुटुंब त्यात रहाते...आणि घर एकदा विकले की परत घेताना जास्त पैसे देउनच घ्यावे लागते
19 Sep 2014 - 10:13 am | प्रभाकर पेठकर
७-८ लाखांचेच कर्ज असल्याकारणाने घर विकण्याची नक्कीच गरज नाही. बँकेकडे तारण ठेवून किंवा तारण न ठेवताही घर दुरुस्तीसाठी एव्हढे कर्ज बँकेकडून अथवा HDFC कडून मिळू शकेल. दुरुस्ती किंवा गृहसजावटीसाठी (फर्निचर) बँका, HDFC वाले कर्ज देतात.
तुमच्याकडे ३ वर्षाचे ऑडीटेड रिपोर्ट्स आणि इन्कम टॅक्स भरल्याच्या पावत्या असतील तर इतरही अनेक कारणासाठी कर्ज मिळू शकेल. असे मिळाल्यावर तातडीने व्यक्तीगत नात्यातून घेतलेली कर्जे फेडून बँक/ HDFC चे कर्ज सुलभ हप्त्यात फेडता येईल. नोकरीच्या पर्यायाचा विचार करावाच. एकदा दगडाखालचा हात पूर्णपणे निघाला की नव्या जोमाने स्वतःच्या व्यवसायाच्या मार्गाने जाता येईल. आमच्या शुभेच्छा आहेतच.
18 Sep 2014 - 6:54 pm | प्यारे१
नक्की काय व्यवसाय आहे आणि काय शिक्षण आहे हे समजल्यास मार्ग सुचवणं बरं पडेल.
विलासरावांनी सांगितल्याप्रमाणं सग ळ्यांना एकत्र बोलावून परिस्थिती समजावून सांगितल्यास काही मार्ग निघू शकेल. (मसाला चित्रपटासारखा)
ह्यानंतर जमल्यास एखादी नोकरी स्विकारावी. ७-८ हजार जरी मिळाले तरी महिन्याचं पक्कं उत्पन्न असेल. घरखर्च किमान निभणं शक्य होईल. उरलेल्या वेळात व्यवसाय सांभाळता आल्यास उत्तम.
बाकी 'हेही दिवस जातील' हे कायम नि पक्कं लक्षात ठेवणं हा अत्यंत चांगला मार्ग आहे. आत्महत्या हे तात्कालिक समस्यांचं तथाकथित कायमचं निराकरण आहे. देणेकरी आपल्या कुटुंबाला त्रास कशावरुन देणार नाहीत?
18 Sep 2014 - 7:20 pm | आदूबाळ
+१
संपूर्ण प्रतिसादालाच
18 Sep 2014 - 9:28 pm | प्यारे१
प्रतिसाद संपादित झालेला असला तरी माझं मत तेच राहील. आयुष्य अकारण अथवा सकारण सुद्धा संपवण्यासाठी नाही.
जन्म आपल्या हातात नाही तसाच मृत्यू देखील नसावा.
संपादित
18 Sep 2014 - 6:56 pm | दिपक.कुवेत
आत्महत्या तर मूळीच करू नका. ती नक्किच पळवाट नाहि. आपल्या प्रयत्नांना लवकारात लवकर यश मिळो हिच सदिच्छा. तुमच्या कामाचं / व्यवसायाचं स्वरुप काय आहे ते ईथे सांगीतलत तर कदाचीत तुम्हाला जास्त काम मिळण्यास मिपाकर नक्किच हातभार लावतील.
18 Sep 2014 - 7:02 pm | विवेकपटाईत
सल्ला देणे सौपे असते, परिस्थितीशी सामना करणे कठीण असते. तरी ही संसारात परिस्थितीला समोर जावेच लागते. त्या शिवाय गत्यंतर नाही. राजा हरिश्चंद्रला चांडाळराज चा सेवक बनण्याची पाळी आली होती. पण त्यांनी आत्महत्या नाही केली. परिस्थिती स्वीकार केली. रात्री नंतर दिवस हा येतोच याच आशेवर संघर्ष करीत राहा. बाकी चोरी करणे आणि आत्महत्या करणे दोन्ही गैर आहे.
18 Sep 2014 - 7:19 pm | डॉ सुहास म्हात्रे
आत्महत्या हा पर्याय कदापी योग्य नाही... ती पळवाट होईल आणि कुटुंबावर अन्यायकारक होईल. कुटूंबातल्या कोणाचाही जीव घेण्याचा तुम्हाला अधिकार नाही... आणि तो गुन्हाही होईल. पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका.
चोरी करणे हे नैतीकदृष्ट्या तर अयोग्य आहेच पण अगदी व्यावहारीकदृष्टीने विचार केला तरी अत्यंत धोकादायकही आहे... पकडला गेलात तर परिस्थिती आहे त्यापेक्षा वाईट होईल हे नक्की. इथेही हाच सल्ल की, पहिली चूक सुधारण्याच्या नावाखाली दुसरी चूक करू नका.
तुमच्या परिस्थितीत सर्वात उत्तम मार्ग म्हणजे देणेकर्यांना विनयाने पण स्पष्ट्पणे सांगा की, "आता पैसे देणे शक्य नाही. पण ते बुडवण्याची इच्छाही नाही. तेव्हा आता काही दिवसांची मुदत हाच एक मार्ग बाकी आहे." तसे केल्यास त्यांचे पैसे मिळतील. पैसे कमावणाच्या मार्गात कोणतीही समस्या उभी करणार्या त्यांच्या कृतीचा परिणाम त्यांचे पैसे परत होण्याला अजून उशीर होण्यात किंवा ते पूर्ण बुडण्यात होउ शकतो... हे तुम्हालाही नको आहे आणि त्यांनाही नको आहे, हे तुम्हाला त्यांना पटवून द्यावेच लागेल. याचे खालील परिणाम होऊ शकतातः
अ) देणेकर्याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला नसेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा असला तर ('वाईट' आणि 'अती वाईट' असे दोनच पर्याय असताना 'वाईट' हा पर्याय निवडावा असा विचार करून) तुम्हाला परतफेडीची मुदत वाढवून देण्यास तयार होईल.
आ) देणेकर्याचा तुमच्यावरचा विश्वास पूर्ण उडाला असेल आणि देणेकरी सारासार विचार करणारा नसला तरीही (अगोदरच चोखाळला असला तरी) सौजन्याने वरचाच प्रयत्न परत परत करावा (तुमच्या हाती अजून काहीच नाही असे तुमच्याच लेखतून कलते आहे)... कोण जाणे पुढच्या एखाद्या प्रयत्नात ते पूर्ण पैसे बुडीत खात्यात जाण्याच्या (अती वाईट) पर्यायाऐवजी अजून थोडा वेळ कळ काढण्याचा (वाईट पर्याय) देणेकरी स्विकारेल.
आता राहीले तुमच्या मनःस्थितीबद्दल : ही परिस्थिती तुमच्या चुकीने झाली की योगायोगाने झाली हा प्रश्न आताच्या घडीला गौण आहे. वस्तूस्थिती खालिलप्रमाणे आहे :
क) परिस्थिती वाईट आहे, यात वाद नाही. पण तिच्यामुळे अधिकाधीक निराश होण्याने किंवा नकारात्मक विचार करण्याने (उदा. आत्महत्या, चोरी, इ) ती सुधारणार नाही, किंबहुना ती अजूनच बिघडेल. तेव्हा ते सोडा. हे कठीण आहे पण अश्यक्य नाही. किंबहुना, समस्येतून बाहेर पडेपर्यंत तुमची सगळी ताकद आणि सगळे विचार समस्या सोडविण्याकरीता वापरणे हेच तुमचे एकमेव कर्तव्य आहे. याबाबत मनात शंका आल्यास कुटुंबाचा विचार मनात आणा.
ख) कोणत्या चुकीने ही परिस्थिती उद्भवली ह्याचा नीट खडतर प्रामाणिकपणे (ब्रुटल ऑनेस्टी) विचार करा. खरी कारणे शोधा. दुसर्यावर दोष ढकलण्याअगोदर स्वतःच्या चूका शोधा आणि त्या चूका भविष्यात तुमच्या हातून परत होऊ नयेत यासाठी उपाय शोधा. यात होणारे बोध तुम्हाला भविष्यात योग्य निर्णय घ्यायला आणि जीवन सुरळीत करण्यच्या प्रयत्नांना योग्य दिशा द्यायला उपयोगी पडतील. कारण, तुमच्या विचारांवर आणि कृतीवर तुम्ही १००% ताबा ठेवू शकता... इतरांच्या विचारां- किंवा कृतीं- बाबत असे असू शकत नाही.
ग) पैसे कमावण्यासाठी कोणता मार्ग योग्य आहे ते तुमच्या शिक्षण, कौशल्य आणि कर्तबगारीवर अवलंबून आहे. तेव्हा तो निर्णय घ्यायला तुमच्यापेक्षा जास्त योग्य व्यक्ती अजून कोणी नाही. फारतर त्या क्षेत्रातल्या जाणकारांचा सल्ला व मदत जरूर घ्या.
घ) तुम्ही समस्येत अडकलेली जगातली पहिली व्यक्ती नक्कीच नाही. यापूर्वी अनेकजण अनेक समस्यात गुंतलेले आहेत आणि त्यातून यशस्वीपणे बाहेर आलेले आहेत... तेव्हा तुम्ही तेच केलेत तर फार मोठे दिव्य काम केले असे होणार नाही... हे नक्कीच लक्षात ठेवा. हे सर्व तुमच्या आणि इतरांच्या बाबतीत भविष्यातही खरे आहे हे नीट ध्यानात ठेवा.
'यशस्वी होणे' म्हणजे कधीच 'कधीच अयशस्वी न होणे' असे अजिबात नाही... तर अपयशांना समर्थपणे तोंड देऊन, अंग झटकून त्यांच्यावर मात करणे होय !
(बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) इए
18 Sep 2014 - 7:29 pm | संदीप डांगे
माझ्याबद्दल व व्यवसायाबद्दल माहिती:
मी एक B F A कमर्शिअल आर्टीस्ट असून १२ वर्षे कामाचा अनुभव आहे. क्रियेटीव डायरेक्टर म्हणून ग्राफिक आणि वेब मध्ये भरपूर काम केले आहे. २०११ पासून स्वत: फ़्रिलान्सर म्हणून काम सुरु केले. नंतर मुंबईहून नाशिक ला शिफ्ट झालो कारण आंतरजालीय संबंधामुळे तसा काही परिणाम होत नव्हता. माझे मुंबई, नाशिक, UK, दुबई ला बरेच ग्राहक आहेत.
नाशिक ला ऑफिस सुरु करणे महागात पडले. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त झाला. ज्यांनी मदत करायची काबुल केली ते सपशेल फिरले. २-३ ग्राहकांची कामे केली त्यात बरेच नुकसान झाले.
सद्य स्थिती मध्ये ऑफिस बंद आहे. घरून काम करत आहे. ग्राहकांना अजून माझ्यावर विश्वास आहे कारण माझ्या कामाच्या दर्जामध्ये मी तडजोड करत नाही.
अचानक उलथापालथ झाल्याने जाम बावरलो आहे. फसवणारी माणसे आतापर्यंत भेटली नव्हती ती आताच भेटली
सर्व अनावश्यक खर्च बंद केले आहेत.
18 Sep 2014 - 7:49 pm | काउबॉय
रिकामटेकड स्मजल्यास हरकत नाही पण 4 पोरं 9 महीने काम करतील इतपत काम आणि पैसा हातात नसल्यास ऑफिस टाकू नयेच. बाकी प्रोफाइल बघता प्रोजेक्ट रिपोर्ट बँकेत टाका कदाचित बैंक कर्ज देइल ? ताबडतोप मुंबई त नोकरी धरा तुम्हास अवघड जाऊ नये आणि यामुळे देणेकर्यांची खात्रिही पटेल ?
