विदेशातील प्रवासाचा महत्वाचा पैलू म्हणजे 'ब्रँड इंडिया'! जेव्हा आपण परदेशात जातो तेव्हा कळत नकळत आपल्या देशाचे आपण ब्रँड प्रमोटर बनतो. या संदर्भात बरेच अनोखे, कधी मजेशीर अनुभव आले. भारतीयांना तेथे सरसकट 'हिंदू' म्हणतात, आणि स्पॅनिशमध्ये ह उच्चाराचा लोचा असल्याने काहिसा 'इंदू' असा उच्चार करतात. आणि आपण पेरूविषयी जितके जाणतो त्याच्या कैक पटींनी अधिक ते भारताविषयी जाणतात.
स्थानिक आणि माझ्यासारखे अनेक इतर देशांचे एकल प्रवासी मला या काळात भेटले. त्यातील प्रत्येकाला मी भारताविषयी आवर्जून विचारत असे. योग, ताज, कामसूत्र, अध्यात्म, गांधी, आयुर्वेद, नाग इ. शब्द (कीवर्डस्) (उतरत्या क्रमाने) तर हमखास उत्तरामध्ये सापडतात. या सर्वांविषयी परदेशी लोकांना अतिशय कुतुहल असते. व वरील ४ विषयात सर्व भारतीय पारंगत असतात असा (भारताशी विशेष संबंध न येणा-या देशातील लोकांना) एक (गैर)समज असतो. एका ठिकाणी क्रोएशियन रुममेटनी तिला तिच्या देशात कुणीतरी शिकवलेल्या सगळ्या 'व्हील पोझ्', 'कॅमल पोझ्' आदी आसनांची खरी नावे आणि पद्धति पडताळून घेतली. दुस-या दिवशी अजुन ५-७ उपस्थितीत आमचं 'योग प्रशिक्षण शिबीर' पार पडलं!
खाण्या-पिण्याच्या बाबतीत तर वेगळा लेख लिहीनच, पण मांसवर्जित जीवनपद्धती असू शकते हे दक्षिण अमेरिकेत कुणाला सांगूनही पटत नाही. त्यामुळे शाकाहारी खाण्याची व त्याबरोबर भारताची एक नवी ओळख ज्यांच्या ज्यांच्या स्वयंपाकघरात मला मुक्त प्रवेश मिळाला त्यांना, आणि जे माझ्याबरोबर जेवायला असत त्यांना झाली. काही जण असे भेटले की तीन चार वेळा भारताला भेट देउनही पूर्ण बघून झाला नाही म्हणून खंत बाळगून आहेत, तर काही इथल्या गर्दी अस्वच्छता अरेरावी व फसवण्याच्या प्रवृत्तीचे किस्से ऐकून इथे न येण्याचं ठरवून बसलेले आहेत. असा कुणाकुणाला ऐकीव, बघीव माहितीतून समजलेला आणि त्यांच्या समजण्यातून मला समजलेला भारत!
आता भटकंती, अरेकिपाहून पुढे आता डोंगराळ भाग आहे. पुढचा प्रवास बसनी पुनो पर्यंत. हा संपूर्ण मार्ग खूप उंचीवरचा आहे. हे उंचीवरील पठार अल्टिप्लॅनो म्हणून ओळखले जाते. हा भूभाग खूप कमी पर्जन्याचा, नापिक व रूक्ष आहे. अल्ट्रा व्हायोलेट इंडेक्स नेहमीच अतिशय जास्त असते. अशा कारणांमुऴे स्थानिकांचे आयुर्मान खूपच कमी (जेमतेम ४०) आहे. येथे लोकांची उंचीसुद्धा खूपच कमी आहे; ५ फूट म्हणजे ताड़-माड, सरासरी ४'३''! या पठारावर अनेक सुप्त ज्वालामुखी आहेत. बाक़ी भाग अतिशय रूक्ष असला तरी अधेमधे असलेले तलाव सौंदर्यातही भर पाडणारे आहेत आणि जीवनाधारही आहेत. उंचीमुळे जाणवणा-या थकवा व सुस्तीसाठी येथे कोकाची पाने खातात वा त्याचा चहा पितात, त्याविषयी अधिक अन्नसंस्कृतीबद्दलच्या भागात. संध्याकाळी पुनोमध्ये मुक्काम केला.
दुस-या दिवशी सूर्योदयालाच टिटिकाका सरोवर. हे जगातील सर्वोच्च नौकानयनक्षम सरोवर आहे. किना-यावरून विटांनी बांधलेल्या पुनो शहराचे व अथांग सरोवराचे अनुपम दृश्य दिसते. नंतर पुनोचे कॅथेड्रल पाहिले, व न्याहरी आटोपून परत बसचा प्रवास. पण आता ही टुरिस्ट बस होती. हा कुझ्को पर्यंतचा रस्ता 'रुता डेल सोल' अर्थात सौरमार्ग म्हणून ओळखला जातो. हा मार्ग काही जुन्या ठिकाणांना भेट देत 'ला राया' येथे १४००० फुटांपर्यंत चढत जातो. नंतर पूर्ण कुझ्को पर्यंत उतार. मार्गावर काही केचुआ (इंका) व काही कॅथलिक पुरातत्व स्थळे आहेत. संध्याकाळी कुझ्को मुक्कामी. त्याविषयी अधिक पुढील भागात.
