पेरू : भाग २ : पराकास समुद्री अभयारण्य

समर्पक's picture
समर्पक in भटकंती
14 Aug 2014 - 6:24 pm

या भागात सुरुवातीला एकल प्रवासाविषयी थोडे... सर्वात मोठा आणि महत्वाचा फ़ायदा म्हणजे कोणावरही अवलंबित्व नाही, स्वतः सगळा आराखडा बनवा आणि तंतोतंत पालन करा. शिवाय स्वतःला ज्याची आवड आहे त्यासाठी जास्त वेळ देता येतो. एक तोटा (किंवा फ़ायदा) म्हणजे तुमच्या 'पराक्रमांचे' फ़क्त तुम्हीच साक्षीदार असता. ब-याच वेळा पुरातत्वीय महत्व असलेल्या ठिकाणी येण्यात फ़ार लोकांना रस नसतो, मग काय्, उचला बोचकं आणि चालू लागा. अजून कोणी एकल प्रवासी असतील तर त्यांच्यासाठी एक टिप, शक्य असल्यास एखाद्या मध्यमवर्गीय स्थानिकाच्या घरी निवास करावा. म्हणजे तेथील विचारसरणी, आदरातिथ्य, परंपरा, खाद्यसंस्कृती, त्यांच्या समस्या या सगळ्याची खूप जवळून आणि खरी ओळख होते. लिमा मधील माझे वास्तव्य अशाच एका कुटुंबाच्या घरी होते. पेरुविषयी माहिती मिळवत असताना लिओ, माझ्या संपर्कात आल्या. लिमामधील उच्चभ्रू वस्तीमध्ये लिओ यांचे शंभर वर्षांहून जुने घर आहे. विमानतळावरून थेट त्यांच्याच घरी मी उतरलो होतो. अशा स्थानिक लोकांकडून काही सुरक्षेच्या आणि प्रवासाच्या दृष्टिने महत्वाच्या गोष्टी अधिक चांगल्या प्रकारे कळतात.

लिमा शहरातील भटकंती तशी एकदम सुरक्षित. पण पुढचा प्रवास आता शहरापासून लांब होता. पहाटे चार वाजताच निघायचं ठरवलं. मस्त चकाचक टोयोटा भाड्याने घेतली. अशा प्रवासात एकट्याने जाणे फ़ारसे सुरक्षित नाही, चोरी-लूट वगैरे नाही, तरी समजा गाडीच बंद पडली किंवा तत्सम् कुठली समस्या, तर अनोळखी प्रदेशात मदत मिळणे कठिण. आणि पुन्हा भाषेचा प्रश्न आहेच. मोठी शहरे वगळता इंग्रजी फ़ारच कमी समजते. त्यामुळे शक्यतो एखादा वाटाड्या बरोबर घ्यावा. चार पैसे जास्त जातात, पण अडचणीच्या वेळी मदत सहज उपलब्ध होते. असो. आता या भागाच्या प्रवासवर्णनाकडे.

या भागात पेरूच्या समृद्ध समुद्री अभयारण्यास भेट देऊया. लिमा पासून दक्षिणेस 250 किलोमिटरवर् पराकास् अभयारण्य आहे. हा भाग जैवविवीधतेसाठी प्रसिद्ध आहे. समुद्री पक्षी, प्राणी व जलचरांच्या अनेक प्रजाती इथे पहावयास मिळतात. पहाटे चारलाच निघाल्याने लवकरच, साधारण साडे-तीन तासात इथे पोहोचलो. पॅनअमेरिकन हायवे चा हा पट्टा अतिशय उत्कृष्ठ दर्जाचा आहे त्यामुळे गाडी चालवणे अतिशय सुकर होते. शिवाय हा भाग वर्षभर धुक्यासाठी प्रसिद्ध आहे, त्यामुळे वातावरण मस्त ताजेतवाने करणारे होते. 40 सोलेस् (पेरूचे चलन, सधारण 12$ / 750₹) देऊन तिथे दोन्-अडीच तासांची समुद्री सफ़र उपलब्ध आहे. जवळच बाय्येस्टास् आयलंड्स् ला एक फ़ेरी मारून परत किना-यावर. हा संपूर्ण प्रदेष वाळवंटी असून लाल रंगाच्या रेतीमुळे मंगळावर आल्यासारखं वाटतं. प्राचीन काळी इथे पराकास् आणि लिमा संस्कृतीचे लोक रहात असत. त्यांच्या जीवनाविषयक एक छोटेसे संग्रहालय आहे. इथपासून पुढे आटाकामा वाळवंट सुरू होते. जगातील् सर्वात रूक्ष (सर्वात कमि पर्जन्यमान) व सर्वात उंच वाळुच्या टेकड्या (ड्यून्स्) असलेल्या ह्या वाळवंटाच्या सफ़रीविषयी पुढील भागात. दर भागात एकदम वेगळीच भौगोलिक संपन्नता आपल्याला पहावयास मिळणार आहे, आणि हीच पेरूची खासियत् आहे.