जमलेच तर नंतर महानगर सोडू नका 100 मार्ग पैसा मिळवायचे इथेच कायम उपलब्ध असतात.
18 Sep 2014 - 8:06 pm | बाबा पाटील
मी तर बर्याच वेळा असा काळ आणलाय,(अंगात वाईट्ट किडे आहेत हो).पण त्यातुन बाहेर पडता येत.सगळ्यात पहिल अनावश्यक खर्चांना कात्री लावायची.बहुतेक सर्व कामे स्वतःच करायची, वर्क ऑर्डर पासुन ते फायनल बिल पेमेंट पर्यंत स्वतःच राबायच,दररोज कुठल्याही परिस्थीतीत डेली अकाउंट मध्ये ५००-१००० बाजुलाच ठेवायचे.बाहेरचा चहादेखिल स्वतःच्याच पैश्याने प्यायचा नाही.सगळ्या गोष्टी बंद्,व्यसनाच्या पासुन मैलभर तरी लांब रहायच, तुम्ही देत असलेल्या सर्विसचे दर कमी करायचे,ग्राहकांशी बायकोशी पहिल्या रात्री बोलला नसाल इतके गोड बोलायचे. डोक्यावर बर्फ आणी जिभेवर साखर अशा मार्गाने व्यवसाय करायचा. त्यात आपण नविन नविन काय देवु शकतो हे सतत विचार करुन सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करायचा,पडेल ती काम स्विकारायची.कष्ट करायचे आणी घरी आले की छोट्या बाळांशी मजेत खेळायच. सहा एक महिन्यात यातुन बाहेर पडाल.
शहाणपणा सांगायच कारण मी स्वतः तीन वर्षापुर्वी दिड ते दोन लाखाची मासिक कमाई सोडुन राज्यसेवेच्या परिक्षेच्या मागे लागलो,खर्च चालुच होते व्याज काही थांबत नाहित्,शेवटची परिक्षा २ फेब.२०१४ ला दिली वैतागलो सगळे मिळुन कर्जाची रक्कम १५ लाखापर्यंत पोहचली, क्लिनिकचा दर महिन्याचा सरासरी खर्च ५० ते ६० हजार, वेड लागायची पाळी आली होती,१५ फेब नंतर दिड लाखाचे पर्सनल लोन घेतले,बायकोकडुन ५० हजार घेतले,परत सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत ओपिडी चालु केली. दोन तीन जणांना तात्पुर्ते कामावरुन कमी केले, ३ ते ४ महिन्यात बर्यापैकी घडी व्यवस्तीत बसली.आता सहाच महिन्यात पुण्यातले पॅरालिसकरीताचे संयुक्त उपचार पद्धतीवरीत आधारित एकमेव रुग्नालय चालु करेल.
होता है बॉस थोडा थंडे दिमागसे सोचो.
18 Sep 2014 - 8:24 pm | स्पा
मुंबईत नोकरी करायची ईच्छा असल्यास काम अणि रिझ्युमे मला पाठवा
lazyprass@gmail.com
18 Sep 2014 - 7:31 pm | काउबॉय
स्वत: च्या पैसा कमवायच्या क्षमतेवर काही कारणाने दीर्घकाल रूपी भलेमोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेली च व्यक्तिच आत्महत्येचा मार्ग पत्करेल. तसेच चोरी मधे रिस्क फैक्टर्स हाय आहेत. त्यापेक्षा व्यावसायिक जोखिम पत्करणे योग्य.(उत्कृष्टच)
पैसा कमवायची जिद्द (व व्यावसायिक अक्कल) नष्ट झाली नसल्यास तात्पुरते निर्लज्य बनुन वेळ मारून न्या.
बाकी रोज प्राणायाम न चुकता कराच. उल्हासित वाटणार असेल तर आरत्या करा. निराश मन ध्यान करू शकत नाही तेंव्हा सर्व आलबेल होई पर्यन्त यात पडू नका. अर्थात शेवटी लिहलेले हे सर्व मनाच्या उभारीसाठी आहे पैसा मिळायला याचा प्रत्यक्ष संबंध नाही.
18 Sep 2014 - 7:32 pm | आतिवास
हेही दिवस जातील. निराश होऊ नका.
कदाचित पुढच्या वळणावर यश तुमची वाट पाहात असेल.
शुभेच्छा.
18 Sep 2014 - 7:48 pm | arunjoshi123
७-८ लाख बिना तारणाचे तुम्हाला देणारे लोक असतील, तर माझ्या मते ते अंततः ते तुमचे हितचिंतकच आहेत/होते. समस्या सुटल्यावर (बाळ एकदा जगात आले, सेक्यूअर झाले) कि लोकांना पैसे पटकन परत पाहिजे असतात. त्यात फार काही चूक वाटत नाही.
त्यातले काही बँकेचे तारणाचे लोन असेल तर बँकेने तितक्याचा कब्जा आतापर्यंत घेतला असेल. जर बिनातारणाचे लोन असेल माझे मते ते बँकेचा हळूहळू एन पी ए होईल. मंजे बँक तुम्हाला त्रास देईल, पण सभ्यपणे आणि नंतर विसरून जाईल.
बिझनेस बुडणे आणि त्याच वेळी घरात मोठा खर्च होणे हे बॅडलक आहे, पण नाईलाज आहे. आता:
१. तुमचे सगळे पैसे मित्रांचे असले तर ते बँक लोन मधे बदला. मित्रांना एकगठ्ठा पैसे परत पाहिजे असतात. त्यामानाने इएमआय सोपी पडते. आणि फालतू बँकेकडे जा, त्यांचा व्याजदर जास्त असतो पण ते एस बी आय सारखे कागदांसाठी छळत नाहीत.
२. जास्त मानसिक ताण असेल तर शेत वैगेरे असल्यास विकून टाका. एखादा असेट विका. बिझनेस विका. घराचे तारण करा. ओवरटाईम करा. जास्तीची नोकरी करा. कमी भांड्वलावर अजून काही चालू करता येतं का ते पहा. पत्नीदेखिल काय काय करू शकेल ते पहा.
३. काही काळ घरखर्च खूप कमी करा. त्यानं थोडं प्रयत्न केल्याचं समाधान वाढतं.
४. काउंसेलर वा मानसोपचार तज्ञाला एक भेट अवश्य द्या.
--------------------------------------------------------------------------------
वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन.
------------------------------
पैसे असून परत न देण्याच्या इच्छेला निर्लज्जपणा म्हणतात. तुम्ही त्यापुढे अजून काय काय विचार करत आहात ते किती चूक आहे हे जाऊच द्या, पण असं स्वतःला निष्कारण निर्लज्ज म्हणणंदेखिल चूक आहे. लोक कितीही वाइट असले तरी अंगावरचे कपडे आणि तोंडचा घास काढून नेत नाहीत.
------------------------------
तुम्ही जितक्या मनस्वीपणे समस्या मांडली आहे, तितक्याच मनस्वीपणे मी प्रतिसाद देत आहे. शिवाय अशी परिस्थिती हाताळण्याचा मला लंबाचौडा अनुभव राहिला आहे. माझ्या प्रतिसादातलं प्रत्येक विधान योग्य आणि उचित असेल असं नाही, पण स्वतःला टेलर मेड करून वाचा.
18 Sep 2014 - 8:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
वर्कींग कॅपिटल मुळं मोठमोठ्या कंपन्यांचे हुश्शार मॅनेजर परेश्शान झालेले असतात. आपण तर सामान्य लोक आहोत. तुम्ही म्हणालात कि फार तर ३ वर्षांत तुम्ही ८ लाखांचे कर्ज फेडाल. मंजे, हे कर्ज फेडल्यानंतर येणार्या पुढच्या प्रत्येक ३ वर्षाला ७-८ लाख (५ म्हणा) रुपये बचत करायची तुमच्या कुटुंबाची क्षमता आहे. मंजे आज तुमचं वर्किंग कॅपिटल फार वाईट स्थितीत असलं तरी (तुम्हाला नुकतंच बाळ झालं आहे, नि तुम्ही तरूण आहात, तुमचे उरलेली वर्षे पाहून) आयुष्यभर तुमची सांपत्तिक स्थिती खूप चांगली असणार आहे. शिवाय तुम्ही जी एकूण वर्षे जगणार आहात त्यापैकी केवळ ३ वर्षे हलाखीत काढणार आहात. (बर्याच लोकांच्या तुलनेत तरी फार नशीबवान आहात.)मग तुम्ही जितके टेंशन घेत आहात ते घेण्याची गरज नसावी. आता पैसे मागायला येणारे लोक कसे हँडल करावेत हे तुम्हाला जमलं वा नाही जमलं तरी तो प्रकार आपणांस हळूहळू अंगवळणी पडेल. पुन्हा नो टेंशन.
+१००.सरळ सोपे पण पूर्णपणे वास्तववादी आर्थिक समिकरण फार आवडले.
18 Sep 2014 - 8:13 pm | शिद
वरील सर्वांशी सहमत. उगाच काही अनाहूत सल्ला देत बसत नाही कारण ज्याची जळते त्यालाच कळते.
तुमच्या खडतर परीस्थितीमधून लवकरच तुम्हाला बाहेर पडण्याची शक्ती व संधी मिळो आणि मनोजोगं यश पदरात पडो हि "श्री" चरणी प्रार्थना.
18 Sep 2014 - 8:41 pm | श्रीरंग_जोशी
उमेदीच्या काळात पहिले शैक्षणिक अडचणी व नंतर आर्थिक अडचणींचा बराच सामना मी केलेला आहे. संकटातून मिळालेला धडा माणूस कधीच विसरत नाही. बरीच वर्षे अवघड आर्थिक परिस्थिती अनुभवली असल्याने आजही अनुत्पादक छंदांवर रुपयाही खर्च करत नाही. या अनुभवांसाठी मी नशिबाचे आभारच मानतो.
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठी नव्हे तर अडचणीत असणार्या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
तुम्ही या अवघड परिस्थितीतून यशस्वीपणे मार्ग काढाल असा विश्वास वाटतो.
18 Sep 2014 - 9:42 pm | श्रीरंग_जोशी
कृपया हे वाक्य खालीलप्रमाणे वाचावे.
वर सर्वांनी अत्यंत सकारात्मक उपाय सुचवले आहेत. ते तुमच्यासाठीच नव्हे तर अडचणीत असणार्या इतरांसाठीही मोलाचे आहेत.
18 Sep 2014 - 8:23 pm | जेपी
जास्त काही बोलणार नाही.व्यनी टाका .
प्रत्यक्ष बोलु.
18 Sep 2014 - 8:49 pm | प्रसाद गोडबोले
सगळ्यात पहिल्यांदा उद्याच्या उद्या सायकॅट्रीस्टला भेटा . बाकीचे नंतर बघु !
18 Sep 2014 - 9:20 pm | एस
सर्वांनी योग्य सल्ले दिले आहेतच. पण नकारात्मक मनःस्थितीतून बाहेर येण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे कुणालातरी अतिशय निरपेक्षपणे, कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न ठेवता मदत करा. भलेही ती मदत अतिशय क्षुल्लक का असेना. बघा, स्वतःबद्दल खूप छान वाटू लागेल आणि गमावलेला आत्मविश्वासही परत येईल.
बर्याच केसेसमध्ये मी हा मार्ग यशस्वीपणे वापरला आहे.
शुभेच्छा. कसलीही मदत हवी असेल तर जरूर संपर्क करा.
18 Sep 2014 - 9:24 pm | बहुगुणी
संपूर्ण धागाच 'वाचनखूण' ठेवण्याच्या लायकीचा आहे!