अँडीज् मधील ज्वालामुखी:
लगून
अग्निपंख फ़्लेमिंगो
थोड़ी वेगळी जात
सरोवर
सूर्यास्त
टिटिकाका सरोवर
सूर्योदय
पुनो शहर
पुनो कॅथेड्रल
टिटिकाका सरोवर
अँडियन लँडस्केप
पुकारा येथील चर्च
अँडीज् पर्वत
ला राया पास १४,१५० फूट
अल्पाका
राक्ची चर्च
राक्ची येथील पुरातन केचुआ देव 'विराकोच्चा' याचे मंदिर
अंडाव्हालियास् 'सिस्टीन चॅपेल'
प्रतिक्रिया
19 Aug 2014 - 11:32 pm | डॉ सुहास म्हात्रे
मस्त चाललीय सफर. सुंदर फोटो.
अँडीज् पर्वताच्य दुसर्या फोटोत मध्यभागी (जरासा उजवीकडे) जो कडा (रिज) दिसतोय त्याचा ल्कोज अप आहे का ? असल्यास टाकू शकाल काय ?
22 Aug 2014 - 2:10 pm | समर्पक
चालत्या बसमधून काढल्याने जरा हलला आहे
19 Aug 2014 - 11:44 pm | प्यारे१
अ प्र ति म!
परत यावंसं वाटतं तिथून?
19 Aug 2014 - 11:56 pm | मधुरा देशपांडे
सुंदर वर्णन आणि फोटो. पुभाप्र.
20 Aug 2014 - 1:29 am | रामपुरी
नवीन प्रदेशाची ओळख होत आहे.
प्रकाशचित्रे आवडली
20 Aug 2014 - 8:14 am | अजया
अप्रतिम फोटो!पुभाप्र.
20 Aug 2014 - 9:21 am | प्रचेतस
अतिशय सुरेख फोटो आहेत.
20 Aug 2014 - 10:07 am | सौंदाळा
सुंदर,
पुभाप्र
20 Aug 2014 - 10:07 am | अत्रुप्त आत्मा
बोले तो................ झका.........................स!!!
20 Aug 2014 - 2:17 pm | एस
सर्वच फोटो अप्रतीम तर आहेतच. वर्णनही खूप छान. परदेशी लोकांना दिसलेला भारत जाणून घेणे आवडले. केचुआ संस्कृतीही आवडली. धन्यवाद! अजून येऊ द्यात.
30 Apr 2015 - 6:49 am | स्रुजा
खरंच. इतकी छान लेखमाला कशी निसटली माझ्या नजरेतून कळेना. आता बसून सगळे भाग नीट वाचते.
20 Aug 2014 - 2:46 pm | शिद
एकसोएक जबराट फोटो आहेत सगळेच. _/\_
20 Aug 2014 - 9:10 pm | विलासराव
सर्व भाग आत्ताच सलग वाचुन काढले.
अप्रतीम प्रकाशचित्रे आणी मोजके वर्णन भावले.
जियो....
21 Aug 2014 - 3:30 am | खटपट्या
सर्व फोटो छान !! वर्णनही सुन्दर !!
अल्पाका, माझा आवड्ता प्राणी
23 Aug 2014 - 4:17 pm | कवितानागेश
आज सगळे भाग नीट बघितले. फारच सुंदर आहेत फोटो.
लेक टिटिकाका नेहमीच गूढ वाटतो. आजपर्यंत त्याचे जितके फोटो पाहिलेत, त्यात अतिशय आकर्षक असं काहितरी वाटतं...
तिकडे जमीन कशी काय असेल हो? म्हणजे गुंठ्याला काय भाव वगरै... ;)
आणि अल्पाका तर फारच गोड! :)
28 Aug 2014 - 4:20 pm | कपिलमुनी
लोका पर्यटन स्थळे एवढी स्वच्छ कसे काय ठेउ शकतात
5 Sep 2014 - 3:41 am | रेवती
सुंदर.
29 Apr 2015 - 1:49 pm | गणेशा
अप्रतिम .. निव्वळ अप्रतिम .. फोटो आणि वर्णन खरेच वाचतच रहावे असे.. पहिल्या भागा नंतर १ भाग वाचुन लंच ला जावु असे ठरवले होते.. आता ५ भाग वाचले तरी लक्षात आले नाही जायचे..
मस्त लेखमाला.. आवडले एकदम..
जीवनात असा प्रवास झाला पाहिजे असे वाटते.. आता तरी पैसा मॅटर्स
30 Apr 2015 - 2:08 am | यशोधरा
सुरेख आहेत फोटो!