पेरूची अन्नसंस्कृती ही अमेरिकेतील सर्वात समृद्ध मानली जाते. लिमा तर 'अमेरिकाज् गॅस्ट्रॉनॉमिकल कॅपिटल' म्हणून ओळखली जाते. हा एकमेव असा सांस्कृतिक पैलू आहे ज्यात नव्या अमेरिकेचे जुन्या अमेरिकेसोबत संघर्षरहित सहअस्तित्व पहावयास मिळते. वसाहतवादाच्या काळात पेरूमध्ये अनेक देशातील लोक विवीध काराणांनी येउन वसले अाणि अापल्याबरोबर नवीन पाककौशल्य घेउन अाले आणि त्यातून ही समृद्ध कला इथे अजून बहरली. उदाहरण, पूर्व अाशियाई लोक इथे आले आणि जन्म झाला 'शिफा' - पेरूव्हियन चायनीज चा. इतालियन लोक इथे पास्ता प्रकार घेउन आले तर गुलाम म्हणून आलेले आफ्रिकेतील लोक त्यांची वैशिष्ट्ये घेउन आले. चित्रांमधून पेरूच्या अन्नसंस्कृतीचे काही विशेष इथे मांडतो आहे. सोबतच भारतातील साहित्यौपलब्धता लक्षात घेउन, मी शिकलेल्यांपैकी दोन सोप्या पाककृती।
ग्नोची सारखा चीज व बटाट्याचे सारण असलेला पास्ता:
अजून एक पास्ता प्रकार:
प्रामुख्याने अन्नामध्ये मांसाचा समावेश असतो. वेगवेगळ्या भागात भौगोलिक परिस्थितीनुसार अन्नात बदल होतो. किनारी भागात सेविशे नावाची समुद्रीशिंपल्यांपासून बनवलेली 'स्टार्टर डिश' प्रसिद्ध आहे. डोंगराळ भागात अल्पाकाचे व गिनिपिगचे मांस खास मानले जाते, तर अॅमेझोनियामध्ये नदीत जे मिळेल बव्हंशी सगळेच खातात, काळे कायमन् (मगरी), कासवं, पिरान्हासकट सगळे मासे हे मांसाहारात प्रमुख उल्लेखनीय गोष्टी.
शाकाहारातील विशेष: बटाट्याची जन्मभूमी असल्याने येथे किमान हजार बटाट्याच्या जाती: लाल - जांभळे - निळे - पांढरे अशा अनेक प्रकारच्या, तशीच रताळी, प्रथिनसंपन्न धान्य किनोवा, पांढरा-लाल-जांभळा मका, लिमा बीन्स सम कडधान्ये इत्यादी विशेष.
खालील चित्रातील पदार्थ : बटाट्याचे वेफर, अॅव्होकॅडो, लिमाबीन्सचं सॅलड, लसाह्न्या, लोणी-पाव.
या पदार्थात सहा प्रकारचे बटाटे आहेत:
भाज्या व टोफ़ू चा मसालेदार रस्सा, भात
अन्नसादरीकरण कला तर फारच विशेष. लिमाबीन्सचं सॅलड:
पेयांमध्ये उल्लेखनीय: पिस्को सोअर नावाची द्राक्षापासून बनवलेली ब्रंॅडी हे राष्ट्रीय पेय सर्वात प्रसिद्ध अाहे. किनारी भागात द्राक्षाचे मळे व पिस्को बनवण्याची ठिकाणे बघण्यासारखी अाहे.
उन्नत पर्वतीय प्रदेशात, अाठ-दहा हजार फुटांच्या वर, प्राणवायूचा अभाव सुरू होतो. त्यासाठी इथे उत्तेजक व रक्तात प्राणवायूचे शोषण वाढवणारी वनस्पती कोकाची पाने खाल्ली जातात. पाण्यात उकळून त्याचा चहाही बनवला जातो. कोकापासून कोकेन बनवले जात असल्याने जगात इतरत्र याचे एक पान बाळगणेही शिक्षापात्र गुन्हा अाहे.