मिपा संस्थळ हे केवळ टाईमपास कराण्याची जागा नसून सभासदांना अगदी वैयक्तिक अवघड समस्याही सोडवणारं 'सुहृद' वाटावं यातच सगळं आलं.
संदीप: व्य नि केला आहे.
18 Sep 2014 - 9:27 pm | प्रभाकर पेठकर
धंद्यात आर्थिक नुकसान आणि देणेकर्यांचे तगादे, अपमानास्पद वागणूक आणि समोर पसरलेला अंधःकार हे मी सुद्धा इथे परदेशात अनुभवले आहे. इथे तर कोणी कोणाला आर्थिक मदत करीत नाहित. (४-५ मित्रांनी तरीही केली) बँक कर्ज मिळत नाही आणि धंद्याचे ओव्हरहेड्स मुळे कर्जाचा आकडा भरमसाठ वेगाने वाढत जातो. हां हां म्हणता डोक्यावरून पाणी जातं.
तुमची इच्छा असेल तर परदेशात नोकरी शोधा. दुबईत तुमचे क्लायंट आहेत म्हणजे तुमच्या ओळखी आहेतच. पेपरातून जाहिराती शोधून गल्फात नोकरी शोधा पासपोर्ट नसेल तर तो आधी बनवा). महिन्याला ५०-६० हजारापर्यंत आमदनी होईल. त्यातील ८० टक्के तरी बचत करू शकाल. (तिन वर्षाच्या ठिकाणी वर्षभरात कर्जाची परतफेड होईल.) देणी लवकर फिटतील. जरा जमापुंजी नीट जमली की परत जाऊन पुन्हा व्यवसाय प्रयत्न करा, पण ह्या वेळी जास्त सावधतेने. फॅन्सी आयडियाजच्या मागे न धावता कठोर वस्तूस्थितीशी सामना करत धंद्यात जम बसवा. जमेल सर्व काही.
18 Sep 2014 - 9:36 pm | प्यारे१
+१११.
अवांतरः व्यवसायाबाबत पेठकर काकांनी (किंवा अनुभवी कुणीही) काही सल्ले द्यावेत.
मुलभूत गोष्टी सगळीकडं त्याच असायला हव्यात असं वाटतंय. व्यवसायाच्या सुरुवातीपासून घ्यायची काळजी ते पुढचे 'टप्पे' पायरीप्रमाणंच व्हर्टीकल ग्राफ आणि काही काळानं स्टॅबिलिटी पुन्हा प्रगती पुन्हा आडवी रेघ असं काही असणं कसं आवश्यक असतं इ.इ.इ.
18 Sep 2014 - 9:54 pm | भिंगरी
मी स्वत। या समस्येतून गेलेली आहे आणि आत्ताही याच समस्येत आहे,पण सगळ्यांना स्पष्ट सांगितले आहे की पैसे नक्की देईन.त्यांनाही विश्वास आहे.पण माझे ज्यांच्याकडून यायचे आहेत तेही असेच सांगत आहे.त्यामुळे गुंता वाढला आहे.३/३ कामवाल्या ठेवणारी मी सर्व कामं हाताने करते पण इतरांना मदत करुन मानसिक समाधान मात्र मिळवते.
18 Sep 2014 - 10:34 pm | धर्मराजमुटके
माणसाने आपल्या करीयरची सुरुवात कमीतकमी २-३ वर्षे तरी नोकरी करावी. जरी तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तरी. शक्यतो छोट्या कंपनीमधे सुरुवात करावी म्हणजे सर्व प्रकारची कामे करण्याचा अनुभव येतो.
स्वतःचा अनुभव सांगतो. ही साधारण १९९८-२००० सालची गोष्ट आहे.
मी कॉलेज सोडल्यानंतर ग्राफीक्स डिजाईनिंग आणि डीटीपी, प्रिंटींगचा व्यवसाय सुरु केला. त्याअगोदर अनुभवासाठी नोकरी केलेली नव्हती. एक जुना ४८६ पीसी घेऊन सुरुवात केली आणी २ वर्षात २-३ संगणक, प्रिंटर असा चांगला सेटअप बनवला. मुळातच कोणतीही नवीन गोष्ट शिकण्याची आवड असल्यामुळे नवनवीन कला पटकन शिकत गेलो. पैसा फार चांगला मिळत होता अशातला भाग नाही पण भागात नाव कमविले. दुपारी दुकान बंद करुन घरी गेलो तरी गिर्हाईके दुकानासमोर लाईन लाऊन उभी असायची. कुणी पैसे नाही दिले तरी काम करुन द्यायचो कारण घरची जबाबदारी नव्हती. ३ वर्षानंतर दुकान बदलले आणि ग्रह फिरले. गिर्हाईक येईनासे झाले. पैसे थकले. १ लाख कर्ज झाले तरी लाजेस्तव दुकानात जाऊन बसायचो. नंतर देणेकरी छळायला लागल्यावर दुकानातून आणि घरुन गायब व्हायला लागलो. पुस्तक घेऊन सार्वजनिक उद्यानात दिवसेंदिवस वाचत बसायचे आणि रात्री घरी जायचो. ज्योतीषांच्या नादी लागलो. हात / चेहरा बघून भविष्य सांगणारा ते कुंडली वरुन भविष्य सांगणारा असे सर्व प्राणी बघीतले. मुंबईपासून पुण्यापर्यंत त्यांच्या मागे हिंडलो. कोणी आशा दाखविली तर कोणी तुला धंदयात यश नाही, तु नोकरीच कर असे सांगीतले. मात्र हे सर्व करत असतांना परमेश्वरावरील भाव कमी झाला नाही की व्यसने लागली नाहित. शेवटी वडीलांनी माझ्या अनुपस्थीत दुकानाला टाळे ठोकले. नसते उद्योग करण्यापेक्षा घरी बस. मी तुला पोसतो असे म्हणाले.
त्या दरम्यान दुकानात एक मुलगी फोन करण्यासाठी यायची. तिच्या कंपनीत हार्डवेअर इंजीनिअरचा जॉब आहे, कोणी आहे का कामासाठी म्हणून विचारायची. मित्रांनी माझे नाव सुचविले. मी व्यवसाय करण्याआधी संगणक जुळणीचा चार दिवसांचा एक हॉबी कोर्स केला होता. व्यवसायासाठी जुना पीसी घेतल्यामुळे तो वारंवार बिघडायचा तेव्हा तो खोलायचा, जोडायचा, फॉर्म्याट करायचा आणि आवश्यक सॉफ्टवेअर टाकायची एवढेच माहित होते. एवढ्या अपुर्या शिदोरीवर उडी मारायचे ठरविले कारण दुसरा उपायच नव्हता. मुलाखतीसाठी चार पाच चकरा मारल्या पण दरवेळी म्यानेजर कामानिमित्ताने कुठेतरी गेलेला असायचा. शेवटी आपल्या नशीबात नोकरीदेखील नाही असे समजून निराश झालो. मग साधारण १०-१५ दिवसांनंतर त्याच कंपनीला तातडीची गरज पडल्यावर ती मुलगी मला शोधत शोधत आली आणी कसेही करुन आज मुलाखतीला चल म्हणाली. तसेच दाढी न करता, शर्ट इन न करता मुलाखतीला गेलो पण कंपनीला फारच गरज असल्यामुळे तातडीने सिलेक्शन झाले. पगार होता १८०० रुपये.
नोकरीचे फिक्स झाल्यावर सगळ्या देणेकर्यांना भेटलो. खरी खरी परिस्थीती सांगीतली आणि तुमचा एक पण रुपया बुडणार नाही पण सगळे पैसे एकदम पण देता येणार नाहीत हे स्पष्ट केले. सगळ्यांनी सहकार्य केले आणि ४ वर्षात सगळे देणेकरी मिटवले. दरम्यान घरच्यांनी मला जवळजवळ फुकटच पोसले. नंतर लग्न केले, एक मुल झाले.
मासीक रु. १८०० वरुन सुरुवात करुन रु. ५०,०००० पर्यंत पोहोचलो पण नोकरीत मन रमत नव्हते म्हणून परत २०११ ला नोकरी सोडून व्यवसाय सुरु केला. बायकोला पहिलेच सांगून ठेवले की नोकरी सोडतोय. धंदा चालेल न चालेल पण मला तेच करायचयं. घरी देणेकरी येऊ शकतील तर त्यांना सहन करावे लागेल. सुदैवाने तिने होकार दिला, त्रास सहन केला. अजूनही मधून मधून अतिशय वाईट दिवस येतात (कारण एकदा पैसे गुंतविले की २-३ महिन्यांनीच पैसे येतात.) पण आता सवय झालीय. आता नवे देणेकरी आहेत पण त्रास नाहीये. सध्या बर चाललयं.
मात्र या सर्व दिवसांत एक गोष्ट शिकलो. लहानथोर सगळ्यांशी नम्रपणे वागलो. कोणालाही कठोर बोललो नाही. ज्याच्याकडून पैसे घ्यायचे त्यालाही नाही आणि द्यायचे त्यालाही नाही. शेवटी माणसे जोडणे हेच कामाला येते. पैसा दरवेळी कामाला येतोच असे नाही.
हे सगळे सांगण्यामागे स्वतःची लाल करणे हा हेतू नाही. ती ऑलरेडी बर्याच कारणांमुळे लाल झालेली आहे. :)
पण धीर सोडू नका आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तोंड चुकवू नका. प्रामाणिकपणाची कदर करणारे या जगात अजून पुष्कळ आहेत. मी तुमचा एक रुपया बुडविणार नाही असे सांगत चला. जर कबूल केलेल्या वेळेस पैसे नाहि देता आले तर त्यांना प्रत्यक्ष भेटा, फोन करा आणि कल्पना द्या. १०० च्या ऐवजी १० रु. देता आले तरी ते द्या.
दिस जातील, दिस येतील भोग सरलं, सुख येईल !
आत्महत्या आणी चोरीचा विचार करु नका. आपल्यामागे आपल्या कुटुंबाचे काय हाल होतील याचा विचार करा. अशा निर्णयाने आपण त्यातून कदाचित सुटून जाऊ पण आपल्या माणसांच्या नजरेतून कायमचे उतरु हे लक्षात ठेवा.
19 Sep 2014 - 1:13 am | खटपट्या
_/\_
19 Sep 2014 - 12:45 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१००
प्रतिसादासाठी _/\_
19 Sep 2014 - 4:05 pm | वैभव जाधव
मुटके साहेबान्चा सांगणे अगदी परफेक्ट आहे. स्वता परिस्थितीतुन पार पडल्यामुळे त्यांच्या बोलण्याची खरी किंम्मत कळते. संदीपसाहेब बिल्कुल धीर सोडू नका. १००० माणसात एखादा आर्टिस्ट असतो. तुम्ही तर त्या कलेत एवढे शिकलेले अणि अनुभवि आहात. सगळे चांगले होईल बघा. त्यात इतक्या मिपाकरानि एवढा मनापासुन धिर दिलाय. त्यांचे सगळ्यांचे आभार माना. मिपाकर वेळेला धावून येतातच हे दिसले. जिओ मिपा.
20 Sep 2014 - 12:48 am | सखी
असेच म्हणते. मुटके आणि इ.एक्काकाकांचेही प्रतिसाद अतिशय आवडले.
चांगले आणि वाईट दोन्ही दिवस खरचं कायम रहात नाहीत. तुम्ही नक्की यातुन बाहेर पडाल.
18 Sep 2014 - 11:10 pm | आजानुकर्ण
आत्महत्येचा विचारही करु नका. तुमच्या बायकामुलांसाठी तेवढे धैर्य गोळा करुन ठेवा. आर्थिक अडचणींचा सामना केलेल्या सर्वांनाच पैशाचे सोंग आणता येत नाही याची जाणीव असते. पण खर्च कमी करुन टिकून राहण्याचे विविध मार्ग शोधा.
