या भागात अजुन थोडे पूर्वतयारीविषयी. भाषा हा अतिशय महत्वाचा घटक आहे. हा देश स्पेन साम्राज्याचा भाग होता त्यामुळे व्यवहाराची भाषा 'एस्पान्योल्' आहे. इंग्रजीशिवाय कोणतीही भाषा बोलली जात असलेल्या प्रदेशात जर तिथल्या रंगात रंगायचे असेल तर भाषेचा रंग आधीपासूनच चढवायला घेणे आवश्यक आहे, जेणेकरून त्या भूमीवर उतरताक्षणीच मिसळून जाणे कठिण जात नाही... आपण भाग्यवान भारतीय, देशांतर्गतच हे अनुभवू शकतो, पण ती रंगण्याची इच्छा आणि तयारी हवी. याआधीही अशा एका देशाला भेट दिल्यामुळे या भाषेचा अभ्यास आधी एकदा झालेला होता, आता परत त्याची उजळणी आणि काही नवीन भर असा पहिले दोन महिने उद्योग होता. साधारण मूलभूत प्रश्न विचारता आले पहिजेत (उदा. रहायची सोय, बघण्यासारखी ठिकाणे, स्वच्छतागृहे, प्रवासी थांबे, ठिकाणापासून अंतर-वेळ, समय, पोलिस-डॉक्टर-पोस्ट,भारतीय दूतावास इ.) तसेच 'ही सुंदर भाषा मला थोडीशीच येते' 'मला समजलं नाही, परत/हळू सांगता का?' आदी उपयोगी वाक्ये आणि समोरच्याने सोप्या भाषेत बोललेले कळणे आवश्यक आहे.
आणि एकल प्रवासामध्ये तर भाषा येणे अजून महत्वाचे. तुम्ही एकटे असता तेव्हा निश्चितच दुर्बल असता, त्यामुळे फ़सवले जाण्याची शक्यता अधिक, तेव्हा भाषा समजणे, व आपल्याला भाषा समजते हे इतरांना समजणे याने मोठा फ़रक पडतो. अजुन एक फ़ायदा मला असा झालाः शक्यतो एकल प्रवासी संस्कृती मधे वेगवेगळ्या ठिकाणचे लोक एकत्र रहातात, फ़िरतात आणि त्या त्या ठिकाणी त्यांचा एक तात्पुरता कंपू बनत जातो. (क्वीन चित्रपटात याची एक झलक पहावयास मिळते). मुख्यतः जपान, ऑस्ट्रेलिया, पूर्व युरोप त्यांच्या कंपूत भाषा येणा-यांचे अजून महत्व वाढते.
आता या भागातील भटकंती, पराकासवरून आता जरा समुद्रापासून दूर ईका शहराकडे प्रस्थान. जवळच पिस्को नावाचे शहर आहे. त्या नावाची ब्रॅन्डी इथे फ़ार् प्रसिद्ध आहे. त्याच्या वाईनरीज्/डिस्टिलरीज् जवळपास आहेत. त्यातील एकाला भेट दिली. 'टकामा' दारूभट्टी शतकाहून जुनी व अजून कार्यरत आहे. 'पिस्को सोअर्' या नावाने प्रसिद्ध इथली मदिरा जणु पेरूचे 'राष्ट्रीय मद्य' आहे. ईथून इका जवळच आहे. आता आपण भर वाळवंटात आहोत. जगातील सर्वात उंच वाळूच्या टेकड्यांचा हा प्रदेश आहे. शहराच्या पश्चिमेला अगदी जवळच एक निसर्गाचा चमत्कार, व्हाकाचिना मरूद्यान आहे. उंचच् उंच वालुकापर्वतांच्या मध्ये एक सुंदर तलाव आणि त्या पाण्याच्या आधाराने वाढलेली रम्य हिरवळ. इथेच बर्फ़ाप्रमाणे वाळूचे खेळ खेळता येतात. 'स्नो बोर्डिंग' ब्लॅक डायमंड लेवल् पर्यंत येत असल्याने सॅन्ड्बोर्डिंग अजून मजेदार वाटले. एक बग्गी दिलेली होती, ती आपल्याला टेकडीवर घेऊन जाते आणि मग आपण घसरत खाली यायचं, परत बग्गी दुस-या टेकडीवर घेउन जाते, असा हा सूर्यास्ताजवळच्या एक दोन तासांचा खेळ. वाळवंट असलं तरी तापमान इथे खूपच कमी असते. इथूनच पुढे जगप्रसिद्ध नाझ्का रेषा आहेत. तिथे विमान सफ़र उपलब्ध आहे. तेथील गूढ अद्यापही तसेच असल्याने फ़क्त बघून परत यायचे एवढेच. त्याविषयी जालावर भरपूर माहिती आहेच्, त्यामुळे त्याविषयी अधिक नंतर कधी.
अटाकामा वाळवंट
आमची बग्गी
सॅन्ड्बोर्डिंग अधिक माहिती
वरील सर्व चित्रे वाळूविरोधी (सॅन्डप्रूफ) कॅमेरातील असल्याने दर्जा थोडा कमी आहे. खालील चित्रे आता नेहमीच्या कॅमेरातून
व्हाकाचिना मरूद्यान
प्रतिक्रिया
15 Aug 2014 - 11:39 am | डॉ सुहास म्हात्रे
मस्त !