कोका चहा:
पेरूव्हियन पाककृती :
'क्रेमा दे झपायो' (crema-de-zapallo)
वेळ ३० मि.
२-३ जणांसाठी
साहित्य:
१ कांदा, ८-१० लसूण पाकळ्या, २ चमचे तेल, पाव किलो साल काढलेला लाल भोपळा व १ मध्यम रताळे मोठे तुकडे करून, १ चमचा सुकी रोझमेरी/शेपू/कोथिंबीर, मीठ, मीरपूड, ६ कप पाणी, अर्धा क्यूब किसलेले चीज, घोटलेली साय, तळलेले पावाचे तुकडे.
कृती:
कढईमध्ये तेल गरम करून बारीक कापलेला कांदा व लसूण सोनेरी रंगावर परतावे. त्यात भोपळा व रताळ्याचे तुकडे टाकावेत. थोडे परतल्यावर त्यात सुकी रोझमेरी टाका. रताळे थोडे उशीरा शिजते, शिजत आल्यावर १ कप पाणी टाका. दोन मिनीटे झाकण ठेउन शिजू द्यावे. नंतर थंड करून पाणी घालून मिक्सी/ब्लेंडर नी बारीक वाटा. आता हे जाडसर 'क्रेमा दे झपायो' थोडे पाणी घालून गरम करावे, त्यात घोटलेली साय घालावी. वाढताना वर किसलेले चीज, तळलेले पावाचे तुकडे (क्रूटन्स) व कोथिंबीर घालावी. पदार्थ तयार!
'पुका पिकांते' (puca picante)
वेळ ४५ मिनिटे
४ जणांसाठी
साहित्य:
२ चमचे तेल, २ बीटांचा रस, पाव वाटी दाण्याचं बारीक कूट, ४ मध्यम बटाटे उकडून सोलून व भाजीसाठी मोठे तुकडे करून, १ बारीक कापलेला कांदा, ८-१० ठेचलेलया लसणाच्या पाकळ्या, २ चमचे 'आह्ही प्हंका' (Aji punca) वाटण, १ चमचा जिरे, मिठ-मिरपूड व पाणी.
कृती:
आह्ही प्हंका: हा एक पेरूचा खास ठेचा, सुकलेल्या जाड लाल मिरच्या थोडे तेल शिंपडून तव्यावर गरम करा व लगेच (विस्तवावरून उतरवलेल्या) उकळत्या पाण्यात टाका. ५ मिनिटांनी त्या मउ पडल्यावर थोड्या तेलासोबत वाटा. बिया काढून टाकल्यास वाटण मिळून येते.
कढईमध्ये तेल गरम करून जि-यावर बारीक कापलेला कांदा व लसूण सोनेरी रंगावर परतावे. त्यात आह्ही प्हंका ठेचा व बटाटे टाकून परतावे. आता यात १ वाटी पाणी व बीटाचा रस घाला. मिश्रणाला उकळी आल्यावर दाण्याचे कूट टाकून जरा मिळून येणारा रस्सा झाला की विस्तव शांत करून मिठ-मिरपूड घालून झाकण ठेवा. भाताबरोबर खातात, पण आपल्याकडे पोळीबरोबरही चालेल. यात बटाट्याऐवजी मांसही घालतात.
ज्या स्वयंपाकघरांत जायचा योग आला, तेथून पाहिलेला, कुशल - सामान्य पाकशास्त्रज्ञांनी दाखवलेला हा खाद्यान्नसमृद्ध पेरू!
प्रतिक्रिया
4 Sep 2014 - 11:33 pm | एस
ह्या भागाला सर्वात जास्त प्रतिक्रिया पडणार बघा!... खल्लास... तुम्हांला मानलं समर्पकबुवा!
निर्वाणमस्तु।
4 Sep 2014 - 11:34 pm | अत्रुप्त आत्मा
काय त्या एकेक पाककृती..शेवटचा फोटू तर................ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्हाआआआआआआ!
