मागील भाग: भाग १: राजधानी लिमा, भाग २: पराकास समुद्री अभयारण्य, भाग ३: वाळवंटाची सफर, भाग ४:अरेकिपा शहर,
भाग ५:अल्टिप्लॅनो,
पुढील भाग: भाग ७:माचुपिचू, भाग ८:अॅमेझॉन, भाग ९:संग्रहालये, भाग १०:पूर्णब्रम्ह, भाग ११: लोकजीवन
पेरूची सांस्कृतिक संपदा खूप समृद्ध होती. पश्चिम गोलार्धातील सर्वात प्राचीन सभ्यता इथे जन्माला आली. जगातील सर्वात जुने पिरॅमिड इथे बांधले गेले. छोट्या जमाती नागरी जीवन जगत विकसित होउ लागल्या आणि स्थानिक संस्कृतींंचा उदय झाला त्यातील लिमा, नाझ्का, चिकों, वारी, आयमारा, केचुआ, तिवानाकु या प्रमुख. नाझ्का व तिवानाकु लोकांनी घातलेली कोड़ी विज्ञानाला आजही उलगडत नाहीत. आयमारा आणि केचुआ अत्यल्प प्रमाणात आजही टिकून आहेत, पण तरी युरोपीय लालसेच्या वरवंट्याखाली हा समाज खूप भरडला गेला त्यात बरंच हरवलं. गुलामीच्या दुर्दैवी पर्वातून गेलेल्या देशाचा नागरिक या नात्याने या समाजाविषयी सहानुभूति वाटते, त्याबरोबर मूर्ख धर्मविस्ताराकांक्षांपाई आज कित्येक कल्पक कलाप्रवीण व प्रगत समाज या जगातूनच नाहीसे झाले त्याविषयी विषाद वाटतो़. प्राचीन धर्म-संस्कृतींंच्या एका छोट्या परिषदेत काही वर्षांपूर्वी सहभागी होता आले तेव्हा एक केचुआ महिला भेटली होती. तेव्हा तिला भेटल्यावर या समाजाला पुनरुत्थानाची चाहूल लागत आहे असे जाणवले होते.
पेरूसारख्या देशात गेल्यावर त्यांची मूळ पारंपारीक श्रद्धास्थाने पाहण्याचा आग्रह ज़रूर ठेवावा. ब-याच ठिकाणी ती विस्मृतीतही गेलेली असतात किंवा तेथे आक्रमकांची दिमाखदार स्मारके उभी असतात. पण हे समाज निसर्गपूजक असल्याने माचुपिचू, कोरीकंचा, चिचेन् इत्झा (मेक्सिको) सारखी जी स्थाने सुस्थितीत आहेत, ज्याला तुम्ही एक प्रकारे 'जागृत' म्हणू शकता, ती आजही लोकांना का आकर्षित करतात हे अनुभवण्यासारखे आहे. (वसंतसंपात व चिचेन् इत्झा च्या अनोख्या नात्याविषयी त्या देशाच्या लेखमालेत) तात्पर्य असे, की निसर्गाच्या श्रेष्ठत्वाची जाण ठेऊन मोठ्या झालेल्या संस्कृतींंचे दर्शनाची संधी येते तेव्हा त्यांच्या या मोठेपणाची आपण जाण ठेउन तयारीनिशी जाणे फ़ार आवश्यक व उपयोगी ठरते.
असो, या भागातील भटकंती कुझ्को शहर. ही पेरूची सांस्कृतिक राजधानी. इथे मी ब-यापैकी मुक्काम ठोकला. हा प्रदेशच मुळी वेळ द्यावा असा आहे. प्राचीन केचुआ इंकाची ही राजधानी. पराक्रमी इंका पाचाकुटी चा पुतळा शहराच्या मध्यभागी आहे. त्याच्या सभोवती कॅथेड्रल सह अनेक चर्च आहेत. येथील प्राचीन इमारत कोरीकंचा नावाने ओळखली जात. विराकोचा या त्यांच्या ब्रह्मदेवाचे व सूर्याचे इथले मंदिर तोडून ही चर्चेस बांधण्यात आली. मूळ वर्तुळाकार गाभारा व ज्याची पूजा होत असे तो मोठ्या वरवंट्यासारखा दगड मात्र जपून ठेवण्यात आला आहे, जेणेकरून ख्रिश्चनेतर लोकांनाही पूजेसाठी चर्चमध्येच यावे लागेल! हलकटपणाची अशी उदाहरणं सर्वत्र मिळतात. इमारतींचा पाया मूळ ठेउन वर बांधकाम केलेले आहे. पण त्यातही केचुआ लोकांची प्रगत स्थापत्यकला दिसून येते.