गावी असताना बांधकाममजूर कम शेतमजूर असा माझा एक शेजारी तुमच्यासारख्याच परिस्थितीतून जात होता. कर्जदार दर आठवड्याला त्याच्या घरी येत. आम्हाला आमच्या घरातही शिवीगाळ व भांडणे नेहमी ऐकू येत असत. दुर्दैवाने त्याच्यावर चोरी करण्याइतकी वाईट परिस्थिती आली होती. अगदी कमी शिक्षण आणि मर्यादित स्किलसेटमुळे त्याला इतर काहीही करणे अशक्य होते. एका दिवाळीत त्याने आमच्या घरातही चोरीचा यशस्वी प्रयत्न केला होता. आज त्याचा थोरला मुलगा टीसीएसमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर आहे, धाकटा मुलगा गावात स्वतःचे क्लासेस घेतो. दोन्ही मुलांची स्वतःची घरे आहेत.
चांगले दिवस नक्की येतील या आशेवर हे दिवस निभावून न्या. प्रामाणिकपणाने नंतर कर्जदारांचे पैसे चुकवा.
याच्याशी सहमत.
18 Sep 2014 - 11:38 pm | कवितानागेश
वर सगळ्यांनी लिहिलं आहे तसंच सांगते... बहुतेक सगळेच अशा परिस्थितीतून गेले आहेत.
कर्ज फेडण्यासाठी आधी दर महिन्याचा खर्च ठरवून तेवढे बाजूला काढायचे. उरलेले, भले ते १००० ते १०००० कितीही असुदेत, आधी महत्त्वचे कर्ज फेडायला वापरायचे. आम्ही दोनेक वर्षे याच पद्धतीनी वागून पुष्कळ कर्ज उतरवलेलं होतं. हातात नेमकेच पैसे शिल्लक असले की आपोआपच खर्चावर नियंत्रण येतं.
शिवाय शक्य असेल तर सोने वगरै विकून बरचसं कर्ज उतरवता येइल. मात्र अगदी सिनेमात दाखवलय तसं दादासाहेब फाळकेंसारखं घरातल्या चीजवस्तू, भांडी पण विका असा सल्ला निश्चित देणार नाही. त्याची गरजही पडणार नाही.
आताच्या काळात नोकरी लागली की झालं असं होत नाही. आणि स्वतंत्र व्यवसायात तर क्लायंट्कडून पैसे मिळ्णं फार कठीण जातं..... त्याचा नियम असा की ५०% अॅड्वान्स घेतल्याशिवाय कामाला हात लावायचा नाही. (मग निदान २५-३० % तरी हातात येतात) सुरुवातीला कठीण जाईल. पण जे जेन्युअन कस्टमर्स असतील, तेच येतिल आणि तुम्हाला पैसे बुडण्याचं फ्रस्ट्रेशन येणार नाही.
19 Sep 2014 - 12:52 am | चिगो
सल्ला देण्यास मी अपात्र आहे. पण तरीही..
वर बर्याच जणांनी मनःपुर्वक आणि काहींनी अनुभवसिद्ध + मनःपुर्वक असे सल्ले दिलेयत, त्यांबद्दल विचार करा.
आत्महत्या हा तर मार्ग असूच शकत नाही, कारण तुम्ही मार्ग बंद करण्याबद्दल / थांबण्याबद्दल विचार करताय. तेव्हा तो विचारही मनातून काढून टाका.
चोरी करणे, हापण मार्ग अत्यंत अयोग्य आहे, कारण की तुम्ही कायद्यात तावडीत सापडाल. मला वाटतं की तुम्हाला मदत करणार्या बहुतांश लोकांचा तुमच्या चांगुलपणावर विश्वास असेल कींवा प्रयत्न केल्यास बसेलही. (काही लोक तुमच्या वाईट परीस्थितीमुळे जरा "जिटरी" झाले असतील. ते होणारच थोडंफार) पण जर तुम्ही गुन्हेगार ठरलात, तर तुमची सगळी गुडवील संपेल आणि ती परत कमावणं जवळपास अशक्य होईल..
आयुष्यात कधीच कुठलाच प्रॉब्लेम न होता यशस्वी होणारे खुप कमी लोक असतात. "ये भी दिन बदलेंगे" म्हणत जरा धीर धरा, कळ सोसा.. हाच कठीण काळ उद्या यशस्वी झाल्यावर तुमच्या अभिमानाची बाब असेल. आजचे धडपडीचे, संघर्षाचे दिवस तुमच्या आठवणींचा ठेवा होईल.
फार नाही बोलत.. माझ्या आवडत्या ओळी आहेत, सुरेश भटांच्या.. त्या सांगतो.
"आजचे अमुचे पराभव पचवतो आम्ही उद्यास्तव
विजय तो कसला, उरावर जखम जो करणार नाही !!"
वाटलं, तर व्यनि करा. काळजी घ्या..
19 Sep 2014 - 1:12 am | खटपट्या
वरील सर्वांशी सहमत !!
आज मिपाकर असल्याचा अभिमान वाटला !!
19 Sep 2014 - 3:07 am | मुक्त विहारि
तरी पण इतकेच सांगू शकतो की,
आत्महत्या करायचा विचार पण मनांत आणू नका.
दिस जातील, दिस येतील, भोग सरल, सूख येईल.
माझे सल्ले.
१. भरपूर वाचन करा.
२. सवंगडी जोडा. हसा-खिदळा.
३. व्यायाम करा.
४. बायको-बरोबर मनसोक्त गप्पा मारा.
५. मुलांच्या बरोबर सिनेमा बघा.
६. बिंधास्त रहा.(मला कल्पना आहे, की ६व्वा सल्ला तुम्हाला आवडणार नाही, पण बिंधास्त रहा, म्हणजे तुम्ही कर्ज घेतले आहे.चोरी नाही केलेली किंवा फसवणूक पण केलेली नाही.धंद्यात खोट येणे हा गुन्हा नाही.ती एक शिकवण आहे,त्याचे तुम्ही पैसे मोजलेत, इतकाच फरक.पण ह्या तुमच्या शिक्षणाचा फायदा तुमच्या मुलांनाच होईल.)
आणि
७. व्यसनांपासून दूर रहा. विशेषतः दारू पासून.
लहान तोंडी मोठा घास घेतल्या बद्दल क्षमस्व.
बादवे, पुण्यात रहात असाल तर आणि गुरुंवर विश्र्वास असेल तर, शंकर महाराजांच्या मठात जावून या.एक मानसिक समाधान मिळते.
थोडी भर घालतो.
तुमच्या पाशी काय आहे ते बघा आणि त्यातून काय उत्तम मार्ग काढता येईल ते बघा.
आपल्या पेक्षा निर्लज्ज माणसे पण ह्या जगांत आहेत.आपण मध्यमवर्गीय आणि पापभीरू माणसे असल्याने, कर्जामुळे घाबरतो.
19 Sep 2014 - 6:27 am | स्पंदना
मन मोकळ करण्याकरिता मिपावर यावं इतक मिपा आश्वस्त वाटलं हे खरच वाखाणण्याजोगं आहे.
अन मिपाकर तुमच्या या विश्वासाला जागले देखील.
वरील प्रतिसाद वाचुन जाणवले असेलच तुम्हाला की तुम्ही एकटेच नाही आहात अश्या परिस्थीतीतुन जाणारे. अन मदतीचे हात देखील आले आहेत समोर. अर्थात मदत घेताना ती तुम्हाला दुबळी वा पंगु बनवणार नाही हे सुद्धा पहा. स्वबळावर उभे करायला जे हात समोर येतील ते कणखर असतील.
तुम्ही उल्लेख केला आहे म्हणुन विचारते काय कॉम्प्लिकेशन्स झाली होती बाळाच्या जन्माला? आता सगळ ठिक आहे ना? तुमची स्वतःची मनस्थीती इतकी ढासळलेली तर तुमच्या पत्निला ज्या दिव्यातुन शारिरीक्दृष्ट्या सुद्धा जावं लागल असेल त्यांची काय अवस्था असेल?
तुम्हाला धिर हवाय ना? पहिला तिला धिर द्या. दोघे ,मिळुन खंबीर व्हा. पुढे हे वळण संपल कीया वेळी आपण दोघे एकत्र उभे राहिलो याचा अभिमान अन सार्थकता वाटेल.
जाणार आहेत हे ही दिवस.
19 Sep 2014 - 7:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपाकरांचे इतके उत्तम प्रतिसाद आले आहेत की आता काही सांगण्यासारखे नाही.खंबीरपणे परिस्थितीचा मुकाबला करा दिवस निघून जातील,आपल्याकडे स्किल आहे यशस्वीच व्हाल. शुभेच्छा.
मिपाकर असल्याचा अभिमान वाटला. जियो मिपाकर जियो.
-दिलीप बिरुटे
19 Sep 2014 - 8:00 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
आत्महत्त्या किंवा चोरी करणं हा पर्याय होऊ शकत नाही. आशावादी राहा. प्रयत्नांती परमेश्वर हे लक्षात ठेवा.
१. सगळे अनावश्यक खर्च बंद करा.
२. देणेकर्यांचे जसे पैसे देता येतील तसे देत चला. तुमची पैसे परत करायची ईच्छा आहे हे त्यांना दिसु देत.
३. व्य.नि. करतोय त्याला उत्तर नक्की द्या.
19 Sep 2014 - 8:08 am | vikramaditya
सगळेच मुद्दे कव्हर केले की मिपाकरांनी. ज्या उद्देशाने लेखकाने हा विषय मांडला त्याला न्याय मिळाला असे वाटते.
वरील प्रतिसादांतील शब्दनशब्द लाख मोलाचा आहे. अनेक उत्तम विचार मांडले आहेत. शांतपणे ते वाचा.
आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल. अरे हो, आणि अश्या प्रसंगात आपले कोण आणि परके कोण ह्याची पण ओळख होते नाही का? आपल्या पाठीशी उभे राहिलेल्यांना विसरु नका. इतरांना ह्या पुढे थोडे लांबच ठेवा.
"राह पकड तु एक चला चल, पा जायेगा मधुशाला."
(अर्थात मधुशाले पासुन दूर राहण्याचा सल्ला पण वर आलाच आहे.)
शुभेच्छा.
19 Sep 2014 - 8:13 am | नितिन थत्ते
मुदत मागितल्यावर ती मिळाली तर शक्य झाल्यास मुदतीआधी त्यांना पैसे द्या. त्यामुळे तुमच्यावरचा विश्वास वाढेल.
19 Sep 2014 - 8:14 am | नितिन थत्ते
आणि हो....
नोकरी करणे शक्य असेल तर कराच.
"छ्या.... नोकरी कसली करायची?" किंवा "नोकरी म्हणजे गुलामी" असल्या विचारांच्या आहारी जाऊ नका.
19 Sep 2014 - 8:31 am | vikramaditya
विषयांतर करुन एक निरिक्षण नोंदवतो.
काही समाजांमध्ये (प्रत्यक्ष माहिती आहे), अश्या अडचणीत सापडलेल्या व्यक्तीच्या मदती साठी समाजातील धनवान लोक पुढे येतात. प्रथम देणेक-यांना पेमेंट करुन टाकतात. त्यामुळे कर्जदार थोडा सेटल होतो. मग त्याला आपल्याच सर्कल मध्ये चार कामे मिळवुन देतात, आपली एखादी रिकामी जागा थोडा काळ वापरायला देतात. आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो. पुढे त्याने पैसे कमवले तर इतर अश्या अडचणीत सापडलेल्यांना (पण त्याच समाजातील) तोही मदत करतो. असे एक आर्थिक सेफ्टी नेट 'बरेचदा' त्यांना उपलब्ध असते. असो.