4 Sep 2014 - 11:47 pm | मधुरा देशपांडे
भटकंती असावी तर अशी. प्रत्येक भागात उत्तम माहिती, अप्रतिम फोटो आणि आता त्यासोबत तेवढ्याच सुंदर पाककृती. खाद्यान्नसमृद्ध पेरुची अप्रतिम सफर. धन्यवाद.
5 Sep 2014 - 12:05 am | नंदन
आतापर्यंतचे सारेच भाग आवडले. प्रत्येक भागावर प्रतिक्रिया दिली नाही, तरी सगळे अथपासून इतिपर्यंत वाचून काढले.
हा भाग शब्दशः रोचक झाला आहे. इटालियन, आशियाई, आफ्रिकन आणि स्थानिक खाद्यपरंपरांचे मिश्रण अफलातून असणार, यात शंका नाही!
5 Sep 2014 - 4:43 am | बहुगुणी
आतापर्यंतचे सारेच भाग आवडले. प्रत्येक भागावर प्रतिक्रिया दिली नाही, तरी सगळे अथपासून इतिपर्यंत वाचून काढले.
+१
ते 'क्रेमा दे झफायो' चाखलंय, सर्वच पाककृतींबद्दल धन्यवाद!
5 Sep 2014 - 1:11 am | प्यारे१
___/\___
शब्द तोकडे आहेत. मानलं ब्वा !
5 Sep 2014 - 1:28 am | डॉ सुहास म्हात्रे
अप्रतिम !
5 Sep 2014 - 3:41 am | शिद
शब्दच नाहीत वर्णन करायला. *good*
अतिशय जबराट लेखमालिका. *clapping* . *clapping* . *clapping*
5 Sep 2014 - 3:46 am | रेवती
सगळी सचित्र लेखमाला एकदम वाचली. खूपच आवडली.
पेरूसफर घडवल्याबद्दल आभार.
5 Sep 2014 - 5:21 am | कंजूस
धन्यवाद ! सर्व भागांसाठी एकच प्रतिक्रिया देतो आहे .पेरूची फोड लागते गोड. आख्खा गोड पेरूच आमच्यासाठी आणलात. आपण सर्व जगातले सर्व बघू शकणार नाही. असे प्रवास वर्णन वाचूनच अथवा टिव्हीवर पाहून आनंद घ्यावा लागतो तो इथे मिळाला.
"एकल प्रवास आवडतो" +१०. फोटो आणि वर्णन फारच छान.फिरते राहा आणि लिहिते राहा.
5 Sep 2014 - 7:54 am | अजया
अप्रतिम लेखमालिका आणि फोटो. हा भाग तर अतीव देखणा झालाय पूर्णब्रम्हाच्या फोटोंनी! _____/\______
5 Sep 2014 - 10:36 am | अनुप ढेरे
व्वा.. मस्तं!
5 Sep 2014 - 10:49 am | दिपक.कुवेत
भटकंतीच्या धाग्याचा ईतका नाविन्यपुर्ण उपयोग मी पहिल्यांदा पाहिला. म्हणजे सगळे भाग भटकंती सदरात न टाकता खाद्यभ्रमंतीचा ईथे आणि एक कलादालनात टाकलात त्याबद्दल विशेष आभार. वर म्हटल्याप्रमाणे प्रत्येक भागावर प्रतिसाद दिला नसला तरी वाचुन/अप्रतिम फोटो बघुन मात्र काढले. आता पाकृ बद्दल. ते 'क्रेमा दे झपायो' जमण्यासारखं दिसतयं. भोपळा/रताळं हलकस वाफवुन/एक शीटि देउन काढलं तर नंतर लागणारा वेळ वाचेलच शीवाय कच्चं राहण्याची भीती उरणार नाहि.