जवळपास लहान-मोठ्या अनेक पुरातात्विक जागा आहेत. सॅक्साय्वामान नावाचा किल्ला पाहण्यासारखा आहे. अतिभव्य शिळा रचून बांधलेली त्याची तटबंदी आजच्या तंत्रज्ञानालाही आव्हान देईल! तांबोमाचे नावाची सुंदर झ-यांची जागा व जवळच असलेली केंगो गुहा, दोन्ही गूढ़ प्रार्थनास्थळे. त्यातही ती गुहा, 'भारीत' म्हणण्यासारखी… अजून एक गौण उल्लेख, बंजी जंप व स्लिंग शाॅट या साहसखेळाचाही अनुभव इथे घेतला. कुझ्को नाव कुसकं असलं तरी माचुपिचू चे प्रवेशद्वार असल्याने पर्यटकांची भरपूर गर्दी व सर्व सोयी उपलब्ध आहेत. पुढील भागात माचुपिचू…!
नकाशा
कोरिकंचा - आताचे सांतो डोमिन्गो
इंका स्थापत्यविशेषः तशिव आणि एकमेकांत मिसळणारे दगड, काटेकोर कोन
मध्यवर्ती भागातील चर्च व चौक.
रात्रीचा देखावा
कॅथेड्रल
सम्राट पाचाकुटी चा पुतळा
सॅक्साय्वामान किल्लाः तटबंदी
एकमेकांत मिसळणारे प्रस्तर
भव्यतेची कल्पना येण्यासाठी मानवाकृतीशी तुलना
ताम्बोमाचे झरे
बाजूचे डोंगर
बंजी जंप
प्रतिक्रिया
22 Aug 2014 - 12:52 pm | प्रचेतस
भारी फोटो आहेत ओ.
माचु पिचूची वाट बघतोय.
22 Aug 2014 - 6:06 pm | विलासराव
मस्त चालु आहे प्रवास.
वाचतोय.
22 Aug 2014 - 6:14 pm | शिद
मस्त झाला आहे हा भाग देखील.
सॅक्साय्वामान किल्ल्याची तटबंदीचा फोटो मस्त आलाय.
22 Aug 2014 - 6:23 pm | एस
तुम्ही नुसतीच भटकंती करत नाही आहात तर तिथल्या संस्कृती, लोकसमुदाय, निसर्ग, इतिहास या सगळ्या बाबी समजून घेऊन इथे टाकत आहात हे आवडले. पुभाप्र.
23 Aug 2014 - 1:26 am | पहाटवारा
हेच म्हणतो. सुरेख फोटोंबरोबर लेखाच्या सुरुवातीची माहिती त्या फोटोंकडे बघण्याचा एक परिमाण देते.
एक्दा जायलाच हवे इथे !
-पहाटवारा
22 Aug 2014 - 11:47 pm | खटपट्या
समर्पक भाउ !! तुम्ही मिपा छायाचित्रण स्पर्धेमध्ये भाग घ्या !!!
22 Aug 2014 - 11:52 pm | प्यारे१
खासच. स्वॅप्स शी सहमत.
पहिल्याच लेखमालेत मिपाला आपलंसं करुन घेतलंत. ___/\___
23 Aug 2014 - 12:05 am | मधुरा देशपांडे
सहज, सोपे, सुंदर वर्णन आणि तेवढेच अप्रतिम फोटो.
5 Sep 2014 - 3:42 am | रेवती
मूर्ख धर्मविस्ताराकांक्षांपाई आज कित्येक कल्पक कलाप्रवीण व प्रगत समाज या जगातूनच नाहीसे झाले त्याविषयी विषाद वाटतो़.
अगदी खरे! चित्रे आवडली.