19 Sep 2014 - 8:41 am | प्रभाकर पेठकर
>>>>आणि लवकरात लवकर तो ते पैसे परत करतो.
हे सगळ्यात महत्त्वाचे. पण आपल्याला अनुभव विपरित येतात. शिवाय पुन्हा त्याचा धंदा चालला पाहिजे. स्वतःची गुंतवणूक असताना जर एखादा नुकसान करून घेत असेल (जनरल बोलतो आहे. धागाकर्त्या बद्दल नाही) तर दुसर्याच्या पैशांची तो काळजी घेईलच असे नाही. असेही उदाहरण मी अगदी जवळून पाहिले आहे.
19 Sep 2014 - 9:01 am | vikramaditya
समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो. नाती गोती फार जपली जातात. आर्थिक व्यवहारांवर बारकाइने लक्ष ठेवतात.
दुस-याने पैसे फेडले म्हणुन मूळ कर्जदार उंडारायला मोकळा, हा प्रकार न होवु देता , ते त्याला "लाइनी'वर ठेवतात आणि आपले पैसे परत येतील ह्यासाठी लक्ष ठेवुन असतात. शेवटी बिसिनेस आणि पैसा त्यांच्या रक्तात आहे. मदत वगैरे ठीक आहे, पण पैसा त्यांचा देव आहे.
19 Sep 2014 - 9:18 am | प्रभाकर पेठकर
त्या समाजाचा एक गुंतागुतीचा मेट्रीक्स असतो.
मला वाटतं हे 'समाजसापेक्ष' नसून 'व्यक्तीसापेक्ष' असतं. मलाही धंद्यात नुकसान होऊन मित्रांकडून कर्ज घ्यावं लागलं होतं. त्याकाळात बायको-मुलासह माझ्या कर्मचार्यांच्या सदनिकेतच एका खोलीत संसार करत होतो. पार्ट्या, दारू, सहली सगळं बंद केलं होतं आणि ज्याच्याकडून आर्थिक मदत घेतली होती त्या सर्वांची पै आणि पै फेडून टाकली नंतर वेगळं घर घेऊन कुटुंबासह तिथे राहावयास गेलो.
19 Sep 2014 - 9:58 am | काळा पहाड
म्हणजे हे आता चालू आहे का? तसं असेल तर वाईटच.
19 Sep 2014 - 2:18 pm | प्रभाकर पेठकर
का बरं वाईट? दुसर्याच्या पैशात नाही करत. स्वतः दिवसाला १४ तास काम करून, स्वकमाईत, सर्व संसारीक जबाबदार्या पार पाडून करतो.
19 Sep 2014 - 8:59 am | नाखु
परिस्थीतीतून सुयोग्य मार्ग मिळण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
चाकरमानी ना.खु.
19 Sep 2014 - 9:45 am | नाव आडनाव
milton@sidefx.co.in
mitoons@gmail.com
jjsophi@gmail.com
माझी एक सहकारी आहे जेसी. तिच्या नवर्याची पुण्यात एक कंपनी आहे. जर तुम्हाला नोकरी करायला हरकत नसेल तर या एमेल आय डी वर तुमचा रेझुमे पाठवा. तुमच्या स्कीलचं / त्यासारखं काम तिथे आहे. मी तिच्या बरोबर बोललो आहे आणि तिला सरं सांगितलं आहे. तिच्या कंपनीत नसेल आता ओपनिन्ग तर तिचा नवरा त्याच्या ओळखिच्या बाकिच्या लोकांना फोरवर्ड करू शकतो. आणि शक्य असेल तर वर्क फ्रॉम होम साठि सुध्दा बघु शकतो.
साहेब, मी बुजुर्ग नाहि. तुम्हि तुमच्या बद्दल लिहिलंय त्या वरून वाट्तय कि तुम्हि आणि मी थोड्याफार फरकाने एकाच वयाचे असु. मी दोन मुलिंचा बाप आहे. तुमचि मुलं रोज सन्ध्याकाळि तुमचि वाट बघत असतील. त्याना काय फरक पडतो तुमच्या कडे पैसा आहे कि नाहि. पण त्याना तुम्हि नसला तर मात्र मोठा फरक पडेल. तुमचा अनुभव बघता, तुम्हाला हे कर्ज फेडायला वर्स्ट केस मधे २-३ वर्षां पेक्षा जास्त लागणार नाहित. तुमच्या मुलांना (आणि तुमच्या घरी सगळ्यांना ) तुमचि गरज आहे. तुम्हि हा विचार केला नाहि असं नाहि. पण तो परत परत करा, म्हणजे दुसरं काहि डोक्यात येणार नाहि. जर शक्य असेल तर रेझुमे लगेच पाठवा.
19 Sep 2014 - 11:13 am | arunjoshi123
थेट कामाचा सल्ला. तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यातले लोक नशीबवान असणार.
(मला हाच अभिमान व्यनिंतून अशीच मदत करणारांचा देखिल आहे.)
20 Sep 2014 - 3:33 pm | आसुड
वर नमुदलेल्या पैकी साईड एफएक्सला थोडी ओळख आहे जमल्यास व्यनि धाडा. काम करुनच देईल.
21 Sep 2014 - 12:44 am | खटपट्या
ये बात !!!
21 Sep 2014 - 10:18 am | नाव आडनाव
मिल्टन (पहिला आय डी) साइड एफ एक्स चे को-फाउंडर आहेत. तेहि शक्य तितकि मदत करतीलच.
19 Sep 2014 - 10:02 am | काळा पहाड
तुमच्या मुलांना अनाथ करायचा तुम्हाला काही एक अधिकार नाहिये.
19 Sep 2014 - 10:09 am | उगा काहितरीच
तुमचा बिझनेस कोणता आहे ते सांगा म्हणजे त्या अनुषंगाने काही सुचत असल्यास फायदा होईल .
19 Sep 2014 - 10:13 am | काळा पहाड
आवो वर लिवलंय तर त्यान्नी.
उगा काहितरीच!
19 Sep 2014 - 10:22 am | संदीप डांगे
मिपाकारांचा प्रतिसाद आणि समंजसपणा बघून खरच भारावून गेलो. खरच काहीही ओळखपाळख नसताना अनपेक्षितपणे आपण सगळ्यांनी ज्या आपुलकीने सल्ले दिले, मदतीचा हात पुढे केला ते बघून डोळ्यात पाणी आले. तुमचे प्रयत्न वय जाऊ देणार नाही.
अशी परिस्थिती पूर्वी कधी न आल्यामुळे खूपच वैतागलो होतो. कुणाशी बोलत पण येत नवते. पुढे काय करता येईल याबद्दल काहीच कळत नव्हते.
आता काही गोष्टी मी ठरवल्या आहेत. माझ्यावर हि स्थिती का आली आणि आताची नक्की आर्थिक, मानसिक आणि कौटुंबिक परिस्थिती काय आहे, मिपावरच का मांडले ह्याबद्दल सविस्तर लिहिणारच अहे. सगळ्यांचे व्यक्तिश: धन्यवाद पण द्यायचे आहेत.
आपण सर्वानी गंभीरपणे हा विषय हाताळला ह्याबद्दल मनापासून धन्यवाद.
19 Sep 2014 - 10:24 am | प्रभाकर पेठकर
काय निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी कशी करणार आहात ह्याचे तपशिलवार विवेचन मिपावर दिल्यास भविष्यात इतरसद्सयांनाही फायदा होऊ शकेल.
धन्यवाद.
19 Sep 2014 - 11:26 am | arunjoshi123
मिपाकरांनी आपुलकिने सल्ले दिले हे कौतुकास्पद आहेच, पण आपण देखिल मिपाकरांशी आपले मनोगत शेअर केले हे कमी प्रांजळ नाही. तुमच्या अप्रोचमुळे या संस्थळाला एक नविन डायमेंशन मिळालं आहे. इथे असंही वातावरण आहे असं (एरवी बहुधा(केवळ तात्विक) वाद घालणार्या) सदस्यांना प्रथमच जाणवलं आहे.
19 Sep 2014 - 10:53 pm | इनिगोय
+१
लाखमोलाची मनं आहेत इथे. सरळ मनाने मागितलेल्या मदतीला असे इतके हात निरपेक्षपणे पुढे होतात, हा अनुभव मिपाकर नेहमीच देतात. या धाग्यावरचे प्रतिसाद पाहून खरंच मिपावरचं प्रेम द्विगुणित झालं.
संदीप, ही श्रीमंतीही आहेच की तुमच्याकडे. लवकरात लवकर या स्थितीतून बाहेर पडून असाच आणखी कोणालातरी आधार देण्याइतके सक्षम व्हा.. ही सदिच्छा.
20 Sep 2014 - 1:37 am | डॉ सुहास म्हात्रे
या बदललेल्या तुमच्या मनस्थितीने तुम्ही अर्धे काम फत्ते केले आहे !
नेट लावून धरा, उरलेले अर्धे नक्की पुरे कराल... आणि त्याने आलेला आत्मविश्वास तुम्हाला आयुष्यभर साथ देईल !!
यशस्वी होण्यासाठी अनेकानेक शुभेच्छा !!!
19 Sep 2014 - 10:29 am | टवाळ कार्टा
हा धागा so called management guru च्या motivational speeches पेक्शा १००० पट जास्त चांगला आहे
19 Sep 2014 - 11:35 am | बबन ताम्बे
माझा एक चुलत भाऊ पोटाची खळगी भरण्यासाठी २५ वर्षांपूर्वी एका ठिकाणी १०० रुपये पगारावर झेरॉक्स काढण्याचे काम करत होता. परिस्थितीशी प्रचंड झुंज घेत त्याने त्यावेळी M.Com.पुर्ण केले. आज तो एका चांगल्या कंपनीत चांगल्या हुद्द्यावर आहे. थोड्क्यात परीस्थिती माणसाला जिद्दी बनवते.
19 Sep 2014 - 10:51 am | अजया
सहमत.एक मिपाकर म्हणून अभिमान वाटला हे सर्व प्रतिसाद वाचुन .अभिमान वाटला हे लिहायला मिळाल्याचा आनंदही.
संदीपभाऊ,आगे बढो मिपा आपके साथ हैै।
19 Sep 2014 - 10:52 am | अंतरा आनंद
वर सगळ्यांनी अनुभवाचे सल्ले दिले आहेत. त्यात दोनच add करते.
(१) दिवसाकाठी तुमच्या मुलांबरोबर थोडा वेळ तरी आवर्जून खेळा. त्यावेळी समस्यांचा विचार करू नका.
(२) तुमच्याकडे कला आहे. वेळ असला तर आठवड्याकाठी थोडा वेळ मुलांना शिकवण्यासाठी द्या . हल्ली पालक मुलांनी कुठल्या ना कुठल्या कलेशी तोंडोळख तरी करून घ्यावी या विचारांचे असतात. तुम्हाला ठराविक उत्पन्न मिळेलच आणि मुलं ही stress buster असतात. त्यांच्यात सकारात्मक उर्जा असते. त्यामुळे समस्या सोडवण्याचा मार्ग सापडेल.
आता ह्या व्यवहारी सल्ल्यांवरुन स्वःताचा एक plan of action बनवावा आणि त्याप्रमाणे कार्य करावे. ह्यातुन बाहेर पडाल.
हे ही.
तुम्हाला तुमच्या सोनेरी भविष्यासाठी मनापासून शुभेच्छा.