नकाशात अभयारण्याचे स्थानः

वाळवंटी किनारा

भूरूपेः पाणी आणि वा-याच्या कलाकृती





पेंग्विन्

बूबीज

सील

पक्ष्यांची वसाहत

बाय्येस्टास् बेटांवरील समृद्ध समुद्री जीवन

'कॅथेड्रल'

प्रसिद्ध त्रिशूळ (क्डेलाब्रो) एरिक् व्हॉन् डेनिकेन् किंवा सुरेशचंद्र नाडकर्णी सारख्यांनी ज्याचा संबंध रामायणातील पाताळाच्या सीमेशी जोडला आहे असे हे भव्य भूरेखन (जिओग्लिफ)

प्रशांत महासागर

पराकास् बंदर

वाळवंटाच्या पार्श्वभूमीवर आमचे वाहन्

संग्रहालयाजवळील 'मंगळावरचा' रस्ता

हॉटेलमधील तरणतलाव

प्रतिक्रिया

हे फोटो तुम्ही स्वतः काढलेले आहेत का? (छाया/प्रकाशचित्रण तुमचे स्वतःचे असल्यास) अप्रतिम फोटो आहेत.

प्रवासवर्णन सुंदर आहे.

प्रसाद१९७१'s picture

14 Aug 2014 - 7:01 pm | प्रसाद१९७१

अतिशय उत्सुकतेने वाचतो आहे.
तुम्ही काय करता आणि कुठे असता ते काहीच माहीती नाही. त्या मुळे तुम्ही एकदम पेरू ला जाण्याचे कसे ठरवलेत.
पेरु लाच जावेसे का वाटले?
प्लॅनिंग कसे केलेत? तुम्हाला लिमा मधला माणुस "लिओ" कसा भेटला? असे अनेक प्रश्न आहेत. त्याची सविस्तर उत्तरांचे १-२ भाग लिहीले तर बरे होइल.

महत्वाचे म्हणजे प्रत्येक गोष्टी साठी खर्च कीती आला हे कळले तर बाकीच्यांना त्याचा उपयोग होईल.

आदूबाळ's picture

14 Aug 2014 - 7:18 pm | आदूबाळ

जबरीच फोटो. पुभाप्र!

धन्या's picture

14 Aug 2014 - 8:37 pm | धन्या

अप्रतिम फोटो !!!

फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद.

समर्पक's picture

14 Aug 2014 - 9:49 pm | समर्पक

धन्यवाद. ठिगळ मलाही मनापासून आवडत नाहीत. कोणाला सत्यप्रत हवी असेल तरी आनंदाने देईन. आनंद होणे हेच तर त्यांचे प्रयोजन...

उपाशी बोका's picture

17 Aug 2014 - 12:11 pm | उपाशी बोका

अरेरे, मग तुम्ही एका मोठ्या आनंदाला मुकताय की काय? पाककृती विभागात चक्कर टाकून आलात तर तुम्हाला उपयुक्त माहिती मिळेल की फोटोच्या मधोमध ठिगळ लावून फोटोचा विचका कसा करायचा ते.
असो, इथे नवे दिसताय. हलके घ्या. तुमचे फोटो छान आहेत. आवडले आणि बघून खरंच आनंद झाला.

विलासराव's picture

20 Aug 2014 - 8:46 pm | विलासराव

फोटो तुम्ही स्वतः काढले असल्यास इतक्या सुंदर फोटोंवर वॉटरमार्क न टाकून फोटोंना ठीगळ न लावल्याबद्दल धन्यवाद.

सहमत.

प्रवास आवडतोय तुमचा.

पुढच्या भागांची उत्सुकतेने वाट बघायला लावणारे अप्रतिम फोटो आणि वर्णन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2014 - 9:03 pm | डॉ सुहास म्हात्रे

अप्रतिम फोटो. उत्सुकता वाढत चालली आहे !

पुढ्चे भाग लवकर लवकर टाका.

सौंदाळा's picture

14 Aug 2014 - 9:41 pm | सौंदाळा

मस्तच,
नाझका रेषांच्या फोटोंच्या आणि वर्णनाच्या प्रतिक्षेत

समर्पक's picture

14 Aug 2014 - 9:42 pm | समर्पक

खरं सांगायचं तर काही प्रतिसादांमधला 'तुमचेच असल्यास...' असा प्रश्नार्थ खटकला पण हरकत नाही, मी नवीन आहे त्यामुळे असेल असे म्हणतो...

बाकीच्या प्रवासासंबंधी प्रश्नांची उत्तरे लेखनाच्या ओघात येतीलच, न आल्यास वेगळे नक्की लिहीन.

प्यारे१'s picture

14 Aug 2014 - 10:01 pm | प्यारे१

तुमचेच आहेत का हा प्रश्न मी आधी विचारला म्हणून...

जळजळ हो! एवढे छान फोटो मला जमत नाहीत.

फोटोज अत्यंत सुंदर नि कलात्मक दृष्टीनं काढलेले आणि तरीही व्यावसायिक सफाईनं काढलेले आहेत. प्रश्नाकडं सकारात्मक पहा. अप्रतिमच आहेत.