5 Sep 2014 - 1:10 pm | समर्पक
शीटी देणे म्हणजे त्याचे अर्धेधिक भरतियीकरण होऊन जाते :)
चालेल म्हणा तसेही... पण पाण्यावर शिजवणे आणि तेलावर शिजवणे यात चवीचा फरक पडेल, नाही का?
6 Sep 2014 - 1:25 am | दिपक.कुवेत
पण अगदि मेण होईस्त शीट्या द्यायच्याच नाहित. अगदि १ आणि ते सुद्धा रताळ्याला. भोपळा तसाहि वाफेवर शीजतो. करुन बघतो आणि कळवतो.
5 Sep 2014 - 11:00 am | सौंदाळा
वाह
पाककृती पेश करुन तर चार चांद लावलेत या लेखमालेला
5 Sep 2014 - 11:26 am | सुहास झेले
सुपर्ब... हा भाग सगळ्यात जात त्रासदायक... च्यायला सगळेच्या सगळे फोटो दिसतायत. माझा गणेशा का झाला नाही? =)) ;-)
5 Sep 2014 - 12:24 pm | बॅटमॅन
अ-फ-ला-तू-न !!!!!!!!!!!!!!!!!!!
नावाप्रमाणेच समर्पक लेखन. अतिजबराट _/\_
5 Sep 2014 - 12:59 pm | सविता००१
अफ्लातून समर्पक, देखणा भाग. सलाम तुम्हाला
_______/\_________
5 Sep 2014 - 3:55 pm | सूड
दंडवत !!
5 Sep 2014 - 4:25 pm | मृत्युन्जय
खतरनाक. तुम्ही पेरु पुरेपुर चाखलेला दिसतोय :)
5 Sep 2014 - 5:19 pm | नि३सोलपुरकर
तुमच्या मिपा आयडीला पुरेपुर न्याय देत आहात.
अलभ्य लाभ.... मिपावर आल्याचे सार्थक होत आहे आणी मिपा दिवसेंदिवस अधिकाधिक समृध्द होत आहे.
5 Sep 2014 - 7:17 pm | पिंगू
आता पेरु स्वंयपाकघरात पण आलाच..
5 Sep 2014 - 7:22 pm | केदार-मिसळपाव
आहे तुमची एखाद्या देशाचे वर्णन करण्याची.
मस्त मस्त.
5 Sep 2014 - 7:55 pm | पोटे
किचनमध्ये एखादा फोटो लावण्यात येईल
6 Sep 2014 - 5:38 pm | पैसा
अप्रतिम! खल्लास!
7 Sep 2014 - 8:57 am | जयंत कुलकर्णी
मस्तच सफर......आवडली व हेवाही वाटला बर का ....
22 Sep 2014 - 9:28 am | Maharani
खुपच छान....
26 Sep 2014 - 1:06 pm | अनिता ठाकूर
सगळे भाग एकदम वाचले. लेखन व फोटो -- दोन्हींचं कसब वाखाणण्यासारखं. वर सर्वांनी ज्या शब्दांत कौतुक केलय त्यापेक्षा वेगळे शब्द माझ्याकडे नाहित. त्या कौतुक-पालखीची मी पण एक भोई!! तुमची भटकंतीची आवड तुम्हाला मनाप्रमाणे पूर्ण करता येवो हा आशिर्वाद!
29 Apr 2015 - 3:21 pm | गणेशा
सर्वच्या सर्व भाग आजच वाचले.. अप्रतिम .. जास्त लिहित नाही.. पण वाचन खुन साठवली आहे
20 Sep 2018 - 3:43 pm | ayush sharad wadnere
आज हॉटेलात बरच कहि बरका वतेल ते खा
20 Sep 2018 - 3:43 pm | ayush sharad wadnere
आज हॉटेलात बरच कहि बरका वतेल ते खा
20 Sep 2018 - 3:43 pm | ayush sharad wadnere
आज हॉटेलात बरच कहि बरका वतेल ते खा
20 Sep 2018 - 4:00 pm | मृत्युन्जय
खतरनाक