19 Sep 2014 - 1:00 pm | पैसा
फुकटचे देण्यासाठी आमच्याकडे बरेच सल्ले असतात, पण अशा प्रसंगात अक्षरशः काट्याच्या टोकावर तोललेला बॅलन्स असताना सल्ला देणे सोपे काम नाही. सगळ्या मिपाकरांनी हे कठीण काम ज्या प्रकारे केलंय, आणि नुसते सल्ले देऊन थांबले नाहीत तर काम मिळवून देण्यासाठी मदतीचे हात पुढे झाले आहेत ते पाहून आज खरेच मिपाकर असल्याचा सार्थ अभिमान वाटला!
संदीपभाऊ, जास्त काही सांगणार नाही, मात्र जे आयुष्य आपल्या इच्छेने या जगात आलं नाही ते संपवायचा काही अधिकार आपल्याला नसतो. आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेतच. मात्र तुमची लढाई तुम्हाला लढावी लागेल. कधी थकल्यासारखं वाटलं, तर जरूर इथे येऊन मन हलकं करा.
मनापासून शुभेच्छा!
19 Sep 2014 - 9:24 pm | सुबोध खरे
+१०००
19 Sep 2014 - 1:00 pm | बॅटमॅन
सल्ला देण्यास प्रचंड अपात्र आहे, त्यामुळे फक्त हा धागा अन प्रतिसाद वाचला हे सांगण्यासाठी हा प्रतिसाद.
आज मिपाकर असल्याचा प्रचंड अभिमान वाटला.
19 Sep 2014 - 1:19 pm | प्रशांत
+ वाचनखुण साठवली आहे
20 Sep 2014 - 11:57 am | अत्रन्गि पाउस
हेच म्हणतोय ....
21 Sep 2014 - 3:20 am | सुहास झेले
ह्येच बोलतो.... काळजी घ्या !!
19 Sep 2014 - 1:04 pm | प्रमोद देर्देकर
अहो साहेब वरिल सर्वांनी खुप चांगले अनुभवाचे मार्गदर्शन देणारे प्रतिसाद लिहले आहेत. आता एक वही घेवुन हे सगळे सल्ले एकत्र करा किंवा याची प्रिन्ट घ्या आणि मला आता काय करायचे आहे त्याची एक यादी करा.
पण कोणत्या ही परिस्थित अजिबात आत्महत्येचा विचार करुच नका. सकारात्मक जगा. तुमच्या पिल्लांना पोरकं करुन तुम्ही जाणार? त्यात त्यांचा काय हो दोष?
आता सर्व मि.पा. करांना विनंती:- कितीही झालं तरी वरिल मार्गदर्शन हे आभासी आहे. म्हणुन जमल्यास त्या साहेबांना प्रत्यक्ष भेटुन त्यांना आत्महत्या करण्याचावाचुन परावृत्त करणासाठी एक अचानक कट्टा त्यांना मुंबई / पुणे येथे कुठे जमत असेल तर करुया का?
मला वाटते कि प्रत्यक्ष भेटीगाठीने त्यांना खुप फायदा होईल.
संदिपभावु तुमच्या पुढिल वाटचालीस शुभेच्छा.
!होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.!
19 Sep 2014 - 2:47 pm | विजुभाऊ
यात असलेला " गर्व" हा शब्द मराठीत वेगळ्या अर्थाने वापरला जातो.
उदा: गर्वाचे घर खाली......
19 Sep 2014 - 1:08 pm | माधुरी विनायक
मिपा करांनी खूप मोलाचे सल्ले दिले आहेत. आपल्यातल्या बहुतेकांना कधी ना कधी अशा अनुभवातून जावंच लागतं. स्वत:वरचा विश्वास कायम ठेवा. आत्महत्या आणि चोरी या दोन्ही प्रकारांचं समर्थन कोणत्याही परिस्थितीत करता येणार नाही. बायको आणि मुलांबरोबरचा संवाद जपा. हे दिवस नक्की बदलतील. ईश्वर तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी खूप बळ देवो...
सर्वच प्रतिक्रिया वाचल्यानंतर, मन मोकळं करण्यासाठी तुम्ही अगदी योग्य मार्ग चोखाळला आहे, हे जाणवलं आणि आवर्जून नमूद करावंसं वाटलं. शुभेच्छा!!!
19 Sep 2014 - 1:23 pm | भिंगरी
!होय मी गर्वाने म्हणतो की मीही एक मि.पा कर आहे.
मी प्रचंड सहमत आहे या विधानाशी.
19 Sep 2014 - 2:09 pm | पोटे
फ्रीलान्सर काम घरी बसुनच होते ना? मग त्यासाठी नोकरी का सोडली ?
आधी पटकन नोकरी बघा. मुंबई किंवा कुठेही
19 Sep 2014 - 2:13 pm | भावना कल्लोळ
संदीप साहेब, समदुखी म्हणायला हरकत नाही, आता ज्या परिस्थितुन जात आहात त्या पेक्षा काही वेगळी नाही माझी परिस्थिती. तरी पण आत्महत्या करणे हा मार्ग नाही. एवढी मेहनत करून हि जेव्हा गणिताचे उत्तर वजाबाकी मध्ये येते तेव्हा मनात असे विचार येतातच. चिडचिड, नैराश्य आणि खूप काही. आयुष्याचे समीकरण खुप वेगळे होऊन जाते. एरवी ठीक पण एकटे असल्यावर हे समीकरण डोळ्यासमोर नाचत बसते अन मग असे विचार येतात. पण अश्या वेळी हे असले विचार न करता काय नक्की केले तर हा प्रोब्लेम सुटेल, आयुष्याची घडी नीट बसेल याचा आराखडा घेत रहावा. कित्येक वेळेला ठरवुन, हातपाय मारून हि नाही सुटत कोडे उलटे गुंता वाढतो अश्यावेळी शांत राहावे. वेळेवर सगळे सोडुन द्यावे. जे करून मनाला आनंद मिळेल ते करावे. व्यसनापासुन कटाक्षाने दुर राहा त्याने समस्या अजून वाढतील. कुटुंबांबरोबर जास्त वेळ घालवा. या घडीला फक्त एवढेच बोलू शकते बाकी तो शिवशंकर तुमच्या समस्या लवकर सोडवो हीच प्राथर्ना आणि कठीण प्रसंगी, द्विधा अवस्था मध्ये मिपा मध्ये मारलेल्या हाकेला मिपाकर तेवढ्याच आपुलकीने साद देतात हा अनुभव मी अनाहिता मध्ये घेतला आहे म्हणून तर एक दुसरे हक्काचे माहेरघर आहे हे आमचे.
19 Sep 2014 - 6:55 pm | arunjoshi123
आवडले (प्रतिसादामागचे व्यक्तित्व).
19 Sep 2014 - 5:34 pm | सस्नेह
आज एक मिपाकर झाल्याचा अभिमान वाटला. तुम्हीही तो बाळगा अन जिद्दीने उठून दुसरे काम शोधायचा प्रयत्न करा.
आणि अनुभव शेअर करा.
19 Sep 2014 - 6:12 pm | आदिजोशी
मुळात आज जरी तुझ्या कडे १ पैसाही नसला तरी शांतपणे विचार केलास तर ७-८ लाख ही काही फार मोठी रक्कम नव्हे.
१. सगळ्यात पहिलं म्हणजे तुझ्या व्यवसायासाठी नाशीक हे कितपत योग्य ठिकाण आहे हे ठरव.
२. मुंबई अथवा पुण्याला शिफ्ट हो, तिथे ह्या लाईनमधे नक्कीच जास्त संधी आहेत.
३. बहुसंख्य लोकांनी आधी सांगितल्या प्रमाणे लोकांना तू पैसे परत करणार आहेस ह्याची खात्री पटव.
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे
४. जसा ह्या लोकांनी तुझ्या कडे तगादा लावला आहे तसाच तू सुद्धा तुझे पैसे येणे असणार्यांकडे लाव.
वाटल्यास एक पत्र आणि त्याची प्रत सगळ्यांना पाठव. कुणा कुणाला पाठवतो आहेस ते सुद्धा पत्रात नमूद कर.
ढोबळ मायना:
मी xxxxxx हे पत्र ह्यासाठी लिहित आहे की श्री xxxxxx, श्री xxxxxx ह्यांना मी xxxxxx रुपये देणं लागतो. सद्ध्याच्या घडीला मला श्री xxxxxx आणि श्री xxxxxx ह्यांच्याकडून xxxxxx रुपये येणं आहे. माझे पैसे ह्या लोकांनी वेळेवर न दिल्याने मला देणेकर्यांना पैसे देणं कठीण जात आहे, वगैरे वगैरे
सदर पत्राची पत एखाद्या सन्माननीय व्यक्तीलाही पाठव.
19 Sep 2014 - 8:02 pm | यसवायजी
संदीपभाऊ,तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही या परिस्थीतीवर लवकरच मात कराल.
आज सगळे प्रतिसाद शांतपणे वाचले. मिपाकर असल्याचा अभिमान वाटला.
19 Sep 2014 - 8:12 pm | चतुरंग
तुमच्यावर आलेली परिस्थिती नक्कीच कठिण आहे परंतु अशक्यप्राय नाही याची खात्री बाळगा.
बर्याचवेळा आपण धंदा सुरु केला की आता नोकरीत पुन्हा कसे जायचे या विचाराने कमीपणा वाटू शकतो तसे काही वाटत असल्यास आधी ते बाजूला ठेवा. घर चालण्यापुरता पैसा दरमहा यायलाच हवा हे नक्की, तो कसा येतो धंद्यातून का नोकरीतून हे गौण आहे. कॉमेंट्स करणारे 'मित्र', नातेवाईक यांना कटाक्षाने दुर्लक्षित ठेवा, दूर ठेवा. ते फक्त कॉमेंट्स करणार असतात घर तुम्हाला चालवायचं असतं!
चार वर्षाच्या मुलाला जवळ बसवून समजावून सांगा की सध्या परिस्थिती अवघड आहे त्यामुळे आपल्या सर्वांना मिळून यातून बाहेर पडण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. आपल्याला वाटते त्यापेक्षा मुले प्रचंड हुषार आणि समजूतदार असतात, त्यालाही आयुष्यभरासाठी शिकायला मिळेल की आपण आई-बाबांबरोबर अवघड स्थितीतून कसा मार्ग काढला. तो तुम्हाला त्याच्यापरीने कशी साथ देतो ते बघण्यासारखे असेल याचा विश्वास बाळगा!
थोडा स्वानुभव - काही काळ असा होता की खिशात फक्त ५०० रुपये आहेत संपूर्ण महिना रेटायचा आहे. त्यातच लग्न, मुंजी, बारशी असले आहेर, किराणा, भाज्या, दूध, फोनची बिले, विजेची बिले, धंद्यासाठी लागणारे भांडवल कसं आणि किती बसवायचं. काय टाळायचं, काय नाही? पत्नीने अशक्य साथ दिली. माझ्या जिवाभावाच्या मित्रानेही मला कामं देऊन मोलाची मदत केली. पुण्यात मी रोज २५-२५ किलोमीटर सायकलवर हिंडून कंसल्टिंगची कामं केलीत. धंदाच करत होतो. परंतु अपेक्षेप्रमाणे यश येत नव्हते. शेवटी मोठी नोकरी मिळवण्यासाठी एक कोर्स करत होतो. अतिताणामुळे भयंकर आजारी पडलो. कोर्सला स्वतः वाहनावरुन जाणे शक्य नव्हते. पत्नी रोज तिच्या चुलत बहिणीच्या लूनावरुन घेऊन जाई आणि परत घेऊन येई. तशाच आजारी अवस्थेत कोर्स पूर्ण केला, आमची टीम विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली! अर्धग्लानी अवस्थेत तो प्रवास मी रोज कसा करायचो हे मला आज आठवत नाही! अतिशय जवळच्या डॉक्टरकाकांकडून उपचार घेतले कारण खर्चाला पैसेच नव्हते. पण जिद्द सोडली नाही. वेळ निभावली. शक्यतो फार कर्जे होऊ दिली नाहीत. नोकरी लागताच देणी फेडून टाकली.