समर्पक's picture

14 Aug 2014 - 10:20 pm | समर्पक

आपल्याला आवडले, आम्हास आनंद आहे

हाडक्या's picture

14 Aug 2014 - 10:01 pm | हाडक्या

खटकायचं काय राव त्यात.. ती एक प्रकारे स्तुतीच आहे हो.
कारण की इथे कोणाला काय माहीत तुम्ही कोण आहात, किती चांगले छायाचित्रकार आहात.
कोणी स्तुती करायचा आणि तुम्ही 'ही चित्रे मी नेटवरून डकवली आहेत' असे सांगून त्यांचा पोपट करायचात म्हणून लोकांनी हातचे राखून केलेली प्रशंसा आहे ती.. :)

केदार-मिसळपाव's picture

14 Aug 2014 - 9:50 pm | केदार-मिसळपाव

आणि भाग्यवान आहात, इतक्या दुरच्या देशात गेलात ते. खुप उत्सुकता आहे पेरु, चिली ह्या देशांबद्दल.

इरसाल's picture

18 Aug 2014 - 5:06 pm | इरसाल

पेरु आणी चिली म्हटले की मग पोपटच झाला म्हणायचा.

क्लिष्ट आणि सविस्तर प्रवासवर्णानांपेक्षा, असं साधं-सोपं वृत्तांकन भावून गेलं.

अत्रुप्त आत्मा's picture

14 Aug 2014 - 11:14 pm | अत्रुप्त आत्मा

पेरु संपूर्ण अवडला. :)

नंदन's picture

14 Aug 2014 - 11:16 pm | नंदन

दोन्ही भाग आवडले. एकल प्रवास आणि स्थानिकांसोबत मुक्काम याबद्दल सहमत आहे.

समर्पक साहेब, प्रवास वर्णन आवडले. लहान पणा पासुन या देशा बद्द्ल कुतुहुल होते. ( मराठी फळाच्या नावाचा देश ) तुमच्या मुळे माहिती मिळाली.
धन्यवाद.

डॉ सुहास म्हात्रे's picture

14 Aug 2014 - 11:48 pm | डॉ सुहास म्हात्रे

मराठी फळाच्या नावाचा देश
पेरू हे फळ मूळ मराठी / भारतीय नाही. ते मूळचे मध्य अमेरिका आणि त्याला लागून असलेल्या उत्तर व दक्षिण अमेरिकेतील भूभागातले आहे. पेरू हा देश त्या भूभागात येतो !

युरोपियन (विशेषतः स्पॅनिश) लोकांनी ते जगाच्या इतर भागात नेले.

राघवेंद्र's picture

15 Aug 2014 - 11:04 pm | राघवेंद्र

नविन माहिती बद्द्ल धन्यवाद !!!

उदय's picture

15 Aug 2014 - 3:53 am | उदय

प्रवासवर्णन आवडले आणि फोटो तर झकासच आहेत. पेरुला एकल प्रवास करायचा आणि विशेषतः इंका ट्रेल पायी करायचा माझा पण विचार आहे. तुमच्या या सुंदर प्रवासवर्णनामुळे जरा अजून लवकर जाण्याचा उत्साह येईल.
असेच अजून लिहित रहा. धन्यवाद.

एस's picture

16 Aug 2014 - 11:07 pm | एस

पेरूची सहल फारच छान सुरू आहे. तुमच्या एकल प्रवासामुळे आम्हां सगळ्यांना एकत्रच पेरूची मजा घेता येतेय ह्याबद्दल खास आभार. छायाचित्रेही मस्तच आहेत.

सविता००१'s picture

18 Aug 2014 - 4:36 pm | सविता००१

प्रवासवर्णन आणि त्याहून सुरेख छायाचित्रे. लवकर लवकर पुढचे भाग येउदेत.

बॅटमॅन's picture

18 Aug 2014 - 5:45 pm | बॅटमॅन

निव्वळ अप्रतिम!!!!!! दक्षिण अमेरिकेत एक तर फारसं कुणी जात नाही, गेलं तरी पेरू कुणी निवडत नाही. तुम्ही पेरूची निवड केलीत आणि अप्रतिम फोटोज़ टाकलेत याबद्दल लैच धन्यवाद. अनवट लेख असेच येत राहोत ही विनंती!!!

पैसा's picture

19 Aug 2014 - 11:42 pm | पैसा

फारच सुरेख वर्णन आणि फोटो. ते त्रिशूळाच्या आकाराचे चिन्ह कोणी कोरले आहे?

समर्पक's picture

22 Aug 2014 - 2:41 pm | समर्पक

ते कोणी कोरले हे कोणालाच माहिती नाही. ५९५ फूट त्याची लांबी आहे. ते १२ मैलावरूनही दिसते त्यामुळे समुद्री (आणि हवाई?) प्रवाशांसाठी बनवले असावे असा अंदाज. काळ ख्रस्ताच्या पुर्वी सहज जातो.

सगळ्या फोटोंना फक्त छान म्हणून दाद देते. खरंतर प्रत्येक चित्रात कायकाय आवडलेलं सांगायला हवं.