व्हाकाचिना मरूद्यान आश्चर्यकारक आहे ! त्याचा खालून तिसरा फोटो खास आवडला !!
15 Aug 2014 - 11:42 am | रुस्तम
मस्त ! पू भा प्र ....
15 Aug 2014 - 2:37 pm | शिद
पेरु देशाबद्दल फक्त भुगोलाच्या पुस्तकात वाचलं होतं पण तुमच्या ह्या प्रवासवर्णनामूळे त्या देशाची तोंडओळख सुद्धा झाली. धन्यवाद.
फोटो सुद्धा जबराट आले आहेत सगळे. अगदी मागच्या २ लेखातील सुद्धा.
मस्त चालू आहे तुमची सफर. और आने दो.
15 Aug 2014 - 9:59 pm | खटपट्या
सर्व फोटो आणि माहित छान !
मरूउद्यान तर स्वप्नवत आहे !!!
पु. भा. प्र.
16 Aug 2014 - 12:30 am | सखी
छान वर्णन आणि फोटो. दुसरा भागही आत्ताच वाचला.
वरचे मरूद्यान खरच ओयासिस आहे, सुरेख फोटो आलेत सगळे. सॅन्ड्बोर्डिंग ऐकले नव्हते, त्याची आणि मरूद्यानची अजुन माहीती दिली तर बरं होईल. इतकं गरम असताना तिथे पाणी कसं रहात असेल?
22 Aug 2014 - 2:35 pm | समर्पक
हे वाळवंट सहारा किंवा थर सारखे उष्ण नाही, त्यामुळे पाणी लगेच उडून जात नाही, पण ते आले कसे हे मात्र विशेष! अंतर्गत झरे इथे पाणी घेऊन येत असावेत.
16 Aug 2014 - 1:13 am | मधुरा देशपांडे
फारच छान. या देशाविषयी पहिल्यांदाच वाचायला मिळते आहे. अजुनही सविस्तर वर्णन वाचायला आवडेल जसे की तुम्ही आधीच्या भागात लिहिले आहे की स्थानिक लोकांकडे राहिलात, ते काही अनुभव, त्या देशाच्या संस्कृतीबद्दल काही अनुभव इत्यादी. फोटो मस्तच.
16 Aug 2014 - 1:22 pm | प्यारे१
सुंदर प्रवासवर्णन. उच्च फोटो.
19 Aug 2014 - 3:35 pm | प्यारे१
फोटो बघताना 'ममी' सीरिज आणि स्कॉर्पियन किंग आठवले.
20 Aug 2014 - 3:37 pm | बॅटमॅन
अगदी अस्संच.
18 Aug 2014 - 10:35 am | प्रसाद१९७१
माझा आधीचा प्रतिसाद मिपा च्या प्रॉब्लेम मुळे उडाला.
प्रवास वर्णन मस्त च.
काही जास्तिची माहीती लिहु शकाल का? जसे की प्रत्येक ठीकाणी रहाण्याचा, प्रवासाचा, खाण्याचा खर्च. तुम्ही भारताच्या बाहेर असता का? भारतातुन एकदम पेरू ला जाणे जरा अवघड आहे. इत्यादी इत्यादी.
22 Aug 2014 - 2:32 pm | समर्पक
मी भारतातच आहे. भटकंती संपल्यावर रहाण्या-खाण्याविषयी विस्ताराने लिहीन.
19 Aug 2014 - 1:12 pm | उदय के'सागर
मरूउद्यान फारच सुंदर. तिथे पाण्याचं तळ कसं काय? ते नैसर्गिक आहे का की मानव निर्मित? प्रश्न थोडा वेड्यासारखा आहे खरा पण एवढ्या रखरखीत वाळवंटात पाण्याने काठोकाठ भरलेलं तळ पाहून प्रश्न विचारायचं राहावलं नाही.
आम्हाला पेरु देश फक्त भुगोलाच्या पुस्तकातून माहित होता, शाळा सुटल्यावर मग 'मिस वर्ल्ड', 'मिस युनिव्हर्स' पाहातांना पुन्हा तो देश प्रेक्षणीय वाटे एवढाच काय तो सबंध. पण तिथे इतरही प्रेक्षणीय स्थळं आहेत हे तुम्ही दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद ;)
19 Aug 2014 - 2:09 pm | बॅटमॅन
स्वप्नवत!!! मस्त!
20 Aug 2014 - 3:35 pm | पैसा
खूपच छान लिहिलय. फोटो तर अप्रतिम आहेतच!
28 Aug 2014 - 4:15 pm | कपिलमुनी
एकदम चित्रपटात पहिल्यासारखच आहे ..
द ममी ची आठवण झाली
28 Aug 2014 - 5:28 pm | रायनची आई
उशीरा प्रतिसाद देत आहे..पण ते मरुदद्यान स्व्प्नवत वाट्ले..अस काही खरच अस्तित्वात असेल असा कधीच विचार केला नव्हता..अशा ठिकाणाची ओळ्ख करुन दिल्याबद्द्ल धन्यावाद..
5 Sep 2014 - 3:37 am | रेवती
मरूउद्यान अतोनात सुंदर आहे. बाकी चित्रेही आवडली. माहिती थोडक्यात असली तरी आवडली.