परिस्थितीने खूप काही शिकवले, खरेखरे आपले, परके समजले! पत्नी आणि मी मनाने फार जवळ आलो.
आज सगळे व्यवस्थित आहे. कोणत्याही परिस्थितीत यश डोक्यात जात नाही कारण कठिण दिवस कसे असतात ते अनुभवले आहे.
मिपाकरांनी वरती तुम्हाला मोलाची मदत देऊ केलीच आहे त्यामुळे आणखी लिहीत नाही.
तुम्हाला या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा! :)
चतुरंग
19 Sep 2014 - 8:39 pm | दशानन
भरपूर मित्रांनी आधीच सल्ले दिले आहेत. अश्या परिस्थितीतून मी स्वतः गेलो आहे, अनेक मिपाकरांनी मला वेळोवेळी आर्थिक - मानसिक मदत केली आहे, त्याची अजून मी परतफेड करतो आहे ही गोष्ट वेगळी पण खचू नका.. धीर सोडू नका! प्रत्येक दिवस तसाच राहत नाही. आम्ही नवरा-बायको दोघे दिवसभर जवळ पास १५-१६ तास सतत काम करत आहोत, मिळेल ते काम घेणे, पुस्तक विक्रीची जाहिरात करणे, डिटीपी पासून कव्हर डीझाईन पर्यत सर्व कामे आम्ही स्वत: करत आहोत.
तुम्ही सुध्दा प्रयत्न सोडू नका, धीर धरा फक्त व घरी तुमची पत्नी काही व्यवसाय करु शकते का याचा देखील विचार करा. सध्या तरी हाच मार्ग योग्य आहे.
19 Sep 2014 - 8:51 pm | अनन्या वर्तक
मी सल्ला नाही देवू शकत. पण तरीही..
काल सहज मिसळपाव वाचत होते तेव्हा तुमचा धागा वाचनात आला. काल पर्यंत अवघे दहा बारा प्रतिसाद असणारया ह्या धाग्यावर आज एक उत्सुकता म्हणून पुन्हा पहिला तुमचा धागा आणि पहिले तर खूप चांगले प्रतिसाद दिले आहेत सगळ्यांनी मिळून. प्रत्येक प्रतिसाद अगदी नीट वाचवा आणि मनात साठवून ठेवावा असा आहे. सगळ्यांनी कित्ती मनापासून आणि योग्य सल्ला दिला आहे.
इस्पीकचा एक्का ह्यांचा प्रतिसाद आणि त्यांचे शेवटचे वाक्य (बोलतो तेच करणारा आणि करतो तेच बोलणारा) हे जास्त महत्वाचे आहे. arunjoshi123 ह्यांचा प्रतिसाद सुद्धा खूप वास्तववादी आहे. मला सुद्धा वाटत होते Financial & Managerial Accounting च्या knowledge चा उपयोग करून तुम्हाला प्रतिसाद द्यावा पण arunjoshi123 ह्यांनी अगदी सोप्प्या आणि सरळ शब्दात खूप चांगले मार्गदर्शन केले आहे जे मला जमले नसते. मला वाटते मिसळपाव इथे एका सायकॅट्रीस्ट ची भूमिका पार पडते आहे. फरक इतकाच आहे हे सगळे virtual communication आहे पण सगळ्यांच्या भावना आणि विचार एकदम प्रामाणिक आहेत. इथे येणारा प्रत्येक जन तुमची मदत करू पाहत आहे. कुणी तुम्हाला इतरांना मदत करुन मानसिक समाधान मिळविण्याचा मार्ग दाखवत आहे, कुणी तुम्हाला नोकरी मिळविण्यासाठी मदत करू पाहतो आहे, तर कित्तेक जणांनी स्वतःचे त्यांच्या आयुष्यातील कठीण दिवसांचे अनुभव तुमच्या पर्यंत पोहोचविण्याचा अगदी मनापासून यत्न केला आहे. प्रभाकर पेठकर, धर्मराजमुटके, श्रीरंग_जोशी, बाबा पाटील, विजुभाऊ, लीमाउजेट, अविनाशकुलकर्णी, विलासराव, प्यारे१, आजानुकर्ण, मुक्त विहारि, नाव आडनाव, चतुरंग....... कित्ती नावे घ्यावी आदराने. कित्तीतरी महत्वाचा, अनुभवाचा, विश्वासाचा सल्ला देणारे मिपाकर. आज मिसळपावची सदस्या असल्याबद्दल मनपासून आनंद झाला.
दुसर्यांच्या अनुभवावरून आपण सुद्धा काही चांगले शिकता आले तर शिकावे ह्याचे अतिशय चांगले उदाहरण आहे हा धागा. संदीप तुम्ही जेव्हा ह्या सगळ्या कठीण परिस्थितीतून खूप मेहनतीने आणि आत्मविश्वासाने बाहेर याल (जो विश्वास मिसळपाव वर तुम्हाला सल्ला देणार्या प्रत्येकालाच वाटतो आहे) तेव्हा तुमच्या सारख्या कठीण परिस्थितीत असलेल्यांना मिपाकारासारखे मार्गदशन करायला आणि तुमचे यशःस्वी आयुष्याचे अनुभव मिसळपाववर सांगायला विसरू नका. तुमच्या पुढील यशस्वी आयुष्यासाठी शुभेछा.
19 Sep 2014 - 9:19 pm | धर्मराजमुटके
धाग्यावर अवांतर होईल पण सांगण्याचा मोह आवरत नाही. पडत्या काळात मला दोन वाक्यांनी प्रेरणा दिली. ही वाक्ये माझ्या अडचणींच्या दिवसात वारंवार म्हणत असे.
१. कोणीही विचारले की अरे बाबा एवढे कर्ज झाले, आता नोकरी करतोयस. परत धंदा करु नकोस. तेव्हा मी दत्ताजी शिंदेंचे पानीपतावरील वाक्य त्यांना सांगत असे " बचेंगे तो और भी लडेंगे !"
२. जेव्हा जवळचा मित्र / देणेकरी पैसे देणे मागायचा तेव्हा मी त्याला नेहमी म्हणायचो, "काय राव पैसे पैसे करता ? मी कुणाचे बुडविलेत तेव्हा तुमचे देणारय ?"
वरील वाक्यांनी मला लढायची आणि कठीण प्रसंग हसत हसत झेलायची प्रेरणा दिली.
19 Sep 2014 - 9:29 pm | सुबोध खरे
धर्मराजमुटके
आपले प्रतिसाद उत्कृष्ट आहेत
__^ __
19 Sep 2014 - 9:38 pm | दशानन
व्यवसाय करु नको, नोकरी कर! असे म्हणाले कोणी मला तर त्या व्यक्तीची मला किव येते!
" बचेंगे तो और भी लडेंगे !" यातील जिद्द समजून घेण्यासाठी तेवढेच कष्ट उपसावे लागतात :)
19 Sep 2014 - 9:41 pm | डॉ सुहास म्हात्रे
"बचेंगे तो और भी लडेंगे !"
+१०^१०19 Sep 2014 - 10:06 pm | सानिकास्वप्निल
संदिपजी तुम्हाला मनापासून शुभेच्छा.
धीर सोडू नका, परिस्थिती नक्की बदलेल व चांगले दिवस लवकरच येतील.
सर्व मिपाकरांचे प्रतिसाद व अश्या कठिण वेळी मिपाकरांनी दिलेला मदतीचा / मैत्रीचा हात बघून मिपाकर म्हणून खूप अभिमान वाटत आहे.
19 Sep 2014 - 11:01 pm | दशानन
आत्मघात खूप त्रासदायक प्रकार असतो, आपल्याला वाटतं तेवढे सोपं काम हे नक्की नाही आहे. आणि चुकून जगला-वाचला, नशिबाने पोलीस केस इत्यादी झाली नाही तरी... मानसिक त्रास जो होतो त्यानंतर.. तो पाहता ८-९ लाख कर्जाचा आकडा फार मोठा नाही आहे.
*माझा आयडी दशानन का? असे मध्यंतरी कोणीतरी विचारले होते.. त्याचे उत्तर आज हा धागा समोर आला आहे म्हणून देतो आहे. मी जवळपास मृत्यूचे दार १० वेळापेक्षा जास्तवेळा ठोठावले आहे.. यातील तीन अपघात होते व बाकीचे माझे त्या क्षणी परिस्थितीजन्य अवस्थेमुळे घेतलेले निर्णय! म्हणून नाव दशानन. यातील २ घटना येथे मिपावर मी खूप आधी लिहिल्या आहेतच. माझ्या जुन्या मिपा मित्रांना ते माहिती देखील आहे.
त्यामुळे स्व: अनुभव म्हणून सांगतो, प्रयत्न करत रहा, आपल्यात फरक एवढाच आहे, कि तुम्ही त्या तीरावर आहात व मी दुसऱ्या तीरावर पोचण्याचा जीवाच्या आकांताने प्रयत्न करतो आहे. तेथेच अडकून राहायचे की प्रयत्न करायचा हा सर्वस्वी तुमचा निर्णय.
(अनुभवी)
19 Sep 2014 - 11:51 pm | प्रफुल्ल पा
वा मिपा क् र बन्धु नो तुम्हा ला सलाम
20 Sep 2014 - 3:50 am | अर्धवटराव
एकदा आपलं म्हटलं कि हा मिपा दोस्त अगदी जय-विरु ला पण मागे टाकतो :)
भाऊ... इतकं उत्तम दिमाग कि बात दिल से केली आहे मिपा ने.. आणखी काय सांगावं... पण एक सांगतो.
अगदी तुमच्या सारखी नाहि पण टोकाची आर्थीक तंगी, प्रेमभंग, कौटुंबीक आणि इतर समस्यांनी अतिप्रचंड हैराण झालेली मंडळी आयुष्यात आलि माझ्या (तशी सर्वांच्याच येतात) मी सुद्धा इतरांप्रमाणे अत्यंत बिकट पर्सिस्थितीतुन गेलो आहे बरेचदा, त्यामुळे तुमची मनस्थिती समजु शकतो. अशा सगळ्या प्रसंगी प्रत्येकाने आपापला मार्ग काढलाच. पण एक गोष्ट कॉमन होती सर्वांच्यात. शेवटी अशी परिस्थिती मनात का उद्भवते? तर मनाची उमेद, इच्छाशक्ती कुंठीत होते म्हणुन. पण आपल्या सर्वांकडे एक एखादी अशी गोष्ट असते कि ज्यामुळे काहि काळापुरतं तरी मन निवळतं. माझ्या पहाण्यातल्या प्रत्येक समदु:खी व्यक्तीने हा उपाय जाणते-अजाणतेपणी अवष्य केला होता. एक देवदास मित्र पार म्हणजे पारच कोलमडला होता. पण त्याला मासळीचं जेवण आणि त्यानंतर दोन सिग्रेट असा खुराक घ्यायचा भयंकर शौक होता. इतर वेळी ते बेणं पार हताश दिसायचं, पण मासळी चेपताना हळुहळु नॉर्मल व्हायचं आणि त्यानंतर सिग्रेट पिताना एकदम फ्रेश-कॉन्फीडंट वाटायचं. या एका धाग्यावरुन त्याने स्वतःला सावरलं. नियमाने मासळी जेवण आणि सिग्रेट घेत राहिला व त्यानंतरचे काहि मिनीट आयुष्याचा सिरीयसली प्रॅक्टीकल विचार करायला लागला. शेवटी तो त्यातनं बाहेर आलाच. वारंवार इंजीनीयरींगमधे गचके खाणार्या दोन मित्रांना अनुक्रमे गोविंदाचे पडिक सिनीमे आणि बॅचलर लाईफमधे फुकट उपलब्ध अशा शरीर-सुखाच्या ऑप्शनने साथ दिली व त्यांना कमालीच्या नैराश्यातुन वाचवलं. असे बरेच अनुभव आहेत.
थोडक्यात काय, तर तुम्हाला समस्या सोडवायला जी मनाची निवांत अवस्था हवी आहे ति तुमच्याच एखाद्या सवयीने म्हणा आवडीने म्हणा तुम्हाला मिळवता येईल. ति सवय प्रयत्नपुर्वक नियमाने अमलात आणा. काहि काळानंतर तुमचं शरीर पाण्याबाहेर आलं नाहि तरी तुमचं नाक-तोंड नक्की येईल व तुम्हालाच तुमचा मार्ग दिसेल.
मिपा आहेच सोबतीला :)
20 Sep 2014 - 8:33 am | तुषार काळभोर
इथे कदाचित अनावधानाने राहून गेलेला एक मुद्दा..
Pleeeeaaase!!!!
एक कुटुंबाचा आरोग्यविमा व एक तुमचा आयुर्विमा लगेच काढा.
मुलाच्या आजारपणात झालेल्या खर्चाने आर्थिक परिस्थिती आणखी नाजूक झाली, असं तुम्ही लिहिलंय. शक्यता कितीही कमी असली, तरी मोठे आजारपण व अकाली मृत्यूमुळे एखाद्या घराचा आर्थिक डोलारा डगमगु शकतो. त्यामुळे कदाचित आताच्या आर्थिक परिस्थितीमध्ये १०-१५ हजाराचे २ विमे खूप जास्त वा चैनीचे वा अनावश्यक वाटू शकतात. किंवा कदाचित आता तुम्हाला ते शक्यही होणार नाही. पण as soon as possible, थोडा मोकळा श्वास घेता आला की लगेच विमा काढा.
(@संपादकः हा प्रतिसाद अवांतर/अनावश्यक असल्यास कृपया काढून टाकावा)
20 Sep 2014 - 10:46 am | सुबोध खरे
डांगे साहेब,
मिपावरील लोकांचे एक एक अनुभव वाचून आला आश्चर्य वाटते आहे. लोक किती गंभीर प्रसंगातून जात असतात. त्यांच्या मानाने माझे आयुष्य फार सुखात आणि सुरळीत गेले असे वाटते. त्यामुळे आपल्याला सल्ला द्यायचा मला कोणताही अधिकार नाही.
परंतु एक नौदलातील वैद्यकीय अधिकारी म्हणून मी काही आत्महत्येच्या प्रकरणा मध्ये चौकशी अधिकारी म्हणून काम पाहिलेले आहे. आत्महत्या करणारा माणूस सुटून जातो पण मागे राहणाऱ्या कुटुंबाची अक्षरशः वाताहत होते. त्यांना आयुर्विम्याचे पैसे मिळत नाहीत.( नैराश्यातून केलेली आत्महत्या हा मानसिक रोग आहे म्हणून त्या रुग्णाच्या कुटुंबाला सर्व फायदे, विमा, इ इ मिळावेत म्हणून मी केलेले सर्व प्रयत्न सरकार दरबारी निष्फळ ठरले आहेत). जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते.
बाकी बर्याच लोकांनी स्वानुभवाने बरेच काही लिहिले आहे. त्या ताज महालाला माझी वीट लावण्यात काहीच अर्थ नाही.अशा लढाऊ लोकांना साष्टांग प्रणाम.
आणि त्यांच्या अशा लढ्यातून स्फूर्ती घेऊन आपणही अशा कठीण परिस्थितीतून लवकरच बाहेर पडाल अशी ईश्वर चरणी प्रार्थना.
20 Sep 2014 - 11:12 am | विलासराव
जशी माणसाची संपत्ती त्याच्या वारसांना मिळते तशीच त्याची कर्जे सुद्धा वारसाहक्काने येतात. त्यामुळे बुडत्याचा पाय खोलात या न्यायाने कुटुंबाची परिस्थिती अधिकच बिकट होते.
बरीचशी भरलीत, काही अजुनही भरतोय.
बाकी जाता जाता अजुन एकः
मी या परिस्थितीतुन पार झाल्यावर मला तशाच परिस्थीतीतुन जाणार्याची भलतीच कणव यायला लागली. मग मी जमेल तशी मदतही करायला लागलो. बरेचसे लोक बरेच बरे निघाले. पण माझ्या अगदी जवळच्या काही लोकांनी धुर्तपणे माझ्याकडुन पैसे घेतले आनी मला कायमची शेंडी लावली. परीणाम आणखी दोनेक लाखाला चुना लागला.
दान्/मदत सत्पात्री करावं ते यासाठीच!!!!!!!!!
20 Sep 2014 - 11:12 am | मदनबाण
रणांगणातुन पळायचे की लढायचे हे सर्वस्वी आपल्या हाती असते... लढणार्यांना विजय देखील प्राप्त करता येतो, पळणार्यांना ?
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Kitni Haseen Zindagi... { Lucky Ali }
20 Sep 2014 - 12:33 pm | आयुर्हित
आपल्या आयुष्यावरच्या या मोठ्ठ्या वळणावर मिपावर आपले मन मो़कळे केल्याबद्दल धन्यवाद.
याचाच अर्थ आपल्याला समस्येचे पूर्ण समाधान हवे आहे.
व यावरुनच आपला जगण्याचा व त्यासाठी संघर्ष करण्याचाच विचार प्रकट झाला आहे.
बर्याच वेळेला मनुष्याची गत "कस्तुरीमॄगा"सारखीच झालेली असते.
आपल्या आत असणारे सद्गुण हे आपल्याला कधिच दिसत नाही.
ते जाणण्यासाठी एक जोहरी किंवा सद्गुरु भेटावाच लागतो. तद्नंतरच आपले कल्याण होत असते. असो!
कठीण प्रसंग कोणाच्या आयुष्यात आला नाही?
प्रभुरामांना देखिल १४ वर्षे वनवास भोगावा लागला होताच की!
भगवान कृष्णावर ही न केलेल्या चोरिचा आळ आला होता.
सोन्याला सुद्दा आपले शुध्दत्व प्रमाणित करण्यासाठी आगीतुन जावेच लागते.
तशीच आता ही सुध्दा आपली सत्वपरिक्षा आहे असे समजुन प्रत्येक पाऊल समजून उमजुन व जपूनच उचलाल अशी अपेक्षा आहे.
भगवान श्रीकॄष्णाने गीतेत सांगितले आहेच
अनन्याश्चिंतयंतो माम् ये जनां पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् ॥
स्थूल रूपात याचा अर्थ आहे- ‘माझ्या भक्तांची सर्व प्रकारची काळजी मी घेतो. त्यांच्या सर्व गरजा-अपेक्षा मी स्वतः वाहून नेतो. त्यांच्या सर्व चिंतांची जबाबदारी मी आपल्या खांद्यांवर घेतो’.
किंवा साध्या मराठीत श्री स्वामी समर्थ सांगतात "भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे!"
तेव्हा देवावर व देवाने दाखविलेल्या मार्गावर म्हणजेच "आपल्या स्वतःच्या कर्मयोगावर" श्रद्धा ठेवावी, हि विनंती.
इतर कोणतेही प्रश्न असतील तर बिनधास्त व्यनी करावा. आम्ही सदैव आपली मदतच करू.
20 Sep 2014 - 4:06 pm | लव उ
काहीही विचार करताना जरा बायको (बाळंतीण) आणी २ सोनुल्यांना आठवा. बाकि व्य. नि. केलाय.
काळजी घ्या. तुमची आणि कुटुंबाचिही.
21 Sep 2014 - 8:51 am | सखी
ही कविता काल प्रतिसाद देताना सापडत नव्हती तुम्हाला किंवा कोणीही निराश झालेल्या व्यक्तीला बळ देण्यासाठी इथे देत आहे. (मला आणि परिचितांना याचा खूप उपयोग झाला.)
मुठभर हृदया
पांढरे निशाण उभारण्याची
घाई करू नकोस,
मुठभर हृदया,
प्रयत्न कर,
तगण्याचा, तरण्याचा,
अवकाश भोवंडून टाकणार्या,
या प्रलयंकारी वादळाचाही,
एक अंत आहे.
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत
लढत रहा,
तुझ्या नाजूक अस्तित्वानिशी.
वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत
हे तपासण्यासाठी नव्हे,
आपण काय होऊ शकतो,
हे आजमावण्यासाठी..
- पद्मा गोळे
21 Sep 2014 - 7:07 pm | आयुर्हित
22 Sep 2014 - 2:18 pm | पियू परी
तुम्ही सुद्धा घेणेकरी आहात हे विसरु नका.
:शक्य त्या सर्व प्रकारे तुम्हीही ज्यांच्याकडून तुम्हाला पैसे येणे आहे त्यांच्यामागे तगादा लावा.
:कागदोपत्री व्यवहार झाला असल्यास कायद्याचा बडगा दाखवा.
:स्वस्तात एखादा वकील मिळाला तर नोटिस वै. पाठवा.
:पोलिस कंप्लेंट करायची धमकी द्या.
:शक्यतो हा तगादा लिखित स्वरुपात करा. इमेल सुद्धा लिखित पुरावा म्हणून ग्राह्य धरला जातो.
:क्लाएंट्सना मेल पाठवतांना रिमाइंडर १, रिमाइंडर २ असं लिहित चला म्हणजे त्यांनाही गांभिर्य येईल.
:एखाद्या कंपनीत अकाउंट्स डिपार्टमेंट दाद देत नसेल तर त्यांच्या वरिष्ठांना किंवा वेळ पडल्यास डायरेक्टर्स ना भेटून तुमची परीस्थिती विषद करा. आणि पेमेंट लवकर देण्याची विनंती करा.
:जे जे क्लाएंट कामाचे पैसे देत नाहीत त्यांची काही ओरिजनल कागदपत्रे/ कामांच्या सॉफ्ट कॉपीज इ. जे काही तुमच्याकडे आहे ते पैसे मिळाल्याशिवाय परत देऊ नका. अगदी सॉफ्ट कॉपी सुद्धा नाही.
:तशीच वेळ आली तर क्लाएंट्साठी केलेले काम (डिझाईन/ लोगो वै.) दुसर्या कोणाला विकुन टाकायची धमकी द्या.
: एखाद्या नालायक माणसाने पैसे न दिल्यास "तुझे नाव लिहुन आत्महत्या करीन" अशी धमकी द्या.
यापुढे जे काम घ्याल त्यात सगळे व्यवहार कागदोपत्री तर कराच पण निदान ५०-७५% आधी घ्या.
आत्महत्येचा विचारही मनात आणू नका. तुमचे पैसे अडकवुन/ हडपुन/ न देऊन लोकांनी तंगड्या पसरून आयुष्य एंजॉय करायचे आणि तुम्ही बायको आणि बाळाला वार्यावर सोडून जीव द्यायचा हा कोणता न्याय?
22 Sep 2014 - 2:58 pm | माहितगार
आपले पैसे मिळवण्याची टेक्निक म्हणून या सल्ल्याच्या सुयोग्यते बद्दल साशंक आहे. मला वाटते टाळलेले बरे.
पैसे अगदी दोन तीन वर्षापेक्षा अधिक थकले आणि बाकी सर्व मार्ग संपले तर वकिला मार्फत नोटीस काही वेळा चांगले काम करून जाते.
पैसे मागण्याच्या टेक्निक्स बद्दल स्वडीने कधीतरी सविस्तर लेख लिहावा असा जुना मानस आहे.
22 Sep 2014 - 3:34 pm | संदीप डांगे
शुभस्य शीघ्रम,
तुमचा लेख लवकर वाचावयास मिळो अशी अपेक्षा आहे.